Showing posts with label फेब्रुवारी. Show all posts
Showing posts with label फेब्रुवारी. Show all posts

19 Feb 2018

नामात राहणे हा सरळ मार्ग आहे.

एका बाईला सासरी नामस्मरण करणे कठीण जाई, सासरच्या लोकांना ते आवडत नसे. मी तिला सांगितले, 'लोणी चोरून खाण्याचा परिपाठ ठेवला तरी त्याचा परिणाम शरीरावर दिसतोच. तसे, नाम कुणाला नकळत घेतले तरी त्याचा उपयोग होतोच; म्हणून उघडपणे नाम न घेता आले तरी ते गुप्तपणे घ्यावे, आणि त्याप्रमाणे युक्तीने वागावे.' शरीराला अन्नाची जरूरी असताना जर ते तोंडातून जात नसेल तर नळीने पोटात घालतात, त्यामुळे ते लवकर पोटात जाते; तसे, भावनेच्या नळीने नाम घेतले तर ते फार लवकर काम करते. 

एक मनुष्य बैलगाडीतून जातांना रस्त्यामध्ये पडलेला होता. एका सज्जन माणसाने त्याला उचलून आपल्या घरी नेले आणि त्याच्यावर उपचार केले. तसे आपण भगवंताच्या नामात पडून राहावे; त्यात राहिले की कुणीतरी संत भेटतो आणि आपले काम करतो; आपण सरळ मार्गात मात्र पडले पाहिजे. नुसत्या विषयात राहणे हा आडमार्ग आहे; नामांत राहणे हा सरळ मार्ग आहे. 

खरोखर, नाम किती निरूपाधिक आहे ! आपण देहबुद्धीच्या उपाधीत राहणारे लोक आहोत, म्हणून आपल्याला नामाचे महत्त्व तितकेसे समजत नाही. संतांनाच नामाचे खरे महत्त्व कळते. विलायत इथून हजारो मैल लांब आहे. तिथे जाऊन आलेल्या लोकांकडून आपण तिथल्या गोष्टी ऐकतो. तिथे आपण पायी जाऊ शकत नाही, कारण ते फार लांब आहे. शिवाय, वाहनामध्ये बसून जावे म्हटले तर मध्ये मोठा समुद्र आहे. तेव्हा, पायाला श्रम न होऊ देता, आपल्याला बुडू न देता, समुद्राचे पाणी पायाला न लागता, समुद्रपार नेणारी जशी आगबोट आहे, त्याचप्रमाणे भगवंताकडे पोहोचविणारे त्याचे नाम आहे. भगवंत कसा आहे तो आम्ही पाहिला नाही, पण संत त्याला पाहून आले आणि त्यांनी त्याचे वर्णन आमच्याजवळ केले. आम्ही आमच्या कष्टाने त्याला गाठू म्हणावे तर ते शक्य नाही. शिवाय, प्रपंचासारखा एवढा भवसागर मध्ये आडवा आलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण नाम घट्ट धरले तर सुखाने भगवंतापर्यंत जाऊन पोहोचू. 

व्यवहारामध्ये जशी एकाच माणसाला अनेक नावे असतात, तो त्यांपैकी कोणत्याही नावाला 'ओ' देतो, तसे कोणत्याही नावाने हाक मारली तरी एकच भगवंत 'ओ' देतो. निरनिराळया गावी असलेल्या सर्व जिंदगीची मालकी खरेदीपत्रातल्या नामनिर्देशाने मिळते, तसे सर्वव्यापी असलेल्या देवाची प्राप्ती त्याच्या नामाने होते. खरोखर, नाम ही कधीही नाहीशी न होणारी जिंदगीच आहे. 

५०. आपण सर्वांनी 'मी भगवंताकरिता आहे' असे मनाने समजावे आणि सदैव त्याच्या नामात राहावे.

