Showing posts with label सप्टेंबर. Show all posts
Showing posts with label सप्टेंबर. Show all posts

30 Sept 2017

प्रपंचात असावी खबरदारी । मन लावावे रामावरी ॥

सर्वांचे राखावे समाधान । पण रामाकडे लावावे मन ॥

रामाला स्मरून वागावे जगात आपण । तेथे पश्चातापाला नाही कारण ॥

म्हणून कृतीस असावा साक्षी भगवंत । हा जाणावा खरा परमार्थ ॥

व्यवहार करावा व्यवहारज्ञानाने । परमार्थ करावा गुरूआज्ञेने ॥

कलि अत्यंत माजला । गलबला चोहोकडून झाला ।

चित्त ठेवावे रामावर स्थिर । कार्य घडते बरोबर ॥

स्वस्थ बसावे एके ठिकाणी । राम आणत जावा मनी ॥

प्रयत्‍नांती परमात्मा । ही खूण घालावी चित्ता । व्यवहारी ठेवावी दक्षता ॥

मागील झाले होऊन गेले । पुढील होणार ते होऊ द्यावे भले ।

त्याचा न करावा विचार । आज चित्ती स्मरावा रघुवीर ॥

आंतबट्ट्याचा नाही व्यापार । ज्याने घरी आणला रघुवीर ॥

नुसत्या प्रयत्‍नाने जग सुखी होते । तर दुःखाचे वारे न भरते ॥

म्हणून परमात्मा आणि प्रयत्‍न । यांची घालावी सांगड । म्हणजे मनी न वाटे अवघड ॥

जेथे वाटते हित । तेथे गुंतत असते चित्त ।

चित्त गुंतवावे भगवंतापाशी । देह ठेवावा व्यवहाराशी ॥

चित्ती ठेवावी एक मात । कधी न सुटावा भगवंत ॥

राम माझा धनी । तोच माझा रक्षिता जनी ।

हे आणून चित्ती । विषयाची योग्यतेने करावी संगति ॥

देह करावा रामार्पण । मुखी घ्यावे नामस्मरण ॥

संतांची संगति । रामावर प्रीति । तोच होईल धन्य जगती ॥

व्यवहार सांभाळून । करावा परमार्थ जतन ॥

राम ठेवावा हृदयात । जपून असावे व्यवहारात ॥

रामाचे चिंतन, नामाचे अनुसंधान । वृत्ति भगवत्परायण, साधुसंतास मान ।

आल्या अतिथा अन्नदान, । भगवंताला भिऊन वागणे जाण, ।

याविण परमार्थ नाही जाण ॥ प्रपंचात असावी खबरदारी । मन लावावे रामावरी ।

त्याचा राम होईल दाता । न करावी कशाचीहि चिंता ॥

करवंटीचे कारण । खोबरे राहावे सुखरूप जाण ।

तैसे आपले देहाचे संबंध ठेवून । चित्ती असावा रघुनंदन ॥

परमार्थ करावा जतन । मन करून रामाला अर्पण ॥

प्रपंची असावे सावध । कर्तव्यी असावे दक्ष । तरी न सोडावा रामाचा पक्ष ॥

प्रयत्‍नांती परमेश्वर हे सज्जनांचे बोल । मनी ठसवावे खोल ॥

पण आरंभी स्मरला राम । त्यालाच प्रयत्‍नांती राम ।

हा ठेवावा विश्वास । सुखे साधावे संसारास ॥

कर्तव्यात भगवंताचे स्मरण । हेच समाधान मिळवण्याचे साधन ॥

प्रयत्‍न करावा मनापासून । फळाची अपेक्षा न ठेवून ॥

कर्तव्यात असावे तत्पर । निःस्वार्थबुद्धि त्याचे बरोबर ॥

जोवर देहाची आठवण । तोवर व्यवहार करणे जतन ।

म्हणून प्रयत्‍न करावा कर्तव्य जाणून । यश देणे न देणे भगवंताचे अधीन ॥

२७४. दाता राम हे आणून चित्ती । आपण वर्तावे जगती ॥


29 Sept 2017

प्रपंच हे साधन, परमार्थ हे साध्य.

