Showing posts with label जानेवारी. Show all posts
Showing posts with label जानेवारी. Show all posts

31 Jan 2018

नाम हाच भगवंताचा अवतार.

आजच्या युगात नाम हाच भगवंताचा अवतार आहे. "सुष्टांचे रक्षण आणि दुष्टांचा नाश करण्याकरिता मी अवतार घेतो" असे भगवंतांनी गीतेत सांगितले आहे; त्यावरून असे ठरते की सुष्ट आणि दुष्ट या दोघांचेही अस्तित्व असून, त्यांत दुष्टांकडून सुष्टांना त्रास होण्यातच भगवंताच्या अवताराची उत्पत्ती आहे. आजकाल पाहू गेले तर असे दिसते की, सुष्टांचे अस्तित्वच जवळजवळ दुर्मिळ झाले आहे. म्हणजे, ज्यांचा छळ झाला असता भगवंताने अवतार घ्यावा, ते सुष्टच नामशेष झाले आहेत. मग अवतार तरी कुणासाठी, कसा व्हावा ? याचा अर्थ, अवतार होणारच नाही असे नाही; पण वस्तुस्थिती काय आहे ते यावरून आपल्याला समजेल. आजची परिस्थिती आणि पूर्वीच्या काळची परिस्थिती यांत फरक आहे. पूर्वी सद्‍वासना जिवंत होती, पण ती उघडपणे कृतीत आणणे कठीण होते. आता सद्‍वासनाच नाहीशी झाली आहे, म्हणजे पायाच ढासळला आहे, तिथे कृतीचा प्रश्नच उदभवत नाही. पूर्वी सद्‍वासना सूक्ष्मपणे का होईना जिवंत होती, पण स्थूल प्रकट कृती दुर्घट झाली होती; त्या वेळी भगवंताला स्थूलात येऊन कार्य करणेच जरूर होते, आणि अशा वेळी अवतार घेऊन, म्हणजे सगुण रूप धारण करून, भगवंताने कार्य केलेही. आताचा प्रश्न, दुर्वासना जाऊन सद्‍वासना कशी उत्पन्न होईल हा आहे; म्हणजेच कार्य सूक्ष्मातले आहे. म्हणजे 'जसा रोग तसे औषध' किंवा 'काटयाने काटा काढावा' या न्यायाने, उपाययोजना सूक्ष्मातच केली पाहिजे. वासना बदलायला वासनेइतकाच जबरदस्त इलाज पाहिजे; आणि तो म्हणजे भगवंताचे नाम. चालू परिस्थितीशी झगडून मार्ग काढून देणारा असा जर कोणता अवतार असेल तर तो भगवंताच्या नामाचाच आहे, आणि त्याकरिता सर्वांनी भगवंताच्या नामाचा टाहो फोडणेच जरूर आहे. हे कार्य भगवंताने सगुणरूप धारण करून होणे कठीण आहे; ज्या अर्थी कारण सूक्ष्मातले आहे त्या अर्थी त्याला इलाजही सूक्ष्मांतला पाहिजे, म्हणून नामावताराची आज गरज आहे. प्रत्येक नामागणिक त्याचा अवतार आहे, आणि त्याची कास धरणे, म्हणजेच नाम घेणे, हे आमचे आजचे मुख्य कर्तव्य आहे. तेवढे केले की नाम आपले अवतारकार्य करून दाखवील. आपण आपले प्रेम प्रपंचाकडे लावले आहे, ते नामाकडे लावावे, म्हणजे नामस्मरणात फार आनंद येईल. मनाला नामाची चटक लागली आणि नामाच्या प्रेमातच मन रंगून गेले म्हणजे जन्म सफल झाला. 

३१. नामाने कलीची सत्ता नाहीशी होते. म्हणून नामधारकाला कलीची बाधा नाही.

30 Jan 2018

जेथे नाम तेथे परमात्मा आहेच.