18 Feb 2018

नामाविषयी शुद्ध भाव आवश्यक

ईश्वर सर्वांचा उत्पन्नकर्ता आहे, रक्षणकर्ता आहे, तसेच संहारकर्ताही आहे. परंतु तरी त्याला न्यायी आणि प्रेमी म्हणतातच, कारण तो निःस्वार्थी आहे. म्हणजे प्रेम हे निःस्वार्थातच असते. आपल्याला खरे म्हटले म्हणजे आपला स्वार्थच नडतो. आपला स्वार्थ प्रेमाच्या आड येतो. आपले विषय ईश्वर-प्रेमात व्यत्यय आणतात. ज्या ज्या गोष्टी या प्रेमाच्या आड येतात त्यांचा त्याग नको का करायला? तेव्हा विषयांची आसक्ती, त्यांच्यावरचे प्रेम, नाहीसे झाले पाहिजे. आपण ईश्वराचे, संतांचे झाले पाहिजे. त्याशिवाय आपल्याला कशाचीही गरज वाटता कामा नये. 

एकाच मातीचा जसा गणपती, बाहुले किंवा मडके होते, त्याप्रमाणे ईश्वरही आपल्या भावनेप्रमाणे होतो. म्हणूनच आपला भाव नेहमी शुद्ध आणि निःस्वार्थी असावा. मुळाशी पाणी घातले की झाड वाढते, पण आपण मुळापर्यंत जातच नाही. तेव्हा, भाव शुद्ध कसा होईल ते पाहावे. उदाहरणार्थ, एकादशीच्या दिवशी उपवास करायचा एवढेच आपल्याला ठाऊक असते. पण एक गृहस्थ एकादशीला भगवंताचे नामस्मरण करायचे सोडून बारा वाजेपर्यंत अंघोळ न करता अंगण, मोरी झाडत बसला! असे आमचे चुकते. थोडक्यात म्हणजे, आपल्याला मुळात काय पाहिजे हेच कळत नाही. कावीळ झाली म्हणजे डोळयाला खरे रूप कसे कळणार? म्हणून, ज्याचे डोळे साफ आहेत तो सांगेल त्याप्रमाणे वागावे. याकरिता गुरू-आज्ञा प्रमाण मानून आपण वागत जावे. नाम श्रद्धेने आणि शुद्ध भावाने घ्यावे म्हणजे मनात शंका येत नाहीत. या भगवंताच्या नामाची गोडी एकदा लागली म्हणजे भगवंत नाही आपल्याला सोडीत. नामाशिवाय दुसरे सत्यच नाही अशी दृढ भावना झाली पाहिजे. जितकी देहबुद्धी अधिक तितके नाम अधिक घेतले पाहिजे. आज इतके दिवस आपण विषयाचे चिंतन केले, त्याने आपल्या हातात काय आले? नामासारखे सोपे साधन नाही. प्रापंचिक लोक असे म्हणतात की, 'विषयाचा अनुभव तात्काळ येतो, पण भगवंताचा अनुभव हा अनुमानाचा आणि श्रद्धेचा आहे.' हे त्यांचे म्हणणे मला पटते. प्रापंचिक लोक प्रपंच सोडीत नाहीत याचे मला नवल वाटत नाही. पण ते सुख चिरकाल टिकणारे आहे ही समजूत करून घेऊन त्यामध्ये रमतात, याचे मला वाईट वाटते. मी असे म्हणतो की, तुमच्या अनुभवाप्रमाणे जे खरे आहे, तेवढेच तुम्ही खरे माना. विषयाच्या ध्यासापासून सुख नाही असे वाटू लागले म्हणजे नामाची गोडी येईल. आपल्या देहावर आपली सत्ता नाही, आपल्या माणसांवर आपली सत्ता नाही. म्हणून आपले कर्तव्य तेवढे करावे, आणि ते करीत असताना आपले मन दुश्चित्त होऊ देऊ नये. 

४९. भगवत्‌प्राप्ती हे आपल्या जीवनाचे ध्येय ठरवून आपण नेहमी 
त्याच्याभोवती फिरत असावे; म्हणजेच त्याच्या अनुसंधानात असावे. 