मी प्रपंचासाठी नसून रामाकरता आहे, ही दृढ भावना ठेवावी. 'मी माझ्याकरता जगतो' असे न म्हणता 'रामाकरता जगतो' असे म्हणू या, मग रामाचेच गुण अंगी येतील. आपण प्रपंचाकरता जगतो, म्हणून प्रपंचाचे गुण अंगी येतात. म्हणून भगवंताकरता जगावे. प्रपंच हे साधन आहे, परमार्थ हे साध्य आहे. प्रपंच कुणाला सुटला आहे ? पण साधू त्याचा सदुपयोग करतात; आम्ही तसा करीत नाही, म्हणून परमार्थ साधत नाही. जगात तीन गोष्टी दुर्मिळ आहेत: मनुष्यजन्म, संतसमागम, आणि मुमुक्षत्व. मनुष्यजन्म हा परमार्थाकरताच आहे, विषयभोगासाठी नव्हे. परमार्थाची तळमळ लागली पाहीजे. तळमळ उत्पन्न झाल्यावर, मन शुद्ध झाल्यावर, राम भेटेलच. समई लावली पण तेल बरोबर् न घातले तर ती विझेल. स्मरणरूपी तेल वारंवार घालावे, मग परमार्थ-दिवा कायम राहील. परमार्थ हा मुख्यतः अनुभवाचा आहे. पंढरपूरला जायचे असेल तर वाट चालू लागले पाहिजे. मग वाटेत कुणीतरी वाट दाखवणारा भेटतोच; निदान पाट्या तरी आढळतात. आम्ही परमार्थमार्गावर प्रत्यक्ष चालूच लागत नाही, मग वाटाड्या कसा भेटणार् ? परमार्थमार्गावर गुरू खास भेटेलच. म्हणूनच रामाचे अखंड स्मरण ठेवून परमार्थाला लागू या.

आचार आणि विचार यांची सांगड असावी. पोथीत जे ऐकतो ते थोडेतरी कृतीत येणे जरूर आहे. पोथी वाचल्यानंतर, जेवढे कळले तेवढे तरी आचरणात आणायला काय हरकत आहे ? जे कळणार नाही तेही पुढे हळूहळू कळेल. घरातून बाहेर पडल्यावर एकदम मुक्कामाचे ठिकाण दिसत नाही. प्रथम एक रस्ता, मग दुसरा, मग तिसरा, असे करता करता आपण मुक्कामाला पोहोचतो. त्याप्रमाणे, पोथीतले सगळे कळले नाही, तरी जे कळले तेवढे तरी कृतीत आणू या. दृढ निश्चयाने एकएक मार्ग आक्रमीत गेलो तर मुक्कामाला खास पोहोचू. म्हणुन भगवत्स्मरणाला जपले पाहिजे. त्याला प्राणापेक्षाही जास्त समजून सांभाळावे. संत, सद्‍गुरू आणि शास्त्र यांच्या वचनावर दृढ विश्वास ठेवावा. तेथे बुद्धिभेद होऊ देऊ नये. याप्रमाणे वागले तर प्रपंच परमार्थरूपच होईल. मी रामाचा म्हणणे हाच परमार्थ, अहंबुद्धी ठेवणे हा प्रपंच. परमार्थात अहंकार मिसळला की तो प्रपंचच झाला; उलट्, प्रपंचातला अहंकार दूर झाला की तो परमार्थच. संसाररूपी वृक्षाला अभिमानाचे पाणी आम्ही वारंवार घालतो म्हणून तो इतका फोफावला. हा मूळ अभिमानच नष्ट केला पाहिजे. खरा कर्ता ईश्वर असताना, जीव विनाकारणच 'मी कर्ता' असे मानतो. झाडाचे पान रामावाचून हलत नाही. देहाचा योगक्षेम तोच चालवितो. मी कर्ता नसून राम कर्ता ही भावना वाढविणे हीच खरी उपासना.

२७३. कर्तृत्व न घेईल तर जीव सुखदुःख भोगणार नाही.

28 Sept 2017

अनुसंधानात राहिल्यावर अभिमान गळून जातो.

