Showing posts with label जुलै. Show all posts
Showing posts with label जुलै. Show all posts

31 Jul 2017

आपण भगवंताचे झालो तरच सुखी होऊ.

आपल्याला साधायचे काय हे ध्यानात धरले पाहिजे. परमात्मा साधायचा आहे, आणि शरीर आणि प्रपंच ही साधने आहेत, हे पक्के समजावे. आपण साधनाला साध्य आणि साध्याला साधन मानतो, म्हणून आपले चुकते. एका गृहस्थाला मुलाबाळांसह मुंबईला जायचे होते. आता आगगाडीत बसायला मिळेल या आनंदात मुले गाडीत बसली, पण मुंबईस जाण्यासाठी गृहस्थ गाडीत बसला. गाडीतून उतरताना मुलांना वाईट वाटले, त्या गृहस्थाला नाही तसे वाटले.
वसिष्ठांनी रामाला सांगितले की, "रामा, तू प्रपंचात वागताना अंतर्यामी निःसंग रहा." 'मी देह नसून आनंदरूप आत्मा आहे, निःसंग आहे,' ही दृढ भावना ठेवून प्रपंच करावा. जमीन सोडून कुणाला राहता येत नाही, त्याप्रमाणे प्रपंच कुणालाच टाकता येत नाही. पण त्यात 'राम कर्ता' मानून वागणारा तो पारमार्थिक, 'मी कर्ता' असे मानून वागणारा तो प्रापंचिक. 'मी कर्ता' असे म्हणूनही जर प्रपंच दुःखरूप राहतो, सुखरूप होत नाही, तर त्याचा कर्ता मी नाही हे सिद्ध झाले ! प्रपंच हा अर्धवट आहे, पूर्ण फक्त राम आहे. मिठाचे पोते कितीही धुतले तरी त्याचा खारटपणा जात नाही, तसे प्रपंचाचे आहे. म्हणून परमार्थ हे ध्येय ठेवून सुलभ असे साधन जे नामस्मरण, ते अखंड करावे. प्रपंचात आपण किती कष्ट करतो ! तितका मोबदला मिळत नाही, तरीही कष्ट करतो. परमार्थात तसे नाही. परमार्थ जितका जितका करावा तितके तितके समाधान अधिकाधिक असते. आयुष्यभर प्रपंच केला तर मृत्युमुखीही प्रपंचच आठवेल. म्हणून प्रपंचाचा हव्यास धरू नये. प्रपंचातल्या वस्तू आज ना उद्या जाणार हे जाणून, त्यांच्याबाबत अलिप्तपणाने वागावे. ही वृत्ती अभ्यासाने आणि वारंवार विचाराने वाढवावी. प्रपंचात, प्राप्त झाले त्याचा हर्ष न करावा, गेल्याचा शोक न करावा. देह प्रारब्धावर टाकावा. हे साधायला एक मोठी परिणामकारक आणि सोपी युक्ति आहे; आपण रामाचे व्हावे. राम ठेवील तसे समाधानाने राहावे. हे सर्व विश्व आणि अखिल प्रपंच ईश्वराचा आहे; तो ज्याचा त्याला देऊन टाकून मोकळे व्हावे.
सर्व ईश्वराचे आहे, माझे काही नाही, असे समजणे म्हणजे ईश्वरार्पण करणे आहे. आपण भगवंताचे झालो तर सुखी होऊ, नाहीतर दुःखी होतो. धान्यातले दगड, माती, पाकड, निवडून बाजूला काढून, धान्य जे सार, ते घ्यावे; त्याचप्रमाणे, अहंकाराचे खडे, ममत्वाची माती आणि विकारांचे पाकड, आत्मस्वरूप परमार्थात मिसळल्याने दुःखरूप प्रपंच होतो. ते प्रपंचातून निवडून टाकले म्हणजे जे उरेल ते सारे सुखच !
२१३. 'रामा, सर्व तुझेच आहे, तू देशील ते घेईन.' 
अशी भावना ठेवावी. यानेच अत्यंत समाधान होते. 

30 Jul 2017

राम कर्ता हे जाणून चित्तीं । जगांत संत ऐसें वर्तती ॥

जेथे मीपणाचे ठाणें । तेथें दुःखाचें साम्राज्य असणे ।
हा आहे नियम । म्हणून मी सांगतो राखावा नेम ।
सर्वस्वी व्हावें भगवंताचें । 'मी, माझें' सोडून साचें ॥
बाह्य मीपणानें जरी सोडलें । पण अभिमानानें वृत्ति बळावली । तेथें घाताला सुरुवात झाली ॥
बुद्धि करावी स्थिर । नामीं असावें प्रेम अनावर ।
राम कर्ता जाणूनि चित्तीं । जगांत संत ऐसें वर्तती ॥
साधनीं सावधान जाण । हेंच साधकाचे मुख्य लक्षण ॥
बाह्य वेषानें कसाहि नटला । जगाला भुलविता झाला ।
तरीं जोंवरी नाहीं चित्त स्थिर । कसा पावेल रघुवीर ? ॥
आजवर केल्या गोष्टी फार । भल्या बुर्‍या असतील जाण ।
त्याचा न करावा विचार । पुढें असावें खबरदार ॥
मानावी परस्त्री मातेसमान । दुसर्‍याचें न पाहावें उणेपण ।
परनिंदा टाळावी । स्वतःकडे दृष्टी वळवावी ॥
गुणांचे करावें संवर्धन । दोषांचे करावें उच्चाटन ।
याला एकच उपाय जाण । अखंड असावें अनुसंधान ॥ 
प्रपंच न मानावा सुखाचा । तो असावा कर्तव्याचा ॥
वृत्ति असावी स्थिर । चित्तीं भजावा रघुवीर ॥
असा करा कांही नेम । जेणें जवळ येईल राम ॥
प्रपंचाची धरितां कांस । दुःखचि पावे खास ॥
प्रपंच हाच आधार । प्रपंचाविण निराधार ।
ऐशी होई ज्याची वृत्ति । समाधान न ये त्याचे हातीं ॥
तुम्ही सुज्ञ भाविक जाण । एवढें ऐकावें माझें वचन ॥
दुष्ट मतीची उत्पत्ति । ही दुर्जनाची संगति ।
भावें धरितां रघुपति । सर्व संकटें दूर जाती ॥
वृत्ति असावी खंबीर । ज्याचा आधार रघुवीर ॥
दुर्जनांचे जैसें मन । पाषाणास न फुटे द्रव जाण ।
तैसें प्रपंची इच्छी जो सुख । जें आजवर कोणास न मिळाले देख ॥
प्रपंचाचे दुःख जाण । तें मीपण असल्याची खूण जाण ॥
जगांत वर्तावें, घरांत असावें । व्यवहारांत व प्रपंचांत वागावे । परि न कोठे गुंतावें ॥
फार दिवसांचा वृक्ष झाला । घरांतील घडामोडी दिसती त्याला ।
जैसें तो न सोडी आपलें स्थान । तैसें वागावें आतां आपण ॥
ज्याचें घरी रामाचा वास । तेणें न राहावें कधीं उदास ॥
सदा राखावें समाधान । मुखीं भगवंताचें नाम ॥
आतां प्रेम ठेवा नामीं । कृपा करील चक्रपाणी ॥
आतां करा चित्त स्थिर । हृदयीं धरा रघुवीर ॥
रामावांचून न आणावा विचार । हाच माझा आशिर्वाद ॥
२१२. जेथे नाम तेथे राम । हा ठेवावा विश्वास । कृपा करील रघुनाथ खास

29 Jul 2017

मला कुणाचे दुःख पाहवत नाही.

