Showing posts with label ऑक्टोबर. Show all posts
Showing posts with label ऑक्टोबर. Show all posts

31 Oct 2017

मनुष्यमात्र भगवंताच्या प्राप्तीसाठीच जन्माला आला आहे.

भगवंत एकच ओळखतो : जो त्याची भक्ति करतो, तो त्याला आवडतो. तिथे जातीचे, वर्णाचे, बंधन नाही. आपण भाग्यवान कुणाला म्हणतो ? ज्याच्याजवळ पैसा अधिक असतो त्याला; पण तो काही खरा भाग्यवान नव्हे. ज्याला भगवंत भेटला तो खरा भाग्यवान. भगवंत आपल्याला भेटणे हे प्रत्येकाने जीवनातले मुख्य कार्य समजावे. पैसा भगवंताच्या आड येत नसतो; आपला अहंकार, मीपणा, हाच मुख्यतः भगवंताच्या आड येतो. 'मी सेवा करतो' असे जो म्हणतो त्याची खरी सेवाच होत नाही. कर्तेपणा आपल्याकडे घेतो तोपर्यंत सेवा नाही घडली. भगवंताची आठवण ठेवून जे जे कर्म आपण करतो ते ते पुण्यकर्म होते. भगवंत माझ्याजवळ आहे अशी श्रद्धा ठेवून वागा. श्रद्धेने जो करील त्याला फळ येईल खास. पण म्हणून श्रद्धेवांचून केलेले भजनपूजन वाया जाते असे नाही समजू. भगवंताची भक्ति उत्पन्न व्हावी म्हणूनच भजनपूजन करावे, मनाचे रंजन म्हणून करू नये. सत्कर्म करणारे पुष्कळ असतात, पण पुष्कळ वेळा त्यात स्वार्थबुद्धी असते. फळाची आशा न ठेवता सत्कर्म करणे हीच खरी भक्ति.

सर्वांभूती भगवद्‌भाव ठेवावा हेच परमार्थाचे खरे सार आहे. माझ्यामध्ये भगवंत आहे हे मी ओळखले म्हणजे इतरांच्या ठिकाणी त्याला पाहता येईल. 'मी कोण' हे न ओळखल्यामुळेच आपले सर्व चुकते आहे. माझ्यात भगवंत आहे हे दोन प्रकारे पाहता येते. सर्व चेतना त्याकडून मिळते हे एक. दुसरे म्हणजे, 'देह ठेवला' असे आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा ठेवणारा कोणी दुसरा असला पाहिजे; म्हणजे देह हा 'मी' नव्हे. जागृती, स्वप्न, सुषुप्ती, यांचा सा़क्षी कुणीतरी आहे हे खास. 'मी कोण' हे जाणायला सा़क्षीरूपाने वागावे. सर्व जगाला मी माझे म्हणतो, पण जो खरा माझा त्याला तसे म्हणत नाही. भगवंत माझ्यात आहे ही जाणीव उत्पन्न करून घ्यावी. अनुमानाने आणि अनुभवाने पाहिले तर भगवंत माझ्यात आहे हे खात्रीने पटेल. वर्षाचा आनंद पाडव्यापासून, आयुष्याचा आनंद वाढदिवसापासून, आणि दिवसाचा आनंद सकाळपासून सुरू होतो, म्हणून भगवंताच्या भक्तीला आपण त्याच्या नामाने सुरुवात करावी; म्हणजे त्यामुळे होणारा आनंद लगेच आपल्याला मिळेल; सुरुवात गोड आणि शेवटही गोडच होईल. आकाश हे जसे सर्वांना सारखे आहे, त्याचप्रमाणे मानवजन्माचे ध्येय हे सर्वांना सारखेच आणि एकच आहे. कोणत्याही जातीतला, धर्मातला किंवा देशातला मनुष्य असो, तो भगवंताच्या प्राप्तीसाठी म्हणजे परमार्थासाठीच जन्माला आला आहे.

३०५. आपण भगवंताला शरण गेलो, तर तो आपल्याला हातचा कधी सोडणार नाही.