अभिमान सोडून जो गृहस्थाश्रम पाळील तोच खरा परमार्थी. अभिमान सोडल्याने गृहस्थाश्रम चांगला होतो. 'मी म्हणेन तसे होईल,' असे कधीही म्हणू नये. अभिमानाच्या पायावर उभारलेली इमारत डळमळीत होणारच. अभिमान हा देहाचा आणि तत्संबंधी विषयांचा असतो. अभिमानाचे मूळच काढून टाकावे; म्हणजे, मी देहाचा आहे म्हणतो, हेच काढून टाकावे. हा देह माझा नाही हे आपल्याला पटते, पण अखंड सहवासाने आपले त्यावर प्रेम जडते. एकदा देहावर प्रेम जडले मग अभिमान आला. त्याच्या पाठोपाठ लोभ, क्रोध येणारच. अभिमान म्हणजे 'मी कर्ता' ही भावना असणे. ही भावना टाकून काम केले, तर् व्यवहारात कुठे नडते ? आपल्या देहाचा आणि मनाचा फार निकटचा संबंध आहे. पण देह केव्हातरी जाणार असल्याने त्याला इतके महत्व नाही. नुसता जाडजुड देह कामाचा नाही. आपले मन तयार झाले पाहिजे. 'मी भगवंताचा आहे' हे एकदा मनाने जाणून घेतले, म्हणजे मग अभिमानरहित होता येते. नेहमी भगवद्‌भजनात राहण्याचा प्रयत्‍न करा, म्हणजे अभिमान शिवणार नाही. डोळ्यात पाणी आणून भगवंताला आळवावे, त्याला शरण जावे; भगवंत कृपा केल्याशिवाय राहणार नाही. आपण आपल्या मर्यादा ओळखून वागावे. अमुक एक गोष्ट अमक्या तर्‍हेने घडावी असे जोपर्यंत आपल्याला वाटते आहे, तोपर्यंत व्यवहाराच्या मार्गाने जो योग्य प्रयत्‍न आहे तो आपण केला पाहिजे. पण प्रयत्‍न केल्यावर मात्र त्याचे फळ भगवंतावर सोपवावे, आणि जे काही घडेल त्यामध्ये समाधान मानावे.

आपले अंतःकरण नेहमी शुद्ध ठेवावे. रात्री निजण्यासाठी अंथरूणावर पडले असताना आपले अंतरंग शोधून पाहावे की, 'मी कुणाचा द्वेष-मत्सर करतो का ?' तसे असेल, तर ते मनातून जबरीने काढून टाकावे; ते थोडे जरी शिल्लक राहिले, तरी आपल्या परमार्थाच्या आड येणार आहे; आपल्या मनाने आपल्याला निश्च्ययाने असे सांगितले पाहिजे की, 'मी कुणाचाही द्वेष करीत नाही.' आपले अंतःकरण इतके शुद्ध आणि सरळ असावे की, आपण तर कुणाचा द्वेष-मत्सर करू नयेच नये, परंतु दुसरा कुणी आपला द्वेष करीत असेल ही कल्पनासुद्धा आपल्याला येता कामा नये. 'मी भगवंताचा आहे, या देहाचा नाही,' असे अखंड अनुसंधान् ठेवून, आपल्याला भगवत्स्वरूप का होता येणार नाही ? जो आतबाहेर भगवंताने भरून राहील किंवा त्या ज्ञानाने भरून राहील तोच खरा ज्ञानी होय' आणि जाणीव ज्याप्रमाणे देहाला व्यापून असते, त्याप्रमाणे भगवंताचे स्मरण ज्याचे मन व्यापून टाकील तोच खरा साधक, तोच खरा अनुसंधानी, आणि तोच खरा मुक्त समजावा.

२७२. विस्तवाजवळ तूप ठेवले की ते वितळते, तसे नामाची शेगडी ठेवली की अभिमान वितळलाच पाहिजे.

26 Sept 2017

भगवंताला विसरणे ही आत्महत्याच.

एकदा एका माणसाने पक्वान्ने कशी तयार करावी हे शिकविण्याची शाळा काढली. त्या शाळेमध्ये तो मनुष्य शब्दांच्या साहाय्याने, निरनिराळी पक्वान्ने कशी तयार करायची, हे आपल्या विद्यार्थ्यांना समजावून सांगे. पण त्या विद्यार्थ्यांना घरी भाकरी करून खाण्यापुरते पीठ देखील मिळत नसे; त्यांना त्या पक्वान्नांच्या ज्ञानाचा काय उपयोग होईल बरे ? त्याचप्रमाणे वेदांताच्या गोष्टी किंवा ज्ञान हे पक्वान्नांच्या ज्ञानासारखे आहे. जो मनुष्य वेदांताचा नुसताच अभ्यास करतो, त्याला त्यापासून तसा काही फायदा होत नाही. जे ज्ञान व्यवहाराला लागू पडत नाही, ते ज्ञान खरे असले तरी आपल्याला उपयोगाचे नाही.

