श्रावण महिना आला की लोकं ठरवतात चातुर्मास पाळायचा.
महाराज म्हणतात " माझ्या माणसांने चातुर्मास कसा पाळावा?
तर आपल्यातला एक दुर्गुण पकडावा.
तो चार महिने सोडण्याचा प्रयत्न करावा.
समजा,आपण खूप रागावता. तर चार महिने रागावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करा. बरं...
आपण कुठे नोकरीत वरच्या पदावर असाल, तर आपल्या हाताखालच्या लोकावर रागवावं लागत असेल .!
आई वडील असाल तर मुलांवर रागवावं लागत असेल अशा प्रसंगी .
रागवताना राग फक्त चेहऱ्यावर असू दे,मनातून नको ! आतून मन शांत असावे, राग हा सोंगाचा राग असावा
जसे चातुर्मासात लोकांकडे गेल्यावर त्यांनी काही खायला दिले तर आपण म्हणतो नां?
या पदार्थात कांदा नाही नां? माझा चातुर्मास आहे! जसा कांदा,लसूण अध्यात्मानं वज्र्य ठरवला आहे, असं मानतात
तसेच, जेव्हा जेव्हा रागाचा प्रसंग येईल , तेव्हा तेव्हा आपल्या मनाला आठवण करून द्यावी की आपला चातुर्मास आहे ! राग आपल्यासाठी वर्ज्य आहे ! आपल्याला रागवायचं नाही ! असा नियम करून प्रथम पहिले चार महिने राग सोडावा ,
मग जर असा दुर्गुण पहिले चार महिने सोडता आला, तर तो वर्षभर सोडण्याचा प्रयत्न करावा
वर्षभर साधलं तर जन्मभर सोडावा !
असा चातुर्मास करणाऱ्या माझ्या माणसानं कांदा खाल्ला काय आणि न खाल्ला काय सारखाच!गोंदवलेकर महाराज.
2 Jul 2017
श्रीमहाराजांनी केलेलं चातुर्मासाचं मार्गदर्शन
24 Jun 2017
गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनांमधील काही बोधवचने
| रामनाम हे ओंकाराचेच स्वरूप आहे. ते सर्व कर्मांचा आणि साधनांचा प्राण आहे. | ” |
| “ | नामस्मरण 'समजून' करावे. समजून म्हणजे 'राम कर्ता' या भावनेत राहून. | ” |
| “ | परमात्म्याने आपल्याला सांगून ठेवले आहे की, "तू माझा व्हावास असे तुला वाटते आहे ना ? मग तू प्रपंच अतिदक्षतेने कर. प्रयत्नाला कधी मागे पाहू नकोस, पण फळ देणारा मी आहे ही भावना ठेवून तू वाग. जी परिस्थिती येईल त्यात समाधान बिघडू देऊ नकोस आणि मी जे सांगतो ते औषध घे. ते तुला सर्व रोगांतून मुक्त करील; आणि ते औषध जर कोणते असेल तर ते माझे 'नाम' हे होय." | ” |
- व्यवहारदृष्टया माझ्यामध्ये एकच दोष आहे की, मला कुणाचे दुःख पाहवत नाही. माझ्यामध्ये प्रेमाशिवाय दुसरे काही सापडायचे नाही. माझ्यातले प्रेम काढले तर मग 'मी' नाहीच ! मला फक्त आईच्याच प्रेमाची कल्पना आहे. माझ्याकडे येणार्या माणसाला माहेरी आल्याप्रमाणे वाटले पाहिजे; तो परत जातांना त्याच्या डोळ्यात पाणी आले पाहिजे.
- दुसर्याला आपला आधार वाटला पाहिजे. मी असून काहीच होत नाही; ज्या गोष्टी घडायच्या त्या घडतच असतात. पण आपण असण्यात एक आधार आहे असे इतरांना वाटावे. माझे आता किती दिवस आहेत कुणास ठाऊक! मी पुढे असो वा नसो, मी जे सुरुवातीला सांगितले तेच मी शेवटीही सांगतो: तुम्ही कसेही असा पण भगवंताच्या नामाला सोडू नका.