30 Oct 2017

ठेवतां रामावर एक विश्वास ।  त्यालाच समाधान हमखास ॥ 

रामाचा हात माझ्यामागे हें ठेवावें मनांत । व्यवहार सांभाळून वागावे जगांत ॥

दुष्ट मतीची उत्पत्ति । ही दुर्जनाची संगति ॥

भावे धरितां रघुपति । सर्व संकटे दूर जाती ॥

भोगांत नामाचे न व्हावे विस्मरण । याकरितां राखावें समाधान ॥

देहाचे भोग देहाचे माथी । त्याची न मानावी खंती ॥

विश्वास ठेवावा रामापायीं । सर्व कांही चांगले होऊन जाई ॥

आपला भार घेतला रामानें । विश्वासाने सत्य मानणें खरे ॥

सद्‌गुरुआज्ञा प्रमाण । हेंच साधनांतील साधन जाण ॥

जो जो प्रसंग येईल जैसा । तो तो सान्निध्य जाणावे रघुपतीचा ॥

शरीर आहे दों दिवसांचे । वायां न जाऊं द्यावें साचे ॥

रामकृपा त्याजसी होई । ज्यानें नांव ठेवले हृदयी ॥

मुखीं नाम, हृदयीं राम, । त्याने जोडला आत्माराम ॥

गुरुचरणी ठेवावा विश्वास । निर्भयता त्यानें येते खास ॥

जें जें होणार ते होतच जाते । विनाकारण मन कष्टी होते ॥

माझे प्रपंची नाहीं सुखदुःख । असे ज्याने जाणले चित्तीं । त्याचा संसार झाला सुखाचा निश्चितीं ॥

ज्याने दिली रामाची संगति । त्याचा विषाद न मानावा चितीं ॥

उद्विग्नतेचें कारण । साधनाचे विस्मरण ॥

मुख्य करितां रामाची भक्ति । आपोआप गळते विषयाची आसक्ति ॥

भगवंतावर ठेवावा पूर्ण विश्वास । तो करतो हेंच हिताचे मानावें खास ॥

अंतकाळी भगवंताचे नाम । त्याला करीन माझेसमान ।

हें भगवंताचे वचन जाण । त्याच्यावर ठेवावा विश्वास ॥

म्हणून रामावांचून जगती । आतां माझा असें न म्हणावें चित्तीं ॥

दुःख जाण्यास उपाय सांगती साधुजन । आसक्तीत न गुंतावें आपण ॥

म्हणून, सर्व कांही करावे । पण मीपणाने कोठें न राहावे ॥

याला उपाय एकच जाण । सदा राखावे रामाचे अनुसंधान ॥

याहून दुजें नाही साधन । हे मानावे प्रमाण ॥

ठेवतां रामावर एक विश्वास । त्यालाच समाधान हमखास ॥

म्हणून रामाचा चित्तीं ठेवावा विश्वास । वळण द्यावें व्यवहारास ॥

साधन असें काही असावे । ज्याने साध्याला सहज पोहोचावे ॥

राम म्हणावा आपला । साधनांतील साधनाचा लाभ झाला ॥

शुद्ध असावे आचरण । पवित्र करावें मन ॥

नामस्मरण ज्याच्या मुखीं । रामकृपें तोच एक सुखी ॥

एकच देव, एकच गुरु, एकच साधन ।

यांवर ठेवतां विश्वास । कृपा करील ईश्वर खास ॥

३०४ जेव्हां मनासकट देह केला अर्पण । 
मग मरणाच्या भयाचे काय कारण ॥ 

29 Oct 2017

भगवंताचे होण्यास आपण निर्दोष असणे जरूर आहे.

भगवंताचे समाधान आपण्यास न मिळण्याचे कारण, आम्ही ज्याचे आहोत असे वाटते ते आम्हाला सोडता येत नाही; प्रपंच आम्हाला हवासा वाटतो. जगाच्या तोंडाकडे पाहून समाधान मिळेल असे आपल्याला वाटते. ही प्रपंचाची आणि जगाची आस सोडून भगवंताचे दास झाल्याशिवाय आम्हाला समाधान मिळणे कठीण आहे. हे दास्यत्व येण्यासाठी भगवंताच्या प्राप्तीची उत्कंठा आम्हाला लागणे जरूर आहे. ही उत्कंठा यावी तरी कशी ? भगवंताचे होण्यासाठी, आम्ही अगदी निर्दोष असणे अवश्य आहे. हे निर्दोषपण येण्यासाठी, आपण खरोखरच जसे नाही तसे जगाला दिसू नये. मनाने नेहमी शुद्ध असावे. आपण खरोखर चांगले नाही असे आपल्याला कळत असतानासुद्धा लोक आपल्याला चांगले म्हणतात, याची आम्हाला खंत वाटणे जरूर आहे. जगात आपले वागणे असे असावे की, आपल्याविषयी दुसर्‍या कुणाला शंकाही येता कामा नये. ढोंग मुळीच करू नका. आचारविचाराने इतके पवित्र झाल्यानंतर मग आम्हाला भगवंताचे का बरे होता येणार नाही ?

