Showing posts with label मार्च. Show all posts
Showing posts with label मार्च. Show all posts

31 Mar 2017

स्वतःला सुधारा की त्या मानाने जग सुधारेलच.

'आपणच काय ते सर्व करणारे' अशी भावना आपण ठेवतो, आणि पुढे दुःख वाट्याला आले म्हणजे वाईट वाटून घेतो. ज्याचे फळ आपल्या हाती नसते ते कर्म 'मी' केले असे म्हणण्यात काय पुरूषार्थ आहे ? 'मी भगवंताचे कृत्य भगवंताला अर्पण करतो' असे म्हणतो, याचासुद्धा अभिमान आपल्याला होतो. जगात सात्विक वृत्तीने वागणारे पुष्कळ असतात, पण 'मी करतो' हा अभिमान त्यांचाही सुटत नाही. खरोखर, नुसत्या कर्माने परमार्थ साधत नाही; 'कर्ता मी नाही' हे समजले म्हणजे सर्व साधते. नसलेले कर्तेपण आपल्याकडे ओढून घेऊन माणूस सुखी किंवा दुःखी होतो. ज्याच्याकडे कर्तेपण आहे त्याला ते देऊन आपण सुखदुःखातीत राहावे.

खोलीतल्या खोलीत जो सुख मानून घेतो तो कैदी खरा सुखात असेल असे आपल्याला वाटते. देहाच्या पलीकडे काही नाही असे मानू लागलो आणि विषयातच सुख पाहू लागलो, तर ते त्या कैद्याप्रमाणेच नाही का ? पण त्याच्यापलीकडे काही आहे हे त्याला समजले नाही तोपर्यंतच हे सुख वाटेल. एकदा का बाहेरची हवा कैद्याला लागली म्हणजे तो नाही म्हणणार कैदीपणाच चांगला म्हणून ! त्याचप्रमाणे एकदा भगवंताच्या आनंदाची हवा कैद्याला लागली म्हणजे माणूस नाही विषयात राहणार. चित्त आपल्याला निर्विषय करता येणार नाही, पण ते भगवंताकडे लावता येणार नाही असे नाही. बुजार घोडयाला जसे चुचकारून घेतात, तसे मनाला करावे. वृत्ती जिथे पालटायला लागते तिथे सावध राहावे. भगवंताचे स्मरण चुकले की काही तरी अवघड वाटायला हवे. आज नको वाटणारे नामस्मरण बळजबरीने करावे, म्हणजे हवेसे वाटणारे विषय जातात. प्रापंचिक अडचणीतून जर आपण मार्ग काढतो तर मग परमार्थातल्या अडचणींना का भ्यावे ? जर आज आपल्याला विवेकाने सुखी राहता आले नाही तर आपल्याला सुख कधीच मिळणार नाही. नुसते गिरिकंदरात जाऊन कुठे परमार्थ साधत असतो का ? तसे असते तर तो माकडांनाही साधला असता ! खालच्या प्राण्यांना आपले विकार आवरण्याचा विचार नसतो. पण मनुष्याला चांगलेवाईट कळते, त्याला सारासार विचार करण्याची शक्ती आहे, ही त्याच्यावर भगवंताची कृपाच आहे. जग सुधारण्याच्या नादी आपण लागू नये; त्या कामासाठी लोक जन्माला यावे लागतात. अगदी आपला मुलगा जरी झाला तरी त्याला योग्य ते सांगून पाहावे, पण 'मी त्याला सुधारीनच' हा भ्रम नसावा. स्वतःला सुधारा की त्या मानाने जग सुधारेलच.

९१. कर्तव्य म्हणून वकील जसा भांडतो, त्याप्रमाणे कर्तव्य म्हणून 
प्रामाणिकपणे आपण प्रपंच करावा. त्यामध्ये भगवंताला विसरू नये. 