पुष्कळ मंडळी यावीत, आलेल्याला खायला घालावे, आणि भगवंताचे नाम घ्यावे, ह्या तीन गोष्टी मला फार आवडतात. त्या जो करील त्याच्या हयातीत त्याला कधीही कमी पडणार नाही. जो माझ्या स्मरणात प्रपंच करतो, त्याच्या प्रपंचात मी आहे. माझ्या माणसाने प्रपंचात हेळसांड केलेली मला आवडायची नाही. उलट, इतरांच्यापेक्षा त्याने जास्त दक्षता दाखवली पाहिजे. कमी आहे त्याची काळजी न करता, जास्त असेल तर त्याविषयी ममत्व न ठेवता, जो येईल तसा खर्च करतो, तो मनुष्य ते सर्व मला देतो. मला विकत-श्राद्ध घ्यायची सवय आहे. मला स्वतःचा प्रपंच करता आला नाही; पण दुसऱ्याचा मात्र चांगला करता येतो. माझ्याजवळ एकही पैसा नव्हता आणि खाणारी माणसे खूप होती; पण मी कधीही काळजी केली नाही. मी आजपर्यंत पैशासाठी कुणापुढे जीभ विटाळली नाही. उद्या जर कोणी एक लाख रुपये माझ्या नकळत माझ्या उशाशी आणून ठेवले, तर मी ते विष्ठेसारखे बाजूला सारीन आणि स्वतःच्या श्रमाचे चार आणे मिळवून पोट भरीन. मला आवडते की, एक लंगोटी घालावी, मारुतीच्या देवळात राहावे, भिक्षा मागावी, आणि अखंड नाम घ्यावे. हे करायला कोण तयार आहे ? मी आपला नामाचा हट्ट कधी सोडला नाही. मी जरी जास्त गरीबांचा आहे, तरी मला प्रपंचांत कधी दैन्यपणा आवडत नाही. दुसर्‍याकरिता निःस्वार्थीपणाने भीक मागण्याची मला कधीच लाज वाटली नाही.
व्यवहारदृष्ट्या माझ्यामध्ये एकच दोष आहे की, मला कुणाचे दुःख पाहवत नाही. माझ्यामध्ये प्रेमाशिवाय दुसरे काही सापडायचे नाही. माझ्यातले प्रेम काढले तर मग 'मी' नाहीच ! मला फक्त आईच्याच प्रेमाची कल्पना आहे. माझ्याकडे येणार्‍या माणसाला माहेरी आल्यासारखे वाटले पाहिजे; तो परत जाताना त्याच्या डोळ्यांत पाणी आले पाहिजे. दुसर्‍याला आपला आधार वाटला पाहिजे. मी असून काहीच होत नाही; ज्या गोष्टी घडायच्या त्या घडतच असतात. पण आपण असण्यात एक आधार आहे असे इतरांना वाटावे. माझे आता किती दिवस आहेत कुणास ठाऊक ! मी पुढे असो वा नसो, जे मी सुरुवातीला सांगितले तेच मी शेवटीही सांगतो : तुम्ही कसेही असा पण भगवंताच्या नामाला सोडू नका. रामरायाने तुम्हा सर्वांवर कृपा करावी, ही माझी त्याला प्रार्थना आहे. तुम्ही माझ्यासाठी इतक्या आपलेपणाने कष्ट करता याची जाणीव मला आहे. या कष्टांचा मोबदला रामरायच तुम्हाला देईल. तुम्ही सर्वजण आनंदात राहा, हा माझा तुम्हा सर्वांना आशिर्वाद आहे.
२११. माझा असा अनुभव आहे की, जो मनुष्य 
आपले आहे ते रामाला देतो त्याला राम पुरवतो. 

28 Jul 2017

नाम घेणार्‍याच्या मागेपुढे मी उभा आहे.

गूढ शोधून काढण्याकडे मनुष्याची नेहमी प्रवृत्ती असते. कोकणामध्ये पाण्याचे झरे आढळतात. ते कुठून येतात हे कळत नाही. म्हणजे, केवळ दृश्यामध्ये असणार्‍या गोष्टींचेदेखील मूळ आपल्याला उकलत नाही. मग जे अदृश्यच आहे त्याचे मूळ आपल्याला कसे कळणार ? मो बोलतो कसा, माझे मन कुठून येते, हे देहबुद्धीत राहणार्‍यांना कळणे कठीण आहे. नामामध्ये जे स्वतःस विसरले त्यांनाच मी खरा कळलो. स्वतःच्या प्रपंचाचे कल्याण करून घेण्यासाठी तुम्ही माझ्याकडे येता. पण कोळसा जितका जास्त उगाळावा तितका तो काळाच होत जातो, त्याप्रमाणे प्रपंचामधे कसेही केले तरी दुःखच पदरात पडते. आपण समजून उमजून ज्या चुका करतो, त्यांचा दोष आपल्याकडे असतो. न समजता जी चूक होते त्याचा दोष येत नाही. प्रपंचाच्या आसक्तिने दुःखपरंपरा येते हा अनुभव दररोज येत असून आपण प्रपंचात आसक्ति ठेवतो, हा दोष नव्हे काय ? आपले कुठे चुकते ते पाहावे आणि जे चुकते ते सुधारावे. प्रपंचात मनासारख्या गोष्टी कुठे मिळतात ? त्या मिळणे न मिळणे आपल्या हातातच नसते. मग अमुक हवे किंवा नको असे कशाला म्हणावे ? रामाचेच होऊन राहावे म्हणजे झाले ! जो रामाजवळ विषय मागतो, त्याला रामापेक्षा त्या विषयाचेच प्रेम जास्त असते असे सिद्ध होते.
मी तुमच्याकडे येतो. पण मला येण्यासाठी तुम्ही वाट मोकळी ठेवीत नाही. मी येण्यासाठी तुम्ही वाट मोकळी करा; म्हणजे सतत नामस्मरणात रहा. मी कधीच कुणाबद्दल निराश होत नाही. जो मनुष्य म्हणून जन्माला आला त्याचा उद्धार होणारच. मला रामावाचून दुसरे जिवलग कोणी नाही. देहाच्या भोगांना मी कधी कंटाळलो नाही. तुम्ही भगवंताचे नाम घ्यावे यापलिकडे खरोखर मला दुसरी कसलीही अपेक्षा नाही. रात्रंदिवस माझ्या माणसांना मी हेच सांगत असतो की, वाटेल ते झाले तरी भगवंताचे नाम सोडू नका. जो माझा म्हणतो , त्याला नामाचे प्रेम असलेच पाहिजे. जीवनामध्ये तुम्ही घाबरू नका, धीर सोडू नका, आणि घ्यायचे झाले तर नामच घ्या. माझा नियम असा आहे की, परमार्थाची एकही गोष्ट अशी असता कामा नये की जी व्यवहाराच्या आड येईल. माझ्या गावी पैसा पिकत नाही. पण भक्ति मात्र खास पिकते. ज्याच्याजवळ भगवंताचे नाम आहे त्याच्या मागेपुढे मी उभा आहे. मी तुमच्याजवळ आहेच; तो कसा आहे याचा विचार तुम्ही करू नका. तुम्ही नुसते नाम घ्या, बाकीचे सर्व मी करतो. शुद्धीमध्ये नाम घेण्याची जबाबदारी तुमची आहे, मग झोपेत आणि बेशुद्धीत नाम घेण्याची जबाबदारी माझी आहे; ती मी सांभाळीन.
२१०. जेथे नाम तेथे मी । हा भरवसा बाळगून असावे तुम्ही ॥