भगवंताचे झाल्यावर आम्हाला काळजीचे काही कारण आहे का ? आपण सर्वजण 'आम्ही भगवंताचे आहोत' असे म्हणतो आणि काळजी करतो, हे किती विपरीत आहे ! ही प्रपंचाची काळजी नाहीशी होण्यासाठी, प्रपंचातले सर्व वैभव, धनदौलत ही आपली कर्तबगारी नसून, ती रामाच्या इच्छेने आली आहे असे आम्ही म्हटले पाहिजे. 'माझा प्रपंच तुझ्या इच्छेने चालला आहे, तू ठेवशील त्यात मी समाधानात राहीन,' अशी आमची वृत्ती बनायला पाहिजे. यासाठी मोठे वैराग्य पाहिजे असे नाही. खरोखर, वैराग्य, त्याग वगैरेंच्या भानगडीत पडू नका. भगवंत ठेवील त्या परिस्थितीमध्ये समाधानात राहणे यासारखे दुसरे वैराग्य कोणतेही नाही. ज्याच्यामधे भगवंताचा विसर पडेल, त्याच्यावर वैराग्य करा. ज्याच्यामध्ये भगवंताची आठवण राहील, तो विवेक समजून आचरणात आणा. प्रपंच उत्तम करा, पण त्याच्या आधीन होऊ नका. आधीन होणे हे पाप आहे, प्रपंच करणे हे पाप नाही. शक्य तितके धर्माचे पालन करा; नीति प्राणाबरोबर सांभाळा. गोंदवल्याला तुम्ही इतकी मंडळी येता, मला संकोच असा वाटतो की, इतका पैसा खर्च करून, इतक्या अडचणी सोसून, इतके कष्ट करून तुम्ही येता, तर बरोबर काय घेऊन जाता ? काहीतरी बरोबर घेऊन जाऊन आचरणात आणा. नामस्मरणात तुम्ही सगळ्यांनी राहा. नामाकरिता नाम घ्या. नाम घेऊन काही मागू नका, राम कल्याण केल्याखेरीज राहणार नाही.

३०३. आपल्याला कोणी चांगले म्हटले तर आपल्या जीवाला धक्का बसून लगेच नामाची आठवण व्हावी.

28 Oct 2017

परमेश्वर आपल्या हृदयात आहे.

सरकारी नोकर वरिष्ठाच्या हुकुमाप्रमाणे चालत असल्यामुळे त्याच्यावर वैयक्तिक जबाबदारी कसलीही येत नाही आणि कर्तेपणाही त्याला शिवत नाही; त्याप्रमाणे गुरूवर श्रद्धा ठेवून त्याच्या आज्ञेत राहावे. लाभ-हानी देव जाणे, जबाबदारी गुरूवर; आणि तोच हे साधन करवीत असल्याने कर्तेपणही त्याच्यावरच असणार. त्याच्याही पुढे म्हणजे, जे जे काही घडते ते ते सर्व त्याच्याच इच्छेने आणि सत्तेने घडते, अशी दृढ भावना असली, म्हणजे कर्तेपण सोडून अजिबात मोकळे होता येते. असे झाले म्हणजे जे जे आपल्या हातून घडते, ती त्याचीच सेवा होते. मुख्य गोष्ट ही की, परमात्मा आपल्या हृदयात आहे, आपण त्याच्यात आहोत, आपण तोच आहो, अशी दृढ भावना पाहिजे. याच्या मधली पायरी म्हणजे परमात्म्याच्या नजरेखाली, तो पाहात असताना, आपण सर्व कर्मे करीत आहोत अशी जाणीव असणे आवश्यक आहे. यामुळे अभिमान सर्वस्वी जरी न गळला, तरी आपल्या हातून वाईट कृत्ये तरी घडायची नाहीत.