30 Mar 2017

ज्या घरात शांति । त्या घरात भगवंताची वस्ती ॥

गृहस्थाश्रमासारखा आश्रम । दुसरा नाही खास ॥

नीतिधर्माचे रक्षण । यासाठीच विवाहाचे कारण ॥

ज्या घरात राहते शांति । त्या घरात भगवंताची वस्ती ॥

कृतीवर मनुष्याची परीक्षा । जैसी वासावर पदार्थाची परीक्षा ॥

कोणाचा न करावा घात । ऐसे वागावे जगात ।

आपण आपले करून घ्यावे हित । त्यालाच म्हणतात संभावित ॥

न कधी व्हावे आपण निराश । व्यवहार हात देईल खास ॥

व्यवहारातील करावा प्रयत्‍न । प्रपंचात न पडू द्यावे न्यून ॥

रोगाची भीति । न ठेवावी चित्ती ।

रोगाला उपचार करावे जरी बहुत । तरी कष्टी न होऊ द्यावे चित्त ॥

आप्त इष्ट सखे सज्जन । यांचे राखावे समाधान । परि न व्हावे त्यांचे अधीन ॥

सर्वांशी राहावे प्रेमाने । चित्त दुश्चित न व्हावे कशाने ॥

आपलेपणा ठेवला जेथे । प्रेम लागत असे तेथे ॥

ज्या घरात स्वार्थाचे मान बळावले । तेथे समाधानाचे मान कमी झाले ॥

मन राखता आले । तरच प्रत्येकाला सुख लागले ॥

सुखाने नांदावे नवराबायकोंनी । राम आणावा ध्यानी ॥

दोघांनी रहावे प्रेमाने । सदा वागावे आनंदाने ॥

एकमेकांनी दुसऱ्यास दुःख होईल असे न करावे । काळजी वाटेल असे न वागावे ॥

घरांतील माणूस मार्गाने चुकले । त्यास प्रायश्चित्त हवे खरे ।

पण ते नसावे जन्माचे । तेवढयापुरते असावे साचे ॥

एखाद्याचे हातून करू नये असे कर्म झाले ।

तरी त्याला सुधारण्याच्या मार्गाने सर्वांनी वागावे ॥

आचरण शुद्ध असावे । एकपत्‍नीव्रत सांभाळावे ।

प्राण गेला तरी परद्वार करू नये ॥

कोणतेही व्यसन करू नये । नीच संगत धरू नये ॥

भलते काम करू नये । गृहछिद्र कोणा सांगू नये ।

आपला बोज आपण घालवू नये । विश्वासघात कोणाचा करू नये ॥

परदुःखे हसू नये । देहदुःखे त्रासू नये । केला उपकार बोलूं नये ॥

मुलाबाळांस सांभाळून राहावे । प्रपंचात कधी उदास न व्हावे ॥

प्रेमाने वागावे सर्वांशी । सुख राहे निःस्वार्थापाशी ॥

आईवडिलांची आज्ञा पाळावी । चांगल्यांची संगत धरावी ॥

अभ्यासांत लक्ष ठेवून राहावे । भगवंताचे नामस्मरण करावे ॥

नामापरते न माना दुजे साधन । जैसे पतिव्रतेस प्रमाण ॥

नामापरते न मानावे सत्य । ज्याने राम होईल अंकित ॥

हेच साधुसंतांचे बोल । कोणीही न मानावे फोल ॥

९०. कोणतेही काम करीत असता राखावी मनाची शांति ॥

29 Mar 2017

प्रपंचात आपण साक्षित्वाने वागावे.

सत्य वस्तू ओळखणे हा परमार्थ, आणि असत्य वस्तूला सत्य मानून चालणे हा प्रपंच होय. आपल्याला वस्तू दिसते ती खरी असेलच असे नाही. पण ती मुळीच नाही असे मात्र नाही; ती काहीतरी आहे. एका दृष्टीने सत्य वस्तू अशी आहे की, प्रत्येकजण जे गुण त्या वस्तूला लावतो ते सर्व गुण तिच्या ठिकाणी आहेतच, शिवाय आणखी कितीतरी गुण तिच्या ठिकाणी आहेत; म्हणून ती निर्गुण आहे. दुसऱ्या दृष्टीने ती अशी आहे की, प्रत्येकजण जो गुण तिला लावतो तो कल्पनेनेच तिच्या ठिकाणी आहे असे आपण म्हणतो; म्हणून ती वस्तू गुणांच्या पलीकडे आहे. या अर्थानेसुद्धा ती निर्गुणच आहे. जशी आपल्या देहाची रचना, तशीच सर्व सृष्टीची रचना आहे. देहामधले पंचकोश सृष्टीमध्ये देखील आहेत. फरक एवढाच की, देहामध्ये ते मूर्त आहेत तर सृष्टीमध्ये ते अमूर्त स्वरूपात आहेत. भगवंताला एकट्याला करमेना म्हणून तो एकाचा अनेक झाला. त्याचा हा गुण माणसाने घेतला. आपण हौसेसाठी आपला व्याप वाढवितो. पण फरक हा की, भगवंताने व्याप वाढविला तरी त्यामध्ये तो साक्षित्वाने राहिला, आणि आपण मात्र व्यापामध्ये सापडलो. भगवंत सुखदुःखाच्या पलीकडे राहिला, आणि आपण मात्र दुःखामध्ये राहिलो. व्यापाच्या म्हणजे परिस्थितीच्या बाहेर जो राहील त्याला दुःख होणार नाही. खरे पाहिले तर व्यापातून वेगळेपणाने राहण्यासाठीच सर्व धडपड आहे. व्याप दुःखदायक न व्हावा असे वाटत असेल तर आपण साक्षित्वाने राहायला शिकले पाहिजे.