27 Jul 2017

आपण मागावे फक्‍त एका रामाजवळ.

आपल्या जीवनामधली प्रत्येक क्रिया ही रामाच्याकरिता व्हावी. आपले जगणे देखील त्याच्या सेवेसाठी असावे. किंबहुना, लहान मुलाला जशी आई, मोठ्या मुलाला जसा बाप, बाईला जसा प्रेमळ नवरा, मुनीमाला जसा सज्जन मालक, नोकराला जसा त्याचा स्वामी, एखाद्याला जसा विश्वासू मित्र, तसा रामराया प्रत्येकाला वाटला पाहिजे. म्हणून प्रत्येकाने गोंदवल्यास यावे. भगवंताच्या अस्तित्वाची खरी जाणीव होऊन, त्याच्या अनुसंधानामध्ये जीवनाचा प्रत्येक क्षण कसा घालवावा, हे सगुणोपासनेशिवाय सामान्य स्त्री-पुरुषाला समजणे अशक्य आहे. जगात घडून येणार्‍या प्रत्येक गोष्टीमध्ये रामरायाची इच्छा काम करीत असल्याचे आपण जाणले पाहिजे. इतकेच नव्हे, तर व्यवहारदृष्ट्या आपण योग्य प्रयत्‍न केल्यानंतर जे चांगले वाईट फळ मिळेल, ते रामाच्या इच्छेनेच मिळते अशी श्रद्धा ठेवावी. अशी श्रद्धा ज्याच्यापाशी असते, त्याला सुखदुःखाची बाधा होत नाही. सर्व काही राम करतो, खरे कर्तेपण रामाचे, हे नीट लक्षात आणून, भगवंताकडे कर्तृत्व द्यावे आणि आपण मीपणाने नाहीसे व्हावे. खरोखर, आपल्या रामाला काय कमी आहे ? आपण मागावे फक्त एका रामाजवळ ! तो देईल अथवा न देईल. जे देईल त्यांत समाधान मानावे. दुसऱ्या कोणाच्याही जवळ आपण कधी मागू नये. त्यामध्ये आपल्या उपासनेला कमीपणा आहे. मात्र देणार्‍याने स्वखुशीने दिले तर ते टाकू नये.
माझ्या आयुष्यात मी नामाशिवाय दुसरे साधन केले नाही. माझ्या गुरूंनी मला नामच दिले, तेच नाम मी सर्वांना देत आहे. तुम्ही ते नाम घ्या, तुम्हाला राम खात्रीने भेटेल. तोंडाने नेहमी 'राम राम' म्हणत जा. भगवंताच्या नामामध्ये जीवाचे कल्याण आहे असा माझा अनुभव आहे. म्हणून ते जास्तीत जास्त स्त्री-पुरुषांनी घ्यावे. कोणत्याही कार्याच्या पाठीमागे भगवंताच्या उपासनेचे बळ ठेवा. गाईचे रक्षण आणि तिची सेवा इतर कशासाठी नसावी, फक्त भगवंतासाठी असावी. आपण जे काही करीत आहोत ते सर्व भगवंतासाठी करीत आहो, जी जाणीव राहण्यासाठी त्याचे नाम सतत घेत असावे. ज्या वेळी समाजातली पुष्कळ माणसे अमर्याद विषयासक्त बनतात, त्या वेळी कलियुग सुरू झाले असे समजावे. सज्जनांची बुद्धी भ्रष्ट होऊन ते देखील विषयाधीन बनतात. विषयांची प्राप्ती करून घेण्यासाठी वाटेल ते कृत्य करण्याची त्यांची तयारी असते. अशा वेळी, भगवंताच्या नामाचे माहात्म्य जो सांगतो त्याच्यावर कठीण प्रसंग यायचेच; पण परमात्मा सांभाळतो अशा निष्ठेने जो राहील, तो प्रत्येक संकटातून सहीसलामत पार पडेल यात शंका नाही. म्हणून प्रत्येकाने नामाला चिकटून असावे. जगाचा नाद सोडा आणि भगवंताचे प्रेम जोडा.
२०९. राम कर्ता म्हणेल तो सुखी, मी कर्ता म्हणेल तो दुःखी.