क्षेत्राला क्षेत्रत्व आपण आपल्या भावनेने जर दिले नाही तर तिथे पाणी आणि दगडच आहेत ! 'काशी', 'गंगा', असे म्हटले म्हणजे पवित्रतेचे संस्कार मनात उभे राहतात, पण तिथल्या राहणार्‍या पुष्कळ लोकांचा तसा भाव नसल्यामुळे ते वर्षावर्षात स्नानासही जात नाहीत. यावरून, त्यांना ते क्षेत्र असे वाटतच नाही असे दिसते. क्षेत्र हे आपल्या भावनेनेच नाही का निर्माण होत ? मग ते घरच्या घरीच नाही का निर्माण करता येणार ? याला अर्थातच दृढभाव असायला पाहिजे. तितका तो दृढ होत नसेल, तर क्षेत्रात जावे; आणि आर्थिकदृष्ट्या तेही शक्य नसेल, तर 'काशीस जावे नित्य वदावे;' म्हणजे काशीचे स्मरण तरी करावे, म्हणजे त्याने पवित्रतेचे संस्कार उद्‌भूत होऊन मन पवित्र होईल. देव सर्वत्र भरलेला आहे, पण तो भावाने प्रकट केला पाहिजे. प्रह्लाद, द्रौपदी यांना अगदी खात्री होती की देव आपला साह्यकारी आहे, तेव्हा देवाला प्रकट होणेच भाग पडले. सद्‌गुरू मला साहाय्य करतील अशी तुमची खात्री पाहिजे, म्हणजे त्यांना साहाय्य करावेच लागते. याचा अनुभव घेणे हे तुमच्याच हाती नाही का ?

स्वार्थाने कर्मे करणे याचे नाव प्रपंच, आणि निःस्वार्थपणाने करणे याचे नाव परमार्थ. जो आसक्तिमध्ये नाही तो निःस्वार्थी समजावा. आसक्ति निघण्याची पहिली पायरी असेल तर ती उदासीनता होय. देव आहे असे निःशंकपणे वाटणे हे ज्ञान होय. हे ज्ञान भगवंताच्या अनुसंधानात राहिल्याने सहज प्राप्त होते.

३०२. उपासनेचा हेतू असेल तर तो राम आपल्या पाठीमागे उभा आहे ही भावना उत्पन्न करणे हा होय.

27 Oct 2017

परमेश्वराकडे कर्तेपण देऊन काळजी सोडून द्यावी.

सर्व कर्तेपण परमात्म्याला देऊन, आपण काळजी करण्याचे अगदी सोडून द्यावे, आणि सदैव समाधानात आणि आनंदात राहावे. जे जे काही घडते आहे ते ते परमात्माच आपल्या हिताकरिता करतो आहे, आणि आपल्याकडून ज्या क्रिया होतात त्या आपण करीत नसून परमात्माच करीत आहे, अशी प्रत्येक गोष्टीमध्ये आणि प्रत्येक क्रियेमध्ये जाणीव आणि भावना ठेवावी. अशी भावना ठेवायला कुठे बिघडते ? त्यात अवघड ते काय आहे ? प्रयत्‍न अवश्य करावा आणि तो कसून करावा ; पण तो परमात्माच सर्व करीत असून, त्यात येणारे यश अगर अपयश हे सर्व आपल्या हितासाठीच आहे, अशी ठाम भावना ठेवली पाहिजे. अशी ठाम भावना ठेवल्यावर काळजीला जागाच कुठे राहिली ? आणि एकदा काळजी गेली म्हणजे आपला आनंद हा स्वयंसिद्ध आहेच आहे ! तो काही दुसर्‍या कुठून मिळवायचा नाही. आनंदाला ही काळजी झाकाळून टाकते. थोडक्यात म्हणायचे झाले तर असे सांगता येईल की, मीपण, म्हणजेच कर्तेपण परमात्म्याला द्यावे, म्हणजे काळजी नाहीशी होते आणि निर्मळ आनंद उरतो, आणि अशा स्थितीत नामस्मरण चालावे. हेच 'स्वानंदात स्मरण' होय.