तुम्ही सर्व भाविकजन । ऐकावे माझे वचन ॥

माझे भेटी सदा राहावे । मुखाने रामनाम घ्यावे ॥

जो नामात राहिला । तो अखंड माझ्या दर्शनात बसला ॥

जेथे नामाचे स्मरण । ते माझे वसतिस्थान ॥

जेथे रामाचे नाव । तेथे माझा ठाव ॥

हे आणून चित्ती । सुखे राहावे प्रपंचाप्रति ॥

नामात ठेवा मन । हेच माझे खरे दर्शन ॥

नेहमी रामाचा ध्यास । हाच माझा सहवास ॥

तुम्ही सुज्ञ माझे प्राण । नाम करा तेवढे जतन ॥

नामात ठेवावे प्रेम । तेथे माझी वसति जाण ॥

ज्याने ज्याने इच्छा धरावी व्हावे माझे ।

त्याने नाम कधी न सोडावे वाचे ॥

एवढे देईल जो नामदान । त्याला अर्पण करून घेईन जाण ॥

जेथे नाम । तेथे माझे धाम ॥

नामापरते न मानी सुख । तेथेच माझे राहणे देख ॥

तुम्ही शक्य तितके राहावे नामात । हेच माझे सांगणे तुम्हांस ॥

शक्य तो नामस्मरण करावे । म्हणजे मी तुमचेजवळ अखंड आहे असे समजावे ॥

जेथे परमात्म्याचे नाव । तेथे माझा आहे ठाव ॥

जेथे नाम तेथेच मी । हा भरवसा बाळगून असावे तुम्ही ॥

नाही केले वेदपठण । शास्त्राचे नाही झाले ज्ञान ।

श्रुतिस्मृति उपनिषदे यांची नाही ओळखण । असा मी अज्ञान जाण ॥

तरी एक भजावे रघुनाथासी । अर्पण होऊन जावे त्यासी ।

ऐसे जाणून चित्ती । खंड नाही समाधानवृत्ति ॥

मी सतत आहे तुमच्यापाशी हा ठेवा निर्धार । न सोडावा आता धीर ॥

ठेवावा एक विश्वास । मी आहे तुम्हाजवळ खास ॥

श्रीदासबोध नामस्मरण । याचे असावे वाचन ।

मी त्यातच मानावे जाण । कृपा करील रघुनंदन ॥

मी तेथे आहे हे नक्की समजावे । राम सर्व ठिकाणी आहे हे लक्षात ठेवावे ॥

उपाधिरहित मी तुमचेजवळ सतत आहे ॥

मी नाही अशी कल्पना करू नये । तुमचे जवळ आहे हे खात्रीने समजावे ॥

मी नाही सोडून गेलो कोणाला दूर । माझी वसति तुमच्या शेजारी जाण ॥

माझे येणे जाणे तुमचे हाती । तुम्हा सर्वांहून नाही परती ॥

रामापरता मी । जैसा प्राणापरता देह जाण ॥

सदा सर्वकाळ माझ्याशी वास । हाच धरावा हव्यास ॥

त्याला न जावे लागे कोठे । घरबसल्या राम भेटे ॥

जे जे करणे आणिले मनी । रामकृपे पावलो जनी ॥

आता पाहा मला रामात । आनंद मानावा नामात ॥

सर्वांनी राखावे समाधान । जे माझे प्राणाहून प्राण जाण ॥

माझे ऐकावे सर्वांनी । सदा राहावे समाधानी ॥

३०. जेथे नामाचे प्रेमतेथेच मी सतत जाण

29 Jan 2018

नामात दृढभाव कसा येईल ?