आपल्यात आणि संतांमध्ये फरक हाच की, आपण जगतासाठी देव मानतो, तर् संत देवासाठी जगत मानतात. खरे म्हणजे, जी गोष्ट आचरायला अतिसुलभ असते, ती समजावून सांगायला फार कठीण असते; ती खरी अनुभवानेच जाणायची असते. ज्याचा अनुभव दुसर्‍यावर अवलंबून आहे तो अपूर्ण समजावा; म्हणजेच, जेव्हा मिश्रणाने पदार्थाला चव येते तेव्हा ते दोन्ही पदार्थ अपूर्णच समजावेत. या जगात सर्व दॄष्टीने पूर्ण असा एक भगवंतच आहे; त्याला विसरणे ही आत्महत्याच आहे. तेव्हा नेहमी त्याच्या सान्निध्यात, म्हणजेच त्याच्या नामात, राहाण्याचा प्रयत्न करावा. सर्व कीर्तनांचे सार हेच असते. फक्त मांडणी निराळी.

रामरायांनी सर्व वानरांना सीतामाईचा शोध करायला सांगितले. जो तो 'हूं, हूं' करून शोधासाठी निघून गेला. परंतु मारूती अती बुद्धीमान्; त्याने 'सीतेला कसे ओळखायचे' म्हणून विचारले. त्यावर श्रीरामांनी तिचे पुष्कळ वर्णन केले. ती सुंदर आहे म्हणून सांगितले. परंतु स्त्री कशी दिसते हेच त्याला माहिती नाही ! तेव्हा श्रीरामप्रभू त्याला म्हणाले, "तुला मी काय सांगतो हे कळलेले दिसत नाही; तू आता एकच गोष्ट लक्षात ठेव, जिथे तुला रामनामाचा सारखा ध्वनी ऐकू येईल तिथे ती आहे म्हणून समज." तेव्हा ती खूण मारुतिरायाला पटली. ज्याला भगवंताच्या नामाची खूण मनापासून समजली त्याच्या जन्माचे सार्थक झाले, त्याचा परमार्थ सफल झाला, आणि त्याला जगात मिळवायचे बाकी असे काही राहिलेच नाही. मारुतिरायाची भक्ती फार मोठी. श्रीरामाला वाटले, याला आता काहीतरी 'चिरंजीव' असे दिल्याशिवाय याचे समाधान होणार नाही; म्हणून चिरंजीव असे हे आपले नाम त्याला त्याने दिले. त्यामुळे त्या नामाबरोबर मारुतीही चिरंजीव झाला.

२७०. सर्व संतांचे सांगणे आहे की, मनापासून भगवंताचे नाम घ्या आणि आपले कर्तव्यकर्म करा.

25 Sept 2017

अखंड अनुसंधान ठेवण्याकरिता काय करावे ?

भगवंताने आपल्याला बुद्धी दिली आणि ती चालवून आपण काम करतो, म्हणजे भगवंतच आपल्याकडून सर्व कर्मे घडवीत असतो. त्याच्या प्रेरणेनेच सर्व घडते आहे, अशी भावना प्रत्येक कर्मात ठेवली, म्हणजे भगवंतावर प्रेम जडते. जे जे काही करायचे ते भगवंताकरिता करावे; म्हणजे पापपुण्याची बाधा आपल्याला होणार नाही. एकदा कबीराच्या घरी पाहुणे आले. घरात तर त्यांना जेवू घालायला काही नव्हते. आणि अतिथीला भगवत्स्वरूप पाहावे असे शास्त्र आहे, तेव्हा कबीराने त्यांना पुरेल इतक्याच धान्याची चोरी केली. चोरी करणे हे वाईट असले, तरी ती भगवंताकरिता केल्यामुळे तिचे पाप त्याला नाही लागले. निदान, कर्म झाल्यावर तरी भगवंताचे स्मरण करून ते त्याला अर्पण करावे, म्हणजे हळूहळू अभिमान कमी होऊन भगवंतावर प्रेम जडेल.

