Showing posts with label बोधवचने. Show all posts
Showing posts with label बोधवचने. Show all posts

24 Jun 2017

गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनांमधील काही बोधवचने

रामनाम हे ओंकाराचेच स्वरूप आहे. ते सर्व कर्मांचा आणि साधनांचा प्राण आहे.
नामस्मरण 'समजून' करावे. समजून म्हणजे 'राम कर्ता' या भावनेत राहून.
परमात्म्याने आपल्याला सांगून ठेवले आहे की, "तू माझा व्हावास असे तुला वाटते आहे ना ? मग तू प्रपंच अतिदक्षतेने कर. प्रयत्‍नाला कधी मागे पाहू नकोस, पण फळ देणारा मी आहे ही भावना ठेवून तू वाग. जी परिस्थिती येईल त्यात समाधान बिघडू देऊ नकोस आणि मी जे सांगतो ते औषध घे. ते तुला सर्व रोगांतून मुक्त करील; आणि ते औषध जर कोणते असेल तर ते माझे 'नाम' हे होय."

  • व्यवहारदृष्टया माझ्यामध्ये एकच दोष आहे की, मला कुणाचे दुःख पाहवत नाही. माझ्यामध्ये प्रेमाशिवाय दुसरे काही सापडायचे नाही. माझ्यातले प्रेम काढले तर मग 'मी' नाहीच ! मला फक्त आईच्याच प्रेमाची कल्पना आहे. माझ्याकडे येणार्‍या माणसाला माहेरी आल्याप्रमाणे वाटले पाहिजे; तो परत जातांना त्याच्या डोळ्यात पाणी आले पाहिजे.
  • दुसर्‍याला आपला आधार वाटला पाहिजे. मी असून काहीच होत नाही; ज्या गोष्टी घडायच्या त्या घडतच असतात. पण आपण असण्यात एक आधार आहे असे इतरांना वाटावे. माझे आता किती दिवस आहेत कुणास ठाऊक! मी पुढे असो वा नसो, मी जे सुरुवातीला सांगितले तेच मी शेवटीही सांगतो: तुम्ही कसेही असा पण भगवंताच्या नामाला सोडू नका.
  • प्रेम ही भगवंताची वस्तू आहे. प्रेम करायला आपण आपल्या घरापासून सुरुवात करावी. सर्वांशी अत्यंत प्रेमाने, निष्कपट प्रेमाने वागावे. आपले बोलणे अगदी गोड असावे. आपल्या वागण्या मध्ये, नव्हे पाहण्यामध्ये सुद्धा प्रेम असावे. प्रेम करायला गरीबी आड येत नाही, किंवा श्रींमंती असेल तर फार द्यावे लागत नाही. नाम हे प्रेम स्वरुप आहे,आणि खरा प्रेमाचा व्यवहार म्हणजे देणे-घेणे होय. म्हणून, नाम घेतले की, भगवंताचे प्रेम येईलच.
  • आनंद पाहायला आपल्याला दुसरे कुठे जावे लागते का ? नाही. जो स्वतःच आनंदरूप आहे त्याने आपण होऊन 'मी दुःखी आहे' असे मानून घेतले आहे.
  • ज्यांना व्याप आहे ते लोक रडतात, आणि ज्यांना व्याप नाही तेही लोक रडतात; मग सुख कशात आहे ? पैसा सुख देतो का? पैसा मिळवणे कठीण, मिळाला तरी तो कायम राहील का त्याची शाश्वती नाही. पैशाप्रमाणेच इतर सर्व वस्तूंची गोष्ट आहे. सर्वसुखी असा प्रपंचात कोण आहे ? प्रत्येकाचे काही ना काही तरी गार्‍हाणे आहेच. प्रत्येकाला आशा वाटते की मी उद्या आजच्यापेक्षा सुखी होईल. तो कधी पूर्ण सुखी होत नाही, त्याचे गार्‍हाणे कधी संपत नाही.
  • मनुष्याची शांती बिघडायला जगामध्ये दोनच कारणे आहेत. एक म्हणजे आपल्याला हवे ते न येणे, आणि दुसरे म्हणजे आपल्याला नको ते येणे. या दोन्हीपैकी आपल्या हातामध्ये एकही नाही; मग आपण दु:ख का करावे? भगवंताच्या नामाची एकदा गोडी लागली ना, की सर्व काही साधते. नाम अभिमानाचा नाश करते. नामाने हवे-नको-पणाची बुद्धी होत नाही. साधुसंतांनी आवर्जून सांगितलेले हेच नाम तुम्ही सतत घेऊन समाधानाचा शाश्वत ठेवा मिळवा.