नामात प्रेम नामानेच येणार. हे प्रेम यायला विषयावरचे प्रेम कमी करायला पाहिजे. दृढनिष्ठा पाहिजे. नामच तारील, नामच सर्व काही करील, असा दृढभाव पाहिजे. तो ठेवून व्यवहारातले प्रयत्‍न चालू ठेवावेत, पण यश देणारा परमात्मा असा भाव पाहिजे. वैद्याकडचे औषध आपण गड्याकडून आणवतो, पण गुण गड्याने दिला असे नाही म्हणत. याच्याही पुढे जाऊन, वैद्याच्या औषधाने आलेला गुण परमात्म्यानेच दिला, असे का मानत नाही ? परमात्म्याला शरण जाणे म्हणजे परमात्मा आपला आहे, त्याच्यावाचून आपल्याला दुसरे कुणी नाही, आपण काही करीत नसून सर्व तोच आपल्या हिताकरिता करतो आहे, असा दृढ विश्वास ठेवणे. आपण आपल्या बायकोमुलांवर प्रेम करतो, कारण त्यांना 'आपले' म्हटले म्हणून. म्हणजे प्रेम हे आपलेपणात आहे, मग परमात्म्याला आपले म्हटले म्हणजे सहजच त्याच्यावर प्रेम बसणार नाही का ? दुसरे असे की, भगवंत हा आपला जिवलग सखा आहे, तो सर्व काही आपल्या हिताकरिताच करतो आहे, असा विश्वास धरल्यावर काळजीला तरी जागा कुठे उरली ? आपली देहबुद्धी नाहीशी होण्यातच आपले हित आहे. परमात्म्याच्या ठिकाणी आपलेपणा उत्पन्न व्हायला त्याच्या नामाशी पुष्कळ सहवास पाहिजे. सिद्धीच्या, चमत्काराच्या पाठीस लागू नये; ती आपल्या मार्गात विघ्ने आहेत. उलट, त्यांनी आपल्या पाठीस लागले पाहिजे. एखाद्याला साप चावत नाही, पण त्यात विशेष ते काय आहे ? सापात काय किंवा कशातही काय, भगवद्‍भाव, आपलेपणा पाहता यावा, म्हणजे कोणीही आपले शत्रू होणार नाहीत. आई आपल्याजवळ आहे या भावनेने मूल जसे निर्भय असते, तसे भगवंत आपल्यापाशी आहे या भावनेने आपण निर्धास्त व्हावे. 

आपल्याला ज्या गावाला जायचे आहे, त्या गावाची गाडी आली की नाही एवढे पाहावे; गाडीत कोण भेटतो याला फारसे महत्त्व नाही. समजा, गाडीत आपल्याला कोणीच भेटले नाही, तर आपण स्वस्थ झोप घेत आपल्या गावी जातो, त्याप्रमाणे आपण आपले साधन करावे. सृष्टीची तत्त्वे किती आहेत वगैरेच्या भानगडीत पडू नये, त्याचा निकाल कधीच लागायचा नाही. शंका गेल्याशिवाय नाम स्थिरच होत नाही हे लक्षात ठेवावे. देहबुद्धी जोपर्यंत आहे तोपर्यंत नामाचे महत्त्व कळणार नाही. आपला उद्धार व्हावा असे वाटत असेल तर नामस्मरण सोडू नये. 

२९. परमात्मा जसा निरूपाधिक आहे तसे नामही निरूपाधिक आहे.

28 Jan 2018

अकर्तेपणाने नाम घ्यावे.

काही न करणे, आपण काही करीत आहो किंवा आपल्याला करावयाचे आहे असे न वाटणे, हाच परमार्थ. पण स्वस्थ बसायला लावणे ही तुरूंगात मोठी शिक्षा समजतात. देहाने, मनाने, एकसारखी चळवळ करण्याची आपल्याला सवय लागली आहे. देहाला स्वस्थ बसायला लावणे कठीण, मनाला स्वस्थ बसायला लावणे त्यापेक्षा कठीण, आणि देह कर्म करीत असताना मनाला स्वस्थ बसविणे हे अत्यंत कठीण. मनाला खरे म्हटले तर स्वास्थ्य हवे. पण ते मिळविण्याकरता साधन करणे, म्हणजे प्रयत्‍न करणे, जरूर आहे. मनाचे स्वास्थ्य बिघडायला कारणे काय ती पाहू. पहिले, आपल्या इच्छेविरूद्ध गोष्ट होणे; दुसरे, आपल्या बऱ्यावाईट कर्मांची आठवण होणे; आणि तिसरे, उद्याची काळजी करणे. जो तो आपल्या इच्छेप्रमाणे व्हावे असे म्हणणार; सर्वजण तुमच्याच इच्छेप्रमाणे कसे चालतील ? तुमच्या इच्छेविरूद्ध गोष्टी होणारच. तेव्हा स्वास्थ्य बिघडू न द्यायला, आपली इच्छाच नाहीशी करावी. कोणतीही वस्तू मिळावी ही बुद्धी नाही ठेवू. हाव सोडावी. लोकांची आस सोडावी. अभिमान सोडून कर्म करीत राहावे. प्रयत्‍न करून यश आले नाही म्हणजे दुःख होते, स्वास्थ्य बिघडते; मी केलेच नाही म्हटले म्हणजे कुठले दुःख ? प्रयत्‍न करून जे काही होते ते रामाच्या इच्छेने झाले म्हणावे. प्रत्येक गोष्ट रामाने केली म्हणणे म्हणजे भगवंताच्या अखंड अनुसंधानात राहणे. हे साधण्यासाठी अखंड नामस्मरण करावे. जे झाले, जे होते आहे, आणि जे होईल, ते भगवंताचेच आपल्या हिताकरिता करणे आहे. आपण कर्ते नाही, असे मानणे, याला अखंड भगवन्नामस्मरण पाहिजे. सारांश, जे जे काही झाले, ते ते भगवंतानेच आपल्या हिताकरिता केले. उद्याची काळजी भगवंतालाच आहे. त्याला काय योग्य वाटेल ते तो करील. म्हणून, झाल्याची म्हणजे कालची आठवण करू नये, होणाऱ्याची म्हणजे उद्याची काळजी करू नये, आणि चालू क्षण वाया जाऊ देऊ नये, नामस्मरणात राहावे. सगळया प्रपंचात खरी विश्रांती असेल तर ती नामस्मरणातच आहे. 

