Showing posts with label जून. Show all posts
Showing posts with label जून. Show all posts

1 Jul 2017

ऐसा करावा काही नेम ।  जेणे जोडेल आत्माराम ॥ 

ऐसा करावा काही नेम । जेणे जोडेल आत्माराम ॥

नेम असावा शाश्वताचा । जेणे राम कृपा करील साचा ॥

नेम असावा वाचा मन । जेणे संतुष्ट होईल रघुनंदन ॥

कर्तव्यात गुंतवावे शरीर । जेणे संतोषे रघुवीर ॥

सतीला नसे दुजे दैवत जाण । तिला पति एकच प्रमाण ॥

न पाहावे त्याचे दोष गुण । आपले कर्तव्य करावे जतन ॥

पतिव्रताधर्म श्रेष्ठ भारी । वंदिताती संत महामुनि ॥

पति‍आज्ञा प्रमाण । हेच मुख्य साध्वीचे लक्षण जाण ॥

न बोलावे उणेपुरे । जे परमात्म्यास न आवडेल खरे ॥

संतति वा संपत्ति । भगवत्कृपेने ज्याची प्राप्ति ॥

त्याचे करावे रक्षण । पण न गुंतू द्यावे मन ॥

जे आवडेल पतीला पाही । तो तो आपला धर्मच राही ॥

मनाने करावे भगवंत स्मरण । जेणे चुकेल जन्ममरण ॥

अखंड राखावे समाधान । चुको न द्यावे अनुसंधान ॥

काया गुंतवावी प्रपंचात । मन असावे रघुनाथात ॥

प्रपंचात राखावी खबरदारी । मन लावावे रामावरी ।

त्याचा राम होईल दाता । न करावी कशाची चिंता ॥

मुखी असावे नामस्मरण । हृदयात भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव ।

शुद्ध राखावे आचरण । पवित्रतम अंतःकरण ।

मुखाने भगवंताचे स्मरण । त्यावर कृपा करील रघुनंदन ।

हा ठेवावा विश्वास । अनुभव येईल नक्की खास ॥

पतीस करावे एकदा तरी नमन । रामरूप जाणून ।

त्याचे जाणावे मनोगत । तैसे वर्तणे हे आपले हित ॥

ऐसा नेम ज्याचे घरी । राम उभा त्याचे दारी ॥

आल्या अतिथा अन्न द्यावे । कोणास विन्मुख न पाठवावे ॥

राम कर्ता हा ठेवा भाव । कमीपणाला नाही ठाव ॥

सर्वांचे उगमस्थान एक । हे धरावे चित्ती । त्याला नाही कशाची भीति ॥

रामाविण न पाहावे जग । समाधानाची खूण हीच सत्य ॥

जे जे काही यावे । ते ते रामापासून आले । हा ठेवावा भाव ॥

साक्षित्वाने देहाचा प्रपंच पाहावा । अंतरी रघुनाथ भजावा ॥

देहाची गति प्रारब्धाचे हाती । ऐसे शास्त्रे सांगती ।

परि न येई हे चित्तीं । एकच जगती माझा रघुपति ॥

मुखाने घ्यावे रामनाम । हृदयी परमात्म्याचे प्रेम ।

याहून दुजा न करावा विचार । हा ठेवावा निर्धार ॥

चातुर्मासांत करावी सुरुवात । अखंड चालवावा हा हेत ॥

थोडा नेम सांगतो कांही । तो करूनिया पाही ॥

घ्यावें भगवंताचें नाम । खात पीत, करीत असता काम ।

होईल तेवढे करावे जतन । परमात्मा पुरे करील हे जाणावे ॥

सर्वांस सांगावे आशीर्वाद । सर्वांनी जोडावा भगवंत ॥

१८२. मागणे तुम्हा एकच पाही । नामावाचून दूर कधी न राही ॥

29 Jun 2017

पुण्यतिथी कशी साजरी करावी ?

