नाम सदा बोलावे, गावे भावे, जनांसि सांगावे ।
हाचि सुबोध श्रीगुरुंचा, नामापरते न सत्य मानावे ॥१॥
नामात रंगुनीया व्यवहारी सर्व भोग सेवावे ।
हाचि सुबोध श्रीगुरुंचा, भोगासंगे कुठे न गुंतावे ॥२॥
आंनदात असावे, आळस भय द्वेष दूर त्यागावे ।
हाचि सुबोध श्रीगुरुंचा, अनुसंधाना कधी न चुकवावे ॥३॥
गोड सदा बोलावे, नम्रपणे सर्वलोकप्रिय व्हावे ।
हाचि सुबोध श्रीगुरुंचा, भक्तीने रघुपतीस आळवावे ॥४॥
स्वांतर शुद्ध असावे, कपटाचरणा कधी न वश व्हावे ।
हाचि सुबोध श्रीगुरुंचा, मन कोणाचे कधी न दुखवावे ॥५॥
’माझा राम सखा, मी रामाचा दास’ नित्य बोलावे ।
हाचि सुबोध श्रीगुरुंचा, रामपाशी अनन्य वागावे ॥६॥
यत्न कसून करिन मी, यश दे, रामा, न दे तुझी सत्ता ।
हाचि सुबोध श्रीगुरुंचा, मानावा राम सर्वथा कर्ता ॥७॥
आचार संयमाने युक्त असा नीतिधर्म पाळावा ।
हाचि सुबोध श्रीगुरुंचा, खेळाएसा प्रपंच मानावा ॥८॥
दाता राम सुखाचा, संसारा मान तू प्रभूसेवा ।
हाचि सुबोध श्रीगुरुंचा, संतोषा सर्वादा मनी ठेवा ॥९॥
स्वार्थ खरा साधा रे, नित्य तुम्ही नामगायनी जागा ।
हाचि सुबोध श्रीगुरुंचा, मीपण जाळोनिया जगी वागा ॥१०॥
अभिमान शत्रु मोठा सर्वाना जाचतो सुखाशेने ।
हाचि सुबोध श्रीगुरुंचा, मारावा तो समूळ नामाने ॥११॥
राज्याधिकार, किंवा जावो समस्त धन मान ।
हाचि सुबोध श्रीगुरुंचा, भंगावे ना कदा समाधान ॥१२॥
प्रेमात राम रमतो, प्रेमाला मोल ना जगामाजी ।
हाचि सुबोध श्रीगुरुंचा, गुरुरायाला तहान प्रेमाची ॥१३॥
https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C