17 Feb 2018

नाम भावयुक्त अंतःकरणाने घ्यावे ।

मला आज देवाची गरज अशी वाटत नाही हे खरे, पण ती कशी वाटेल याचा तरी आपण विचार करावा. भगवत्‌चिंतनाने, नामाने ही गरज भासू लागते. गरज इतकी भासली पाहिजे की, अन्नपाणीसुद्धा गोड लागू नये. जितकी आग जोराची तितका पाण्याचा मारा जास्त हवा, तसे जितकी देहबुद्धी बळकट तितका नामाचा जोर अधिक पाहिजे. नामात प्रेम नाही म्हणून ते घेण्याचे सोडू नये. पाण्यात पडल्यावर पुढे पोहायला येते. काशीला गेले नाही तरी काशीस जायचे असे तरी म्हणावे; त्याप्रमाणे नामात प्रेम वाटत नसले तरी, नामात प्रेम आहे असे नित्य म्हणावे. नामाशिवाय दुसरे सत्य नाही, दुसरे साधन नाही, असा दृढ विश्वास झाला म्हणजे नाम घेतल्याशिवाय राहवत नाही; आणि ते घेतल्याने, त्याच्या सहवासाने, त्याचे प्रेम येते. 

संत देव आहे असे म्हणतात, मीही देव आहे असे म्हणतो; फरक इतकाच की, माझे म्हणणे अनुमानाचे असते. संत देहातीत असतात; त्यांच्याजवळ गेल्याने देहाभिमान कमी होतो. प्रत्यक्ष गेले नाही तरी चालेल; भाव ठेवून कार्य जितके लवकर होते तितके देहाच्या सहवासाने होत नाही. तीर्थास तीर्थपण, देवांस देवपण आणि गुरूंस गुरूपण आपण आपल्या भावनेने देतो. तीर्थास जाऊन जर 'आपण याने निष्पाप होऊ' अशी भावना असली तरच मला तीर्थाचे स्नान होईल, नाहीतर मला ते नुसते पाणीच आहे ! थोडक्यात म्हणजे, सर्व काही भावनेत आहे. नाम हे भाव उत्पन्न करते. भावयुक्त अंतःकरणाने आपण नाम घेतले म्हणजे आपले काम शीघ्र होते. 

साधूंची अगर संतांची लक्षणे आपल्या अंगात ती बाणून घेण्याकरिता सांगितली आहेत. परंतु त्या लक्षणांवरून साधू ओळखता येणार नाही; साधू होऊनच त्याला ओळखले पाहिजे. प्रापंचिकाला त्याला ओळखायचे असेल तर त्याने आपल्यावर त्याच्या संगतीचा काय परिणाम झाला हे पाहावे; म्हणजे आपल्यावरून त्याला ओळखायचे. आपल्या मनाला काही वेळ तरी शांती मिळाली, आपला मीपणा थोडा तरी कमी झाला, मन निर्विषय राहावे असे वाटू लागले, तर ते साधूचे स्वरूप आहे असे समजावे. साधू सर्वांभूती भगवद्‍भाव किंवा सर्वत्र मीच आहे असे पाहतात. त्यामुळे सर्वांवर ते प्रेम करतात. सर्वत्र प्रेम करायचे म्हणजे निःस्वार्थ बुद्धीने योग्य ते करणे. आपण आपलेपणा काहींमध्येच पाहतो, सर्वत्र पाहात नाही, म्हणून द्वैतप्रचीती येते. साधूंचा मीपणा गेल्याने जगात त्यांना सर्वत्र अभेदप्रचीती येते. ते सर्वत्र भगवद्‍भाव पाहतात, आणि त्यांचे प्रेम अगदी निर्भेळ असते. 

४८. सर्वांशी अत्यंत प्रेमाने, निष्कपट प्रेमाने वागावे. 
आपल्या बोलण्यामध्ये नव्हे,पाहण्यामध्येसुद्धा प्रेम असावे.

16 Feb 2018

संत सांगतील तसे वागावे.