सत्पुरुषाची पुण्यतिथी कशी साजरी कराल ? या दिवशी जो नेम कराल तो सतत टिकण्यासारखा असतो. म्हणून आजपासून नामाशिवाय बोलायचे नाही असे आधीच ठरवा. नामांत राहण्याचा प्रयत्‍न करा, म्हणजे इथे आल्यासारखे काही केल्याचे श्रेय तरी मिळेल. इथे जो जो म्हणून आला त्याच्याजवळ आपण राहावे असे मला वाटते, पण तुम्हीच दार लावून ठेवले तर मी काय करणार ? पाहुणा घरी आला आणि त्याला दार उघडलेच नाही, तर तो काय करणार ? तसे विषयात राहून दारे बंद करून ठेवू नका. नामाचा उच्चार कंठी ठेवा, म्हणजे विषयाचा घाला होणार नाही. आता कली मातत चालला आहे; त्याचा घाला चुकवायचा असेल तर नामावर विश्वास ठेवा. कोणीही काहीही सांगितले तरी नाम सोडू नका. जसे पाण्याचा मोठा लोंढा चालू झाला की एखाद्या स्थिर झाडाला दोराने बांधून ठेवलेली वस्तू वाहून जात नाही, तसे तुम्ही नामाची कास घट्ट धरलीत म्हणजे काळ काही करू शकणार नाही.

समर्थांनी नामाच्या समासात सांगितले आहे तसे, नाम हेच रूप असे समजून घेत चला, म्हणजे रूप दिसेल. भगवंत हा आपल्या आतमध्ये प्रकट व्हायचा असल्यामुळे, नामस्मरणाच्या योगाने तो हळूहळू प्रकट होत जाणे हेच खरे हिताचे आणि कायमचे असते. डोक्यावर हात ठेवून चमत्कार होणे, काहीतरी तेज दिसणे, दृष्टांत होणे, इत्यादि गोष्टी तात्पुरत्या असतात. एखादा अशक्त, हाडकुळा मनुष्य लठ्ठ होण्यासाठी 'अंगाला सूज येऊ दे' असे म्हणाला तर ते वेड्यासारखे होईल; याच्या उलट, त्याने नीट औषध घेतले तर तो कदाचित लठ्ठ होणार नाही, पण त्याचे शरीर मात्र घट्ट होईल. तसेच परमार्थाच्या अनुभवाचे आहे; आणि हा अनुभव वाढीला लागावा याकरिताच पुण्यतिथी साजरी करावी. नामस्मरण सतत केल्याने आज ना उद्या भगवंताचे प्रेम येईलच येईल. प्रपंचाच्या गर्दीमध्ये भगवंताचे स्मरण ठेवण्यासाठी उत्सव, सण, पुण्यतिथ्या, वगैरे असतात. खरोखर, प्रापंचिकाला कितीतरी पाश आहेत ! पैसा, लौकिक, मुले, मित्र, आप्त, वगैरे सर्व पाशच आहेत. अशा अनेक पाशांमध्येही नाम आवडीने घेणे किती कठीण आहे ! त्यामध्ये टिकणारा मनुष्य चांगला भक्कम असला पाहिजे. नामाच्या मागे भगवंताचे अस्तित्व आहे. म्हणून नामात सत्संगतीही आहे. मोबदल्याची अपेक्षा न करता मनापासून नाम घ्यायचे, आजच्या दिवसापासून ठरवा.

१८१. संतांचे अस्तित्व त्यांच्या देहात नसून त्यांच्या वचनात आहे.

28 Jun 2017

परमार्थ हे कृतीचे शास्त्र आहे.

एकदा जनक राजाच्या घरी एक विद्वान आला, आणि आपण आल्याची वर्दी त्याने राजाला पाठविली. 'आता राजा आपली पूजा करील' असे त्याच्या मनात आले. हा त्याचा भाव समजून जनक राजाने निरोप पाठविला की, 'आपण एकटेच यावे.' त्याप्रमाणे, आपण अभिमानाचे गाठोडे बाहेर ठेवून मगच रामाकडे जावे; तसेच सद्‍गुरूच्या घरीही आपले भांडवल बाजूला ठेवूनच जावे. 'मी कोण' याची जाणीव जोपर्यंत राहते तोपर्यंत दुजेपण आलेच. अभिमान वाढविण्याकरिता देवाकडे नाही जाऊ. दुसर्‍याचे वाईट व्हावे असे आपल्याला वाटले की आपला अभिमान वाढीला लागला आहे असे जाणावे. पोराबाळांवर जितके प्रेम करता तितके प्रेम भगवंतावर करावे. आपली आणि भगवंताची इच्छा एकच होणे, हे परमार्थाचे सूत्र आहे. भगवंताची जी इच्छा तीच आपली करावी, आणि आनंदात राहावे. अगदी निःस्वार्थबुद्धीने केलेले कर्तव्य कधी वाया जात नाही. एखाद्या सावकाराकडे कोणाचे दागिने गहाण असले, तर त्याने आपल्या घरच्या लग्नामध्ये ते वापरणे हा अन्याय आहे. त्याचप्रमाणे, आपली मुलेबाळे ही देवाने आपल्याजवळ दिली आहेत, त्यांचे रक्षण करावे; ते कर्तव्य होईल. पण त्यांच्या ठिकाणी आपलेपणा ठेवून सुखदुःख भोगणे हे मात्र पाप आहे.