आपण जगामध्ये व्याप वाढवितो, तो आनंदासाठी वाढवितो. पण भगवंताच्या व्यतिरिक्त असणारा आनंद हा कारणावर अवलंबून असल्याने ती कारणे नाहीशी झाली की तो आनंद मावळतो. यासाठी तो आनंद अशाश्वत होय. म्हणून खरा आनंद कोठे मिळतो ते पाहावे.

जगणे म्हणजे शरीरात चैतन्य असणे होय. चैतन्य हे केवळ सच्चिदानंदात्मक आहे. म्हणून, जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत स्वाभाविक आनंद असलाच पाहिजे. हा आनंद आपण भोगावा. ब्रह्मानंद आणि सुषुप्ती यांमध्ये फरक आहे. ब्रह्मानंद हा आहेपणाने आहे, तर सुषुप्तीचा आनंद हा नाहीपणाने आहे. आपल्याला झोप लागली की काय 'जाते' आणि जागे झालो की काय 'येते' हे नित्याचे असूनसुद्धा आपल्याला कळत नाही. भगवंताच्या इच्छेने सर्व होते आणि तोच सर्व करतो अशी भावना ठेवणे यासारखे समाधान नाही. कृतीमध्ये आनंद आहे, फळात किंवा फळाच्या आशेत तो नाही. नामस्मरणरूपी कृती केली असता शाश्वत आनंदाचा सहज लाभ होईल.

८९. भगवंताच्या स्मरणात कर्तव्य केले की जीवनात आनंद उत्पन्न होतो.

28 Mar 2017

भगवंताची स्मृति आणि कर्तव्याची जागृति.

प्रत्येक मनुष्य बोलताना 'मी' आणि 'माझे' अशा भाषेत बोलत असतो; म्हणजे प्रत्येक व्यक्तीला ह्या दोन्ही बाबतींत काही कर्तव्ये असतात. 'माझे' या शब्दात शरीर आणि तत्संबंधी सर्व गोष्टी येतात. आयुष्यात 'मी' चे कर्तव्य परमेश्वरप्राप्ती हे आहे; आणि देहाचे कर्तव्य देहाशी संबंधित असलेल्या प्रत्येक व्यक्तीबद्दलचे असते. देहाच्या कर्तव्यात धर्म, शास्त्र आणि नीति यांना धरून, संबंधित व्यक्तीशी करण्याच्या आचरणाचा समावेश होतो; म्हणजेच, ज्याच्याशी जसा आपला संबंध असेल त्याप्रमाणे त्याच्या बाबतीत आपले कर्तव्य चोख पार पाडणे. 'कर्तव्य' याचा अर्थ मोबदल्याची अपेक्षा न ठेवता ज्या ज्या बाबतीत जे करणे योग्य असेल ते करणे, असा आहे. मनुष्याने 'मी' आणि देह या दोहोंच्या बाबतींतली कर्तव्ये समान चालीने करीत राहिले पाहिजे. 'मी' चे कर्तव्य करीन पण देहाने कसाही वागेन, असे म्हणून चालणार नाही. याचे कारण असे आहे की, समजा, एखादा मनुष्य नोकरी करीत आहे; तो ती नोकरी कशाकरिता करतो याचा विचार केला तर असे दिसते की, ती नोकरी करायला दुसरे कोणी नव्हते म्हणून तो ती नोकरी करीत नसतो, तर त्या नोकरीतून मिळणारा पैसा कुटुंबरक्षणाकरिता उपयोगी पडेल म्हणून तो ती नोकरी करीत असतो. समजा, त्याने नोकरी केली पण मिळणारा पैसा घरात दिला नाही, तर त्या नोकरीचा काही उपयोग नाही. तसे, 'मी' चे कर्तव्य, म्हणजे भगवंताचे अनुसंधान केले, पण देहाचे कर्तव्य, म्हणजे सदाचरण आणि संबंधित व्यक्तीशी असलेली कर्तव्ये न केली, तर नोकरी करून पैसे घरी न दिल्यासारखे होईल. म्हणून प्रत्येक व्यक्तीने भगवंताची स्मृती आणि कर्तव्याची जागृती ठेवावी; आणि या दृष्टीने आपले कुठे चुकते आहे याचा शोध दर वाढदिवसाच्या निमित्ताने घेऊन, प्रत्येकाने आपली उन्नति करून घ्यावी. जेवताना भोवती उदबत्तीचा सुंदर वास आणि तोंडात गोड घास जसा असावा, त्याप्रमाणे आपण बाहेर गोड बोलावे आणि आत भगवंताचे गोड नाम घ्यावे; म्हणजेच, आपण आतबाहेर गोड असावे.