  • जगाची आशा, आसक्ती, सोडल्याशिवाय परमेश्वराला आपली हाक कशी पोहोचेल? ज्या गोष्टीवर आपले प्रेम असते त्याच गोष्टीची आपल्याला नड लागते. आपल्याला देवाची नड लागली आहे का? देवाचे प्रेम लागायला त्याच्या अखंड सहवासात राह्ण्याची अत्यंत जरुरी आहे; आणि हा सहवास जर कशाने साधत असेल तर तो एक त्याचे नाम घेतल्यानेच साधेल. भगवंताचे नाम घेऊन त्याचे प्रेम मिळवा, हेच माझे सांगणे.
  • ज्याच्यामध्ये भगवंताची आठवण राहील, तो विवेक समजून आचरणात आणा. प्रपंच उत्तम करा, पण त्याच्या अधीन होऊ नका. अधीन होणे हे पाप आहे, प्रपंच करणे हे पाप नाही. शक्य तितके धर्माचे पालन करा; नीती प्राणाबरोबर सांभाळा; आणि प्राण गेला तरी नामाची धुगधुगी राहू द्या, इतके नाम तुम्ही सांभाळा.
  • आपले ध्येय काय असावे हे ठरविण्याची बुद्धी माणसाला आहे, ती खालच्या प्राण्यांना नाही. हाच माणसांत आणि त्या प्राण्यात फरक आहे. प्राण्यांना प्रारब्धाने आलेले भोग भोगावे लागतात, त्याचप्रमाणे माणसालादेखील आलेले भोग भोगावे लागतात. पण भगवंताचा पाठिंबा ज्याला आहे तो मागेपुढे सोयीने भोग भोगू शकतो.
  • दुसरे काही एक न करता सतत निश्चयाने नामात राहण्यार्‍या माणसाला संतांची भेट झाली की ते त्याचे कल्याण करतात.
  • ज्याप्रमाणे एकच ठिणगी सबंध कापसाचा नाश करायला समर्थ असते, त्याप्रमाणे भगवंताचे नाम सर्व पापांचा नाश करायला समर्थ असते.
  • खरे सांगतो मी, मनुष्याने जन्माला येऊन एकच करावे: आपण नामात रहावे, आणि दुसर्‍यास नामास लावावे. संसारात न्यून पडू देऊ नये आणि भगवंताला विसरू नये.
  • आपल्या बाळाला दुःख व्हावे असे माऊलीला कधी वाटेल का ? आपण तिला मनापासून हाकच मारीत नाही. भगवंताचे नाम मनापासून घेतच नाही; इथेच आपले सर्व चुकते. तेव्हा गोंदवल्यास आल्यासारखे, रामाजवळ जाऊन आता तुम्ही एकच मागा, 'रामा, तुझे प्रेम आम्हाला दे.' तुम्ही मागाल ते तो तुम्हाला खात्रीने देईल यावर विश्वास ठेवा. तो त्याच्यासाठीच इथे उभा आहे. रामाची भक्ती करण्याने, आपला संसार आपली कल्पनाही होणार नाही इतका सुखाचा होईल. कोणत्याही परिस्थितीत नामाला सोडू नका. भगवंताच्या नामानेच त्याचा सहवास घडेल आणि त्याचे प्रेम उत्पन्न होईल.
  • भगवत्प्राप्‍तीसाठी एक सुलभ उपाय आहे: भगवंताशी आपले नाते जोडावे, कोणते तरी नाते लावावे. भगवंत हा माझा स्वामी आहे, मी त्याचा सेवक आहे; तो माता, मी लेकरू; तो पिता, मी पुत्र; तो पती, मी पत्‍नी, तो पुत्र, मी आई; तो सूत्रधार, मी बाहुले; असे काही नाते लावावे. मुलगा दत्तक घेतल्यावर मग त्याच्याशी पुत्रप्रेम लावतो की नाही? लग्न होण्यापूर्वी कोण नवरा आणि कोण बायको? पण लग्न होताच ते नाते लावतो, आणि सहवासाने प्रेम वाढवतो. प्रेम केल्याने प्रेम वाढते. तसे भगवंताविषयीचे प्रेम कोणचे तरी नाते लावून वाढवावे. किंबहुना तो स्वभावच व्हावा, म्हणजे भगवत्प्राप्‍ती सुलभ होते.