संन्याशाने भगवे वस्त्र धारण केल्यावर त्याचा थोडा तरी परिणाम बुद्धीवर होतोच. त्याचप्रमाणे आपण भजनपूजन करू लागल्यावर त्याचा परिणाम आपल्यावर दिसला पाहिजे. जो शहाणा असेल त्याने समजून आणि जो अडाणी असेल त्याने श्रद्धेने, बंधने पाळावीत. स्वतःच्या मताबद्दल आपल्याला पूर्ण खात्री असावी, त्यात घोटाळा असू नये. मनाने आपण खंबीर झाले पाहिजे. ज्याप्रमाणे पांढरा कपडा मळण्याचा जास्त संभव असतो, त्याप्रमाणे सत्कर्माला विघ्ने फार येतात; त्यांना न जुमानता आपण सत्कर्म करावे. आचार आणि विचार ही दोन्ही जुळली म्हणजे उच्चारही तसाच येतो.

नारळात पाणी जितके गोड तेवढी खोबर्‍याला चव कमी; तसे, जेवढी विद्वत्ता जास्त तेवढी निष्ठा कमी. फार वाचू नका; जे काही थोडे वाचाल त्याचे मनन करा; आणि ते कृतीत आणा. जसे वडिलांचे पत्र वाचल्यावर आपण त्यातल्या मजकुराप्रमाणे कृती करतो, तशी ग्रंथ वाचनाच्या समाप्तीनंतर कृतीला सुरुवात करावी. परमार्थ हे सर्वस्वी कृतीचेच शास्त्र आहे. समाधान आणि आनंद हे त्या शास्त्राचे साध्य आहे. भगवंताच्या स्मरणात कर्तव्य केले की जीवनात आनंद उत्पन्न होतो.

१८०. सर्व काही करावे । पण खरे प्रेम साधनावर असावे ॥

27 Jun 2017

शाश्वतचे सुख कसे लाभेल ?

असे पाहा, एखादा प्रवचन करणारा घ्या; किंवा मोठा वैदिक कर्मे करणारा घ्या; त्याला त्यापासून समाधान मिळते असे नाही, तो असमाधानातच असतो. कळू लागल्यापासून आपण सदाचाराने वागत असून आणि देवधर्म करीत असूनही आपल्याला समाधान लाभत नाही, याचे कारण काय ? तर आपले ध्येय निश्चित झालेले नसते. आपण नीतिने वागतो ते लोकांच्या भितीने; कारण आपण वाईट वागलो तर लोक आपल्याला नावे ठेवतील. लौकिकासाठी केलेले कर्म कधीही समाधान देऊ शकत नाही. पापकर्म करणार्‍यालाही समाधान लाभत नाही, कारण त्यालासुद्धा आपण करतो हे वाईट आहे असे वाटतच असते. एकदा एक गृहस्थ माझ्याकडे आला आणि म्हणाला, "देवापाशी काही न्याय नाही; तो अगदी अन्यायी आहे." मी त्याला विचारले, "असे झाले तरी काय ?" त्यावर तो म्हणाला, "मी कधी कोणाचा पैसा खाल्ला नाही, सदाचरणाने वागलो; पण मी फक्त एकमजली घर बांधू शकलो, आणि माझ्या हाताखाली काम करणार्‍या एका भिकारड्या कारकुनाने पैसा खाऊन माझ्या घरासमोर दुमजली घर बांधले !" मी त्याला विचारले, "मग तुम्ही का नाही पैसा खाल्ला ?" त्यावर तो म्हणाला, "मला तसे आवडत नाही; लोक नावे ठेवतील." तेव्हा, जे कर्म लौकिकासाठी केले त्याने कधीही समाधान मिळू शकणार नाही. प्रपंचात सुख लाभावे म्हणून आपण देवाचे करतो, आणि लौकिकासाठी नीतिधर्माने वागतो; मग त्यातून शाश्वतचे सुख कसे लाभेल ? अंगावर चांगले दागिने घातले, उत्तम लुगडे नेसले, परंतु कुंकू जर कपाळाला नसेल तर या सर्वांची काय किंमत ? तसेच, जर देवाचे प्रेम नसेल तर त्या सत्कर्मापासून तितकासा उपयोग होणार नाही. या‍उलट देवाच्या ठिकाणी अत्यंत प्रेम असूनसुद्धा जर नीतिधर्माचे आचरण नसेल, तर ती परमार्थाची इमारत टिकू शकणार नाही.