26 Jul 2017

साधन - चतुष्टय

कोणतीही इमारत बांधीत असताना अगोदर तिचा पाया जसा घालावा लागतो, त्याप्रमाणे परमार्थ साधण्यासाठी अगोदर साधनांचा पाया घालावा लागतो. शास्त्राने चार प्रकारचे साधन सांगितले आहे. प्रथम, नित्यानित्यवस्तुविवेक करावा. अनित्य जो विषय त्याच्या वाबतीत आपण उदास व्हावे आणि नित्य जो भगवंत त्याच्याकडे लक्ष द्यावे. नंतर, या जगातल्या किंवा स्वर्गातल्या भोगाची वासना नाहीशी करावी. हे दुसरे साधन होय. आपले मन बाह्य विषयांकडे धाव घेते; तिथून त्याला खेचून आणावे आणि भगवंताकडे लावावे. आपण चूक केली नसतानाही कोणी जाच केला तरी शांतपणे सहन करावे, गुरूच्या सांगण्यावर विश्वास ठेवावा, हर्ष विषाद न मानता संतोषाने राहावे; हे तिसरे साधन होय. शेवटी, भगवंताच्या भेटीची खरी तळमळ लागावी. ही सर्व साधनसामग्री असेल तरच साधकाला ब्रह्मदर्शन घडेल. ब्रह्मदर्शन होण्यासाठी कडकडीत वैराग्य असावे लागते. पैशाचा लोभ पूर्णपणे गेला पाहिजे. मनामधली कामवासना पूर्णपणे गेली पाहिजे. मोहाला बळी पडता कामा नये.
नुसता प्रपंच चांगला करणे हे काही मनुष्यजन्माचे ध्येय नव्हे. जनावरेदेखील आपापला प्रपंच करतातच. मनुष्याने भगवंताची उपासना करून त्याची प्राप्ती करून घेतली पाहिजे, तरच प्रपंचातल्या कष्टांचे सार्थक होते. सध्याच्या परिस्थितीमध्ये उपासना करायला नामासारखा सोपा उपाय नाही. खरोखर, भगवंताच्या नामामध्ये फार मोठे सामर्थ्य साठविलेले आहे. त्याचे नाव घेऊन जो जगात वावरेल, त्याला व्यवहारामध्ये नेहमीच यश येईल असे नाही, परंतु भगवंत त्याची लाज राखील यात शंका नाही. प्रपंचातले यश आणि अपयश या तात्पुरत्या गोष्टी आहेत. भगवंताच्या अनुसंधानाला खरे महत्त्व आहे. रामाच्या इच्छेनेच आपल्याला सुखदुःख भोगावे लागते, पण हे आपल्याला सर्वाच्या शेवटी आठवते, म्हणून सुखदुःख बाधते. म्हणून आपण सुरुवातीपासूनच रामाची इच्छा लक्षात ठेवून वागू. यासाठी त्याच्या नामाची गरज आहे. प्रपंचाची तर्‍हा अशी असते की, आज सुख झाले म्हणून जरा बरे वाटले, की लगेच उद्या दुःखाचे ताट पुढे वाढून ठेवलेले असते. म्हणून, एका डोळ्यात सुखाचे अश्रू, तर दुसर्‍या डोळ्यात दुःखाचे अश्रू ठेवून माणसाने प्रपंचात वागावे. प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेनेच जर घडते, तर एकीचे सुख आणि दुसरीचे दुःख का मानावे ? शहाण्या माणसाने आपले चित्त भगवंताच्या नामात गुंतवून ठेवावे, आणि बरावाईट जसा प्रसंग येईल त्यात सामील होऊन जावे. जो नाम घेईल त्याच्या मागे राम उभा आहे. नाम घेणार्‍याचे राम कल्याण करतो, एवढे माझे सांगणे शेवटर्यंत विसरू नका.
२०८. अती प्रेमाने नाम घ्यावे. नामात तल्लीन 
झाल्यावर देहाची सुखदुःखे बाधणार नाहीत. 

25 Jul 2017

भगवंताचे नाम सोडू नका.

संकल्प ही फार मोठी शक्ति आहे. इच्छा जर खरोखर अती प्रबळ झली, तर ती वस्तूला आपल्याकडे खेचून घेतल्याशिवाय राहणार नाही. तसेच, भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रबळ इच्छा धारण केली तर भगवंत भेटतो. प्रापंचिक वस्तू आपण कितीही मिळविल्या, तरी त्या स्वभावतःच अपूर्ण असल्यामुळे त्यांच्या प्राप्तीपासून पूर्ण समाधान होत नाही. याच्या उलट, भगवंत स्वतः पूर्ण असल्यामुळे, आपल्या वासनांची पूर्ण तृप्ती होऊन त्या क्षीण बनतात, आणि नंतर आपोआप नाहीशा होतात. म्हणून नेहमी 'भगवंत मला हवा' अशी इच्छा करीत जावे. त्याचे नाम घेणे, म्हणजे 'तू मला हवास' असे म्हणणेच होय. खऱ्या प्रेमाने जर आपण आपला भार रामावर टाकला, तर तो नेहमी आपल्या कल्पनेच्या बाहेर गोष्टी घडवून आणतो. आपला देह आणि प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो, ही जाणीव सतत ठेवून जगात वागावे, म्हणजे आपल्याला कधी कमी पडणार नाही.
नामात एक विशेष आहे. विषयाकरता जरी नाम घेतले तरी विषय प्राप्त होऊनही ते आपले काम, म्हणजे तुमचे मन निर्विषय करणे, ते करीतच असते, म्हणून कशाकरता का होईना, नाम घ्या. पण निर्विषय होण्याकरिता घेतले तर काम शीघ्र होईल. साधन तेच, आणि साध्यही तेच. नामच एक सत्य आहे, यापरते दुसरे सत्य नाही, यापरते दुसरे साधन नाही, असा दृढ भाव असावा. आपण कोणचेही कृत्य करीत असताना, ज्याकरता ते आरंभले ते जसे नेहमी आपल्या डोळ्यासमोर असते, नाम घेताना, ते आपण कशाकरता घेतो त्याची जाणीव अखंड असावी. ही जाणीव अखंड ठेवणे, मी भगवंताचा आहे हे जाणणे, याचे नाव अनुसंधान. वास्तविक आपण भगवंताचेच आहोत, पण भ्रमाने मला 'मी विषयाचा आहे' असे वाटू लागले. संत 'तू विषयाचा नाहीस, भगवंताचा आहेस,' असे सांगतात. हीच संतांची खरी कामगिरी; आणि याकरता ते नाम सांगतात, नाम घेणे म्हणजे 'मी विषयाचा नाही, भगवंताचा आहे' असे मनाला सांगणे, मनात तशी जाणीव उत्पन्न करणे, आणि ही जाणीव टिकवण्याकरता पुनः पुनः मनाला तेच सांगणे, म्हणजे तेच नाम सतत घेणे.
भगवंत खरोखरच मनापासून ज्याला हवा आहे, त्याचे काम झालेच पाहिजे. आपल्याला जगातला मान, लौकिक, पैसा, विषय इत्यादि काही नको असे वाटते का ? तसे नसेल तर, 'भगवंत मला हवा आहे' असे नुसते तोंडाने म्हणणे बरोबर नाही. ज्याला भगवंताचे प्रेम जोडायचे असेल त्याने जगाचा नाद सोडायला पाहिजे. जगाच्या मागे लागाल तर आपले साधन बुडवून बसाल. तुम्ही सतत भगवंताचे नाम घावे आणि मनापासून भगवंताला आळवावे, तुम्ही कितीही पतित असला तरी पावन होऊन जाल, हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे.
२०७. जो जो संकल्प उठेल तो तो रामस्मरणयुक्त असला पाहिजे.