आपण भगवंताचे आहोत, जगाचे नाही, असा एकदा दृढ निश्चय करावा. आपण मनुष्य आहोत याची जाणीव जितकी दृढ असते तितका हा निश्चय दृढ असावा. तथापि हे साधणे कठीण आहे. त्याच्या खालोखालचा उपाय म्हणजे, जे काही घडते आहे ते भगवत्प्रेरणेने, त्याच्या सत्तेने आणि इच्छेने घडते आहे, अशी अंतःकरणपूर्वक भावना ठेवावी. आणि हेही साधत नसेल, तर वैखरीने अखंड नामस्मरण करावे. या अनुसंधानाच्या प्रक्रियेत मन भगवंताच्या ठिकाणी चिकटून असते. सध्या आपले उलट चालले आहे; आपण देहाने पूजा करतो, यात्राबित्रा करतो, पण मन मात्र प्रपंचाकडे ठेवतो. सासरी असलेली सून कुटुंबातल्या सर्वांकरिता कष्ट करते; नवर्‍याचे कदाचित् ती फारसे करीतही नसेल, पण अंतःकरणात मात्र ती फक्त त्याच्यासाठीच असते. तसे, प्रपंचात सर्वांकरिता सर्व करावे, पण मनात मात्र 'मी रामाचा आहे' ही अखंड आठवण ठेवावी. आपले स्टेशन ठरून आपण गाडीत बसल्यावर मध्ये अनेक गोष्टी घडतील; उभे राहावे लागेल, निरनिराळ्या तर्‍हेचे लोक भेटतील. पण स्टेशनावर उतरल्यानंतर त्या आनंदामध्ये मागचे सगळे आपण विसरून जातो. तसे भगवंताचे ध्येय निश्चित करावे. भगवन्नाम हे भगवत्कृपेसाठी घ्यावे, कामनापूर्तीसाठी नसावे; नामच ध्येय गाठून देईल. भगवंताप्रमाणे आपणदेखील, प्रपंचात असून बाहेर राहावे; आपल्या देहाकडे साक्षित्वाने पाहायला शिकावे. पण ते साधत नसेल, तर व्यापात राहून अनुसंधानात असावे. वाचलेले विसरेल, पाहिलेले विसरेल, कृती केलेली विसरेल, पण् अंतःकरणात घट्ट धरलेले भगवंताचे अनुसंधान कधी विसरायचे नाही.

२६९. कलियुगात अवतार नसला तरी 'नामावतार' आहे, आणि तोच खरा तारक आहे.

24 Sept 2017

कुटुंबात कसे वागावे ?

देहात आल्यावर, आपले ज्याच्याशी जे कर्तव्य आहे ते बरोबर करावे. घरात अत्यंत समाधान असावे. मुलांनी वडील माणसांचे दोष पाहू नयेत. बाप जसा सच्छील आहे तसे मुलांनी व्हावे., म्हणजे कुळाची कीर्ति वाढते. मोठ्या माणसाने, पेन्शन घेतल्यावर मनाने भगवंताचे नोकर होऊन राहावे. बाईनेही पतीपरते दैवत न मानावे. सर्वांनी भगवंताच्या नामात राहावे. जो मनुष्य तरूणपणी स्वाभाविक रीतीने वागेल त्याला म्हातारपणीही स्वाभाविक रीतीने वागता येईल; म्हणजेच म्हातारपण त्याला मुळीच दुःखदायक होणार नाही. आपण अस्वाभाविक रीतीने, म्हणजेच आसक्तीने वागत असल्यामुळे, म्हातारपणी कर्तेपण कमी होते आणि आसक्ती मात्र टिकते; आणि ती तापदायक बनते. ज्या माणसाची आसक्ती किंवा आग्रह म्हातारपणी सुटलेला असतो, त्याचा देह जरी अशक्त झाला तरी तो सर्वांना हवासा वाटेल. अशक्तपणामुळे त्याला ऐकायला कमी येईल, त्याला दिसायला कमी लागेल, त्याला मागच्या गोष्टींची आठवण राहणार नाही, त्याची झोप कमी होईल; पण हे सर्व होऊनही त्याचा कोणी कंटाळा करणार नाही, आणि त्याला स्वतःलाही जीवनाचा कंटाळा येणार नाही. म्हातारपणी आपण कसे मीपणाने वितळून जावे ! पण मी सांगतो ना !, ही कर्तेपणाची वृत्ती नाहीशी करावी, म्हणजे मग दुःख नाहीच नाही.