खरोखर परमार्थ अत्यंत सोपा आहे, विद्वान लोक तो उगीचच अवघड करून सांगतात. चांगले काय आणि वाईट काय हे कळायला लागल्यापासून जो त्याप्रमाणे वागेल त्याला खात्रीने परमार्थ साधेल. परमार्थ तीनपैकी कोणत्याही एका गोष्टीने साधू शकेल : एक, देहाने साधूची संगत; दुसरी, संतांच्या वाङ्‍मयाची संगत आणि त्याचप्रमाणे पुढे आचरण; आणि तिसरी, भगवंताचे नामस्मरण. नाम घेतल्याने त्याची संगत आपल्याला अखंड लाभू शकेल. संतांनी सांगितले ते संशय न घेता विश्वासाने करणे ही पहिली पायरी, आणि ते पुढे निश्चयाने, श्रद्धेने, आणि प्रेमाने चालू ठेवणे ही शेवटची पायरी. हाच शाश्वत समाधानाचा मार्ग आहे.

१७९. जग काय म्हणेल म्हणून वागणे याचे नाव व्यवहार; 
भगवंत काय म्हणेल म्हणून वागणे याचे नाव परमार्थ. 

26 Jun 2017

नियम थोडा करावा, पण तो शाश्वताचा असावा.

ज्या झाडाची वाढ व्हावी असे आपल्याला वाटते, त्या झाडाला आपण पाणी घालतो, त्याची मशागत करतो, त्या झाडाकडे लक्ष पुरवितो. परंतु जे झाड वाढू नये असे वाटते, किंवा ज्या झाडाचे विशेष महत्त्व आपल्याला वाटत नाही, त्या झाडाकडे आपण दुर्लक्ष करतो. तसे, जेणेकरून परमेश्वराच्या ठिकाणी बुद्धी स्थिर होईल, त्याची जोपासना करावी. देहाकडे, विचारांकडे, विषयांकडे दुर्लक्ष करावे, म्हणजे आपोआपच त्यांचा विसर पडेल. ज्याप्रमाणे एखाद्या झाडाची जोपासना करताना, त्याला गुराढोरांनी खाऊ नये म्हणून त्याच्याभोवती कुंपण घालावे लागते, त्याप्रमाणे परमार्थ हा खरा कुंपणातच ठेवावा; तो जितका गुप्त राहील तितका चांगला. त्याचे प्रदर्शन झाले तर त्याला दृष्ट लागते. म्हणून परमार्थ हा कोणाच्या न कळत, परंतु अत्यंत आवडीने करावा. झाड लावल्यावर ते किती वाढले आहे हे कुणी रोज उकरून पाहात नाही, त्याप्रमाणे अनुभवाच्या, प्रचीतीच्या मागे लागू नका; त्यामुळे प्रगती खुंटेल.