24 Jul 2017

सद्‌गुरूला शरण जावे.

प्रत्येकजण पोटाला खायला मिळावे म्हणून खटपट करीत असतो. परंतु आपल्या इच्छेप्रमाणे आपल्याला मिळते का ? नाही. म्हणून, सांगायचे कारण असे की, जर आपण विषयांकरिता इतके झटतो, तर देवाच्या प्राप्तीकरता श्रम करायला नकोत का ? संत सांगतात तो मार्ग चोखाळून पाहावा. एकदा ठाम विचार करून आपण ज्याला गुरू कल्पिला, तो सांगेल तेच साधन मानावे. गुरू देहातच असावा हे मानणे चूक आहे. गुरू हे देहात कधीच नसतात. गुरू प्रत्यक्ष देवच आहे अशी भावना ठेवून वागले पाहिजे. अशी भावना ठेवून वागले, म्हणजे गुरू कसाही असला तरी तिथे प्रत्यक्ष देवाला येणे भाग पडते. गुरू सांगेल तसे आपण नेहमी साधन करीत राहावे. तसे साधन करीत राहिले म्हणजे आपल्याला देवाची प्राप्ती होते. गुरू नामाशिवाय दुसरे काय सांगणार ? त्यातच आपण सदा राहावे. जो खरा साधनात राहतो, त्याला ह्या सर्व गोष्टी आपोआपच साधत असतात. म्हणून आपण गुरूला अनन्यशरण जाऊन, तोच सर्व करतो आहे हे मानून, जे होईल त्यात आनंद मानीत जावा. भगवंताबद्दल जिज्ञासा उत्पन्न होणे ही खरी भाग्याची गोष्ट आहे. असा जिज्ञासू शिष्य भेटला तर गुरूला देखील आपले स्वतःचे सार्थक झाले असे वाटते. श्रीरामचंद्राची जिज्ञासू अवस्था पाहून वसिष्ठांना फार आनंद वाटला; आणि ते साहजिकच आहे. एकच देव, एकच साधन, आणि एकच गुरू मानला, त्याचप्रमाणे, आपण एका नामात राहण्याचा प्रयत्‍न करावा. मुलगा हसतखेळत असताना बाप त्याला घेतो, पण रडू लागला की खाली ठेवतो; याच्या उलट, मुलगा रडत असला तर आई त्याला घेते. हाच देवामध्ये आणि संतामध्ये फरक आहे.

बर्फामधले पाणी काढले तर काहीच उरत नाही. त्याप्रमाणे, संतांमधले भगवंताचे प्रेम जर काढून टाकले तर त्यांच्यामध्ये मग काहीच उरत नाही. साधन करण्याचे कष्ट न होता वस्तू साध्य करून घेण्याचा मार्ग म्हणजे सत्संगती हा होय. आपल्या मनावर संगतीचा फार परिणाम होतो. नुसता हेतू काम करीत नसून संगत काम करीत असते. संगत दोन प्रकारची आहे; घातक आणि उत्तम. विषयी माणसाची संगत ही घातक होय, आणि सत्संगत ही उत्तम होय. सत्संगतीमध्ये असताना, आपल्या ठिकाणी दोष आहे असे ज्याला कळेल तो लवकर सुधारेल. आपण ज्या सत्पुरुषाकडे जातो त्याने सांगितलेले मनापासून आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्‍न केला, तरच त्याच्याशी खरी संगत केली असे म्हणावे. संताची प्रचीती पाहणे म्हणजे आपले प्रपंचातले काम मनासारखे होणे हे नव्हे. ज्या घटकेला आपले चित्त शुद्ध होते, त्या घटकेला संताची खरी प्रचीती आली असे समजावे.

२०६. संतांना ओळखण्यासाठी अनुसंधानाशिवाय दुसरे साधन नाही.

23 Jul 2017

आधी श्रद्धा, मग कृती, नंतर अनुभव.

गुरुआज्ञेप्रमाणे वागणार्‍याला कधीही नड येत नाही. राजाच्या राणीला दुपारी जेवायला कसे मिळेल याची काळजी नसते. तसे, गुरूचा आधार आपल्याला आहे असे ठाम समजणार्‍याला कसली नड असणार ? लांब उडी घेण्यापूर्वी चार पावले मागे जावे लागते, परिसापाशी सोने व्हायला रुप्याचे लोखंड व्हावे लागते; तसे, गुरूचा पाठीराखेपणा असून आपल्याला जी अधोगतीशी वाटते, ती पुढच्या महत्कार्याची पूर्वतयारीच होय. बाप मुलाला हातावर घेऊन पोहायला शिकवीत असताना मधून मधून हात काढून घेतो, पण मुलाची खात्री असते की हा आपल्याला बुडू देणार नाही, तसा आपल्याला सद्‍गुरूचा आधार आहे अशी आपण पक्की खात्री बाळगावी.

आपण आजारी पडलो तर आपणच पैसे देऊन डॉक्टरवर विश्वास ठेवतो, याचे कारण असे की, आपल्याला जगायची इच्छा आहे. तसे, भगवंताच्या प्राप्तीची तळमळ असेल तर मनुष्य त्याचे नाम घेतल्याशिवाय राहणार नाही. आधी श्रद्धा, मग कृती, आणि नंतर कृतीच्या फलाचा अनुभव, असा व्यवहाराचा नियम आहे. परमार्थामध्ये आपण त्याच मार्गाने जावे. व्यवहारात तुम्ही एकमेकांवर जेवढी निष्ठा ठेवता तेवढी जर भगवंतावर ठेवलीत, तरी भगवंत तुम्हाला खात्रीने समाधान देईल. आगगाडीत ड्रायव्हरवर विश्वास ठेवून आपण स्वस्थ झोप घेतो, त्याप्रमाणे भगवंतावर श्रद्धा ठेवून काळजी न करता आपण स्वस्थ रहावे. ड्रायव्हरपेक्षा भगवंत नक्कीच श्रेष्ठ आहे. परमार्थात अंधश्रेद्धेची मुळीच गरज नाही, पण तिथे श्रद्धेशिवाय मात्र मुळीच चालावयाचे नाही. सांगणारा कसाही असला तरी ऐकणार्‍याची जर खरी श्रद्धा असेल; तर त्या श्रद्धेनेच त्याच्याअंगी पात्रता येईल. संतांच्या सांगण्यावर पूर्ण श्रद्धा ठेवावी. अशी श्रद्धा असणे ही फार भाग्याची गोष्ट आहे. खरे म्हणजे अशी श्रद्धा ज्याला लाभली, तो लवकर सुखी झाला. आज आपल्यापाशी ती नाही, तर निदान आपण स्वतःशी प्रामाणिक बनू या. आधी पुष्कळ चिकित्सा करून आपले ध्येय ठरवावे, पण एकदा ते ठरले की मग निश्चयाने आणि श्रद्धेने त्याच्या साधनात राहावे.