ज्या स्थितीत परमात्मा ठेवतो त्यात आनंद मानावा. प्रपंचातल्या दुःखाबद्दल वाईट वाटून घेऊ नये. आपण जगात वागताना सर्व 'माझे, माझे,' म्हणतो, पण प्रत्यक्ष आपल्या वाटणीला किती येते याचा कधी आपण विचार करतो का ? मिळण्याची आणि मिळविण्याची हाव वाढल्यामुळेच आपल्याला खरे दुःख होते. ही हाव नाहीशी व्हायला भगवंताच्या स्मरणात राहणे हा एकच उपाय आहे. मी भगवंताचा आहे ही जाणीव ठेवून वागावे. भगवंताकडे चित्त गुंतवून ठेवणे हाच खरा धर्म मानावा. जगाला फसवू नये आणि जगाकडून फसले जाऊ नये. 

नामात जो राहिला तो सत्संगात राहिला. व्यवसाय आणि हौस याप्रमाणे आपण संगत धरतो. मनाची आणि नामाची संगत जोडून द्यावी. मालकाच्या बरोबर असलेला कुत्रा ज्याप्रमाणे धीट होऊन दुसऱ्यावर भुंकतो, त्याप्रमाणे आपण भगवंताच्या आधाराने राहावे; भुंकू मात्र नये, नेहमी लीनता ठेवावी. 'मी' साधन करतो हे विसरून जावे; त्याबद्दल अभिमान धरणे म्हणजे साधनाला कमीपणाच आणणे आहे. आपल्या कामात लक्ष ठेवून सर्वांशी प्रेमाने वागावे. स्त्री दीराचा किंवा सासू-सासऱ्यांचा मान ठेवते, ते नवऱ्याला खूश करण्याकरिता; तसे, भगवंताला ज्या रीतीने समाधान होईल, त्याप्रमाणे आपण वागावे. डॉक्टरला जर आपण 'त्या काळया बाटलीतले औषध मला का देत नाही ?' असे म्हटले तर तो ज्याप्रमाणे 'तुला तो रोग नाही' असे उत्तर देतो, त्याप्रमाणे संत ज्याची त्याची वृत्ति ओळखून मार्ग सांगत असतात. याकरिताच संतांची संगत धरून, ते 'सांगतील' तसे वागावे; ते 'वागतात' तसे नाही वागू. आपल्या पतंगाची दोरी आपण संतांच्या हातात द्यावी आणि खुशाल निश्चिंत रहावे. आपण गुरूने सांगितलेले साधन करीत जावे, म्हणजे साधनात पुढे वाट दाखवायला तो उभाच असतो. जिथे दोन वाटा फुटतात तिथे एक पंढरपूरची आणि एक गोंदवल्याची पाटी असते, तसे साधनात राहून, जिथे त्या दोन वाटा फुटतात, तिथपर्यंत या म्हणजे तिथे गुरू उभाच आहे. पण उगीच काही न करता 'पुढे काय आहे ?' हे विचारण्याने काय होणार ? 

संतांनाच वेदांचा खरा अर्थ कळला. त्यांचे केवढे उपकार सांगावेत, की त्यांनी तो अर्थ आपल्याला सांगितला. म्हणून आपण वेद वाचण्याचे कारण नाही; आपण फक्त संत आपल्याला सांगतील त्याप्रमाणे वागावे. त्यात आपलेच घुसडू नये. आपले काम खात्रीने झालेच पाहिजे. पाणी गोठून बर्फ बनते, बर्फाच्या आत-बाहेर जसे पाणीच असते, तसे जो आत-बाहेर भगवंताच्या प्रेमाने ओथंबलेला असतो त्याला संत म्हणतात. असे संत फक्त नामस्मरणाने जोडता येतात. 

४७. सदगुरूच्या आज्ञेचे पालन करता करता साधकाला नामाची गोडी लागते, 
आणि नाम पोटभर घेतल्याने त्याचा आत्मा तृप्त होतो. 

15 Feb 2018

जेथे नाम, तेथे मी आहेच.