आहे त्या परिस्थितीत समाधान नसणे हा जो देहबुद्धीचा स्वभाव तो आपण सगळीकडे लावतो. सर्व गोष्टींचे ज्ञान होत नाही तोपर्यंत आपण काही करणार नाही, असे आपण म्हणतो; सर्व गोष्टींचे ज्ञान मरेपर्यंत आपल्याला होत नाही, आणि आपण काही करीत नाही ! देहबुद्धी आपल्याला भगवंताचा विसर पाडते. या देहबुद्धीवर आपण नामाच्या मंत्राचे पाणी शिंपडू या म्हणजे तिची वाढ होणार नाही. 

२८. मन परमेश्वराच्या ठिकाणी स्थिर करावे आणि देहाने प्रपंचाच्या गोष्टी कराव्यात.

27 Jan 2018

नाम हा परमात्म्याकडे जाण्याचा राजमार्ग आहे.

सर्व साधनांत श्रेष्ठ साधन नामस्मरणच आहे. पण त्याचे महत्त्व कळत नाही. ते कळायला खरोखर भगवत्‌कृपाच पाहिजे. आपल्या शरीरात मुख्य जसे हृदय, आणि बाकीचे अवयव गौण आहेत, तसे परमार्थात मुख्य साधन नामस्मरण हे आहे आणि दुसरी साधने गौण आहेत. नाम हे मंगलात मंगल आणि अत्यंत पवित्र आहे. आपले जीवन देवाच्या हाती आहे, आणि देव नामाच्या स्वाधीन आहे हे पक्के लक्षात ठेवा. 

योगात, योग करीपर्यंतच समाधान असते; पण नामस्मरणाच्या अनुसंधानात सतत समाधान असते. स्वतः निर्गुण झाल्याशिवाय निर्गुण उपासना होत नाही. तेज दिसणे, नाद ऐकणे, या सर्व गोष्टी गुणातच नाही का आल्या ? निर्गुण व्हायला देहबुद्धी सुटायला पाहिजे. सर्वव्यापी परमेश्वराला सर्वांभूतीं पाहणे ही निर्गुण उपासनाच होय. योग नामस्मरणाला पोषक तितकाच करावा; केवळ त्यालाच प्राधान्य देऊ नये. योग नामस्मरणाला पोषक आहे, पण नामस्मरण योगाच्या पलीकडे आहे; म्हणून नामस्मरणात योग येतो, योगात नामस्मरण येत नाही. सर्व साधनांचा अंत नामस्मरणात आहे. नामाचे साधन हे जलद गाडीप्रमाणे आहे. रंग दिसणे, प्रकाश दिसणे, आवाज ऐकू येणे, ही मधली स्टेशने सोडून नाम एकदम भगवंतापर्यंत नेऊन पोहोचवते. इतर साधनांनी लवकर साधल्यासारखे वाटेल, पण ते तात्पुरते असते. नामाने थोडा उशीर लागेल, पण जे साधेल ते कायमचे साधेल, कारण नामाने मुळापासून सुधारणा होते. नामस्मरण हा परमात्म्याकडे जाण्याचा राजमार्ग होय. नामात एका आनंदाशिवाय दुसरे काही नाही. नामाच्या आनंदाचा झटका आला की मनुष्य स्वतःला विसरेल. तुकारामबुवांची वाचा त्यांना अनावर झाली, ती सारखी नाम घेऊ लागली; याचा अर्थ असा की, त्यांच्या कल्पनेच्या बाहेर नाम येऊ लागले. गाडी उताराला लागली की जशी अतिवेगात येते आणि आवरत नाही, तसे हे आहे. आपल्या शक्तीच्या बाहेर कार्य होणे ही भगवंताची कृपा होय. 