आपण परमात्म्याजवळ मागावे की, "तू वाटेल त्या स्थितीत मला ठेव, पण माझे समाधान भंगू देऊ नकोस. माझा मीपणा काढून टाक. तुझा विसर पडू देऊ नकोस. मला अमुक एक तुजजवळ मागावे अशी इच्छा देऊ नकोस. नामामध्ये प्रेम दे, आणि तुझ्या चरणी दृढ श्रद्धा सतत टिकू दे."

२०५. श्रद्धेशिवाय कधी कोणाला परमार्थ साधायचा नाही.

22 Jul 2017

गुरू आपल्याला अंतिम सुख दाखवितात.

एक लहान मुलगा एका विहिरीजवळ उभा होता. त्याची एक वस्तू आत पडली होती. 'ती काढण्याकरिता मी आत उडी मारतो,' असे तो म्हणू लागला. त्यावर तिथे होता तो एक मनुष्य म्हणाला, 'तू असे करू नकोस, आत पडून बुडून जाशील.' तरीपण तो ऐकेना, एवढ्यात त्याचा बाप तिथे आला. त्यानेही मुलाला पुष्कळ सांगून पाहिले, पण तो ऐकेना, मग त्या मुलाला बापाने धाक दाखवून आणि मार देऊन घरात नेले. आता, मुलाला मारले म्हणून तुम्ही बापाला दोष द्याल का ? "एकुलता एक मुलगा, नवस करून झालेला, त्याला जाऊ दिले असते तर काय झाले असते ?" असे म्हणाल का ? नाही ना ? तर मग गुरू करी काय करीत असतो ? आपण विषय मागत असतो आणि ते दिले तर आपण त्यात बुडून मरू हे त्याला माहीत असते; म्हणूनच तो आपल्याला त्यातून वाचविण्यासाठी चार गोष्टी सांगून पाहतो. आपण तेही न ऐकले, तर तो आपत्ती वगैरे आणून धाक दाखवितो. आपण त्याबद्दल रडत असलो तरी तो आपल्याला त्यातून वर ओढीतच असतो. आपण तर चांगले शिकले-सवरलेले; त्या मुलाप्रमाणे अज्ञान नसून चांगले वयस्कर; तरीसुद्धा आपल्याला विषयात उडी घ्यावीशी वाटते. गुरूने सांगितले, 'लग्न करू नकोस', तर आपण 'लग्न कधी होईल' म्हणून त्याच्या पाठीस लागत असतो. आणि शेवटी तर 'गुरूला समजतच नाही' असे म्हणण्यापर्यंत आपली मजल जाते ! सध्या दिसते तेच सुख आपण खरे असे मानीत असतो. पण अंतिम सुख काय, हे गुरूला कळत असते. म्हणून तो सध्या दिसणाऱ्या सुखापासून आपल्याला परावृत्त करीत असतो. तेव्हा, आपण गुरुवचनावर विश्वास ठेवून त्याच्या आज्ञेप्रमाणे वागणे हेच श्रेयस्कर आहे. तो जे साधन सांगेल तेच करीत राहावे, म्हणजे आपल्याला अंतिम सुखाचा लाभ होईल. गुरू आज्ञा करतो म्हणजे काय करतो ? तर आपले मन जिथे गुंतले असेल तिथून त्याला काढण्याचा तो प्रयत्‍न करतो.

भगवंत भक्ताची संकटे नाहीशी करतो, म्हणजे त्याची प्रापंचिक संकटे दूर करतो असे नाही. ती काय, सहज दूर करता येतात; पण भक्ताला समाधानात ठेवून संकटे सहन करण्याची शक्ति भगवंत देतो. भक्ताला तो नेहमी स्मरणात ठेवतो. असे भक्तच संतपदाला पोहोचतात. एकाद्या विद्वान माणसाची विद्वत्ता ओळखायला आपण थोडे तरी विद्वान झाले पाहिजे, त्याप्रमाणे, संत ओळखायला संतांच्या ठिकाणी असणारा गुण थोडा तरी आपल्या ठिकाणी असला पाहिजे. संतांचा मुख्य गुण म्हणजे, ते भक्तिला चिकटलेले असतात. सत्पुरुषांचे बाहेरून वागण्याचे प्रकार त्या त्या देशकालमानाने निरनिराळे असतात, पण आतले भगवंताचे प्रेम मात्र सर्वांचे एकच असते.

२०४. प्रापंचिक जन विषयप्राप्तीसाठी झटतात. पण विषय
मागूनही जो देत नाही, त्यापासून परावृत्त करतो, तो संत. 

21 Jul 2017

वेदाप्रमाणे नामही अनादी, अनंत, अपौरुषेय आहे.

शास्त्रामध्ये असे सांगून ठेवले आहे की, कृतयुगामद्ये ध्यानाने, त्रेतायुगामध्ये हवनाने आणि द्वापारयुगामध्ये देवतार्चनाने भगवंताची प्राप्ती होते. परंतु कलियुगामध्ये त्यांपैकीं काहीच साध्य होणे शक्य नसल्याने, भगवंताचे केवळ नाम घेतले असता मनुष्याला त्याचे दर्शन घडते. शास्त्राच्या या सिद्धांताचा संतांनी स्वतः अनुभव घेतला आणि लोकांना सांगितले की, साडेतीन कोटी जप केला असता चित्तशुद्धी होते; आणि तेरा कोटी जप केला असता, भगवंताचे दर्शन होते. मला आपण महत्त्व देऊ नका; पण ज्या थोर संतांच्या नावावर मी नामाविषयी सांगतो, ते ज्ञानेश्वरमहाराज, एकनाथमहराज, तुकाराममहाराज, आणि समर्थ रामदासस्वामी, यांच्यासारखे संत कधी वेदबाह्य बोलतील, हे शक्यच नाही. वेदांना जे परमात्मस्वरूप अगोचर आहे ते स्वरूप संत तद्‌रूपाने जाणतात. सध्याच्या परिस्थितीमध्ये संयमाची बंधने सुटत चालली आहेत, म्हणून संतांनी कळवळून 'नाम घ्या' असे सांगितले.