मला नामात पहा असे मी म्हणतो याचा अर्थ, मी देहात नसून माझी वस्ती नामातच असते; कारण आपले मन जिथे असते तिथेच आपण खऱ्या अर्थाने असतो. समजा तुम्ही यात्रेला गेला आहात; पण मन घराबद्दलच चिंतन करीत असेल, तर तुम्ही देहाने क्षेत्रात असलात तरी खऱ्या अर्थाने घरीच आहात असे नाही का होत ? त्याप्रमाणे, तुम्हांला जर कुणी विचारले की, 'तुम्ही नेहमी कुठे असता', तर आम्ही नेहमी विषयातच असतो, असेच सांगावे लागेल. ज्यांना जे जास्त आवडते त्यातच ते असतात, हे खरे ना ? मग तुमचा गुरू कुठे आहे असे जर कुणी विचारले तर तो नामात आहे असेच म्हणाल ना ? म्हणून, जिथे नाम चालू आहे तिथे मी आहेच; जो नामस्मरण करतो त्याच्या मागेपुढे मी उभा आहे. 

शास्त्री-पंडित म्हणतात की, आमच्याकरिता ज्ञानमार्ग आहे. पण त्यांच्या लक्षात येत नाही की तो अत्यंत कठीण आहे. त्यात अभिमान नष्ट होण्याऐवजी वाढण्याचाच संभव जास्त असतो. 'ब्रहम सत्यं जगत्‌ मिथ्या' हे तत्त्व त्यांच्या बुद्धीला पटते. पण त्यांच्या अनुभवाला मात्र येत नाही. जग मिथ्या आहे असे ते म्हणतात. पण आपल्या देहाला मात्र सत्य मानतात. नुसत्या विचाराने देहाचे मिथ्यत्व अनुभवाला येणे अत्यंत कठीण आहे. कर्मठ लोक म्हणतात की, 'आम्ही आमच्या कर्ममार्गानेच जाणार. आमचा नामावर विश्वास नाही. आम्ही वेदांनी घालून दिलेली बंधने आणि नियम यांचे पालन करणार'; असे म्हणून ते बंधने आणि नियम यांचे इतके काही पालन करतात की ते बंधनालाच सर्वस्व मानतात. त्यांच्या हे लक्षात येत नाही की ईश्वरप्राप्ती हे साध्य असून बंधने आणि नियम हे साधनरूप आहेत. साध्य साधण्यापुरतीच बंधने पाळायला हवीत. फुलझाडांची बाग रक्षण करण्यापुरतेच तिचे कुंपण सांभाळायला हवे. पण ते कुंपणालाच सर्वस्व मानतात, त्याला खतपाणी घालून वाढवितात; आतल्या बागेकडे लक्ष देत नाहीत. वैदिक कर्माने चित्तशुध्दी होते हे मी मान्य करतो, परंतु ज्या भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून चित्तशुध्दी करायची त्या भगवंताचे अधिष्ठान जर वैदिक कर्मांना नसेल, तर कर्ममार्गाचे पर्यवसान कर्मठपणात होते. नामावर विश्वास नाही असे ते म्हणतात, पण संध्येच्या किंवा कोणत्याही वैदिककर्माच्या सुरूवातीला "ॐ केशवाय नम:" असे म्हणतात, ते नाम नव्हे काय ? वेद म्हणजे भगवंताची स्तुती होय. ती करीत असताना आपले लक्ष शब्दांकडे नसावे, त्यांच्या अर्थाकडे असावे; अर्थ न समजला तरी भगवंताकडे असावे. 

४६. रामनाम हे ॐकाराचेच स्वरूप आहे. ते सर्व कर्मांचा आणि साधनांचा प्राण आहे.

आनंद हवा असेल तर नाम घ्यावे.