चार माणसे होती, त्या सर्वांना एकच रोग झाला होता. पण त्यांची सांपत्तिक स्थिती सारखी नव्हती. वैद्याने त्यांपैकी अगदी गरीब माणसाला एक औषध तुळशीच्या रसात घ्यायला सांगितले, त्याच्यापेक्षा पैसेवाल्याला तेच औषध मधात घ्यायला सांगितले, त्याच्याहीपेक्षा पैसेवाल्याला तेच औषध केशरात घ्यायला सांगितले, आणि सर्वात जो श्रीमंत होता त्याला तेच औषध कस्तुरीत घ्यायला सांगितले. त्याचप्रमाणे, ज्याचा जसा अधिकार तसे त्याने नाम घ्यावे. नाम नुसते तोंडाने घ्यावे, नाम श्रद्धेने घ्यावे, नाम वृत्ती सांभाळून घ्यावे, नामाशिवाय जगात दुसरे सत्य नाही, अशा दृढ भावनेने घ्यावे; सर्वांना फळ सारखेच मिळेल. 

२७. सर्व साधनांचा अंत नामस्मरणात आहे.

26 Jan 2018

अंतकाळ साधण्यासाठी नामस्मरण.

अंतकाळी नामस्मरण होणे म्हणजे अंतकाळ साधणे; आणि हा साधण्यासाठी आधी नामस्मरण करायला पाहिजे. अंतकाळ साधण्यासाठीच जगावे. भगवंत जिथे राहतो तेच आपले खरे घर आहे. सध्या आपण राहतो ते भाडयाचे घर आहे. भाडयाचे घर सोडून स्वतःच्या मालकीच्या घरात राहायला जाताना जसा आनंद वाटतो, तसाच शरीर सोडताना वाटायला पाहिजे. भगवंताचे घर तेच आपले घर आहे, याची खात्री झाली म्हणजे ते जमेल. त्यासाठी आपण सतत भगवंताच्या नामात राहावे. "मला तू आपला म्हण, माझे मन तुझ्या चरणी अर्पण केले, आता मला तुझ्याजवळ काहीही मागण्याची इच्छा न होवो," असे मागावे. परमेश्वर आपल्या मागेपुढे आहे असे अखंड मानावे. भगवंताचे स्मरण करणे, म्हणजे जे काही आपल्या हातून घडते आहे ते त्याच्याच इच्छेने घडते आहे असे समजणे. प्रपंच हा देवाचा मानून अभिमान रहितपणे तो करणे, हा परमार्थ; आणि परमात्म्यावाचून आपल्याला कोणी नाही याचा दृढनिश्चय होणे याचे नाव ज्ञान. हे ज्ञान बाणले म्हणजे मनुष्य खऱ्या अर्थाने परमात्मप्राप्तीच्या मार्गाला म्हणजे साधनाला लागला. या साधनाने परमात्म्यावाचून दुसरे काही आवडेनासे होते; आणि ही जी अत्यंत आवड तिलाच भक्ती म्हणतात. या भक्तीची परिपूर्णता अंतकाळ साधण्यात होते; त्यासाठी सतत नामस्मरण किंवा अखंड अनुसंधान हेच एकमेव साधन सांगितले आहे. अंतकाळी ज्याने नाम घेतले त्याच्या विषयवासना मेल्या असे नसते; तो काही एकदम मुक्त होत नाही, पण पुढच्या जन्मी तो अती सात्त्विक म्हणून जन्माला येईल. सात्त्विक म्हणजे भगवंताची प्राप्ती करून घ्यावी अशी वृत्ती असणारा होय. 