ज्याप्रमाणे एखादा गवई पुष्कळ ताना मारतो, पण शेवटी समेवर येतो, त्याचप्रमाणे भगवंताजवळ लक्ष ठेवून मग आपण काहीही केले तरी हरकत नाही. समेला विसरून मात्र उपयोग नाही. इथे तबला वाजविणारा भगवंतच आहे; म्हणून त्याचा ठेका बरोबर चालतो. ठेक्याप्रमाणे, म्हणजे भगवंताच्या ठेक्याला अनुसरून, म्हणजेच त्याच्या स्मरणात, जो गवई गाईल तो बरोबर मार्गावर राहील आणि शेवटी समेवर येईल.

८८. फळाची अपेक्षा सोडून कर्म करणे याचे नाव कर्तव्य होय.

27 Mar 2017

प्रपंचातले सुखदुःख हे केवळ जाणिवेत आहे.

प्रापंचिकाच्या मनात नेहमी एक शंका येते की, खोटे करूनसुद्धा जर सुखी होता येते तर तसे करायला काय हरकत आहे ? सन्मार्गाने गेला तरी माणूस दुःखी का होतो, अशीही शंका आपल्याला येते. मी देवाला भिऊन वागलो, का, तर प्रपंच सुखाचा व्हावा म्हणून. देवाची एवढी खटपट करूनही जर सुखी होता येत नाही तर काय उपयोग ? किती विचित्र आहे पाहा, खेळातले घर बांधायला आपण गवंडी बोलावण्यासारखा हा प्रकार आहे ! प्रपंचात दक्षता ठेवणे जरूर आहे; ते जर आपण केले नाही तर देवाने काय करावे ? भगवंताचा 'साधन' म्हणून आपण उपयोग करतो, आणि शेवटी साधनालाच दोष देतो, साध्य बाजूलाच राहते. भगवंत विषय देईल, पण त्याबरोबर त्याचे दुःखही देईल. एकजण मारूतिरायाला सांगून चोरी करीत असे. तो एकदा पकडला गेला आणि त्याला शिक्षाही झाली; तेव्हा तीही मारूतीच्या संमतीनेच झाली असे नाही का ?