आपले कर्तेपण अपुरे आहे. ते आपल्या स्वाधीन नसून परमात्म्याच्या स्वाधीन आहे. म्हणून सुखदुःखाची बाधा आपल्याला न होता, ती परमात्म्याला झाली पाहिजे ! आपल्या सुखदुःखाचा नाश म्हणजेच आपल्या कर्तेपणाचा नाश; आणि आपल्या कर्तेपणाचा नाश म्हणजेच 'भगवंत करतो' ही भावना होय. आपले होते कसे ते पाहा; कर्माच्या सुरुवातीला काळजी लागते; कर्म झाल्यावर शेवटी, 'अरे, हेच का फळ मिळाले ?' म्हणून काळजी लागते; याप्रमाणे, काळजी करणार्‍या मनुष्याला सुख-समाधान केव्हाच मिळत नाही. काळजी ही वाळवीसारखी आहे; काही खात असताना तर ती दिसत नाही, पण कपडा किंवा पुस्तक खाल्ल्यावर मात्र ती दिसते. त्याचप्रमाणे, काळजी आपली निष्ठा कमी करीत असते; त्या अवस्थेत ती दिसत नाही, परंतु नंतर मात्र ती दिसते. काळजी सोडायची म्हटली तर आजच सुटेल, नाहीतर ती केव्हाच सुटणार नाही. भारतीय युद्धात, भगवंताने जिथे रथ नेऊन उभा करावा तिथे अर्जुनाने बाण मारावे ! अर्जुनाने आपल्या रथाच्या दोर्‍या भगवंताच्या हाती दिल्या, त्याचप्रमाणे आपण आपल्या जीवनाच्या दोर्‍या भगवंताच्या हाती देऊ या. अर्जुनाच्या जागी एखादे बाण मारणारे यंत्र जरी असते तरी काम तेच झाले असते. तसे आपण भगवंताचे यंत्र बनू या. यंत्राला चालविणारी शक्ति आणि यंत्राकडून काम करवून घेणारी शक्ति म्हणजे भगवंत आहे. आपण आपल्या मालकावर पूर्ण विश्वास टाकून त्याच्या नामात राहू या.

३०१. आपला देह प्रारब्धावर टाकून, साधकाने मजेत त्याच्या सुखदुःखाकडे पाहावे.

26 Oct 2017

भगवत्कृपेचा लोंढा म्हणजे काय ?

कोणतेही बी पेरताना ते अत्यंत शुद्ध असावे; म्हणजे किडलेले किंवा सडलेले नसावे. भगवंताशिवाय दुसर्‍या कोणत्याही फळाच्या हेतूने केलेली भक्ति ही सडलेल्या बीजासारखी आहे. आता, सुरुवातीलाच उत्तम बी पैदा होईल असे नाही, परंतु प्रयत्‍नाने ते साधता येते. पुष्कळ वेळा काही तरी ऐहिक सुखाच्या इच्छेने मनुष्य भक्ति करायला लागतो; म्हणजे त्यावेळी तो सडके बीज पेरीत असतो. प्रारंभी अशा तर्‍हेचे काही तरी निमित्त होतच असते, परंतु थोड्याशा विचाराने, शुद्ध बीजाची पेरणी होणे जरूर आहे असे चित्ताला पटते. भगवंताची तशी अनन्य भावाने प्रार्थना करावी. पाऊस पडणे वा न पडणे ही गोष्ट सर्वस्वी भगवंताच्या स्वाधीन आहे, आणि तो यथाकाळ पडतोही. असे पाहा की, एखादे शेत खोलात असले की त्यात पाणी इतके साचते की, ते जर बाहेर काढून लावले नाही तर सबंध पीक कुजून जाते. त्याच अर्थाने भगवंताच्या कृपेचा लोंढा जर जोराचा असला तर बंधारा फोडून तो बाहेर सोडणेच जरूर असते. असे करण्यात दोन्हींकडून फायदा असतो. एक म्हणजे शेतात जास्त झालेले पाणी बाहेर काढून लावल्याने शेतातले पीक न कुजता उत्तम वाढते; आणि दुसरे म्हणजे, हे बाहेर घालविलेले पाणी आजूबाजूच्या शेतात पसरून तिथलेही पीक वाढवायला मदत होते. बंधारा फोडून पाणी बाहेर लावणे याचेच नाव परोपकार. साधकाची जशी प्रगती होत जाईल त्याप्रमाणे मध्यंतरी सिद्धी प्राप्त होऊन, बोललेले खरे होणे, दुसर्‍याच्या मनातले समजणे, एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी अदृश्य गतीने जाणे, इत्यादि प्रकार घडू लागतात. अशा वेळी मोहाला बळी न पडता, त्यांचा उपयोग स्वार्थाकडे न होईल अशी खबरदारी घेणे जरूर असते. उपयोग करायचाच झाला तर दुसर्‍याचे काम करण्यात, परोपकारांत व्हावा; यालाच बंध फोडून पाणी बाहेर लावणे असे म्हणता येईल.