हट्टी आणि व्यसनी माणसे एका दृष्टीने मला आवडतात; कारण त्यांचा हट्ट भगवंताच्या मार्गाला लावला की झाले. परमार्थात नियम थोडाच करावा, पण तो शाश्वताचा असावा; म्हणजे, जेणेकरून भगवंताचे प्रेम लागेल याबद्दलचा असावा, आणि तो प्राणाबरोबर सांभाळावा. जे अत्यंत थोर भाग्याचे असतात त्यांनाच ध्यानमार्ग साधतो. हा मार्ग फार थोरांचा आहे. ध्यानामध्ये जगाचाच विसर पडतो; त्या अवस्थेमध्ये दिवस काय पण वर्षेसुद्धा जातील, पण त्याच्या देहाला काही होणार नाही. आपल्यासारख्याला साधनांत साधन म्हणजे भगवंताचे नाम; दानांत दान म्हणजे अन्नदान; आणि उपासनांत उपासना म्हणजे सगुणाची उपासना होय; या तिन्हींमुळे देहाचा विसर पडतो. म्हणून शक्य तो या तीन गोष्टींची कास धरा. मनुष्याची साहजिक प्रवृत्ती व्याप वाढविण्याकडे असते. द्वैत वाढवून त्यात अद्वैत पाहण्यात आनंद असतो हेही खरे. साधे मधमाश्यांचे उदाहरण घ्या. त्या अनेक झाडांवरून मध गोळा करतात आणि नंतर पोवळ्यात एकत्र करतात. असा एकत्र केलेल्या मधाचा केवढा गोड साठा होऊ शकतो बरे ! अशा रीतीने सर्व द्वैतामध्ये एक अद्वैत, म्हणजे एक राम, पहायला शिकावे; आणि ज्याला सर्वत्र राम पाहणे असेल त्याने स्वतःमध्येच राम पाहून, प्रत्येक कृती ही रामाची समजावी. स्वतःमध्ये राम पाहिल्याशिवाय तो सर्वत्र पाहता येणार नाही. तेव्हा स्वतःचा म्हणजेच देहाचा विसर पडल्याशिवाय सुख लाभणार नाही, आणि हा देहाचा विसर राममय झाल्यानेच होईल. म्हणून अखंड भगवंताच्या अनुसंधानात राहा.

१७८. परमार्थाला अगदी स्वतःपासून सुरुवात करायची असते.

25 Jun 2017

सदाचरण हा परमार्थाचा पाया आहे.

राम सहज हाती लागेल म्हणून जी काही साधने समर्थांनी सांगितली आहेत, त्यामध्ये चांगल्या ग्रंथांचे वाचन हेही एक आहे. परंतु कोणत्याही ग्रंथाचे अगर पोथीचे वाचन करताना, केवळ काहीतरी वाचायचे म्हणून वाचन करू नये. अर्थ कळल्याशिवाय पोथी खरी वाचल्यासारखे नाही होणार; तसेच जितका त्याचा अर्थ कळला तितके तरी कृतीत आणण्याचा प्रयत्‍न करावा. आपण जे करीत नाही ते प्रथम करायला सुरुवात करावी. भाराभर वाचले आणि कृती केली नाही, तर काय उपयोग ? चार मैलांचा रस्ता असला तर सबंध रस्ता एकदम दिसावा असे म्हटल्याने कसे होईल ? एक मैल रस्ता चालावा, म्हणजे पुढचे दिसेल. जसजशी मजल मारावी तसतसे पुढचे दिसू लागेल. परमार्थाचेही असेच आहे. बापासारख्या मिशा मला याव्या म्हणून लहान मुलाने हट्ट धरला तर कसे होईल ? त्याचप्रमाणे, आजच मला देवदर्शन व्हावे म्हटले तर कसे होईल ? सद्‍गुरूची आज्ञा पाळावी, साधन करू लागावे, म्हणजे सर्व काही होते. जेवायला बसले म्हणजे पोट भरायचे राहते का ?

खरोखर परमार्थाची वाट अगदी सरळ आहे; प्रपंचाचा रस्ता मात्र डोंगराळ असून काटेकुटे यांनी भरलेला आहे. आपला प्रपंच हा परमार्थाच्या सोयीसाठी असायला पाहिजे. पण याच्या उलट, आपला परमार्थच मुळी आपल्या प्रपंचाच्या सोयीसाठी आपण केला आहे. कुंपणाने शेत खावे तसे आपले झाले आहे. शेताला कुंपणाची जरूरी आहे; नाहीतर ढोरे आत येऊन शेत फस्त करतील. पण कुंपणच जर बेसुमार वाढले, तर त्यामुळे शेताचे नुकसान होते हे जाणले पाहिजे.

ज्याने व्यवहार तपासून केला, त्याला परमार्थ साधलाच. परमार्थ हा साखरेसारखा आहे. आपण साखरेचे कारले जरी केले तरी ते खायला गोड लागते, तसे प्रपंचातसुद्धा परमार्थ केला तरीही तो गोडच असतो. परमार्थ हा आपल्यासाठीच असल्याने तो आपल्याला शक्य आहे किंवा नाही हे विचार करून पाहावे; आणि तो आपल्याला शक्य आहे असे जर पटले, तर मात्र केल्याशिवाय राहू नये.