'मी कोण' हे जोवर आपण ओळखत नाही तोवर, वैभवाच्या शिखरावर जरी गेलो तरी आपल्याला समाधान मिळणार नाही. ज्याच्यापासून प्रपंच झाला, त्याला ओळखता आले पाहिजे. देहच सत्य नाही तर त्यावर उभारलेली इमारत कुठून सत्य असणार? ठिगळे लावून आपण प्रपंच करतो; मग त्यात कमतरता आल्याशिवाय नाही राहात ! कोळसा उगाळून पांढरा रंग मिळेल हे म्हणणे जसे वेडेपणाचे आहे, तसे प्रपंचात सुख मिळवीन हे म्हणणे आहे. सुखदुःख हे जाणिवेत आहे. आपल्याला मिळायचे तेवढेच मिळते, पण आपले हवेनकोपण, म्हणजे आपली वासना गेली की सुखदुःख राहात नाही. वासना मारायला, भगवंताचे अधिष्ठान हाच एक उपाय आहे. वासना ही लाडावलेल्या श्वानाप्रमाणे आहे, त्याला नुसते हड्‌हड्‌ करून ते बाजूला जात नाही. पण तेही बरोबरच आहे, कारण आपणच त्याला लाडावून ठेवले आहे, म्हणून भगवंताच्या पूजेच्या वेळीसुद्धा ते देवघरात येते. बरे, चांगली वासना तेवढीच आत येऊ द्यावी असे म्हणावे, तर तिच्याबरोबर वाईट वासनाही हळूच आत येते. शिवाय, वाईट वासनेमध्ये चांगल्या वासनेला मारण्याचे बळ आहे, कारण आपण स्वतः वाईट वासनेच्या बाजूचेच आहोत ! वासना ही कोणत्याही उपायांनी तृप्त होण्यासारखी नसून, आपण जर भगवंताजवळ 'वास' ठेवला तरच ती नष्ट होते. 'मी कर्ता नसून परमात्मा कर्ता आहे' अशी भावना झाल्याशिवाय मन भगवंताला अर्पण होणार नाही; ते अर्पण झाल्याशिवाय फळाची अपेक्षा सुटणार नाही; आणि फळाची अपेक्षा सुटल्याशिवाय जीवाला शांती मिळणार नाही.

८७. वासना म्हणजे देवाच्या विरूद्ध असलेली आपली इच्छा.

26 Mar 2017

प्रपंचातले विषयसुख हे खरे सुख नाही.

मनुष्य जगात कितीही मोठा असला तरी त्याच्या प्रपंचात काहीतरी न्यून असतेच. न्यूनता नाही असा प्रपंचच नाही. एखादा प्रापंचिक 'माझा प्रपंच पूर्ण आहे ' म्हणून सांगणारा भेटेल, परंतु 'चालले आहे असेच चालावे, यात कमी तर नाही ना कधी पडणार?' अशी त्याला काळजी असतेच; म्हणजे त्याला खरे सुख असे नसतेच. एखादा अत्यंत विषयी, त्याला कदाचित् काळजी नसेल. दारूच्या धुंदीत असणाऱ्याला राजाचीही पर्वा नसते, वस्त्राचीही शुद्ध नसते, आणि तो आपल्याच धुंदीत, आनंदात असतो; पण हे सर्व त्याची धुंदी उतरली नाही तोपर्यंतच. विषयातले सुख परावलंबी, विषयांवर अवलंबून असते. विषय हे नश्वर, आपल्यापासून कधी तरी जाणार; निदान आपल्याला तरी त्यांच्यापासून एक दिवस जावे लागणार. दुसरी गोष्ट म्हणजे, विषयाचे सुख इंद्रियाधीन असते. इंद्रिये विकल झाली म्हणजे सुख कसे मिळणार ? उद्या आपण मरणार हे समजले की कोणते विषय आपल्याला सुख देतील ? सारांश, विषयात सुख नाही. जे सुख होतेसे वाटते ते आपल्यातच असते, आणि ते विषयापासून मिळते अशी आपली फसवणूक मात्र होते.

तर मग सुख कशात आहे ? पुष्कळ वस्तू पुष्कळ मिळाल्या तर पुष्कळ सुख मिळते हा भ्रम आहे. खरे किंवा पुष्कळ सुख म्हणजे कायमचे, सनातन सुख होय. ते सनातन वस्तूपाशीच, म्हणजे भगवंतापाशीच असते. आपल्याप्रमाणे पशूंनाही विषयसुख आहे; त्यांच्यात आणि आपल्यात फरक तो कोणता ? मी कोण, कशासाठी आलो, असा विचार करणे याला सारासार विचार म्हणतात. प्रपंचातही आपण विचार करतोच; कशात आपला फायदा आहे, कशात आपला तोटा आहे, हे बघतो. पण सर्वच असार, त्यात सार ते कुठुन, कसे येणार ? असलेल्या परिस्थितीत आपण समाधान मानीत नाही. त्याहून अधिक सुखाच्या स्थितीची इच्छा धरतो. देवाची भक्ति करणे, संतांकडे जाणे, हे सुद्धा विषय मिळविण्याकरिता आपण करतो; मग ही आपली सेवा, भक्ति विषयांची झाली का संतांची ? देव, संत, यांचा उपयोग इतर गोष्टींप्रमाणे विषय मिळविण्याचे साधन म्हणून नाही का आपण करीत ? मांजर आडवे गेले की, आपले काम होणार नाही, ही भगवंताची सूचना आहे, असे समजून आपण परततो; पण एक बायको मेली की दुसरी करण्याच्या विचाराला लागतो ! सारांश, आपले ध्येयच विषय हे असते, आणि ते मिळविण्याची आपली खटपट असते. खरोखर, जो मनुष्य प्रपंचातला आपला अनुभव जमेस धरीत नाही, तो कशानेच शहाणा होत नाही.