शहाण्या माणसाने आपले सुख बाहेरच्या वस्तूवर अवलंबून न ठेवण्याचा अभ्यास करावा. बाहेरची वस्तू सुटली तरी मनाला दुसरी वस्तू देणे अवश्य असते. अशी वस्तू म्हणजे भगवंत होय. भगवंत हा नेहमी राहणारा, स्वयंपूर्ण, आणि आनंदमय असल्यामुळे त्याचे चिंतन करता करता मनामध्ये ते गुण उतरतात. अर्थात् मन भगवंताच्या चिंतनाने आनंदमय बनल्यावर त्या माणसाला जीवन किती रसमय होत असेल याची कल्पना करावी. मी त्याचा आहे आणि हे सर्व त्याचे आहे अशी सारखी जाणीव पाहिजे. किती आनंद आहे त्यात !

३००. शुद्ध अंतःकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल.

25 Oct 2017

ईश्वरप्राप्तीचा मार्ग - खरी तळमळ आणि संपूर्ण शरणागती

नुसता विषयाचा त्याग केल्याने ईश्वराची प्राप्ती होत नाही; बायकोचा त्याग करून होत नाही; जनात राहून होत नाही तसेच वनात राहिल्यानेही होत नाही. खरे म्हटले म्हणजे अमुक असे काही नाही, की जे केल्याने त्याची प्राप्ती होईल. तसे असते तर साधू ओळखायला काहीच वेळ लागला नसता. संत हे यांपैकी काय करीत नाहीत ? काही प्रपंच करतात तर काही वनात राहतात. म्हणून काय, की अमुकच केले म्हणजे ईश्वराची प्राप्ती होते असे नाही. मग असे काय आहे की जे केल्याने त्याची प्राप्ती होते ? तर त्यासाठी एकच लागते, ते म्हणजे, ईश्वराची प्राप्ती व्हावी ही मनापासून तळमळ लागली पाहिजे. ज्याला अशी तळमळ लागली त्याचे निम्मे काम झाले. ज्याप्रमाणे मोठी इमारत बांधण्यासाठी तिचा पाया अगोदर बळकट असावा लागतो, त्याप्रमाणे खरी तळमळ लागली म्हणजे पुढले कार्य व्हायला फार अडचण पडत नाही; आणि हे व्हायला भाग्य लागते. तळमळ लागल्यावर सर्व भोगांचा त्याग करावाच लागतो असे नाही. आपण रामाचे आहोत असे आपल्याला मनापासून वाटले पाहिजे; आणि त्याला शरण जाऊन आपण त्याचे आहोत असे वागले पाहिजे; म्हणजे त्याचे झाले पाहिजे. असे करण्याने आपला प्रपंच बिघडेल असे वाटते का ? आपण नोकरी करतो त्यावेळेस अंमलदाराबद्दल आपले चांगले मत असते का ? तो आपल्याला मनाने आवडत नसूनही आपण देहाने त्याचे काम करतोच की नाही ? तसे, आपण मनाने रामाचे आहोत असे ठरवून देहाने प्रपंच करावा, म्हणजे प्रपंच न बिघडता उलट चांगला होतो; कारण आपण ज्याला शरण गेलो त्याला त्याची लाज असते. बिभीषण रामाला शरण आला, तेव्हा त्याला मारून टाकावा असेच बाकीच्यांनी सांगितले. तरी पण रामाने सांगितले की, "जो मला शरण आला त्याचे रक्षण करणे माझे काम आहे." शरणागताला नुसते जीवदान देऊन तो राहिला नाही, तर त्याला लंकेचे राज्य दिले. म्हणून सांगतो की, जो त्याचा होऊन राहतो, त्याची लाज रामाला असते.