वेद भगवंताचे वर्णन करतात. नामदेखील भगवंताचेच अस्तित्व प्रकट करते. प्रत्येक वेदमंत्राच्या आरंभी 'हरिः ॐ' असते, ते नामच आहे. जसा वेद हा अनादि, तसे नाम अनादि. जसा वेद हा अपौरुषेय, तसे नाम हे अपौरुषेय. जसा वेद हा अनंत, तसे नाम हे अनंत आहे. प्रत्यक्ष शिवाने नाम घेतले, म्हणून ते अनादि साधन आहे. इतर साधनांना आणि वैदिक कर्मांना आहाराविहाराची बंधने आहेत, भगवंताच्या नामाला ती नाहीत. नाम हे आगंतुक नाही. आदिनारायणाने वेद सांगण्याच्या वेळी जो ॐ चा ध्वनी केला तेच नाम होय. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे की, आपण नाम घेत जावे. किंबहुना, आपण नाम घेतले तरच वेदांचा खरा अर्थ आपल्याला कळेल अशी माझी खात्री आहे. वेद म्हणजे भगवंताची स्तुती होय. ती करीत असताना, म्हणजे वेद म्हणत असताना, आपले लक्ष शब्दांकडे असावे. आपण नेमके तेवढेच विसरतो. नाम घेणार्‍या लोकांनी शास्त्राच्या विरुद्ध वर्तन करू नये. आपल्याला शक्य आहे तितके वैदिक कर्म करावे, परंतु चित्तशुद्धी होण्यासाठी त्यावर पूर्णपणे विसंबून न राहता त्या कर्माच्या जोडीला भगवंताचे नाम घ्यावे. भगवंताला लबाडी खपत नाही. आपले मन स्वच्छ नसेल तर भगवंत हात आखडता घेतो, पण खरी अनन्यता असेल तर पोटभर पुरवितो. इतक्या तन्मयतेने नाम घ्या की, 'मी नाम घेतो आहे' हे सुद्धा विसरून जा.

२०३. इतर साधनांनी लवकर साधल्यासारखे वाटेल पण ते तात्पुरते असते. नामाने थोडा 
उशीर लागेल, पण जे साधेल ते कायमचे साधेल, कारण नामाने मुळापासून सुधारणा होते. 

20 Jul 2017

नामांतच राहे समाधान । ही सद्‌गुरूची आहे खूण ॥

रामापायी ठेवावे मन । त्यासी कर्तव्य नाहीं उरले जाण ॥

देहभोग आजवरी नाही सुटला कोणाला । त्याचा त्रास मात्र नाहीं रामभक्ताला ॥

तुम्हाला आता करण्याचेंच नाही काही । भाव ठेवा रामापायीं ॥

नामांतच राहे समाधान । ही सद्‍गुरूची आहे खूण ॥

रामास जावें अनन्य शरण । कृपा करील तो दयाघन ॥

देह सोडावा प्रारब्धावर । ज्या ज्या वेळी जें जें होईल तो मानावा आनंद ॥

दृश्याते नाहीं मानूं सत्य । रामरूपीं ठेवावें चित्त ॥

विषयासी नाही देऊं थारा । दया येईल रघुवीरा ॥

नाहीं देवाजवळ मागूं दुजें जाण । तुमचे नामीं लागो मन ।

ऐसें प्रार्थिता जो झाला । राम कृपा करील त्याला ॥

नाहीं भंगूं द्यावें समाधान । रामापायीं ठेवावें मन ॥

लोभ्याच्या मनांत जसें वित्त । तसें साधकाचें नामांत चित्त ॥

एवढे ज्यानें केलें काम । त्याला नाहीं रामाचा वियोग ॥

पाण्यांवाचून जसा मासा तळमळतो । तसें नामाशिवाय व्हावें मन ॥

एक मानावी आज्ञा प्रमाण । नाहीं याहून दुसरें साधन आण ॥

साधनाच्या आटाआटी । नाही देह करू कष्टी ॥

रामावांचून नाही कोणी सखा । त्याला नाहीं कोठें धोका ॥ 

प्रपंची ज्याचा राम सखा । भय चिंता दुःख नाहीं देखा ॥

रामसेवेपरतें हित । सत्य सत्य नाहीं या जगांत ॥

मनानें होऊन जावें भगवंताचे । त्यानें खास केलें सार्थक जन्माचे ॥

सर्व कर्ता राम । हा भरवसा ठेवावा ठाम ॥

राम कर्ता हा ठेवितां विश्वास । काळजीचें कारण उरत नाहीं खास ॥

रामरायाचें सान्निध्य राखता । भय, चिंता, शोक, यांची नाही वार्ता ॥

सतत करावें नामस्मरण । सर्व इच्छा राम करील पूर्ण ॥

नामाचें चिंतन, भगवंताचें ध्यान, गुरुआज्ञा प्रमाण ।

तीच गुरुपुत्राची आहे खूण । नाहीं यावांचून दुसरें स्थान । जिथें राहे समाधान ॥

रामापायीं व्हावें लीन । याहून नाहीं दुसरें लिहिणें जाण ॥

आतां याहून दुजे नाही करणें काहीं । असा भाव ज्यानें ठेविला हृदयीं । त्याला राम नाहीं राहिला दूर ॥

रामाविण न मानावे हित । त्यानेंच जोडेल भगवंत ॥

नाहीं करूं देहाचा कंटाळा । राम ठेवील त्यांत राहावें सदा ।

जे जे होतील देहाचे हाल । ते ते परमात्म्यापासून आले असें जाणावें ॥

नाहीं करूं काळजीला । मी नाही सोडलें तुम्हांला ॥

ज्याची वाटते महति । त्याचेंच चिंतन होय चित्तीं ॥

रामावांचून न ठेवा दुजा भाव । चित्तास येईल तेथेंच ठाव ॥

देहासकट माझा प्रपंच जाण । हा रामा तुला अर्पण ।

ऐसें वाटत जाणें चित्तीं । कृपा करील रघुपति ॥

सर्व ठिकाणीं पाहावें अधिष्ठान । तेणें मिळेल मनास समाधान ॥

२०२. रामापायीं ठेवा मन । नाम घ्यावें रात्रंदिन॥

19 Jul 2017

साधनाची चार अंगे.