८६. प्रपंचात सुखी होणे म्हणजे भगवंताचे होणे होय.

25 Mar 2017

प्रपंच केवळ कर्तव्यकर्म म्हणून करा.

एका माणसाला विडी ओढण्याचे फार व्यसन होते. तो आजारी पडल्यावर त्याने डॉक्टरांना सांगितले, "मला तुम्ही औषध दिले तरी मी विडी सोडणार नाही." त्याचा डॉक्टर फार हुशार होता. त्याने त्याला एक गोळी देऊन, विडी ओढण्यापूर्वी ती तोंडात धरीत जा म्हणून सांगितले. त्या गोळीमुळे विडीच्या तंबाखूचे विष त्याला बाधत नसे. तसे आपण प्रपंच करताना वागले पाहिजे. प्रपंच आम्हांला सुख देईल ही आमची कल्पनाच नाहीशी झाली पाहिजे. म्हणजे प्रपंचाची हावही कमी होईल, आणि नंतर कर्तव्यापुरतेच आम्ही प्रपंचात राहू. जोपर्यंत प्रपंचाकडे आमची दृष्टी आहे तोपर्यंत आम्हाला समाधान कालत्रयीही मिळणे शक्य नाही. प्रारब्धाने प्रपंच आला आहे, तो कर्तव्यकर्म म्हणून करीत जा, पण त्यात सुख मिळणार आहे या कल्पनेने तो करू नका. प्रपंची लोकांचा स्वभाव फार विचित्र आहे; त्यांना खरे सांगितले तर ते आवडत नाही. वास्तविक आपण प्रपंचातले संबंधी लोक कामापुरते एकत्र जमलो आहोत. ज्याप्रमाणे आगगाडीत पुष्कळ प्रवासी एकत्र जमतात, त्याप्रमाणे प्रपंचात आपण एकत्र जमतो. पाचजण मिळून प्रपंच बनतो. त्यामध्ये प्रत्येकजण स्वार्थी असतो. मग सुख एकट्यालाच मिळणे कसे शक्य आहे ? नुसता प्रपंच तापदायक नाहीं, आकुंचित प्रपंच तापदायक आहे.

आपले खरे समाधान भगवंताजवळ आहे ही खूणगाठ पक्की बांधून प्रपंचात वागा. ज्याप्रमाणे व्यापारात नफा व्हावा म्हणून व्यापार करतात, तो होत नसेल तर व्यापारात काहीच तथ्य नाही, तसेच प्रपंचात समाधान हा नफा आहे; तो जर मिळत नसेल तर प्रपंचाचा लोभ धरण्यात काय फायदा आहे? "तुझ्या असमाधानाचे कारण नक्की सांग," असे जर आपण एखाद्याला विचारले, तर त्याला खात्रीलायक कारण सांगता येणार नाही. याचा अर्थ असा की, तत्त्वदृष्टया समाधान व्हायला खरोखरीच कशाची जरूरी नाही; पण ही गोष्ट कुणाला पटत नाही. आहे त्या अवस्थेमध्ये आपले समाधान टिकत नाही, आणि पाहिजे ती वस्तू मिळाली तरी आपण पूर्ण सुखी होत नाही. कैदेतल्या माणसाला 'मी सुखी आहे' असे वाटणे कधी शक्य आहे का ? तशी प्रपंची माणसाची अवस्था आहे. खरोखर, प्रपंचात समाधान, आनंद, मिळत नाही हे अगदी सर्वांना कळते; परंतु शहरातले लोक केवळ अभिमानामुळे, आणि खेडयातले लोक अज्ञानामुळे, जसे वागायला पाहिजे तसे वागत नाहीत. या प्रपंचात राहूनसुद्धा भगवंताचे प्रेम आणि समाधान आम्हांला कसे मिळविता येईल, याचा आपण आधी विचार करायला पाहिजे. नामाच्या सहवासात राहिल्याने देहावरचे प्रेम आपोआप नष्ट होईल, आणि मग देहाने मांडलेल्या प्रपंचावरचेही प्रेम कमी होईल, आणि पुढे त्याला सर्वत्र परमेश्वरच दिसेल.