साधन प्राणाबरोबर असावे; प्राण जसे अभिमानरहित, अखंड चालतात त्याप्रमाणे साधन अभिमानरहित, अखंड चालावे. ते 'करता' कामा नये; 'करणे' म्हणजे अभिमान आला. सहज प्राणाबरोबर झाले म्हणजे अखंड चाललेलेच असते. प्रपंचातली तळमळ सोडून वागावे. गुरूआज्ञेत असावे. अनंत जन्मांचा देहाशी सहवास, म्हणून देहावर प्रेम जडून देहबुद्धी होते; तसाच नामाचा सहवास पुष्कळ करावा, म्हणजे विषयाची आसक्ती कमी होऊन नामावर प्रेम जडते. योगात कष्ट फार, या युगात तो साधणे अशक्यप्रायच; आणि कर्मात तर अभिमान असतो आणि वाढतो. भक्तीत कष्ट नसतात, आणि ती करताना अभिमान आपोआप गळत जातो. योग आणि कर्म ही साधने परमात्म्याच्या दत्तकपुत्राप्रमाणे आहेत, तर भक्तीचे साधन हे परमात्म्याच्या औरस मुलाप्रमाणे आहे. भगवंताला दृष्टीआड होऊ न देणे हीच खरी भक्ती, हेच खरे अनुसंधान, हाच खरा परमार्थ, आणि हेच खरे आपले सर्वस्व आहे. 

२६. नुसते देहाने तीर्थस्नान, पूजापाठ, वगैरे करून परमार्थ घडत नाही; 
आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी चिकटली पाहिजे. 

25 Jan 2018

अनुसंधानासाठी सतत नामस्मरण करावे.

नामस्मरण हे प्रपंचाकरिता, म्हणजे तो चांगला व्हावा म्हणून नाही, तर प्रपंचाची आसक्ति कमी करण्यासाठी आहे. तरी पण त्याने प्रपंच बिघडणार नाही. जे होईल ते आपल्या बऱ्याकरिता आहे असे मानून परमात्म्यावर विश्वास ठेवून राहावे. एक गृहस्थ मला भेटले तेव्हा म्हणाले, 'मी रिकाम्या वेळात नामस्मरण करतो.' त्यावर मी म्हटले,"सार्‍या जन्मात महत्त्वाचा आणि सार्थकी लागलेला वेळ असेल तर तो हाच; त्याला तुम्ही रिकामा वेळ कसा म्हणता ?" पुढे ते म्हणाले, "प्रारब्धाचे भोग काही केल्या टळत नाहीत, ते भोगावेच लागतात, असे सर्व संत सांगतात. हे जर खरे, तर प्रारब्धाचे भोग आपण भोगत असताना त्यामध्ये भगवंताच्या स्मरणाची काय गरज आहे ?" खरोखर हा प्रश्न अगदी बरोबर आहे. आपल्या कर्माचे भोग आपल्यालाच भोगावे लागतात हे खरे. पण भोग आले की, आपल्या मनाला चैन पडत नाही, तिथे मनाला भगवंताच्या स्मरणात गुंतवून ठेवले की आपले समाधान टिकते. आपल्या सध्याच्या अवस्थेमध्ये, 'भगवंताच्या इच्छेने घडायचे ते घडते' असे मानणे, किंवा 'भगवंत चांगले करील' असा विश्वास ठेवून वागणे, हेच सोपे जाईल. हे दिसायला साधे दिसले तरी यात फार मोठे मर्म साठविले आहे हे ध्यानात धरा. "भगवंताच्या इच्छेने घडणार ते घडू द्यावे" अशी निष्ठा उत्पन्न व्हायला त्याचे अनुसंधान सतत ठेवले पाहिजे. "आहे त्यात समाधान, आणि भगवंताचे अनुसंधान," एवढीच सदगुरूची आज्ञा असते. दुसर्‍याने आपल्याला दु:ख दिले असता आपले अनुसंधान चुकते ही त्याची नव्हे, आपली चूक आहे. 

'विषय कसा सुटेल ? मन एकाग्र कसे होईल ?' हे न कळले तरी चालेल. सोडण्याच्या गोष्टीचा अभ्यास करण्यापेक्षा धरण्याच्या गोष्टीचा, म्हणजे अनुसंधानाचा, अभ्यास करावा. एक भगवंताचे अनुसंधान ठेवले की सर्व गुण आपोआपच वाढतील; ते कसे, तर शरीराचे अवयव सारख्या प्रमाणात वाढतात तसे. झाडाच्या मुळाला पाणी घातले की, त्याच्या सर्व भागांना ते पोहोचते, तसे भगवंताचा विसर पडू न दिला तर सर्व काही बरोबर होते. "अज्ञानाच्या अंधकाराने दुःख भोगत असताना तू माझे स्मरण, माझे अनुसंधान ठेव, म्हणजे तुला पुढे उजेड दिसेल," असे गीतेमध्ये प्रत्यक्ष श्रीकृष्णच अर्जुनाला सुचवीत आहेत. दिवा जळायला हवा असेल तर त्यामध्ये सतत तेल घातले पाहिजे, तसे भगवंताचे अनुसंधान सारखे राहण्यासाठी त्याचे नामस्मरण आपण सतत करीत असावे. ज्याचे अनुसंधान अखंड टिकले, त्याचे खाणे, पिणे, उठणे, बसणे, वगैरे सर्व क्रिया भगवंताची सेवाच बनतात. 