पोटात अन्न घालण्यासाठी जसे तोंड, त्याचप्रमाणे परमार्थाला सदाचरण आवश्यक आहे. सदाचरण हा परमार्थाचा पाया आहे. पाया म्हणजे काही घर नव्हे; परंतु पायाशिवाय मात्र घर नव्हे, हे देखील तितकेच खरे. आपण स्वतःच्या मुलाला जसे प्रेमाने घेतो तसा परमार्थ करावा; आणि दुसर्‍याच्या मुलाला जसे घेतो तसा प्रपंच करावा. भगवंताच्या स्मरणात प्रपंच सुखाचा करणे हाच खरा परमार्थ, आणि ज्याची वृत्ती सुधारून भगवंताकडे लागली त्यालाच खरा परमार्थ कळला.

१७७. भगवंतावर अकारण प्रेम करणे याचे नाव परमार्थ.

24 Jun 2017

ज्ञान हे दुहेरी शस्त्र आहे.

लोककल्याणाच्या तळमळीने जो ग्रंथ लिहितो तो खरा ग्रंथकार होय; वाचनात आलेले आचरणात आणून जो लोकांना सांगतो तो खरा वक्ता होय; आणि सांगितलेले आचरणात आणतो तोच खरा श्रोता आणि साधक होय. अलीकडे ज्ञानप्रसाराची अनेक साधने उपलब्ध झाली आहेत.त्यामुळे नको त्या ज्ञानाचाही विस्तार झपाट्याने होतो आहे. ज्ञान हे एक प्रकारचे दुहेरी शस्त्र आहे. कोणत्याही ज्ञानाचा बरावाईट उपयोग, तो करणार्‍यावर अवलंबून असतो. ज्ञान हे मुळात पवित्र आहे. जे ज्ञान नीति आणि धर्म यांच्या पायावर उभे असते ते जास्त प्रभावी ठरते. सर्वांचे एकमेकांवर प्रेम वाढेल आणि सर्वजण एकत्र येतील असे ज्ञान असावे. श्रीमंत-गरीब, विद्वान-अशिक्षित, लहान-थोर, स्त्री-पुरुष या सर्वांना एकमेकांबद्दल प्रेम, आदर आणि आपुलकी वाढेल, असे ज्ञान व्यक्त झाले पाहिजे. द्वेष-मत्सर वाढवील, नीतिधर्माला फाटा देईल, असे ज्ञान पुस्तकात नसावे. विद्वान शास्त्रज्ञ नवीन शोध लावून जगाला स्वार्थी आणि लोभी बनवितात, आणि त्यामुळे सर्वनाश होतो. जे ज्ञान समाधान देत नाही ते खरे ज्ञान नव्हे. जगाचे खरे स्वरूप ज्याने कळते ते खरे ज्ञान होय.

देहासंबंधी जे ज्ञान ते व्यावहारिक ज्ञान जे असे आहे तसे ओळखणे हे तत्त्वज्ञान. मी देहाला 'माझा' म्हणतो, अर्थात मी देह नव्हे. 'माझे घर' म्हणणारा 'मी', घराहून वेगळा ठरलो ! जडत्व म्हणजे काय ? देहाच्या ठिकाणी ममत्व हे जडत्व. पदार्थाचे यथार्थ ज्ञान ज्याला आहे तो शहाणा. व्यवहाराचे गूढ ज्याला कळते तो प्रपंची; जगाचे गूढ ज्याला कळते तो तत्त्वज्ञानी. सूक्ष्माचे ज्ञान होणे यात सुख आहे. आत्मा हा समुद्र आहे, तर जीव हा त्याचा अगदी लहान थेंब आहे. त्याची ओळख होऊन आत्म्याशी समरस होणे हेच खरे तत्त्वज्ञान आहे. 'ब्रह्म सत्यं, जगन्मिथ्या' अशा ज्ञानाच्या गोष्टी कळायला कठीण असल्या, तरी अभ्यासाने दीर्घ काळानंतर कळतील; पण नामाचे महत्त्व कळणार नाही; ते एक संतकृपेनेच कळते. नामावर विश्वास ठेवून अखंड नाम घ्यावे; त्यानेच समाधान लाभेल.

ज्या ग्रंथाच्या श्रवणाने भगवंताविषयी प्रेम उत्पन्न होते; ज्याच्या योगाने विरक्ति उत्पन्न होते, अनीतिचे वर्तन टाकून नीतिमार्ग, धर्ममार्ग याचा अवलंब करावासा वाटतो, तो सद्‍ग्रंथ; उदाहरणार्थ, ज्ञानेश्वरी, दासबोध, नाथभागवत, हे ग्रंथ वाचून सदोदित त्यांचे मनन करणे, हेच फार जरूरीचे आहे. त्याने ईश्वरप्रेम उत्पन्न होते.

१७६. अत्यंत कठीण प्रमेये असलेले जगातले ग्रंथ वाचावेत,
पण शेवटी अत्यंत सोप्यातले सोपे असे नामच घ्यावे. 

23 Jun 2017

हेतू शुद्ध ठेवावा.

मनुष्याने शुद्ध हेतू ठेवण्याचा प्रयत्‍न करावा. हेतू शुद्ध असला की स्वाभाविकच कृती त्याला अनुरुप होऊ लागते आणि प्रगतीला मदत होते. हेतू हा विहिरीत असणार्‍या झर्‍याप्रमाणे आहे. झरा गोड पाण्याचा असला म्हणजे विहिरीचे पाणी स्वाभाविकच गोड असते. म्हणुन हेतू शुद्ध ठेवण्याची दक्षता घ्यावी, आणि त्याकरिता रामाची प्रार्थना करावी. माणसाला देहरक्षणापुरते अन्न, वस्त्र आणि नाम घेण्याची बुद्धी असली की असमाधानाला जागा नाही. 'नको दैन्यवाणे जिणे भक्ति उणे' हेच रामराया जवळ मागावे. पर्वकाळात भगवंत कामधेनूचा अवतार घेतो; जे ज्याला पाहिजे ते त्याला देतो. पर्वकाळात सज्जन तसेच दुर्जनही आपली कामे करून घेतात. जारण-मारण ही देखील पर्वकाळांतच शीघ्र साध्य होतात. आपण मात्र भगवंताचे कसे व्हावे हे पहावे. शुभेच्छा धरावी, भावना जागृत करावी. 'काहीही कर, पण भगवंता तुझा विसर पडू देऊ नकोस.' असे भगवंताजवळ मागावे. 'आजवर कळत नकळत जे पाप झाले असेल ते नाहीसे कर. पुढे पुनः नाही करणार,' असे म्हणावे, म्हणजे मागली पापे नष्ट होतात. ज्याला विषयाची गोडी असते त्याला नाही परमार्थाची गोडी लागत. त्यांना 'मीच काय तो शहाणा, मोठा' असा अभिमान असतो. पण त्यांच्यापेक्षा लक्षावधी शहाणे आणि श्रीमंत जगात आहेत हे ते जाणत नाहीत. ते खालच्या लोकांकडे पाहतात आणि त्यांच्याहून मी श्रेष्ठ आहे असे म्हणतात. माझे चुकते आहे एवढे कळले तरी चालेल. विषयी लोकांना 'मला कुठे दुःख आहे' असे वाटते. पण दारूप्रमाणे विषयाची धुंदी उतरली म्हणजे पश्चात्ताप होतो.

'देव आहे' असे खर्‍या अर्थाने वाटणारे जगामध्ये थोडेच असतात. सद्‌विचार, सच्छास्त्र आणि सद्‍बुद्धि हे प्रत्येक माणसाला याच जन्मात भगवंताकडे नेण्यासाठी आहेत. प्रपंचाचा अनुभव कष्टमय आहे, पण भगवंताचा अनुभव आनंदमय आहे. तापाने आजारी असलेल्या माणसाला आपल्याला घाम यावा असे वाटत असते. पण नुसत्या वाटण्याने काही तो येत नाही, त्यासाठी डॉक्टरचे औषध घ्यावे लागते. तसे, ज्याला भगवंताचे प्रेम यावे असे वाटते, त्याने नाम घेणे हेच एक औषध घ्यावे. भगवंताचे प्रेम एकदा चिकटले की त्याच्या आड दुसरे काही येत नाही.