८५. प्रपंच सुखाचा करणे याचेच नाव परमार्थ होय.

24 Mar 2017

प्रपंच हा परमार्थाला साधन म्हणून वापरावा.

आपले खरे समाधान भगवंताजवळ आहे, आणि ते मिळण्यासाठी भगवंताचे प्रेम आम्हांला लागणे जरूर आहे. ते प्रेम आपल्याला कसे मिळेल याचा आपण विचार करू. वास्तविक, आईचे तिच्या मुलावरचे प्रेम स्वाभाविक असते, तिला मुलावर प्रेम कर म्हणून शिकविण्याची जरूरी नसते; त्याप्रमाणे भगवंतावर आपले प्रेम असणे जरूर आहे. मनुष्यजन्म हा भगवंताच्या प्राप्तीसाठी आहे. ईश्वराने एवढी सृष्टी निर्माण केली, पण मनुष्यदेह निर्माण केल्यावर त्याला फार आनंद झाला. त्याला वाटले, खरोखर या योनीमध्ये जन्म घेणाऱ्याला माझे प्रेम मिळविता येऊन मला ओळखता येईल. असे असताना मनुष्यप्राण्याला भगवंताचे प्रेम स्वाभाविक का बरे असू नये ? मनुष्यप्राणी हा नेहमी आनंदासाठी धडपडत असतो; मग या धडपडीतून भगवंताचे प्रेम त्याला का बरे येऊ नये ? मला वाटते, ज्या ध्येयासाठी आपण ते ध्येय ठरविताना आम्ही चुकत असलो पाहिजे खास. आमचे ध्येय असे असले पाहिजे की, त्यातून आम्हांला शाश्वत आनंद मिळविता आला पाहिजे. तो आनंद जर एवढया कष्टाने, मेहनतीनेसुद्धा आम्हांला मिळत नसेल, तर आमचे ध्येयच चुकले असे म्हणायला कोणती अडचण आहे ? तुम्ही सांगा. आज प्रपंच आम्हांला हवासा वाटतो, प्रपंचातल्या नाना तऱ्हेच्या गोष्टी आम्हांला सुख देतील असे वाटत असते, आणि त्या मिळविण्यासाठी आम्ही अहर्निश झटत असतो. वस्तूसाठी चाललेली आमची धडपड ही खरे पाहता त्या वस्तूसाठी नसून, त्यातून मला आनंद मिळेल या कल्पनेने, त्या आनंदासाठी, आम्हांला ती वस्तू हवी असते. त्या वस्तूत मला समाधान मिळेल ही कल्पना नाहीशी व्हायला पाहिजे. आज प्रपंचात मला समाधान मिळेल असे वाटते; ती माझी कल्पना नाहीशी होणे जरूर आहे. ही प्रपंचाची आस जोपर्यंत आहे तोवर भगवंताचे दास आम्हांला होता येणार नाही, आणि शाश्वत समाधान आम्हांला मिळणार नाही. "तूं जगाची आस सोडून दे, मी तुला शाश्वत आनंद देतो, " असे भगवंत आम्हांस सांगत आहे. ही जगाची आस, हे प्रपंचाचे प्रेम, आम्हांला कसे सुटेल ? प्रपंच सोडल्याशिवाय भगवंताचे प्रेम आम्हांला येणारच नाही का ? प्रपंच सोडून देण्याची आज आमची तयारी नाही. तो न सोडता भगवंताचे कसे होता येईल, ह्यासाठी संतांनी मार्ग सांगितला आहे. त्या मार्गाने आम्ही जाणे जरूर आहे. ज्याप्रमाणे आपण आपल्या या खिशातील पैसे त्या खिशामध्ये ठेवतो, त्याचप्रमाणे प्रपंचातील आपले मन आपण काढून भगवंताकडे लावावे. तसे करण्यात समाधान आहे. भगवंताला अशी प्रार्थना करावी कीं, " देवा, प्रारब्धाने आलेले भोग येऊ देत, पण तुझे अनुसंधान मात्र चुकू देऊ नकोस. "