शरीरस्वास्थ्याला लागणार्‍या शरीरातल्या द्रव्यांत जेव्हा कमी-अधिकपणा उत्पन्न होतो तेव्हा शरीरस्वास्थ्य बिघडते; त्यालाच आजार म्हणतात. सुंठ हे असे औषध की, ते शरीरात कमी झालेल्या द्रव्याची भरपाई करते आणि जास्त झालेले द्रव्य कमी करून आरोग्य राखते. नाम हे सुंठीसारखे आहे. पारमार्थिक प्रगतीच्या मार्गात प्रत्येक व्यक्तीतल्या ज्या ज्या गुणदोषांमुळे अडथळा येतो, ते गुणदोष दूर करून भगवंताचे नाम प्रगतीचा मार्ग मोकळा करते. म्हणून कोणात कोणतेही गुणदोष असोत, त्याने निष्ठेने नाम घेतले की त्याचे काम बिनचूक होऊन तो ध्येय गाठतो. आपल्यात तेलाचा नंदादीप लावण्याची पद्धत आहे. तो अखंड तेवत ठेवायचा असतो. त्यात तेलाचा पुरवठा करावा लागतो. तसे, ज्याला आनंदरूपी नंदादीप हवा असेल त्याने सतत नामरूपी तेलाचा पुरवठा करीत राहिले पाहिजे. थोडक्यात म्हणजे, ज्याला आनंद हवा असेल त्याने सतत नाम घेतले पाहिजे. आनंदाचा उगमच नामात आहे. केव्हाही आणि कुठेही पाहिले तरी बर्फामध्ये गारपणा हा असायचाच, त्याचप्रमाणे परमात्म्याजवळ नेहमी आनंद हा असायचाच असे समजावे. आपण जगामध्ये व्याप वाढवितो तो आनंदासाठीच वाढवितो; पण भगवंताच्या व्यतिरिक्त असणारा आनंद हा कारणांवर अवलंबून असल्याने, ती कारणे नाहीशी झाली की तो आनंद पण मावळतो. म्हणून हा आनंद अशाश्वत होय. 'खावे, प्यावे आणि मजा करावी' हे तत्वज्ञान मला थोडेसे पटते, पण त्यामध्ये मोठा दोष असा की, ते देहबुद्धीवर आधारलेले असल्याने कायमचे म्हणजे टिकणारे नाही; कारण आजची चांगली परिस्थिती उद्या बिघडली, की याची मजा गेली ! उलट, येईल त्या परिस्थितीमध्ये आपण आनंद निर्माण करावा. रोज अगदी पाचच मिनिटे का होईना, भगवंताशी अनन्य व्हायला शिका. अशा त्या पाच मिनिटांचा आनंद शंभर वर्षे नुसते जगून मिळणार नाही. साखरेच्या गोडपणाबद्दल तासन्‌तास निरूपणे करण्यापेक्षा एक चिमूटभर साखर तोंडात टाकली असताना जसा खरा आनंद मिळतो, तसेच इथे आहे. जगण्यामध्ये आनंद आहे ही गोष्ट खरी, पण आनंदाचे जगणे नसेल तर ते मेल्यासारखेच आहे. ज्याच्याजवळ भगवंत आहे, त्यालाच आनंदाचे जगणे प्राप्त होईल. म्हणून ज्याला जगायचे आहे त्याने नाम घ्यावे. 

'सदा सर्वदा योग तुझा घडावा' असे श्रीसमर्थांनी मागितले. याचे कारण हेच की, जिथे भगवंत तिथे आनंदीआनंद असतो. व्यापारी लोक 'आज रोख, उद्या उधार' अशी पाटी लावतात. त्याप्रमाणे आपणही 'आनंद रोख, दुःख उधार' अशी वृत्ती ठेवावी. ज्याचा आनंद नामात टिकेल त्याला नित्य दिवाळीच आहे. 

४५. भगवंताने आपल्याला ज्या स्थितीत ठेवले आहे. त्यात समाधान मानून त्याचा कधीही विसर पडू न द्यावा.

13 Feb 2018

नामाचे त्रिकालबाधित श्रेष्ठत्व !