खाणीतल्या दगडामध्ये जसे सोने असते, तसा आपल्यामध्ये परमात्मा आहे. दगडातली माती अनेक चाळण्यांनी आणि यंत्रांनी काढून टाकतात आणि नंतर सोने हाती लागते, त्याचप्रमाणे अनेक वासना नष्ट झाल्यानंतर परमात्मा आपल्या हाती लागतो. आपण 'मी' पणाने मेल्यानंतर शेवटी परमात्मा प्रकट होतो.

१७५. शुद्ध असावे आचरणतसेच असावे अंतःकरण । 
त्यात भगवंताचे स्मरणहेच प्रपंच सुखी करण्याचे साधन ॥ 

सुख त्यागात आहे, भोगात नाही.

अमुक हवे असे वाटले आणि ते मिळाले नाही, म्हणजे दुःख होते. अमुक हवे असे वाटूच देऊ नये. परमात्मा ठेवील त्यात समाधान मानावे. याचेच नाव वैराग्य. आपण विषयांत बुडतो आहोत, आणि पुनः विषयाचीच कास धरली तर आपण अधिकाधिक नाही का बुडणार ? विषयाची आस धरणे म्हणजे त्याचे दास होण्यासारखे आहे. मनुष्य सुखाकरता धडपड करतो, आणि अंती दुःखमय अशा विषयाची आशा करतो. सुख त्यागात आहे, भोगात नाही, हे पुष्कळांना पटत नाही.

परिसाला लोखंड लागले म्हणजे त्याचे सोने होते, पण रुप्याचे काही सोने होत नाही. तसे आपण दीनाहून दीन म्हणजे अभिमानरहित झाले पाहिजे. आणि असे झाले म्हणजेच परमात्म्याला अनन्य शरण जाता येईल. हे व्हायला त्याची कृपाच पाहिजे, आणि ती नित्य भाकावी. एखाद्या गोष्टीने आपले मन अस्वस्थ होते ते का बरे ? त्या गोष्टीला आपण सत्यत्व देतो म्हणून. हा सर्व खेळ आहे, हे मिथ्या आहे, असे जाणून, ज्याप्रमाणे नट नाटकातली आपली भूमिका अगदी खर्‍यासारखी करतो, त्याप्रमाणे व्यवहार करावा. सुख, समाधान, सत्यात असते, मिथ्यात नसते. आजपर्यंत आपण विषय उपभोगले पण त्यात आपल्याला सुख झाले नाही; मग विषय मिथ्या आहेत याची भगवंताने तुम्हाला प्रचीती नाही का दिली ? तरीसुद्धा तुम्ही या विषयांतच प्रपंच कसा सुधारेल असे मला विचारता, याला काय म्हणावे ? जे दुःखमयच आहे त्यात सुख कुठून मिळणार ? दोन लहान मुली भातुकली खेळल्या; जी मुलगी गरीब होती तिने पोळ्या आणि गुळांबा केला, पण जी श्रीमंत होती तिने मात्र श्रीखंड आणि बासुंदी केली. पहिलीचा गुळांबा जितका पोट भरण्याला उपयोगी नाही, तितकेच दुसरीचे श्रीखंडही उपयोगी नाही. तसे प्रपंचाचे खरेपण आहे. प्रपंच असण्यासाठी बायको आणि मुले यांची गरज आहेच असे नाही; जो दुसर्‍यावर अवलंबून असतो तो प्रपंचीच असतो. म्हणून एकटा असला तरी प्रपंचीच असतो. दुसर्‍यापासून सुख मिळविण्याचा प्रयत्‍न करणारा मनुष्य हा प्रपंची होय. पाचजण मिळून प्रपंच बनतो. त्यामध्ये प्रत्येकजण स्वार्थी असतो. मग सर्व सुख एकट्यालाच मिळणे कसे शक्य आहे ?

प्रपंचामध्ये अनेक वस्तू आहेत, पण भगवंताजवळ एकच वस्तू आहे. प्रपंचामध्ये कितीही वस्तू आणल्या तरी पुर्‍या पडत नाहीत, कारण एका वस्तूच्या आणण्यामध्येच दुसर्‍या वस्तूच्या आणण्याचे बीज आहे. पण भगवंताचे तसे नाही. भगवंताची वस्तू एकदा आणली की पुनः ती आणायला नको.

१७४. 'अमुक एक वस्तू आहे म्हणून मी सुखी आहे' 
या वृत्तीत राम नसून, काही नसताना वृत्तीचे समाधान टिकले पाहिजे.