प्रपंचात वागत असता प्रत्येकाने अंतर्मुख होऊन, आपले दोष काय आहेत ते हुडकून काढावेत आणि ते घालविण्याचा प्रयत्‍न करावा. वयाची सोळा ते पंचवीस वर्षे हा काल असा असतो की मनुष्याची बुद्धी वाढीला लागलेली असते. ती वाढ योग्य मार्गाने व्हायला बंधनाची अत्यंत आवश्यकता असते. बंधनात उत्तम बंधन म्हणजे आईबाप सांगतील त्याप्रमाणे वागणे हे होय; कारण आपले हित व्हावे यापलीकडे त्यांचा दुसरा हेतू नसतो. जगामध्ये प्रत्येक गोष्ट आपण स्वतःच्या अनुभवाने शिकणे कसे शक्य आहे ? म्हणून आईबापांच्या अनुभवाचा फायदा आपण करून घ्यावा. आपले आईबाप एखादे वेळी चुकणार नाहीत असे नाही, कारण चुकणे हा मनुष्याचा धर्मच आहे; परंतु आपल्याविषयी त्यांची जी हितबुद्धी असते, तिच्यामुळे त्यांची चूक आपले कायमचे नुकसान करणार नाही. कोणता काल कुणाच्या भाग्याने येतो हे सांगता येत नाही. म्हणून आपण कधी कष्टी होऊ नये. सत्कर्म जेवढे मोठे तेवढी विघ्ने अधिक; भगवंताचे अनुसंधान हे सर्वात मोठे सत्कर्म आहे. आपण निश्चयाने आणि निःशंकपणे त्याचे नाव घेऊ या आणि आनंदात राहू या.

२६८. आपले अवगुण शोधावेत व त्यांचा त्याग करून गुण घ्यावेत.

23 Sept 2017

शास्त्रवचन, थोरवचन आणि आत्मसंशोधन.

एकदा उद्धवाने श्रीकृष्णाला विचारले की, "तू आपल्या मुखानेच सांग की आम्हाला तुझी प्राप्ती कशी होईल." तेव्हा परमात्मा म्हणाला, "भक्ती केल्यानेच माझी प्राप्ती होऊ शकते." भक्तीची तीन साधने आहेत - शास्त्रवचन, थोरवचन आणि आत्मसंशोधन. आपले सध्या सगळे विपरीत झाले आहे. शास्त्रवचन म्हणावे, तर आपण आता इतके सुधारक झालो आहोत की, हल्लीच्या ज्ञानाने आपल्याला पुराणावर विश्वास ठेवण्याची लाज वाटते, 'मी या गावंढळ बापाचे कसे ऐकू ? यापासून माझा काय फायदा होणार?' तसेच आत्मसंशोधनाचे. आपण शोधन करतो ते कसले, तर पांडव कुठे राहात होते ? रामाचा जन्म कोणत्या गावी झाला ? कौरव-पांडवांचे युद्ध कोणत्या ठिकाणी झाले ? मला सांगा, अशा संशोधनापासून आपला कसा फायदा होणार ? एक प्राध्यापक मला म्हणाले, "मी कृष्णाबद्दलचे पुष्कळ संशोधन केले आहे आणि कृष्णाचे जन्मस्थळ कोणते, निर्याणस्थळ कोणते, याची आता खात्री झाली." मी म्हणतो की, ते करतात ते ठिक आहे. पण संतांना कृष्णप्राप्तीसाठी, कृष्णजन्म कुठे झाला या प्रश्नाच्या खात्रीची जरूरी वाटली नाही; त्यांनी दृढ उपासना करून कृष्णाला आपलेसे केले. खरे म्हणाल तर कृष्णाचा जन्म उपासनेने हृदयातच झाला पाहिजे आणि तेच खरे जन्मस्थान आहे.

आपण जर आपले वर्तन पाहिले, मनातले विचार बघितले, तर आपल्याला असे आढळून येईल की, लोकांना जर ते कळले तर लोक आपल्याकडे ढुंकूनही पाहणार नाहीत; आणि असे असूनही आपण आपल्या संशोधनाचा आणि विचारांचा अभिमान बाळगतो, याला काय म्हणावे ? अशाने का आपल्याला भगवंताचे प्रेम लाभणार ? आपला परमार्थ कसा चालला आहे हे दुसर्‍या कुणी सांगण्याची गरजच नाही. आपल्याला तो पुरता ठाऊक असतो. अभिमान खोल गेलेला, विचारांवर ताबा नाही, साधनात आळशीपणा; मग अशा परिस्थितीत आपल्याला परमात्म्याचे प्रेम कसे लाभणार ? साधुसंतांनी यावर एकच उपाय सांगितला आहे, आणि तो म्हणजे पूर्ण शरणागती. रामाला अगदी विनवणी करून सांगा की, 'रामा, आता मी तुझा झालो; ह्यापुढे जे काही होईल ती तुझीच इच्छा मानून मी राहीन, आणि तुझे नाम घेण्याचा आटोकाट प्रयत्‍न करीन; तू मला आपला म्हण.' देव खरोखरच किती दयाळू आहे ! लोकांचे शेकडो अपराध पोटात घालूनही, शरण आलेल्याला मदत करायला तो सदैव सिद्धच असतो.

२६७. नाम घेण्यात एकतानता करावी आणि स्वतःला पूर्ण विसरून जावे.

22 Sept 2017

भक्ति म्हणजे ईश्वराविषयी अत्यंत प्रेम.

एखाद्या मोठ्या यंत्रामध्ये एक चक्र सुरू झाले की बाकीची सर्व चक्रे आपापल्यापरी हळू किंवा जलद फिरू लागतात. त्याचप्रमाणे आपल्या मनाचे आहे. मनाची एक शक्ती काम करू लागली की तिच्याबरोबर इतर सर्व शक्तीदेखील हालचाल करू लागतात. मनाला आपल्या शक्तीने ताब्यात आणणे फार कठीण आहे. ते थोर माणसालाच जमण्यासारखे आहे. पारा समोर टाकला तर दिसतो, पण काठीने मारला तर तो मारला जात नाही. त्याचप्रमाणे, मन आहे हे समजते, पण ते आवरता येत नाही. म्हणूनच भगवंताला शरण जावे, आरशावर घाण पडली म्हणून साफ करण्याचा प्रसंग आला. अंतःकरणाची घाण पुसण्याचे काम साधनाने होते. मिरच्या, मिरे, मीठ, इत्यादी पदार्थ एकत्र करून जसा सुंदर मसाला तयार करतात, त्याप्रमाणे भगवंताच्या प्राप्तीसाठी तीन गोष्टींचा मसाला पाहिजे. शुद्ध आचरण, शुद्ध अंतःकरण आणि भगवंताचे नामस्मरण, या त्या तीन गोष्टी आहेत. शुद्ध आचरण म्हणजे प्रामाणिकपणा, धार्मिक आचार आणि नीतीचे वर्तन. शुद्ध अंतःकरण म्हणजे अभिमान नसणे, द्वेषमत्सर नसणे, आणि सर्वजण सुखी असावेत अशी भगवंताची प्रार्थना करणे. भगवंताचे नामस्मरण म्हणजे भगवंताचा केव्हाही विसर न पडणे. नवर्‍याला देव आवडत नाही म्हणून बायकोने नामस्मरण सोडण्याचे कारण नाही. तिने नाम घेतले तर पत्‍नीधर्म सोडला असे होत नाही.

मनात येणारे भलतेसलते विचार हे नामाच्या प्रेमाला आडकाठी करतात. त्यांचा बंदोबस्त करण्याचा उपाय म्हणजे, या विचारांना थाराच देऊ नये म्हणजे झाले. एक मोठा पोलीस अंमलदार चोर पकडण्यात हुशार होता. तो असे करी की, चोर ज्या बाईच्या नादी असेल तिला फितुर करून घ्यायचा, म्हणजे चोर आपोआप नेमका सापडे. त्याचप्रमाणे आपले मन जिथे गुंतते तिथे भगवंताला ठेवला, की मन आपल्या ताब्यात आलेच म्हणून समजा. मनाचे संयमन करायला दोन उपाय आहेत: एक म्हणजे पातंजल योग, आणि दुसरा म्हणजे भगवंताची भक्ती. पातंजल योग म्हणजे युक्ताहारविहार, नियमित राहणे, आणि इंद्रियांचा निरोध करणे, भगवंताची भक्ती म्हणजे ईश्वराविषयी अत्यंत प्रेम. या प्रेमाची साधने कोणती तर भगवंताचे नामस्मरण, त्याचे कथाकीर्तन, साधुसमागम, आणि त्यातल्या त्यात सद्‌गुरूची कृपा, ही होत. भगवंताच्या स्मरणाशिवाय जी कर्मे होतात ती वाईट कर्मे होत. कोणताही खाण्याचा किंवा पिण्याचा पदार्थ भगवंताचे नाम घेतल्याशिवाय खायचा नाही, असा नेम ठेवला तर नाम आपोआप येते. कोणत्याही परिस्थितीत आपण नामस्मरणापासून ढळूच नये. जो नामात प्रपंच करील, त्याचा अभिमान नष्ट होऊन त्याला सुखसमाधानाचा लाभ झाल्यावाचून राहणार नाही.

२६६. अनावर मनाला नामाचे ओंडके बांधावे, म्हणजे भगवंताचे प्रेम येते.

21 Sept 2017

अंतरंग ओळखायला स्वतःपासून सुरुवात करावी.

दुसर्‍याच्या मनातले ओळखणे ही फारशी मोठी विद्या नाही. ज्याच्या मनातले ओळखायचे आहे त्याच्या मनाशी एकरूप झाले की आपल्याला कळायला लागते; पण अंतःकरण शुद्ध असेल तरच हे साधेल. हे साधण्याच्या काही क्रिया असतात. त्या क्रिया चालू असतात तोपर्यंत ती शक्ती राहते. त्या क्रिया बंद झाल्या की ती नाहीशी होते. जो मनुष्य या शक्तीचा बाजार मांडतो, त्याच्याजवळ भगवंताची कृपा असेलच असे मात्र नाही; आणि ती नाही म्हणजे काहीच नाही ! मनोगत कळायला एकमेकांना एकमेकांची भाषा कळायला पाहिजेच असे नाही. समजा, तेलंगणातला एक भिकारी आपल्या दारी भीक मागायला आला आणि तो एक तेलंगी गाणे म्हणू लागला. त्या गाण्याचा अर्थ आपल्याला मुळीच कळत नाही; पण हा भीक मागतो आहे, हे आपण ओळखतो. त्याचप्रमाणे मनोगताचा भावार्थ कळतो. प्रत्यक्ष वाक्याचा अर्थ कळला नाही तरी हरकत नसते. ऐकणारा खर्‍या उत्सुकतेने आला असेल, तर सांगणार्‍याचा भावार्थ त्याला आपोआप कळेल. पण ऐकणारा तसा आला नसेल, तर सांगणार्‍याने स्पष्ट सांगूनसुद्धा त्याला कळायचे नाही. तत्वज्ञान हे कायम आणि कधीही न बदलणारे आहे. स्थलकालानुसार निराळ्या भाषेत ते मांडावे लागते इतकेच. समजा, आपण गाडीत बसून दिल्लीला चाललो. गाडी दर क्षणी पुढे पुढे जाते, पण आपण आपल्या जागेवर बसूनच असतो. त्याप्रमाणे परिस्थिती सारखी बदलत असते; पण आपण जर भगवंतालाच चिकटून राहिलो तर खात्रीने आपण आपल्या नियोजित स्थळी पोहोचू शकू; मग परिस्थिती कितीही बदलू दे !

देहाला आल्यावर आपले ज्याच्याशी जे जे कर्तव्य आहे ते बरोबर करणे हे रामचरित्राचे सार आहे आणि हे प्रत्येकाने जाणले पाहिजे. रामासमोर जाऊन, 'मी अमुक अमुक करीत आहे' असे त्याला सांगावे, आणि आपल्या कार्याला लागावे. भगवंताला स्मरून काम करीत असताना, जे योग्य दिसेल ते त्याच्याच इच्छेने आहे असे समजून काम करावे. जो असे करील त्याला समाधान झालेच पाहिजे. 'भगवत्कृपेने मी सर्व कॄत्ये करतो' म्हटले म्हणजे अभिमान कशाला वाढेल ? अंतरंग ओळखायला स्वतःपासून सुरूवात करावी. माझे चुकते कुठे हे पाहावे. तर्कशास्त्र शिकून तर्कटी बनू नये; तसेच संतांच्या अनुभवी वचनांकडे फर चिकित्सेने पाहू नये. संतांचे सांगणे अगदी सोप्या भाषेत असते. गंमत अशी की, 'भगवंत आहे की नाही' इथपासून लोक चिकित्सेला सुरूवात करतात, आणि मोठ्या घोटाळ्यात पडतात; आणि शेवटी, आहे तिथेच थांबण्याची त्यांच्यावर पाळी येते, म्हणजे, त्यांची प्रगती खुंटते. याकरिता भगवंताचे बूड कायम ठेवून चिकित्सा करावी.

२६५. देहरूप गावाहून रामरूप गावाच्या प्रवासात रामनाम हीच उत्तम शिदोरी होय.