मी जेव्हा भजन करीत असे, त्या वेळेस मी आणि देव यांच्याशिवाय मला कुणीच दिसत नसे. तसे तुम्हाला व्हावे अशी माझी इच्छा आहे, आणि तसे तुम्हाला होऊ शकेल म्हणूनच हे मी तुम्हाला सांगतो आहे. प्रपंचात वागत असताना प्रत्येकाने अंतर्मुख होऊन आपले दोष काय आहेत ते हुडकून काढावे आणि ते घालविण्याचा प्रयत्‍न करावा. माझे अवगुण मला डोंगरासारखे दिसले पाहिजेत. प्रत्येकजण स्वतःच्या अवगुणांकडे दुर्लक्ष करून, दुसऱ्याच्या अवगुणांकडे किंवा दोषाकडे पाहतो. त्याला स्वतःच्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही, पण दुसर्‍याच्या डोळ्यातले कुसळसुद्धा मुसळापेक्षा जास्त मोठे दिसते, हेच चुकते. आपण दुसर्‍याचे दोष सांगू नयेत, आणि परनिंदा करू नये. रोज निजण्याच्या वेळेस, आपण दिवसभरात देवप्राप्तीसाठी काय केले आणे दुसऱ्याच्या निंदेत किती काळ घालवला याचा पाढा वाचावा, म्हणजे चित्तशुद्धी होत जाईल. रोज असे तुम्ही करीत जा, म्हणजे तीन महिन्यात तुमचे चित्त शुद्ध होईल. चित्तशुद्ध होण्यासाठी दुसरा उपाय म्हणजे सत्संग. सत्संग करण्यासाठी संत कुठे पाहावेत ? आपण पाहू गेलो तर संत आपल्याला ओळखता येतील का ? संत आपल्यासारखेच देहधारी असतात का ? हल्लीच्या काळात संत पाहू गेल्यास सापडणे कठीण आहे. अशा वेळी दासबोध हाच संत होईल. समर्थांनी सांगून ठेवले आहे की, जो विश्वासाने हा ग्रंथ वाचील त्याला माझा संग घडेल.

आपण संतांना देहात पाहू नये, तर ते जे साधन सांगतात, तेच ते होत असे समजावे. त्यांनी चार गोष्टी करायला सांगितल्या आहेत : एक, निर्गुणत्व कळायला कठीण म्हणून सगुणोपासना करावी. त्यानेच निर्गुणरहस्य कळेल. दुसरी गोष्ट म्हणजे नम्रता. अभिमानाने परमात्मा दुरावतो. सर्वांशी जो नम्र तो भगवंताला प्रिय असतो. तिसरी गोष्ट अन्नदान, कलियुगात यथाशक्ति अन्नदान करीत जावे. त्याचे महत्त्व फार आहे. चौथी गोष्ट म्हणजे भग्वन्नामस्मरण अखंड ठेवणे. परमात्मप्राप्तीसाठी संतांनी नाम ही अजब वस्तू दिली आहे. संत भेटल्यावर, काही करायचे उरले आहे असे आपल्याला वाटताच कामा नये. ज्यांना ते वाटते, त्यांना गुरू भेटूनही भेट न झाल्यासारखेच आहे. आज एक यात्रा केली, उद्या दुसरी करायची राहिली, अशी इच्छा का असावी ? गुरू एकदा भेटला की आता काही कर्तव्यच उरले नाही असे ज्याला वाटते, त्यानेच गुरू भेटल्याचे सार्थक केले असे होते. गुरुआज्ञेपरते दुसरे त्याला साधनच नसते. तोच परमार्थ, आणि तीच त्याची तीर्थयात्रा होते. आणखी काही करायचे आहे असे त्याच्या ध्यानीमनीही येत नाही.

२०१. अत्यंत चिकाटीने संतांचा समागम करावा, आणि त्यांच्या कृपेस पात्र व्हावे.

18 Jul 2017

साक्षित्वाने राहाणार्‍याला दुःखाची बाधा नाही.

देहबुद्धी आहे तोवर, म्हणजे 'मी देही आहे' ही भावना आहे तोपर्यंत, काळजी राहणारच. काळजी मनातून असते. जोवर संशय फिटत नाही, परमेश्वराचा आधार वाटत नाही, तोवर काळजीही मनाला सोडीत नाही.

कुंडलीतल्या ग्रहांच्या अधिकाराची मर्यादा देहापर्यंतच आहे. पैसा किती मिळेल हे त्यावरून सांगता येईल, भगवंताकडे किती कल आहे हे सांगता येईल, पण भगवंताची प्राप्ती होईल की नाही हे सांगता येणार नाही. मनुष्यजन्म येऊनही भगवंताची प्राप्ती नाही झाली, तर जिवाचे फार नुकसान आहे. भगवंताच्या प्राप्तीची मनापासून तळमळ लागायला पाहिजे. एकदा का अशी तळमळ लागली की मनुष्य वेडा बनतो, आणि कोणी संत भेटला की निवांत होतो. संत आपल्यावर येणारी संकटे नाहीशी करीत नाहीत, तर त्या संकटांची भिती नाहीशी करतात. संकटापेक्षा संकटाची भितीच आपल्याला फार घाबरवून सोडते. 'आपल्याला हे कळले ते लोकांना कळून लोक सुखी होऊ द्या,' असा संतांचा एकच हेतू असतो. संत विषयावर मालकी गाजवितात. जगाला जिंकणे एक वेळ सोपे, पण स्वतःला जिंकणे कठीण आहे. संत स्वतःला जिंकून जगात वावरत असतात. संत साक्षित्वाने जगात राहतात, आणि साक्षित्वाने राहणाऱ्याला दुःखाची बाधा होत नाही. संतांच्या संगतीत राहून, त्यांच्या आज्ञेत राहून, आपण आपल्या मनातले सर्व संशय नाहीसे करावेत. वास्तविक, संतांच्या आज्ञेचे एकनिष्ठपणाने जो पालन करतो, त्याचे संशय आपोआप दूर होतात. जोवर संशय आहे तोवर असमाधान आहे. समाधान हे आपले आपल्यालाच घ्यायचे असते. म्हणून ज्याला समाधानी राहायचे आहे, त्याने फार धडपड करू नये.जशी स्थिती येईल त्या स्थितीत समाधानात राहावे.

कचेरीचे विचार आपल्याबरोबर घरी आणू नयेत; ते तिथेच ठेवावेत. घरातले वातावरण शुद्ध आणि निःसंशयाचे असावे. भोळेपण एकप्रकारे चांगले; ती भाग्याची गोष्ट आहे. जो योगभ्रष्ट असतो त्याच्या अंगी भोळेपण असते; जसे कल्याणस्वामींच्या अंगी होते. झालेल्या गोष्टी विसरून जाण्यातच आनंद आहे; पण ते विसरणे कृत्रिमपणे न आणता, भगवंताच्या स्मरणात राहिल्याने आले पाहिजे. म्हातारपणी मन आणि शरीर फार नाजूक बनते. त्या वेळी शरीरसुद्धा बरे राहायला, आनंद हे फार मोठे औषध आहे. हसावे, खेळावे, लहान मुलांत मिसळावे, थट्टा-विनोद करावा; काहीही करावे पण आनंदात राहावे. ज्याचा आनंद कायम टिकला, त्याच्याच जन्माचे सार्थक झाले.

२००. समाधान ही परमेश्वराची देणगी आहे. ती मिळविण्याचा उपाय म्हणजे भगवंताचे स्मरण होय.