नाम हे सच्चिदानंद स्वरूप आहे. शुद्ध परमात्मस्वरूपाच्या अगदी अगदी जवळ कुणी असेल तर ते फक्त नामच होय. नाम हे चिन्मय असल्यामुळे त्याचा आनंद ओसंडून येतो आणि ही सृष्टी तयार होते. अनेक रूपे घडविणे, ती मोडणे आणि नवीन तयार करणे, पण आपण स्वतः मात्र मूळ स्वरूपाने राहणे, ही केवढी विलक्षण लीला आहे ! खरोखर, तुम्हाला मी काय सांगू ! बोलायला शिकल्यापासून आजपर्यंत मी नामाबद्दलच बोलत आहे, अजून नामाचे माहात्म्य संपत नाही. नामाचे माहात्म्य सांगून संपले तर भगवंताचे भगवंतपण लटके झाले असे समजावे. जो नामात 'मी' पणाने नाहीसा झाला त्यालाच नामाच्या माहात्म्याची कल्पना आली. असा पुरूष नामाविषयीं मौन तरी धरील, कारण त्याचे माहात्म्य कोणालाच सांगता येणार नाही; किंवा शेवटच्या श्वासापर्यंत नामाचे माहात्म्यच सांगत राहील, कारण ते कितीही सांगितले तरी संपणार नाही, आणि कितीही ऐकले तरी तृप्ती होणार नाही. नामाने सर्व पापे नाहीशी होतात. भगवंताला विसरणे हे सर्वांत मोठे पाप आहे. नामाने भगवंताचे स्मरण होते. 

नाम हे वेदांपेक्षाही श्रेष्ठ आहे, कसे ते पहा. वेदाध्ययनापासून फायदा होण्यासाठी चारी वेदांचा अभ्यास करणे जरूर आहे. त्यासाठी पुष्कळ वेळ आणि श्रम लागतात. नामाला श्रम नाहीत. दुसरे, वेदांचा अधिकार सर्व लोकांना नाही, पण नाम कुणीही घ्यावे. वेदांच्या मंत्रांचा आरंभ ॐकारानेच होतो, म्हणून वेदारंभी देखील नामच आहे. नाम हे तीर्थयात्रेपेक्षा श्रेष्ठ आहे. अंतरंगामध्ये बदल होण्यासाठी यात्रा करायची असते; पण त्याला श्रम, पैसा, प्रकृती, वगैरे गोष्टी अनुकूल असाव्या लागतात. नाम हे घरबसल्या अंतरंग बदलण्याचा अनुभव आणून देते. पंढरपूरला जाऊन नाम घेण्याचे जर न शिकला तर जाणे व्यर्थ गेले म्हणावे. नाम घ्यावे अशी बुद्धी होण्यासाठीच तिथे जाणे जरूर आहे. नाम हे सर्व सत्कर्मांचा राजा आहे. सत्‌ म्हणजे भगवंत, त्याच्याकडे नेणारे जे कर्म तेच सत्कर्म. इतर कर्मे आडवळणाने भगवंताकडे नेतात, नाम हे साक्षात्‌ भगवंताकडे पोहोचवते. नामाने भवरोग नाहीसा होतो. भव म्हणजे विषय. विषयांची आसक्ती असणे हा सर्व रोगांचा पाया आहे. नाम घेतल्याने भगवंताकडे प्रेम लागते आणि इतर ठिकाणची आसक्ती सुटते. नामाने सर्व दुःखे नाहीशी होतात, कारण या दुःखाचे मूळ विषयांच्या आसक्तीमध्ये आहे, आणि नामाने ती आपोआप सुटते, म्हणून दुःख नाहीसे होते. शिवाय, भगवंत हा आनंदरूप असल्याने त्याला नामाने घट्ट धरला की दुःख त्या ठिकाणी कसे राहू शकेल ? 

४४. प्रत्येक मनुष्याने भगवंताचे नाम घ्यावे, त्याचे ध्यान करावे, 
त्याच्या स्मरणात राहावे, आणि आपल्या जन्माचे सार्थक करून घ्यावे. 

12 Feb 2018

नाम हे सत्स्वरूप आहे.

नाम हे रूपापेक्षा निश्चित श्रेष्ठ आहे; त्यामुळे रूपाचे ध्यान मनामध्ये आले नाही तरी नाम सोडू नये. पुढे रूप आपोआप येऊ लागेल. रूप हे जड आणि दृश्य असल्यामुळे उत्पत्ती आणि विनाश, वाढ होणे आणि घटणे, जागा व्यापणे आणि जागा बदलणे, कालमानाने फरक पडणे, इत्यादि बंधने त्याला असतात; पण नाम दृष्याच्या पलिकडे आणि सूक्ष्म असल्यामुळे त्याला उत्पत्ती आणि विनाश. वाढ आणि घट, देशकालनिमित्ताच्या मर्यादा, इत्यादि कोणतेही विकार नाहीत. नाम हे सत्स्वरूप आहे. नाम हे रूपापेक्षा व्यापक असते. व्यापक वस्तूचे क्षेत्र मोठे असल्याने तिच्यामध्ये शक्तीदेखील अधिक असते. जिच्यामध्ये शक्ती जास्त असते ती वस्तू अधिक स्वतंत्र असते. जी वस्तू अधिक स्वतंत्र असते तिला बंधने किंवा मर्यादा कमी असतात. म्हणून नाम हे रूपापेक्षा अधिक व्यापक, अधिक शक्तिमान, अधिक स्वतंत्र, आणि अधिक बंधनरहित असते. 

आपली ज्ञानक्रिया कशी चालते हे पाहू. आपण एका टेकडीवर उभे राहून सृष्टिसौंदर्य पाहिले. त्या पाहण्यात कोणकोणत्या क्रिया होतात पाहा. प्रथम डोळयांमधून प्रकाशकिरणे आत गेली. बाह्य सारासार विचार करून त्या वस्तूचे यथार्थ ज्ञान आपल्याला करून देते. पण मनुष्याच्या बुद्धीचा व्यापार इथेच थांबत नाही. टेकडीवरून आजूबाजूला पाहात असताना झाडे, वेली, घरे, बागा, माणसे, पक्षी, पाण्याचे तलाव, इत्यादि सर्व वस्तूंचे ज्ञान झाल्यावर पुन्हा त्यांचे एकीकरण होऊन, 'ही सृष्टीची शोभा आहे' असे ज्ञान आपल्याला होते. म्हणजे अनेकांत एकत्व शोधणे हेच मानवी ज्ञानाचे लक्षण आहे. या जगामध्ये कितीतरी विचित्रता आढळते. नाना तऱ्हेचे दगड, नाना तऱ्हेचे किडे, नाना प्रकारचे पक्षी, प्राणी, या सर्वांची नावे जरी भिन्न असली तरी त्या सर्वांमध्ये 'असणेपणाचा' गुण आहे; म्हणजे, सजीव प्राणी झाला तरी तो 'आहे', आणि निर्जीव वस्तू झाली तरी तीही 'आहे'. एवढेच काय, पण आनंदालासुद्धा 'आहेपणा'चा गुण आहे. या 'असणेपणा'च्या गुणाला 'नाम' असे म्हणतात. यालाच 'ॐकार' असे म्हणतात. 'ॐकारांतून' सर्व सृष्टी उगम पावली. ॐकार हे परमात्म्याचेच स्वरूप आहे. अर्थात्‌, नाम म्हणजे सत्‌ होय. म्हणूनच नाम हे सृष्टीच्या आरंभी होते, ते सध्या आहेच, आणि सृष्टीचा लय झाला तरी ते शिल्लक राहणारच. नाम म्हणजे ईश्वर होय. नामातून अनंत रूपे उत्पन्न होतात आणि अखेर त्यामध्येच ती लीन होतात. रूप हे नामाहून निराळे राहू शकत नाही. नाम हे रूपाला व्यापून पुन्हा शिल्लक उरते. 

४३. नाम हे शाश्वत आहे. ते पूर्वी टिकले, आता आहे, आणि आपण गेल्यावर ते राहणार आहे.