- प्रेम ही भगवंताची वस्तू आहे. प्रेम करायला आपण आपल्या घरापासून सुरुवात करावी. सर्वांशी अत्यंत प्रेमाने, निष्कपट प्रेमाने वागावे. आपले बोलणे अगदी गोड असावे. आपल्या वागण्या मध्ये, नव्हे पाहण्यामध्ये सुद्धा प्रेम असावे. प्रेम करायला गरीबी आड येत नाही, किंवा श्रींमंती असेल तर फार द्यावे लागत नाही. नाम हे प्रेम स्वरुप आहे,आणि खरा प्रेमाचा व्यवहार म्हणजे देणे-घेणे होय. म्हणून, नाम घेतले की, भगवंताचे प्रेम येईलच.
- आनंद पाहायला आपल्याला दुसरे कुठे जावे लागते का ? नाही. जो स्वतःच आनंदरूप आहे त्याने आपण होऊन 'मी दुःखी आहे' असे मानून घेतले आहे.
- ज्यांना व्याप आहे ते लोक रडतात, आणि ज्यांना व्याप नाही तेही लोक रडतात; मग सुख कशात आहे ? पैसा सुख देतो का? पैसा मिळवणे कठीण, मिळाला तरी तो कायम राहील का त्याची शाश्वती नाही. पैशाप्रमाणेच इतर सर्व वस्तूंची गोष्ट आहे. सर्वसुखी असा प्रपंचात कोण आहे ? प्रत्येकाचे काही ना काही तरी गार्हाणे आहेच. प्रत्येकाला आशा वाटते की मी उद्या आजच्यापेक्षा सुखी होईल. तो कधी पूर्ण सुखी होत नाही, त्याचे गार्हाणे कधी संपत नाही.
- मनुष्याची शांती बिघडायला जगामध्ये दोनच कारणे आहेत. एक म्हणजे आपल्याला हवे ते न येणे, आणि दुसरे म्हणजे आपल्याला नको ते येणे. या दोन्हीपैकी आपल्या हातामध्ये एकही नाही; मग आपण दु:ख का करावे? भगवंताच्या नामाची एकदा गोडी लागली ना, की सर्व काही साधते. नाम अभिमानाचा नाश करते. नामाने हवे-नको-पणाची बुद्धी होत नाही. साधुसंतांनी आवर्जून सांगितलेले हेच नाम तुम्ही सतत घेऊन समाधानाचा शाश्वत ठेवा मिळवा.
- जगाची आशा, आसक्ती, सोडल्याशिवाय परमेश्वराला आपली हाक कशी पोहोचेल? ज्या गोष्टीवर आपले प्रेम असते त्याच गोष्टीची आपल्याला नड लागते. आपल्याला देवाची नड लागली आहे का? देवाचे प्रेम लागायला त्याच्या अखंड सहवासात राह्ण्याची अत्यंत जरुरी आहे; आणि हा सहवास जर कशाने साधत असेल तर तो एक त्याचे नाम घेतल्यानेच साधेल. भगवंताचे नाम घेऊन त्याचे प्रेम मिळवा, हेच माझे सांगणे.
- ज्याच्यामध्ये भगवंताची आठवण राहील, तो विवेक समजून आचरणात आणा. प्रपंच उत्तम करा, पण त्याच्या अधीन होऊ नका. अधीन होणे हे पाप आहे, प्रपंच करणे हे पाप नाही. शक्य तितके धर्माचे पालन करा; नीती प्राणाबरोबर सांभाळा; आणि प्राण गेला तरी नामाची धुगधुगी राहू द्या, इतके नाम तुम्ही सांभाळा.
- आपले ध्येय काय असावे हे ठरविण्याची बुद्धी माणसाला आहे, ती खालच्या प्राण्यांना नाही. हाच माणसांत आणि त्या प्राण्यात फरक आहे. प्राण्यांना प्रारब्धाने आलेले भोग भोगावे लागतात, त्याचप्रमाणे माणसालादेखील आलेले भोग भोगावे लागतात. पण भगवंताचा पाठिंबा ज्याला आहे तो मागेपुढे सोयीने भोग भोगू शकतो.
- दुसरे काही एक न करता सतत निश्चयाने नामात राहण्यार्या माणसाला संतांची भेट झाली की ते त्याचे कल्याण करतात.
- ज्याप्रमाणे एकच ठिणगी सबंध कापसाचा नाश करायला समर्थ असते, त्याप्रमाणे भगवंताचे नाम सर्व पापांचा नाश करायला समर्थ असते.
- खरे सांगतो मी, मनुष्याने जन्माला येऊन एकच करावे: आपण नामात रहावे, आणि दुसर्यास नामास लावावे. संसारात न्यून पडू देऊ नये आणि भगवंताला विसरू नये.
- आपल्या बाळाला दुःख व्हावे असे माऊलीला कधी वाटेल का ? आपण तिला मनापासून हाकच मारीत नाही. भगवंताचे नाम मनापासून घेतच नाही; इथेच आपले सर्व चुकते. तेव्हा गोंदवल्यास आल्यासारखे, रामाजवळ जाऊन आता तुम्ही एकच मागा, 'रामा, तुझे प्रेम आम्हाला दे.' तुम्ही मागाल ते तो तुम्हाला खात्रीने देईल यावर विश्वास ठेवा. तो त्याच्यासाठीच इथे उभा आहे. रामाची भक्ती करण्याने, आपला संसार आपली कल्पनाही होणार नाही इतका सुखाचा होईल. कोणत्याही परिस्थितीत नामाला सोडू नका. भगवंताच्या नामानेच त्याचा सहवास घडेल आणि त्याचे प्रेम उत्पन्न होईल.
- भगवत्प्राप्तीसाठी एक सुलभ उपाय आहे: भगवंताशी आपले नाते जोडावे, कोणते तरी नाते लावावे. भगवंत हा माझा स्वामी आहे, मी त्याचा सेवक आहे; तो माता, मी लेकरू; तो पिता, मी पुत्र; तो पती, मी पत्नी, तो पुत्र, मी आई; तो सूत्रधार, मी बाहुले; असे काही नाते लावावे. मुलगा दत्तक घेतल्यावर मग त्याच्याशी पुत्रप्रेम लावतो की नाही? लग्न होण्यापूर्वी कोण नवरा आणि कोण बायको? पण लग्न होताच ते नाते लावतो, आणि सहवासाने प्रेम वाढवतो. प्रेम केल्याने प्रेम वाढते. तसे भगवंताविषयीचे प्रेम कोणचे तरी नाते लावून वाढवावे. किंबहुना तो स्वभावच व्हावा, म्हणजे भगवत्प्राप्ती सुलभ होते.
कै. के. वि. बेलसरे यांनी सांगितलेला श्रीमहाराजांचा ‘निरोप’
-
-
-
-
- हाचि सुबोध श्रीगुरूंचा
-
-
-
नाम सदा बोलावे, गावे भावे, जनांसि सांगावे । हाचि सुबोध श्रीगुरुंचा, नामापरते न सत्य मानावे ॥१॥ नामात रंगुनीया व्यवहारी सर्व भोग सेवावे । हाचि सुबोध श्रीगुरुंचा, भोगासंगे कुठे न गुंतावे ॥२॥ आंनदात असावे, आळस भय द्वेष दूर त्यागावे । हाचि सुबोध श्रीगुरुंचा, अनुसंधाना कधी न चुकवावे ॥३॥ गोड सदा बोलावे, नम्रपणे सर्वलोकप्रिय व्हावे । हाचि सुबोध श्रीगुरुंचा, भक्तीने रघुपतीस आळवावे ॥४॥ स्वांतर शुद्ध असावे, कपटाचरणा कधी न वश व्हावे । हाचि सुबोध श्रीगुरुंचा, मन कोणाचे कधी न दुखवावे ॥५॥ ’माझा राम सखा, मी रामाचा दास’ नित्य बोलावे । हाचि सुबोध श्रीगुरुंचा, रामपाशी अनन्य वागावे ॥६॥ यत्न कसून करिन मी, यश दे, रामा, न दे तुझी सत्ता । हाचि सुबोध श्रीगुरुंचा, मानावा राम सर्वथा कर्ता ॥७॥ आचार संयमाने युक्त असा नीतिधर्म पाळावा । हाचि सुबोध श्रीगुरुंचा, खेळाएसा प्रपंच मानावा ॥८॥ दाता राम सुखाचा, संसारा मान तू प्रभूसेवा । हाचि सुबोध श्रीगुरुंचा, संतोषा सर्वादा मनी ठेवा ॥९॥ स्वार्थ खरा साधा रे, नित्य तुम्ही नामगायनी जागा । हाचि सुबोध श्रीगुरुंचा, मीपण जाळोनिया जगी वागा ॥१०॥ अभिमान शत्रु मोठा सर्वाना जाचतो सुखाशेने । हाचि सुबोध श्रीगुरुंचा, मारावा तो समूळ नामाने ॥११॥ राज्याधिकार, किंवा जावो समस्त धन मान । हाचि सुबोध श्रीगुरुंचा, भंगावे ना कदा समाधान ॥१२॥ प्रेमात राम रमतो, प्रेमाला मोल ना जगामाजी । हाचि सुबोध श्रीगुरुंचा, गुरुरायाला तहान प्रेमाची ॥१३॥
https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C
15 Jun 2017
एका भक्ताने महाराजांना नाम कोणत्या वाणीने घ्यावे असा प्रश्न विचारला
एका भक्ताने महाराजांना नाम कोणत्या वाणीने घ्यावे असा प्रश्न विचारला यावर महाराजांनी एक गोष्ट सांगितली " एक मोठा गणिती एकदा खेडेगावात गेला. सकाळी गावच्या बाजारामध्ये तो भाजी आणायला गेला. त्याला बटाटे घ्यायचे होते ,एका बाईने बटाट्याचे पंधरा वीस वाटे विकायला ठेवले होते, आणि " बटाटे घ्या, एक आणा वाटा " असे ती ओरडत होती. गणिती तिच्याजवळ गेला व म्हणाला " ए बाई बटाट्याचा मणाचा भाव काय ?" ती म्हणाली " ते मला माहित नाही , हा मी एक आण्याचा वाटा लावला आहे, तुला पाहिजे असला तर घे नाहीतर चालू लाग," या उत्तराने त्याचे समाधान झाले नाही तो मनात म्हणाला 'मणाचा भाव कळल्याशिवाय या बाईने केलेले वाटे बरोबर आहेत कि नाही हे अचूक कळणार नाही' म्हणून तो पुढे गेला. दोनतीन तास झाले तरी त्याने भाजी काही घेतली नाही.पण त्या बाईने मात्र तासाभरात आपले वाटे विकले व आनंदाने ती घरी निघून गेली". महाराज पुढे म्हणाले " विद्वान लोक आपल्या आयुष्याचा अशा व्यर्थ चीकीत्सेने नाश करून घेतात,साधे भोळे ,अडाणी लोक भगवंताचे नाम घेवून मजेने तरुन जातात, विद्वान लोक 'भगवंत कसा आहे,त्याचे गुण काय आहेत ? त्याचा व आपला संबध काय आहे ? त्याचे नाम त्याच्यापर्यंत पोचते कि नाही ? नामाचे प्रकार काय, त्याची सुरवात कधीपासून झाली ? नाम कोणत्या वाणीने घ्यावे परा, पश्यंती, मध्यमा कि वैखरी ? वगैरे गोष्टीची इतकी चिकित्सा करतात कि शेवटी आयुष्याचा अंतकाल येतो, आणि नामाची चिकित्सा तेवढी पदरात पडते नाम घेण्याचा आनंद काही मिळत नाही म्हणून शहाण्या माणसाने प्रथम नाम घ्यावे नंतर चिकित्सा करावी.
https://m.facebook.com/girish.atre.7