२५. भगवंताचे अनुसंधान हे आपले ध्येय. त्याला अनुसरून बाकीच्या गोष्टी आपण करू या.

24 Jan 2018

नामसाधन कसे करावे ?

नामाचे साधन कसे करावे ? एखाद्या दगडावर पुष्कळ पाणी एकदम ओतले तर तो दगड भिजेल आणि पाणी निघून जाऊन कोरडा होईल. पण तेच पाणी थेंब थेंब असे एकाच ठिकाणी आणि अखंड पडत राहिले तर त्या दगडाला भोक पडेल, आणि काही दिवसांनी दगड फुटूनही जाईल; त्याप्रमाणे, केव्हातरी पुष्कळ साधन करण्यापेक्षा अगदी अल्प प्रमाणात का होईना पण नित्यनेमाने, ठराविक वेळी, आणि शक्य तर ठराविक स्थळी, जर नामाचे साधन केले तर ते जास्त परिणामकारक होते. जात्याला दोन पेठी असतात; त्यातले एक स्थिर राहून दुसरे फिरत राहिले तर दळण दळले जाऊन पीठ बाहेर पडते. पण जर दोन्ही पेठी फिरत राहिली तर दळण दळले न जाता फुकट श्रम मात्र होतात. माणसाचे शरीर आणि मन अशा दोन पेठी आहेत. त्यांतले मन हे स्थिर आहे आणि देह हे फिरणारे पेठे आहे. मन परमेश्वराच्या ठिकाणी स्थिर करावे, आणि देहाने प्रपंचाच्या गोष्टी कराव्यात. प्रारब्धाचा संबंध देहापर्यंतच असतो. प्रारब्धरूपी खुंटा देहरूपी पेठयात बसून तो त्याला फिरवतो, आणि मनरूपी पेठे स्थिर असते. देह प्रारब्धावर सोडावा, आणि मन भगवंताच्या स्मरणात स्थिर ठेवावे, याहून नामाचे साधन दुसरे काय ? हे साधन अमक्यालाच साधेल असे नाही, तर ते कोणालाही साधेल. गरिबाला गरिबीचे दु:ख होते म्हणून साधत नाही, तर श्रीमंताला पैशाचा अभिमान आणि लोभ असतो म्हणून साधत नाही; विद्वानाला विद्येचा अभिमान होतो म्हणून साधत नाही, तर अडाण्याला काय करावे हे समजत नाही म्हणून साधत नाही. साशंक वृत्तीने कितीही साधन केले, कितीही नामस्मरण केले, तरी कधी समाधान होणार नाही. 

नीतिधर्माचे आचरण, शास्त्रशुध्द वर्तन, शुद्ध अंतःकरण, आणि भगवंताचे स्मरण, इतक्या गोष्टी असतील तरच साधक शेवटपर्यंत पोहोचेल; आणि शेवटपर्यंत तो पोहोचला तरच फायदा. 'घरी पोहोचल्यावर पत्र लिहा' असे म्हणतात, याचा अर्थ हाच आहे. प्रपंच करीत असताना वाईट विचार मनात येतात, त्याचप्रमाणे परमार्थ करीत असतानाही वाईट विचार आले म्हणून घाबरण्याचे कारण नाही. ज्यावेळी वाईट विचार मनात येतील त्यावेळी भगवंताचे नाम घेतले तर त्या विचारांची मजल पुढे जाणार नाही. दृढ विश्वासाने नाम चालू ठेवावे. जिथे कर्तव्याची जागृती आणि भगवंताची स्मृति आहे तिथेच समाधानाची प्राप्ती होते. 'भगवंता, मी तुझा आहे' असे रात्रंदिवस म्हणत गेल्याने भगवंत प्रकट होत जाईल; आणि भगवंत जितका प्रकट होत जाईल तितके 'मी' पणाचे दडपण आपोआप कमी होत जाईल. 