८४. दिवा जळायला हवा असेल तर त्यामध्ये सतत तेल घातले पाहिजे, तसे भगवंताचे 
अनुसंधान सारखे राहण्यासाठी त्याचे नामस्मरण आपण सतत करीत असावे. 

23 Mar 2017

प्रपंचात भगवंताची नड आहे असे वाटले पाहिजे.

प्रत्येक माणसाला आपण सुखी असावे असे वाटते; भगवंताची कृपा आपल्यावर असावी, नामाचे प्रेम आपल्याला यावे, असे वाटते. पण हा अनुभव आपल्याला का बरे येत नाही ? जगामध्ये पाहताना कुणी मनुष्य सुखी आहे, समाधानी आहे, असे आपल्याला का बरे दिसत नाही ? अशी अवस्था असायला काय कारण असावे ? आपण सर्वजण सदाचाराने वागतो असे आपल्याला वाटते. भगवंताचे भजनपूजन आपण सर्वजण करतो, पण तरी ते समाधान आपल्याला का बरे मिळत नाही ? ते समाधान न मिळायला खरे कारण कोणते असेल तर, आम्हांला अजून भगवंताची नड आहे असे वाटत नाही. भगवंत नसेल तर माझे चालणार नाही, माझ्या समाधानाला त्याची अत्यंत गरज आहे, असे आपल्याला मनापासून वाटतच नाही. प्रपंचात पैसाअडका असावा, बायकोमुले असावीत, शेतीवाडी, नोकरीधंदा, इतर वैभव असावे, आणि त्याचबरोबर भगवंतही असावा, असे आपल्याला वाटते. प्रपंचाची स्थिती कशीही असो, मला भगवंत हवाच, असे आम्हांला तळमळीने मनापासून वाटत नाही. आज, प्रपंचात आम्हांला समाधान मिळेल या आशेने आम्ही प्रपंच करतो, पण इतका प्रपंच करूनही आम्हांला समाधान किती मिळाले याचा तुम्ही विचार करा. अगदी दूर, एका डोंगरावर जाऊन बसा, आणि लहानपणापासून आतापर्यंत केलेल्या खटाटोपात समाधान किती मिळाले याचा आढावा घ्या, आणि निश्चयाने ठरवा की प्रपंचात मला किती सुख मिळाले. आज इतकी वर्षे प्रपंच करूनही तो आम्हांला सुख देत नाही, हे अनुभवाला येऊनसुद्धा तो टाकावा असे आम्हांला वाटत नाही. प्रपंचात आम्हांला सुख मिळेल ही आमची कल्पनाच नाहीशी व्हायला पाहिजे. प्रपंच आम्हांला शाश्वत समाधान देऊ शकत नाही हे एकदा निश्चयाने ठरले, आणि हा निश्चय एकदा दृढ झाला, म्हणजे मग भगवंताची गरज आम्हांला भासू लागेल, आणि मग त्याच्या प्राप्तीसाठी आम्ही केलेल्या प्रयत्‍नाच्या आड जग, परिस्थिती, वगैरे काहीही येऊ शकाणार नाही. भगवंत मला पाहिजेच हे विचाराने ठरल्यावर, त्याचे प्रेम आम्हांला यावे असे आपल्याला वाटू लागेल, आणि त्याचीच आपल्याला आज खरी गरज आहे. हे भगवंताचे प्रेम कशाने बरे निर्माण करता येईल ? भगवंताचे प्रेम यायला एकंदर तीन मार्ग आहेत : पहिला मार्ग म्हणजे संतांची संगती करणे; दुसरा मार्ग म्हणजे सद्विचाराची जोपासना करणे; आणि तिसरा मार्ग म्हणजे अखंड नामस्मरण करणे. त्यांपैकी ज्याला जो जुळेल तो त्याने करावा.

८३. भगवंत हवासा वाटणे यामध्ये सर्व मर्म आहे.