माझ्याकडे इतके जण येतात, पण एकाने तरी 'रामाची प्राप्ती करून द्या' म्हणून विचारले का ? मी आलो आहे तो काय तुमचे विषय पुरविण्यासाठी ? समजा, एकजण चोरी करायला निघाला आणि वाटेत त्याला मारुतीचे देऊळ लागले. तिथे जाऊन मारुतीला नवस केला की, "मला जर आज चोरीत यश आले तर मी तुझ्या देवळावर सोन्याचा कळस चढवीन'" तर आता सांगा, त्याला मारुतीने काय द्यावे ? त्याने त्याच्या नवसाला पावावे असे तुम्हाला वाटते का ? जर नाही, तर तुम्ही विषय मागितले आणि मी दिले नाहीत तर मला दोष का देता ? आपल्याला नवस करायचा असेल तर असा करावा की, "मला तू ज्या स्थितीत ठेवशील त्या स्थितीत आनंद म्हणजे समाधान रहावे, आणि दुसरे काही मागण्याची इच्छाच होऊ नये."

२९९. साधकाने शक्य तितके कर्तव्य करावे, आणि मग 
'भगवंत किंवा गुरू पाहून घेतील' असे म्हणून आनंदात राहावे. 

24 Oct 2017

परमेश्वराची खरी पूजा.

देहाभिमान नाहीसा झाला म्हणजे काळजीचे कारण उरत नाही. 'मी साधन करतो' असा अभिमान देहाभिमानामुळे उत्पन्न होतो. हा साधनाभिमानही घातुक असतो. तेव्हा, जे काही होते ते परमेश्वराच्या सत्तेने होते असे मानीत जावे. आपले हित कशात असते ते त्यालाच उत्तम कळते, आणि तो सर्व तुमच्या बर्‍याकरिताच करीत असतो. तेव्हा कसलीही काळजी करू नये. त्याच्यावर विश्वास टाकून आनंदात असावे, चित्तवृत्ती परमेश्वराकडे लावावी. तेथून ती विषयाकडे जाऊ लागली म्हणजे संधी साधावी; म्हणजे त्यावर लक्ष असावे. मन विषयाकार होऊ लागले म्हणजे माझे स्मरण करावे. बर्‍याच वेळाने आठवण झाली तरी माझे स्मरण करावे, म्हणजे पुढे पुढे लवकर आठवण होऊ लागेल. ज्याचे मन पूजेत असते त्याची खरी पूजा होते. सर्वांभूती भगवद्‌भाव, आणि कोणाचे मन न दुखविणे, ही पूजा खरी होय. पूजेला बाह्योपचाराची गरज नसते. मन मात्र अर्पण होणे जरूर आहे. पूजेत भाव असणे जरूर आहे.

भक्ति आणि वैराग्य यांच्यामध्ये तसा फरक नाही. परमेश्वराची आवड म्हणजे भक्ति, आणि विषयाची अनासक्ति म्हणजे वैराग्य. रामराय वनवासात जायला निघाले तेव्हा त्यांनी सीतामाईला बरोबर न येण्याविषयी सांगितले. त्या वेळी तिने उत्तर दिले की, 'रामा ! तुझ्याबरोबर असेन तर मला सर्व कष्ट सुखमय आहेत; आणि तुझ्याशिवाय असेन तर सर्व सुखोपभोग हे मला कष्टमय आहेत.' सीता ही रामाची मोठी भक्त होती, आणि म्हणून तिची अशी अवस्था होती. तिला परिस्थितीची जाणीव नव्हती. पण आपली गोष्ट अशी नाही. आपण एकीकडे परिस्थितीवर अवलंबून आहोत आणि दुसरीकडे आपल्याला भगवंत पाहिजे, म्हणून आपण मध्यम मार्ग धरावा; तो हा की, आपण म्हणावे, 'रामा, माझी परिस्थिती तुझ्या इच्छेवर अवलंबून आहे.' असे आपण मनःपूर्वक म्हटले की परिस्थिती बदलली तरी आपला आनंद टिकेल.

'माझ्या देवाला हे आवडेल का ?' अशा भावनेने जगात वागणे हाच सगुणोपासनेचा हेतू आहे. जसजशी आपण सगुणाची उपाधी वाढवतो तसतशी आपली इतर उपाधी कमी कमी होत जाते. सगुणाच्या उपासनेला आज आपण कल्पनेने प्रारंभ करू, मागून निश्चयात्मकता आपोआप येईल. चैतन्य सर्व ठिकाणी भरलेले आहे; ते कुठेही प्रकट होऊ शकेल. त्याला प्रकट करणे हे आपल्या भावनेवर अवलंबून आहे. ज्याची भावना खरी शुद्ध, म्हणजे निःसंशय असते, त्याला दगडाची मूर्तीदेखील देव बनते. भावना मात्र शंभर नंबरी पाहिजे; त्यामध्ये भेसळ उपयोगाची नाही.

२९८. उपाधी वासना नाहीशा करण्यासाठीच नाम घ्यायचे असते.

23 Oct 2017

तुम्ही नाम घ्यायला लागा, भगवंताचे प्रेम येईलच.

ज्या माणसाला आपला स्वार्थ साधायचा नाही, त्याला कमी पडणे शक्यच नाही. जिथे निःस्वार्थीपणा आहे तिथे भगवंताला पुरवठा केलाच पाहिजे. आपण जगावर प्रेम केल्याशिवाय परत प्रेम मिळणार नाही. जो भगवंताच्या प्रेमात तल्लीन झाला, त्याला बाकीच्या गोष्टींची आठवण राहात नाही. ज्याप्रमाणे मालक घरात आला की चोर पळालाच म्हणून समजा, त्याचप्रमाणे जो भगवंताच्या प्रेमात रमला, तो खात्रीने सुखी बनला; कारण त्याची देहबुद्धी पळून जाते. म्हणून भगवंताला अशा प्रेमाने आळवावे, की त्याच्या डोळ्यांत पाणी यावे. आळवताना आपल्या डोळ्यात पाणी आले की भगवंताच्या डोळ्यांत पाणी येते.

भगवंताचे प्रेम लागायला सत्संगतीचा मार्ग अतिशय उत्तम आहे यात शंकाच नाही. परंतु सत्संगती सर्वांनाच मिळेल असे काही निश्चयाने सांगता येणार नाही. दुसरा मार्ग विचाराचा आहे. नेहमी चांगले आणि पवित्र विचार मनात बाळगावेत. भगवंताने सर्वांवर कृपा करावी, त्याने सर्वांचे कल्याण करावे, त्याचे प्रेम सर्वांना यावे, असे विचार नेहमी मनात ठेवून संतांच्या विचारांचे मनन करावे. सर्वांचे कल्याण चिंतण्यात स्वतःचे कल्याण अनायासे होत असते. पण आपण असे पाहतो की आपले विचारसुद्धा नेहमी स्थिर राहात नाहीत. नामस्मरणाला बसल्यानंतर किती अपवित्र विचार आपल्या मनात येत असतात याचा सर्वांना अनुभव आहे ना ? तेव्हा चांगले विचार मनात बाळगणे हेही आपल्या हातात नाही. आता तिसरा मार्ग म्हणजे नाम. नाम हे एकच साधन असे आहे की आपल्याला ते प्रयत्‍नाने घेता येईल. ते नाम तुम्ही सर्वांनी निःशंकपणे घ्या. त्या नामाच्या विरुद्ध तुम्हाला कुणीही सांगितले तरी त्याचे ऐकू नका. ते नाम कसे घ्यावे वगैरे चिकित्सेत तुम्ही पडू नका. तुम्ही नाम घ्यायला लागा, भगवंताचे प्रेम तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. अगदी सतत निश्चयाने नाम घ्या. जिथे नाम तिथे माझा राम आहे, हा माझा विश्वास तुम्ही बाळगा. दुसरे काही एक न करता सतत निश्चयाने नामात राहणार्‍या माणसाला संतांची भेट होऊन ते त्याचे कल्याण करतील. भगवंताचे नाम ही ठिणगी आहे. ती फुलवली तर सबंध जग भरून जाईल एवढी मोठी होऊ शकते. ही नामाची ठिणगी आपण सतत जागृत ठेवू या. जो नामात राहिला त्याचा वासनाक्षय झाला आणि दैन्यपणा संपला. ते नाम सर्वांनी मनापासून घ्या, आणि सर्वांनी अगदी आनंदात राहून सुखाने संसार करा.

२९७. विचार आणि नाम यांनी वासनेला खात्रीने जिंकता येईल. 
मग आपले कर्तेपण आपोआप मरून जाईल.