२४. प्रारब्धाची व ग्रहांची गती देहापर्यंतच आहे. मनाने भगवंत भजायला त्यांची आडकाठी नाही.

23 Jan 2018

नामस्मरणरूपी शेताची मशागत.

नामस्मरणरूपी शेतात उत्तम पीक येण्यासाठी प्रथमत: सदाचरणाची आवश्यकता आहे. सदाचरण हे शेताचे रक्षण करण्याकरिता लागणार्‍या कुंपणासारखे आहे. दुसरी गोष्ट, शुद्ध अंतःकरण म्हणजे उत्तम काळी भुसभुशीत जमीन. या जमिनीमधले दगड, हरळी, वगैरे काढून ती साफ करावी; म्हणजेच, अंतःकरणात कोणाबद्दलही द्वेष, मत्सर, वगैरे ठेवू नये. शुद्ध अंतःकरणानंतर नामस्मरणाचे महत्त्व आहे. नामस्मरण हे त्या जमिनीत पेरण्याचे बी आहे. हे बी किडके नसावे; म्हणजे, नाम सकाम नसावे. उत्तम बीज म्हणजे 'नामाकरिताच नाम' हे आहे. त्यानंतर तीर्थयात्रा, संतांचे आशीर्वाद, त्यांची कृपादृष्टी, यांची आवश्यकता आहे. या सर्व गोष्टी पाटाच्या पाण्यासारख्या आहेत. यामुळे शेत चांगले यायला मदत होते. शेवटची महत्त्वाची गोष्ट म्हणजे भगवत्‌कृपा होय. भगवत्‌कृपा ही पावसाच्या पाण्यासारखी आहे. पाटाच्या पाण्यापेक्षा पावसाच्या पाण्याची गोष्ट काही और आहे. पण तो पडणे न पडणे आपल्या हाती नाही. शेताला लावण्याकरिता पाटाचे पाणी एखादी विहीर, तलाव किंवा नदी यामधून नेता येणे शक्य असते; परंतु पावसाच्या बाबतीत कोणाला काहीच करता येत नाही. त्यामुळे एखाद्याने शेताची उत्तम निगा राखली, उत्तम बी पेरले, तरी पावसाच्या अभावी पीक न येण्याचा संभव असतो. नामस्मरणरूपी शेताचे एक वैशिष्टय आहे. ते हे की, त्याच्या अंगी लोहचुंबकासारखी आकर्षणशक्ती आहे. म्हणून हे शेत वाया गेले असे कधीच होत नाही. आपण असे पाहू की, दोन शेतकरी आहेत; एक कर्तव्यकर्म म्हणून वेळ झाली की आपल्या शेताची मशागत करणारा आहे, तर दुसरा आळशी म्हणजे मशागत न करणारा आहे. आता जेव्हा पाऊस पडेल तेव्हा, ज्याने मशागत केली त्याचे शेत उत्तम वाढेल, पण दुसऱ्याचे वाढणार नाही. भगवंताच्या कृपेने जो पाऊस पडणार, त्याचा एकाला फायदा मिळेल; तो दुसर्‍याला मिळणार नाही. म्हणजे जो नियम प्रपंचात लागू तोच परमार्थात लागू. भगवंताची कृपा सर्वांवर सारखाच वर्षाव करीत असते. ज्याने ज्या प्रमाणात चित्तशुद्धी केली असेल, त्या प्रमाणात त्याला फायदा होईल, दुसर्‍याला नाही होणार. भगवंत किंवा संत समदृष्टी असतात ते असे. भगवंत निःपक्षपाती आहे. त्याच्यापाशी कोणताही भेद नाही. आपण तयार झालो की त्याची कृपा आपोआप होते. कृपेला योग्य अशी भावना तयार करणे आपले काम आहे. संतांनी नुसते आपल्याला सांगून भागत नाही, आपण काय करायला पाहिजे हे कळून आपण ते स्वतः करायला पाहिजे. त्यांच्या ठिकाणी जर विषमता दिसली तर तिचा उगम किंवा कारण आपल्यातच आहे हेच यावरून दिसते. 

२३. शुद्ध अंतःकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल.