Showing posts with label अमृतधारा 601 TO 900. Show all posts
Showing posts with label अमृतधारा 601 TO 900. Show all posts

23 May 2025

अमृतधारा 601 TO 900

 ☘🌷श्रीराम समर्थ🌷☘


अमृतधारा  ६०१


हवेनकोपणात दुःखाचे मूळ आहे. ते नाहीसे झाले की, त्याला द्वेष वगैरे नाहीत.


प्रथम अभिमान, म्हणजे मी कर्ता ही भावना टाकावी. रामकर्ता ही भावना वाढवावी.


परमात्म्याचे विस्मरण हे पाप व स्मरण होईल ते कर्म पुण्य.


"भगवंता ! आता तुझ्या कृपेविण नाही" (असे जर शेवटी वाटते ) मग आधीच कां मानू नये?


ज्यांना बाधा असते त्यांना ते मागे आहेसे वाटते. पण भगवंत मागे आहेसे वाटत नाही. भगवंताची बाधा व्हावी, तो पाठीराखा आहे असे वाटावे.


परमात्म्यापाशी लहान मुलाच्या वृत्तीने राहिले पाहिजे म्हणजे भगवंताला पान्हा येईल. त्या सहज अवस्थेत सुख आहे.


वृत्ती, वागणे, बोलणे सहज ठेवावे. हे अभ्यासाने साधते.


आशीर्वाद

🌼🍁☘

   🌷☘श्रीराम समर्थ☘🌷


अमृतधारा  ६०२


सर्व गोष्टी परमात्मा करतो असे म्हटल्यावर काळजी कशाची? काळजी करणे हे पाप आहे. कर्तव्य करणे हे पुण्य आहे.


काळजी करण्यासारखी वस्तुच जगात नाही. कारणाशिवाय उत्पत्ति असेल तर ती काळजीची आहे. काळजीला कारण असत नाही.


काळजी  चांगल्या किंवा वाईट गोष्टींची, दोन्ही वाईटच.


निष्काळजीपणाने वागणे बरे नाही व काळजी करणेही बरे नाही. म्हणून काळजी घेण्याचा मधला मार्ग साधावा.


प्रपंचाची काळजी लागली म्हणजे मी रामाच्या पायाशी आहे, हे म्हणणे खरे नाही.


प्रपंचसुद्धा सेवाबुद्धीने केला तर भगवंताकडेच नेईल. म्हणून नामाचे प्रेम मागावे.


आशीर्वाद

🌼🍁☘

   🌸☘श्रीराम समर्थ☘🌸


अमृतधारा  ६०३


आपल्याला भगवंत पाहिजे म्हटले की प्रपंच कसा झाला हे महत्वाचे वाटणार नाही. प्रपंच फक्त देहाने करता येईल. पण तो कमी जास्त झाला तरी वाईट वाटणार नाही.


मागचे, म्हणजे प्रपंचाचे सुटले आणि पुढचे, म्हणजे परमात्मा मिळाला नाही अशी अवस्था उत्पन्न झाल्यावर देवाजवळ मागणे ते खरे.


ज्याचे मागचे सुटले नाही. त्याचे मागणे खरे नाही.


मागितल्याशिवाय मिळत नाही हा व्यवहाराचा नियम आहे. पण आई आणि गुरू न मागताच देतात. म्हणून त्यांचेजवळ मागण्याची गरजच नाही.


तरीही मागितले तर त्यांना कौतुकच वाटते. आई मुलाला देणारच होती. इतक्यात त्याने भूक लागली म्हटले. तेव्हा आईला कौतुकच वाटले.


भगवंताचे होऊन राहिल्यावर मग मागणेच नाही. परमात्मा आपली श्रद्धा पाहून देतो.


आशीर्वाद

🌼🍁☘

, 🌸☘श्रीराम समर्थ☘🌸


अमृतधारा  ६०४


मी सर्व संतांच्या आधारावर व देवाला साक्ष ठेवून एकच सांगेन की, सर्वाचे सार भगवंताचे नाम हेच आहे.


भगवान श्रीकृष्ण निजधामाला जात असल्याचे वर्तमान सांगण्याकरता उद्धव गोपींच्याकडे गेला तेव्हा प्रत्येक गोपीने हेच सांगितले.


भगवंताला नामाच्या जोरावर आम्ही आपल्या हृदयात साठवला आहे. आता तो कोठेच जाऊ शकत नाही.


त्याला जिकडे जायचे असेल तिकडे जाऊ दे, पण आमच्या हृदयातून तो बाहेर कसा जातो ते आम्ही पाहतो.


म्हणून नामात सर्वांनी राहण्याचा प्रयत्न करावा आणि मग आनंदाने  प्रपंच करावा.


आपली वृत्ती गोड, नाम गोड व परमात्मा गोडात गोड आहे ही वृत्ती राखा, आनंदात राहा.


आशीर्वाद

🌼🍁☘

   ☘🌷श्रीराम समर्थ🌷☘


अमृतधारा  ६०५


जगात दोन गोष्टी आहेत, स्वार्थ आणि परमार्थ. प्रत्येकाने दोहोपैकी काही तरी साधावे. काहीही न साधता जाणे म्हणजे आयुष्य फुकट दवडणे आहे.


खरा स्वार्थ आणि परमार्थ यात भेद नाहीच आहे. परम अर्थ हाच खरा स्वार्थ होय. म्हणजे भगवंताचे होणे होय.


आपण ज्यात स्वार्थ मानतो तो आहे परमार्थ. त्यातील कोणत्याच गोष्टीवर आपला ताबा नाही.


खरा स्वार्थ साधण्यासाठी आता भगवंताशिवाय काही नकोच. इतर काही असो वा नसो किंवा कसेही असो, पण भगवंत हवा अशी भावना झाली पाहिजे.


प्रपंचातील आमची आसक्ती सहज सुटणारी नाही. नीतीअनिती, धर्मअधर्म, न्यायअन्याय वगैरे सर्वच गोष्टींकडे दुर्लक्ष करून आपण आपल्या आवडीची गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करतो.


तीच निष्ठा भगवंताबद्दल पाहिजे. आणि त्याकरता नामस्मरणात अखंड राहणे हा एकच उपाय आहे.


आशीर्वाद

🌼🍁☘

   ☘🌷श्रीराम समर्थ🌷☘


अमृतधारा  ६०६


आपले असे होते की, आपण सर्व दुसऱ्यांचेच करतो. पण माझे ह्या बुद्धीने ते करतो म्हणून परमार्थ  होत नाही.


त्यात माझे खरे कल्याणाचे काही असत नाही. म्हणून स्वार्थही काही साधत नाही.


जन्माला आल्यावर भगवंताचे होणे हे भाग्याचे. त्याचे महत्व पटले, म्हणजे सोय गैरसोय अडचण वाटत नाही.


जगात आपल्या लक्षात येत नाही. भाग्याचे क्षण असतात. ज्याकरता आलो ते साधले म्हणजे भाग्य होय.


देव दर्शनाने येण्याचे सार्थक होते. जन्माला येणे ज्याकरता, ते साधले नाही तर भाग्याचे नाही.


शिक्षण शिकावे पण घरचे वळण सोडू नये. बाहेरचा संस्कार मनावर संगतीत सहज होतो, जडतो. तो होऊ देऊ नये. त्याकरता भगवंताचे स्मरण करावे.


प्रपंचाच्या संगतीने आम्हाला इतर गोष्टी महत्वाच्या वाटतात. पण आपली श्रद्धा, तसा भगवंत उभा राहतो. श्रद्धा नसेल तर भगवंत साक्षात् समोर उभा असूनही उपयोग नाही.


आशीर्वाद

🌼🍁☘

   ☘🌷श्रीराम समर्थ🌷☘


अमृतधारा  ६०७


आपला खरा स्वार्थ माणसाने साधावा. खरा स्वार्थ दोन मार्गांनी साधता येतो.

१)  परोपकाराने.

२)  भगवंताच्या स्मरणाने.

खरा परोपकार साधण्याकरता आधी खरा स्वार्थ सिद्ध झाला असला पाहिजे. त्याकरता भगवंताच्या स्मरणाची जरूर आहे.


म्हणून भगवंताच्या स्मरणात अखंड रहावे.. हाच खरा परमार्थ आहे.


परमार्थात व्यवहार येणारच, पण तो स्वार्थमूलक नसावा. व्यवहार स्वार्थाकरता आहे. परमार्थ निस्वार्थ होण्याकरता आहे.


आपल्या स्वार्थाच्या आड आले म्हणून देवाने घात केला असे आपण म्हणतो. ते खरे नाही. ते व्हायलाच पाहिजे होते. सृष्टीक्रम अगदी बरोबर चालतो.


व्हायचे असले की अडचण येत नाही. व्हायचे नसले की सर्वच अडचणी आहेत आणि होणे आपल्या स्वाधीन नाही.


अमुकच होऊ दे म्हटले तर भीती. भगवंता, तुझ्या इच्छेने काहीही होऊ दे म्हटले तर भीती नाही. त्यासाठी नाम घ्यावे. नामाचा गुण कायमचा असतो.



आशीर्वाद

🌼🍁☘

   ☘🌷श्रीराम समर्थ🌷☘


अमृतधारा  ६०८


पैशाच्या पाठीमागे जाऊ नये. प्रेमाच्या पाठीमागे जावे, त्याने पैसा भरपूर येतो. पण पैशाच्या मागे गेले तर पैसाही जातो व प्रेमही मिळत नाही.


पैसा व्यवहाराला पाहिजे हे खरे आहे, पण तो घातक आहे ही जाणीव ठेवावी.


पैसा निर्जीव आहे. त्यामुळे त्याची आसक्ती चटकन होते, फार खोलवर जाते आणि ती शेवटी घात करते.


पैसा घेताना फार जपून घ्यावयास पाहिजे. ज्याचा पैसा असेल त्याची वृत्ती त्याला चिकटून येते आणि त्याचा परीणाम होतो.


म्हणून जो रामनाम घेत नसेल, ज्याला ईश्वराचे स्मरण (आस्था) नसेल, अशांकडून पैसा घेऊ नये. पैशासाठी नवस करावा लागत नाही. तो नशीबाने येतो.


पैशाने सुखी झाला असा मनुष्य मी पाहिला नाही. पैशाने देव मिळत नाही. पैशाकडे जाऊ नये. प्रेमाकडे जावे.


आशीर्वाद

🌼🍁☘

   ☘🌷श्रीराम समर्थ🌷☘


अमृतधारा  ६०९


जगात प्रपंचाशिवाय दुसरे काहीच केले नाही तर त्या सहवासाचे, प्रपंचाच्या आसक्तीचे फळ केंव्हातरी बाहेर येणारच. चोवीस तास प्रपंच करणे बरे नव्हे.


देवदर्शन झाले की सार्थक आहे. बुद्धीला फाटे फार फुटतात. ते न फुटता बुद्धी कायम राहावी इतकेच मागावे. इतर गोष्टी प्रारब्धाने येतील त्याला महत्व नाही.


आपल्याला श्रद्धा असल्याशिवाय, रामदर्शनाचा व्हावा तसा उपयोग होत नाही.


शरीरात इतर सर्व अवयवापेक्षा प्राण महत्वाचा आहे. तसे सर्व गोष्टी कराव्या. त्यांचा प्राण श्रद्धा आहे. श्रद्धा नसेल तर ते कर्म निष्प्राण देहासारखे आहे.


श्रद्धा दोन प्रकारची असते.

१) मला जे पाहिजे त्यासाठी भगवंत हवा.

२) मला फक्त भगवंत हवा.


पहिली नुसती विषयाची इच्छा असते. आपण भगवंताजवळ विषय मागतो. पण त्या विषयापासून सुख प्राप्त होते असे कोठेच दिसत नाही.


आशीर्वाद

🌼🍁☘

, ☘🌷श्रीराम समर्थ🌷☘


अमृतधारा ६१०


परमात्म्याचे ठिकाणी विषय आहे असे म्हणता येणार नाही. तो निर्विषय आहे. त्याला त्याचे पूर्ण वावडे (नावड) आहे.


भगवंताला विषयाची आवड असणारच नाही. त्यामुळे आपण त्याच्याकडे विषय मागितला तर तो देईल,  पण नाक मुरडूनच देईल.


म्हणून भगवंताजवळ मागायचे असेल तर त्याला आवडेल असे मागावे. पण आपल्या मागण्यातही "भगवंत दाता आहे" ही भावना,  विश्वास असावा.


आपली श्रद्धा पाहिजे. तसेच हेतु चांगला पाहिजे, म्हणजे भगवंताच्या प्रेमाचा पाहिजे.


म्हणून भगवंतच निश्चित दाता आहे ही श्रद्धा असावी. भगवंताशिवाय दुसरा हेतु नाही. असे केले पाहिजे.


"माझे मागणे बंद कर व जे कल्याणाचे तेच तू कर." इतकेच भगवंताजवळ मागावे.


आशीर्वाद

🌼🍁☘

, 🌷☘श्रीराम समर्थ☘🌷


अमृतधारा  ६११


गोंदवल्यास प्रेमाचे राज्य पाहिजे. पैशाचे नको. मग पैशाचा पाऊस पडेल.


गोंदवले सुधारण्याचा प्रयत्न करू नये आणि गोंदवल्याला काहीही होणार नाही. कारण काही व्हावयास, सुधारण्यास तेथे काही नाहीच.


प्रत्येकाने आपली सुधारणा कशी होईल ते पहावे.


कोणतेही कार्य हेतुवरून चांगले वाईट ठरते. हेतुचेच फळ मिळते. सकाम कर्माचे फळ मिळाले तरी ते वस्तुच्या गुणधर्मांना सोडून येत नाही.


प्रत्येक वस्तु अशाश्वत आहे. अशाश्वतपणा सोडून वस्तु येत नाही.


देहाची स्मृती न राहता उपासना करणे हा उत्तम शेवट होय. रावणाने अशी सेवा केली. त्याला अमरत्व वगैरे मिळाले. पण हेतु बरा नव्हता म्हणून मरण आले.


भगवंत मला पाहतो, देव सर्वत्र आहे म्हणून पाप लपवता येत नाही. ही भावना असावी.


आशीर्वाद

🌼🍁☘

   ☘🌷श्रीराम समर्थ🌷☘


अमृतधारा  ६१२


आपल्याला भगवंताचे प्रेम नाही हे फार मोठे पाप आहे. ही वृत्ती पालटण्याकरता तीर्थक्षेत्रे आहेत. त्याचा नकळत परिणाम होतो. म्हणून विसर न पडण्याचे मागावे.


आपला विषयाचा भोग संपला नाही. त्यात समाधान देऊन पुरे पडण्याचा गुणच त्यात नाही. म्हणून ते तरी मागू नये.


भोग खरोखर सुख देत नाहीत. विषयाचे सुख दारूच्या धुंदीतील सुखासारखे आहे.


ज्यांना भोग नाहीत ते तरी सुखी कां नसावेत. म्हणजे सुख कशातच नाही. म्हणून बरे व्हावे असे मागूच नये.


भोग असताही जर स्मरण असेल तर तो नसल्यासारखा आहे. ते भगवंताच्या स्मरणात साधेल. म्हणून ते स्मरण मागावे. बाकी त्याच्या नियमाने होईल ते मानावे.


देहाचे काहीही होवो, पण प्रेम दे अशी आपली तयारी नाही. पण आपण मागू ते योग्य वेळेस देईल,  म्हणून हेतु तो ठेवावा. बुद्धीस्थैर्य मागावे.


आशीर्वाद

🌼🍁☘

   ☘🌷श्रीराम समर्थ🌷☘


अमृतधारा ६१३


प्रपंच मनापासून करणे म्हणजे लोभात गुंतणे आहे आणि ते (परमार्थिक दृष्टीने) चांगले नाही.


माणसाने गुंतून राहू नये. प्रपंचात काय किंवा देवळात काय, दोन्ही सारखेच.


ज्याला काही करायचे राहिले नाही असे वाटते त्याचे करून पूर्ण झाले. पण शिल्लक राहिले असे वाटले तर कधीच पूर्ण होणार नाही.


प्रत्येकजण बरीवाईट गोष्ट आपल्या मनाप्रमाणे ठरवतो. पण कोणालाच खरे कळलेले नसते.


घडेल ते घडेल, पण घडले नाही तर बिघडले, असे वाटू नये.


आपल्याला दृष्य वस्तु भगवंतापेक्षा जास्त खरी वाटते.


खरे म्हणजे इतर गोष्टींवर आपला अधिक विश्वास आहे. आपण इतर गोष्टी करतो पण यश येत नाही. आता हाही उपाय करून पहावा असे आपण करतो.


आशीर्वाद

🌼🍁☘

   ☘🌷श्रीराम समर्थ🌷☘


अमृतधारा  ६१४


आपल्या प्रपंचाला परमार्थाची आडकाठी, की परमार्थाला प्रपंचाची आडकाठी येते, असे दोन प्रश्न आहेत. आडकाठी असेल तर ती दूर केली पाहिजे. आपली आवड कोणती ते ठरवले पाहिजे.


एका म्यानात दोन तलवारी राहत नाहीत, तसे एका मनात प्रपंच व परमार्थ राहणार नाहीत. प्रपंचाची परमार्थाशी युक्तीने जोड घालणे जरुरी! प्रपंचाची तार परमार्थाला लावून घेतली तर आवाज गोड निघाल्यावाचून राहणार नाही.


येथे एक मीपणा आड येतो. इतर काही नाही. इतर गोष्टी चालतील पण भगवंताला मीपणा चालत नाही.


माझेपणा, मीपणाची फांदी आहे. माझेपण अनेक वस्तूत अडकून राहिले आहे. ते एक एक करून तोडले पाहिजे. म्हणजे शेवटी देहबुद्धीचा बुंधा () तोडता येतो.


देहबुद्धी नष्ट झाल्यावर तो कोणाबरोबर जेवतो हे पाहण्याची गरज नाही. प्रपंच कर्तव्य दृष्टीने करावा. भोगासाठी नसावा. आणि भगवंताच्या अनुसंधानात रहावे.


आशीर्वाद

🌼🍁☘

   🌷☘श्रीराम समर्थ☘🌷


अमृतधारा  ६१५


स्वतःच्या अस्तित्वाची पूर्ण जाणीव हीच आसक्ती होय. आसक्ती दोन प्रकारची. एक  प्रीतीची, दुसरी भीतीची. आपण भीतीला शेपुट लावतो, ते लावू नये.


भगवंताच्या स्मरणात देहाचा विसर हेच आनंदाचे चिन्ह आहे. सगळीकडून रान उठवले पाहिजे व भगवंताचे स्मरण वाढवले पाहिजे.


प्रपंचातील गोष्टी कल्याणाच्या नाहीत, हे वाटत नाही तोपर्यंत भगवंताची नड भासत नाही.


धर्माने, शास्त्राने व संतांनी जे सांगितले ते सत्य मानावे, चांगले मानावे.


मनात येणे आपल्या हातात नाही पण दृष्याच्या मागे न जाणे आपल्या हातात आहे.


चांगल्या आचाराकरता चांगले विचार हवेत. त्याकरता चांगले मन हवे. चांगल्या मनासही भगवंताचे स्मरण हवे. त्यासाठी त्याची कृपा मागावी.


आशीर्वाद

🌼🍁☘

,   🌷💧अमृतधारा💧🌷

अमृतधारा  ६१६


मनापासून सर्व प्रेरणा येते. मुळचा झरा चांगला असेल तर पुढचा सर्व ओघ चांगला असतो. मग कोणाच्याही भांड्यात घेतले तरी पाणी स्वच्छ असते. पण मुळ झरा गढुळ असेल तर सोन्याच्या भांड्यात घेतले तरी पाणी  गढुळच असते.


मनाचा उपदेश जितका कल्याणाचा असतो तितका इतर नाही. मनाची तयारी ठेवणे जरूर आहे. मन कोणाच्या तावडीत सापडणारे नाही. मन आवरण्यासाठी भगवंताचे स्मरण हा एकच मार्ग आहे.


भगवंताच्या स्मरणाने सर्व सुधारेल. गोकुळात कृष्ण होता म्हणून गोकुळाचे नाव अजून राहिले. तसे प्रपंचाच्या गोकुळात भगवंताचे स्मरण ठेवावे.


भगवंताच्या विस्मरणामुळे आपण आजच्या अवस्थेत आलो (दूर झालो). आता भगवंताच्या स्मरणाने पुन्हा त्याच्यात जाऊ (सामावून जाऊ).


आशिर्वाद

🌼🍁☘

   🌷💧श्रीराम समर्थ💧🌷

अमृतधारा  ६१७


आईबापांना सुख देणे, त्यांची आज्ञा पाळणे हे पहिले कर्तव्य आहे. वडील सांगतात त्याप्रमाणे न वागले तर ते जिवंत असतानाही नसल्यासारखे आहे. पण ते जिवंत नसताना त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागले तर ते असल्यासारखेच आहे.


लहान मुले देवाला प्रिय असतात. तुकाराम बुवांनी लहानपण मागितले. शेताला जसे कुंपण तसे बाळपणाला आज्ञापालन हे कुंपण आहे.


रामाच्या राज्यात दुखणी फारशी नसावी. पण त्याला जो विसरेल त्यास दुखणे झाल्याशिवाय राहणार नाही.


आपण ज्या अवस्थेत आहोत त्या अवस्थेप्रमाणे वागले पाहिजे. ज्ञान वगैरे गोष्टी आपोआप होणाऱ्या आहेत.


भक्तीमार्ग डोंगराच्या बाजुने जाणाऱ्या रस्त्यासारखा आहे. पडला तर डोंगराकडेच पडेल.


आशीर्वाद

🌼🍁☘

  +     '  

   🌷💧श्रीराम समर्थ💧🌷

अमृतधारा  ६१८


प्रत्येक मनुष्य निर्दोष नाही. त्याचे काहीतरी चुकतेच, पण चुकल्यावर सुधारले तर ते मनुष्यत्व होय.


एखाद्याचे चुकले असेल तर त्याला भरावे लागेल. पण ते ताबडतोब होणार नाही. कारण तो सुधारेल म्हणून देव जरा दम धरेल.


मी कोणीतरी झालो हे वाटणे जसे चूक तसेच,  मी कोणीतरी कनिष्ठ आहे असे वाटणेसुद्धा चूकच आहे.


दुसऱ्याला वाईट म्हणणे म्हणजे आपण दोषाचे चिंतन करीत बसणे आहे. यात आपलाच घात आहे.


दुसरा कसाही वागो पण म्हणून आपण तसे वागणे बरे नाही. प्रेमाला आपण चांगले असावे लागते. दुसरा चांगला नसला तरी चालेल. प्रेम बसू शकते.


आशीर्वाद

🌼🍁☘

   🌷💧श्रीराम समर्थ💧🌷


अमृतधारा  ६१९


पैसा म्हणजे चांगली परिस्थिती आणि देहसुख. या दोन सुखाच्या गोष्टी आहेत. त्या दोन्ही देवाने प्रत्येकाला दिल्या आहेत.


तरी त्यामुळे फक्त देहसुख वाटेल. पण खरे सुख निश्चितच मिळणार नाही. कारण या दोन गोष्टी ज्यांच्यापाशी आहेत ते सुखी आहेत असे दिसत नाही. दुःखातील थोडीशी फुंकर तोच आपला आनंद आहे. खरा आनंद आपल्याला माहित नाही. तो आहे हे दाखवण्याकरता ग्रंथ आहेत.


पुष्कळदा आपण व्यवहारात पाहतो की एखादी गोष्ट न देणे हे तात्कालिक दुःखाचे वाटत असले तरी शेवटी हिताचे ठरते.


मी सुखी आहे असे कोणीच म्हणत नाही. त्याचे कारण कळत नाही.


ज्याला प्रपंच नाही तो दुःखी असतो व ज्याला प्रपंच आहे तोही दुःखी असतो. ज्याची दोन्ही टोके दुःखी आहे तो सर्वच दुःखाचा असला पाहिजे.


आसक्तीरहित प्रपंच बाधत नाही. प्रपंच कर्तव्यपणाने केला पाहिजे. रामकर्ता ही भावना आली पाहिजे.


आशीर्वाद

🌼🍁☘

   🌷💧श्रीराम समर्थ💧🌷


अमृतधारा  ६२०


राम कर्ता व मी कर्तव्यापुरता.


आपण आपले कर्तेपण काढून टाकले पाहिजे. आपले कर्तेपण खरे नाही ही खात्री पाहिजे.


गीतेत भगवंताने सांगितले, "तू कर्तव्य करताना माझे स्मरण ठेव".


राम व नामासोबत मी उपाधीरहित झाल्यावर त्रिवेणी संगमाने गंगा वाहू लागते. तोच परमार्थ होय.


बुद्धी कितीही वाढली तरी मर्यादित असते. म्हणून शरणागती घ्यावी. मीपणाने मेल्याशिवाय शरणागती नाही. मी नाही, भगवंत आहे हेच परमार्थाचे लक्षण आहे.


शरणागतीत नाम एकमेव साधन आहे. नामात वृत्तीमधे बदल करण्याचे सामर्थ्य आहे.


आशीर्वाद

🌼🍁☘

   🌷💧श्रीराम समर्थ💧🌷


अमृतधारा  ६२१


भगवंताने सर्व निर्माण केले, पण स्वतः उपाधीरहित राहिला.


मी उपाधीरहित झाला पाहिजे. हे कसे राहावे संतांनी सांगितले. त्यासाठी उपाधीरहित नाम घ्यावे.


इतर साधने उपाधी सहित आहेत. नाम उपाधीरहित आहे. त्याला स्वतःच्या चवीचीही उपाधी नाही. त्याला कशाचीही गरज नाही.


भगवंताच्या खालोखाल त्याच्या बरोबर नाम आहे. अवताराला मर्यादा आहेत. पण नामाला नाहीत.


निस्वार्थीपणा येण्यासाठी उपाधीरहित व्हायला पाहीजे. ते व्हायला उपाधीरहित साधन पाहिजे. ते साधन म्हणजे नाम.


निस्वार्थ व्हायला नीती, धर्म पाहिजे. निस्वार्थ, मोबदल्यारहित नाम घ्यावे. म्हणजे निस्वार्थ प्रेम कसे करायचे ते शिकता येईल.


नामाबद्दल सांगता येत नाही. ते अनिर्वचनीय आहे. ज्याला उपाधी नाही त्याला वाणी कशी लागेल?


आशीर्वाद

🌼🍁☘

   🌸☘श्रीराम समर्थ☘🌸


अमृतधारा  ६२२


जी गोष्ट खरोखर सांगता येणारी नाही, ती सांगता येत नाही म्हणणे हेच त्याचे खरे निरुपण आहे. नामाचेही तसेच आहे.


जगाची उपाधी सुखदायक वाटते तोपर्यंत भगवंत आठवत नाही. जगाची आस सोडल्याशिवाय भगवंताची कास धरता येणार नाही.


जगाची आस सुटल्यावर भगवंताचे प्रेम लागेल. आपले चुकले असे वाटले की तेथे भगवंत उभाच आहे.


परमात्मा सर्वांना सुसाध्य आहे. तो कष्टसाध्य (आपल्यामुळे) झाला आहे. जो शरणागती पत्करील त्याला परमात्मा सुसाध्य आहे. म्हणजे त्याची आस उत्पन्न होईल.


भगवंताचे दास बनल्याशिवाय त्याचे प्रेम येणार नाही. आपण विकारांचे दास होऊन जगाचे मालक होऊ पाहतो. भगवंताचे दास झालो तरच विकारांचे मालक होता येते. आपल्या मनाचा मालक भगवंत असावा.


आशीर्वाद

🌼🍁☘

   🌷☘श्रीराम समर्थ☘🌷


अमृतधारा  ६२३


देहबुद्धि जी विषयाला धरून असते ती, किंवा भगवंताशिवाय जी बुद्धी, ती सकाम होय. ती आहे तोपर्यंत व्यवहार चालू राहणारच.


व्यवहारात आतली गोष्ट लपवून बाहेर एक दाखवता येईल. पण माणूस कधीतरी उघडा पडेल. परमार्थात तसे चालत नाही.


दिलेले घेतले तर व्यवहार पूर्ण होतो. पण दिलेले घेतलेच नाही तर व्यवहार पूर्ण होणार नाही.


आपल्याला कोणी बोलू लागला तर त्याचे तोंड धरता येत नाही. पण कानात बोळे घालून ते न ऐकणे आपल्या हातात आहे, (ते मनाला लावून घेणे वा प्रतिक्रिया देणे, न देणे ही निवड आपण करु शकतो).


हे करू का ते करू असे वाटते तोपर्यंत खरी तयारी नाही. मला रोग काय झाला? हे ज्याला कळले त्याने आपले आपण औषध घ्यावे.


आपल्याला भवरोग  झाला आहे. त्यासाठी संतांनी नाम हे औषध सांगितले आहे.


देह रक्षणासारखे नामाचे रक्षण करावे, नेम पाळावा.


आशीर्वाद

🌼🍁☘

   🌷☘श्रीराम समर्थ☘🌷


अमृतधारा  ६२४


चिकित्सा कल्पना मूलक आहे. ती एका मर्यादेपर्यंतच पाहिजे. निदान मरण्यापूर्वी रोगाचे निदान झाले पाहिजे.


शंका वांझेच्या मुलासारखी आहे. ती नाहीशी होत नाही. संतांच्या नंतरही शंका शिल्लक राहते हे आश्चर्य आहे.


आपण विषयाच्या आधाराने राहणारे आहोत. शंकेचे निरसन कृतीनेच होईल.


प्रत्येक कृती भगवंताच्या सक्षित्वाने अभिमानाला बळी न पडता, राम कर्ता ही भावना ठेऊन करावी.


आपण एखादी गोष्ट केली की ती बरोबर झाली की नाही पाहतो. पण भगवंताच्या इच्छेने जे झाले ते बरोबरच होणार.


मुखात नाम असावे. मग कर्तव्य करताना समाधान राहते व तेथे फळही तात्काळ मिळते.


आशीर्वाद.

☘🌸☘

   🌷☘श्रीराम समर्थ☘🌷


अमृतधारा  ६२५


प्रपंच खेळासारखा केला तर गंमतच आहे. पण तो खरा मानला तर बिघडते.


ज्याला प्रपंचाचे भान नाही त्याला प्रंपंच सोडणेही नाही व धरणेही नाही.


नुसता प्रपंच करून समाधान कधीच होणार नाही. म्हणून भगवंताचे होण्याचा प्रयत्न करावा.


प्रापंचिकाला काळजी करण्यास सांगावे लागत नाही. ती होतेच. भीती हे दररोजचे मरण आहे. देहाचे मरण एकदाच आहे.


निर्भयता हा मोठा गुण आहे. विद्वानाला, शक्तिमानाला, श्रीमंताला तो येत नाही. तो गुण भगवंताच्या आधाराने येतो.


आपण प्रपंच दुसऱ्याचा म्हणजे देहाचा करतो, तो खोटा. मी त्या देहाचा संसार केला. देहाला सुख होईल असे केले. पण ते खोटे सुख टिकणारे नाही.


आशीर्वाद

🌼🍁☘

  : 

   ☘🌷श्रीराम समर्थ🌷☘

अमृतधारा  ६२६


माझेपणात आपण वेगळेपण जाणतो. पण माझा देह मीच झालो, (देहाला खरा मी समजलो).


माझे म्हणताना मी (खरा) नाही. त्याची बाधा माझेपणाला (देह संबंधाला) होईल, मीपणाला नाही.


कर्तव्य देहाला धरून होते. खरे कर्तव्य कळण्याला माझे (आत्म) स्वरूप कळले पाहिजे.


मी कोण हे कळणे कठीण आहे, पण मी कोण नाही हे कळेल. मी कोण (देह) नाही हे कळल्यावर, मी (खरा) कोण आहे ते कळेल.


आपले खरे ध्येय काय आहे ते जाणीवेत पाहिजे. त्यासाठी मी कोणाकरता आहे, मी खरा कोण आहे हे समजले पाहिजे.

खरे ध्येय  भगवंत व

मी कोणाकरता  भगवंताकरता.


भगवंताचे नाम, त्याची भक्ती हृदयासारखी आहे. इतर गोष्टीं इन्द्रियासारख्या आहेत.


देहासकट सर्व अर्पण करीन, पण तुझा योग राहू दे असे समर्थांनी सांगितले.


आशीर्वाद

🌼🍁☘

   🌷☘श्रीराम समर्थ☘🌷


अमृतधारा  ६२७


आपल्याला काहीतरी पाहिजे पण काय पाहिजे ते कळत नाही. जे खरे पाहिजे ते मिळत नाही म्हणून तळमळ राहते. ते संत सहवासाशिवाय कळत नाही.


सर्व व्यवस्थित चालले असताही ज्या वेळेस चाललेल्या कार्यात इतर काही करावेसे वाटते, भजन पूजनादि कां करावे वाटते कारण त्यावेळी काही उणीव भासते. आहे त्यात समाधान मिळत नाही.


ज्याची संगत धरावी त्याचे गुण अंगी येतात. मनुष्याची संगत धरली तर माणसाचे गुण येतील. संताची संगत धरली तर भगवंताची आवड निर्माण होईल. भगवंताची संगत धरली तर त्याच्यासारखे सामर्थ्य येईल.


संतांनी एक परमात्मा नित्य म्हणून सांगितला. पण तो तळमळीशिवाय मिळत नाही. भगवंताची तळमळ नाही आणि आहे त्यात समाधान नाही.


संत सांगतात, अमुक एक गोष्ट मिळवीनच अशी आपल्याला खात्री नाही. मग दाता दुसरा नाही का ?


मी कर्ता ही भावना जाण्याकरता रामकर्ता ही भावना ठेवावी.


आशीर्वाद.

🌷🌿🌷

   🌷☘श्रीराम समर्थ☘🌷


अमृतधारा  ६२८


मी कोण आहे हे ओळखले नाही तोपर्यंत खोटा मी वावरतो. तो नाशिवंत आहे म्हणून नाशिवंताची इच्छा करतो.


तो खरा मी कसा असेल? जोपर्यंत आपले खरे कर्तव्य कळणार नाही तोपर्यंत भगवंताची प्राप्ती नाही.


देह मी समजून कर्तव्य केले ते माझे खरे कर्तव्य नाही.


आपला देह पराधीन आहे. पण मन स्वाधीन आहे. वाईट संगतीने वाईट विचार येतात आणि त्याने वाईट परिणाम होतात.


वाईट संगती धरू नये. वाईट खाऊ (पिऊ) नये. एकदा व्यसन लागले तर ते सुटणे कठीण आहे.


खोटे बोलू नये. पाप थोडेच असते. पण शेवट फार मोठा वाईट होतो.


चांगुलपणा कृपेशिवाय येणार नाही. जग पाहते की नाही पाहू नये. भगवंत पाहतो हे पहावे. म्हणजे प्रामाणिकपणा येईल. म्हणून भगवंताची कृपा मागावी.


आशीर्वाद.

🌸☘🌸

   🌷🍀श्रीराम समर्थ🍀🌷


अमृतधारा६२९


आपल्या इच्छेप्रमाणे मिळाले म्हणजे देवाने दिले, म्हणजेच देवाची कृपा आहे असे आपण म्हणतो. दिले नाही म्हणजे कृपा नाही असे आपण म्हणतो. परंतु खरी कृपा कशात आहे हे पाहिले पाहिजे.


भगवंताने दिले म्हणजे बरे वाटते. पण ज्या परिस्थितीत ठेवील ती बरीच आहे, म्हणजे कोणत्याही परिस्थितीत माणसाचे समाधान ढळत नाही ही खरी कृपा आहे.


माणसाचे समाधान राहणे ही खरी कृपा आहे. पण आपल्याला हवे ते देऊनही समाधान राहात नसले तर ती कृपा म्हणता येत नाही. आणि न देताही समाधान राहिले तर तीच खरी कृपा होय.


माणसाला दृश्य वस्तू मिळाल्यावर होणाऱ्या आनंदाने, देणारा आनंदी होतो म्हणून तो देतो. पण ते कधीही संपत नाही. पुन्हा मागणारा असमाधानी राहतो. म्हणून देणारा पण असमाधानी राहतो.


न देणे व काही न मिळता समाधान टिकणे आणि कसल्याही परिस्थितीत भगवंताचे स्मरण राहणे ही त्याची खरी कृपा होय.


आशीर्वाद.

🌿🌷🌿

   🍀🌷श्रीराम समर्थ🌷🍀


अमृतधारा  ६३०


उपासनेने आपण देवाची कृपा मागतो तेव्हा म्हणावे हे भगवंता, कसल्याही परिस्थितीत समाधान व तुझे स्मरण राहू दे.


देहबुद्धी हेे साधन व भगवंत साध्य आहे. सृष्टी टाकता येत नाही. ती टाकू नका पण साधन करा.


साधन देहबुद्धितुनच करावे लागते. पण ते देहबुद्धिच्या बाहेर नेणारे पाहिजे. साधनामध्ये अनन्यता हा मोठा गुण आहे.


साधनाला काहीच नको आहे. उपाधीरहित रहावे. सुखाची वा दुःखाची जाणीव न ठेवणारे साधन असावे.


कधी हवेपणा आड येईल. हवेनकोपण आपल्या स्वाधीन नाही,  म्हणून त्याचा आग्रह नसावा.


प्रपंचाचा गुण अनेकत्व आहे. या दोहोची सांगड घालणारे साधन पाहिजे.


असे एकमेव साधन म्हणजे नाम होय.


आशीर्वाद

🌼🍁☘

   🌿🌸श्रीराम समर्थ🌸🌿


अमृतधारा  ६३१


जर परमार्थ खरा तर मग प्रपंच कशाला. त्याची गरज नाही तर तो कसा करावा हे संतानी कां सांगितले?


प्रपंच त्यागासाठी नाही. तो जरूर आहे, पण चवीपुरता अाहे. प्रपंच परमार्थाला पूरक असावा.


मनुष्याचा स्वभाव बनल्यानंतर तो मुद्दाम करतो असे नाहीच. तसे विषयाचे प्रेम आपल्या अंगाशी एकरूप झाले आहे.


प्रपंचाचे विषय सुख देत नाहीत. पण ते सोडवतही नाहीत. म्हणून प्रपंच न सोडता परमार्थ करतो तोच खरा मनुष्य.


आपल्याला प्रपंच सोडून राहता येणार नाही. पण प्रपंच सुटल्याशिवाय भगवंत गाठता येणार नाही असे सांगणे बरोबर नाही.


परमार्थ सोडून प्रपंचाचे चिंतन होते. म्हणजे प्रपंच आहेच. म्हणून प्रपंचात राहा पण परमार्थ मार्ग सोडू नका.


म्हणून प्रथम बळजबरीने नाम घेणे जरूर आहे. म्हणजे वासना जळून नामाचे प्रेम येईल.


आशीर्वाद.

🍀🌸🍀

  +          .        .

   🌿🌷श्रीराम समर्थ🌷🌿


अमृतधारा  ६३२


प्रपंच मनासारखा झाला का? आपली प्रेमाची माणसे गेली की नाही?  माझ्या गोष्टींवर माझी सत्ता नाही ना? दुसऱ्याच्या सत्तेने ते चालले आहे.


आपल्या सत्तेचे काहीच नाही. ते कळण्याकरिता संतांनी ग्रंथ लिहिले आहेत. ग्रंथ आचरणाकरता आहेत. कीस काढण्याकरता नाहीत.


संत सांगतात प्रपंच करा, पण कर्तृत्व व फल आपल्या हातात नाही ही जाणीव ठेवा. प्रपंचातील कर्तव्ये भगवंताच्या स्मरणात करावीत.


आपला प्रपंच विश्वातील एक भाग आहे. तो अभ्यासाकरताच आहे. ज्याने प्रपंच जिंकला, त्याने जग जिंकले. ज्याने आपल्याला जिंकले, त्याने प्रपंच जिंकला.


मी देवाचा दास झालो तर मी जिंकला जाईल. त्याला धर्म, नीती फार उपयोगी आहेत.


प्रपंच व परमार्थ, आपण काय, कशाकरता करतो हे समजून केले पाहिजे. प्रपंच भगवंताकरता आहे हे कळले पाहिजे.


आशीर्वाद

🌼🍁☘

, 🌿🌷श्रीराम समर्थ🌷🌿


अमृतधारा  ६३३


माणूस प्रपंचात जसा तयार होईल तसा जंगलात जाऊन तयार होणार नाही. प्रपंच शिक्षणाकरता आहे.


आपल्याला आपले दोष दिसले तर चैन पडणार नाही. अवगुण समजून बदलले नाही तर दोष आहे. ते समजले नाहीत तर दोष नाही.


प्रपंचात स्वार्थ बुद्धीने केले तर चुकले असे वाटले पाहिजे. घरातल्या इतके बाहेर स्वार्थी संबंध नाहीत, म्हणून तेथे निस्वार्थी होणे कठीण असते. घर जिंकणे हा पहिला मार्ग आहे.


प्रपंचात इतक्या ठिकाणी मन जाते. पण स्थिरता एकाच ठिकाणी होते. देहाच्या नादी लागू नये व मन परमेश्वरी लावावे.


देह सर्वस्व वाटतो हे आपले मर्म आहे. देहावर संकट आल्यावर धीर सुटणे स्वाभाविक आहे.


आपल्याला संसारात कोणाचा तरी आधार लागतो. आपण तो एकमेकांचा घेतो,  त्याच्याऐवजी भगवंताचा आधार घ्यावा आणि त्यातच राहावे.


परिस्थिती कितीही अनुकूल असली तरी नामस्मरणाशिवाय खरे समाधान मिळत नाही.


आशीर्वाद

🌼🍁☘

   🌿🌷श्रीराम समर्थ🌷🌿


अमृतधारा  ६३४


भगवंताच्या इच्छेने व्हायचे ते होतच असते, तरी थोडा वेळ नाम स्मरणात घालवावाच. त्याने उल्हास व आत्मविश्वास येतो आणि तो आत्मविश्वास भगवंताच्या आधारावरच असतो.


व्हायच्या गोष्टी होतच राहणार. सर्वत्र अशाश्वतता व असत्यता आहे. सर्व प्रारब्धाप्रमाणे चालते असा अनुभव आहे. मग करता येण्यासारखे आहे ते तरी करावे. प्रपंचाला धक्का न लावता ते तरी  (भगवंताचे स्मरण) करावे.


हवेनकोपण नसावे. साधनाला या वृत्तीची पूर्व तयारी पाहिजे. हवेनको पणात दुःखाचे मूळ आहे.


हेतू राहू द्या पण हट्ट ठेवू नका. प्राणाशिवाय जसे शरीर, तसा हट्टाशिवाय हेतू असतो. तो घात करीत नाही.


माणसाला प्रयत्नाशिवाय राहताच येत नाही. पण प्रयत्नाचे फळ भगवंताच्या इच्छेने येईल असे मानणे जरूर आहे. असा हेतू ठेवून राहणे जरूर आहे.


आशीर्वाद

🌼🍁☘

   💧🌷श्रीराम समर्थ🌷💧


अमृतधारा  ६३५


प्रयत्नावाचून राहू नये, पण परमात्मा जे फळ देईल त्यात समाधानाने राहावे.


ठरवल्याशिवाय कार्य करता येत नाही हे खरे. पण फार निश्चित ठरवू नये. ते झालेच पाहिजे असे म्हणू नये. हट्ट धरु नये. झाले तर बरे. नाही झाले तर नाही.


विचाराने कितीही गोष्टी ठरवल्या तरी आचरणात आणायला कृतीशिवाय मार्ग नाही.


वृत्तीत (बदलण्यात) सर्व आहे. साक्षीपणाने प्रपंच करावा. या गोष्टी कशा साधतील हे पहावे.


सर्वांचे ऐकावे पण आपण काय करायचे हे निश्चित ठरवून वागावे व ते सोडू नये. ज्याचे त्याचे सांगणे, ज्याच्या त्याच्यापुरते बरोबर असते. पण आपल्याला आचरणाला आपलेच खरे.


स्वतःचे ज्याने ऐकले, त्याचे कल्याणच झाले.


आशीर्वाद

🌼🍁☘

   🌸💧श्रीराम समर्थ💧🌸


अमृतधारा  ६३६


शिकलेला वेदांत आचरणात आणला नाही तर माणूस प्रात्यक्षिकात नापास होतो. विषय कळल्याचा आनंद बुद्धीचा आहे.


चित्रकलेचा, काव्याचा आनंद तसाच आहे. तो प्रत्यक्ष (खरा) आनंद नाही. त्याला कशाची मर्यादा नाही. तो कसा मिळवायचा हे संतांनी सांगितले.


जे समाधान कृतीने व्हायचे आहे, ते कृती नसेल तर होणारच नाही.


परमात्मा सहज आहे. तसा मीपणा सहज आहे. कर्म करून फलाची आशा न ठेवणे हा सहजपणाचा मार्ग आहे.


जे करावे लागते ते (पुष्कळदा) बळजबरीचे असते. पण जे सहज होते ते खरे असते.


सहज राहणे हे वैराग्य. नको म्हणणे वैराग्य नाही. हवेनकोपणा टाकणे हे वैराग्य आहे. कर म्हटले तर होणार नाही. पण झालेच तर हरकत नाही.


हवेनकोपण ही उपाधी आहे. ते टाकावे. मग आपण भगवंताशी एकरूप होऊ.


आशीर्वाद

🌼🍁☘

  +     '  

   🌷☘श्रीराम समर्थ☘🌷


अमृतधारा  ६३७


भगवंत निरुपाधिक आहे. तसे नाम ही निरुपाधिक आहे. आपण निरुपाधिक राहिले पाहिजे.


साधन प्रपंचात करता येण्यासारखे असावे. ते भगवंताजवळ नेणारे पाहिजे व माझ्या हातात असावे. असे साधन नाम आहे.


नाम घेण्याकरता प्रपंचाची आडकाठी कोठे येते? आपण हे सर्व म्हणतो पण करीत नाही.


भगवंताचे प्रेम येत नाही म्हणून सर्व अडते. अगदी प्रथमपासून सुरुवात करावी. बळजबरीने नाम घ्यावे.


विचार व सावधानता बाळगावी. सतत नाम घ्यावे. नामात राहावे. मग परिस्थिती बदलू दे, वृत्ती स्थिर राहील.


भगवंताला नामाशिवाय राहताच येत नाही, व आपण नामावेगळे राहिलो नाही तर भगवंताशी एकरूप व्हायला वेळ लागणार नाही.


आशीर्वाद

🌼🍁☘

   💧🌷श्रीराम समर्थ🌷💧


अमृतधारा  ६३८


प्रेम हे सर्वत्र एकच आहे. ते वाटून विभाग करता येण्यासारखे नाही. थोडे येथे, थोडे तेथे करता येत नाही.


जे एके ठिकाणी तेच इतर ठिकाणी ठेवता येते. असे प्रेम निरुपाधिक असणार.  उपाधीला धरून असणारे प्रेम असे एकरूप असणार नाही. शिवाय निरुपाधिक प्रेम निस्वार्थीच असले पाहिजे.


असे निस्वार्थी प्रेम एका भगवंताच्या ठिकाणी असेल व लागेल. बाकी इतर ठिकाणी काही ना काही स्वार्थ राहणारच.


ते निस्वार्थी प्रेम भगवंताच्या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ते प्रेम भगवंताजवळ मागितले पाहिजे.


पण आपले विषयाचे प्रेम आहे. तोपर्यंत ते प्रेम येणार नाही. विषयाचे प्रेम ठेवून भगवंताकडे गेले व त्याचे प्रेम मागितले तर ते प्रेम देता येणार नाही.


म्हणून ते प्रेम पाहिजे असेल तर थोडे तरी विषयाचे प्रेम आपण सोडले पाहिजे. त्याकरता सतत नाम घेतले पाहिजे.


आशीर्वाद

🌼🍁☘

   💧🌷श्रीराम समर्थ🌷💧


अमृतधारा  ६३९


भगवंताचे थोडे तरी प्रेम आपल्याला येणे जरूर आहे. त्याचे प्रेम येण्याकरता विषयाचे प्रेम कमी होणे जरूर आहे.


त्याकरता एकच उपाय आहे. भगवंताच्या अखंड स्मरणात रहावे व सुखाने प्रपंच करावा. राम कल्याण केल्याशिवाय राहणार नाही, ही माझी खात्री बाळगावी.


सांगितलेले करीत राहिले म्हणजे मार्ग दिसावयास लागतो. प्रसंग येईल तसे वागणे, हेच खरे शहाणपण.


भगवंताचे नाम आहे, हे माहीत असताना त्याचा उपयोग कां होणार नाही.


सांगणाऱ्याची निष्ठा खरी होती. नामाने काम होते, ही निष्ठा आपल्याजवळ नाही. भगवंताची निष्ठा त्याच्या कृपेने येते.


शुद्धीवर असताना घेतलेले नाम बेशुद्धीत आत चालू राहते. जागेपणी घेतलेले नाम झोपेत चालू राहते. भगवंत ठेवील त्यात आनंदाने रहावे. तो आपल्याला कसा राखतो हे कळत नाही.


आशीर्वाद.

🌷☘🌷

    +  

   💧🌷श्रीराम समर्थ🌷💧


अमृतधारा  ६४०


खरे म्हणजे जगाला जितके कळते तितकेच पुरे असते. कोणतीही गोष्ट सर्वाना सारखी कळत नाही. मुख्य गोष्ट म्हणजे, जितके समजले तितके आचरणात आणणे ही आहे.


परमात्मा प्रेमपूर्ण व दयाळु आहे. त्याला दुसरी बाजु नाही. भगवंताच्या सेवेची बिदागी (मुल्य) तोच देऊ शकेल, व ती म्हणजे त्याचे प्रेम होय.  तेच खरे तर भगवंताकडे मागावे.


आपल्याला ते वाटत असेल पण आपण भगवंताचे स्मरण करत नाही. ही चूक स्वाभाविक असेल. पण ती सुधारणे अवश्य आहे.


माणसाला तरायला व बुडायला सर्व सोय करून दिली आहे. बुडणारे काय व तारणारे काय ते समजले पाहिजे. (तरने को लीनता, डुबने को अभिमान  संत वचन ) त्याप्रमाणे वागले पाहिजे. ते केले नाही तर भगवंत तरी काय करील?


आशीर्वाद

🌼🍁☘

   🌸🌼श्रीराम समर्थ??🌸


अमृतधारा  ६४१

( अनुग्रह )


आजपर्यंत आपण नाम घेतोच आहो. पण त्यात मी घेतो, मला वाटते म्हणून मी घेतो, हा मीपणाचा अंश आहे.


म्हणून हेच नाम सद्गुरुने दिले म्हणजे त्याने दिले म्हणून मी घेतो असे होते, यात मीपणा जातो. परमेश्वराचे होणे म्हणजे मीपणाने मरणे.


दुसऱ्याने नाम देण्यात हे मर्म आहे. अनुग्रह हा एक संस्कार आहे. संस्काराचे महत्त्व फार आहे. आपले जीवन असंख्य संस्कारांनी व्याप्त आहे.


ज्या मंंत्रानी संस्कार होतो, कर्म होते त्याचा अर्थ कळला नाही तरी संस्कार होतो. त्याचा परिणाम फार होतो. तो फार खोलवर जातो.


नाम देणे हा असाच एक संस्कार आहे. नाम दिल्यवर ते घेणाऱ्याने आता मी भगवंताचा झालो ही भावना बाळगली पाहिजे.


ज्या परमात्म्याचे आपण झालो त्याला कमीपणा येईल असे कधी वागू नये. नीती प्राणाबरोबर सांभाळावी. शास्त्राला धर्माला सोडून वागू नये.


संतांच्या वचनांवर विश्वास ठेवून रहावे. शक्यतो अनुसंधानात राहावे. सतत नाम घ्यावे.


आशीर्वाद.

🌷☘🌷

, 🍀🌷श्रीराम समर्थ🌷🍀


अमृतधारा  ६४२


जगात दोनच गोष्टी आहेत  ब्रह्म आणि माया.. अर्थात सत्य आणि नाशिवंत. पण नाशिवंत सत्य वाटते.  ते निश्चित असत्य वाटू लागले म्हणजे ब्रह्मच राहते.


मी आहे, ते (ब्रह्म) नाही असे समजून मी दुसराच कोणी आहे हे घालवण्याकरता साधन लागते. ते (ब्रह्म) होण्याकरता साधन नाही.


सत्य स्वरुपाची जाणीव उत्पन्न होण्याकरता साधन हवे. जाणीव उत्पन्न करणे ही भावना होय. नाशिवंतपणाचा निश्चय होणे (काय नाशिवंत आहे हे स्पष्ट कळणे) हे साधनाने साधते.


जे खोटे आहे त्याचे मूळ सत्यातच आहे. पण खोटे सोडता येत नाही. सत्य आहेच. ते उत्पन्न होण्याकरता साधन नको. पण नाशिवंत जे  सत्य वाटते, त्याचा निरास करण्यासाठी साधन पाहिजे.


मायेची खरी ओळखण मायाजन्य बुद्धी जाणू शकत नाही. जे नाही ते आहे (असे वाटणे) म्हणजेच माया.


आशीर्वाद

🌼🍁☘

   💎🌷श्रीराम समर्थ🌷💎


अमृतधारा  ६४३


छायचित्रामध्ये आपण आहो तसे दिसतो.  फक्त चलनवलन नसते. ही सृष्टी मायेने केली आहे. ती बर हुकूम भगवंतासारखी आहे, त्याची छायाच आहे.


एवढे मोठे जग आहे. सृष्टीमधे विविध प्रकार आहेत. पण एक सारखा एक नाही. अनेकपणा विलक्षण रितीने भरला आहे. स्वभाव वैचित्र्य आहे.


आनंद तर एकत्वात आहे.  मग अनेकत्वात आनंद कसा मिळेल. परमेश्वराची सृष्टी आनंदमयच असली पाहिजे. तो सच्चिदानंद आहे ना!


साखरेची वस्तू गोडच असली पाहिजे. जर ती गोड लागत नसेल तर आपली चव बिघडली असली पाहिजे.


मायेने आपल्यावर पगडा बसवला आहे. भगवत् सृष्टीचा आभास निर्माण केला. निद्रा व समाधी दोन्ही सारख्या दिसतात. दोन्ही मध्ये देहाचा विसर पडतो.


मायेने अगदी तशीच सृष्टी निर्माण केली. मन तिकडे नेले पण सावलीच्या सोपस्काराने समाधान होत नाही. आपण देहाला सुखी करण्याचा प्रयत्न केला. पण सुखाला अंतरलो.


हा मायेचा पगडा जोपर्यंत गेला नाही, तोपर्यंत खरा सुखानुभव येत नाही.


आशीर्वाद.

☘🌷☘

   💧🌷श्रीराम समर्थ🌷💧


अमृतधारा  ६४४


देहाचे सुख, सुख मानले. पण सुख झाले नाही. तरीही माझे चुकले असे वाटत नाही. देहाचे सुख खरेच वाटते. हेच मायेचे लक्षण होय. देहाच्या सुखाचा लोभ सुटत नाही.


देहसुखाचा आदिअंत सुखाचा नाही, म्हणजे तो दुःखरूपच आहे. तरीपण ते सुख सत्य वाटते, ही माया होय.


आपण मायेत आहोत तोपर्यंत नामाचे महात्म्य कळणार नाही. पण साधन मायेतूनच करावे लागते. आपण मायेत आहोत तोपर्यंत साधन कठीण आहे.


देह दिसल्यावर आपण त्याची छाया पाहत नाही. तसा भगवंत दिसल्यावर आपण त्याची माया पाहणार नाही.


साध्य व साधनात फरक असणारच. साध्याला अनुरूप असे साधन पाहिजे.


आपले साध्य भगवंत आहे. साधन देहबुद्धितूनच करणे आहे पण ते त्याच्या बाहेर नेणारे पाहिजे. साधनामधे अनन्यता पाहिजे. ते साधन म्हणजे नाम होय.


आशीर्वाद.

🌷☘🌷

   ☘🌷श्रीराम समर्थ🌷☘


अमृतधारा  ६४५


ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी बोलता येतील पण अनुभव येत नाही. त्यासाठी साधन जरूर आहे.


मायेचा पगडा कितीही बसला तरी त्यातून पळवाट असते. ती संतांनी दाखविली.


प्रपंचातील विकाराच्या तुरुंगातून पळवाट दाखवली हा संतांचा मोठा उपकार होय.


प्रपंचात पुढे जाताना नाम घ्यावे. अडचणी प्रलोभने येतील, प्रारब्ध भोग येतील, पण ते बाधणार नाहीत.


सृष्टी अनेकपणाने असेल. तरी नामाने,  साधनाने अनन्यपणा येईल.


मायेचा पार भगवंताशिवाय नाही व भगवंत त्याच्या स्मरणात आहे. भगवंताचे स्मरण त्याच्या कृपेशिवाय होत नाही. ते आपण मागूया. आपण प्रयत्न करुया, मग परमात्मा मागे राहील खास.


भगवंताशिवाय जगणे म्हणजे प्राणाशिवाय शरीर आहे.


आशीर्वाद.

🌿🌸🌿

   ☘🌹श्रीराम समर्थ🌹☘


अमृतधारा  ६४६


जग भलतीकडे जात आहे. पण तो ओघ थांबवता येणार नाही. परदोष, परद्वेष भगवंताच्या विस्मरणात घडतात व ते घात करतात.


जगात एक स्वभाव मिळत नाही. घरातही मिळत नाही म्हणून भांडणे होतात. म्हणून थोडे मिळते घेऊन रहावे.


दुसऱ्याच्या स्वभावामुळे त्याच्यासारखे होणे बरोबर नाही. नीतीने वागले तर गरीबी असली तरी पुरवली. वाईट वागून कितीही मिळवले तरी पुरत नाही.


भगवंताला सोडून पैसा आला की वाईट मार्गाला लागतो. उदरनिर्वाहासाठी पैसा जरुरी. त्यासाठी नोकरी करावी.


पण आपण नोकर आहो ही भावना उत्पन्न होऊ देऊ नये. नोकरीमध्ये हीच भावना उपयोगी पडते. पण आपल्याला ती नुकसानकारक आहे.


मी नोकरीकरता नाही तर भगवंताकरता आहे,  ही भावना दृढ झाली तर नोकरी करूनही नोकर होणार नाही. परमार्थ या वृत्तीच्या बदलण्यात आहे.


आशीर्वाद.

🌿🌸🌿

   🌸☘श्रीराम समर्थ☘🌸


अमृतधारा  ६४७


परमार्थाला बायको, मुले, नोकरी काहीच आड येत नाही. पण मी या कुणाकरताच नाही, इतकेच नव्हे तर मी देहाकरताही नाही ही दृढ बुद्धी झाली पाहिजे. त्यासाठी नामस्मरण करावे.


सुरवातीला नेमाने नियमित नाम घेणे गरजेचे आहे. त्याने ते अंगवळणी पडेल. त्याचा परिणाम वासना कमी होऊन नामाचे प्रेम हळूहळू येइल.


मग संतांकडे गेले की ते पुढचे काम करण्यास तयारच नाहीत, तर उतावीळ आहेत. मग चरणरजा इतकी ही कृपा पुरे आहे.


चरणरज, याचा धुळीचा कण असा शब्दशः अर्थ करण्याची आवश्यकता नाही. "कणाइतकी ही कृपा पुरे" असा करावा. तितकीच कृपा पुरे आहे.


माणसाची तयारी पाहूनच संतांना कार्य करावे लागते. त्याची तयारी नसताना संतांनी आपल्या शक्तीचा उपयोग केला तर माणूस वेडा तरी होईल किंवा मरेल.


संत जिवाला विषयाची विस्मृती पाडून काम करतात. त्यांच्या सहवासाने वासना हळूहळू मरू लागते.


आशीर्वाद.

💧🌸💧

   💧☘श्रीराम समर्थ☘💧


अमृतधारा  ६४८


संताकडे जाताना हेतू चांगला धरून जावे. म्हणजे काम लवकर होते. अर्थात संताकडे कसेही गेले तरी उपयोग होणारच. सहवास फुकट जाणार नाही पण वेळ लागेल.


गुरु, देव प्रसन्न झाले व काय पाहिजे ते देऊ लागले तर माणूस जिवंत आहे तोपर्यंत त्यांना देतच बसावे लागेल. कारण कितीही दिले तरी याचे मागणे संपणार नाही व त्यांचे देणे चालूच राहील.


मागणारा शिष्य व देणारा गुरु दोघेही असमाधानीच असतात. कितीही मागून मागणाऱ्याची इच्छा राहतेच. म्हणून त्याचे असमाधान असते.


मागितलेले दिले तर त्याच्या हिताचे होईल की नाही हे पाहिले पाहिजे. संत हे करतात म्हणून ते देत नाहीत.


जग सुखी असावे असे वाटणे हा खरा दयाळुपणा होय. पण सर्व जग दुःखी असताही साधू संतांना दयाळू म्हणतात. म्हणजे त्यांच्यात काहीतरी आहे.


आशीर्वाद.

☘🌸☘

   ☘🌷श्रीराम समर्थ🌷☘


अमृतधारा  ६४९


संतांचे तीन प्रकार आहेत.

१) संन्यासी  त्याचे काही नसताही समाधान आहेच.

२) काही येते किंवा जाते तरी त्यातही समाधान आहेच.

३) गडगंज आहे, पण गडगंजावर अवलंबून नसून त्यापासून अलिप्त राहिल्याने समाधान राहते. हा त्यागी होय. ही सर्वात उत्तम अवस्था व सर्वात कठीण अवस्था आहे.


देवापेक्षा संतांचे महत्व अधिक आहे. देव मागितले ते देतो पण संत मागितले ते देत नाहीत. आई (मुलांच्या) कल्याणाचे चिंतन करते. तसे संत हिताचे असेल तरच देतात.


किंबहुना, मागितलेले न देताही प्रेम राहते तो संत होय. इतर गोष्टी जरुरच नाहीत. फक्त एक प्रेम पाहिजे. ते देणारा संत दुर्मिळ. त्याच्या सहवासाने ते मिळते.


एक वेळ देवाची सुद्धा गाठ पडेल. पण संत मिळणे ही गोष्ट खऱ्या भाग्याची आहे.


आशिर्वाद

🌼🍁☘

   🍀🌸श्रीराम समर्थ🌸🍀


अमृतधारा  ६५०


जगात अत्यंत दुर्धर गोष्ट असेल तर सत्समागम होय. अगदी काही न करता प्रगतीचे साधन असेल तर सत्संग होय. तो मिळणे दुर्मिळ खरे पण तो टिकवणे त्याहून कठीण असते.


भगवंताच्या कृपेने सत्संग व सत्संगतीने देवाची भेट होते. भगवंताच्या कृपेनेच गुरुचे महत्त्व कळेल.


खरा मी मोठा झाल्याविना आणि खोटा "मी" क्षीण झाल्याविना गुरुचे महत्व कळणार नाही. ते नामानेच होईल.


आपल्याला जे मिळवायचे आहे त्याला आड येणारा जो मी, तो कसा आहे ते आपल्याला ठाऊक आहे. तो घालविण्याची शक्ती माणसात आहे.


माझ्या मनाच्या मागे भगवंत आहे. पण मनात आले पाहिजे. माणूस करील तर त्याला सर्व अनुभव येतील, कारण अनुभव सर्वत्र सारखा आहे. तो नामाने येईल.


माझ्या हातात वृत्ती बदलणे नाही. पण कृती करणे माझ्या स्वाधीन आहे. भगवंताला कमीपणा न येईल असे वागणे हेच साधन होय.


आशीर्वाद

🌼🍁☘

   💧🌸श्रीराम समर्थ🌸💧


अमृतधारा  ६५१


मंदिरात माणसे निर्माण झाली पाहिजेत. ती शक्ती माणसात आहे. परमेश्वराला साष्टांग नमस्कार घालून "मी पुन्हा नाही करणार" असे म्हटले तर तीर्थे करणार नाहीत ते परमेश्वर करेल.


भगवंताचा होऊन राहणे हे करायचे आहे. ते पदरात पाडून घ्यावे. त्याकरता भगवंताची प्रार्थना करावी.


आम्हांला भगवंताचे प्रेम नाही कारण त्याची गरज नाही. ते असते तर इतर गोष्टी नको वाटल्या असत्या.


मला भगवंत हवा असे वाटायला पाहिजे. मग त्याला आवडेल असे वागायला पाहिजे. हे नसेल तर चिकाटी पाहिजे.


आपल्याजवळ शरणागती नाही. मग नुसते पडून राहिले पाहिजे. बळजबरीची चिकाटी पाहिजे. "मरेन तर तुझ्या नावाने मरेन" अशी चिकाटी पाहिजे.


नामस्मरण पाहिजे. "अंतःकरणात भगवंत पाहिजे. भगवंत मला हवा" अशी बुद्धी पाहिजे.


आशीर्वाद.

🌸🍀🌸

   🌷🍀श्रीराम समर्थ🍀🌷


अमृतधारा  ६५२


नामस्मरण करतांना विचार आवरता येणार नाहीत. ते आवरणे अवघड आहे पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येईल.


मन ताब्यात रहात नाही, विचारांमागे धावते. आकाशात ढग येतात आणि जातात तसे विचार येतात व जातात.


जे करता येत नाही ते करण्याचा आपण प्रयत्न करतो. पण जे नाम सहजपणे घेता येते, ते आपण घेत नाही.


आज आपल्याला विषयाचे प्रेम औरस (सख्खे) व नामाचे प्रेम सावत्र झाले आहे.


ब्रह्मानंद बुवांनी विद्येचा उपयोग कधी केला नाही. सर्व सोडून ते नामात राहीले.


माझे दोष पाहू नको असे रामाला सांगून त्याला आवडेल असे वागावे. रामाला शरण जावे आणि माझी बुद्धी (नामात) स्थिर राहू दे असे मागावे.


आशीर्वाद.

🌿🌸🌿

   ☘🌷श्रीराम समर्थ🌷🍀


अमृतधारा  ६५३


काहीतरी होण्याची आपली धडपड चालते म्हणजे कुठे जायचे ते आपल्याला माहीत नाही. पण आहे तेथे समाधान नाही.


आज मी जे आहे ते सोडले पाहिजे. आज आपली देहबुद्धि आहे. त्यामुळे आहे त्यात समाधान नाही. हे समजले म्हणून आजची अवस्था सोडली पाहिजे.


त्यास दोन अडचणी आहेत.

१) आतली अडचण   विकारांचे विषयाचे प्रेम आड येते.

२) बाहेरची अडचण   बाहेरची, देहाची परिस्थिती आड येते.


मुख्य अडचण आतली आहे. आपण विकारांचे अधिन आहोत. त्यांचे मालक झाले पाहिजे. विकार भगवंताच्या आड येतात. ते मदतीला आले पाहिजे.


विकारांपैकी मुख्य राग आहे. बाकीचे पराधीन आहेत. राग स्वाधीन आहे. रागाला काही कारण लागत नाही. राग सर्वांना येतो व त्याने देहभान जाते. राग आहे तोपर्यंत भगवंताची कृपा नाही.


आशीर्वाद.

☘🌷☘

   🌷☘श्रीराम समर्थ☘🌷


अमृतधारा  ६५४


विकार जाण्यासाठी नाम घ्यावे, मग भगवंत जवळ घेतो.


मी आहे हे गेले पाहिजे. ते (मीपण) नाहीसे केले पाहिजे.


मुख्य मीपण देहबुद्धीत असते. माझेपणात त्याच्या फांद्या वाढतात.


देहबुद्धीच्या मुळ्या अत्यंत खोल आहेत. त्या काढायला नाम उपयोगी पडते.


रामाचा बाण फुकट जात नाही. मग हृदयातले नाम फुकट कसे जाईल ?


जगात कितीही कष्ट केले तरी जे शक्य होत नाही ते एकानेच साध्य होईल. भगवंताचे झाले तर ते होते.


त्यासाठी "रामा मी तुझा आहे" अशी कळकळीची विनंती करावी. त्याच्या डोळ्यात पाणी आले पाहिजे. रामाने दिलेलेच आहे. पण आपला त्यावर विश्वास बसत नाही.


राम देईल ते संपत नाही. रामास "मी तुझा आहे." म्हणावे. त्याकरता 'रामा, मी तुझ्या नामात राहीन' म्हणावे. म्हणून निरंतर नाम घ्यावे.


आशीर्वाद.

🌿🌷🌿

   ??💧श्रीराम समर्थ💧🌷


अमृतधारा  ६५५


"मी भगवंताचा आहे" असे म्हटल्यावर सर्वत्र भगवंत पाहिला जाईल. म्हणजे जे होईल त्याचा परिणाम होणार नाही. कारण सर्वत्र भगवंतच आहे.


समजा, आज नाही पण उद्या भगवंताचे होऊन राहिले तर आजचे पुसले जाईल.


"मी अमुक आहे" यापेक्षा "मी अमक्याचा आहे" असे म्हटले पाहिजे. पण त्यासाठी मी अमुक आहे हे विसरले पाहिजे. मी अमक्याचा (भगवंताचा) आहे म्हणजे त्याप्रमाणे वागले पाहिजे.


आपण भगवंताला आवडेल असे वागावे. त्याला कमीपणा न येईल असे वागणे म्हणजेच साधन होय.


भगवंत इतका मोठा आहे कि त्याचा मोठेपणा आपण जाणूच शकत नाही.


भगवंत प्रेमळ, दयाळू, कृपाळू, क्षमाशील, व सच्चिदानंद आहे. त्याला दुसरी (विरुद्ध) बाजू नाही.


आशीर्वाद.

🌷☘🌷

   ☘🌷श्रीराम समर्थ🌷☘


अमृतधारा  ६५६


परमार्थाचा नीती हा पाया आहे, अंतःकरणाचे पावित्र्य, सदाचरण हे स्तंभ आहेत.


द्वेष, मत्सर, परनिंदा, अभिमानी वृत्ती ही नाशाची कारणे आहेत. आपला नाश करून आपण दुसऱ्याचा घात करू नये.


माझे दुर्गुण दिसले नाहीत म्हणून मी संभावित आहे असा समज नसावा.


विद्वान पैशाचा लोभ करणार नाहीत, मानाची अपेक्षा धरणार नाहीत, पण अभिमानाशिवाय राहू शकणार नाहीत.


अभिमान कशाचा धरायचा? विद्या, पैसा आपण आहोत तोपर्यंत टिकतात.


अभिमानासारखी वाईट वस्तू नाही. अभिमान रक्तात मिसळला आहे. बाहेरच्या औषधाने तो बाहेर पडणार नाही. त्यासाठी संतांनी भगवंताचे स्मरण हे रक्तात मिसळणारे औषध सांगितले आहे.  म्हणून सतत नाम घ्यावे.


आशीर्वाद.

☘🌷☘

, 🌸💧श्रीराम समर्थ💧🌸


अमृतधारा  ६५७


अभिमान लहान काय आणि मोठा काय, सारखाच घातक असतो. आपण अभिमानाला जितके जवळ करतो तितके देवाला जवळ करत नाही.


विद्वान लोक मांडवातून जाऊन आले (ज्ञान मिळविले), पण अनुभव कुणालाच नाही. विद्वत्तेचा अभिमान मात्र आहे.


ज्या विद्येचा उपयोग व्यवहारात होत नाही  ती विद्या खरी नाही. विद्येचा खरा उपयोग भगवंताचे होणे हा आहे.


आपल्याजवळ आहे ते वापरावे, तर उपयोग होईल. निस्वार्थ प्रेम मुख्य आहे.


आसक्ती हा स्वार्थाचा विस्तार आहे. मन विशाल करण्याकरिता निस्वार्थीपणाचा विस्तार करावा.


मिळणे हे प्रारब्धाचे आहे. पण सोडणे कर्तबगारीचे आहे. कुणी मान दिल्यावर मी त्याला लायक आहे असे वाटले की मान खालीच आला. त्याने जंगलात जावे (जगापासून दूर जावे).


मान ज्याने पचविला तो सत्पुरुष झाला.


आशीर्वाद.

🍀🌸🍀

   🌸🍀श्रीराम समर्थ🍀🌸


अमृतधारा  ६५८


एकाची दृष्टी जशी दुसऱ्याला उपयोगी येत नाही, तसे ज्याचा जसा भाव तसा त्याला देव असतो.


माझेपणाची प्रीती गेल्याशिवाय भगवंताची प्रीती लागत नाही. म्हणून माझेपण जाण्याकरता घरापासून सुरवात करावी.


माणसाने संकोच ठेवू नये. तो थोडा थोडा सोडायचा प्रयत्न करावा. त्याच्यात माझेपणाचा त्याग आहे.


आपण चार चौघात मिसळावे आणि त्यांना आपल्यात मिसळू द्यावे. जो लोकांना आवडतो तो भगवंताला आवडतो. जो लोकांना आवडत नाही तो भगवंताला प्रिय होत नाही.


माझेपणात मनाचा संबंध आहे. माझेपणा मनाने वाढवण्यात आहे. तो जितका वाढवावा तितका वाढतो, तसाच कमी पण होतो. तेवढे माणसाच्या स्वाधीन आहे.


आशीर्वाद.

☘🌸☘

   💧🌷श्रीराम समर्थ🌷💧


अमृतधारा  ६५९


बाहेरच्या हवामानाचा परिणाम जसा शरीरावर होतो तसा परिस्थितीचा परिणाम मनावर होतो.


पंचमहाभूतात्मक हवामानाप्रमाणेच शरीरही पंचमहाभूतात्मक असल्याने त्याचा परिणाम शरीरावर होतो ते बरोबर आहे.


पण परिस्थितीचा मनाशी संबंध आपण लावून घेतला आहे, आणि त्यामुळे जे माझे नाही ते सर्व मी मला चिकटवून घेतले आहे. आपले मन आपल्याला वेगळे काढता येण्यासारखे आहे.


मन चंचल आहे, स्थिर नाही. पण ते कोठे तरी चिकटते, आणि एकीकडून काढून दुसरीकडे चिकटवता येते. ते भगवंताकडे चिकटवावे जे नामाने साधते.


मग त्याला पहिल्याची किंमत राहात नाही व त्याचे सुखदुःख राहात नाही. ते करण्याचा प्रयत्न करावा.


आशिर्वाद.

🌸🍀🌸

   🌸💧श्रीराम समर्थ💧🌸


अमृतधारा  ६६०


मनाला इतर कोठे न चिकटवता आणि भगवंताकडे लावले तर माणसाचे खात्रीपूर्वक कल्याणच होईल.


देहाकडून मन काढून थोडे थोडे भगवंताकडे लावण्याचा प्रयत्न करावा. त्याचा अभ्यास केला पाहिजे. पण तो निराळा करावा लागत नाही. भगवंताचे अनुसंधान ठेवले की आपोआप अभ्यास होतो.


याचा अर्थ शरीराची हेळसांड करावी असा नाही. त्याची काळजी घ्यावी व सांभाळ करावा, पण ते सर्वस्व आहे असे धरून चालू नये.


असे केले म्हणजे कर्तव्याची जागृती राहील, पण आसक्तीचा जोर राहणार नाही. मग देहाच्या बाबतीत होणारे चढउतार, दोष नसताना निंदा ऐकणे, गुण नसताही उत्कर्ष होत राहणे वगैरे सर्व गोष्टी मजेने पहात राहता येईल.


पण त्याकरता देहाच्या तीरावर राहता आले पाहिजे, (म्हणजे साधन करवून घेण्याईतपत देहबुद्धी असावी). त्याचा अभ्यास म्हणजे भगवंताचे अनुसंधान ठेवावे. ते नामाने साधते.


आशीर्वाद.

🌷🌿🌷

   🌷💧श्रीराम समर्थ💧🌷


अमृतधारा  ६६१


आपले भाग्य फार थोर आहे. आपल्याला त्याची कल्पना नाही. हल्लीचा काळ कठीण, फारच कठीण आहे. बुद्धीभेद होणे सोपे झाले. कालची बुद्धी आज नाही.


इतके दिवस रामाने हात धरला. आता मध्ये सोडू नकोस अशी भगवंतापाशी प्रार्थना करावी. तो हात सोडत नाहीच.


रामाला कर्तव्य आवडते. तो अल्पसंतुष्ट आहे. त्याला कर्तव्य फार आवडते. ते करावे.


रामाला शरण जावे. माझे दोष पाहू नको असे कळवळून सांगावे आणि त्याला आवडेल असे वागावे. जगाला आवडेल असे न वागावे. रामाला आवडेल असे वागले तर ते मान्य होते. रामाचे चरित्र सर्वांना आदर्श आहे.


आपण मागू ते राम देईल. पण आपण खरे, आपल्या कल्याणाचे मागतच नाही. आपण शुद्धीवर (काय मागावे ह्याची) असताना मागचे सर्व विसरून भगवंताचे प्रेम मागावे. तो देईलच. पण आपण मात्र ते अंतःकरणापासून मागावे.


आशीर्वाद.

🍀🌸🍀

   

   🍀🌷श्रीराम समर्थ🌷🍀


अमृतधारा  ६६२


आपण पूर्ण नाही. जोवर काही हवे वाटते तोपर्यंत आपण अपूर्ण आहोत. अपूर्ण मनुष्याची हाव पूर्णाकडे जाण्याची स्वाभाविकच आहे.


आत्मप्रचितीने जावे पण अनुभवाने फक्त संतच शहाणे झाले.


विषयाने सुख झाले नाही हा आपला अनुभव आहे. सत्यासत्याचा निवाडा करण्याची सामग्री दिली, मग कां उमजत नाही?


कायम समाधान देणारी कोणती गोष्ट रामाजवळ मागता येईल? दृष्यात समाधान नाही हे आपल्याला माहित आहे. पण आपल्या अनुभवाचा उपयोग होत नाही. मग कुठे तरी विश्वास ठेवला पाहिजे.


सत्पुरुषांनी सांगितलेले आचरणात आणावे. प्रपंच न सोडता भगवंताच्या स्मरणात राहायला संतांनी सांगितले.


प्रपंचाचे कर्तव्य करीत असता त्यात भगवंताचे स्मरण राखावे, तोच परमार्थ आहे.


आशीर्वाद.

🌸🍀🌸

   🌸☘श्रीराम समर्थ☘🌸


अमृतधारा  ६६३


कर्तव्य आणि भगवंताचे स्मरण, यात स्मरण हे मुख्य. कारण कर्तव्य बदलत जाईल पण स्मरण  एकच राहील.


आजपर्यंतचे विचार सोडता येणार नाही. पण नीती सोडू नका व अनुसंधानात रहा. भगवंतानी अर्जुनाला हेच सांगितले.


जो आपल्या अनुसंधानाला टिकवतो तो टिकेल. अनुसंधानाला टिकवणे व आपण टिकणे सांभाळले तर मग शेवटी तो सत्पुरुष होतो.


संत होण्यासाठी पहिली पायरी म्हणजे चांगले वाईट परखण्याची बुद्धी. ती सर्वांना दिली आहे.


संत सर्वात राहून स्वतःला काही लागू देत नाही. तो आपल्या हेतुला धक्का लागू देत नाही.


जो मोह पावत नाही तो खरा ठरतो. ज्याने जगाचे विचार लावून घेतले नाहीत तो खरा संत. पुण्यतिथि करण्यास तोच लायक होय.


आशीर्वाद.

🌸🍀🌸

   🍀🌷श्रीराम समर्थ🌷🍀


अमृतधारा ६६४


आपल्याला सुधारण्यासाठी पुण्यतिथी असते. किती माणसे जन्मतात व मरतात पण सर्वांची पुण्यतिथी होत नाही. का ?


सर्वांचा शेवट एकच. पण तो कसा झाला याला महत्व आहे. शेवटात फरक असतो. राम, कृष्ण व संत यांचे शेवट वेगळे आहेत. ज्याने शेवट जिंकला त्याने जिंकले.


संत काळावर सत्ता ठेवून जातात. जे वासनेत जातात ते कालवश होतात. जे वासनेवर जय मिळवतात ते काळावर सत्ता गाजवितात.


पैसा देणारा, नोकरी देणारा तो साधु चांगला असे आपण समजतो. म्हणजे प्रपंचाबरोबर आपण त्याची तुलना करतो.


सत्पुरुष ओळखणे कठीण आहे. तो (भाव) टिकणे कठीण आहे. मेल्यावर संत होता हे कळते. मग त्याची पुजा होते.


वासना जाळून जे भगवद्रूप झाले ते संत बनले. म्हणून त्यांची पुण्यतिथी होते.


आशीर्वाद.

🌷🍀🌷

   

   🌷🙏🏼श्रीराम समर्थ 🙏🏼🌷


अमृतधारा  ६६५


जगात पुष्कळ गौडबंगाल आहे. कार्यकारण कळत नाहीत अशा गोष्टींना गौडबंगाल म्हणतात.


संत एक गौडबंगालच आहे. राम व कृष्ण यांची काहीतरी कल्पना येते. पण संताची काहीच कल्पना करता येत नाही.


एक संत पैशाचा लोभ दाखवतो तर एक बायकापोरात राहतो. आपण संतांच्याबद्दल कल्पना ठरवतो व तो तसा आहे का नाही पाहतो.


संताचा शोध लावून लागणार नाही व त्याचा उपयोगही नाही. प्रत्येक माणूस भगवत्प्राप्तीचा आधिकार घेऊनच जन्मास आलेला असतो.


भगवत्प्राप्तीचा मार्ग तितकाच सोपा, निरुपाधिक व वासना नाश करणारा असला पाहिजे. इतर गोष्टीं आपोआप घडून येतात.


जे त्या तळमळीतून गेले त्यांनाच आपल्या उद्धाराची योग्यता असते. देवालाही ते जमणार नाही. म्हणून संतांचा सहवास मागितला.


ते नामात असतात म्हणून आपण प्रेमपूर्वक नामात राहू. तो सर्वात सोपा मार्ग आहे.


आशीर्वाद.

🌷🍀🌷

   

   🍀🌸श्रीराम समर्थ🌸🍀


अमृतधारा  ६६६


आपण देवाला स्मरून चांगले वागावे. दुसऱ्याने चांगले म्हणावे ही सुद्धा ईच्छा ठेवू नये. लोक वाईट म्हणतात म्हणून वाईट वाटू देऊ नये.


नीती हा पाया, अंतःकरणाची पवित्रता व सदाचार हे स्तंभ, निष्ठा हा गाभा आणि परमार्थ हा कळस आहे.


शास्त्राची व धर्माची बंधने जरूर आहेत. धर्माचे सनातनत्व बंधनांनीच टिकले. बंधनांच्या व्यतिरिक्त असते ते स्वैरत्व होय.


प्रत्येक गोष्टीचे आपण मुळ पाहत असतो. विस्तार मागाहून होतो. पण मुळ पाहणे जरूर आहे. तसे विकारांना मुळापासून हळूहळू नष्ट केले पाहिजे. जे नामाने साधते.


बाहेरचा रोग इतका वाईट आहे की तो न समजता लागतो. परिस्थितीवर समाधान न राहता कोणत्याही परिस्थितीत समाधान किती टिकते हे परमार्थाचे थर्मामिटर आहे.


परमेश्वराकडे जे नेईल ते सर्व चांगले. बाकी इतर ते वाईट.


आशीर्वाद.

🌷🍀🌷

   🌷☘श्रीराम समर्थ☘🌷


अमृतधारा ६६७


कुणाचे तरी ऐकले पाहिजे. ते देवाचे, संताचे ऐकावे.


ब्रह्मानंद बुवांनी सर्व टाकले. एकच नाम ठेवले. बुवांचे माहेरघर मला माझे घरच वाटते.


विषयाचे दास होण्यापेक्षा देवाचे दास व्हावे.


सोडावी सर्व जगाची आस आणि व्हावे भगवंताचे दास


मंदीर प्रपंच म्हणून करता कामा नये. येथे (गोंदवल्यास) कमी पडते म्हणून करु नये. आपल्या कल्याणाचे म्हणून करावे.


घरदार सुख देत नाही. आपल्या कर्तव्यात सुख मिळते. ते स्मरणात करावे. आपण चांगले वागावे.


दुसरा एक चूक करतो. आपण दुसरी केली तर दोन्ही पैकी सुधारणारा कोणी नसतो.


येथे गोंदवल्यास जितके लोक आले, तितके चांगले होऊनच गेले.


आशीर्वाद.

🌷🍀🌷

   🌷☘श्रीराम समर्थ☘🌷


अमृतधारा ६६८


घरात शांती राहील असे वागावे. आपण ती बिघडवायला कारण होऊ नये.


चार घरची चार माणसे, सर्वच स्वार्थी असतात. त्यांचे कमी पडले की ते ओरडतात. आपण निस्वार्थीपणाने राहावे.


कोणाच्या स्वार्थाच्या आड आले की तो नांवे ठेवणारच. बापाच्या घरी फुकट राहू नये,  (मुलाच्या घरीसुद्धा. जमेल ते काम करावे).


श्रीमंत व विद्वान जगात पुष्कळ आहेत. पण वैभव व सत्कार खाली ओढतात.


प्रपंचात समाधान ही खरी भगवंताची कृपा आहे. पैका व वैभव नव्हे.


मला चुकवून करता येईल अशी गोष्टच जगात नाही. मग भगवंताला चुकवून काही करताच येणार नाही.


परमात्मा आपल्या बुद्धीने व कल्पनेने किती कळेल? त्याला अनन्य शरणागतीशिवाय मार्ग नाही.


आशीर्वाद.

☘🌺☘

   🍁💧श्रीराम समर्थ💧🍁


अमृतधारा  ६६९


आपला साडेतीन हाताचा देह साधन तरी किती करील ? शरणागतीला उत्तम उपाय नाम आहे.


आपला शेवटचा श्वास नामात जावा. नामात राहिला तर जगाला भारी होईल. उपाधीरहित होण्यास एक नामच उपयोगी पडते.


नामाचे महत्व कोणाला कळले नाही. नाम भगवंताचे आहे हे माहित असताना उपयोग का होणार नाही? ते घेत असताना समाधान का होत नाही?


कारण नामाच्या ठिकाणी सर्वस्वाची भावना नाही. निश्चितपणा नाही तोपर्यंत समाधान नाही. नामात निश्चितपणा आल्यावर समाधान आलेच.


नाम घेत असताना विचार आवरणे अवघड आहे. सुरवातीला आपण एकाग्रता करायला गेलो तर व्यग्रताच येईल. नामात प्रेम आल्याशिवाय चित्त एकाग्र होणार नाही. अतिशय प्रेमानेच चित्त एकाग्र होते.


आशीर्वाद.

🌸🍀🌸

   🍀🌷श्रीराम समर्थ🌷🍀


अमृतधारा  ६७०


नाम अगदी उपाधीरहित आहे. त्याला इतर कसलीही उपाधी लावू नका.


भगवंताला साक्षी ठेवून चोवीस तास कर्म केले तर एकाग्रता होईल.


राजा असो, रंक असो प्रत्येकाला सेवेशिवाय चैन पडत नाही. मोबदल्याची अपेक्षा, चांगुलपणाला कमीपणा आणणारी आहे.


ज्याचा मालक भगवंत असतो त्याची सेवा ही कृपाच आहे (त्याला मिळालेला सेवेचा अवसर ही त्याची कृपाच असते).


सर्वाचे मूळ नाम आहे. त्यात सर्व साधनांचा समावेश आहे. भगवंतापाशी नामाचे प्रेम व निष्ठा मागावी.


इतर सर्व सत्कर्में हातापायासारखी आहेत. निष्ठा हा प्राण आहे. अन्य साधनात एकेक गुण आहे. ते सर्व गुण नामात आहेत.


आनंदात रहा म्हणून सांगणे यासारखा दुसरा आशीर्वादच नाही.


आशीर्वाद.

🍀🌸🍀

   🌷☘श्रीराम समर्थ☘🌷


अमृतधारा  ६७१


सेवेत सेव्य व सेवक अशा दोन गोष्टी असतात. सेव्य अत्यंत मोठा अशी भावना असावी व सेवकाने स्वतःबद्दल मी अत्यंत लहान, दीन अशी भावना ठेवावी.


सेवेत अनन्यता पाहिजे. मला अमुक एक पाहिजे हे नको. सेव्यास आवडेल ते करावे. मी कर्ता ही भावनाच नसावी व कशाचीही अपेक्षा नसावी.


सद्गुरुची सेवा हे सर्वात श्रेष्ठ साधन. सद्गुरुची आज्ञा हेच श्रेष्ठ प्रमाण. श्रीगुरु शिष्यास जे उचित तेच सांगतात. आपणास आपले अवगुण काय आहेत ते कळत नाही.


डाॅक्टर सांगतील तेच औषध व पथ्य जसे आपण सेवन करतो, त्याचप्रमाणे सद्गुरु सांगतील तेच वचन प्रमाण मानून त्याप्रमाणे वागावे.


सद्गुरु स्वरूप कळले पाहिजे. तनुभाव ज्यास नाही तो गुरु. अशाचेच वचन मानणे जरूर आहे. डाॅक्टर औषध देऊ लागला म्हणजे तू अमुक औषध दे म्हणणे बरे नसते. तो देईल ते औषध घ्यावे लागते.


त्याप्रमाणे आपली निवड बाजूस ठेवून,  रामाससद्गुरुस आवडेल ते करावे व त्यांची आज्ञा मानावी.


आशीर्वाद.

🌸☘🌸

,   🌷☘श्रीराम समर्थ☘🌷


अमृतधारा  ६७२


खरा मालक परमात्मा रामच आहे. परमात्मा सेवेने संतुष्ट होतो आणि सेवकास जे पाहिजे ते तो देतो.


ज्ञानाने आपणास जे पाहिजे ते मिळत नाही.  सेवेने परमात्मा प्रसन्न होतो, तसा ज्ञानाने तो होत नाही. सेवा मात्र निराभिमान वृत्तीने केली पाहिजे.


लोखंड (शुद्ध) बनल्याशिवाय स्पर्शमणी (परीस) सोने करीत नाही. तद्वतच,  "तुझ्या वाचून मला तारक कोणी नाही" अशा भावनेने भगवंताला शरण जावे. तो आपणास फळ दिल्यावाचून राहणार नाही.


प्रामाणिक मुनीमाने चूक केली तर मालक ती सोसतो. त्याप्रमाणे आपली भावना शुद्ध असल्यास राम आपले दोष सहन करून ते घालवील.


परमात्म्याशिवाय दाता कोणी नाही ही भावना दृढ असली पाहिजे. प्रपंचात सेवा कोण करीत नाही? सर्वच करतात. पण योग्य मालक कोण हेच कळत नाही.


आशीर्वाद.

??☘🌼

   🌷☘श्रीराम समर्थ☘🌷


अमृतधारा  ६७३


योग्य मालक हुडकून काढला पाहिजे. ऐहिक मालक, माता, पिता वगैरे नश्वर व्यक्ती काही काळ आनंद देतील, परंतु त्रैलोक्याचा मालक राम मात्र परमानंद देईल.


मनाने नेहमी "मी रामाचा आहे" ही भावना असावी. आपण सर्व त्या रामाचे नोकर आहोत व रामच खरा सर्वांचा मालक आहे ही श्रद्धा ठेवावी.


व्यवहारात इतरास मालक मानले तरी खरा रामच सर्वांचा मालक आहे हेच पूर्ण समजावे. मनच त्यास द्यावे म्हणजे ते दुसरीकडे जाणार नाही. एखादी वस्तू एकाकडे गहाण ठेवल्यावर ती दुसरीकडे ठेवली जाणार नाही.


सेवा कशी करावी हे प्रापंचिक पूर्ण जाणत असतात. तीच सेवा रामाची करावी. ऐहिक मालक हा थोड्याने संतुष्ट होत नाही पण राम हा थोड्याने संतुष्ट होतो.


प्रपंच टाकणे म्हणजे काय हेच कळत नाही. प्रपंच प्रत्यक्ष सोडू म्हटले तर सुटणे कठीण आहे. त्याची आसक्ती सोडणे म्हणजे तो टाकणे आहे.


आशीर्वाद.

🌸🌼🍀

   🍀🌸श्रीराम समर्थ🌸🍀


अमृतधारा  ६७४


समर्थ रामाचे सेवक, दास झाले म्हणूनच ते जगाचे गुरू झाले. मामलेदार (कलेक्टर) हा राजसत्तेचा सेवक. तो मोठा का वाटतो? त्याचे पाठीमागे राजसत्ता आहे म्हणून. तद्वतच, आपण रामाचे अनन्य सेवक झाल्यास रामसत्ता आपल्या पाठीमागे उभी राहील.


आपण मीपण मारुया, रामापायी अनन्य होऊया. मग राम आपणावर कृपा करीलच.


बेशुद्धिचे औषध (अॅनेस्थेशिया) हुंगावयास दिले की शस्त्रक्रिया (आॅपरेशन) करण्यास सोपे जाते. तद्वतच, नामस्मरणाची चांगली धुंदी आल्यावाचून मीपण जात नाही. मीपण गेले की तो(साधक) शुद्ध झालाच.


एक बाई सोवळी होती. तिचे मूल रडत होते. त्याने ओवळ्याचा अंगरखा (शर्ट) घातला होता. "तू कपडे काढ मग मी घेते" आई म्हणाली. तो कपडा काढीना. आई काही घेईना.


इतक्यात शेजारीण आली. तिने ओवळ्याचा अंगरखा चड्डी काढले. नंतर ताबडतोब त्या आईने मुलास जवळ घेतले. तद्वतच, राम म्हणतो  "तू संसाराची आसक्ती सोड, मग मला भेटावयास ये"


मग शेजारणीप्रमाणे संत भेटतात व आपली आसक्ती सोडवितात आणि राम भेटवून देतात. विषयाची आसक्ती सोडल्यावाचून रामाचे खरे दास होता येणार नाही.


आशीर्वाद.

🌸🍀🌸

   ☘🌷श्रीराम समर्थ🌷☘


अमृतधारा  ६७५


खरोखर विचार करा की प्रपंचात मनासारख्या गोष्टी कोठे मिळतात? त्या मिळणे न मिळणे आपल्या हातातच नसते.


अमुक हवे अथवा नको असे कशाला म्हणावे? असे न म्हणता रामाचेच होऊन राहावे म्हणजे झाले.


जो रामाजवळ विषय मागतो त्यास रामापेक्षा त्या विषयाचेच प्रेम जास्त आहे असे सिद्ध होते.


सर्व काही रामाचे आहे असे समजणे म्हणजेच सर्वस्व रामास अर्पण करणे आहे. देह हा प्रारब्धावर टाकावा. प्रारब्धावरच तो खरोखर असतो, पण आपण चुकिने तो प्रयत्नावर आणतो.


भगवंताच्या सेवेच्या आड़ विषयासक्ती येते. विषय बाधक नाहीत पण विषयासक्ती बाधक आहे.  खऱ्या दास्यत्वाचे लक्षण रामाचे होऊन राहणे व त्याची आज्ञा पालन करणे हे आहे.


आशीर्वाद.

🌸🌼🍀

   🌷💧श्रीराम समर्थ💧🌷


अमृतधारा  ६७६


गुरु सेवेचे फल अपूर्व आहे. त्याचे रहस्य आज्ञा परीपालनात आहे.


आपण असे ठरवूया, परमात्म्याचे चरणीं डोके ठेवून म्हणू की "रामा, हे सर्व तुझे आहे" हे करणे अगदी सोपे नाही काय?


माझे आहे ते सोडावे. मग त्याचे आहे ते आपणास मिळते. दत्तकास एका कुळाची आशा सोडावी लागते. तसे आपण आपल्या देहाची आसक्ती सोडुया.


लाभ व हानी याचे सुखदुःखच वाटून घेऊ नये. हीच विषयासक्ती गेल्याची खूण आहे.


कुणाला काय दिले हे महत्त्वाचे नाही. सर्व प्रेमाने दिले की नाही हे महत्वाचे आहे.


"माझे आहे ते रामा सर्व तुझे आहे" असे म्हणावे. मला दे नाहीतर देऊ नकोस. रामाची इच्छा, हा भाव सतत रहावा म्हणजे समाधान टिकून राहील.


आशीर्वाद.

🌷💧🌷

   ☘🌷श्रीराम समर्थ🌷☘


अमृतधारा  ६७७


रामावाचून काही अन्य न मागणे याचे नाव अनन्यता. राम खरा मालक, खरा दाता आहे. जो निरभिमान व निरपेक्ष त्याचीच सेवा करावी.


अभिमान हा नाशक आहे. तो सेवेनेच घालविला पाहिजे. राम स्मरणात अखंड राहूया. चुकता चुकता बरोबर येणे हाच अभ्यास आहे.


शरीरावर सत्ता नाही तर त्यावर मिळविलेल्या पैशावर आपली सत्ता कोठली बरे? म्हणून भगवंताचे अनुसंधान नित्य धरावे.


थोडा पैसा असल्यावर निदान पाया तरी मजबूत करून ठेवावा. मग पुढे हळू हळू इमारत बांधता येईल.


शास्त्रानुसार म्हणजेच नीती धर्मानुसार वागणुक ठेवणे हाच पाया आहे. सदाचरण हेच मुख्य आहे. त्यावाचून वरील इमारत (परमार्थाची) बांधली जाणार नाही.


आशीर्वाद.

☘🌸☘

   🌿🌷श्रीराम समर्थ🌷🌿


अमृतधारा  ६७८


" तू माझा आहेस" असे रामाचे शब्द आपल्या कानी येतील तो दिवस खरा. हे कसेव्हावे? आपण त्याचेच होऊन राहुया. मग असे शब्द कानी येतील.


या भावनेच्या अभ्यासात नुकसान काहीच नाही. उलट फायदाच आहे. " रामा, सर्व तुझेच आहे, तू देशील ते घेईन " अशी भावना ठेवावी. यानेच अत्यंत समाधान राहते.


ही वृत्ती येणे हे भाग्याचे लक्षण आहे. जो भगवंताला आपलेसे करून घेईल तो खरा भाग्यवंत. तो धन्य होय.


म्हणून नामस्मरणास विसरू नका. मासा जसा पाण्यावाचून राहू शकत नाही, तसे नामावाचून राहू नका. अखंड स्मरण ठेवण्यास सोवळ्या ओवळयाचे बंधन नाही. अखंड स्मरणच सोवळे आहे.


आशीर्वाद.

☘🌸☘

   🌷🌿श्रीराम समर्थ🌿🌷


अमृतधारा  ६७९


श्रीरामचंद्र राज्यारूढ झाल्यावर अनेकांस बक्षिसें वाटली. पण मारुतीरायास काय द्यावे अशी पंचाईत पडली.


मारुतीस रामावेगळे न होणारी अशी जी वस्तू म्हणजेच नाम, ते रामाने त्यास दिले व चिरंजीव केले.


रामाचे अनन्य भावे स्मरण केल्यास तो आपणास कधीही तोंडघशी पाडणार नाही.


प्रपंच देहाने करूया, पण मनाने रामनाम स्मरू. अशी वाटणी करावी. मग भांडणच उरणार नाही.


रामाचे अखंड अनुसंधान ठेवणे हाच अभ्यास, हीच तपश्चर्या. आईपेक्षाही राम परम दयाळु आहे. खडकावर आपटलेले पाणी परत येते. पण समुद्रावर आपटलेले पाणी त्यातच मिळून जाते. श्रीराम दयेचा सागर आहे.


भगवंताच्या नामावाचून ज्ञान होणार नाही. म्हणून आपण तेच करुया. सतत नाम घेउया.


आशीर्वाद.

☘💧☘

   🌷💧श्रीराम समर्थ💧🌷


अमृतधारा  ६८०


अवधूताने २४ गुरु केले. त्याचा अर्थ असा की परमात्मा सर्व ठिकाणी आहे, ही भावना दृढ व्हावी. ती झाल्यावर चोवीस तासच काय, सर्व जग गुरुरूप दिसेल.


जगात एकही वस्तू त्याज्य अथवा वाईट नाही. आपलीच दृष्टी वाईट म्हणून जगात दोष पाहतो, गुण पाहत नाही.


काशीचे वर्णन ऐकायचे किंवा वाचायचे कशाकरिता? तेथे जाण्याची तयारी करण्यासाठी. तसेच पोथी वाचायची ती कशाकरिता? साध्य काय, साधन काय हे जाणून घेऊन साधनाची तयारी करण्यासाठी.


आम्ही साधनांची तयारीच करीत नाही. मग साध्य मिळेल कसे? लोभी जास्त पैशासाठी हावरा असतो. त्याप्रमाणे पोथीतील सार जे असेल त्याकडे लोभ्याप्रमाणे लक्ष असावे.


जगातील प्रत्येक वस्तूत गुण आहेच. फक्त आम्ही तो पाहत नाही. सर्व ठिकाणी परमात्मा आहे हे ध्येय आहे.


आशीर्वाद.

🌼🍀🌸

   💧🌷श्रीराम समर्थ🌷💧


अमृतधारा  ६८१


आपली वृत्ती अगदी स्वार्थी असते. ती तशी नसावी. स्वार्थ म्हणजेच तनुभाव  देहबुद्धि. ती गेल्यावाचून गुरुमधील गुण आपल्या अंगी येणार नाही.


गुण अंगी यावे असे वाटत असेल तर मन शुद्ध पाहिजे. भूमी (शेत) नांगरून, वखरून, शुद्ध केल्यावाचून बी रुजणार नाही.


अंतर शुद्ध झाल्यावाचून गुरुचे ज्ञानबीज रुजणार नाही. भगवंताचे गुण आपल्या अंगी यावे असे वाटत असेल तर अंतर शुद्ध पाहिजे.


मन ज्या संगतीने दूषित होते, ती संगती टाळावी. गाणे गावे असे वाटत असेल तर गाणाराची संगत धरली पाहिजे. तसे न करता आपण इतराची संगती धरतो. मग गाणे कसे येईल?.


तद्वतच, देव ज्यांच्या हृदयात, त्या संताची संगती धरली पाहिजे.


माझेतुझे हेच मलिनत्व, ते घालवावे. द्वेष, मत्सर नाहिसे करावे. रामप्रेम साठवावे.  त्या साठी निरभिमान, निर्मत्सर झाले पाहिजे.


आशीर्वाद.

🌸🌸🍀

   🌷💧श्रीराम समर्थ💧🌷


अमृतधारा  ६८२


परमार्थ हे अनुभवाचे शास्त्र आहे. आपपर भाव ठेवूच नये. भगवंताचा मी आहे म्हणवितो, त्याचेच हे जगत आहे. अशी दृढ भावना ज्या वेळी होईल, त्याच वेळी आपपर भाव जाईल.


मानवास विचार करण्याची बुद्धी दिली ही रामाची कृपाच आहे.


पण ज्याप्रमाणे बापाने दिलेल्या पैशाची उधळपट्टी मुलगा करतो त्या प्रमाणे परमात्म्याने मानवास दिलेल्या बुद्धीची उधळपट्टी मानव करतो. त्यास त्याची किंमत वाटत नाही.


लोकांस नीतीच्या गप्पा सांगतो. स्वतः मात्र अनीतीने वागतो. लोकांस सांगतो तेच जर तो स्वतः आचरणात आणील तर किती चांगले होईल !!


आधी केले मग सांगितले.  हा समर्थांचा उपदेश आहे.


परमार्थ हा अरुंद वाटे प्रमाणे आहे. फार सांभाळले पाहिजे. अहंभावाने दुर्लक्ष केले तर पतन होण्यास वेळ लागणार नाही.


आशीर्वाद.

🌷☘🌷

   

   🌷☘श्रीराम समर्थ☘🌷


अमृतधारा  ६८३


मी रामाचा म्हणणे हाच परमार्थ. अहं बुद्धी ठेवणे हा प्रपंच.


आम्ही परमार्थरूपी दुधात अहंरूपी पाणी मिसळून त्या मिश्रणाची देवघेव करतो, मग तो सुखरूप कसा व्हावा?


परमार्थात अहंकार मिसळला की तो प्रपंचच झाला. प्रपंचातील अहंकार दूर झाला कि तोच परमार्थ  झाला.


शुद्ध मनाने राम बघावा. तोच गुरुरूप आहे. त्याचेच अनुसंधान असावे.


अवधूताने २४ गुरु केले. त्याची वृत्ती शुद्ध असली पाहिजे. चोवीस गुणापैकी एक जरी गुण अंगी बाणला तरी पुरे.


तो एक गुण बाणल्यास सर्व गुण आपोआप येतील. जो सद्गुण आपल्यात नाही तो बाणविण्याचा प्रयत्न करणे यासच अभ्यास म्हणतात.


रामाच्या प्रित्यर्थच सर्व करतो ही भावना असावी. "मी माझ्याकरता जगलो" असे न म्हणता "रामाकरता जगलो" असे म्हणुया म्हणजे रामाचे गुण अंगी येतील.


आशीर्वाद.

☘🌸☘

   💧🌷श्रीराम समर्थ🌷💧


अमृतधारा  ६८४


प्रपंचाकरता जगतो म्हणून प्रपंचाचे गुण येतात. म्हणून भगवंताकरिता जगावे.


प्रपंच हा साधन आहे. परमार्थ हे साध्य आहे. फिरावयाचे वेळी वृद्ध लोक काठी घेतात ते काठीला फिरविण्यासाठी  नव्हे.


प्रपंचाकरिता भगवंताची जरुरी आहे असे म्हणणे म्हणजे काठीस हिंडून आणण्यासाठी ती घेतो असे म्हणण्यासारखे आहे.


प्रपंच कुणाला सुटला आहे? साधूसंत त्याचा सदुपयोग करतात, आम्ही तो करीत नाही. म्हणून आम्हाला परमार्थ साधत नाही.


जगात तीन गोष्टी दुर्मिळ आहेत.

१) मनुष्य जन्म.

२) संत समागम.

३) मुमुक्षुत्व.


परमार्थाकरिताच मनुष्य जन्म आहे, विषय भोगासाठी नव्हे. परमार्थाची तळमळ लागली पाहिजे. मन शुद्ध झाल्यावर तळमळ उत्पन्न झाल्यावर राम भेटेलच.


भगवद्स्मरणास प्राणाहीपेक्षा जास्त समजून सांभाळावे. संत, सद्गुरु व शास्त्र यांच्या वचनांवर दृढ विश्वास ठेवावा. असे झाल्यास प्रपंच परमार्थरुपच होईल.


आशीर्वाद.

🌷🍀🌷

   🌷💧श्रीराम समर्थ💧🌷


अमृतधारा  ६८५


समई लावली पण तेल वरचेवर घातले नाही तर ती विझेल. स्मरणरुपी तेल वारंवार घालावे. मग परमार्थाचा दिवा कायम राहील.


मी प्रपंचाकरिता नसून रामाकरिता आहे  ही दृढ भावना ठेवावी. परमार्थ हा मुख्यतः अनुभवाचा मार्ग आहे.


पंढरपूरास जाणे असल्यास वाट चालू लागले पाहिजे. मग मार्गात कोणीतरी वाट दाखवणारा भेटतोच. निदान पाट्या तरी आढळतात.


परमार्थाच्या मार्गावर आम्ही प्रत्यक्ष चालूच लागत नाही, मग मार्गदर्शक कसा भेटणार!


आपण एखादे सत्कार्य करण्यास सुरुवात करावी. मग आपणास मार्गदर्शक अथवा दुसऱ्याची मदत खास मिळेलच.


परमार्थ मार्गी चालू लागल्यावर गुरु खास भेटेलच. म्हणून रामाचे अखंड स्मरण ठेवून मार्गास लागुया. कोणीतरी संत भेटल्याशिवाय राहणार नाही.


आशीर्वाद.

🌸🍀??

   🌷☘श्रीराम समर्थ☘🌷


अमृतधारा  ६८६


प्रपंच हा रामाकरिता आहे. नुसते विषय उपभोगण्यासाठी नाही, हे ध्यानात ठेवावे.


आचार व विचार याची सांगड घालावी. पोथीत जे ऐकतो, वाचतो ते थोडे तरी कृतीत येणे जरूर आहे.


पोथी (पुस्तक) वाचल्यानंतर जेवढे कळले तेवढे तरी आचरणात आणण्यास काहीच हरकत नाही. जे कळले नाही तेही पुढे हळूहळू कळेल.


घरातून बाहेर पडल्यावर एकदम मुक्कामाचे स्थान दिसत नाही. प्रथम एक रस्ता, मग दुसरा, मग तिसरा असे करता करता (माणुस) मुक्कामी पोहचतो.


तद्वतच, पोथीतील सगळे कळले नाही म्हणून जे कळले तेवढे तरी कृतीत आणुया. सगळे कळले नाही म्हणून जे कळले तेही कृतीत आणायचे नाही असे करु नये.


दृढ निश्चयाने एक एक मार्ग आक्रमित केल्यास मुक्काम खास येईलच. म्हणून भगवत्स्मरणास जपले पाहिजे.


आशीर्वाद.

☘🌷☘

   🌷💧श्रीराम समर्थ💧🌷


अमृतधारा  ६८७


देहसंबंध जो धरील त्यासच पुढे कर्तव्य,  कर्माचा प्रश्न उत्पन्न होतो. संत मुळी देहसंबंधच ठेवत नाहीत. मग कर्तव्याचा प्रश्नच शिल्लक राहत नाही.


साधकाने देहाचे कर्तव्य प्रारब्धावर टाकून मनाने मात्र ईश्वर उपासना करावी. तरच समाधान लाभेल.


आम्हास समाधान का मिळत नाही? जे करू नये ते करतो म्हणून. परमार्थाचे शुद्ध पाणी, मी  ममत्वाच्या चिखलाने आम्ही गढूळ केले आहे. मग भगवंताची प्राप्ती कशी व्हावी?


देहास सुखदुःख प्रारब्धाने मिळते. दुःख कोणासही नको आहे. पण ते येते. तसेच सुखाचेही आहे. म्हणून त्याच्या नादी लागणे बरे नाही.


दुःखाचे कारण वृथा,  अहंकृती. सत्कर्म आपण करतो. ते अहंकाराने केल्यास बिघडते.


अहंकृती येऊ न देणे हेच महत्वाचे, प्रथमचे कार्य आहे. याकडे आपण दुर्लक्ष करतो व दुसरी मोठी पुण्य कर्मे करण्यास धावतो.


आशीर्वाद.

🍀🌸🍀

   🌷☘श्रीराम समर्थ☘🌷


अमृतधारा  ६८८


अगदी सोपे जवळचे असे नम्रतेचे साधन भक्ती. ते टाकून इतर मोठमोठी साधनें करण्यास आपण धावतो पण खरे समाधान प्राप्त होत नाहीच. खऱ्या कर्तव्याची जाणीव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत समाधान होणार नाही.


तुकाराम, गोराकुंभार, चोखामेळा या संतांनी आपले खरे कर्तव्य ओळखले. भलत्याच नादी ते लागले नाही. भक्ती करण्यास काहीही आड येत नाही हे ते जाणून होते.


कोणाचाही मत्सर न करणे हे परमार्थाचे वर्म जाणून ते भक्तीच्या मागे लागले. त्यांना कोठे कमीपणा आला? उलट ते वंद्यच झाले.


आम्ही मुख्य भक्ती सोडून इतर गौण गोष्टींच्या मागे लागतो. त्यांनी देहाकडे न बघता देवाकडेच फक्त पाहिले. म्हणून त्यांस सर्व साधले. आम्ही देवाकडे पाहतो असे दाखवतो, पण खरे पाहतो देहास,  म्हणून सर्व बिघडते.


आशीर्वाद.

☘🌷☘

   🌷☘श्रीराम समर्थ☘🌷


अमृतधारा  ६८९


नकाशात काशी असते. ती पाहिली म्हणजे खरी काशी पाहिल्यासारखे होत नाही. त्याचप्रमाणे पोथी पुराणे नकाशाप्रमाणे आहेत. संत मात्र प्रत्यक्ष काशी पाहिलेल्या माणसाप्रमाणे असतात.


खरी तळमळ असल्यावाचून संत भेट होत नाही. उपाधीचे प्रेम जोपर्यंत आहे तोपर्यंत खरे कर्तव्य होतच नाही.


देहाभिमानाने वादविवाद वाढतात. संत देहाभिमानासच तिलांजली देतात. म्हणून त्यांच्याजवळ हे वाद नाहीत.


सर्व सधारणपणे रोग होण्यास पोट साफ नसणे हे कारण होय. त्याप्रमाणे सर्व दुःखास कारण देहबुद्धि आहे. ती जाण्यास उपाय एकच. प्रेमाने भगवद् नामस्मरण करणे.


नामस्मरण केल्यास सर्व मल जाईल (वृत्ती निर्मल होईल). नामस्मरणच रामाची व रामदासांची गाठ घालून देईल. चित्तात  तळमळ मात्र पाहिजे. तीच संत दर्शन घडवून आणील.


आशीर्वाद.

🌼🌿🌼

   ☘🌷श्रीराम समर्थ🌷☘

अमृतधारा  ६९०


मीपणा टाकावा व परमात्म्याचे व्हावे. मीपणा घालवण्यास नामस्मरण हा एकच उपाय आहे. ते करीत असता व्यवहार कधीच बिघडणार नाही.


ऐश्वर्याच्या मांडीवर बसण्यात सुख नाही. धृवाप्रमाणे सर्वस्वाचा त्याग करून भगवंताचे अनुसंधान धरले पाहिजे.


सर्वस्वापैकी आपण सर्व देतो पण स्व देत नाही. त्यामुळे काहीच न दिल्यासारखे होते. "स्व" जर दिले तर देवाचे सर्व प्राप्त होईल.


मनाने भगवंताचे स्मरण व देहाने कर्तव्य करावे. पण याचे उलट आपण करतो. त्यामुळे खरे सुख मिळत नाही.


धर्माला सनातनत्व, बंधन व मर्यादा यामुळे आले आहे. जेथे मर्यादा नाही व अनर्गलत्व (असंयमितता) आहे,  तेथे धर्म नाही. धर्म नाही तेथे देव नाही व देव नाही तेथे समाधान नाही.


आशीर्वाद.

🌹🌼🍀

   🌷☘श्रीराम समर्थ☘🌷


अमृतधारा ६९१


जगाने आपला घात करण्यापेक्षा आपणच आपला घात करत असतो. श्रीरामाचे (नामाचे) विस्मरण होणे हाच घात होय. तो आपल्या मागे उभा आहे असे समजून वागुया. मग अनीतीचे वर्तन होणारच नाही.


नीतीने चालल्यास शांति दूर नाही. असे वागेल त्याला काही कळले असे म्हणता येईल. म्हणून आपण भगवंताचे होऊन राहुया. देहाचे कर्तव्य फलापेक्षा सोडून करुया म्हणजे झाले.


शांति येण्यास कारण जग, परिस्थिती नसून अंतःस्थिती हेच कारण आहे. अंतःस्थितीत द्वैत बुद्धी नसावी. पृथ्वी ही क्षमा, शांतिरूप आहे. त्याप्रमाणे संत असतात. जेथे स्वार्थ तेथे अशांति.


भगवंताहून मी निराळा अशी जेथे द्वैत भावना, तेथे खरी शांति नाही. अनन्यतेने शांति प्राप्त होते आणि तोच परमार्थाचा पाया आहे.


आशीर्वाद.

🌼🌹🌼

   💦🌷श्रीराम समर्थ🌷💦


अमृतधारा  ६९२


नामास बसलो की मनात नाना विकल्प येतात. मन नश्वर वस्तूकडे लावल्यास जीव नश्वर होतो. शाश्वत असा जो भगवंत, त्याजकडे मन लावल्यास जीव शाश्वत होईल.


पैका, मोठेपणा अशाश्वत आहे. तेथे चित्त ठेवल्यास अशांतीच येणार. रामाचे पाय हेच शाश्वत आहेत. तेथे मन ठेवावे.


शांति बिघडण्यास दोन कारणें

१) गत गोष्टीचा शोक.

२) पुढील चिंता.

या दोन्ही गोष्टी आपण व्यर्थच करतो. मागील व पुढील दोन्ही ईश्वराधीन आहे असे दृढ समजल्यास शांति येईल.


महत्वाची गोष्ट म्हणजे सदाचरण.  सदाचरण जर नसेल तर शांती कधीही येणार नाही. पश्चात्ताप करण्याची पाळी येईल. म्हणून प्रत्येक कर्म भगवंताच्या साक्षीत्वाने करावे.


भगवंतास साक्ष ठेवून केल्यास दुष्कर्म हातून घडणार नाही. सदाचरण हा परमार्थाचा पाया आहे. पाया मजबूत नसेल तर इमारत ढासळून पडेल. भगवंताला विसरतो म्हणून उद्याची तळमळ वाटते.


आशीर्वाद.

🍀🌼🌹

, 🌷💧श्रीराम समर्थ💧🌷


अमृतधारा  ६९३


नवविधा भक्तीत जशी श्रवण ही पहिली भक्ती, तसे संत लक्षणात पहिले लक्षण शांति आहे. वास्तविक संताची लक्षणें सांगता येणार नाहीत. पण समजुती करता असे म्हणता येईल की शांति हे संताचे मुख्य लक्षण आहे.


वडीलांचे पत्र मुलास आले की तो ते पत्र प्रेमाने वाचत असे पण कृती मात्र उलट करी. त्यामुळे वडिलांस वाईट वाटे.


तसे सद्ग्रंथ, पोथ्या ही देवाची (संतांची) पत्रे होत. आपण ती मोठ्या प्रेमाने वाचतो व सांगतो, पण कृती तशी नसते म्हणून देवास अप्रिय होतो.


सद्ग्रंथ हे आईच्या दुधाप्रमाणे तर बाकीचे ग्रंथ दाईच्या दुधाप्रमाणे आहेत. सद्ग्रंथ आपल्यास आलेल्या प्रिय व्यक्तीच्या पत्राप्रमाणे वाचावे. ग्रंथ माझ्याच करता सांगितला आहे असे समजून वाचावे.


ग्रंथ वाचावयाचे ते कशाकरता? वृत्ती सुधारण्यासाठी. श्री एकनाथांची शांति अगाध होती. मनातील शांति कायम ठेवून रागावता येते. तसे केल्यास हातून प्रमाद घडत नाही. नाथांसारखी शांति येण्यास परम भाग्य पाहिजे.


आशीर्वाद.

☘🌼🌹

   🌷☘श्रीराम समर्थ☘🌷


अमृतधारा  ६९४


राजेरजवाडे आले आणि गेले. पण ज्ञानेश्वरांचे नाव मात्र राहिले. कारण ते शांतिची मूर्ती होते.


ही शांति काय केले असता मिळेल? भगवंताच्या स्मरणावाचून अन्य उपायांनी ती मिळणार नाही. जे जे घडते ते भगवंताच्या इच्छेने घडते ही दृढ भावना असणे हे शांतीचे लक्षण आहे.


परमार्थाची तत्वे व्यवहारात उपयोगी असतात. आपला कर्तृत्वाचा अभिमान हा शांतीच्या आड येतो.


विद्या, वैभव, संपत्ती, संतती, कला  याने शांति येत नाही. मोबदल्याची अपेक्षा करणे हे अशांतीचे मुळ आहे. निरपेक्षता हे शांतीचे मूळ आहे.


प्रपंच सुखरूप समजून करू नका. तो अनासक्त बुद्धीने करावा.भगवंताचा मी आहे समजून व्यवहारात वागावे.


आशीर्वाद.

🍀🌼🌸

   ☘🌷श्रीराम समर्थ🌷☘


अमृतधारा  ६९५


प्रपंच करु नये असे नव्हे. तो अवश्य करावा. नाटकातील पात्र जसे आपले काम चोख करते, त्याप्रमाणे प्रपंचातील आपले कर्तव्य करावे.


नाकासमोर चालणे हा परमार्थ. वारा येईल तशी पाठ देणे हा प्रपंच. मनाविरुद्ध गोष्ट घडल्या तर भगवंताची आठवण करावी. म्हणजे आपोआप शांती येईल.


ही गोष्ट अशक्य नाही. संत जे साधन सांगतात ते आपल्या शक्तीप्रमाणेच असते. शांती परमात्म स्मरणात मिळते. जेथे समाधान, तेथे देवाचा वास.


प्रपंच करताना भगवंताचे अखंड स्मरण ठेवावे, व खुशाल प्रपंच करावा. संत जो बोध सांगतात त्याचे आचरण आपण थोडे तरी करुया.


भगवंताचे अधिष्ठान ठेवून प्रत्येक कर्म करावे. जेथे भगवंताचे स्मरण तेथे माया नाही. जेथे अभिमान व माया आहे, तेथे भगवंत नाही.


आशीर्वाद.

🍀🌼🌹

   🌷💧श्रीराम समर्थ💧🌷


अमृतधारा  ६९६


दानाचेही महत्त्व फार आहे. पैसा आणून गळ्याशी बांधला तर तो बुडवील. त्याचे यथायोग्य दान केले तर तो तारील.


भगवंत खरा श्रीमंत दाता आहे. त्याचेच होऊन राहिल्यास तो आपणास दिनवाणे कसा बरे ठेवील! भगवंत श्रीमंताचा श्रीमंत आहे. तो  सर्वांस सुखी करील बरे.


उपासना याचा अर्थ भगवंताच्या निकट असणे. उपास्याचे गुण अंगी आणणे. तुलसीदासांनी रामोपासना अशी केली की स्वतः रामरूप बनले. त्यांना रामावाचून काही दिसत नव्हते.


तुलसीदासांचे रामाचे अंतरातील प्रेम रामायण रुपाने बाहेर उतास आले. रामायण ऐकत असता मनुष्य तल्लीन होऊन जातो. कथा सांगत असता तुलसीदास स्वतःस विसरून जात.


राम पूर्वीचा जरी असला तरी तुलसीदासांच्या कथेमुळे तो आज प्रत्यक्ष आहे असे वाटते. रामाची भक्ती कशी करावी हे त्यांनी सांगितले.


मानवास राम चरित्र हेच आदर्श आहे. रामरूप होण्यास रामासारखे निस्वार्थी बनले पाहिजे. रामाने "जग माझ्या करता आहे" असे न म्हणता "मी जगाकरता आहे" असे म्हटले. हाच खरा परमार्थ.


आशीर्वाद.

🌷☘🌼

   🌷💧श्रीराम समर्थ💧🌷


अमृतधारा  ६९७


रामाने जसा व्यवहार उत्तम केला तसा प्रत्येकाने करावा. एकपत्नी व्रत व सत्यभाषण हे रामाचे दोन प्रमुख गुण होते. एवढे जरी आचरणात आणले तरी पुरे.


कामिनी आणि वाणी या दोन गोष्टी जिंकाव्यात. रामासच ज्याने आपले सर्वस्व मानले त्यासच या गोष्टीं साधतील.


इतर अवतारातही महत्वाच्या गोष्टी आहेत. परंतु रामचरित्र प्रापंचिकास अत्यंत आदर्श रूप आहे. राम हा कल्पतरू आहे. त्याचेजवळ काय मागावे हेच कळत नाही.


आपण रामाजवळ अमुक दे तमुक दे असे मागत असतो. रामास आपण नश्वर पदार्थ, गोष्टी मागतो. तोच ते देतो. त्याला आपण होऊन देण्याची संधीच देत नाही म्हणून आपले चुकते.


आपण रामावर सोपवत नाही. त्याचेवर सोपविल्यास तो कायमचे कल्याणच करील.


आशीर्वाद.

🍀🌼🌸

   💧🌷श्रीराम समर्थ🌷💧


अमृतधारा  ६९८


रामप्रेम हे वयावर किंवा बुद्धीवर नसते. ते राम कृपेवाचून मिळत नाही. "रामा, मी तुझा होण्यास जे लागेल ते दे". असे म्हणावे.


विद्येने, पैशाने राम कधीच संतुष्ट होत नाही. बापापेक्षा मुलगा हा वयाने (अनुभवाने) कधीच अधिक होणार नाही. उंच होईल, श्रीमंत होईल पण बापापेक्षा धाकटाच राहील.


तद्वतच, मनुष्य कितीही श्रीमंत, विद्वान झाला तरी तो रामापेक्षा लहानच असणार. असे असता मनुष्य उगाच अभिमान वाहतो.


रामाला अत्यंत नम्रतेने प्रसन्न करून म्हणावे,  "रामा, मी तुझा आहे. माझे दोष पाहू नकोस. मला तुझे प्रेम दे".


रामाचा विसर पडून प्रपंच करणे हाच मोठा दोष आहे. प्रापंचिकास काय दुःखे असतात हे राम जाणतो. कारण रामाने प्रपंच केला होता.


राम हा त्रैलोक्याचा स्वामी आहे. त्याचे आपण सेवक आहोत. ही भावना असावी.


आशीर्वाद.

🍀🌸🌼

   💧🌷श्रीराम समर्थ🌷💧


अमृतधारा  ६९९


आपण रामाचे सेवक आहोत. पण आपण त्याचे उलट करतो. नोकरी दुसऱ्याची करतो व पगार मात्र रामाजवळ  मागतो. तसे करू नये. आपण खरेखुरे रामाचे दास व्हावे.


"रामा तुझ्या चरित्र, गायन, वाचनात मला विसरू दे" हे मागावे. मग तो आपली भक्ती देतो. ज्ञान, योग, प्राणायाम वगैरे भगवंतावाचून येऊ शकेल. पण भक्ती मात्र भगवंतावाचून येणार नाही. "भक्ती ही भगवंताची देणगी आहे."


रामाचे प्रेम कसे लागेल? तर ते त्याचा सहवास सदोदित केल्याने लागेल. ते नामाच्या सहवासाने, स्मरणाने साधेल. राम फार दयाळू आहे. त्याच्यामुळे आपण जगलो आहो हेच आपण विसरतो. रामाचे प्रेम येण्याकरता रामचरित्रही वाचावे.


रामचरित्र वाचत असता त्यात अगदी रंगून जावे. रामचरित्रात पूर्ण रंगून जाणे हे प्रत्यक्ष आवडीचे पक्वान्न खाण्यासारखे आहे. नुसते प्रेमाशिवाय वाचणे हे वस्तुंची यादी करण्यासारखे आहे.


आशीर्वाद.

🍀🌼🌸

, 💧🌷श्रीराम समर्थ🌷💧


अमृतधारा  ७००


परमात्मा सच्चिदानंदरुप सर्व सृष्टीत भरला असता जीव दुःखी कां? साखर गोड असते पण एखाद्यास कडू कां लागावी?


तुलसी रामायणासारखे सद्ग्रंथ, त्यांची गोडी काहींनाच का लागावी? इतरांना कां नसावी?


साखर एखाद्यास कडू लागत असेल तर तो दोष साखरेत नसून खाणाऱ्याच्या मुखात आहे.


पंढरपूरचा विठोबा आम्हांस ओबडधोबड दगडाचा दिसतो पण तुकाराम महाराजांस तो "सुंदर ते ध्यान" असा दिसावा. याचे कारण आम्हांस तुकारामांसारखे प्रेम नाही.


तुलसीदास वगैरे संतांचा मीपणा मेला होता. म्हणून ते रामपणे चिरंजीव झाले. ते भगवंताच्या छायेत राहिले. आम्ही मायेच्या छायेत राहिलो.


देहाभिमानाने आम्हांस पोखरले आहे. विषयाचे प्रेम आम्हास आहे,  त्यामुळे भगवंताचे प्रेम कसे येणार?


आशीर्वाद.

🍀🌼🌸

, 💧🌷श्रीराम समर्थ🌷💧


अमृतधारा  ७०१


रामचरित्राचा अभ्यास केल्यावाचून आम्हास रामप्रेम येणार नाही. भिकारी, चोर, साव सर्वच भगवंताचे नाम घेतात. पण प्रल्हादासच भगवंत प्रसन्न झाले, का?


त्याचे प्रेम निरपेक्ष होते, निस्सीम होते. आमचे तसे नाही. "मी कर्ता" हा अभिमान सोडल्यावाचून भगवंत प्रसन्न होणार नाही. अंधार गेल्यावाचून प्रकाश नाही. पण प्रकाशानेच अंधार जाईल. तसे राम भजनानेच (नामस्मरणाने) अहंकार जाईल.


जीव हा पूर्ण पराधीन असता तो विनाकारणच अभिमान करत असतो. निदान श्रवण करीत असता तरी निरभिमानाने श्रवण करावे.


मी देहाचा न म्हणता, मी रामाचा म्हणावे. शंकराचार्य व तुकाराम महाराज  दोघेही साधूच. खेड्यातील आई आणि शहरातील आई सारखीच. दोघींच्या आईपणात काहीच फरक नाही.


ज्ञानी होऊन नामस्मरण करणे किंवा भक्त होऊन नामस्मरण करणे एकच आहे. दोन्हीकडे भगवंताचे प्रेम मुख्य आहे.


आशीर्वाद.

🍀🌸🌺

   🌷💧श्रीराम समर्थ💧🌷


अमृतधारा  ७०२


रामचरित्र सामान्य नाही. ते एखाद्या कादंबरीतील राजा राणीचे चरित्र नाही. रामचरित्रात अलौकिकता आहे. म्हणून रामचरित्र निरभिमानाने गावे.


अभिमानाचा विटाळ ज्यास झाला तो कितीही सोवळा झाला तरीही ओवळाच. तसेच मीपणा ठेवून सत्कर्म केल्यास तो शुद्ध कसा होईल. रामनाम स्मरण हाच एक मीपणा घालविण्यास उपाय आहे.


जे आपणास आवडते तेच आपण पाहतो किंवा ऐकतो व त्याचाच आपल्या मनावर परिणाम होत असतो. प्रत्येकास देवाची कृपा व्हावी असे वाटते. पण आपण पाहतो ऐकतो मात्र दुसरे. त्यामुळे ईश्वर कृपा होत नाही.


देवाने कृपा करावी म्हणजे मला धन, सुख, दारादिक द्यावे असे वाटते. पण हे मागणे म्हणजे भगवंत अंतरेल तेच नेमके मागणे नव्हे काय?


आशीर्वाद.

🌹🍀🌹

  :  🙏🏻

    ,    '   .      .


 .

 .

  

   .

        .

  . 🙏🏻

  : < >

  :  🙏🏻💐

   🌷💧श्रीराम समर्थ💧🌷


अमृतधारा  ७०३


आपण भगवंतापाशी नश्वर विषय सुख मागतो म्हणून देव दुरावतो. जीवाला देवाजवळ काय मागावे तेच कळत नाही.


जीव हा शाश्वत सुखासाठी वास्तविक ईच्छा करतो पण मागतो मात्र अशाश्वत विषय. शाश्वत सुखरूप एक परमात्माच आहे. तो न मागता आपण क्षणिक विषय मागतो. हाच भ्रम होय.


प्रपंचात कसे चिकाटीचे प्रेम असते, अनंत अडचणी तरी प्रपंच सोडवत नाही, तसे देवावर प्रेम झाले पाहिजे. अनेक अडचणी आल्या तरी देवावरील प्रेम कमी न व्हावे.


रामाच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न होईल असे रामायण वाचले, ऐकले पाहिजे. कितीही अडचणी आल्या तरी रामकथा सुटली नाही म्हणजे रामप्रेम खरे म्हणायचे.


म्हणून नित्य नेमाने रामकथा श्रवण करावी. मग अनायासे रामकृपा होईल.


आशीर्वाद.

🍀🌼🌹

   💧🌷श्रीराम समर्थ🌷💧


अमृतधारा  ७०४


आपल्या मनातील संकल्प प्रपंचाच्या आसक्तीने खारट होत असतील तर ते आसक्तीरूपी खारटपणा काढून टाकून भगवत्प्रेमाने गोड करावेत.


प्रत्येक संकल्प उठताच त्यावर रामनामाचा शिक्का उठवावा. मग  आनंद खास दुणावेल. व्यवहार करताना सुद्धा रामनाम स्मरणाचा अभ्यास केला पाहिजे.


असे काही करुया की, जेणे करून राम संतोष पावेल. राम दयामूर्ती आहे. रामभक्तीचा ओलावा रामचरित्र वाचल्याने येईल. अगदी मनापासून वाचावे.


पाऊल पुढे टाकीत गेले पाहिजे. हळूहळू टाका पण परतवू मात्र नका. मनुष्य जन्माची ही मोठी संधी प्राप्त झाली आहे. ती व्यर्थ दवडू नका.


रामाविषयी खरे प्रेम उत्पन्न होण्यास प्रथम बळेच स्मरणाचा अभ्यास केला पाहिजे. नंतर हळूहळू खरे प्रेम उत्पन्न होईल.


आशीर्वाद.

☘🌼🌸

   💧🌷श्रीराम समर्थ🌷💧


अमृतधारा  ७०५


जो जो संकल्प उठेल तो तो रामनाम स्मरणयुक्त उठला पाहिजे. रामाच्या लीला वर्णन करताना स्वतःस विसरले पाहिजे. ज्या गोष्टीचा विसर पडणे जरूर आहे त्याची आठवण नसावी.


राम दयाळू आहे, तो सर्वास भेटू शकतो. त्याची आठवण मात्र असावी. "मनी नसे तरी नसो, परी वाचे तरी असो."


भगवंताचे प्रेम भगवंतच देणार. दुसरे कोण देणार! भगवंतास शरण गेल्यावर तो भक्तास दुःखी ठेवणारच नाही.


रामायणातील कोणता भाग गोड आहे हे विचारणे म्हणजे पेढा कोणत्या बाजुने गोड लागेल असे विचारण्यासारखे आहे. रामचरित्र सर्वांग सुंदर आहे.


रामचरित्र वाचल्यावर आनंदच होतो, धन्यता वाटते, परमार्थात प्रगती होत आहे असे वाटते. रामचरित्र वाचताना, सांगताना अथवा ऐकताना आपण रामप्रेमात स्वतःला विसरून जाणे ही फार उच्च अवस्था होय.


आशीर्वाद.

🌸🌼🌺

   🙏🏼🌷जय श्रीराम🌷🙏🏼


अमृतधारा  ७०६


ज्यावर आपले अत्यंत प्रेम असते, त्याचे बोलणे, चालणे सर्वच आपणास आवडते. ते मधूर वाटते. त्याच्याविषयी आपण कौतुक करतो.


तशी रामाची प्रत्येक कृती गोड वाटली पाहिजे. रामाने सकल वैभव आणि सुख यांचा त्याग करून वनवास पत्करला. पितृआज्ञा पाळली.


या त्याच्या थोर कृत्याचा वारंवार विचार करावा. केवढा हा त्याग! किती हा संयम! किती असामान्य पितृभक्ती!  काय निर्लोभता! काय कर्तव्य निष्ठा!


या प्रत्येक गुणाचा विचार करावा. आपण तसे वागण्याचा प्रयत्न करावा. कोणी म्हणतील रामाचा काळ वेगळा, आताचा काळ वेगळा. पण तसे नव्हे.


तो ज्या मार्गाने गेला तो आजही अनुकरणीय नाही काय?


आशीर्वाद.

🌹🌼🍀

   🌷☘श्रीराम समर्थ☘🌷


अमृतधारा  ७०७


श्रीरामाच्या मातृपितृ भक्ती, एकपत्नीव्रत, बंधुप्रेम, सहिष्णुता, निर्लोभत्व, अत्यंत प्रेमळपणा, शौर्य आदि गोष्टी आजही आदर्शभूत नाहीत काय?


सत्य निष्ठा आजही मान्य व स्तुत्य नाही काय? काळ वेगळा असला तरी नीती तत्वे सर्वकाळी अबाधितच असतात.


पुंडलिकाने मातापित्याची सेवा केली. आजही या गोष्टीची जरुरी आहे ना? म्हणून रामचरित्र सर्वांस सर्वकाळी आदरणीय व अनुकरणीय आहे.


रामाविषयी प्रेम वाटावे, तद्रूप व्हावे असे वाटत असेल तर रामकथा अगदी मन लावून ऐकावी व तिचे मनन करावे.


जगाला जोपर्यंत आपण हवे असे वाटत असेल तोपर्यंत आपण जगणे उत्तम, हे खरे ना! जगाला नकोसा मनुष्य जगणे बरे नव्हे. तो जगला तरी भारभूतच आहे.


रामाचा वियोग दशरथास जसा सहन झाला नाही, तसे रामावाचून आपले जिणे व्यर्थ आहे असे मानावे.


आशीर्वाद.

🌷🍀🌼

   🌼🌷श्रीराम समर्थ🌷🌼


अमृतधारा  ७०८


दशरथास रामाचा वनवास दुःखदायक वाटला, पण त्याहीपेक्षा त्याचा वियोग जास्त दुःखदायक वाटला. वियोगात स्मरण तीव्रतर असते.


राम आपल्या हृदयात आहे ही भावना सतत ठेवुया. तेच अनुसंधान नेहमी ठेवणे हाच रामाचा सहवास करणे होय. हीच उपासना होय.


राम(नाम) स्मरण ज्यास नाही तो जिवंत असून मेल्यासारखा आहे, कारण त्यात राम नाही. "रामाहून मी वेगळा नाही व तो माझ्या हृदयात आहे." असा दृढ निश्चय करून ही भावना वाढविली पाहिजे.


भावनेत देव आहे. अभावात देव नाही. भिक्षेकरीही राम राम म्हणतात पण ते दृढ भावनायुक्त नाही. रामदासांनी दृढ भाव धरला म्हणून हे रामरुपी महद् भूत हाती आले.


या महाभूताची बाधा आपल्याला झाली पाहिजे. त्याचे वेड लागले पाहिजे. त्याच्या नामात रंगले पाहिजे, नाचले पाहिजे, रडले पाहिजे. ही बाधा  सर्व बंधनास दूर करते.


आशीर्वाद.

🍀🌼🌸

   🌹🌼श्रीराम समर्थ🌼🌹


अमृतधारा  ७०९


या रामरुपी महाभूताचे वेड सर्व ज्ञान्यास वेड लावणारे आहे. ही बाधा मृत्युला भिवविणारी आहे.


मरणाचे स्मरण असावे असे म्हणतात ते कशाकरता? आयुष्य क्षणभंगुर आहे म्हणून शक्य तितक्या लवकर जीवाने रामास आपलेसे करून घ्यावे. म्हणून रामाची आवड धरुया.


"भगवंता, तुझ्यावाचून काहीच नाही" असे म्हणुया. कोणत्याही परिस्थितीत रामास न विसरणे हेच सुखी असणे आहे. याप्रमाणे सुखात राहुया.


रामाच्या वियोगात देहाचे स्मरण आहे व रामाच्या योगात देहाचे विस्मरण आहे. आपण देहभान विसरणे यातच आनंद आहे. रामाच्या सहवासात आनंद आहे.


सीतेने रामाचा सहवास मागितला. रामाच्या सहवासात तिला अरण्य अयोध्येप्रमाणे व तेथील सर्व दुःखे सुखरूप वाटली. रामाच्या सहवासातला आनंद प्रपंचाची दुःखे विसरवितो.


आशीर्वाद.

🍀🌸🌼

   🌸💧श्रीराम समर्थ💧🌸


अमृतधारा  ७१०


राम वनात गेल्यामुळे सगळी अयोध्या रडली, दुःखी झाली. सर्व अयोध्या वनवासरूप झाली, कारण तिथे राम नव्हता आणि अरण्य अयोध्यारूप झाले,  कारण तेथे रामनिवास झाला.


जेथे रामाचा सहवास आहे तेथे महानंद आहे. तो सहवास कशाने घडेल? तर नामस्मरणाने.. म्हणून भक्त, भगवंत व नाम हे तिन्ही एकरूपच आहेत.


जेथे नाम आहे तेथे भक्त आहे व तेथेच भगवंत आहे. म्हणून नाम सर्वात श्रेष्ठ आहे. आपण ते नाम अनन्य होऊन घेऊ या. राम कृपा केल्यावाचून राहणार नाही.


नाल्यातून, गटारातून पाणी वाहते ते किती घाण असते! पण ते नदीस मिळते व नदी सागरास मिळते. सागर त्या सर्व अशुद्ध पाण्यास सागररूपच करून टाकतो.


त्याप्रमाणे मनुष्य कितीही पापी, दोषी, अपराधी असू द्या. ज्याने नामनदी ची कास धरली, तो रामसागररूप झालाच म्हणून समजावा.


आशीर्वाद.

🍀🌹🌼

   🌼🌹श्रीराम समर्थ🌹🌼


अमृतधारा  ७११


प्रपंच वनवासासारखा आहे. राम सहवासात, म्हणजेच रामाच्या स्मरणात प्रपंचातली संकटे, दुःखे कस्पटासमान वाटतील व सर्व अडचणी दूर होतील. म्हणूनच प्रत्येकाने नेहमी "रामा, तुझा सहवास दे" हेच मागावे.


दृढ श्रद्धा असलेला मनुष्य विरळाच असतो व तोच पावन होतो. बाकीचे वाईट नसतात. ते त्या मार्गातले आहेत पण तितकी दृढ श्रद्धा नसते.


तुलसीदासांचे रामायण फारच गोड आहे. भगवंताचे प्रेम वाढावे हाच या ग्रंथाचा मुख्य विषय आहे. अंतःकरण पावन होण्यास रामचरित्राची गोडी लावून घ्यावी.


अनाथ शब्द नाथावाचून नाही व नाथास अनाथावाचून नाथत्व नाही. म्हणून राम सर्वांचा नाथ आहे. त्याच्या अखंड स्मरणात राहुया.


आशीर्वाद.

🍀🌼🌸

   🌼☘श्रीराम समर्थ☘🌼


अमृतधारा  ७१२


त्रेतायुगातला राम व कलीयुगातला राम हे दोन नाहीत, एकच आहे. सीतेस तो प्रसन्न असावा मग आम्हास का नसावा?


सीतेने आपल्याबरोबर वनात यावे अशी रामाची वा कोणाची इच्छा नव्हती. पण त्या सर्वांची इच्छा मोडून सीता वनात गेली, रामाच्या सहवासात राहिली.


याप्रमाणे रामाच्या प्राप्तीकरता धर्म, मर्यादा उल्लंघण्याचा प्रसंग आला तरी तो पत्करावा पण राम जोडावा.


आमच्या भ्रामक कल्पनेने उत्पन्न केलेला प्रपंच म्हणजे वनवासच आहे. त्या वनवासात रामाचा सहवास असावा म्हणजे दुःख पळून जाईल.


राम संसाररूपी वनवासात येण्यास तयार आहे. पण आम्हीच त्यास प्रेमाने हाक मारत नाही व आणीत नाही.


"रामा, आपण आमच्या अखंड सान्निध्यात रहावे" असे रामाला वारंवार म्हणावे.


आशीर्वाद.

🍀🌷🌿

   🌷☘श्रीराम समर्थ☘🌷


अमृतधारा  ७१३


विचार केल्यास कळून येईल की रामास खरोखर वनवास होता का? सूर्यास जसा अंधकार नाही, तसा रामास वनवास नाही. भ्रमाने आपण म्हणतो की, अंधारनाशक सूर्य आहे. तसेच रामास दुःख नाही आणि पापही नाही.


कानात अत्तराचा फाया ठेवला तर घाण दूर जाते. तद्वत रामनाम स्मरण ठेवल्यास पाप दूर जाईल व पुण्याचा सुवास दरवळेल.


राम अत्यंत दयाळू आहे. त्यास जे आवडते ते आपण आपल्या जवळ ठेवुया म्हणजे राम आपोआप आपले जवळ येईल. भगवंताला त्याचे नाम घेणारा आवडतो. नाम आवडते, तेच आपण अखंड घेऊया.


रामनाम ही रामरायाची खूण (रामनाम म्हणजे परवलीचा शब्द, पासवर्ड) आहे. ते घेणारास वैकुंठीचा पास मिळतो. असे जर आहे तर आपण रामनाम टाहो फोडून घेऊया.


आशीर्वाद.

🌷☘🌸

  +     '  

, ☘🌹श्रीराम समर्थ🌹☘


अमृतधारा  ७१४


ज्याच्या मुखी राम त्याच्या पाठी राम उभाच आहे. रामाला स्मरून कार्य न झाले तर आपली निष्ठा कमी आहे असे समजून अधिक निष्ठेने व हट्टाने नाम घ्यावे.


आपण आपले सर्वस्व रामाच्या हातात देऊया. लोक म्हणतात अंधविश्वास नसावा, पण म्हणणारे तेच करीत असतात.


आगगाडीत बसताना इंजिन ड्रायव्हरवर तो दारू वगैरे प्यायलेला नाही असा अंधविश्वास ठेवूनच बसतो ना. त्याचप्रमाणे नामावर विश्वास ठेवून कार्य करुया. या विश्वासाने आपली वृत्ती फार शांत राहाते.


राम प्रत्येकाच्या हृदयात आहे. तो पूर्ण व निरिच्छ आहे. त्यास कसलीच गरज नाही. त्याला फक्त तळमळ असलेल्या भक्तांची गरज आहे. तो त्यांची वाट पाहत उभा आहे.


पाऊस डोक्यावर आला की मग घर शाकारण्याची आठवण होते. त्याप्रमाणे संकटकाळी राम आठवतो. संकटकाळीच फक्त न आठविता सर्वकाळी राम का आठवू नये? (सर्वकाळी सतत नाम का घेऊ नये?) मग तो आपली काळजी घेईल.


आशीर्वाद.

☘🌹🌼

   🌹💧श्रीराम समर्थ💧🌹


अमृतधारा  ७१५


रामायण विषय गोड, वक्ता गोड, व श्रोता श्रवणचतुर असला की मग तेथे बहार येईलच. जसे वाढणारा उदार व खाणारा पट्टीचा असला म्हणजे फार मजा येते.


परमभक्त तुलसीदास हे वक्ते व लेखक, मग त्यांचे व्याख्यान वा लिखाण उत्तम असणारच. तुलसीदासांना इतके रामप्रेम कसे आले?


याचे मूळ कारण त्यांची बायको होती. तिचा उपदेश त्यांस पटला व ते रामभक्त झाले.


तुलसीदासांनी त्यांच्या रामायणात सर्वांचे चरित्र उत्तम वर्णन केले आहे. पण त्यातल्या त्यात भरताचे चरित्र उत्तम रंगविले आहे.


तुलसीदासांना रामाच्या त्यागापेक्षा भरताचा त्याग अधिक श्रेष्ठ वाटला असावा. रामास राज्य मिळणारच होते. कारण तो जेष्ठ होता.


जे मिळण्याची आशा अगर संधी नसताही ते प्राप्त झाले तर त्याचा त्याग करणे फार कठीण आहे. म्हणून तुलसीदासांना भरताचा त्याग श्रेष्ठ वाटतो.


आशीर्वाद.

☘🌷🌼

   

   ☘🌷जय श्रीराम🌷☘


अमृतधारा  ७१६


रामास वल्कले नेसण्यास आज्ञा होती व वनवासात जाण्याची आज्ञा होती. राम त्याप्रमाणे वागला यात नवल नाही. पण भरतास तशी आज्ञा वगैरे काही नसता रामाप्रमाणे वल्कले नेसून, जटाभार राखून, वनवासासारखे १४ वर्षे कंदमुळावर राहणे हे फार कठीण आहे.


भरताला अत्यंत रामप्रेम असल्यावाचून असे करणे शक्य नाही. म्हणून भरताची योग्यता मोठी आहे व म्हणूनच तुलसीदासांना भरत फार आवडला. भरताचे रामावरील प्रेम हे बंधुप्रेम नसून ईश्वरी प्रेम होते.


तुलसीदासाचे रामचरित्र वाचणे म्हणजे संत संगत करणे आहे. संत संगती तीन प्रकारची करता येते.

१) प्रत्यक्ष साधूची किंवा श्रीगुरुची सेवा करणे.

२) संत चरित्रे अथवा

ईश्वर चरित्र वाचणे.

३) मानसिक स्मरण (नामस्मरण) करणे.


आशीर्वाद.

☘🌼🌷

   🌷💧श्रीराम समर्थ💧🌷


अमृतधारा  ७१७


सत्संगतीत कष्टाशिवाय ईश्वर प्राप्ती होते. आपण स्वतः कष्ट करून एखाद्या वस्तूची प्राप्ती करून घेऊ म्हटले तरी ती होत नाही. कोणाचे तरी सहाय्य लागते.


ज्यांचे सहाय्य घेतो त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगीत नाही हेच आपले चुकते. संतापासून किंवा वक्त्यापासून ज्ञान घेतो पण त्यास गुरू मानत नाही. हे बरोबर नाही.


रामायणात भरताची भक्ती अपूर्व आहे. रामाजवळून भरताने पादुका मागून घेतल्या. त्या पादुकांना साक्षी ठेवून भरताने अकर्तेपणाने १४ वर्षे राज्य केले. तसे आपण प्रपंचात जर वागलो तर किती आनंद होईल !!


देहाची सुखदुःखे प्रारब्धावर टाकुया. रामनामस्मरण बळेच प्रयत्नाने व प्रेमाने करुया. हा देह रामास विकून टाकुया. घर विकल्यावर त्याचा वासा (आधार) तुटला तर दुःख होत नाही, कारण घराचे ममत्व गेलेले असते. तद्वत, हा देह खरोखरच रामास विकुया व त्याचे मोबदल्यात रामाचे (नामाचे) प्रेम घेऊया.


आशीर्वाद.

☘🌼🌷

,   🌷☘श्रीराम समर्थ☘🌷


अमृतधारा  ७१८


ज्याला प्रारंभ आहे त्याला अंत आहेच. अंत गोड होणे जरूर असते. जन्माचे सार्थकत्व उत्तम मरण येण्यात आहे. उत्तम मरण ते की ज्यावेळी प्रभुस्मरण (नामस्मरण) करीत असता प्राण जातो.


जिवंत असता मनुष्य दुसऱ्यास फसवील पण मरणाचे वेळी त्यास दंभ, ढोंग करता येणार नाही.


मरणाचे वेळी पूर्वीचा अभ्यासच एकदम पुढे उभा राहतो व जीव तदाकार होतो. पूर्वाभ्यासाप्रमाणे शेवटी मती होते व तीच गती मिळते.


म्हणून सदोदित देहबुद्धी सोडण्याचा अभ्यास केला पाहिजे. "आपुले मरण पाहिले म्या डोळा" म्हणजे काय?


देहबुद्धी गेल्याचे सुख अनुभवणे म्हणजे आपले मरण आपण पाहणे आहे. देहावरील प्रेम गेले पाहिजे.


जटायुने रामासाठी सर्वस्व अर्पण केले. अंती राम प्रत्यक्ष दृष्टी समोर असता, मुखी राम राम म्हणत प्राण त्याग केला. म्हणून तो धन्य झाला.


जटायुचे रामावर अत्यंत प्रेम होते. काया, वाचा,  मने करून तो राममय झाला होता. म्हणुनच मरणाचे वेळी जटायुला रामस्मरण व रामदर्शन झाले.


आशीर्वाद.

🌷☘🌹

   🌸💧श्रीराम समर्थ💧🌸


अमृतधारा  ७१९


कलमी आंब्याचे झाड कसे करतात? एका झाडाची फांदी (विशेष पद्धतीने) दुसऱ्यावर लावतात. तसे आपल्यावर संतसंगरुपी फांदी लावली पाहिजे. मग उत्तम (भक्ती) रसयुक्त फळ येईल.


ते नित्य रामनाम स्मरण ठेवल्यावाचून अंती येणार नाही. म्हणून नामस्मरणाचा अभ्यास आजपासुनच सुरवात करुया.


एखादे मूल रडत रडत निजले तर ते रडतच उठते. म्हणून निजण्यापूर्वी खूप नामस्मरण करुया. जागृत असताना अभ्यास केला तर झोपेच्या वेळी स्मरण येईल.


झोपेच्या वेळी स्मरण दृढ श्रद्धेने झाले तर रात्री स्वप्नात तेच होईल. असा सदोदित ध्यास ठेवला तर मरणाच्या वेळीही रामाचे  नामाचे स्मरण होईल.


देह केव्हा जाईल याचा नेम नाही. म्हणून मग वृद्धापकाळी नामस्मरण करू असे म्हणू नये. उद्यापासून नामस्मरण करू म्हटल्यास उद्याची तरी खात्री आहे काय?


आशीर्वाद.

🌸🍀🌸

   🌸☘श्रीराम समर्थ☘🌸


अमृतधारा  ७२०


आयुष्य क्षणभंगुर आहे ही खात्री प्रत्येकास आहे, म्हणून प्रत्येक जण आयुष्याचा विमा उतरवतो.


जेणे भगवंत जोडे तो धर्म

जेणे तो न जोडे तो अधर्म


लग्नाला आलेल्या पाहुण्यास लग्न कसे पार पडेल ही काळजी नसते. पण घरातल्या माणसास फार काळजी वाटते. प्रपंचात आपण आलेल्या पाहुण्यासारखे वागुया.


देहादिक सर्व रामास अर्पण करून आपण निश्चिंत होऊया. आपण देव आहे म्हणतो, तरी काळजी करतो.


आपण रामाचे म्हणतो पण काळजी करण्याचे सोडीत नाही. हे त्या बैलगाडीत डोक्यावर ओझे घेऊन बसलेल्या म्हाताऱ्या माणसासारखे झाले.


आपण देवाला शरण जाऊन मागावे की, " देवा काळजी लागू देऊ नकोस." रामास अनन्य भावे शरण जाऊया. मग तो सर्व अडचणी दूर करील.


आशीर्वाद.

🌹🍀🌼

   🌷🌼श्रीराम समर्थ🌼🌷


अमृतधारा  ७२१


राम मूळातच दयाळु आहे. त्याने काही केले तरी ती दयाच आहे. मूळचा मूका तो रागावला तरी मूकाच. म्हणतात ना, गवयाचे पोर रडले तरी ते सुरातच रडणार.


मांजर पडले तरी ते चार पायावर उभे राहते. तसे रामाचे. आतबाहेर दयाच दया. दयामूर्तीच तो. त्याचा क्रोधही दयारूपच.


रामाने शत्रूला मारले,  पण मरणात उद्धार केला. रामाचा कोपही कल्याणकारक. म्हणून रामचरित्र गोड.


रामाचा ध्यास लागला पाहिजे. दशरथास रामाचा विरह झाला. राम राम म्हणता म्हणता त्याचा प्राण गेला. दशरथास सद्गती मिळाली.


सीताहरणाचे वेळी रावण मारीचास म्हणाला  " तू सुवर्ण मृग हो व राम लक्ष्मणास दूर ने. नाहीतर मी तुला ठार मारीन. मारीचाने विचार केला " रावणाच्या हातून मरण्यापेक्षा रामाच्या हातून मेलेले काय वाईट?


मग रामरूप पाहता पाहता मारीचाने प्राण सोडला. रामाने त्यासही आत्मस्वरूप मिळविले.


आशीर्वाद.

🌼🍀🌸

  +     '  

   ☘🌷श्रीराम समर्थ🌷☘


अमृतधारा  ७२२


मरणाचे महत्व फार आहे. भगवंताच्या स्मरणात, दर्शनात अंतःकाळ साधणे फार महत्वाचे आहे. सर्व संतांनी अंतःकाळ साधला म्हणून आपण संतांच्या पुण्यतिथी करतो.


जी वस्तु जन्मास आली ती जाणार हा सिद्धांत आहे. शरीर जन्मास आले त्याला मृत्यू आहेच. शेवट गोड व्हावा असे प्रत्येकाला वाटते. ज्याचा शेवट गोड त्याचे सर्वच गोड.


शेवट साधला नाही तर आधी मनुष्याने कितीही केले तरी ते वाया जाते. "अंती मती ती गती" हा नियम आहे.


मरण म्हणजे काय? आपली विस्मृती हेच मरण होय. यातूनच जीव जन्मास आला आहे. मरण हेच जन्मास कारण व जन्म हा मरणास कारण आहे.


विस्मृतीमुळे वासना, वासनेमुळे पुन्हा जन्म व त्यामुळे पुन्हा विस्मृती असे आहे. तसे, अंती वासना तो जन्माचा प्रारंभ व जन्माचा जो उदय तोच मरणाचा प्रारंभ.


आशीर्वाद.

🌿🌸🌼

   ☘🌷श्रीराम समर्थ🌷☘


अमृतधारा  ७२३


वासनेवर जीव जगला आहे, पोसला आहे. वासनाक्षय हेच त्याचे खरे मरण आहे. "आपुले मरण पाहिजे म्यां डोळा" म्हणजे स्वतःच्या देखत वासना संपूर्ण क्षीण झाली हा अनुभव येणे होय.


यासच जीवनमुक्ती म्हणतात. जिवंत असता चित्तात कोणतीच इच्छा नसणे, आनंदरूप असणे हीच जीवनमुक्ती.


देह प्रारब्धावर टाकून साधुसंत मरून जिवंत असतात. वासनेचा क्षय कसा करावा? सदाचरण व सत्संगती यावाचून वासनेचा क्षय होणार नाही.


पुण्याचे फळ इच्छितो पण पापकृती सोडीत नाही. हेच आपले चुकते. आमचे सामाजिक जीवन किती बिघडले आहे. दुसऱ्याने अनीती केली म्हणून मी करतो. यामुळे अनीती वाढते, पाप वाढते.


आम्ही आमचा धर्म सोडून परक्याचे अनुकरण करतो. विद्येचा उगाच अभिमान बाळगतो. खरोखर विद्येने जेवढा धर्म बुडवला तेवढा अज्ञानानेही बुडविला नाही.


आशीर्वाद.

🔥☘🌷

   🌷☘श्रीराम समर्थ☘🌷


अमृतधारा  ७२४


विद्येने आमची श्रद्धा घालवून टाकली. त्यामुळे भगवंत अंतरला. विद्यावंताचा गर्व अज्ञान्यापेक्षा सहस्रपटीने आधिक व त्यासच जास्त धोका. म्हणून श्रद्धावंताची संगत धरावी.


अंतकाळी नाम घेतले की झाले हे खरे. पण अंतकाळी नाम केव्हा येते? जिवंतपणी नेमाने घेतले तरच ते नाम अंतकाळी आठवते.


सगळ्यात शेवटी, महत्वाचे असे संत सांगतात की, मरणाचे वेळी भगवंताचे नाव मुखातून आले पाहिजे. शेवटी जे स्मरण, तेच जीवाचे रूप होते.


झोप हे एक मरणच आहे. येवढ्याकरिता झोपी जाताना नामस्मरण करीत झोपी जावे. म्हणजे उठतानाही नामस्मरण करीत उठेल.


पण झोपेच्या वेळी नाम येण्यासाठी अगोदरही त्याचा अभ्यास करणे जरूर आहे. तसे न केल्यास अगदी झोपेच्या वेळीही स्मरण राहणे कठीण आहे.


आशीर्वाद.

☘🌸🌺

   🌷☘श्रीराम समर्थ☘🌷


अमृतधारा  ७२५


जागृत अवस्थेत अभ्यास केला नाही तर झोपेच्या वेळी दुसरेच विचार येतील. नाही, तेच डोळे मिटल्यावर दिसेल व नामस्मरण बाजुलाच राहील. भलत्याच विचारात पटकन झोप लागून जाईल.


म्हणून सदोदित नामस्मरण केले पाहिजे. तरच ते अंतकाळी आठवेल. अभ्यास अगोदर केला नसेल तर परीक्षेच्या वेळी कसे आठवेल?


अंतकाळ कसा येतो याचे महत्व नाही. राजे लोक पलंगावर मरतात, पण त्यास उत्तम गती मिळत नाही. संत जमिनीवर मरतील, पण त्याना सद्गति मिळते.


अंती मती जशी असेल तशी गती मिळते. अंती स्थिती कशी होती हे महत्वाचे नसून अंती मती कशी होती हे महत्वाचे आहे.


मरणाचे वेळी रामाचे (नामाचे) स्मरण असावयास जिवंतपणी त्याचा फार ध्यास घ्यावा लागतो. परमात्मा प्राप्ती हेच ध्येय असावे लागते. रामाचे प्रेम निष्काम असावे लागते.


आशीर्वाद.

🌼🌸🍀

   🌹🌼श्रीराम समर्थ🌼🌹


अमृतधारा  ७२६


श्रीरामाच्या सर्वच कृती व आकृती गोड. मग त्याच्या नामात किती गोडी असली पाहिजे सर्व रामायणाचे सार नामात आहे. आपल्या अंतरात थोडा तरी सद्भाव, विश्वास, पाहिजे.


डाॅक्टरच्या औषधाचा उपयोग शरीरात मुळीच शक्ती नसेल तर काहीच होणार नाही. त्याप्रमाणे, अंतरी थोडे तरी राम प्रेम असावे. मग नामस्मरणात आनंद येईल.


आपणामधे प्रेम नाही असे वाटते. नाही कसे, ते आपण प्रपंची लावले आहे. तेच रामनामी लावायचे आहे. यासाठीच रामचरित्र ऐकावे व गावे. ते प्रापंचिकास आदर्शरूप आहे, म्हणून त्याचे अखंड स्मरण करावे.


आपण भरताप्रमाणे प्रपंच करावा. भरताचा प्रपंच म्हणजे त्याचा राज्यशकट. रामाच्या पादुकांना वंदन करावे. प्रत्येक गोष्ट त्यांना निवेदन करावी. राम स्मरण करून मग ती करावी.


असा भरताने राज्यशकट (प्रपंच) हाकला. तसेच आपणही आपला प्रपंच रामास साक्षी ठेवून करावा म्हणजे सुख होईल.


आशीर्वाद.

🌼🌸🍀

   🌷🌼श्रीराम समर्थ🌼🌷


अमृतधारा  ७२७


आपले जीवन हा एक प्रवास आहे. परमात्मपद हे प्रवासाचे अंतिम स्थान (ध्येय) आहे. तेथे जाण्यास बरेच मार्ग आहेत. पैकी भक्तीमार्ग हा सोपा मार्ग आहे.


या मार्गात शिदोरी लागते ती म्हणजे भगवंताचे नामस्मरण  ती निरुपाधिक असून अत्यंत उपयोगी आहे.


त्या स्थानास एकदा पोहचला की साध्य व साधन एकरूप होऊन जाते. प्राप्तव्य काही राहिले नाही असे ज्यावेळी होईल त्यावेळी हित झाले असे समजावे.


आपण ज्यावेळी योग्य साधने जमवू लागतो व त्या साधनात रमून जातो त्यावेळेला समजावे की आपणास आपले हित कळू लागले.


साधन उत्तम साधले की साध्य साधण्यास वेळ लागत नाही. हित कशात आहे हे संताकडून कळून घ्यावे.


संसाराचा अनुभव प्रत्येकास आहेच. पण जसे त्याचे स्वरूप कळते, तसे ओळखून वागत नाही. त्यात समाधान नाही कळूनही त्यातच समाधान आहे असे मानतो. म्हणून संत वचनांवर विश्वास ठेवून रामनामाचे प्रेमाने स्मरण करावे.


आशीर्वाद.

🌷🍀🌸

   ☘??श्रीराम समर्थ💧☘


अमृतधारा  ७२८


रामचरित्रात महत्वाचा भाग भक्ताचे चरित्राचा आहे. म्हणून रामभक्त भरत आदि भक्तांचे चरित्राचा अभ्यास केला पाहिजे. राज्यपदात खरे समाधान असते तर भरताने त्याचा त्याग केला नसता.


पण राज्यपदाचा त्याग करून तो रामपदी रत झाला. हेच त्याचे वैशिष्ट्य. त्यास असे वाटे की रामावाचून जगणेच अशक्य. भरताने राम पादुकांस साक्षी ठेवून राजशकट (राज्याचा प्रपंच) हाकला.


आपणही स्मरणपूर्वक रामास साक्षी ठेवून आपला प्रपंच करावा. म्हणजे सुख लाभेल. संसार, जगत, मातापिता, जाया, पुत्र, घरदार सर्व माझे नसून रामाचे आहे असा भाव ठेवावा.


पुत्र, कलत्र(पत्नी) माझे असे म्हणतो. पण खरोखर माझे असते तर त्यावर सत्ता गाजविता आली असती. पण तसे करता येत नाही. म्हणून भगवंताचेच सगळे आहे असे पक्के समजावे.


भरताचे चरित्र प्रापंचिकास आदर्शरूप आहे. प्रपंच परमात्म्याचा आहे असे समजून प्रपंच केल्यास तो बाधणार नाही.


भरतासारखे आचरण व त्याच्यासारखी भक्ती घडेल तर राम खास भेटेल. पुराणवचनें खोटी नव्हेत. सर्वस्वाचा त्याग म्हणजे सर्व आसक्तीचा त्याग होय.


आशीर्वाद.

🌸❄🍀

, ☘🌹श्रीराम समर्थ🌹☘


अमृतधारा  ७२९


संत हे जीवाच्या मनात ईश्वर दर्शनाची तळमळ उत्पन्न करतात. तळमळ उत्पन्न करून देणे हीच संतांची कामगिरी. संतांची भाषा तळमळीची असते, म्हणून ती आपल्यात तळमळ उत्पन्न करते.


ज्या विषयाची आम्हास गोडी नाही त्या विषयाची गोडी उत्पन्न करुन देणे किती कठीण आहे! संत आपल्याशी तळमळीने बोलून भगवंताची (नामाची) गोडी उत्पन्न करून देतात.


प्रवृत्ती व निवृत्ती ही एकाच रुपयाच्या दोन अंगांप्रमाणे आहेत. तसे व्यवहार व परमार्थ एकाच वस्तुची दोन अंगे आहेत. संत व्यवहार व परमार्थ दोन्ही करू शकले म्हणून  ते धन्य व श्रेष्ठ.


मिठावाचून पदार्थ चविष्ट लागत नाही. पण जास्त घातले तर पदार्थ बिघडतो. म्हणून ते पदार्थात प्रमाणशीर घालणे हीच चतुराई. तसे प्रपंचात अती लक्ष नसावे, दक्ष मात्र सावध असावे.


परमार्थ हा आपण स्वतः मनाने, जप तपादि केल्यास साधणे कठीण जाईल. पण तोच सत्संगतीत सुलभ होतो. रामाचे अनुसंधान तुटेल अशी कोणतीही गोष्ट करू नये.


आशीर्वाद.

🌷☘🌼

   ☘🌷श्रीराम समर्थ🌷☘


अमृतधारा  ७३०


संतांचा उपदेश एकच असतो. पण थोडा फार फरक करून व्यक्तीच्या योग्यतेनुसार अभ्यास सांगतात.


जसे, काही रोग्यांचे रोग जरी सारखे असले, तरी प्रत्येकाची प्रकृती भिन्न असल्याने एकच औषध निरनिराळ्या अनुमानाने द्यावे लागते.


आपले कुठे चुकते ते पहावे व जे चुकले ते सुधारावे. चुकते कोठे तेच कळत नाही. ते कळण्यात शहाणपण आहे. पुष्कळ कळण्यात महत्व नाही, पण थोडे आचरणात आणणे महत्वाचे आहे.


आहे ते बाधत नाही, पण लोभाने जे जास्त मागतो ते बाधक असते. प्रारब्धानुसार, अनायासे जे मिळेल ते राम(नाम) स्मरणपूर्वक सेवन केल्यास व प्रतिकुल असेल ते सहन केल्यास दुःख वाटणार नाही व बाधा करणार नाही.


जे सहज मिळाले त्याकरिता लोभ केल्यास बाधेल. मी जगतो कशाकरता? प्रपंचाकरता नसून भगवंताकरता जगतो हा निश्चय ठेवावा व सत्कर्में करावीत.


आशीर्वाद.

☘🌼🌸

,   ☘🌷श्रीराम समर्थ🌷☘


अमृतधारा  ७३१


आपण समजून उमजून चुका करतो त्यांचा दोष आपणाकडे असतो. न समजता जी चूक होते, त्याचा दोष नाही.


प्रपंचासक्तीने  दुःख परंपरा येते हा अनुभव दररोज येत असून प्रपंचात आसक्ती ठेवतो, हा दोष नव्हे काय?


पदार्थाचा स्वभाव काय हे ओळखून त्याप्रमाणे त्याच्याशी वर्तन ठेवणे इष्ट आहे.


धर्मशाळेत उतरल्यावर तेथे कायमच्या मुक्कामाची व्यवस्था करणारा मूर्खच नव्हे काय? म्हणून अविचाराने वागू नये.


कोणी विचारतात साक्षात्कार म्हणजे काय? पोट भरले म्हणजे काय होते सांगता येणार नाही. पण पोट कशाने भरते,  हे सांगता येईल. खऱ्या कर्तव्याला आपण विसरतो व भलतेच करतो.


नामस्मरण करण्यास सांगितले की सबबी सांगतात. पण खरोखर नामस्मरणाच्या आड काही येत नाही.


काम करीत असताना उगाचच इतर विचार आपले मनात येतात ना? मग तसेच नामस्मरण करण्यात कोणती अडचण आहे?


आशीर्वाद.

🌷🌼🍀

   🌹💧श्रीराम समर्थ💧🌹


अमृतधारा  ७३२


उगाच दुसरे विचार करत बसण्यापेक्षा भगवंताचे नाम घ्यावे हे बरे नाही का? वेळ सापडताच तो व्यर्थ गप्पागोष्टीत न घालवता नामस्मरण करावे.


श्रद्धा ठेवून नामस्मरण करावे. इतर कोणावर श्रद्धा ठेवू नये पण गुरु, संत, वेद यांच्या वचनांवर श्रद्धा ठेवावी.


नामावर बळकट श्रद्धा ठेवून परमार्थ करुया. नाम न सोडता इतर गोष्टी करूया. काही शंका असतील तर त्या हळूहळू जातील.


संत ज्ञानेश्वरांसारख्यांनी एवढे मोठे ग्रंथ लिहिले ते कशाकरिता? आपल्या शंका निवारणार्थच. म्हणून शंकेबद्दल निःशंक राहून नाम स्मरण करुया.


ध्रुवाने काय केले? नारद वचनांवर विश्वास ठेवून तो प्रेमाने नारायणाचे नामस्मरण करू लागला. इतर विचारांच्या, शंका कुशंकाच्या नादी तो लागलाच नाही. एकतत्व नाम हेच त्याने दृढ धरले.


संत निस्वार्थी असतात. ते तळमळीने सांगतात. त्यावर आपण श्रद्धा ठेवली पाहिजे. जर भगवंतावरील श्रद्धा उडाली तर आईबापावरसुद्धा श्रद्धा राहणार नाही..


आशीर्वाद.

🌷☘🌼

,   🌸❄श्रीराम समर्थ❄🌸


अमृतधारा  ७३३


दोन माणसांची संगत श्रद्धेस ढासळून टाकते व मनास मोहित करते. मनात शंका उत्पन्न करून धड सगुण ना निर्गुण अशी स्थिती करते. म्हणून या दोन माणसापासून सावध राहावे. एक  विद्वान व दुसरा  श्रीमंत.


हल्ली विद्वान तो की, जो स्वतः फसला असून फसलो नाही असे दाखवितो म्हणून त्यापासून सावध राहा. श्रीमंत हा दुसऱ्यास लुबाडुन बहुधा मोठा झालेला असतो. जगात फसविणारे हे दोघे, म्हणून यांचे पासून दूर रहावे.


संत फसवीत नाही. ते आईपेक्षाही प्रेमळ असतात. प्रेम कसे व्हावे, प्रेम कसे करावे व प्रेमानेच कसे जिंकावे, हे ते शिकवतात. निष्काम प्रेम हे त्यांचे ध्येय व हेच त्यांचे साधन. ते कसे येईल? तर ते भगवन्नामानेच येईल.


राम सुंदर, तसे त्याचे नामही सुंदरच आहे. राम जसा निरुपाधिक, तसे नामही निरुपाधिक आहे. म्हणून नामाविषयी उगाच शंका घेऊ नये.


आशीर्वाद.

🌸❄🍀

   ❄🌷श्रीराम समर्थ🌷❄


अमृतधारा  ७३४


काही लोक फार चिकित्सक असतात. पण संतांना रामकृष्ण प्राप्तीसाठी त्यांचा जन्म कोठे झाला या प्रश्नाच्या खात्रीची जरूर वाटली नाही.


त्यांनी दृढ उपासना करून रामकृष्णास आपलेसे केले. खरे म्हणाल तर, रामकृष्णाचा जन्म उपासनेने हृदयात झाला पाहिजे व तेच खरे त्याचे जन्म स्थान आहे.


आपण नामावर श्रद्धा ठेवून नाम घेण्यास सुरुवात करावी व नामातच अखंड रहावे. नाम किती दिवस घ्यावे? सोडावेसे वाटत नाही तोपर्यंत घ्यावे. नामात रंगून जाईपर्यंत नाम घ्यावे. रंगला की नाम सुटणारच नाही.


एक मोठा अभेद्य किल्ला होता. त्याचा भला मोठा दरवाजा होता व त्यास मोठे कुलुप होते. एकाला त्याची किल्ली मिळाली,  मग प्रवेश सुलभ झाला. तसे नाम हीच परमार्थाची किल्ली आहे. परमार्थ कितीही कठीण असला तरी नामाने तो सुसाध्य असतो.


आशीर्वाद.

🌸🌼🍀

   ❄🌷श्रीराम समर्थ🌷❄


अमृतधारा  ७३५


एखाद्या किल्ल्यास शत्रुने वेढा दिला असता आतील लोकसैनिक खुणेचा शब्द ठरवतात. तो आत येण्यास परवानगीचा शब्द असतो.


तद्वतच, संतांनी नाम हा भक्तास परवानगीचा शब्द अथवा मंत्र अथवा खूण सांगून ठेवली आहे. नाम जो उच्चारील त्यास वैकुंठात प्रवेश मिळेल. इतरांस नाही.


नामावर प्रेम व श्रद्धा बसत नाही अशी तक्रार असते. घरादारावर सहवासाने प्रेम बसते, मग नामाशी सहवास केला तर प्रेम का लागणार नाही.


बुद्धीभेदापासून सावध व दूर असले पाहिजे. संत वचनांवर विश्वास ठेवून अखंड नाम घ्यावे. त्यानेच समाधान होईल.


भगवदभक्तांचा व भगवन्नामाचा नित्य सहवास ठेवावा. आज आपण बळेच नाम घेऊया. मग सवयीने आपोआपच स्मरण होत राहील.


आशीर्वाद.

❄🌸🍀

   🍀🌸श्रीराम समर्थ🌸🍀


अमृतधारा  ७३६


जगात तीन गोष्टी दुर्लभ आहेत.

१) मनुष्यत्व,

२) मुमुक्षुत्व आणि

३) संतसंगती.

संत ओळखणे कठीणच आहे. ज्यास रामाची आवड तो संत.


आपली संताची कल्पना निराळीच असते. जो आपल्या इच्छा तृप्त करील तो संत. ही कल्पना बरोबर नाही.


कारण, वासनेच्या मागे लागून दुःख परंपरा आली. त्यामुळे दैन्य येते. म्हणून संत कामनेच्या, इच्छेच्या नादी लागत नाहीत. ते स्वतः निरिच्छ असतात व लोकास तसे बनवितात.


तुकाराम महाराजांनी देवाजवळ धन, संपदा मागितली नाही. मुक्ती देखील नको म्हणाले. फक्त संतसंगती द्या म्हणाले.


पण संत ओळखावे कसे? संतांची लक्षणें संतांच्या ग्रंथात सांगितली आहेत. ज्याची संगत केली असता भगवत्प्रेम प्रगट होते तो संत जाणावा.


आशीर्वाद.

🌼🌸🍀

   ❄🌷श्रीराम समर्थ🌷❄


अमृतधारा  ७३७


अंगारा लावला त्यामुळे ताप बरा झाला हे संत ओळखण्याचे चिन्ह नव्हे. संताच्या संगतीने भगवंताचे प्रेम उत्पन्न झाले तर तो संत. चांगला वक्ता असेल, शंका कुशंका निवारील त्यावरून तो संत असेलच असे नव्हे.


सर्व प्रापंचिकजन विषय प्राप्तीसाठी झटतात. पण विषय मागुनही जो देत नाही, त्यापासून परावृत्त करतो तो संत. जो विषयाचे प्रेम कमी करतो तो संत.


विषय तृप्तीसाठी जावे आणि निर्विषय होऊन यावे हा संतसंगतीचा परिणाम. असा जो असेल तो संत. अशांची संगती केंव्हा होईल ही तळमळ असावी.


संत भेटावे ही तळमळ तरी कोठे असते? धन मिळावे, परीक्षा पास व्हावी, नोकरी मिळावी ही तळमळ. पण संत मिळावे ही तळमळ कुठे आहे ?


एखाद्या सज्जनाने आपणास पटेल असे साधन सांगितले तर ते तरी करतो कुठे? साधन किंवा अभ्यासच करणे नको. मग उद्धार कसा व्हावा ?


आशीर्वाद.

🌷💐🌷

   ❄💧श्रीराम समर्थ💧❄


अमृतधारा  ७३८


संतसंगतीत एक महत्वाची गोष्ट घडते ती ही की, संतसंगतीत साधने आपोआप होत असतात. त्यांच्या पुजनाबरोबर पुजन व भजनाबरोबर भजन होत असते. श्रवणाबरोबर श्रवण व स्मरणाबरोबर नामस्मरण आपोआप होते.


संतसंगतीत स्वतःची विस्मृती घडते व रामनाम स्मरण घडते. म्हणून संतसंगती करावी. तेथे प्रारब्ध आणू नये.


प्रपंचात दुःख कोणी मागत नाही, पण ते येते. तसेच सूखही न मागताच येत असते. देहाचे भोग प्रारब्धाने येत असतात. पण प्रापंचिक त्या ठिकाणी अभिमान ठेवून भोगतो. परमार्थी मात्र ते भोग निरभिमानाने भोगतो.


आपला पाहुणा घरात कसा वागतो तसे आपण वागावे. सर्व वस्तुंचा दाता भगवंत आहे व तो सर्व कर्ता आहे ही भावना ठेवल्यास समाधान राहील व जन्माचे सार्थक होईल.


आपण नामस्मरण करीत असता चिकाटी धरीत नाही. त्यामुळे समाधान टिकत नाही.


आशीर्वाद.

🌼🌸🍀

,   🍀🌸श्रीराम समर्थ🌸🍀


अमृतधारा  ७३९


चमत्कार करणे हे संत लक्षण नव्हे. चमत्कार सहजगत्या होतील तर होवोत. पण संत चमत्कार दाखवावा म्हणून चमत्कार करीत नाही. प्रपंचात कसे वागावे हे संत शिकवतात व वागून दाखवतात.


दुःखाचा प्रसंग आल्यानंतर मनुष्य म्हणतो जे व्हायचे ते झाले. मग हेच अगोदरपासून मानून समाधानात का राहू नये. हावरेपणात दुःख आहे. जे आले ते समाधानाने भोगण्यात सुख आहे.


सद्विचार ही एक सत्संगतच आहे. कोणाचेही वाईट चिंतूच नये. दुसऱ्याचे हित चिंतावे व करावे. उत्तम हित नामावाचून अन्य कशात नाही. म्हणून अखंड भगवन्नाम जपणे ही संत संगतच आहे.


संतांची निंदा किंवा अपमान करू नये. त्यांची परीक्षाही पाहू नये. खरोखरीच परमार्थ आपणास वाटतो तितका तो कठीण नाही.


आशीर्वाद.

❄🍀🌸

   🍀🌸श्रीराम समर्थ🌸🍀


अमृतधारा  ७४०


१) आहे त्यात समाधान मानणे,

२) कोणाचाही द्वेष मत्सर करू नये,

३) सर्व भगवद्रूप मानणे,

४) निरभिमानपणाने राहणे,

५) सदोदित भगवन्नाम स्मरण करणे,

६) संत, सज्जन व सद्गुरु यांचेविषयी पूज्य भाव ठेवणे.

या गोष्टीत कोणती गोष्ट अवघड अथवा खर्चाची आहे?


आम्ही निश्चयाने ती करीतच नाही म्हणून समाधान येत नाही. वरील गोष्टी आचरणात आणणे हाच परमार्थ. ज्यास काहीच करावयाचे नाही त्यास सोपेही दुर्लभ व दूर्घट (कठीण) होते. ज्यास करावयाचे असते त्यास अवघडही सोपे वाटते.


वरील गोष्टींप्रमाणे आचरण ठेवल्यास समाधान येईलच. रामनाम स्मरण रामाकरता, नामाकरता करावे. धन वैभव प्राप्तीकरीता करू नये.


आशीर्वाद.

🍀🌸🌼

   🍀🌸श्रीराम समर्थ🌸🍀


अमृतधारा  ७४१


सुख विषयात नाही, निर्विषय होण्यात आहे. विषय मागितल्यास ते राम देईलही कदाचित,  पण तुम्ही दुःखीच व्हाल.


विषयापेक्षा विषयी जनांची संगत बाधते. कांद्यापेक्षा कांदा खाणाराची घाण फार येते. तसे व्यसनापेक्षा, व्यसनी जनांची संगत वाईट. तीच त्याज्य आहे.


म्हणून नेहमी संतसंगती धरावी. म्हणजे त्यांचे बरोबर भजन, पूजन व भगवंताचे स्मरण सहज होईल. संत सहवासात राहून अखंड नामस्मरण करावे, यातच खरे कल्याण आहे.


जग हे अनेक मोहक वस्तूंनी भरले आहे. त्या वस्तू पाहिल्या किंवा नुसत्या ऐकल्या तरी हव्याशा वाटतात, व त्या मिळविण्याचा आपण प्रयत्न करतो.


म्हणून देवाजवळ अशी प्रार्थना करावी की "देवा मला मोहक वस्तू दाखवू नको. माझी इच्छा तिकडे जाईल व मी फसेन. अशा मोहक वस्तूपासून मला दूर ठेव."


"देवा ! माझे ज्यात खरे हित आहे तेच मला दिसो, तेच मी ऐको व त्याचेच मला स्मरण होवो." असे म्हणावे.


आशीर्वाद.

💧🌼🌸

   🌸❄श्रीराम समर्थ❄🌸


अमृतधारा  ७४२


ध्रुव, प्रल्हाद, द्रौपदी आदि भक्तांनी देवाजवळ काय मागितले तेच आपण भगवंताजवळ मागावे. त्यांनी जशी निष्ठा ठेवली तशी निष्ठा ठेवावी.


त्यांचे ठिकाणी जसे वैराग्य व भगवंतासाठी प्राण देण्याची तयारी होती, तितकी आपल्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करावा. प्रयत्न करीत असता चुका होतील. त्या झाल्या तर पश्चाताप व्हावा.


"देवा मी फार दोषी, अपराधी आहे. मला क्षमा कर व कृपेस पात्र कर". असे मनापासून म्हणावे. पश्चाताप खरा झाला तर भगवंत (राम) कृपा करीलच. पण खरा पश्चात्ताप झाला पाहिजे.


अहं कर्तृत्व (मी केले ही भावना) हे सर्व दुःख मूळ आहे. मी केल्याशिवाय अमुक एक गोष्ट होणार नाही असे म्हणतो तेच चुकीचे आहे. रामावाचून पान हालत नाही असे असता, तेथे विश्वास बसत नाही हे दुर्दैव व या गोष्टींवर विश्वास बसणे हे सुदैव.


भिकारी जसा एखाद्या घरी चिकाटीने भिक्षा मागतो, पुढे जात नाही, शेवटी घर मालकाच्या मनात दया येवून तो भिक्षा वाढतो. तसे आदराने रामाजवळ कृपेसाठी त्याचे नाम घेत धरणे धरून बसावे. राम परम दयाळू आहे. तो कृपा केल्याशिवाय राहणार नाही.


आशीर्वाद.

🌼🍀??

   🌸🌼श्रीराम समर्थ🌼🌸


अमृतधारा  ७४३


एक मनुष्य जंगलातून जात होता. त्याला वाघाची डरकाळी ऐकु आली आणि समोर अस्वलही दिसले. तो घाबरून पळत सुटला व पळता पळता एका विहिरीत पडला.


पडताना विहिरीतील झाडाच्या फांदीस अडकला. खाली पाहतो, तो पाण्यात मोठा भुजंग. वर, आडाच्या (विहीरीच्या) काठावर वाघ.


अडकल्या झाडाच्या फांदीच्या वर मधमाशाचे मोहोळ होते. पडण्यामुळे गांधील माशा उठल्या व माणसाला चावू लागल्या. इतक्यात मधमाशाच्या पोळातील मधाचे काही थेंब नेमके या माणसाच्या ओठावर पडले. त्याने ते चाटले व त्यास ते गोड लागले.


अशाही अवघड परिस्थितीत तो म्हणाला

"अहाहा ! काय मध गोड आहे." विषय सुखाची आसक्ती ही अशी आहे. त्यात सुख थोडे व दुःखच फार.

(अमृतधारा मधे उदाहरणें नसतातच पण विषयासक्तीचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून दिले आहे). माणसाची विषयासक्ती सुटणे फार कठीण आहे.


आशीर्वाद.

🌺🌼🍀

   🌷🌼श्रीराम समर्थ🌼🌷


अमृतधारा  ७४४


नामदेवास व तुकारामास काही लोक भोळे समजतात. पण रामदास तसे नव्हते ना? विवेकानंद तसे नव्हते ना? त्यांनी देवाची करुणा भाकली व देव त्यास प्रसन्न झाला. मग आपण तसे कां बरे करू नये?


भगवत् कृपा तेंव्हाच होईल जेंव्हा आपणास पूर्ण विरक्ती येईल. भगवंत आपले वडील व आपण त्याचे लहान लेकरू आहो अशी भावना करून त्यास आळवावे.


लहान मुलगा दमला तर बाप त्याला कडेवर घेतो. तसे राम स्वतः आपणास कडेवर घेऊन भवसागर पार करील, अशी खात्री ठेवावी.


वस्तू वाईट नाहीत. वस्तूंची आसक्ती वाईट. ती सुटावी म्हणून भजन करावे. रामाला आळवावे."रामा, मी तुझे नाम घेऊन काम करतो, यश देणे तुझे हाती आहे".


"मी तुकारामा वा नामदेवासारखा नाही. मी मूढ व लहान आहे. तूच मला हाती धर व वाट दाखव". असे म्हणावे. मग राम वाट दाखवीलच.


आशीर्वाद.

🌷🍀🌼

  : 

   ☘🌷श्रीराम समर्थ🌷☘


अमृतधारा  ७४५


श्रीराम दयाळू आहे. तो इतर मालकांप्रमाणे नाही. मालक म्हणतो नोकराने थोड्या पगारात पुष्कळ काम करावे. नोकराला वाटते पुष्कळ पगारात थोडे काम असावे.


पण रामाचे तसे नाही. रामास जे आवडते त्याप्रमाणे आपण वागावे. आपण रामास अनन्य भावे शरण जाऊया. बाकीचे तो पाहून घेईल. "योग क्षेमम् वहाम्यहम्" चा हाच अर्थ आहे.


जशास तसे वागावे म्हणजे काय? एकाने ठोसा दिला तर त्यास ठोसा द्यावा, असे नसून दुसर्‍याने आपल्याशी जसे वागावे असे वाटते, तसे आपण त्याच्याशी वागणे असा अर्थ आहे. दुसऱ्याने खरे बोलावे असे वाटते तर आपणही खरेच बोलावे.


शरणागतीवाचून कोणतीही गोष्ट रामाकडे नेणारी नाही. ती आपण करावी. कुळधर्म करावे, इतर कर्तव्ये करावीत, पण लक्ष मात्र सदा रामाकडे असू द्यावे.


इतर गोष्टींवर जसे, या वडाच्या झाडावर भूत आहे असे म्हटले तर विश्वास बसतो, पण मूर्तीत देव आहे असे म्हटले तर विश्वास बसत नाही. हे आश्चर्य नाही काय?


आशीर्वाद.

🍀🌼🌸

   🌼🌷श्रीराम समर्थ🌷🌼


अमृतधारा  ७४६


आपण रामाचे होऊन राहुया. राम कर्ता अशी भावना ठेवुया. मग समाधान येईलच. जपतप करण्यास कोठे अवसर (वेळ) आहे! आयुष्य थोडे उरले आहे.


म्हणून आहे त्या परिस्थितीत रामाचे सर्व आहे असे समजून वागावे. समाधान कसे असते ते सांगता येत नाही. पोट भरल्याची खूण ज्याची त्यालाच.


आयुष्याचा नावाडी राम आहे. आपण विश्वासाने त्याच्या नावेत बसावे. मग तो भवसागर पार नेईल. पण मधेच बाहेर उडी मात्र मारू नये.


परमात्मा सर्व देतो, यात समाधान आहे. श्रीमंतीत सुख नाही. धनी असणे हे साधुत्वाचे लक्षण असते तर राजे लोक संतच झाले असते.


माझे कर्तेपण मेल्याशिवाय भगवंत प्रसन्न होणार नाही. प्रत्येक कर्माचे वेळी आपण त्याचे स्मरण करुया. नफ्याचे वेळी अभिमान उत्पन्न होतो. तोट्याचे वेळी दैव आठवते. म्हणून दोन्ही प्रसंगी अभिमान नसावा.


देवा, तुझ्या हातात मी बाहुली प्रमाणे आहे, असे मानावे. सद्बुद्धी ही निरहंकृतीत आहे. खोटे कर्तेपण घेतल्यामुळे खरे रडावे मात्र लागते.


आशीर्वाद.

🌷🌼🍀

   🌼🌷श्रीराम समर्थ🌷🌼


अमृतधारा  ७४७


आपणास शारीरिक दुःख किंवा आजार झाला असता त्याचे निदान स्वतःस करता येत नाही. काहीतरी होते, पण काय होते व का होते हे कळत नाही. ती गोष्ट (लक्षणावरून) उत्तम वैद्य जाणतो, व तो औषध देतो.


औषध ते चांगले म्हणावयाचे की ज्याने गुण येतो. काही ज्वर हाडी खिळतो. तो काढणे कठीण जाते. त्यासाठी बराच काळ औषध सेवन, पथ्यावर राहणे, कुपथ्याचा त्याग करणे, हे सांभाळावे लागते. शिवाय वैद्यावर विश्वास ठेवावा लागतो.


त्याप्रमाणे जिवासही भवरोग झाला आहे. तो फार दिवसाचा अंगी मुरला आहे. तो काढण्यासाठी उत्तम सद्गुरु वैद्य भेटणे जरूर असते.


तो भेटल्यावर, त्याजवर विश्वास ठेवून ते सांगतील त्याप्रमाणे साधन केले पाहिजे. जे टाकावयाचे ते टाकले पाहिजे. जे घ्यावयाचे ते घेतले पाहिजे. भवरोगाचे मूळ देहाहंकार (मीपणा, माझेपणा) आहे. रामनाम हेच त्यावर रामबाण औषध आहे.


आशीर्वाद

🌸🍀🌼

   🍀🌷श्रीराम समर्थ🌷🍀


अमृतधारा  ७४८


भवरोगावर रामनाम हे एकच औषध आहे. सदाचरण, सत्संगती व गुरुसेवा ही पथ्ये आहेत व दुःसंगती हे कुपथ्य आहे. रामाची विस्मृती हाच भवरोग व दुःखाचे मूळ आहे. रामनामाचा विसरच पडू देऊ नये.


सत्कर्म करीत असता अहंभाव येऊ देऊ नये. पोटात जंतू झाल्यावर पौष्टिक आहार घेऊन काय उपयोग? त्याने मनुष्य पुष्ट होण्याऐवजी जंतू पुष्ट होतात व तो कृष होतो.


त्याचप्रमाणे अहंकार हा कृमी आहे. जे जे सत्कर्म, सद्ग्रंथ वाचन, दान, पुण्य, सेवा, पूजा कराल ते अहंकार पोटात असल्याने वाया जात आहे. तो मारण्यास उत्तम उपाय म्हणजे संत अथवा सद्गुरु यांची सप्रेम सेवा आणि भगवन्नाम स्मरण हा होय.


पोथी पुराणे वाचावयाची ती कशाकरता? अंतःकरण शुद्ध करण्याकरता ना? प्रत्येकास वाटते मी शहाणा आहे. आपण वृथा गर्व करतो !!


आशीर्वाद.

🌷🌼🍀

   ☘🌷श्रीराम समर्थ🌷☘


अमृतधारा  ७४९


संत चरित्राकडे पहावे. राम चरित्राचे वाचन करावे. मग आपले दोष आपल्यालाच समजून येतील. थोरपणा वाईट. थोर असावे पण थोरपणा नसावा.


माणूस भगवत्कृपेवाचून थोर होत नाही. आपले वर्तनाकडे आपण पहावे व दोष असतील ते काढावे. थोर जे असतात, ते थोरपणा भगवंताकडे देतात. आपण लहानच राहतात.


हिरण्यकश्यपूस किती अभिमान झाला होता. "मी त्रैलोक्यात अजिंक्य आहे" असे त्याला वाटले होते. पण प्रल्हादाने त्यास उपदेश केला की "तुला बळ ज्यामुळे आले आहे तोच महाविष्णु सर्वांचा पालक आहे. तोच माझे रक्षण करतो".


"तू मला कितीही छळलेस तरी मी त्याचे स्मरण सोडणार नाही. तो सर्वत्र व्यापक आहे. या खांबातही तो आहे" असे म्हटल्यावर हिरण्यकश्यपूने खांबावर लाथ मारली.


त्याबरोबर तेथे नृसिंहरुपाने ईश्वर प्रगट झाला व हिरण्यकश्यपूस मांडीवर घेऊन त्याचे पोट फाडले. त्यावेळी हिरण्यकश्यपूचा हात खड्गाकडे गेला. केवढा हा अभिमान! काळाच्या मांडीवर असून हात खड्गाकडे! त्याऐवजी हात जोडले असते तर, भगवंताने कृपाच केली असती.


आशीर्वाद.

☘🌹🌼

   🍀🌹श्रीराम समर्थ🌹🍀


अमृतधारा  ७५०


भगवंताचा अवतार अभिमानास मारण्यासाठी असतो. सत्कर्माने अभिमान मरत नाही. भगवंताच्या नामाने व सत्संगतीने तो मरतो.


कर्म करावे पण फलाकडे दृष्टी ठेवू नये. जज्जाच्या हातून अनेक जणास फाशीच्या शिक्षा दिल्या जातात. परंतु त्याचे पाप त्यास लागत नाही.


दुष्कर्म करणारा गुन्हेगार असतो व त्यास कायद्यानेच फाशीची शिक्षा सांगितली आहे. ती देणे भागच आहे.


तेव्हा गुन्हेगारास फाशी कायद्याने दिली आहे, जज्जाने दिली नाही. म्हणून त्यास त्याचे वाईट वाटत नाही. पण स्वतःचा मुलगा वाईट निघाला म्हणून दुःख होते.


जर हे सर्व भगवंताच्या इच्छेने होते आहे, असा विश्वास ठेवला तर दुःख होणार नाही. याप्रमाणे विश्वास वाढवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे.


आशीर्वाद.

🌷☘🌸

   ☘🌸श्रीराम समर्थ🌸☘


अमृतधारा  ७५१


राम कर्ता म्हणेल तो सुखी, मी कर्ता म्हणेल तो दुःखी. बारशाचे दिवशी लहान बाळास दागिने घालतात, पण त्याचे सुख दुःख त्यास काहीच नसते. लहान मुलांसारखे निरभिमान असावे.


कर्तृत्वाने मनुष्य मोठा होतो असे म्हणावे तर तो आज तसा का नाही? म्हणजेच मनुष्याचे हाती काही नाही. सर्व रामाच्या हाती आहे. रामालाच सर्व समर्पण करून व समाधान मानून घेऊया.


पंढरपूरचा विठोबा तुकाराम महाराजासलावण्याचा पुतळा दिसला. आम्हास कां दिसत नाही?  ते निरभिमानी व प्रेमळ होते, तसे आम्ही नाही.


जिवाचे खरे चिरंजीवित्व म्हणजेच खरा जन्म निरभिमानात आहे व खरे मरण अभिमानात आहे. जटायुचे मरण त्याच्या पंखात होते.तसे मायेचे मरण अभिमान शुन्य होण्यात आहे. अभिमान गेला कि माया मेली.


अभिमानाने दृष्टी अस्थीर होते. अभिमानावर मात करावी. राम इतर कशानेही प्रसन्न होणार नाही. " रामा यश देणे न देणे तुझ्या हाती आहे." असे म्हणुन रामास शरण जावे. ही वृत्ती सांभाळावी व मजेत असावे.


आशीर्वाद.

🌷☘💧

   🌼🌷श्रीराम समर्थ🌷🌼


अमृतधारा  ७५२


"रामा, तुझ्या नामाची, स्मरणाची गोडी मला दे" हेच मागावे. आनंदाने संसार करावा. स्मरण हाच प्रकाश आहे. स्मरण लौकिकाकरिता नको तर स्वतःकरिताच असावे.


संतांचे सांगणे आईपेक्षा जास्त कळकळीचे असते. "रामा, सर्व तुझ्या हाती आहे. सर्वतोपरी कल्याण कर" म्हणून त्यास शरण जावे. "रामा, तू मला जे देशील ते माझ्या हिताचेच आहे" असे भगवंताला नेहमी म्हणावे.


एवढेच नव्हे तर रडून त्यास प्रसन्न करून घ्यावे. भगवंताजवळ रडणे, त्याचे नाव घेताच रडू कोसळणे, सोपे नाही.


रडू येणे हे भक्तीचे चिन्ह आहे. असे रडू आल्यावर मग आपली काळजी भगवंताला लागते व तो सर्व आपत्ती निवारण करतो.


प्रपंचात वारंवार अनुभव येतो की, मी कर्ता नाही. हे प्रपंच शिकवतो, पण आम्ही ती शिकवण धरीत नाही म्हणून दुःखी होतो.


राम कर्ता म्हणावे. त्याचे स्मरण आनंदाने करावे व अभिमानरहित कर्म करावे. मजेत रहावे पण नामस्मरण मात्र सोडू नये.


आशीर्वाद.

💧🌼🌷

, 💧🌷श्रीराम समर्थ🌷💧


अमृतधारा  ७५३


सर्वात आवडीचा पदार्थ रामच आहे. भगवंताची गोडी अवीट आहे. ती घेण्याची सवय केली पाहिजे. भगवत् चरित्र आरशाप्रमाणे आहे. जीवाने व्यवहारात कसे वागावे हे त्यात सांगितले आहे.


भगवंताच्या प्राप्तीच्या आड अहंभाव येतो. तो नाहीसा करण्याचा उपाय रामकथा श्रवण हाच आहे. परमात्म्याची गोडी चाखल्यानंतर मुखशुद्धीची जरुरच नाही.


विषयात गोडी खरी नसते म्हणून मुखशुद्धीची गरज भासते. तशी राम चरित्राची गोष्ट नाही. ती गोडी अवीट आहे. रामकथा ऐकणे वा सांगणे हे भगवत् स्मरणच आहे.


बाजारात गेल्यावर जो माल आपल्याला अनुकूल व माफक असा असेल तोच घेतो. परमार्थाच्या अनेक साधनात आपल्याला अनुकूल व माफक असे उत्तम साधन नामस्मरण हेच एक साधन आहे. तेच करावे व आनंदाने रहावे.


गढुळ पाणी तुरटी फिरविल्याने स्वच्छ होते. तसे रामनाम स्मरणाने प्रपंच सुखरूप होतो. अंतःकरण शुद्ध होते. राम चरित्र ऐकावे, गावे, सांगावे, त्याची मूर्ती डोळयाने पहावी, त्याचे नाम घ्यावे म्हणजे रामनामाचे प्रेम उत्पन्न होते.


आशीर्वाद.

🌷☘🌼

  +          .        .

   💧🌷श्रीराम समर्थ🌷💧


अमृतधारा  ७५४


आस्तिक बुद्धीच्या माणसास देखील असे वाटते की जगात दुःख कां? साखरेचा लाडू हा गोडच असणार. मग काहीना कडू कां लागतो? जगात जर ईश्वर आहे तर दुःखाचा अनुभव का?


सूर्याचे किरण जेथपर्यंत जातील तेथपर्यंत प्रकाशच असणार. त्याचप्रमाणे राम सर्वात आहे तर वस्तू समच असावयास पाहिजेत. सूर्य उगवतो, सर्वांस प्रकाश देतो. पण जो जाणून बुजून डोळे मिटतो त्यास तो दिसणार नाही.


राम समरूप आहे. आनंदरूप आहे. पण आमच्या डोळयावर देहबुद्धीचे पटल आल्याने तो दिसत नाही. सकल जीवांचा बाप राजा रामचंद्र आहे व तो खरा श्रीमंत आहे.


जीव, राजा रामचंद्राहून वेगळा झाल्यास, वा मी रामचंद्राहून वेगळा आहे असे समजू लागल्यास, त्यास रामचंद्राचे ऐश्वर्य व सुख मिळत तर नाहीच, परतु उलट त्याच्या कपाळी दारिद्र्य व दुःख येते.


आशीर्वाद.

💧🌷🌼

   💧🌷श्रीराम समर्थ🌷💧


अमृतधारा  ७५५


मी भगवंंताचाच आहे आहे, त्याहून निराळा नाही, अशी ज्यांची दृढ निष्ठा असते त्यांना भगवंताचे ऐश्वर्य प्राप्त होते व शाश्वत सुख मिळते.


त्यांना जगात दुःख दिसतच नाही. वैभव, धनादिक असणारा सुखी नसून, सर्व रामाचे आहे असे म्हणणारा सुखी आहे.


रामाची सत्ता कबूल करतात, देव आहे म्हणतात, देवाच्या स्वाधीन सर्व आहे असेही त्यास वाटते परंतु त्यांची निष्ठा मात्र तशी नसते. म्हणून देव भेटत नाही.


तळमळ नाही म्हणून देव भेटत नाही. आचार व विचार यांची फारकत नसली पाहिजे. भगवंताचे सर्वव्यापित्व कबुल करतो पण स्वतःचे कर्म मात्र भगवंतास दिसत नाही असे समजून करतो. हेच वाईट.


कृत कर्माचा पश्चाताप होणे जरूर आहे. म्हणावे  "रामा मी वेड्यासारखा विषयाधीन झालो. धड उत्तम प्रपंचही नाही व परमार्थही नाही. इदंच नाऽस्ति परंच न लभ्यते. अशी माझी स्थिती झाली. देवा आता तूच मला तार"


आशीर्वाद.

☘🌸❄

, ❄🌸श्रीराम समर्थ🌸❄


अमृतधारा  ७५६


राम हा सर्वांचा बाप आहे. तो मुलास वेगळा हो असे म्हणत नाही. मुलगा मात्र कुसंगतीने बापाचा अपमान करतो, वेगळा पडतो व विषयी बनतो.


मांजर; उंदीर एकदम खात नाही. पकडल्यावर त्याला खेळत खेळत मारते. तशी माया जीवास खेळत खेळत मारते. पण जीवास कळत नाही.


माया विषयाचा योग दाखविते व पुन्हा वियोग दाखविते. मांजरास भिवविणारा कुत्रा आहे. त्याप्रमाणे जीवास राम नामस्मरण हाच कुत्रा आहे. तो कुत्रा, माया मांजरास नाहीसे करील.


काळाला सवड सापडते याचे कारण, जीव भगवंताहून वेगळा झाला. जीवाने परमात्म्याचे व्हावे व असावे. वेगळा झाल्यास पुन्हा पश्चाताप करून एक व्हावे.


पश्चातापाने खरी शुद्धी होते. चूक झाली ती पुन्हा न करणे याचे नाव पश्चात्ताप. सत्य मार्गाने चालल्यास भगवंत कृपा करील.


आशीर्वाद.

🌷☘🌺

   💧🌸श्रीराम समर्थ🌸💧


अमृतधारा  ७५७


पोटातला रोग बाहेरच्या सोंगाने बरा होत नाही. त्यास पोटातले औषधच घेतले पाहिजे. संतास सर्व सृष्टी आनंदरूप वाटते. प्रापंचिकास सर्व दुःखरूप वाटते. कारण तो रामपदाचा आश्रय करीत नाही.


एक मुलगा स्वप्नात ओरडत उठला व म्हणाला "मी बुडालो बुडालो, मला वाचवा". स्वप्नातले दुःख जागे केल्यावाचून जाणार नाही.


तद्वतच, रामस्मरणरूपी जाग आल्यावाचून प्रपंचासक्ति व तज्जन्य दुःख जाणार नाही.


शहाण्याने न बोलण्यात शहाणपण आहे. त्याप्रमाणे आपण न बोलता रामाचे व्हावे व त्यास जे आवडते ते करावे. रामास जाणतेपणाने शरण न जाता नेणतेपणाने शरण जावे.


आईला बालक पाहिल्यावर पान्हाच फुटतो. तसे भगवंताला तुम्ही दंडवत करून अनन्य शरण जा. तो तुम्हास तारील.


आशीर्वाद.

🌷🌸💧

   🌷💧श्रीराम समर्थ💧🌷


अमृतधारा  ७५८


भक्ती चांगली करावी, सुनितीने वागावे, अनन्य भावे शरण जाऊन अनुभव घ्यावा. मग राम प्रसन्न होईल.


संतांची परीक्षा घेणे म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेणे होय. संतांनी किती उपकार केले आहेत. सोप्यात सोपे साधन सांगितले.


प्रपंच व परमार्थ यांचा ३६ चा आकडा पाहून त्यांनी तडजोड करण्याचा प्रयत्न केला. सोपे साधन म्हणजे नामस्मरण करीत प्रपंच करावा असे सांगितले. यापेक्षा अधिक सुलभ व उपयुक्त असे दुसरे साधन नाही.


आपल्या प्रत्येक कर्माचा साक्षी राम आहे असे समजून वागावे म्हणजे दुष्कर्म होणारच नाही. भगवंतास जे आवडते ते आपणास आवडत नाही. म्हणून आपल्यास सृष्टी आनंदरूप वाटत नाही.


प्रपंचात ढोंग असतेच, परमार्थाचे ढोंग नसावे. परमार्थ खरेपणाने करून त्यात मुरावे. आपण भगवन्नाम प्रेमाने घेऊया. मग सर्व सृष्टी आनंदरूप दिसेल. भगवंताच्या सावलीत राहूया, मग काळजी कसली ?


आशीर्वाद.

🌸💧🌼

   💧🌼श्रीराम समर्थ🌼💧


अमृतधारा  ७५९


रामाची भक्ती कशी करावी हा प्रश्न काही नवीन नाही. प्रपंचात जशी आसक्ती असते तशीच रामचरणी ठेवणे हीच रामभक्ती होय.


भक्ती म्हटले की माणसास मोठा बाऊ वाटतो, काहीतरी विशेष असेल असे वाटते. भक्तीचे रहस्य प्रत्येकास जाणून अथवा अजाणून परिचित आहे. ते अगदी नवीन नाही.


संसाराची आसक्ती किंवा प्रेम आपण ज्याप्रमाणे सोडत नाही, त्याप्रमाणे रामाविषयी प्रेम करणे यास भक्ती म्हणतात.


जे नश्वर आहे त्याविषयी आसक्ती याचे नाव प्रेम. शाश्वत रामपदी आसक्ती याचे नाव भक्ती. प्रपंची नाना प्रकारची दुःखे सोसूनही प्रेम सोडीत नाही. तद्वतच, रामपदीही नाना भजन, स्मरण न सोडणे याचे नाव भक्ती.


प्रपंचाचे सुख क्षणिक. राम पदाचे सुख शाश्वत, म्हणून त्याला परमानंद म्हणतात. त्याची एकदा गोडी लागली की मनुष्य तो आनंद सोडणारच नाही.


प्रपंच दुःखरूप असून त्यास खोटेच सुखरूप मानून सोडीत नाही हीच माया.


आशीर्वाद.

💧🌷🍀

   

   💧🌼श्रीराम समर्थ🌼💧


अमृतधारा  ७६०


संसारातील प्रेम स्वार्थमूलक असते. ईश्वर विषयक प्रेम निःस्वार्थ असते. खरे ईश्वरप्रेम (भक्ती) ईश्वरी कृपेवाचून येत नाही.


भगवत्कृपा होण्यासाठी

१) अखंड भगवन्नाम स्मरण व

२) माझे काही नसून सर्व रामाचे आहे, हा समर्पण भाव.

या दोन गोष्टी दृढ धरल्याने भगवंताची कृपा होईल.


प्रपंचात सर्व सुखी असा कोण आहे? कोणी नाही. प्रपंचात मनुष्य पोळतो, पण तो प्रपंच सोडीत नाही हीच माया. आम्ही खरे जिवंत नसतोच. "उद्याच्या आशेत" जिवंत असतो हीच माया.


प्रपंचाची आसक्ती तुटता तुटत नाही. घाणीतले किडे जसे बाहेर काढताच तडफडतात, तद्वत आम्हास प्रपंचाबाहेर करमतच नाही. विषयात सुख मानणे हाच भ्रम होय. जो विषय दुःखरूप मानील त्यास प्रपंचाचे खरे रूप कळू लागेल.


आशीर्वाद.

🌼🌷💧

   🌷🌼श्रीराम समर्थ🌼🌷


अमृतधारा  ७६१


भगवंताकडे कसे लक्ष असावे? घार आकाशात उंच जाते पण दृष्टी पिलांकडे असते, तसे लक्ष असावे.


मांजर जसे उंदराला खेळवित मारते; एकदम मारीत नाही, तशी माया जीवास एकदम मारीत नाही. माया दुस्तर आहे.


मायेचा नाश सत्संगती वाचून होणार नाही. व्यसनी लोकांची संगत धरली तर व्यसन लागते. तद्वत रामभक्तांची संगत धरली तर रामभक्ती येते.


गाईचे दूध काढताना ओशट (तूप किंवा तत्सम पदार्थ) लावूनच धार काढावी लागते. त्याप्रमाणे रामभक्तीची गोडी लावून मग रामाची गोडी घ्यावी लागते.


तुलसीदासास जसा पूर्ण पश्चाताप झाला, असे लोक थोडेच. त्या पश्चात्तापाची वाट न पाहता आपण रोज थोडे थोडे करून राम नामस्मरणात रंगले पाहिजे.


सत्संगतीने या सर्व गोष्टी आपोआप होतात.


आशीर्वाद.

🌿🍁🌼

   🌷💧श्रीराम समर्थ💧🌷


अमृतधारा  ७६२


एक मांजर होते. ते एका उंदराच्या मागे लागले. इतक्यात एक कुत्रा आला. तो आल्याबरोबर मांजर पळाले व उंदराचा जीव वाचला. मायारूपी मांजर संत दर्शनाने पळून जाते.


मी रामाचा होणे म्हणजे विकारांचा मालक होणे. रामाचा मी होत नाही म्हणून विकार माझे मालक बनतात व मी त्यांचा गुलाम होतो.


आपण बळेच नाम घेऊया. रामाचे थोडे तरी प्रेम लागले की दिवसेंदिवस ते वाढत जाईल. रामाच्या इतके जरी वैराग्य न आले तरी, थोडे तरी येईलच.


आपण कृतीच करत नाही. तो राम आपल्या मागे पुढे सर्व ठायी आहे अशी भावना करुया व नेमाने नाम घेऊया. मग दुःख कमी होऊन सुख वाढेल.


कुत्रा जसा मालकाच्या आज्ञेत राहतो, मालकाच्या मित्रांवर भुंकत नाही वा त्यांना चावत नाही, तसेच मायेचे आहे. रामाशी सख्य केले तर मायारूप कुत्रा चावत नाही. म्हणून ढोंग सोडून नामस्मरण करुया.


पुष्कळ वाचले पण ढोंगाने केले तर उपयोग नाही. भगवंताचा सहवास जेणेकरून घडेल असे करावे. लोकांनी वेडे म्हटले तरी चालेल पण रामाचे व्हावे.


आशीर्वाद.

💧🌷☘

   💧🌷श्रीराम समर्थ??💧


अमृतधारा  ७६३


संत हे वेडेच असतात. त्यांस इतर लोक खुळे म्हणतात. कारण ते लोकांसारखे वागत नाहीत.


भगवंताचे प्रेम टिकवणे कठीण आहे. जो स्वतःच्या बुद्धीने वागतो त्याचे प्रेम टिकत नाही. सद्गुरु सांगतील, शास्त्र श्रुती सांगेल त्यावर विश्वास ठेवून वागावे व आनंदाने रहावे.


परमात्म्याची भक्ती करावी असे प्रत्येकास वाटते. परंतु तशी भक्ती आपल्या हातून होत नाही. ती न होण्याचे कारण म्हणजे कुठली तरी अडचण सांगून भक्ती घडत नाही म्हणून सांगतो.


भगवंत सर्व ठिकाणी आहे. ज्या वस्तूपासून वा ज्या ठिकाणी भय वाटते तेथेही तो असला पाहिजे. परंतु अशी श्रद्धा बसत नाही.


भगवंत जेथे नाही (असे वाटते) तेथे तो वास्तविक असतो. पण आपली श्रद्धा नसते. म्हणून तो असूनही भीती वाटते.


जेथे भगवंत आहे असे वाटते तेथेही दृढ श्रद्धा नाही म्हणून दिसत नाही.

एवंच (तात्पर्य), श्रद्धा नसेल तर कार्य होत नाही. वृत्ती भगवद्रूप, झाल्यावर भीती अथवा दुःख होणारच नाही.


आशीर्वाद.

💧🌷🌼

   🌼🌷श्रीराम समर्थ🌷🌼


अमृतधारा  ७६४


भक्तीचे लक्षण पतिव्रता धर्माप्रमाणे आहे. हळूहळू तसे बनले पाहिजे. एकदम रामदास होता येणार नाही. पण तसे होण्याची वाट चालणे मात्र जरूर आहे.


प्रपंचात रहा. कामधंदा करा. पण राम कर्ता व तोच दाता आहे असे म्हणा म्हणजे झाले. नळ सोन्याचा, चांदीचा, तांब्याचा वा पितळेचा कोणताही असो, त्यातून पाणी आले म्हणजे झाले.


तसे संस्कृतमध्ये म्हणा वा प्राकृतात म्हणा, गद्यात म्हणा अगर पद्यात म्हणा. प्रेमाने रोज नियमितपणे रामनाम म्हणा म्हणजे झाले. तरच समाधान होईल.


अन्न भगवंतास समर्पण केले म्हणजे प्रसाद होतो. न केले तर अन्नच असते. त्याप्रमाणे संसार भगवंताचा म्हटल्यास तो संसार उरत नाही. माझा म्हटल्यास संसाररूप होतो व बाधा करतो.


भगवंत आईप्रमाणे दयाळू आहे. तो आपणास देतो व मग आपण खातो. कोणी म्हणतील तो आम्हास कां देत नाही? मुलाला रोग झाला तर आई त्याला खाण्यास देत नाही. ते न देणे ही तिची दया आहे.


तद्वत, जिवाची प्रकृती नादुरुस्त झाली म्हणजे ती सुधारण्यासाठी भगवंत त्यास खाण्यास देत नाही. तो सुखासोबत कधीमधी दुःखेहि (कडु औषध) देतो. तो आईपेक्षा दयाळू आहे, हे आपणास कळत नाही.


आशीर्वाद.

🌷💧☘

    ~  

   🌸🌼श्रीराम समर्थ🌼🌸


अमृतधारा  ७६५


दुःख कशात आहे? जेवढे अगदी जरूर त्यापेक्षा अधिकाची हाव करण्यात दुःख आहे. आहे त्यातच समाधान मानणे हेच सुखाचे मूळ आहे.


राम कर्ता आहे अशी ज्याची दृढ श्रद्धा, त्यासच आस्तिक म्हणावा. रामा तूच दाता आहेस असे समजुन त्याचेच जवळ भिक्षेकऱ्याप्रमाणे "दिलेस तरी वाहवा, न दिलेस तरी वाहवा." अशी  वृत्ती ठेवावी.


रामाजवळ विषय मागू नये. तो देईल ते मुकाट्याने घ्यावे. राम मला जे देत नाही ते माझ्या कल्याणाचे आहे असे समजावे.


बाप आपल्या मुलाला अंधारात भूत नाही हे समजाविण्यासाठी स्वतःच कोपर्‍यात जाऊन उभा राहतो व म्हणतो  "बघ भूत वगैरे काही नाही, मीच आहे" असे दाखवतो. तसे दुःख जेथून येतेसे वाटते तेथेच राम आहे ही भावना करावी. मग दुःखच राहणार नाही. हे आपणास कळत नाही. ते नामस्मरणाने हळूहळू समजते.


आशीर्वाद.

💧🌸🌿

   ❄🌼श्रीराम समर्थ🌼❄


अमृतधारा  ७६६


आपण भजनाला लागलो तर प्रपंच कसा चालेल याची काळजी करू नये. भजनाला, भक्ती मार्गाला लागल्यावर तुकाराम महाराजांसारखे झाले तर कुठे बिघडले, त्यात वाईट काय? न झाल्यास प्रपंच चालूच आहे.


नुसते प्रपंचात रडत बसण्यापेक्षा आनंदाने रामनामात राहुया. सर्व हवाला रामावर ठेवून थोडे दिवस तरी राहून पहा. मन खास चिंतारहित होईल. एक दिवस असा येईल की पूर्ण निष्ठा उत्पन्न होईल व अंतःकरण निर्वासन होईल.


रामाने दिलेले ते सत्तेचे व त्यावाचून घेतलेले ते चोरीचे. प्रकृती, विद्या, पैसा व सुख हे एकमेकांवर मुळीच अवलंबून नाही. प्रकृती बरी असेल तर विद्या नसते. प्रकृती आहे, विद्या आहे तर पैसा नसतो.


सर्व असुनही सुख नसते. म्हणून जे असेल ते भगवंताचे, असे समजण्यात सुख आहे. भगवंतावाचून अन्य काही न पाहणे म्हणजेच अनन्यता. ही बाणावी म्हणून अभ्यास करावा. नाम घ्यावे, मग प्रपंच सुखाचाच होईल.


आशीर्वाद.

💧🌷💧

   ।। जय श्रीराम ।।


आपल्याला माहीत आहेच, अयोध्या येथील अतिभव्य व अतिसुंदर असे श्रीराम मंदिर २२ ते २४ जानेवारी २०२४ च्या दरम्यान मुख्य भाग तयार होऊन श्रीरामलल्लाच्या मूर्तिची श्री. नरेंद्र मोदींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होणार आहे.

हे मन्दिर पूर्ण झाल्यावर जगातील समस्त हिन्दुसाठी, पुढच्या अनेक पिढ्यापर्यंत प्रेरणास्थान राहील. सद्य परिस्थिमध्ये, बऱ्याच दुष्ट शक्तींची ह्या मंदिराकडे वक्रदृष्टी आहे. हे कार्य निर्विघ्नपणे करवून घेण्यास रामराया स्वत: समर्थ आहेच. तरीही, आपण सर्वांनी एक मानवी प्रयत्न म्हणून, खारीचा वाटा समजून हे कार्य निर्विघ्नपणे पार व्हावे म्हणून श्रीरामाची प्रार्थना करणे गरजेचे आहे. ह्यासाठी, आपण सगळ्यांनी रोज किमान एक रामनाम जपाची (श्रीराम जय राम जय जय राम) माळ करावी. आपल्या सगळ्यांच्या प्रेमाखातर, श्रीरामराया दुष्ट शक्तींचा नि:पात नक्कीच करेल. आपल्याकडे जानेवारीच्या २२ तारखेपर्यंत १०८ दिवस आहेत. आपण सर्वांनी मिळून हा संकल्प करुया! रोज एक माळ करुन किंवा बोटावर मोजून अर्पण करुया! एवढे, आपण वेळात वेळ काढून नक्कीच करू शकतो.

🙏जय श्रीराम🙏

,   🌼🌷श्रीराम समर्थ🌷🌼


अमृतधारा  ७६७


भरताला जसे वैराग्य प्राप्त झाले तसे वैराग्य प्राप्त होणे फारच कठीण. भरताला राज्य आपण होऊन त्याच्या पायी चालत आले. असे असता त्याचा यत्किंचितही अभिलाष त्याने धरला नाही.


धन्य भरत चरित्र. त्याच्यासारखे साधुत्व व बंधुत्व क्वचितच आढळेल, नाहीच म्हटले तरी चालेल. सर्व भारतातच नव्हे, सर्व जगात भरताचा आदर्श आहे. भरत चरित्रात देहासक्तीचा लेषही नाही. म्हणून भरत सर्व पूज्य व राम सर्व प्रिय झाला.


आपण कसे आहोत याचा विचार करु. आपण अगदी वाईटही नाही व भरतासारखेही नाही. आपण अधले मधले आहो. मग आपण काय केले पाहिजे? सर्व दुःखाचे मुळ देहबुद्धी आहे. ती सुटली पाहिजे.


प्रपंचात एखाद्या विषयात तल्लीन झालो तर आपण देहाच्या सुखदुःखाकडे कोठे पाहतो. विषयानंद देखील देहाचा विसर पडल्यावाचून होत नाही.


आशीर्वाद.

🌷💧🌿

   🌷☘श्रीराम समर्थ☘🌷


अमृतधारा  ७६८


साधकाने संतांच्या वृत्तीचा विचार करावा. एखादा मनुष्य प्राणायामाचे सहाय्याने वृत्ती निरोध काही वेळ करू शकतो. पण वृत्ती उठल्यावर देहाच्या अहंकारावर येतो.


संतांचे तसे नसते. वृत्ती असतानाही ती देहाहंकार विरहित म्हणजेच शुद्ध असते व निवृत्तीतून उठल्यावर सुद्धा देहाहंकारावर न येता रामरूप झालेली असते. म्हणून संत तीनही अवस्थेत एकरूप असतात. त्यांचा आनंद कायम असतो.


प्रापंचिक मनुष्य विषयानंद घेत असता विषयातून आनंद मिळावा असे मानतो. मी घेणारा व विषय तो देणारा अशी कल्पना असते. परंतु सुख हे विषयात नसून आत्म्यात आहे. आत्माच सुखरूप आहे.


सुख बाहेरून मिळते हा भ्रम, माया, आरोप, अध्यास काय वाटेल ते म्हणा आहे. ही कल्पना आपण घालविली पाहिजे व वृत्ती अंतर्मुख केली पाहिजे.


स्वतः मेल्यावाचून स्वर्ग दिसत नाही म्हणतात, तसे आपण मरणे म्हणजेच देहबुद्धी टाकणे देहाची आसक्ती सोडणे होय.


आशीर्वाद.

☘🌷💧

   💧🍁श्रीराम समर्थ🍁💧


अमृतधारा  ७६९


देहबुद्धी सुटली की आत्मानंद आहेच. तो कोठून बाहेरून मिळवायचा नाही. आत्मसुखाची गोडी घेण्याची दररोज मनाला थोडा थोडा वेळ सवय केली पाहिजे.


यालाच आत्मचिंतनाचा अभ्यास म्हणतात. अभ्यास जसा जसा वाढेल तसा साधक आनंदी होईल. पण हे सर्व आपणच केले पाहिजे.


एका गृहस्थाचे लग्न ठरले. त्याने लग्नाकरता रजा मागितली. साहेब म्हणाला

"दुसऱ्या कडून करून घे". हे कसे चालेल! त्याप्रमाणे ब्रह्मानंद हा आपणच चाखला पाहिजे. तो प्रत्येकाच्या हृदयात स्वयंभू आहे. वृत्ती वळवून तो चाखला पाहिजे.


सर्व लोक यात्रेकरता धडपडतात. पैसा खर्च करतात. कष्ट, देहदुःख सहन करतात. पण ब्रह्मगिरीवर जाण्याची यात्रा घरबसल्या बिनकष्टाची, बिन पैशाची असता ती कोणी करत नाही.


आशीर्वाद.

🍁💧☘

   🍁💧श्रीराम समर्थ💧🍁


अमृतधारा  ७७०


एकांतात स्वस्थ बसावे. रामास आठवावे. त्याच्या पायावर डोके ठेवावे आणि म्हणावे  "रामा माझे मन शुद्ध कर. देहबुद्धी येऊ देऊ नको. तुझे चरण माझ्या चित्तात सदैव ठेव. तुझे हास्य मला पाहू दे. तू माझ्या मस्तकावर वरदहस्त ठेव. तुझे चंद्रासारखे मुख पाहता मला तल्लीन होऊ दे. रामा, मी कोणी नाही. तूच, सर्व आहे. तूच सर्वांपरता व सर्वात आहेस. तूच सर्व शक्ती समर्थ आहेस". असे त्यास प्रेमाने आळवून राम परमानंदरूप आहे असे जाणून त्याच्याशी अनन्य होऊन रहावे.


वृत्ती उठली तरीही नम्र भावना ठेवावी. मी कोणीच नाही, सर्व राम आहे व मी रामाचा आहे. ही भावना सोडूच नये. वृत्ती असो वा नसो गोड भावनेत आनंदाने रहावे.


असा अभ्यास करून पहावा. अशा प्रकारे सदोदित रामस्मरणात रहा. किती समाधान लाभेल पहा !


आशीर्वाद"

🍁☘🌷

   🌼🍁श्रीराम समर्थ🍁🌼


अमृतधारा  ७७१


संत फारच दयाळु आहेत. त्यांनी परमार्थाचे किती सोपे साधन सांगितले. पण आपण सोपे सोडून कठीणाकडे जातो. काय म्हणावे? संतांची संगत धरावी म्हणजे हा मार्ग आपोआप सापडेल.


प्रपंच हा एक बाजार आहे. यात्रा भरते तसा. तेथे अनेक वस्तू येतात. त्या आपण घेत नाही. जे आपणास पाहिजे तेच घेतो. त्याप्रमाणे आपणास सुख पाहिजे ते संतांच्या पेठेत आहे. तेथे नाम घेतात व नाम देतात. तेच फक्त घ्यावे आणि सुखी व्हावे.


काही लोक संसार नको म्हणतात. घरदार, बायको यांचा त्याग करतात. पण दुसरीकडे जाऊन मठाची, आश्रमाची स्थापना करून मठपती बनतात.


गृहपतीत्व टाकून मठपतीत्व घेतले. एक उपाधी टाकून दुसऱ्या मोठ्या उपाधीत अडकला. तसे करु नये. सर्वात उत्तम निरुपाधिक साधन नाम आहे. ते कधी सोडू नये.


आशीर्वाद.

🌼☘🌷

   💧🌷श्रीराम समर्थ🌷💧


अमृतधारा  ७७२


संसार हा नश्वर आहे हे ओळखून वागायचे आहे. पण तो टाकताही येत नाही. संसारात राहून त्याच्याशी विशेष आसक्ती ठेवली नाही तर तो टाकल्यासारखाच होणार नाही काय?


बायकोनवरा कोणी वाईट निघाले, टाकता तर येत  नाही. मग घरात राहून संबंध न ठेवले तर टाकल्यासारखेच नव्हे काय? असे केल्याने अब्रूही राहते, व टाकल्यासारखेही होते.


प्रपंचातली वस्तू आज ना उद्या जाणार हे जाणून त्यांच्याशी अलिप्तपणे वागावे म्हणजे शोक करण्याची पाळी येणार नाही. ही वृत्ती अभ्यासाने वारंवार विचाराने वाढवावी.


प्रपंचात प्राप्त झाले त्याचा हर्ष न करावा, गेल्याचा शोक न करावा, असे वागावे. देह प्रारब्धावर टाकावा. परमार्थात आटोकाट प्रयत्न करावा. हे साधण्यास एक मोठी परिणामकारक व सोपी अशी युक्ती आहे.


आपण रामाचे व्हावे.


आशीर्वाद.

🍁☘🌷

   💧🌹श्रीराम समर्थ🌹💧


अमृतधारा  ७७३


राम ठेवील त्यात समाधानाने रहावे. जशी हानी (नुकसान) आपण इच्छा न करता होते, ती आपल्या हातात नाही, तसा लाभही नाही हे लक्षात ठेवावे. लाभ झाला की मी केला व हानी झाली की दुसर्‍याने केली म्हणतो हेच चुकते.


दुसऱ्यावर शोक प्रसंग आला की त्याला म्हणतो "ईश्वरी इच्छा, तिच्या पुढे इलाज नाही" असे आपण म्हणतो. पण स्वतःवर तो प्रसंग येताच आपण ती बुद्धी विसरतो.


आम्ही जे लोकांस सांगतो ते कृतीत आणले पाहिजे, तर फार आनंद होईल. जे ज्ञान आपणास समाधान देते, ते खरे ज्ञान. जे ज्ञान समाधान देत नाही ते खरे ज्ञान नव्हे.


एखाद्या ठिकाणची भाषा येत नसल्यास आपण दुभाषा गाठतो. त्याप्रमाणे संत दुभाषाची संगती धरली पाहिजे. तो म्हणेल तेथे जाऊ, तो सांगेल तसे करुया. मग परमात्मा भेटेलच.


आशीर्वाद.

🌷☘🌼

   🍁💧श्रीराम समर्थ💧🍁


अमृतधारा ७७४


आपण संतांच्या पावलावर पाऊल ठेवून चालल्यास मुक्काम गाठू. संतांना फार कष्ट पडले. त्यांना रात्रंदिवस आमची चिंता लागली. पण आपणास कष्ट मुळीच नाहीत.


संतांवर विश्वास ठेवून वागले की आपले काम झालेच बघा. शास्त्रें व वेद अनंत आहेत. ते शिकण्यास वेळ कोठे आहे? अनेक साधनें आहेत. तीही करण्यास आमचेपाशी सामर्थ्य व वेळ कोठे आहे?


संतांनी सर्वांचा अभ्यास केला. सर्व वेद शास्त्रें पाहिली व नवनिताप्रमाणे सर्व साधनांचे सार असे  नाम ते आपल्या हाती दिले. "रामाला अनन्य भावे शरण जावे व त्याच्या नामात रंगावे" हेच ते सार.


संत आणाशपथा घेऊन सांगतात, कळकळीने सांगतात, पण दुर्दैवी आम्ही. ते सांगतात त्यावर विश्वासच बसत नाही. म्हणून सुगम परमार्थ दुर्गम झाला.


आशीर्वाद.

🌷🌼☘

,   ☘🌼श्रीराम समर्थ🌼☘


अमृतधारा  ७७५


संतांनी जो मार्ग आखला, त्यावरून डोळे मिटून जावे. पडण्याची, अडखळण्याची भीती नाही. आपण प्रपंचात इतके खोल जातो की संताची हाकच ऐकू येत नाही.


ती ऐकू येईल इतक्या अंतरावर तरी असावे. ते हात वर करून हाका मारतात. पण आम्हीच त्यांच्याकडे लक्ष देत नाही.


बुद्धीमंतापेक्षा भोळा माणूस बरा. त्यास परमार्थ सुलभ होतो. तसा बुद्धीमंतास होत नाही. अर्धवटास तर त्याहून नाही.


आपण संत वचनांवर विश्वास ठेवुया म्हणजे भगवद्प्रेम लागेलच. ते लागल्यावर विषयप्रेम कमीच होईल. म्हणून संताची संगत करणे. एवढे जरी केले तरी कल्याणच होईल बरे.


संत वचनांवर विश्वास ठेवून त्याप्रमाणे वागावे. नामस्मरण करावे. ते रामाकरता करावे. दुसऱ्या कशाही करता करू नये. रामाचा ध्यास अखंड असावा.


आशीर्वाद

🌼🌷☘

  : 🍃श्रीराम 🌷 समर्थ🍃


विजयादशमी उत्सव मोठा

मनो मीलनाचा |

झाले गेले विसरुन सारे

मानसी जुळण्याचा ||

सिमोल्लंघन करुनी टाकू

अंतर् दोषांना |

सदभावांचे सोने आणुन

लुटुया प्रीय जनां ||

सद्गुरु देवा मागु आशिषा

आनंदी जीवन |

तया आवडे वागु , करुया

नामाचे स्मरण ||

सर्वां हृदयी चैतन्याचा

वास असे जाणुनी |

प्रेमप्रिती सद्भाव धरुया

सर्वांसाठी मनीं ||


श्रीसद्गुरु ब्रह्मचैतन्य

महाराजकी जय

जय जय रघुवीर समर्थ

🍃 स्वानंन्द 🍃


??🏻🌿🌷🌼🌷🌿🙏🏻

   ☘🌼श्रीराम समर्थ🌼☘


अमृतधारा  ७७६


खरोखर रामचरित्र सर्वतोपरी गोड आहे. रामाजवळ कैकयी,  मंथरा होती. रामाचे सान्निध्य हे रामप्रेमास कारण आहे म्हणावे तर कैकयी, मंथरा यांचे मनात मत्सर का उत्पन्न झाला? दुष्टबुद्धी का उत्पन्न झाली? त्या दोघींची वृत्ती का बदलली नाही?


याचे उत्तर एकच सांगता येईल. ते म्हणजे कैकयीच्या मनात विचार व विकार या दोन्हीचे वादळ झाले. त्यात विकाराने विचारांचा पराभव केला व विकार बळावला.


देहबुद्धी बळावली व ती मंथरेच्या दुष्ट संगतीने आणखी फोफावली. गूहकाला मात्र रामप्रेम आले, त्याचे कारण त्याचे विचारांचे प्राबल्य आणि त्याची रामावरील भक्ती.


एक गृहस्थ २४ तास देवळात बसला पण त्याचे लक्ष रामाकडे नव्हते. म्हणून तो देवळात स्थुलदृष्ट्या बसला असता तो घरी गेला होता. दुसरा गृहस्थ घरीच होता पण सगळे लक्ष रामाकडे होते म्हणून तो गृहस्थ घरी असूनही रामाजवळच राहिला.


देवाच्या पुजाऱ्यापेक्षा देवापासून लांब असणाऱ्या लोकासच भक्ती जास्त असते.


आशीर्वाद.

🌷🌼💧


गूहक हा नंदीग्रामचा राजा, जिथे रामाची व भरताची भेट झाली.


☘💧🙏🏻😌🙏🏻💧☘

   🌷🌼श्रीराम समर्थ🌼🌷


अमृतधारा  ७७७


रामचरित्रात काही लोकांस गोडी वाटत नाही. हे निकृष्ट असे काही मानतात. तसे नव्हे. भगवद्प्रेम थोडे जरी असल्यास राम चरित्र फार गोड लागेल.


परमेश्वर प्राप्तीसाठी भक्ती वाढविली पाहिजे. ती वाढविण्यासाठी सदाचाराची जोड पाहिजे. सदाचाराने वागणे हे मात्र आपल्या हातात आहे.


आपल्या मुलाच्या गोष्टी कोणी सांगू लागला तर त्यात प्रेम वाटते. मुलावर प्रेम आहे म्हणजेच आपलेपणा आहे. म्हणून प्रेम वाटते. आपलेपणा जेथे नाही, त्याचा इतिहास गोड लागत नाही.


राम माझा आहे, मी रामाचा आहे ही भावना ठेवून रामचरित्र वाचल्यास प्रेम लागेल व चरित्रातील प्रत्येक बारिक सारीक गोष्ट प्रेमाची वाटेल.


बायकोचे पत्र आल्यावर ते किती प्रेमाने पुन्हा पुन्हा वाचतो? किंवा चुकल्या मुलाची कोणी माहिती सांगत असल्यास किती आतुरतेने व प्रेमाने ऐकतो व आनंदित होतो.


त्याप्रमाणे रामचरित्राविषयी प्रेम वाटले पाहिजे. आपल्या मुलांस, बायकोस कोणी वाईट म्हटले तर खपत नाही. तसे कोणी रामास वाईट म्हटले तर आपल्याला वाईट वाटले पाहिजे.


आशीर्वाद,

💐☘🌼

   🌼🍁श्रीराम समर्थ🍁🌼


अमृतधारा  ७७८


मुख्यतः देहावरील प्रेम हेच बाधक आहे. इंद्रियांना वळण लावले पाहिजे. त्यांची विषय प्रिती कमी कमी केली पाहिजे. जे इंद्रीये मागतील ते न दिले पाहिजे.


मुख्य म्हणजे आम्ही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागतो. त्यांस डोक्यावर आम्ही चढवले. इंन्द्रियांना आपले सेवक केले पाहिजे. आपण म्हणू तसे त्यांनी वागले पाहिजे. याला अभ्यासच केला पाहिजे. तो अभ्यास नामस्मरण पूर्वक झाला पाहिजे.


भगवंताचे नाम मुखातून न येण्यापेक्षा मुकेपण बरे नाही काय? दृष्टी जर भगवंताची मूर्ती पाहत नसेल तर दृष्टी काय कामाची? भगवंताची कीर्ती जर आपले कान ऐकत नसतील ते कान काय कामाचे?


डोळ्याने भगवंताची अथवा महात्म्याची मूर्ती पाहणे, मुखाने भगवत् नामस्मरण करणे, कानांनी त्याचेच गुणानुवाद ऐकणे हाच खरोखर अभ्यास आहे.


भगवत् चरित्र ऐकावयाचे कशासाठी? गोष्ट म्हणून नव्हे तर त्याप्रमाणे वागण्यासाठी ऐकावयाचे.


आशीर्वाद.

🍁🌼💧

,   🍁🌼श्रीराम समर्थ🌼🍁


अमृतधारा  ७७९


भगवत्प्राप्तीचा एक सुलभ उपाय आहे. भगवंताशी, रामाशी कोणते तरी नाते लावावे. भगवंत माता मी लेकरू, तो पिता मी पुत्र, तो सूत्रधार मी बाहुले, तो पती मी पत्नी, किंवा तो पुत्र मी आई. असे नाते लावावे.


मुलगा दत्तक घेतल्यावर त्याच्याशी पुत्रप्रेम लावतो की नाही? लग्न होण्यापूर्वी कोण नवरा कोण बायको? पण लग्न होताच ते नाते लावतो व सहवासाने प्रेम वाढवितो.


प्रेम केल्याने प्रेम वाढते. तसे भगवंताविषयी कोणते तरी एक प्रेमाचे नाते लावून ते वाढवावे. किंबहुना तो स्वभावच व्हावा म्हणजे भगवत्प्राप्ती सुलभ होते.


हनुमंताने दास्य भक्ती केली. रामास आपल्या हृदयातच ठेवले. गूहकाचे (नंदीग्रामचा नंदराजा) रामावर प्रेम तसेच होते. प्रपंचात दुःख प्रसंग आला म्हणजे राम स्मरण होते. तसे ते सर्व काळी ठेवावे. रामावर पूर्ण श्रद्धा ठेवावी. म्हणजे आपली काळजी त्याला वाटते.


आशीर्वाद.

🍁☘🌷

   ☘🌹श्रीराम समर्थ🌹☘


अमृतधारा  ७८०


एक जोडपे जवळच्या खेड्यातील बाजार आटोपून आपल्या गावी परतत होते. रस्त्यात पाऊस लागल्यामुळे एका घराच्या ओट्यावर थांबले. काही चोर पण त्याच ओट्यावर थांबले होते.


जोडप्याचे बोलणे ऐकून एक चोर म्हणाला आम्ही पण त्याच गावी जात आहे. तुम्ही आमच्याबरोबर चला, अनायासे सोबत होईल. नवऱ्यास जरी पटले तरी बायकोचा त्यांच्यावर विश्वास बसेना.


त्या चोरांनी सांगितले "राम साक्ष सांगतो तुम्ही भिऊ नका, आमचेबरोबर चला" ती मनात म्हणाली "रामा, तुझी शपथ व साक्ष या माणसांनी दिली आहे. आता तुझ्यावर भरवसा ठेवून मी या लोकांबरोबर जाते, तूच आम्हास सांभाळ".


नंतर काही वेळाने जेव्हा डोंगरवाट लागली तेंव्हा चोरांनी नवऱ्यास एका झाडाला बांधले व बायकोच्या अंगावरचे दागिने घेण्यास हात टाकणार तो बायकोने "चोर चोर धावा धावा" अशा आरोळ्या ठोकल्या.


इतक्यात समोरून दोन घोडेस्वार आले, त्यांनी वायबार (हवेत गोळीबार) केले. ते आल्याबरोबर चोरांनी पलायन केले. नवऱ्यास बांधले होते ते सोडले व स्त्रीस म्हणाले  "बाई घाबरू नका. आम्ही तुम्हास गावाच्या वेशीपर्यंत पोचवितो. काही काळजी करू नका".


त्यांनी त्या दोघांस गावाच्या वेशीपर्यंत पोहचविले. बाईने आपली कृतज्ञता व्यक्त केली. तिला वाटले की साक्षात राम लक्ष्मण सोडविण्यास आले की काय! तिची रामावरची श्रद्धा अधिकच  दृढ झाली. तिचा रामावर भरवसा होता म्हणून सुटका झाली.


आशीर्वाद.

🌷☘🌼

   🙏🏻🌷श्रीराम समर्थ🌷🙏🏻


अमृतधारा  ७८१


रामप्रेम हे आईच्या दुधासारखे व इतर साधनें बाटलीतील दुधाप्रमाणे होत. रामाजवळ घरदार मागावे, नाही असे नाही. पण ते स्वार्थोपभोगासाठी नसून रामाप्रित्यर्थच मागावे. मग राम निश्चित देतो.


जसे एखाद्या बाईस स्वतःचे मूल नसले म्हणजे तिला दुसऱ्याचे मूल पाहताच प्रेम येते. तसे भगवत् प्रेमरुपी मूल आपल्याजवळ नाही. ते संतांजवळ आहे. त्यांच्याजवळ गेल्यास, त्यांची संगती धरल्यास भगवंताचे प्रेम येईल.


रामाचा सहवास ज्यास घडला तो श्रेष्ठ भक्त समजावा. एक रामभक्त होता. तो रामायण सांगत असे. श्रोते म्हणाले  "रामायणातले सार आम्हास सांगा". तो म्हणाला  "उद्या सांगेन." सर्वांना उत्कंठा लागली.


दुसरे दिवशी पोथीस सुरवात झाल्यावर तो "राम राम" च म्हणत बसला व तेच सर्वाचे सार आहे असे तो म्हणाला. लोकांना विश्वास बसेना. ते कंटाळले व निघून गेले. एकदोघांनी मात्र चिकाटी धरली व नामस्मरणात रंगले. त्यांना समाधान झाले.


नामदेव चरित्र पहा. त्यांच्याशी देव बोलत होता. त्यांच्या हाताने विठ्ठल जेवत होता. तितके प्रेम आपले वाढले पाहिजे. मग आनंदाला पारावारच राहणार नाही.


आशीर्वाद.

🌷☘💧

   🌷💧श्रीराम समर्थ💧🌷


अमृतधारा  ७८२


रामायणातील भरताचे चरित्र फार गोड आहे. रामाची किंवा कोणाचीही अपेक्षा नसता भरत रामाप्रमाणे वल्कले धारण करून, व्रत वैकल्याने, जटा वगैरे ठेवून वनवासीप्रमाणे राहिला. रामावरील त्याचे प्रेम अलोट होते. त्याची वर्तणूक सर्वांस आदर्श आहे.


भगवंताचे नाम सर्वात श्रेष्ठ आहे. जो त्या नामात रंगेल तो खरा रामप्रेमी. रामाचे चरित्र विसरले तरी चालेल पण त्याचे नाम विसरु नये. कारण नामात सर्व चरित्र साठवले आहे.


ज्ञान, उपासना, कर्म वगैरे अनेक मार्ग आहेत पण सर्वात नामस्मरण हे सोपे साधन आहे. रामस्वरूप निरुपाधिक शुद्ध सोने आहे. तसेच त्याचे नाम ही आहे. म्हणून नामस्मरण केले की राम प्राप्ती होईल.


आंबा स्वाभाविकच गोड असतो, त्याला साखरेची जरुरी नाही. तद्वत नाम स्वभावतःच गोड आहे. पण आमचे तोंड कडवट आहे. म्हणून आम्हास ते कडू वा बेचव लागते.


ज्ञानाच्या गोष्टी "ब्रह्म सत्यं जगत् मिथ्या" कळणे फार कठीण आहे. त्याही, पुढे अभ्यासाने व दीर्घ काळाने कळतीलही. पण नामाचे महत्व कळणार नाही. नामाचे महत्व संतकृपेनेच कळते. नामावर विश्वास बसणे महाभाग्याचे लक्षण आहे.


आशीर्वाद.

🍁☘🌼

   

   ☘💧श्रीराम समर्थ💧☘


अमृतधारा  ७८३


एका मुलास बाप म्हणे तूं माझ्यासारखा कलेक्टर हो. मुलगा होईन म्हणाला, पण तो पुढे अभ्यास काही करीना.

तेव्हा बाप म्हणाला  अभ्यास करून परीक्षा पास झाल्याशिवाय तू कलेक्टर कसा होशील?


त्या मुलाप्रमाणे आपली स्थिती आहे. राम प्राप्ती पाहिजे पण साधन करणे नको. तसेच काही लोकांस निर्गुण श्रेष्ठ वाटते. पण सगुणावाचून निर्गुण कळणारच नाही, हे त्यांना कळत नाही.


सर्व जगावर संतांचे फार मोठे उपकार आहेत. त्यांनी जे केले त्यापैकी काही महत्त्वाच्या गोष्टी,


१) परमात्म्यास सगुणात आणले व सुसेव्य, सहज साध्य केले.

२) परमात्म्यास आपलासा करून घेण्यास सोपे साधन नामस्मरण दिले.

३) एकनाथी भागवत, ज्ञानेश्वरी आदि सोपे ग्रंथ निर्माण केले.

४) कलीयुगात यथाशक्ती अन्नदान करणे हेही एक उत्तम साधन आहे असे सांगितले.


या चार गोष्टी ज्याने आचरल्या त्यास कधी काही कमी पडणार नाही. नेहमी समाधानच राहील.


आशीर्वाद.

💧🌷☘

   💧🌷श्रीराम समर्थ🌷💧


अमृतधारा  ७८४


नाम श्रेष्ठ आहे ते खोटे नाही. सर्व संत तेच सांगतात. पण लोक त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत. प्रत्येक जण आपल्या नावाला जपतो ना?


नावाला जितकी किंमत आहे तितकी कशास नाही. बाळपणापासून मरेपर्यंत ते आहे. मेल्यावर देह जातो पण नाम राहते. भगवंताचे नाव आपल्यापेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे.


वैद्य आपल्याला प्रकृती पाहून सुलभ सोपे औषध सांगतात. फार कमी किमतीचे पण गुणकारक. तसे संतांनी भवरोगावर रामनाम मात्रा शोधून काढली आहे.


रामनाम मात्रा घेण्यास अगदी सोपी आहे. उपचार काही नाही. किंमत काही नाही. हे असे साधे औषध पण गुणकारी आहे. ही मात्रा भवरोग्याने नियमित सेवन मात्र केली पाहिजे.


पतंग कितीही उंच गेला तरी दोरी हातात असली म्हणजे झाले. तसे राम कितीही दूर असला तरी नाम जवळ असले म्हणजे झाले. राम दूर असला व नाम जवळ असले तर रामास पकडून ठेवल्या सारखेच आहे.


आशीर्वाद.

💧🌷☘

   🍁💧श्रीराम समर्थ💧🍁


अमृतधारा  ७८५


हनुमान सीता शोधास जात असता सीता कोठे सापडेल याचा विचार करू लागला. त्याने सीता पाहिली नव्हती. तेव्हा सुग्रीव म्हणाला  "जी स्त्री रामनाम स्मरण करत असेल ती सीता आहे असे समज". नंतर अशोक वनात नामस्मरणावरून सीतेची ओळख मारुतीस पटली.


नामस्मरण करता करता काही काळाने चित्त एकाग्र होते. सोने तोलण्यास जशी गुंज तसे रामाला तोलण्यास रामनाम आहे.


शिमग्याच्या (होळीच्या) दिवसात एका मुलाने दुसर्‍यास शिवी दिली. त्याने त्याच्या थोबाडीत मारली व त्याच्या बापाकडे नेले. बाप म्हणाला  अरे, माझा मुलगा लहान आहे. त्याला शिवीचा अर्थही कळत नाही. तू त्याला का मारले?


मुलगा म्हणाला  "शिवीचा अर्थ त्याला कळत नसेल पण मला कळतो म्हणून मी त्यास थोबाडीत दिली". त्याप्रमाणे नामाचा अर्थ आपणास जरी कळला नाही तरी तो रामास कळतो. म्हणून नामाचे महत्त्व कळो वा न कळो ते आपण नियमितपणे अवश्य घ्यावे.


आशीर्वाद.

🌸☘💧


( गुंज  तोळा  मासा  गुंज. त्या काळातील सोने वजन करण्याचे अगदी लहान माप. )

   🌷☘श्रीराम समर्थ☘🌷


अमृतधारा  ७८६


भगवंताचे नाम हेच त्याचे सर्वस्व आहे. तसे रामाचे नाम हे रामसर्वस्व आहे. मोक्षरूपी किल्ल्याची ती किल्लीच आहे. नाम घेत असताना सदाचरण मात्र ठेवले पाहिजे.


अनीती, अधर्म हातून घडूच नये. भगवंतावर भरवसा ठेवून रहावे. प्रारब्धाने जे आले ते मुकाट्याने सहन करावे. लोभ करू नये.


नामस्मरण करतो पण अनीतीने वागतो हे बरे नव्हे. भरताने नीती सोडली नाही. राम पादुका घेतल्या, सिंहासनावर ठेवून तो नित्य रामस्मरणात राहिला. मारुतीने रामसेवा एकनिष्ठेने केली म्हणून रामाने त्यास आपले नाम दिले.


रामाने आपले नाम त्यास देणे म्हणजे सर्वस्व देण्यासारखेच आहे. रामाने इतकेच सांगितले की  "मारुती, तुझी जो सेवा करील त्याने माझी सेवा केल्यासारखे होईल".


रामाने मारुतीस आपले नाम देणे म्हणजे एका सत्ताधीशाने आपला सही करण्याचा अधिकार दुसऱ्यास देण्यासारखे आहे.


आशीर्वाद.

☘🌸💧

   💧🌷श्रीराम समर्थ🌷💧


अमृतधारा  ७८७


नाम स्मरणात खूप तल्लीन व्हावे. देहाचा विसर पडावा. देहबुद्धी विसरून नाम घेणे हेच निर्गुण होणे आहे.


भगवंत जर कृपण असेल तर तो नामभक्ती देण्यात आहे. म्हणून त्याला आळवावे. "तुझ्या नामाचे प्रेम दे" हेच मागावे.


बाकी सगळे भगवंत देईल पण नामाचे प्रेम तो क्वचित देतो, म्हणून आपण तेच मागावे. रामाचे अनुसंधान नित्य ठेवावे व आनंदात रहावे.


संतांनी जी ईश्वर चरित्रे वा संत चरित्रे लिहिली ती स्वतःच विसरून लिहिली. तुलसीदासांना निर्गुण कळत नव्हते काय? त्यांनी निर्गुणावर का लिहिले नाही ?


श्रीरामप्रभुचे चरित्रच वर्णन कां केले? याचे कारण सर्वांस त्याचा लाभ होऊन त्यांना निरहंकारत्व बाणावे.


राम चरित्र व भरत चरित्र याचा आदर्श डोळ्यापुढे ठेवल्यास कोणासही आपल्याविषयी अभिमान वाटेल? राम चरित्रापुढे आपण कःपदार्थ आहोत असेच वाटेल. हे मीपणाचे वारे संपूर्ण गेले पाहिजे तरच भगवद् प्रेम लागेल.


आशीर्वाद.

🌷💧🌼

   🌷💧श्रीराम समर्थ💧🌷


अमृतधारा  ७८८


प्रपंचासक्त मनुष्याचा मीपणा वाढत असतो.  जाणून अथवा अजाणून तो आपणास ज्ञानी समजत असतो. आमचा सगळा प्रयत्न मीपणा वाढविण्यात जातो.


संत सांगतात की, "विद्या शिका, कला शिका, थोर व्हा पण थोरपणा घेऊ नका, तो सांडा"  म्हणूनच संत म्हणतात की, भगवत् चरित्राचा अभ्यास करा म्हणजे नामावर श्रद्धा बसेल व नीतीची वागणूक होईल.


नाम घेत असता पथ्ये सांभाळलीच पाहिजेत.

१) परस्त्री मातेसमान मानणे,

२) परद्रव्य विष्ठेसमान मानणे,

३) परनिंदा त्याग करणे.

ही पथ्ये सांभाळून नामस्मरण केले तर कृतकृत्यता येईल.


संत तुलसीदासांनी तर असे म्हटले आहे की, ही वरील पथ्ये सांभाळून जो नामस्मरण करेल त्यास राम खास भेटेल व त्याबद्दल मी जामीन राहीन.


रामाचे चरित्र किती उदार आहे. कैकेयीने रामास वनवास दिला. पण रामाने कैकेयीस चुकूनसुद्धा अनादराने संबोधिले नाही. दुसऱ्याने अपकार केला तरी आपण त्यावर उपकारच करणे ही सामान्य गोष्ट नाही.


आशीर्वाद.

🌷💧☘

   🍀🌷श्रीराम समर्थ🌷🍀


अमृतधारा  ७८९


परमार्थात मुख्य शत्रू अहंकार आहे. तो आपल्यात पूर्णपणे भरला आहे. म्हणून रामकृपा होत नाही व नामावर श्रद्धा बसत नाही. मुख्य कर्तव्य आपले हे आहे की अहंकार घालविणे.


सुखी कोण? निरहंकारी. देहबुद्धी हेच अहंकाराचे स्वरूप. ती वाढवून जो वासना वाढवितो तो दुःखी. देहबुद्धी नाहीशी करून जो रामनामी रंगतो तो सुखी.


प्रपंच हा मीठाप्रमाणे आहे. मीठ कितीही धुतले, स्वच्छ केले व साखरेसारखे दिसले तरी ते खारटच. प्रपंच कितीही उत्तम, संतती, संपत्ती व ऐश्वर्ययुक्त असला तरी तो नश्वरच; अतएव दुःख रूपच. फरक एवढाच की गरीबाचे मीठ काळे व श्रीमंताचे मीठ पांढरे. पण मीठ ते मीठच.


एका गरीब बाईचा हुशार मुलगा मिलिटरीत गेला. नोकरीवर जाताना त्याने आईला नमस्कार केला व आशिर्वाद मागितला. त्यावेळी ती गोधडी शिवत होती.


काही दिवसांनी त्यास बढती मिळाली. पगार पण चांगला झाला. तो आपल्या आईस पुरेसे पैसे पाठवी. बरेच दिवसांनी तो आईस भेटण्यास आला. त्यावेळीही आई गोधडीच शिवत होती. यावरून प्रपंचाची आसक्ती माणसास किती असते याचा विचार करावा.


आशीर्वाद.

🌷🍀🌼

   🍁💧श्रीराम समर्थ💧🍁


अमृतधारा  ७९०


प्रपंचाची आसक्ती सुटावी म्हणून संत तुलसीदासांनी रामचरित्र लिहिले. सगुणाचे श्रेष्ठत्व गाईले. सगुणाचे प्रेम ठेवणे हेच खरोखर ध्येय आहे. कोणी त्यावर विश्वास ठेवत नाहीत. ते निर्गुणच श्रेष्ठ समतात.


खरे म्हणजे निर्गुण त्यांस कळत नाही व सगुणावरील त्यांचा विश्वास उडालेला असतो. म्हणून दोहोकडोन ते अंतरतात.


खरोखर, सगुणोपासनेवाचून मोक्ष मिळणार नाही. सगुणोपासनेवर श्रद्धा बसणे हे महद् भाग्य आहे. सत्संगती व संतकृपा यानेच सगुणोपासनेवर श्रद्धा बसेल.


देहबुद्धी व वासना नाहीशी करण्यास उपाय म्हणजे सप्रेम नामस्मरण व रामास अनन्यभावे शरण जाणे. मी कर्ता आहे असे न म्हणता राम कर्ता असे म्हणूया.


अभिमान ठेवायचाच असेल तर तो "मी भगवंंताचा आहे" असे म्हणावे व बाकिचे सर्व अभिमान सोडावे.


रामापाशी विषय मागू नका. रामाची फक्त सेवा करा. ती निष्काम करा. मग रामच तुम्हाला आपण होऊन सर्व देईल. म्हणून सकाम भक्ती करू नका. अर्थात अगदीच न करण्यापेक्षा ती बरी. पण ध्येय निष्काम भक्ती हे असावे.


आशीर्वाद.

🍁☘🌷

   🌷💧श्रीराम समर्थ💧🌷


अमृतधारा  ७९१


आपणास जे धन, ऐश्वर्य वगैरे मिळाले आहे ते माझे नसून रामाचे आहे, हे नेहमी ध्यानात ठेवावे. नळातून जे पाणी येते ते नळाचे आहे असे अडाणी म्हणतील पण ते खरे नव्हे.


कारण नळाचे पाणी जो मूळ पाण्याचा साठा किंवा तलाव आहे तेथून येते. तेथील पाणी जर आटले तर नळाला पाणी येणार नाही. म्हणून आपले ऐश्वर्य आपले नसून ते रामाचे आहे असे समजावे व राम ठेवील त्यात आनंदात रहावे.


राम उपाधीरहित आहे. तसे त्याचे नामही उपाधीरहित आहे. म्हणून तेच घ्यावे. दगड किंवा वाळू पाण्यात मिसळत नाही. साखर किंवा मीठच पाण्यात विरघळते व समरस होते. तद्वत रामाशी त्याचे नामच समरस होते.


समरसता, श्रीराम प्रभूंच्या चरित्राचा अभ्यास केल्याने येईल. रामाला, रावणास अन्य प्रकारे मारता आले असते. परंतु "जगाकरीता मी आहे. त्यास नीती, धर्म, परमार्थ प्रत्यक्ष कसा आचरावा हे शिकवायचे आहे". हे ध्येय ठेवून श्रीराम तसे वागले.


कलीयुगात नाम श्रेष्ठ आहे. तेच भवरोग निवारक आहे. राम नामाचे औषध संत देतात व म्हणतात, आता खुशाल कलीकालात वावरा. भवबाधा होणार नाही


आशीर्वाद.

💧🌷🍁

   🍀🌸श्रीराम समर्थ🌸🍀


अमृतधारा  ७९२


देहाने संतसेवा व मुखाने नामस्मरण असल्यावर जगात दुःखच भासणार नाही. आपली परीक्षा आपणच घ्यावी. पहिला प्रश्न मी विकारवश होतो काय? होत असेल तर सप्रेम नामस्मरण करणे जरूर आहे.


थर्मामीटर ताप दाखवितो, घालवीत नाही. त्याप्रमाणे शास्त्र तुमचे चुकते कोठे ते दाखवितात, काय करावे ते सांगतात. पण करणे आपल्याकडेच आहे.


नाशकात समर्थास राम दिसला. आम्हास कां दिसू नये? रामदासांसारखी श्रद्धा ठेवून उपासना करीत नाही म्हणून. कसेही करा पण सदोदित मी रामाचा आहे, ही भावना जागृत ठेवा.


एका स्त्रीला नवऱ्याने टाकले, तरीपण अन्नवस्त्र स्त्रीस देणे नवऱ्यास भाग पडलेच. तसे नामाचे आहे. नाम घेत असावे. जाणून, अजाणून, श्रद्धेने, अश्रद्धेने कसेही घ्यावे. तो राम अन्नवस्त्रास कधी कमी पडू देणार नाही.


तेच नाम श्रद्धेने घेतल्यास विशेष फळ लवकर मिळते. म्हणून अखंड नामात रंगूया व आनंदात राहूया.


आशीर्वाद.

🌷🍀🌸

  : 🪔📍श्रीराम📍🪔


दिपावली अभिष्ट चिंतन


दिपावलीः शुभं कुर्यात

सर्वेशाम् वो दिवा निशम् ।

आनन्दो जीवनोत्साहः

वर्धताम  उत्तरोत्तरम् ॥

दीर्घमायुः सदारोग्यम्

कोष वृद्धिर्बलोन्नती |

सर्वेस्तु नित्यमानंदः

प्रसीद परमेश्वर ||

असो सर्व सुखी देवा

कोणा दुःख कधी नसो ।

मांगल्य सर्व पाहोत

स्वस्थ सारे सदा असो ॥


.... .


🍁🙏🏻🌷🍁🌷🙏🏻🍁

   🌼🌸श्रीराम समर्थ🌸🌼


अमृतधारा  ७९३


पदार्थाची खरी ओळख झाल्याशिवाय त्याची किंमत कळत नाही. आंब्यात जर गोडी नसेल तर तो आंबा नव्हे. तसे मनुष्यात मनुष्यत्व (माणुसकी) नसेल तर तो माणूस नव्हे.


जड पदार्थ देहादिक कशाने चालतात? आतील सूक्ष्म चैतन्य तत्वामुळे. म्हणून नुसते बाह्य जडाचे ज्ञान होऊन भागणार नाही. आतील सूक्ष्माचेही ज्ञान होणे जरूर आहे.


पदार्थ दिसला की त्याचा कर्ता कोणीतरी सूक्ष्म असला पाहिजे असे वाटते. कापड तयार करणारे यंत्र असते. पण यंत्र चालविणारा दुसराच असतो. काठी स्वतः आपण होऊन मारत नाही. तिला धरून मारणारा दुसराच असतो.


त्याप्रमाणे बाह्यतः असे वाटते, की देह कर्में करतो. तो जेवतो, खातो, पितो वगैरे कामें करतो. पण करणारा किंवा करविणारा वेगळाच आहे.


आपण प्रत्यक्ष पाहतो की मनुष्य मेला म्हणजे देह धरणीवर पडतो. त्यातून जीव निघून गेला असतो. यावरून देह जड आहे व कर्म कर्ता देह नव्हे, तो कोणीतरी वेगळा आहे हे स्पष्ट होते.


आशीर्वाद.

🌼🌸💧

  : 🚩श्रीराम समर्थ 🚩

🪔

सन्मान वंदना


एकच पणती लावु वेगळी

सैनिकांची ठेवु स्मृती |

सीमेवर ज्यां जगता लढता

प्राप्त जाहली वीरगती ||

बलिदानाची जाण अंतरी

करु प्रार्थना प्रभु चरणीं |

वीरांच्या त्या आत्मीयांना

प्रभो मिळू दे शांति मनी ||

घरो घरी लावुनी दीप हे

अभिवादन करु शुरांना |

शतशत प्रणाम अमुचे पायी

शहीद जाहल्या वीरांना ||

सुखा स्तव अमुच्या केलेल्या

बलिदानाला नित्य स्मरू |

उतराई ना होणे कधीही

कृतज्ञता ही मनी धरू ||

जाणिव आहे त्यागाची त्या

मोल तयाचे अम्हां खरे |

सदा अंतरी स्मृती जागवु

सुख शांतिच्या क्षणीं बरे ||

अता यापुढे सैनिक कोठे

सहज भेटले कधीकुणी |

मान वंदना देऊ तयांना

अंतरात या सदा ऋणी  ||


..... स्वानंन्द.


🙏🏼🍀🌸🪔🌸🍀🙏🏻

   🍀💧श्रीराम समर्थ💧🍀


अमृतधारा  ७९४


वेदांत  ज्ञान म्हणजे सूक्ष्म तत्व आत्मा, त्याचे ज्ञान. देहासंबधी जे ज्ञान ते व्यावहारीक ज्ञान. जसे आहे तसे ओळखणे हे तत्व ज्ञान.


देहास आपण माझा म्हणतो. अर्थात देह म्हणजे मी नव्हे. माझे घर म्हणजे मी घराहून वेगळा झालो. जडत्व म्हणजे काय? देहाचे ठिकाणी ममत्व हेच जडत्व होय.


पदार्थाचे यथार्थ ज्ञान ज्यास तो शहाणा. जगाचे खरे रूप कळणे ते खरे ज्ञान. जगाचे गूढ ज्यास कळते तो तत्वज्ञानी. व्यवहाराचे गूढ कळते तो माणूस.


सूक्ष्माचे ज्ञान होणे यात सुख आहे. जड देह टाकावा कसा? तो टाकता येत नाही. त्याला एक युक्ती आहे. देहाचा अभिमान सोडावा की तो टाकल्यासारखाच आहे.


आत्मा समुद्रासारखा आहे. त्याचा अगदी लहान थेंब, त्याप्रमाणे जीव आहे. त्याची ओळख होऊन आत्म्याशी समरस होणे हेच खरे तत्वज्ञान आहे. या आत्म्याचे नित्य स्मरण ठेवून आनंदात असावे.


आशीर्वाद.

💧🍀🌸

   🍀🌷श्रीराम समर्थ🌷🍀


अमृतधारा  ७९५


प्रत्येकाला ज्ञान आहे. पण त्याचा वारंवार विसर पडतो. त्याप्रमाणे आपण वागत नाही. हीच माया आहे. आपण ज्याच्या घरी राहतो त्याच्या इच्छेप्रमाणे रहावे व त्याचे ऐकावे लागते.


त्याचप्रमाणे हे विश्व, हे सुंदर देहरुपी घर ज्याने निर्माण केले त्याला जाणून त्याच्या आज्ञेप्रमाणे वागणे जरूर नाही काय? तसे आपण करीत नाही म्हणून दुःखी होतो.


दुःखी होण्यास दुसरे कारण असे आहे की, आपण आपल्या उपाधी, गरजा, जरुरीपेक्षा फार वाढवल्या. इतक्या वाढवल्या की त्यांचे अधिन झालो. त्या नसतील तर चैन पडत नाही.


संत व आम्ही यात फरक असा आहे की, संतांस गरजा अगदी कमी, जवळ जवळ नाहीतच. आम्हांस गरजा, उपाधी फार म्हणून, आम्ही दुःखी असतो आणि संत सुखी असतात.


जगात सुधारणा फार होत आहेत. शास्त्रीय शोध पुष्कळ लागत आहेत. त्यामुळे आम्ही अधिकच दुःखात व भीतीत पडलो आहोत. ही सुधारणा म्हणावी की काय म्हणावे?


प्रत्येकाने विचार करावा की, या उपाधी वाढविल्याने, सुधारणा केल्याने खरोखरच मी सुधारलो काय? माझ्या सुखात भर पडली काय?


आशीर्वाद.

🌼💧🌷

   🌷🍀श्रीराम समर्थ🍀🌷


अमृतधारा  ७९६


जे आपणास सुखद आहे असे वाटते ते खरोखरीच पाहता दुःखाचा पाया आहे. पैसा खूप मिळवला की पक्के समजावे आपण भांडणरुपी (मतभेदाचे) दुःख घेतले आहे. म्हणून बाह्य पदार्थ धन, सुत, दारादिक या उपाधी सर्व दुःखाचे माहेरघर आहेत असे दिसून येते.


यांच्याशी आम्ही आजपर्यंत प्रेम, सख्यत्व करीत आलो, त्यामुळे दुःखी झालो. धन, सुत, दारा घर वगैरे सर्व प्रपंचच नव्हे, तर हे जग ज्याने निर्माण केले तो कोण याचा विचार करून त्या भगवंताशी प्रेम, सख्यत्व केले तर मनुष्य सुखी होईल.


परमात्मा विद्येच्या किंवा बळाच्या जोरावर जाणता येणार नाही. ईश्वराशी सख्यत्व करावे, आपण ईश्वराचे व्हावे.. पण हे घडावे कसे?


हे कळण्यास प्रपंचाचा थोड्या काळाचा अनुभव पुरे होईल. एक वर्षभराचा अनुभव जागे करण्यास पुरे आहे. प्रत्येकाने मनास विचारावे की, प्रपंचाच्या नादी लागून सुख मिळाले का? नाही ना मग परमार्थाचा तरी अनुभव घेऊन पाहुया.


आशीर्वाद.

🌷💧🍀

   🌸☘श्रीराम समर्थ☘🌸


अमृतधारा  ७९७


ईश्वर प्रेम कसे निर्माण होईल? प्रपंचात जी गोष्ट लागू तीच परमार्थात लागू पडते. एखाद्या व्यक्तीचे सख्यत्व मिळवायचे असेल तर आपण काय करतो?


१) प्रथम त्या व्यक्तीचे जे मित्र असतील त्यांचा सहवास करतो.

२) त्यांचे तोंडून त्या व्यक्तीचे गुणवर्णन ऐकतो, त्याच विचारात राहतो.

३) नंतर जी प्रत्यक्ष व्यक्ती आहे त्याची मनोभावे सेवा करतो व त्याच्या मनोगताप्रमाणे वागतो.


तसेच परमार्थातही ईश्वर प्रेम हे तीन गोष्टीने साधते.

१) सत्संगती

२) ईश्वर कथा श्रवण, सद् ग्रंथाचे वाचन व मनन.

३) ईश्वर सहवास जो नामस्मरणाने साधतो.


सहवासावाचून प्रेम उत्पन्न होत नाही. मुंबईत राहणाऱ्यांना मुंबईच आवडते. याचे कारण सहवास.


सहवासास चिकाटी लागते. प्रापंचिकास जशी चिकाटी असते तशी बैराग्याची देखील नसते. अशी चिकाटी परमार्थात पाहिजे.


आशीर्वाद.

🌼💧🌸

, ☘🌷श्रीराम समर्थ🌷☘


अमृतधारा  ७९८


लग्न करून घरी आलेल्या मुलीवर सहवासाने प्रेम जडते. याचे कारण तिला आपलेसे म्हटले. तसेच ईश्वरास आपला म्हणावे. म्हणजे त्याचे प्रेम आपणास लागेल.


ईश्वराला आपलेसे करावे. पूर्ण श्रद्धेने त्यास आळवावे. मग प्रसंगी वा संकटी हाक मारल्यास तोच धावून येईल व संकटातून सोडवील. अशी अनेक उदाहरणे घडली आहेत.


आम्ही खरोखर नडीची हाक मारत नाही. द्रौपदीने हाक मारली. गजेंद्राने हाक मारली. कळवळून मारलेली हाक ऐकून तो परमात्मा धावून आला अशी पुष्कळ उदाहरणें आहेत. परमात्म्याविषयी खरे प्रेम असल्यावाचून तळमळीने हाक मारली जात नाही.


सद्ग्रंथ कोणते? ज्या ग्रंथाच्या श्रवणाने भगवंताविषयी प्रेम उत्पन्न होते, ज्याच्या योगाने विरक्ती उत्पन्न होते, अनीतीचे वर्तन टाकून नीती मार्ग, धर्म मार्ग याचा अवलंब करावासा वाटतो ते सद्ग्रंथ.


उदा. ज्ञानेश्वरी, दासबोध, भागवत वगैरे. हे ग्रंथ सदोदित वाचून त्याचे मनन करणे हे फार जरुरीचे आहे. त्याने ईश्वर प्रेम उत्पन्न होते.


आशीर्वाद.

☘🌷💧

   🌷☘श्रीराम समर्थ☘🌷


अमृतधारा  ७९९


प्रपंच व परमार्थ वेगळा नाही. प्रपंच अनासक्तीने व आनंदाने करणे हाच परमार्थ. प्रपंच परमार्थरूप कसा होईल? ईश्वर स्मरण स्मरणपूर्वक केल्यास तो परमार्थरूप होईल.


सदाचरण व नामस्मरण या दोन गोष्टी परमार्थाचा पाया आहेत. प्रपंचातील नड भगवंतावाचून पुरी होतच नाही.


पैठणचा रांजण ज्याप्रमाणे श्रीखंड्याची (भगवंताची) घागर पडल्यावाचून पुरा भरत नाही त्याप्रमाणे, प्रपंचातील पूर्तता भगवंताच्या स्मरणाशिवाय पूर्ण होत नाही.


कर्मातील न्यून भगवत्स्मरणाने पूर्ण होते. आपल्या शरीरात जसे हृदय मुख्य व बाकीचे अवयव गौण, तसे परमार्थातील मुख्य साधन नामस्मरण हे आहे. बाकी साधने गौण आहेत.


बुद्धी, विद्या व पैसा प्रारब्धानुसार मिळतात परंतु भगवद्भक्ती ही त्याची देणगी आहे. परमात्म्यास कळकळीची हाक मारल्यावाचून तो भक्तीची देणगी देत नाही. तळमळीत भगवद्प्रेमाचा उगम आहे.


भगवंताचे सख्य ज्यास मिळाले, त्यास जीवनाचे सारसर्वस्व मिळाले. असा दिवस उगवावा की ज्या दिवशी वाटावे की सर्व कर्तव्य सरले. ही धन्यता भगवद्स्मरणानेच येते.


आशीर्वाद.

☘🌷💧

   🌸💧श्रीराम समर्थ💧🌸


अमृतधारा  ८००


हातच्या कंकणास आरसा लागत नाही अशी म्हण आहे. पण ती आपण प्रापंचिक खोटी करतो. हाती कंकण असुनही त्याला दिसत नाही. म्हणून संसाराचे खरे स्वरूप समजण्यासाठी आरशाची नाही पण आरशीची (चष्मा) मात्र गरज असते.


संसाराचे स्वरूप काय आहे हे संसारच सांगत असतो. पण आपले तिकडे लक्ष नाही. संसारात कोणती वस्तू सुखदायक आहे? अशा वस्तुंची यादी केली तर त्या वस्तू कायम सुख देतील याची खात्री आहे काय?


प्रपंचात सर्व सुखी असा कोण आहे? प्रत्येकाचे काही ना काही गाऱ्हाणे आहेच. १२ वर्षे प्रपंचाचा अनुभव घेतला. त्यात काय आढळून आले !


"आज सुखी उद्या दुःखी" अशी पाटी प्रापंचिकाच्या घरी लागलेलीच असते. प्रत्येकास आशा वाटते की, मी उद्या आजच्यापेक्षा सुखी होईन. तो कधी सुखी होत नाही व त्याचे गार्‍हाणे कधी संपत नाही.


संत म्हणतात की, प्रपंच दुःखरूप आहे पण तो कोणी सोडत नाही. प्रपंच कितीही आंजरला गोंजरला तरी तो त्याचा स्वभाव सोडीत नाही. तो दुःखरूप असूनही आपल्याला सुखरूप वाटतो!!!


आशीर्वाद.

🌷☘🌼

   🌷☘श्रीराम समर्थ☘🌷


अमृतधारा  ८०१


प्रपंच दुःखरूप असून सुखरूप का वाटतो? प्रपंचात सुख थोडे व दुःखच फार, तरीही आम्ही त्याची आसक्ती धरतो.


समर्थ म्हणतात की, प्रपंचात सुख मानील तो मूर्ख. प्रपंच दुःखरूप आहे हे समजूनही जो त्याची आसक्ती धरतो तो महामूर्ख होय.


रोग ज्याला झाला असेल त्याला आपण रोगी आहोत हे कळले पाहिजे. रोगी असताना मी निरोगी आहे असे वाटणे हाच भ्रम. रोगी आहोत ज्यास कळले तोच रोगमुक्त होण्याची खटपट करील, तळमळ लागेल, तो डाॅक्टरास भेटेल व रोगमुक्त होण्यासाठी औषध घेईल.


तसे भवरोगाचे आहे. प्रपंचाची आसक्ती सुटण्यासाठी संतांनी नामस्मरण हे रामबाण औषध सांगितले आहे.


प्रपंचाचा अनुभव काय सांगतो याकडे आपण लक्ष देत नाही. पैसा सुख देतो काय? पैसा मिळविणे कठीण, मिळाला तरी तो कायम राहील काय? त्याची शाश्वती नाही.


पैसा जवळ असला, बँकेत ठेवला किंवा दुसर्‍याजवळ ठेवला तरी भीती. एकूण तो दुःखरूपच आहे ना? पैशाप्रमाणेच इतर सर्व वस्तुंची गोष्ट आहे.


आशीर्वाद.

🌷☘💧

   🌸☘श्रीराम समर्थ☘🌸


अमृतधारा  ८०२


प्रपंचातील सर्व वस्तु नाशवंत व दुःखरूप अशा आहेत, म्हणूनच प्रपंच असत्य आहे हा अनुभव प्रपंच देतो.


त्यावर विश्वास ठेवून जो आसक्त होत नाही तो सुखी. या अनुभवाची ज्यास विस्मृती होते व प्रपंचात पुन्हा आसक्त होतो तो दुःखी.


हे सर्व नाशवंत, जाणार असे समजून वागले पाहिजे. मुमुक्षुता किंवा तळमळ उत्पन्न होण्यास प्रपंच दुःखरूप आहे, हे पूर्ण जाणले पाहिजे.


पोपट नळी धरतो मग तो उलटा होतो. खाली डोके वर पाय झाल्यावर त्यास असे वाटते की तो पडला. म्हणून तो नळी आणखी घट्ट धरतो आणि त्यास वाटते त्याला कोणी तरी बांधले आहे.


त्याप्रमाणे प्रपंच सत्य आहे याच भावनेने जीव बांधला गेला आहे. आपणास जो प्रपंचाचा अनुभव येतो किंवा प्रपंच जो आपणास धडे शिकवितो, त्याच्याशी आपण प्रामाणिकपणे वागत नाही.


प्रपंच दुःखरूप व असत्य आहे असा अनुभव पदोपदी येत असता तेथे उदास किंवा अनासक्त होऊन आपण वागत नाही. प्रपंचातील कर्तव्ये भगवंताच्या स्मरणात करावी आणि अनासक्तपणे आनंदात राहावे.


आशीर्वाद.

🍁💧🌷

   🌷☘श्रीराम समर्थ☘🌷


अमृतधारा  ८०३


सूक्ष्म दर्शकाने पाण्यातील जीव जंतु दिसतात. तसे संत हे प्रपंचात काय आहे, तो कसा आहे हे पाहण्याची दृष्टी देतात. पण आम्ही पक्के निर्लज्ज आहोत. त्यांच्या म्हणण्याकडे मुळीच लक्ष देत नाही.


प्रपंचाची आसक्ती कशाने सुटेल? त्याला तीन उपाय आहेत. १) सत्संगती २) भगवन्नाम स्मरण ३) भगवत् कथा श्रवण.


विद्वान लोक विद्या शिकूनही कायम बद्धासारखे असतात. याचे कारण संतसंगती नाही. मुमुक्षुत्व अंगी बाणण्यासही संतसंगतीच कारण आहे. म्हणून ती धरणे जरूर आहे.


प्रपंच चावऱ्या कुत्र्यासारखा आहे. त्याला ओळखून दुरुनच वागले पाहिजे. चावरे कुत्रे केंव्हा चावेल याचा नेम नाही. तसा प्रपंचाचा केंव्हा तडाखा बसेल याचा नेम नाही.


उपासनेचा खरा अनुभव तो की ज्यावेळी प्रपंच असत्य वाटु लागतो. प्रपंचाचे खरे स्वरूप कळण्यासाठी सत्संगती व नामस्मरण यांची आवश्यकता आहे. नामस्मरण करणारा प्रपंच करील पण तो उदासीनपणे, अनासक्तपणे करील व आनंदात राहील.


आशीर्वाद.

🌼🌷💧

   💧🌷श्रीराम समर्थ🌷💧


अमृतधारा  ८०४


काही माणसे यात्रेला निघाली. त्यापैकी एक चोर होता व ते एका यात्रेकरुला माहीत होते. वाटेत नदी लागली. सर्व जण स्नानास उतरले. चोर म्हणाला मी कपडे सांभाळतो.


जो या चोरास ओळखत होता तो नदीत उतरला पण त्याने पाण्याच्या वर डोके ठेवून स्नान केले व चोरावर लक्ष ठेवले. तसे आपण प्रपंचावर करडी नजर ठेवून वागले पाहिजे.


प्रपंचात वागत असता प्रत्येकाने आपले दोष काय आहेत ते हुडकून काढावे व ते घालवण्याचा प्रयत्न करावा. माझे अवगुण मला डोंगरासारखे दिसले पाहिजेत.


प्रत्येक जण स्वतःच्या अवगुणांकडे दुर्लक्ष करून दुसऱ्याच्या अवगुणांकडे, दोषांकडे पाहतो. त्यास स्वतःच्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही पण दुसर्‍याच्या डोळ्यातील कुसळ मुसळापेक्षा मोठे दिसते. आपले अवगुण शोधावे व त्यांचा त्याग करून सद्गुण घ्यावेत.


आशीर्वाद.

🌷💧🌼

   🌼🌸श्रीराम समर्थ🌸🌼


अमृतधारा  ८०५


परमार्थ हा बोलण्याचा नसून तो अनुभवाचा विषय आहे. मी देहच आहे असे म्हणतो तो बद्ध. मी देह नसून देव आहे हे जो यथार्थ जाणतो तो मुक्त.


मी देह म्हणणे हा सर्वात मोठा अवगुण आहे. त्याचा त्याग केल्यावाचून मुमुक्षुत्व येणार नाही.


आपल्या अंतरंगात फार मळ, घाण आहे ती म्हणजे वासना. ती घालविण्यास यत्न झाला पाहिजे. आपले अवगुण घालविल्यावाचून झोप आली नाही पाहिजे.


जगाला सुधारण्याची खटपट करतो पण आपण सुधारत नाही. ज्या खोलीत आपण झोपतो तेथे साप असल्यास आपल्याला झोप येईल काय?


तसे अवगुणरूपी साप घरात असताना त्याला घालवून दिल्यावाचून खरी सुखरुपी झोप येईल काय?


आशीर्वाद.

🌷🌼💧

    +  

   🌷💧श्रीराम समर्थ💧🌷


अमृतधारा  ८०६


सद्ग्रंथ वाचन, श्रवण कशाला करावयाचे? तळमळ व मुमुक्षुत्व अंगी बाणण्यासाठी. परमात्म्याचा आनंद अखंड मिळावा, मी भगवंंताचा आहे ही दृष्टी ठेवून नामस्मरण करावे.


मन एकाग्र होत नसेल तर न होवो. पण नामस्मरण सोडू नये. पगार मिळण्यासाठी अगोदर नोकरी करावी लागते.


तसे अगोदर संतसेवा व सदाचरण असणे जरूर आहे. त्यावाचून समाधान मिळणार नाही


भगवंताचे नाम हे भगवद्कृपेसाठी घ्यावे. कामना पूर्तीसाठी नसावे. नामच आपले ध्येय गाठून देईल.


नाम सुरुंगाप्रमाणे आहे. विकाररुपी मोठाले खडक नाम फोडून टाकते. ते पापांचे पर्वत नाहीसे करते.


परमार्थाचा पाया म्हणजेच नामस्मरण. मोबदल्याची अपेक्षा न करता नामस्मरण करावे. त्यानेच जन्माचे कल्याण होईल.


नामस्मरण करता करता मनुष्य क्रमाक्रमाने प्रथम मुमुक्षु, मग साधक व पुढे सिद्ध होतो.


आशीर्वाद.

🌷🌼💧

   🌼🌷श्रीराम समर्थ🌷🌼


अमृतधारा  ८०७


आमचे हात घाणीने भरले आहेत. म्हणून देव म्हणतो की तू जरा बाहेर हात धुवून शुद्ध होऊन ये. शुद्ध होताच देव ताबडतोब आपला हात धरतो व आपणास उद्धरतो.


नवज्वर (टायफॉइड) फार वाईट असतो. नवव्या दिवशीपर्यंत ताप उतरला नाही तर मनुष्य जातो की राहतो अशी त्याची स्थिती होते.


सर्व लोक त्यावेळी घाबरतात. त्याच्याविषयी जशी तळमळ वाटते त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त तळमळ प्रपंच सोडण्याविषयी झाली पाहिजे.


नवव्या दिवशी माणसाला घाम सुटला तरच ताप उतरतो. त्याप्रमाणे प्रपंचाबाबत घाम सुटला पाहिजे, प्रपंचाचा वीट आला पाहिजे. मग मुमुक्षुता येईल. म्हणून सर्वाचे मूळ जे नामस्मरण ते नेमाने केले पाहिजे व त्यात आपण रंगले पाहिजे.


आशीर्वाद.

🌼💧🌷

   🌷🌼श्रीराम समर्थ🌼🌷


अमृतधारा  ८०८


आपण कोण, आपले कर्तव्य काय हे जसे व्यवहारात कळणे जरूर असते त्याप्रमाणे परमार्थात मी कोण हे कळले पाहिजे. ज्याला मी माझा म्हणतो तो मी नव्हे हे खास.


माझा देह म्हटल्यावर मी त्याहून निराळा नव्हे काय? असे असता देहास ताप आला असता मला ताप आला असे मानतो ही चूक आहे.


देह रोडावला तर मी रोडावलो म्हणतो हाच भ्रम आहे. मी कोण आहे हे ओळखण्यासाठी मी, मी नाही कोण हे ओळखले पाहिजे. मी नाही कोण हे कळले तर उरले ते मी असे सिद्ध झाले.


देहाला तीन अवस्था आहेत. जागृती, स्वप्न व सुषुप्ती. मी स्वप्न पाहिले म्हणजे त्याहून तो निराळा झाला. मी गाढ झोपलो होतो हे ज्याने जाणले तो सुषुप्तीहून निराळाच असला पाहिजे.


आशीर्वाद.

🌸💧🌼

   💧🌼श्रीराम समर्थ🌼💧


अमृतधारा  ८०९


सुख पाहिजे म्हणतो, दुःख नको म्हणतो. यावरून जीवाचे स्वरूप नित्य सुखरूप असले पाहिजे. याचा अनुभव कसा घ्यावा?


आत्मा देहावेगळा असून तो देहासी तादात्म्य (एकरूप) का पावला, याचा विचार करुया. वास्तविक आत्मा देहाहून वेगळा असता भ्रमाने देहच मी अशी भावना केली म्हणून सुख दुःखे अनुभवू लागलो.


आत्मा हृदयात आहे याची प्रचिती म्हणजे, मनुष्य मी म्हणत असता आपल्या छातीवर हात ठेवतो. त्यावरून आत्मा हृदयात आहे ही जाणीव न कळत का होईना, पण प्रत्येक माणसास आहे.


नदीतले पाणी व भांड्यातले पाणी एकच. परंतु भांड्यातील पाण्याची चव अथवा स्वाद निराळा येत असेल तर भांड्यात काहीतरी दोष असला पाहिजे.


तसे आत्मस्वरूप समुद्राप्रमाणे आहे. जीव त्याचाच अंश आहे. पण तो दुःखरूप झाला याचे कारण त्याने देहाची संगती धरली.


आशीर्वाद.

🌷💧🌼

   ??🌷श्रीराम समर्थ🌷💧


अमृतधारा  ८१०


मुंबईत एका गृहस्थाची बायको बाळंत झाली. त्याच्या मित्राने डाॅक्टर, हाॅस्पिटल वगैरे बाबतीत पुष्कळ सहाय्य केले. पण त्याने सोयरसुतक मुळीच पाळले नाही. त्या मित्राप्रमाणे देहाबाबत आपण वागले पाहिजे.


एखाद्या वाढणाऱ्या वृक्षाला पाडायचे असल्यास व ते वाढू नये असे वाटत असल्यास त्याची वरवर पालवी खुडून काय उपयोग?  मुळाला खत पाणी घालणे बंद केले पाहिजे म्हणजे आपोआप तो वृक्ष वाळेल व पडेल.


त्याप्रमाणे संसाररुपी वृक्षाला अभिमानाचे पाणी आम्ही वरचेवर घालतो म्हणून तो इतका फोफावला. हा मूळ अभिमानच नष्ट केला पाहिजे.


खरा कर्ता ईश्वर असता जीव विनाकारणच मी कर्ता असे मानतो. झाडाचे पान रामाच्या इच्छेवाचून हालत नाही. देहाचा योगक्षेमही तोच चालवितो.


मी कर्ता नसून राम कर्ता ही भावना वाढविणे हीच खरी उपासना.


आशीर्वाद.

💧🌼🌷

,   🌷💧श्रीराम समर्थ💧🌷


अमृतधारा  ८११


प्रकृती कर्म करते. मी तिचा साक्षी असता मी कर्म केले असा भ्रम होतो. मी कर्ता नाही ही वस्तुस्थिती आहे. असे असता जीव विनाकारण स्वतःकडे कर्तृत्व घेतो व म्हणून तो सुखदुःख भोगतो.


कोणत्या वस्तुवर जीवाची सत्ता आहे?  देह, गृह, दारा, सुत वगैरे कोणावरही जीवाची सत्ता नाही. मग वृथा अहंकार का घेतो? सत्ता ज्याची चालेल त्याने अहंकार घ्यावा. श्रीमंत तो की ज्यास सत्तेने बँकेतून पैसे काढता येतात.


माझ्या कर्माचे फळ जर मला सत्तेने  मिळविता येत नाही तर मी कर्माचा कर्ता कसा? हे कळण्यास वेदांत वा शास्त्राचीही जरूर नाही. हाच नित्य प्रत्येकाचा अनुभव आहे.


विचार करा की, एकदा मनुष्य जन्माला येतो एके ठिकाणी, विद्या शिकतो दुसरे ठिकाणी. नोकरी करतो तिसऱ्या ठिकाणी, मरतो चौथ्या ठिकाणी.


त्याच्या ध्यानी मनी नसताही काही काही गोष्टी घडून येतात. यावरून कर्माचा कर्ता मी नाही हे पक्के ध्यानात ठेवावे.


आशीर्वाद.

💧🌼🌷

   🌷☘श्रीराम समर्थ☘🌷


अमृतधारा ८१२


परमात्म स्वरूप त्यालाच ओळखता येईल ज्याला राम कर्ता ही भावना दृढ करता आली. यंत्र आपण होऊन चालत नाही. चालविणारा धनी वेगळाच असतो.


तद्वत हे शरीर यंत्र जो चालवतो तो ईश्वर आहे. तो शरीरात असून अलिप्त आहे. तोच आत्मा मी आहे. तो आनंदस्वरूप आहे हा दृढ विश्वास ठेवून वागावे.


आनंद विषयात नाही, तो आत्म्यात आहे. विषयात आहे असे वाटणे हाच भ्रम आहे. मला आनंदरूप व्हावयाचे आहे हे ध्येय असले पाहिजे. ते मिळविण्यासाठी जे साधन तेच खरे साधन.


मामलेदार (कलेक्टर) हा अधिकारी आहे. व्यक्ती हा अधिकारी नव्हे. म्हणजे अधिकारी निर्गुण आहे. तो व्यक्ती रुपाने दिसतो म्हणून कळून येतो. तद्वत निर्गुण हे दिसत नाही, कळत नाही.


निर्गुण कळण्यासाठी ते सगुण रूप घेऊन येते. अवतार रुपाने, संतरुपाने सगुण रूप घेते. त्यास भेटले, त्याची सेवा केली की निर्गुणाची सेवा केल्यासारखेच आहे. म्हणून सगुणोपासनेनेच निर्गुणाची प्राप्ती होते असे संत म्हणतात.


आशीर्वाद.

🌷☘💧

, 🌷☘श्रीराम समर्थ☘🌷


अमृतधारा  ८१३


जीव जशी भावना करील तसा तो होतो. देहाची भावना केली तर तो देहच होतो. मी आत्मा आनंदरूप आहे अशी भावना केल्यास तो तसा होईल.


म्हणून नेहमी मी देहाचा न म्हणता मी देवाचा असे म्हणावे. माझे ध्येय रामच असावे, म्हणजे मी रामरूप होईन. मग सुखदुःख बाधणार नाही.


एक देहरूप गाव आहे. दुसरे रामरूप गाव आहे असे समजा. जसे जसे आपण देहाभिमान सोडू म्हणजे जसे जसे देहगाव सोडू तसे तसे रामरूप गावाजवळ जाऊ. रामरूप गावाला पोहोचल्यावर रस्ता, गाव, देह वगैरे भिन्नता उरणारच नाही.


रामगावी पोहचण्यासाठी रामनाम हीच उत्तम शिदोरी होय. नाम घेत असता ते अतीप्रेमाने घ्यावे. नामात तल्लीन झाल्यावर देहाची सुखदुःखे बाधणार नाहीत. संत देहास सावलीप्रमाणे पाहतात. म्हणून त्यास दुःख नसते.


आशीर्वाद.

☘🌷💧

   💧🌼श्रीराम समर्थ🌼💧


अमृतधारा  ८१४


मी रामाचा आहे, ही उपासना करावी. उपासना करणे म्हणजे रामाच्या निकट जाणे किंवा बसणे. मी रामाचा ही भावना दृढ झाल्यावर ती रामाच्या इतकी निकट नेते की दुजेपणा उरूच देत नाही.


मग आनंदास पारावार राहणार नाही. दुःख उरणारच नाही. सुखच उरले हेही म्हणावयास जागा राहणार नाही. अशी स्थिती होण्यास रामाचा ध्यास ठेवणे जरूर आहे. राम भक्तांचीच संगती असणे जरूर आहे.


मुंबईला जाण्यासाठी मुंबईच्या गाडीत बसल्यावर, मधेच उडी मारु नये. तसे सत्संगती व नामस्मरण कधीही सोडू नये. म्हणजे आपोआप त्या रामगावी पोहचू.


कळते सर्वांस पण वळत नाही कोणासच. शुध्द आचरण हेच नामस्मरणाचा पाया आहे. वेदाज्ञा पाळली पाहिजे. जो वेदास मानत नाही तो रामास प्रिय कसा होईल?


रामही वेदशास्त्र, नीती, धर्म यांची आज्ञा पाळीत होते. मग आपणही वेदशास्त्र, नीती, धर्म यांची आज्ञा पाळणे जरूर नाही काय?


आशीर्वाद.

🌼💧🌷

   💧🌷श्रीराम समर्थ🌷💧


अमृतधारा  ८१५


वेदाज्ञा पाळणे हा परमार्थाचा पाया आहे, नव्हे तो सर्वांचा पाया आहे. व्यक्ती, समाज व राज्य या सर्वांचा पाया वेदाज्ञा आहे. त्याला अनुसरून ज्याचे  वर्तन नाही त्याची परमार्थिक प्रगती कशी होईल?


प्रपंचात सार्थक करून घ्यावयाचे असेल तर सदाचरणयुक्त नामस्मरण करणे जरूर आहे. संसाराचे, प्रपंचाचे रूप कसे आहे हे जाणावे.


कडु कारले तुपात व साखरेत घोळले तर त्याचा कडुपणा जाईल काय? नाही. तद्वत प्रपंच कितीही थाटाचा केला तरी तो नश्वर म्हणून दुःखरूप आहे.


म्हणून अगदी साधे असावे, शुद्ध आचरण ठेवावे व रामाचे व्हावे. प्रारब्धाने जे येईल ते रामाची इच्छा म्हणून भोगावे. रामाच्या इच्छेने जावे.


प्रत्येक जण म्हणू लागला की रामाने माझ्या इच्छेप्रमाणे वागावे तर मग व्यवहारच चालणार नाही.


आशीर्वाद.

🌷🌼☘

   🌷💧श्रीराम समर्थ💧🌷


अमृतधारा  ८१६


शरीराची ममता वाढवूच नये, संकट काळीच नव्हे तर सुखाच्या काळात सुद्धा सर्व काळी राम नाम स्मरण करावे. " रामा, तुझी स्मृती सर्वदा दे." हेच रामाजवळ मागावे.


आपण देहावर किती आसक्ती ठेवतो! डोळे, कान, दात आपणास वय झाल्यावर कंटाळतात व सोडून जातात, पण आपण त्यास सोडू इच्छित नाही.


ते जाणारच आहे असे समजून आपण त्यावरील ममत्व सोडले पाहिजे व नामस्मरणात काळ घालवला पाहिजे.


कोणत्याही गोष्टीत आग्रह नसावा व कर्मफळाकडे दृष्टी नसावी. कर्में कर्तव्य म्हणून करावीत व राम नामाला अखंड स्मरावे. म्हणजे समाधान होईल.


परमार्थ हे ध्येय ठेवून सुलभ साधन नामस्मरण अखंड करावे. प्रपंचात आपण किती कष्ट करतो! तितका मोबदलाही मिळत नाही तरी कष्ट करतो. परमार्थात तसे नाही. परमार्थ जितका करावा तितके समाधान अधिकाधिक असते.


आशीर्वाद.

💧🌼🌷

,   💧🌼श्रीराम समर्थ🌼💧


अमृतधारा  ८१७


संतांचे ग्रंथ मानवाकरिताच आहेत. संत अथवा त्यांचे ग्रंथ प्रपंच टाका असे सांगत नाहीत. आपणास साधायचे काय, हे ध्यानात धरले पाहिजे.


आपणास परमात्मा साधायचा आहे. त्यासाठी शरीर व प्रपंच साधन आहे. हे पक्के समजावे. आपण साधनाला साध्य व साध्याला साधन मानतो म्हणून चुकते.


एक गृहस्थ मुलाबाळांसह मुंबईस जाण्यासाठी गाडीत बसला. मुलांना गाडीत बसायला मिळणार म्हणून आनंद झाला. पण तो गृहस्थ मुंबईस जाण्यासाठी गाडीत बसला.


गाडीतून उतरताना मुलांना वाईट वाटले पण त्या गृहस्थास वाईट वाटले नाही. प्रपंचाचा अनुभव आल्यानंतर आपण स्वतःची तरी फसवणूक करून घेऊ नये.


रामास वशिष्ठाने सांगितले की, "रामा, तू प्रपंचात वागशील तर आत निःसंगपणे राहून वाग."


आशीर्वाद.

🌷💧🌼

   💧🌷श्रीराम समर्थ🌷💧


अमृतधारा  ८१८


प्रपंच कोणालाच टाकता येत नाही. मी कर्ता असे मानून वागणारा तो प्रापंचिक. राम कर्ता असे मानून वागणारा पारमार्थिक.


नाटकात स्त्रीचे रूप घेणारा मनुष्य, मी पुरुष आहे ही भावना न सोडता स्त्रीचे सोंग उत्तम आणतो. तसे मी देह नसून आनंदरूप आत्मा आहे, निःसंग आहे ही दृढ भावना ठेवून प्रपंच करावा.


डाॅक्टरास वाटते की रोग्यास मी बरा करतो. ते जर खरे असते तर रोगी मरतो का? रोग्यास बरे वाटले नाही की डाॅक्टर म्हणतात आता तुझ्या नशीबावर आहे.


मी कर्ता असे म्हणूनही जर प्रपंच दुःखरूप होतो, सुखरूप होत नाही तर त्याचा कर्ता मी नाही हे सिद्धच झाले. प्रपंच अर्धवटच आहे. पूर्ण फक्त राम आहे.


मिठाचे पोते कितीही धुतले तरी त्याचा खारटपणा जात नाही, तसे प्रपंचाचे आहे. आयुष्यभर प्रपंचच केला तर मृत्यु समयी प्रपंचच आठवेल. म्हणून प्रपंचाचा हव्यास धरू नये. प्रपंचातील कर्तव्य करताना भगवंताचे स्मरण ठेवावे.


आशीर्वाद.

💧🌼🌷

,   ☘🌷श्रीराम समर्थ🌷☘


अमृतधारा  ८१९


एका माणसाने वाईट मार्गाने काही लोकांना लुबाडुन, फसवून पैसे मिळविले. ती माणसे त्याला डोळे मिटल्यावर दिसू लागली. त्यामुळे त्याला झोप येईना व काय करावे ते सुचेना.


तो एका साधुकडे गेला. त्यावर उपाय विचारला. तेव्हा साधुने त्यास सांगितलें  "तू त्यांचा सर्व पैसा व त्यावरील कमाई त्यांना परत कर". त्याने तसे केल्यावर त्यास झोप आली व समाधान लाभले.


तद्वत, प्रपंच ज्या ईश्वराचा आहे त्यास देऊन टाकून आपण मोकळे व्हावे व भगवंताच्या स्मरणात आपले कर्तव्य करावे. हे सर्व विश्व व अखिल प्रपंच ईश्वराचा आहे.


सर्व ईश्वराचे आहे, माझे काही नाही असे समजणे म्हणजे ईश्वरार्पण करणे आहे. आपण भगवंताचे झाल्यास सुखी होऊ नाहीतर दुःखी होतो.


आशीर्वाद.

💧🌷☘

   ☘🌹श्रीराम समर्थ🌹☘


अमृतधारा  ८२०


धान्यात दगड, माती, पाखड (फोलपट) मिसळलेले असतात. म्हणून दगड, माती, पाखड बाजुला काढून झाल्यावर जे केवळ धान्य असते ते आपण घेतो.


त्याचप्रमाणे अहंकाराचे खडे, ममत्वाची माती व विकारांचे पाखड आत्मस्वरूप परमार्थात मिसळले गेल्याने प्रपंच दुःखरूप होतो. प्रपंचातून वरील गोष्टी निवडून बाजुला काढल्यास उरेल ते सुखच राहील.


जीवाच्या हातात काय आहे, काही नाही. मग राम कर्ता ही भावना का असू नये? पैसा घालविणे जसे हाती नाही तसे तो मिळविणेही आपल्या हाती नाही. हे खरे अनुभवास येत असून "मी कर्ता" म्हणतो.


भगवंताने प्रपंच लावला, त्यानेच तो चालविला व वाढविला. विद्या, नोकरी, धंदा वगैरे काहीच आपल्या हातात नव्हते. ते मिळाले म्हणजे म्हणतो मी मिळविले व ते गेले म्हणजे म्हणतो प्रारब्ध.


मिळणे व जाणे दोन्ही प्रारब्धाधीनच आहेत, मग हर्ष शोक वृथा का करावा? जगणे व मरणे जर आपल्या हातात नाही, तर रामच कर्ता हे सिद्ध होत नाही काय?


आशीर्वाद.

☘🌷💧

   💦🌷श्रीराम समर्थ🌷💦


अमृतधारा  ८२१


"हे सर्व ईश्वराचे आहे".

वेदांताची घोषणा हीच नाही काय? हेच सार वेद श्रुती सांगतात. संत "हे सर्व रामाचे असून तोच सर्वांचा कर्ता आहे"  असे सांगतात. दोघांचे सांगणे एकच. अशी भावना ठेवल्यावर दुःख भोगावेच लागणार नाही.


आपण वस्तुवर लोभ करतो. हा लोभच पापाचे व दुःखाचे मूळ आहे. त्यामुळे भगवंताचे विस्मरण होते. आपले प्रपंचावर प्रेम असते. प्रपंच आम्हाला आवडता झाला आहे. देव असला नसला तरी चालेल, पण प्रपंच पाहिजे असे आपले  वर्तन, धोरण व मत असते.


संतांचे याचे उलट वर्तन असते. त्यांचे देवावर प्रेम असते. देवच त्यांना आवडतो. प्रपंच असला नसला तरी चालेल पण देव पाहिजे, अशी त्यांची समज असते म्हणून ते नित्य सुखी असतात व आम्ही दुःखी असतो.


रामाचे, नामाचे स्मरण होण्यास आपण मनरुपी उपरण्यास गाठ मारली पाहिजे. पण ही गाठ कसली याचेही आपणास विस्मरण होते, इतके आपण पक्के विसराळू आहोत.


आशीर्वाद.

💦☘🌷

   🌷💦श्रीराम समर्थ💦🌷


अमृतधारा  ८२२


मूर्तीकार जसा यात्रेची वेळ आली की मातीच्या मूर्ती राजा, राणी, घोडा, उंट वगैरे तयार करतो. ती विकतो व उरलेली पुन्हा मातीत टाकतो. वेळ आली की पुन्हा त्या मातीच्या मूर्ती तयार करतो...


त्याप्रमाणे, जगातील सर्व प्राणी वस्तु वगैरे ईश्वर निर्माण करतो, वेळ आली की त्यांचा संहार करतो. तो मायारुपी चिखलापासून सर्व निर्माण करतो व पुन्हा नाहीसे करतो. हा ईश्वराचा खेळ आहे.


आपण सर्व रामाच्या हातची बाहुले आहोत. आपणां सर्वांस हालवणारा, नाचवणारा राम आहे. म्हणून त्याचे आपण सतत स्मरण करावे.


"काय करावे, ईश्वर ध्यान करण्यास, नाम स्मरण्यास वेळ नाही",  अशी सबब लोक सांगतात. एक गृहस्थ कामात इतका व्यस्त असायचा की त्याला जेवण्यास देखील फुरसत मिळत नसे.


म्हणून त्याच्या आईने एक युक्ती केली. त्याच्या खिशात काजु, बदाम, खडीसाखर वगैरे ठेवले व सांगितले "येता जाता, काम करता करता एक एक तोंडात टाकीत जा बरे बाळ".


तद्वत संतांनी आम्हाला रामनाम रुपी खाऊ तोंडात घेण्यासाठी जवळ दिला आहे.


आशीर्वाद.

💦☘🌷

, 💦🌷श्रीराम समर्थ🌷💦


अमृतधारा  ८२३


संतांनी दिलेला रामनामरुपी खाऊ येता जाता काम करता तोंडात घेतला म्हणजे लोभाची भूक लागणारच नाही व सुख लाभेल.


आपण उगाच सबबी सांगत असतो. काम असेल तेव्हा कामाची सबब, पण काम नसेल त्यावेळी नामस्मरण न करता उगाचच गप्पा, नाहीतर निंदा स्तुती किंवा इतर खेळ खेळण्यात वेळ घालवितो. तसे करु नये.


आषाढी वा कार्तिकी या मोठ्या एकादशीला सुटी आली असता आपण नामस्मरण करण्याचे सोडून मोरी (बाथरुम) साफ करणे, माळयावरील अडगळ काढणे वगैरे इतर वेळी करता येणाऱ्या हलक्या (फालतू) कामात वेळ घालवितो व त्यामुळे कष्टी होतो.


वेळ असतो त्यावेळी इतरांची निंदा, स्तुती रुपी घाण उपसत बसतो. तसे करु नये. नामस्मरणास सबबी नसाव्यात. नामस्मरण हे साधन अत्यंत सोपे सुटसुटीत निरुपाधिक आहे. त्याला काहीच आड येत नाही. आड येते म्हणणारा दुर्दैवी.


संत फार दयाळू आहेत. तुमच्या सर्व सबबी ऐकून घेतात. त्यातूनही एखादी तोड काढतात व नामस्मरण करण्यास युक्तीने सांगतात.


आशीर्वाद.

💧☘🌹

   ☘🌷श्रीराम समर्थ🌷☘


अमृतधारा  ८२४


"प्रपंच आम्हास सुटणे शक्य नाही. तो सर्व करून जर काही साधण्यासारखे साधन असेल तर सांगा" असे आम्ही संतास म्हणतो.


त्याप्रमाणे संत सांगतात

"प्रपंच खुशाल करा पण तो करीत असता रामास विसरु नका, भगवंताच्या स्मरणात प्रपंच करा म्हणजे भवाची बाधा होणार नाही"..


प्रपंचाचा अनुभव इतके वर्षे घेतला, आता नाम स्मरणाचा अनुभव का घेऊ नये? तो घेतल्यास महालाभ म्हणजे जगदीशच जोडला जाईल.


पैशाचा लाभ हा खरा लाभ नव्हे. खरा लाभ म्हणजे भगवंत जोडणे. म्हणून रामाला कळकळीने हाक मारून प्रार्थना करू "रामा, तुझ्या नामाचे प्रेम दे, त्यात मला रंगू दे" ते जर त्याने दिले तर किती सुख होईल !


नामाचे प्रेम यावे म्हणून सद् ग्रंथ वाचन व श्रवण करावे आणि आनंदाने नामस्मरणात काळ घालवावा.


आशीर्वाद.

☘🌷💦

   💦🌷श्रीराम समर्थ🌷💦


अमृतधारा  ८२५


नामाचे प्रेम येण्यासाठी भगवंताचे चरित्र ऐकावे, ते प्रेमाने ऐकावे. एखादे नित्याचे काम करतो तसे नसावे. ऐकले व समजले ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा.


ग्रंथ वाचीत असता, ध्येय जर परमात्मप्राप्ती हे असेल तर त्या ग्रंथात साधन कोणते सांगितले इकडे लक्ष असावे. साधनाची योग्य निवड झाली की साध्य साधेलच.


ज्या विषयात पारंगत व्हावयाचे तीच पुस्तके वाचणे जरूर असते. आमचे उलट होते. गणित विषय घेतो व वाचतो कादंबर्‍या, मग गणितात पास कसे होणार?


परमार्थ हे ध्येय असेल तर संतांच्या ग्रंथांचाच अभ्यास करावा. त्याचेच श्रवण, मनन करून त्याप्रमाणे आचरण ठेवण्याचा प्रयत्न करावा.


परमात्मा हा बुद्धीच्या पलीकडे आहे. तो बुद्धीने, विद्येने आकळला जाणार नाही. भगवंतास प्रसन्न करून घेण्यास अनन्य शरणागती हाच एकमेव उपाय आहे. कोणताही अहंकार आपल्याकडे न ठेवता भगवंताचे होणे हीच शरणागती होय.


आशीर्वाद.

☘💦🌸

   💦🔥श्रीराम समर्थ🔥💦


अमृतधारा  ८२६


माझ्या हातात जर कर्माचे फळ आणण्याची शक्ती असती तर मी स्वतःला कर्ता खुशाल म्हणावे. परंतु तशी शक्ती नाही म्हणून मी कर्ता नाही हे सिद्धच झाले.


पुढच्यास ठेच मागचा शहाणा यावरून काही लोक दुसऱ्याच्या अनुभवाने शहाणे होतात, काही स्वतःस ठेच लागूनही शहाणे होत नाहीत.


प्रपंच हा बहिर्मुखी आहे. परमार्थ हा अंतर्मुखी आहे. म्हणून परमार्थ सुख देतो व प्रपंच दुःख देतो.


दुसऱ्याकडून व्याजाने पैसे आणून त्यावर सावकारी करणारा गृहस्थ खरा सावकार नाही. त्याप्रमाणे आम्ही प्रापंचिक आहोत. आमचे सुख परावलंबी, सर्वच परतंत्र असून,  स्वतंत्रतेच्या गप्पा मारतो व वृथा अभिमान मात्र आम्ही घेतो.


परमात्म्याचे नामस्मरण परमात्म्यासाठीच घ्यावे, त्यात इतर काही हेतू नसावा. संतांचे सांगणे थोडे असते पण त्यात अर्थ फार असतो. त्यांचे मौन हेच निरुपण असते.


आशीर्वाद.

🔥☘💧

   🔥💧श्रीराम समर्थ💧🔥


अमृतधारा  ८२७


संताचे प्रेम आईच्या प्रेमापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे. आई एका जन्मात आपल्या लेकराचे कल्याण व्हावे यासाठी झटत असतै तर संत, गुरू जीवाचा उद्धार कसा होईल या तळमळीने जन्मोजन्मी झटत असतात.


संतांचे ग्रंथ वाचत असता आपली मते बाजुला ठेवावीत. एका अक्षरावर दुसरे अक्षर लिहिले तर पहिले दिसत नाही. म्हणून शुद्ध मनाने ग्रंथ वाचावा.


आपल्यामधे दोष असल्याशिवाय दुसऱ्याचे दोष दिसत नाही. दुर्जनाला दुर्जनच दिसतात. लोकांचे दोष पाहिल्याने आपल्या दोषावर अधिक पुटे चढतात व त्यानेच आत्मघात होतो.


ज्याचे आपण चिंतन करावे त्याच्याशी  तद्रूप आपण होत असतो. दोषाचे चिंतन केले तर दोषीच होतो. देवाचे चिंतन केल्यास देवच होतो. आरशात जसे आपलेच रूप दिसते, तद्वत आपलेच दोष दुसऱ्यात दिसत असतात.


जी गोष्ट दुसऱ्याने करू नये असे मला वाटते ती स्वतः करू नये. उपासनेची प्रचिती म्हणजे आपले दोष ठळकपणे दिसु लागतात. ते प्रयत्नपूर्वक टाकले पाहिजेत. दोष गेले की गुणच राहतात.


आशीर्वाद.

💧☘??

   💧🌹श्रीराम समर्थ🌹💧


अमृतधारा  ८२८


मी कोण हे ओळखण्यास मी कोण नाही समजून ते टाकले पाहिजे म्हणजे जे उरेल ते मीच आहे. माझे घरात मी एकटाच राहिलो तर मला त्रास होत नाही.


पण अल्प लोभासाठी भाडेकरी ठेवतो व मग ते आपलाच हक्क गाजवू लागतात व अखेर मालक बनू पाहतात. तसे विकारास आम्ही जागा दिली व तेच आमचे मालक झाले. परमात्मप्राप्ती चित्त शुद्ध झाल्यावाचून नाही.


संतांनी चार गोष्टी सांगितल्या.

१) निर्गुणत्व कळण्यास कठीण म्हणून सगुणोपासना करावी. त्याने निर्गुण रहस्य कळेल व अभिन्नता प्राप्त होईल.

२) नम्रता  अभिमानाने परमात्मा दुरावतो. सर्वांशी जो नम्र तोच भगवंताला प्रिय होतो.

३) अन्नदान कलीयुगात यथाशक्ती अन्नदान करीत असावे. त्याचे महत्व फार आहे.

४) भगवन्नाम स्मरण  ते अखंड ठेवावे. संतांनी परमात्म प्राप्तीसाठी नाम ही अजब वस्तू आपल्याला दिली आहे.


आशीर्वाद.

🌷💧☘

   💧🌷श्रीराम समर्थ🌷💧


अमृतधारा  ८२९


एका गृहस्थाला एका गावी जावयाचे होते. त्यास त्या गावाचा रस्ता माहीत नव्हता. एका वाटसरुने त्याला रस्ता दाखविला.


समोर दूर डोंगरावर एक झाड दिसते ना ! त्या झाडावर दृष्टी ठेवून तुम्ही वाटचाल करा. तुम्हास तुमचे गाव मिळेल.


त्या गृहस्थाने झाडावर पक्की दृष्टी ठेवली. वाटेत नद्या, नाले, टेकड्या, झाडे लागलीत. पण त्याने मुख्य झाडावरची दृष्टी कायम ठेवली. त्यामुळे तो सर्व अडचणी पार करून त्या गावी बरोबर पोहचला.


त्याप्रमाणे संतांनी आम्हाला आपणास नामाची खुण दिली आहे. काहीही अडचणी आल्या, नाम सोडले नाही, तर परमात्मप्राप्ती निश्चित होईल. प्रेमाने नामस्मरण करावे आणि भगवंतास अनन्य भावे शरण जावे.


संतांनी नामस्मरणरुपी नाव आपणास दिली आहे. त्यात आपण विश्वासाने बसूया. संत, गुरू कर्णधार आहेत. ते आपणास खात्रीने भवसागर पार नेतील.


आशीर्वाद.

🌷☘💧

   ??💧श्रीराम समर्थ💧🌷


अमृतधारा  ८३०


राजदंडाच्या भीतीने नीतीयुक्त वागणे नसावे. ते कमी प्रतीचे असते. तसे कामना वा इच्छा पूर्तीसाठी राम भजन, नामस्मरण करणे कमी प्रतीचे आहे. रामाकरताच रामप्रेम  नामस्मरण असले पाहिजे.


नीती, सदाचार हा परमार्थाचा पाया आहे. रामाला आपलेसे करून घेण्यास रामाज्ञेने वागावे तरच राम प्रसन्न होईल. सर्व साधनात श्रेष्ठ साधन रामनाम स्मरण हे आहे. पण त्याचे महत्त्व आपणास कळत नाही.


नामस्मरणाचे महत्त्व कळण्यास खरोखर भगवंताची कृपाच पाहिजे. देहबुद्धी जोपर्यंत आहे, अभिमान जोपर्यंत आहे, तोपर्यंत नामाचे महत्त्व कळणार नाही.


परमात्मा जसा निरुपाधिक आहे. तसे नामही निरुपाधिकच  आहे. जीवाचा उद्धार व्हावा असे वाटत असेल तर नामस्मरण कधीही सोडू नये. समर्थ सुद्धा हेच सांगतात.


आशीर्वाद.

💧🌹☘

  : 

  +  : आजचे अमृतधारा आलेले आहे

चुकून टाकल्या गेले का

श्रीराम

🙏

  : श्रीराम 🙏 क्षमस्व 🙏🏻??

   ☘🌸श्रीराम समर्थ🌸☘


अमृतधारा  ८३१


खटाऱ्यातून (मोठ्या बैल गाडीतून) प्रवास करणे असल्यास पुष्कळ सामान नेता येते. पण विमानातून प्रवास करणे असल्यास सामान अगदी मर्यादित, कमीतकमी ठेवावे लागते.


अगदी आपल्या जरुरीपुरते तेवढेच सामान विमान प्रवासात घ्यावे लागते. पायीच जायचे असल्यास सहज उचलून नेता येईल एवढेच सुटसुटीत सामान ठेवावे लागते.


त्याचप्रमाणे परमात्मप्राप्तीसाठी जेवढे व जितके निरुपाधिक व कमी त्रासाचे साधन, तितके चांगले. ते म्हणजे नामस्मरण हेच होय.


आपण आपल्या गरजा फार वाढविल्या आहेत. त्या कमी कमी करत अगदी निरुपाधिक होण्याचा प्रयत्न करावा. निरुपाधिक तो सुखी. फार उपाधीचा (गरजा असलेला), तो दुःखी.


उपासना करीत असता लाजू नये, कंटाळू नये. माळ घेताना, भजन करताना लाजू नये. कायदाच केला की मनुष्य लाज सोडतो. तसे शास्त्रानेच कायदा केला आहे की हातात माळ घेऊन नाम जपावे. लाजू नये.


आशीर्वाद.

🌸☘💧

   ☘🌼श्रीराम समर्थ🌼☘


अमृतधारा  ८३२


आपणास उगाच निंदा करण्याची सवय असते. अमुक साधन चांगले, अमुक साधन वाईट असे म्हणूच नये.


शरीराचे सर्व अवयव महत्वाचे असतात. त्या त्या क्षेत्रात त्यांचे महत्व असते. त्याप्रमाणे सर्व साधने चांगलीच आहेत.


आम्ही कोणतेच साधन न करता उठाठेव मात्र करतो. गप्पा मारतो व निंदेस प्रवृत्त होतो.


एखादी स्त्री सवतीच्या मुलास जसे उगाचच नावे ठेवते, तसे आपण नामात काय आहे, माळेत काय आहे, भजनाने  काय होणार असे म्हणून उगीच नावे ठेवतो. तसे करू नये.


संत कळकळीने सांगतात त्याप्रमाणे रामनाम स्मरण करावे. ते रामाकरता करावे. दुसर्‍या कशाकरता करू नये. नामाचा अखंड ध्यास धरावा. नामस्मरण प्रेमाने करावे व आनंदात रहावे.


आशीर्वाद.

🌼🌸💧

   🌸☘श्रीराम समर्थ☘🌸


अमृतधारा  ८३३


कुणी मुलाकरता, कुणी पैशाकरता तर कुणी आणखी इतर कारणाकरता जगतात व झटतात. पण जे मिळाले असता, आणखी मिळावे असे वाटत नाही ते भगवंत प्राप्तीचे ध्येय ठेवावे.


ते साधण्यास नामावाचून दुसरे कोणतेही सुलभ साधन नाही. नामस्मरणाने भगवंताला प्रसन्न करून घ्यावे, मग खुशाल प्रपंच करावा.


जसे एखादा मनुष्य ज्या कामाकरता एखाद्या गावाला जातो व ते काम पूर्ण झाल्यावर तो इतर उद्योग करण्यास मोकळा असतो, तसे आपण ज्यासाठी जन्माला आलो ते म्हणजे "भगवंताची प्राप्ती". ती आधी करून घ्यावी व मग त्याच्या स्मरणात खुशाल संसारात वावरावे.


भगवत्प्राप्ती कशाने होईल हे संतांनी सांगितले आहे. त्यांच्या वचनांवर विश्वास ठेवावा व नित्य नेमाने अखंड नामस्मरण करावे.


आशीर्वाद.

🌼💧🌸

   🌼🌷श्रीराम समर्थ🌷🌼


अमृतधारा  ८३४


आजारी माणसाला बरे होण्यासाठी तीन गोष्टी कराव्या लागतात.

१) कुपथ्य टाळणे,

२) पथ्य सांभाळणे आणि

३) वेळेवर औषध घेणे.


भवरोग्यासही तीन गोष्टी जाणीवपूर्वक कराव्या लागतात. त्यालाही कुपथ्य टाळून पथ्य सांभाळून औषध घ्यावे लागते.

१) दुःसंगती, अनाचार, अधर्माचरण, मिथ्या भाषण, द्वेष, मत्सर वगैरेचा त्याग करणे,

२) सत्संगती, सद्विचार, सद्ग्रंथ वाचन, व सदाचार ह्या गोष्टी पाळणे, आचरण करणे आणि

३) सर्वात महत्त्वाचे अखंड नामस्मरण करणे हेच औषध सेवन होय.


जे आहे ते नकोसे वाटणे हे वैराग्य नाही. "मला हवे" असे म्हणणेही बाधकच आहे. मुख्य ध्येय म्हणजे भगवंताची प्राप्ती. त्याच्या आड जे येईल ते कुपथ्य. त्याचा त्याग करावा.


परमेश्वर प्राप्तीसाठी जे सहायक, पोषक ते पथ्य पाळावे. त्याचे ग्रहण करावे. ज्या परिस्थितीत आपण आहोत त्यात समाधान मानणे व त्यापेक्षा चांगल्या स्थितीची इच्छा न करणे हेच वैराग्य होय.


आशीर्वाद.

🌸☘🌼

   🌸💦श्रीराम समर्थ💦🌸


अमृतधारा  ८३५


वास्तविक पाहता जगातील प्रत्येक वस्तु सुखरूपही नाही व दुःखरूपही नाही. आपल्या आवडीनिवडी प्रमाणे ती सुखरूप वा दुःखरूप वाटत असते.


परमार्थाच्या आड कुठल्याही वस्तु येत नाहीत. उलट त्या उपकारकच असतात. परमार्थाच्या आड काय येते? पैसा, मुले, बायको वगैरे आड येत नाही, तर त्यांच्यावरील ममत्व, माझेपणा आड येतो.


वस्तुवर आसक्ती न ठेवणे हे वैराग्य. ती वस्तूच नसणे हे वैराग्य नव्हे. एखाद्याची बायको नसली म्हणजे तो विरक्त व असली तर आसक्त असे म्हणता येणार नाही. बायको असून लंपट नसेल तो विरक्त.


संतांची वचने फार ध्यानात ठेवण्यासारखी असतात. आहे ते परमात्म्यानेच दिले आहे व ते त्याचे आहे, असे मानून आनंदाने राहणे हे वैराग्य होय. या भावनेत राहून जो इंद्रियांच्या नादी लागत नाही तो वैरागी.


आशीर्वाद.

🌼🌸☘

   🌸☘श्रीराम समर्थ☘🌸


अमृतधारा  ८३६


सर्व इंद्रियात वाणी हे महत्वाचे इंद्रिय आहे. ते कर्माकडे उपयोगी पडते व ज्ञानाकडेही उपयोगी पडते. "ज्याने वाचा जिंकली त्याने अर्धा परमार्थ जिंकला" अशी आपल्यात म्हण आहे.


माराने झालेला वळ काही दिवसाने पुसून जातो, नाहीसा होतो पण बोललेला अधिक उणा शब्द मनात घर करून राहतो. तो पुसला जात नाही.


कोणी एक हात वर करून तप करतात तर कोणी एक तंगडी वर करून तप करतात. पण तप भगवंताच्या प्राप्तीकरता नसेल व भगवत् प्रेमाने होत नसेल तर ते तप व्यर्थ होय.


उत्तम तप होण्यास वाणीला वळण लावले पाहिजे. तिला वळण लावले की इतर इन्द्रियांस आपोआप वळण लागेल.


वाणीने नाम घ्यावे व मनाने स्मरण करावे. या दोघांचा मेळ असावा. मग आनंद उपभोगास मिळेल.


आशीर्वाद.

☘🌼🌸

   🌼🌸श्रीराम समर्थ🌸🌼


अमृतधारा  ८३७


एकदा नामस्मरणाचा चाळा वाणी व मनाला दिला की प्रपंचाची आसक्ती सुटेलच. वासना आपोआप कमी होईल व वृत्ती स्थिरावेल.


वृत्ती स्थिरावली की सुखदुःखादि द्वंद्वे दुरावतीलच. प्रपंचात राहूनही सावधानतेने परमार्थ साधावा. परमार्थ दुसऱ्याकरिता करू नये व स्वतःची फसवणूक करून घेऊ नये. परमार्थ आत्मसुखाकरिता आहे.


दांभिक परमार्थ वरून चांगला दिसतो पण आतून पोखरलेला असतो. पंडु रोगाने पछाडलेले बालक दिसावयास लठ्ठ दिसते पण तो त्याचा खरा लठ्ठपणा नसून ती अंगावरची सूज असते.


त्याप्रमाणे दांभिक आनंद किंवा विषयानंद हा खोटा आहे. प्रत्येकाने आपल्या मनाचे निरीक्षण करावे व विचारावे खरी शांती मिळाली काय?


कोठडीतला कैदी जसा स्वतःस स्वतंत्र मानतो, त्याप्रमाणे संसारपाशाने बद्ध झालेला जीव भ्रमाने मी सुखी, आनंदी व स्वतंत्र असे मानतो. ते मानणे खरे नव्हे.


आशीर्वाद.

🌼☘🌸

   ☘🌸श्रीराम समर्थ🌸☘


अमृतधारा  ८३८


कामक्रोधाचा मी मालक होण्याऐवजी माझेच मालक काम क्रोध झाले. मग मी स्वतंत्र कसा? मी असा पराधीन असून जगाला मात्र ज्ञान शिकवितो व जगाची मालकी मिळवू पाहतो.


ज्याने आपले मन जिंकले नाही, रसना ताब्यात ठेवली नाही, तो दुसऱ्याचा मालक कसा होणार? विकाराचा जो दास तो भगवंताचा दास होऊ शकत नाही. पण भगवंताचा दास झाल्यावर मात्र विकारावर मालकी मिळेल.


म्हणून आपण कामक्रोधादि विकार जिंकण्यासाठी भगवंतास अनन्य शरण जाऊया व त्याचेच होऊन राहुया. मग विकार जवळही येणार नाही.


कोणाचे तरी होऊन राहावे. गुरूचे किंवा देवाचे तरी. ज्याचा संत, सद्गुरुंवर किंवा देवावर पूर्ण विश्वास असेल तो खास उद्धरून जाईल.


आपणच आपले मित्र व शत्रु आहोत. आपला उद्धार करणे असल्यास आपणच दीर्घ प्रयत्न केला पाहिजे.


आशीर्वाद.

🌸☘🌼

    .     

   🌷🌼श्रीराम समर्थ🌼🌷


अमृतधारा  ८३९


परमार्थाच्या मार्गावर भगवत स्मरणरुपी कंदील घ्यावा म्हणजे मार्ग स्पष्ट दिसेल. भगवंताचे नामस्मरण हा एक उत्तम दिवा आहे कि जो खाचखळग्यातूनही सहज पुढे नेईल.


वैराग्यास विवेकाची जोड असावी. चित्तामधे खरी तळमळ पाहिजे. आपण नुसते म्हणतो की "देवा कृपा कर" पण देवाशिवाय जगताच येणार नाही असे खरे वाटत नाही.


देवाशिवाय आपण खरोखरीच जगू शकणार नाही, असे ज्या दिवशी खरे वाटेल त्यादिवशी विषयी वैराग्य व देवाचे खरे प्रेम येईल.


परमात्म्याची खरी गरज वाटू लागली पाहिजे. परमात्मा सर्व कर्ता आहे ही भावना वाढविली पाहिजे. त्याच्याशी नाते जोडून प्रेम केले पाहिजे.


आशीर्वाद.

🌸☘🌼

   🔥🌼श्रीराम समर्थ🌼🔥


अमृतधारा  ८४०


ज्या गोष्टीने अभिमान वाढतो ते पाप व ज्याने नाहीसा होतो ते पुण्य होय. भगवत् स्मरण हेच निरभिमानी करणारे आहे. ते पुण्यरूप आहे.


भगवंताच्या स्मरणात केलेले जे कर्म तेच सत्कर्म. रामाला साक्ष ठेवून कर्म करावे. किती आनंद होईल अनुभव घेऊन पहावा.


तुकाराम महाराजांच्या मनात पांडुरंगाविषयी प्रेम होते म्हणून त्यास विठोबाची मूर्ती "सुंदर ते ध्यान" अशी दिसली. आम्हास ती तशी का दिसत नाही ? कारण आमच्यात प्रेम नाही.


भगवंतावर आपले अलोट प्रेम आल्यावर त्याचे अंग प्रत्यंग सुंदर दिसेल. पण हे प्रेम कसे यावे? हे प्रेम संत संगती व भगवत् नामस्मरण यानेच येईल. दुसरे कशानेही येणार नाही.


संत प्रपंचासक्ति जाण्यास सप्रेम नामस्मरण करण्यास सांगतात. त्याने दिव्य दृष्टी येते. मग भगवंत सुंदर दिसतो व सर्व ठिकाणी असलेली त्याची व्याप्ती कळते.


म्हणून सदाचार ठेवावा व प्रेमाने अखंड नामस्मरण करावे. असे केल्याने प्रपंच परमार्थरूपच होईल, दुःख उरणारच नाही. सहजतेने  नाम घ्यावे आणि आनंदात राहावे.


आशीर्वाद.

☘🙏🏻🌸

  ~    +  

   🌷🌼श्रीराम समर्थ🌼🌷


अमृतधारा  ८४१


भगवंताला मनाने चिकटून असण्याची जी स्थिती तिचे नाव भक्ती. आपल्या देहावर असणारी जी प्रीती तिचे नाव आसक्ती आणि भगवंतावर असणारी जी प्रीती तिचे नाव भक्ती.


जगावर निष्कपट व पूर्ण निस्वार्थी प्रेम करणं म्हणजेच भगवंतावर प्रेम करणं होय.


भगवंताच्या म्हणजे परमात्म स्वरूपाच्या चिंतनातच मनाला खरी विश्रांती मिळते. सत्य म्हणजे जे अखंड टिकतं, ते परमात्म स्वरूप होय.


भगवंताच्या म्हणजे परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी मन अखंड चिकटून राहणे हेच परमात्म दर्शन समजावे.


भगवंताचे स्मरण अखंड राहील अशा गोष्टी करणे हा विवेक समजावा. भगवंताचे ज्याने विस्मरण होते ते सोडणे हे वैराग्याचे लक्षण समजावे.


परमात्मा आनंदरूप आहे. संत परमात्म स्वरूप असतात म्हणून ते आनंदरूप असून त्यांचे मन पूर्ण शांत असते.


आशीर्वाद.

🌼🌷☘

   ☘🌷श्रीराम समर्थ🌷☘


अमृतधारा  ८४२


संत व्हायचे म्हणजे सर्व प्राणीमात्रांवर उत्कट प्रेम करायला शिकायचं. संत मनाने जेथे राहतात तेथे आपले मन ठेवण्याचा प्रयत्न करणे हा खरा संत समागम होय.


संतांच्या नुसत्या देहाची संगती ही खरी सत्संगती नव्हे. मनाला नेहमी खऱ्या सत्संगतीत गुंतवून ठेवावं म्हणजे ते आपोआप शुद्ध होत जातं.


आपले दोष आपल्याला कळून ते जावे अशी आपली प्रवृत्ती झाली की, भगवंताच्या कृपेला सुरवात झाली असे ओळखावे.


ज्याच्यावाचून आपल्याला करमत नाही, चैन पडत नाही, तेथे आपलं मन गुंतलं आहे असे समजावे.


जो इंद्रियांच्या मागे जातो तो भगवंतापासून वेगळा होतो. म्हणून मनाला भगवंतापाशी ठेवून इंद्रियांना प्रपंचात गुंतवावे.


मन भगवंताच्या संगतीत व देह प्रपंचात ठेवावा.


आशीर्वाद.

☘🌼🌷

   🌷🌼श्रीराम समर्थ🌼🌷


अमृतधारा  ८४३


भगवंताची तळमळ लागली की त्याची भेट होण्यास उशीर लागत नाही. नामाने ती तळमळ उत्पन्न होते. म्हणून नेहमी भगवंताचे नाम घेत असावे.


नाम घेतल्याने दोन परिणाम होतात.

१) प्रपंचाचे खरे रूप कळते.

२) भगवंताची प्राप्ती होते.


पाणी जसे शरीराचे जीवन आहे तसे नाम हे मनाचे जीवन बनले पाहिजे. अखंड नाम घेतल्याने भगवंताचे प्रेम येईल. त्याच प्रेम आले की आपण आपले जीवन भगवंताला वाहून टाकुया अशा समर्पण केलेल्या जीवनामध्येच खरे समाधान आहे.


प्रपंचातले आजचे सुख फार फसवे आहे. प्रपंच हा तोंड झाकलेल्या ज्वालामुखीसारखा आहे. त्याच्यातून कधी आग बाहेर पडेल व आपल्याला पोळून काढील याचा नेम नाही.


जगामधे हट्टाने करायचे असेल तर ते एक म्हणजे भगवंताचे स्मरण होय.


आशीर्वाद.

🌼☘🌷

    ~  

   🌼☘श्रीराम समर्थ☘🌼


अमृतधारा  ८४४


भगवंताच्या श्रद्धेचे बीज त्याच्या नामामध्ये आहे. नामाने श्रद्धा उत्पन्न होईल पण ते प्रेमाने व पवित्र भावनेने मात्र घेतले पाहिजे.


सत्समागम आणि भगवंताचे नाम हेच फक्त जीवाचे कल्याण करतात.


भगवंत सूक्ष्मात सूक्ष्म आहे. त्याचं स्मरण सूक्ष्मच असले पाहिजे, म्हणून त्याच्या स्मरणामध्येच भगवंताची संगती आहे.


"भगवंताच्या स्मरणाशिवाय मला काही कळत नाही" हे ज्याला कळले त्यालाच सर्व कळले.


जसे पतिव्रतेचे नवऱ्यावर मनापासून प्रेम असते, तसे आपण भगवंतावर करायला शिकावं.


अंतकाळी आपल्याला सर्व सोडून जावे लागतं. त्यावेळी जीव अनेक ठिकाणी चिकटला असल्याने व्याकूळ होतो. म्हणून आजपासूनच मरणाचे स्मरण ठेवावे आणि आपल्या मनाला भगवंताच्या नामाची गोडी लावून ठेवावी.


आशीर्वाद.

🌷☘🌼

  : श्रीराम समर्थ

श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर संस्थान गोंदवले येथे श्री महाराजांचा ११० वा पुण्यतिथी उत्सव संपन्न होत आहे.

६ जानेवारी या दिवशी होणाऱ्या पुण्यतिथी पुण्यकाल कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ऑनलाइन माध्यमाद्वारे होणार आहे.

सोबत दिलेल्या लिंकवर आपण ऑनलाइन दर्शनाचा लाभ खालील वेळेत जरुर घेऊ शकता.

वेळ : पहाटे ५.००   ते ६.०५

लिंक:

:._

विश्वस्त गोंदवले संस्थान

   🌷☘श्रीराम समर्थ☘🌷


अमृतधारा  ८४५


प्रपंचामधे काळजी, भय व दुःख हीच जास्त आढळतात. म्हणून प्रपंचाला आत चिकटू देऊ नये, त्यात गुंतू नये. तो योग्य रीतीने करावा पण वरवरचा असावा.


प्रपंच नुसता वरवर करावा म्हणजे त्यात आपण गुंतून राहू नये. प्रपंचात आसक्ती किंवा आपलेपणा नसावा. घरात पाहुण्यासारखे रहावे. आपण जर घरात असे वागलो तर परमार्थाचा अनुभव तात्काळ येईल.


जगात प्रेमाशिवाय समाधान नाही, पण भगवंताशिवाय प्रेमाला योग्य आधार नाही. म्हणून भगवंत हेच आपले सर्वस्व आहे असे मनात ओळखून असावे.


सकाळ संध्याकाळ "देवा मी तुझा आहे". असे घोकीत असावे आणि भगवंताला शोभेल असे वागावे.


भगवंताच्या प्रेमामधे मोठे समाधान व खरी तृप्ती आहे. त्या प्रेमाच्या जोरावरच खरे भक्त जगामधील सुखदुःखाच्या हेलकाव्यांना शांतपणे तोंड देतात.


आशीर्वाद.

🌷🌼💧

  : < >

  : < >

  : अयोध्येचा अक्षता कलश

   🌼💧श्रीराम समर्थ💧🌼


अमृतधारा  ८४६


आपल्या जीवनातील सर्व घडामोडी भगवंताच्या इच्छेने चालतात ही खुणगाठ मनाशी पक्की बांधावी म्हणजे प्रपंचातील कर्तव्य करुन सुद्धा मनाची शांती बिघडणार नाही.


जो आत बाहेर भगवंताच्या प्रेमाने भिजलेला आहे व तो भगवंताच्या प्रेमाशिवाय इतर गोष्टी सांगत नाही तो संत आहे असे समजावे. तो सांगेल ते ऐकावे कारण त्यामधे आपले कल्याण आहे.


कोणत्याही परिस्थितीत आनंदात असणे हे ज्ञानी माणसाचे लक्षण आहे. ते ज्ञान भक्तीने उत्पन्न होत.


काळजी, चिंता, तळमळ व भीती समूळ नाहीशी होणे हेच भगवंताच्या भक्तीचे फळ ओळखावे.


"जग काय म्हणेल?" याची काळजी वाहण्यापेक्षा "माझा परमात्मा काय म्हणेल?"  हे लक्षात ठेवून आपले कर्म करावे. अशा वृत्तीलाच भक्त उपासना म्हणतात. अशी उपासना जो करील त्याला शांती मिळालीच पाहिजे.


आशीर्वाद.

💧🌷🌼

   💧🌷श्रीराम समर्थ🌷💧


अमृतधारा  ८४७


पैशाने परमात्मा जवळ आणता येत नाही. पैशाने देहाच्या सुखसोयी प्राप्त करून घेता येतील पण त्याने मनाची शांती कशी मिळवता येईल? देहाच्या पोषणापुरतीच पैशाला किंमत आहे.


ज्याला भगवंताची नित्य संगती आहे, (जी नामानी साधते) तोच खरा भाग्यवान समजावा.


कामवासना, पैसा आणि कीर्ती हे साधकाला खाली खेचणारे पाशच होत. ते आले तर येऊ द्यावेत परंतु आपण होऊन त्यांच्या मागे लागू नये. तरच परमार्थ साधेल.


शरीराला विनाकारण कष्ट देऊ नये. तसेच त्याला सुखाला व आळसाला लालचाऊ देऊ नये. प्रकृती सांभाळणे हा आपला धर्मच आहे.


आपला अहंकार नाहीसा करणे हे सर्व साधनांचे मर्म आहे. म्हणून पैशाचा, विद्येचा, सौंदर्याचा व अधिकाराचा अभिमान नसावा.


आशीर्वाद.

💧🌷🌼

   💧🌷श्रीराम समर्थ🌷💧


अमृतधारा  ८४८


रोज नियमाने परमार्थपर काहीतरी वाचावं. थोड वाचावं पण ते रोजच्या आचरणात आणण्याचा मनापासून प्रयत्न करावा. कारण परमार्थ हे कृतीचे शास्त्र आहे.


आपल्या घरातील मंडळी ही भगवंतानेच आपल्याला दिली आहेत ही भावना ठेवावी. त्यांना कसलाही त्रास होणार नाही असेच आपण वागावे आणि त्यांच्यावर मनापासून प्रेम करावे.


कोणतीही गोष्ट मनापासून करण्याची सवय लावून घ्यावी. कर्म अगदी मनापासून होऊ लागले की त्यामध्ये आपण स्वतःला विसरायला लागतो. यामध्येच फलाची आशा सुटण्याचा मार्ग आहे.


स्वतःचा विसर पडण्यामधेच भगवंताच्या अस्तित्वाची खरी खूण आहे. रोज थोडावेळ तरी स्वतःला विसरायला शिकावं. हे साधण्यासाठी भगवंताच्या स्मरणाची फार आवश्यकता आहे.


भगवंताच्या चरणीं वृत्ती लीन होणे यालाच समाधी असे म्हणतात.


आशीर्वाद.

💧🌷☘

   ☘🌷श्रीराम समर्थ🌷☘


अमृतधारा  ८४९


भगवंताचा नाद (वेड) हा सर्व व्यसनांचा राजा आहे. ती चटक एकदा लागली मात्र पाहिजे. नामाने ही चटक लागते. म्हणून पुष्कळ नाम घ्यावे.


जाणीव जशी आपल्या देहाला व्यापून असते तसे भगवंताचे प्रेम मनाला, जीवाला व्यापून राहिले पाहिजे.


एखाद्या वस्तूचे सारखे चिंतन केल्याने अंतःकरण तद्रूप बनते. म्हणून नामस्मरण, भजन, वाचन, संभाषण, ध्यान वगैरे अनेक रीतीने आपण भगवंताचे विचार मनात टिकविण्याचा अभ्यास करावा.


इच्छेपासून अभ्यास होतो, अभ्यासाने सवय होते आणि शेवटी सवय हाच स्वभाव बनतो. आज आपल्याला भगवंताच्या प्राप्तीची इच्छा आहे.


आपण त्याच्या अनुसंधानाचा अभ्यास करूया. अभ्यास दृढ झाला म्हणजे विनासायास नामजप चालेल. असा सहज जप चालणे यालाच अजपाजप असे म्हणतात,


आशीर्वाद.

🌷☘🌼

   ☘🌷श्रीराम समर्थ🌷☘


अमृतधारा  ८५०


भगवंताला आपण काय द्यावे? काय देऊ शकतो?  ज्याच्या कृपेने आपण आजपर्यंत जगलो, देहाची सुखे भोगली, त्याच्याशी कृतज्ञ राहून त्याचा विसर कधी न पडू द्यावा. त्या भगवंताचे सतत स्मरण ठेवूया. भगवंताला हे आपण देऊया.


भगवंत अल्प संतोषी आहे. आपण एवढे जरी मनापासून दिले तरी तो अगदी प्रसन्न होईल व आपल्याला समाधान लाभेल.


जर जगाची सर्व मालकी भगवंताकडे आहे तर "मी त्याला अमुक देतो" असे आपण म्हणणेच योग्य नाही.


वास्तविक जे देहासकट माझे नाही ते माझे म्हणून वापरणे हाच आधी गुन्हा आहे.


ही एक चोरी समजावी. जे माझे नाही ते माझे म्हणणे यालाच चोरी म्हणतात. म्हणून आपल्यासकट आपण भगवंताला अर्पण व्हावे. म्हणजे त्याची ठेव त्याला परत केल्यासारखे होईल.


आशीर्वाद.

🌸🌼☘

   ☘🌷श्रीराम समर्थ🌷☘


अमृतधारा  ८५१


पाणी जसे उतरत्या बाजुने आपोआप वळते, अगदी तसेच जीव लीन, नम्र, निरभिमान झाले की, त्याच्याकडे भगवंताच्या कृपेचा ओघ आपोआप वळतो.


खरे मोठेपण माणसाच्या लीनतेवर असते. खरी लीनता जीवाला भगवंताच्या जवळ नेते. म्हणून बोलण्यात, चालण्यात, व्यवहारात लीनता आणण्याचा मनापासून प्रयत्न करावा.


भक्तीमध्ये, म्हणजे प्रेमामध्ये ही नम्रता लवकर साधते, म्हणून संतांनी भक्तीला सर्व साधनात उत्तम असे साधन ठरविले. नीती ही भक्तीची दासी होय.


भगवंताचे प्रेम लागणे यामध्येच जीवनाचा खरा विकास होतो. म्हणून ते प्रेम लागण्याची खटपट करावी, म्हणजे सर्व दैवी संपत्ती आपोआप आपल्या ठिकाणी प्रकट होतात.


आशीर्वाद.

🌸🌼☘

   🌼🌷श्रीराम समर्थ🌷🌼


अमृतधारा  ८५२


मन फार उच्छृंखल आहे ही गोष्ट खरी, पण त्याला नाहीसे करायला अगदी सोपा उपाय म्हणजे भगवंताच्या नमनात रहावे. मन विराम पावणे यालाच नमन म्हणतात.


मनाची गडबड शांत करायला दोन उपाय करावे.

१) मना ला उलट करावे म्हणजे नाम घ्यावे.

२) मनाचे ऐकू नये. (मनन) भगवंताचे मनन, चिंतन करावे.


आपले मन वरवर शांत आणि स्वच्छ दिसत असले तरी त्याच्या तळाशी फार घाण आहे. स्वतः आत बुडी मारून आपले लपलेले संस्कार व वासना वर काढून त्यांचा नाश करणे हे खऱ्या साधकाचे कार्य समजावे.


आपले मन संस्कारमय आहे. मनावर पवित्र संस्कार उमटण्यासाठी पवित्र कर्मेच करावीत. आतमधे भगवंताची प्रार्थना करावी. पवित्र माणसांच्या विचारांची संगत जोडावी, म्हणजे मन घाणेरड्या वृत्तींकडे धावणार नाही.


आशीर्वाद.

🌼🌷☘

   ☘🌼श्रीराम समर्थ🌼☘


अमृतधारा  ८५३


साध्या डोळ्यांनी पाहणे व शुद्ध बुद्धीने पाहणे यात फरक आहे. पहिली चर्म दृष्टी.. सामान्य मनुष्य त्याच दृष्टीने जग पाहतो.


दुसरी दिव्य दृष्टी.. संत या दिव्य दृष्टीने जगामधे वावरणारा भगवंत शोधून काढतात. भक्तीनेच ही दिव्यदृष्टी प्राप्त होते.


कोणतीही शक्ती, शक्तीरुपाने दिसत नसून कार्यरुपाने ती आपल्याला  दिसते. उदा: वीज आपल्याला दिवे, पंखे, गाडी वा यंत्र इत्यादी कार्यामध्ये दिसते.


तसे, हे प्रचंड जग ज्या शक्तीचा कार्य विस्तार आहे, ती आपल्याला दिसत नाही तरी ती आहे. तिला माया असे म्हणतात.


भगवंताने मायेच्या आधाराने सृष्टी निर्माण केली असल्याने त्यामध्ये चांगले व वाईट याचे मिश्रण आढळते. जे वाईट आहे त्याबद्दल तक्रार न करता भगवंताच्या आधाराने आपण चांगले वाढविण्याचा प्रयत्न करावा.


आशीर्वाद.

☘🍁🌼

   💧🌷श्रीराम समर्थ🌷💧


अमृतधारा  ८५४


जगत् चालक शक्तीचा एक नियम आहे. "जितकी क्रिया तितकीच प्रतिक्रिया".. तो स्वच्छपणे अनुभवण्यास विशिष्ट वस्तू लागतात.


ओल्या मातीचा गोळा भिंतीवर फेकून मारला तर प्रतिक्रिया होईल ती म्हणजे तो मातीचा गोळा तेथेच चिकटून बसेल.


उलट रबरी चेंडू भिंतीवर मारला तर तो आपल्याकडे जोराने परत येईल. तसे आपण भगवंताची आठवण केली तर तो जवाब (उत्तर) देतो.


पण खऱ्या उत्कंठेने व तळमळीने भगवंताला हाक मारली तर त्याचा अनुभव तात्काळ व स्पष्टपणे येतो. ही तळमळ उत्पन्न होण्यासाठी मनापासून  प्रयत्न करावेत.


परमात्मा सत्तारूप असल्याने त्याला सूक्ष्म दृष्टीनेच शोधून काढता येईल. अशी दृष्टी बनवणे हाच परमार्थ समजावा. हे सर्व अखंड नामस्मरणाने साधते.


आशीर्वाद.

💧🌼🌷

   🌷☘श्रीराम समर्थ☘🌷


अमृतधारा  ८५५


परमात्मा सत् आहे. तो नेहमी आहेच आहे, कधी नाही असे होत नाही म्हणून तो पूर्ण आहे. तो पूर्ण आहे म्हणून सर्व व्यापक आहे.


तो सर्व व्यापक आहे म्हणून आत्मतृप्त म्हणजे आनंदरूप आहे. तो आनंदरूप आहे म्हणून जिवंत आहे. तात्पर्य परमात्मा सच्चिदानंद स्वरूप आहे.


भगवंत हा पूर्ण सत्यस्वरूप असून तो अनंत, अमर्याद, स्वतंत्र, पवित्र, शांत आणि चिन्मय आहे. तो शब्द, स्पर्श, रस, रूप व गंध या इन्द्रिय धर्मांनी आकलन होऊ शकत नाही. तो अत्यंत सूक्ष्मही आहे.


आपला जीव किती आकुंचित (सीमित) म्हणून आपली वासना व हेतु हेही आकुंचित आहेत. आकुंचित दृष्टीने म्हणजे जड दृष्टीने जग पाहिल्यावर ते जसे खरे आहे तसे दिसत नाही. त्यामुळे जीव घोटाळ्यात पडतो.


या घोटाळ्यामध्ये वावरणारी बुद्धी अर्थात अस्वच्छ असते. यातली अशांती व असमाधान हा त्याचाच परिणाम आहे. या बुद्धीनेच आपण कर्म करतो म्हणून तेही बाहेर जगामध्ये दुःखच उत्पन्न करतात.


आशीर्वाद.

💧☘🌷

   💧🌷श्रीराम समर्थ🌷💧


अमृतधारा  ८५६


अस्वच्छ (मलीन) बुद्धीने केलेल्या कर्माने बाहेर जगामध्ये जे दुःख उत्पन्न होते ते नाहीसे करण्यासाठी दोन मार्ग आहेत.


१) अगदी मुळापासून सुरवात करायची म्हणजे, आकुंचितपणा उत्पन्न करणारी आपली वासना मारून टाकायची. याला मीपणा जाळणे, अहंकार मारणे, शरण जाणे असे म्हणतात.


२) अगदी वरच्या टोकापासून सुरवात करायची म्हणजे, बुद्धीमधला घोटाळा नाहीसा करून तिला हळूहळू स्वच्छ करायचे. बुद्धीची मलीनता नाहीशी करायची. याला आत्मानात्मविवेक, वेदांतविचार, ज्ञानमार्ग म्हणतात.


भक्तीमध्ये हे दोन्ही मार्ग आहेत. म्हणून ती श्रेष्ठ आहे. भगवंताला शरण गेल्याशिवाय भक्तीला अस्तित्वच नाही आणि सत्संगती मध्ये अहोरात्र आत्मानात्मविवेक होत असतो.


आशीर्वाद.

🌷💧🌼

   🌼🌷श्रीराम समर्थ🌷🌼


अमृतधारा  ८५७


शूरवीर तानाजीने गडावर चढून सिंहगड घेण्यासाठी घोरपडीचा उपयोग केला.


घोरपड जोपर्यंत जमीनीकडे तोंड करून पोटावर चालते तोपर्यंत तिची ताकद भक्कम असते, तिला आवरणे महाकठीण काम असते.


पण जर घोरपडीची पाठ जमीनीला लागली की ती क्षणात हतबल होते. आपल्या मनाचे सुद्धा तसेच आहे. आपले मन जोपर्यंत इंद्रियांकडे तोंड करून बाहेर धावत आहे तोपर्यंत विलक्षण बलवान व आवरण्याला फार दुष्कर आहे.


पण जर का त्याला उताणे पाडले आणि त्याचे तोंड उलट दिशेला वळवले (म्हणजे ते आतमध्ये स्वरुपाकडे वळवले, स्वतःकडे बघायला लावले) तर तेच मन आपल्या हातातले खेळणं बनते.


मनाला उताणे पाडण्याची, आत वळवण्याची, अंतर्मुख करण्याची खुबी (कुशलता) मात्र साधली पाहिजे. ही खुबी सतत मनापासून शांतपणे नाम घेण्याने साधते.


आशीर्वाद.

🌷🌼💧

   🌷🌼श्रीराम समर्थ🌼🌷


अमृतधारा  ८५८


व्हायोलिनसारखे वाद्य सुरात वाजवण्यासाठी त्या वाद्याला मोठय़ा प्रेमाने आपण आपल्या कुशीत घेतो आणि त्याच्या खुंट्या पिरगळून सुरात लावतो. मग त्यामधून किती सुंदर स्वर निघतात.


तसे आपण आपल्या मनाला प्रेमाने भगवंताच्या चरणीं ठेवावे. मग जरुर त्याचे दमन करावे. भगवंताचे नाम सुरवातीला बळजबरीने घ्यावे. एकदा भगवंताची, नामाची गोडी लागली की ते मन आनंदाचा वर्षाव करील.


समुद्रामध्ये अहोरात्र लाटा उत्पन्न होत असतात. त्यामुळे पाणी अस्थिर असते. तिथे सुद्धा बोट स्थिर ठेवण्यासाठी जड नांगर सोडावा लागतो.


तसे या अशाश्वत प्रपंचामध्ये मन शांत राहण्यासाठी त्याला भगवंताचा, भगवंताच्या नामाचा नांगर लावला पाहिजे. नामस्मरण केले पाहिजे.


तापलेला दगड नदीत टाकला तर तो थंड होतो, पण खडीसाखर पाण्यात टाकली तर ती विरघळते. तसे प्रपंचाच्या त्रासाने नाम घेतले तर मन शांत होईल हे खरे पण तेच जर भगवंत भेटावा म्हणून घेतले तर मन भगवत् स्वरूप होऊन जाईल.


आशीर्वाद.

💧🌷🌼

  : 🙏🏻श्रीराम 🛕 समर्थ🙏🏻


मकर संक्रांतीच्या शुभेच्छा


कृति वचनीं जरी दुखविले

कधी कुणाला जरी

क्षमा करावी थोर मनाने

प्रिय सुहृदहो परी

चला विसरुया जेजे घडले

अप्रियसे जीवनीं

पुन्हा  जगूया  आनंदाने

जीवन हे निशिदिनी

संक्रातीचासण हा येता

वदे जनां मानसा

तिळ गुळ देता घेता ठेवा

भाव मनीं मधुरसा

बोल असे बोलावे सुखवी

लोकां नित श्रवणीं

विलसावे स्मितजरा जनांच्या

गंभीरशा वदनीं

चला स्मरुया सदा सर्वदा

रामनाम निशिदिनी

हमी घेतली म्हणे माउली

ठेवु भरोसा मनीं


🙏🏻🪷💧🛕💧🪷🙏🏻

   🌼🌷श्रीराम समर्थ🌷🌼


अमृतधारा  ८५९


पांढरा रंग हा रंगच आहे. परन्तु पांढऱ्या कपड्याचा रंग जाण्याची भीती नाही. कारण तो त्या कपड्याचा स्वाभाविक रंग आहे.


तसे मन भगवंतापाशी राहून शांत असणे हा त्याचा मूळ स्वभाव आहे. पण ते भगवंतापासून सुटले आणि प्रपंचात अडकले की त्याला दुसरा रंग चढतो.


मग आपल्याला हा आगंतुक रंग धुवून काढण्याचा खटाटोप करावा लागतो. मनाचा रंग धुणे म्हणजे आसक्ती काढणे होय. यालाच परमार्थ साधन म्हणतात.


एखादी अगदी गरीब बाई जर सुवासिनी असेल तर तिला हळदी कुंकू लावले जाते. पण श्रीमंत दागिन्यांनी भरलेली बाई जर सुवासिनी नसेल तर तिला हळदी कुंकू मिळत नाही.


अगदी तसेच जर भगवंताचे प्रेम असेल तर इतर गोष्टी पैसा, विद्वत्ता, मान, घरदार वगैरे नसल्या तरी हरकत नाही, परंतु भगवंताचे प्रेम नसेल तर या गोष्टी असुनही काही उपयोग नाही.


आशीर्वाद.

🌼🌷💧

   

   ☘🌷श्रीराम समर्थ🌷☘


अमृतधारा  ८६०


ज्याने देह दिला प्रपंचाला

मन  वाहिले भगवंताला

तोच खरा सुखी  झाला

जन्मा येऊन धन्य झाला


भाकरीमधे पीठ पुष्कळ व मीठ अगदी थोडे म्हणजे चवीपुरते असते. तसे परमार्थाच्या सोयीसाठी प्रपंचात थोडे लक्ष असावे.


पण आपले बरोबर याच्या उलट आहे. आपण भाकरी करण्यासाठी मीठ पुष्कळ आणि पीठ अगदी थोडे घेतो. त्यामुळे भाकरी नीट तयार होत नाही  (म्हणजे जीवनात सुसंगती येत नाही).


यदाकदाचित, भाकरी तयार झालीच तर ती खाल्ल्यावर ओकारी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे जीवन दुःखमय बनून असमाधानी होईल.


समजा, आपण एक स्वच्छ काच घेतली आणि तिला पारा लावला. काच तीच खरी पण तिला पाऱ्याची जोड दिल्यामुळे आरसा बनते व आपले खरे रूप दाखवते.


तसे आजचे आपले मन जर भगवंताशी जडले तर आपल्याला आपले खरे स्वरूप (आत्मस्वरूप) दाखवील.


आशीर्वाद.

🌼☘🌷

   🌼🌷श्रीराम समर्थ🌷🌼


अमृतधारा  ८६१


सहवासाने नावडती गोष्ट सुद्धा आवडती बनते. म्हणून आज भगवंताचे प्रेम नसले तरी त्याच्या कथा पुन्हा पुन्हा वाचाव्यात. नेहमी भगवंताचे नाम घ्यावे.


भगवंताची मानसपूजा करावी. म्हणजे काही कालाने आपोआप भगवंताचे प्रेम लागेल. एकदा प्रेम लागले की आपले काम झाले.


आपल्या खऱ्या प्रेमाचे आणि आदराचे माणूस आपल्या घरी आले तर आपण ज्या प्रकारे व प्रेमाने त्याची शुश्रुषा करतो सेवा करतो, तशी रोज मनाने भगवंताची सेवा शुश्रुषा करणे याला मानसपूजा म्हणतात.


अशा प्रकारे रोज प्रेमाने मानसपूजा केल्याने तो परमात्मा आपल्याजवळ आहे ही भावना उत्पन्न होते. नेमाने नियमितपणे मानसपूजा केल्याने भगवंत आपल्याजवळ असल्याची भावना दृढ होते.


शीतपेटी (फ्रीज)मध्ये जर फळे ठेवली तर ती न कुजता पुष्कळ दिवस टिकतात. तसे आपल्या मनाला नामाच्या गारठयामध्ये ठेवले तर विषय सुखाच्या उष्णतेचे दुष्परिणाम पुष्कळसे कमी होतील.


आशीर्वाद.

🌼🌷☘

   💧🌷श्रीराम समर्थ🌷💧


अमृतधारा  ८६२


आपली वाणी ही भगवंताची देणगी आहे. वाणी नेहमी मृदु, मधुर, सबळ व प्रेमळ असावी. वाणीची गोडी अगदी मनापासून असावी.


ज्याची वाणी प्रेमळ व गोड असते तो जगन् मित्र बनतो आणि जो जगाला प्रिय झाला तो भगवंताला खात्रीने आवडला असे समजावे.


आपली वाणी परनिंदेने कधी विटाळू नये. आपण निंदा केली नाही तर आपला प्रपंच अडतो असे आहे का?


पुष्कळ वेळा आपण ज्याची निंदा करतो, तो मनुष्य अध्यात्मिकदृष्ट्या आपल्यापेक्षा श्रेष्ठ असतो.


वाणी ही एक शक्ती आहे. आपण ती व्यर्थ घालवू नये. मौनामध्ये फार सामर्थ्य आहे. एक वर्षपर्यंत खरोखरीचे मौन पाळले तर वाचासिद्धी येईल. रोज ठराविक वेळेला काही काळ मौन पाळण्याचा अभ्यास करावा. त्याचा नक्कीच परमार्थाच्या वाटेवर प्रगती होण्यास उपयोग होईल.


आशीर्वाद.

🌼💧🌷

   💧🌷श्रीराम समर्थ🌷💧


अमृतधारा  ८६३


ज्या वाचनाने, संगतीने, दृष्याने, कृतीने व ज्या बोलण्याने मन भगवंतापासून चळते, दूर जाते ते सर्व मनापासून टाळण्याचे प्रयत्न करावेत.


दुसऱ्याने आपल्याशी जसे वागावे व बोलावे असे वाटते तसे आपण सुद्धा त्याच्याशी वागणे व बोलणे हेच सर्व नीतीचे सार आहे.


"आतापर्यंत जे झाले ते झाले, आता मात्र माझे जीवन भगवंतासाठीच आहे" ही वृत्ती बनणे हा भक्तीचा आरंभ समजावा. आपले प्रत्येक कर्म भगवंतासाठीच करणे ही कर्म अर्पण करण्याची युक्ती आहे.


"भगवंत माझ्याजवळ आहे, तो माझा आहे आणि मी त्याचा आहे, माझी सर्व कृती तो पाहतो, माझे सर्व बोलणे तो ऐकतो, माझे सर्व विचार त्याला समजतात" अशी भावना करून नाम घ्यावे म्हणजे भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव लवकर होते.


आशीर्वाद.

🌼💧🌹

   🌷🍀श्रीराम समर्थ🍀🌷


अमृतधारा  ८६४


आपण देहावर जितके प्रेम करतो तितके जो भगवंतावर करतो, त्याला संत म्हणतात.


संत हिमालयासारखे असतात. बद्रीनारायणाला जाणारे असंख्य लोक तिथे आपली घाण टाकतात, पण म्हणून हिमालयाचे पावित्र्य कमी होत नाही.


तसे लोकांनी कितीही निंदा व छळ केला तरी संतांची शांती कधीही ढळत नाही. ते आपली व भगवंताची गाठ घालून देतात व स्वतः बाजुला सरतात.


संत तुमच्या आमच्यासारखाच प्रपंचात असतो. फरक इतकाच की प्रपंच आपल्या "आतमध्ये" शिरतो. आणि आपण बुडतो. पण संतांच्या "आतमध्ये" प्रपंच शिरत नाही म्हणून संत तरतात व दुसऱ्याला तारतात.


जसे पाणी गोठून त्याचा बर्फ बनतो, तसे भगवंताचे प्रेम साकार झाले की तो संत बनतो. संत तत्वतः भगवत्स्वरूपच असतात.


आशीर्वाद.

🌷💧🍀

, 🌷🍀श्रीराम समर्थ🍀🌷


अमृतधारा  ८६५


थंडीने गारठलेला साप वेटोळे घालून बसतो त्यावेळी त्याला लहान मुले सुद्धा हात लावतात. पण जरा त्याला उब मिळाली की कुणी हात लावला तर तो साप फुत्कारतो व फणा उभारून दंश करतो.


तसे मनाचे आहे. ते जोवर भगवत् चरणी लीन आहे तोवर मन स्वस्थ राहते. एकदा का रोजच्या व्यवहारातील विषयाचे दर्शन झाले की ते त्यामागे धावते. म्हणून जागेपणीच भक्तीच्या साधनाने मनाला पूर्ण निर्विष करून  टाकावे.


एखादा पदार्थ तात्पुरता गोड लागला, तरी तो जीव घेणारा आहे असे कळल्यावर मनुष्य तो खाणार नाही. त्याचप्रमाणे तात्पुरते आहे, आपले अहित करणारे आहे असे कळले की आपण ते सोडले पाहिजे. हे सुख खरे नाही ही कल्पनाच आपल्या मनात येत नाही.


विषयाचा त्याग हे आम्हाला संकट वाटते. हे माझे चुकते आहे असे वाटून आपण विषयात राहिलो तरी आपले काम होईल. आपण विषय भोगीत असताना "भगवंता तुझा विसर पडू देऊ नकोस." असे त्याच्याजवळ मागावे.


आशीर्वाद.

🍀🍁💧

   🍀🍁श्रीराम समर्थ🍁🍀


अमृतधारा  ८६६


देहात भरलेले विषयांचे विचार, विकार व वासना प्रयत्नपूर्वक बाहेर काढले व देह रिकामा झाला की तेथे भगवंताला प्रकट होण्यास पवित्र जागा तयार होते, (देहाचे मंदीर होते). कर्म करण्याची हावसुद्धा तेथे नाहीशी होते. हाच खरा संन्यास होय.


आपली इन्द्रिये, मन आणि बुद्धी या सर्वाना प्रपंचातून बाहेर काढून भगवंताचे वळण देणे हा सर्व संतांच्या ग्रंथाचा सारांश होय.


हे कसे करावे यासाठी भक्तीचा उपदेश संतांनी केला. भक्ती म्हणजे भगवंतावर खरे प्रेम करणे होय.


भगवंताच्या साधनाचा अभ्यास म्हणजे एक प्रकारचा झगडाच आहे. आरंभी तर नेहमी अपयशच ठेवलेले असते.


पण निराश न होता चिकाटीने नामाचा आधार धरून नामस्मरण करत जो चालतो त्याला यशाची चिन्हे दिसू लागतात.


आशीर्वाद.

🍁🍀💧

   🌷💧श्रीराम समर्थ💧🌷


अमृतधारा  ८६७


देह आणि देहासंबंधी असणाऱ्या वस्तूंबद्दल असणाऱ्या वासना हळूहळू आवरून निर्बल करून ठेवणे हे खऱ्या विवेकाचे लक्षण समजावे.


वासना निर्बल झाल्यावाचून खऱ्या सुख  शांतीची आशा करणे वेडेपणाचे होय. "मला हे हवे, ते नको." अशी वृत्ती उठणे हे वासनेचे प्रकट स्वरूप आहे.


सामान्य माणसामध्ये वासना विशेषतः दोन प्रकाराने बाहेर पडते. एक कामवासना आणि दुसरे खाण्यापिण्याची वासना.


म्हणून प्रापंचिकाने या दोहोंवर बंधन घालून संयमाने वागावे तरच परमार्थ साधण्याची आशा आहे.


जसा आपला आहार तसे आपले मन बनते. म्हणून आहार शुद्ध, सात्विक व परीमित असावा.


मांसाहार व अपेयपान कटाक्षाने टाळावे. देहाचे नीटपणे पोषण होण्यास जितका, ज्या प्रकारचा आहार जरूर आहे, तो अवश्य घ्यावा.


आशीर्वाद.

🌷🌼☘

   🌼🌹श्रीराम समर्थ🌹🌼


अमृतधारा  ८६८


आपले मन व शरीर भक्तीच्या खुंटाभोवती फिरत ठेवावे. याचेच नाव अभ्यास होय. आपल्याला भगवंताचा नाद लागला पाहिजे.


भगवंताच्या पायावर आपल्या जीवनाची, ध्येयाची, विचारांची व आचरणाची परमार्थाच्या दृष्टीने पुनर्रचना झाली पाहिजे.


भगवंत हा कष्टाने साध्य होणारा नाही. तो प्रेमाने व तळमळीने साध्य होतो. म्हणून साधनांची खटपट करायची ती भगवंताचे प्रेम उत्पन्न होण्यासाठी असते.


विद्वत्ता, कला व इतर प्रापंचिक ज्ञान हे विपरीत ज्ञान असल्यामुळे त्याने आपल्याला भगवंतापासून दूरच केले आहे.


भगवंत भेटण्यासाठी सर्व विद्या विसरून आपण लहान मुलाप्रमाणे झाले पाहिजे. मनापासून नाम घ्यावे. भूतमात्रांशी, सर्वांशी लीन असावे. सर्वांशी प्रेमाने वागावे. हे सर्व साधनांचे सार आहे.


आशीर्वाद.

🌷🍀💧

   🌼💧श्रीराम समर्थ💧🌼


अमृतधारा  ८६९


मागे जे होऊन गेले, त्याची आठवण काढून दुःख करू नये. उद्या जे होणार आहे त्याची कल्पना करून काळजी करू नये.


पण आज मात्र कर्तव्य करीत असता भगवंताला विसरु नये. या अशाश्वत जगात सुखी होण्याचा हा एकच मार्ग आहे.


आपल्याला सगळे कळते, पण वेळेवर आपण ते विसरतो. याचे कारण आपण  आपल्या वृत्तींना मोकाट सोडतो. त्यामुळे मन अनावर बनते.


म्हणून नेहमी मनावर लक्ष ठेवून आलेली उर्मी सहन करावी. हे साधण्यासाठी नामाचा दिवा अंतःकरणात सतत तेवत ठेवला पाहिजे.


भगवंताला हाक मारताना अतीशय प्रेमाने मारावी. आपल्या डोळयात पाणी आले तर भगवंताच्या हृदयात कालवाकालव होऊन तो धावत आल्यावाचून राहणार नाही.


आशीर्वाद.

💧☘🌸

   🍀🌸श्रीराम समर्थ🌸🍀


अमृतधारा  ८७०


लाज ही साधकाच्या फार आड येते. आपल्या देहाची, लौकिकाची, वयाची, गरीबीची, नातेवाईकांची लाज आपल्याला भगवंताकडे जाऊ देत नाही.


"मी एवढा श्रीमंत, सुंदर, अधिकारी.. मी माळ घेऊन जप कसा करु? मी देवाला साष्टांग नमस्कार कसा घालू? मी भजनात टाळ्या कशा वाजवू?" असले सर्व विचार आपल्या अहंकाराचे मित्र समजावे.


मनाने एकदा ठरवून टाकावे आणि या लाजेला वैचारिक चाबकाने सोलून काढावे तरच परमार्थ हाताशी येईल.


प्रपंचामधे अनेकांपासून सुख मिळावे असे वाटते पण ते क्वचितच कुणाकडून आपल्या पदरात पडते. ते नेहमीच मिळेल असे नाही. परमार्थामधे मात्र एका भगवंतापासून सुख मिळवायचे असल्यामुळे ते सुख नेहमीच पदरात पडते.


आशीर्वाद.

☘💧🌷

   🍁💧श्रीराम समर्थ💧🍁


अमृतधारा  ८७१


भगवंत हा पूर्ण व सच्चिदानंदरूप असल्यामुळे त्याचे सुख नेहमीचे, टिकणारे व आनंदरूप असते. या सुखाला परमानंद म्हणतात.


दिवसाच्या चोवीस तासापैकी प्राय: सर्व वेळ भगवंताच्या वातावरणात शिकणे हे आत्मज्ञानाचे मुख्य साधन समजावे. वाटेल तो मार्ग पत्करावा पण हे शिकावे. देहाच्या प्रत्येक क्रियेमध्ये भगवंताची आठवण असावी.


आपल्या प्राणाचा जसा जीवाबरोबर अहोरात्र सहवास असतो, तसा भगवंताचा सहवास अनुभवास येऊ लागला की परमार्थ साधला असे नक्की समजावे.


देहात राहणारा "मी" जितका खरा वाटतो तितकाच भगवंत खरा वाटला पाहिजे. ज्या जीवनात राम नाही, त्या जीवनात प्रेम नाही. जेथे प्रेम नाही तेथे जगण्यात अर्थ नाही.


आशीर्वाद.

🌷💧🍀

   🍁💧श्रीराम समर्थ💧🍁


अमृतधारा  ८७१


भगवंत हा पूर्ण व सच्चिदानंदरूप असल्यामुळे त्याचे सुख नेहमीचे, टिकणारे व आनंदरूप असते. या सुखाला परमानंद म्हणतात.


दिवसाच्या चोवीस तासापैकी प्राय: सर्व वेळ भगवंताच्या वातावरणात शिकणे हे आत्मज्ञानाचे मुख्य साधन समजावे. वाटेल तो मार्ग पत्करावा पण हे शिकावे. देहाच्या प्रत्येक क्रियेमध्ये भगवंताची आठवण असावी.


आपल्या प्राणाचा जसा जीवाबरोबर अहोरात्र सहवास असतो, तसा भगवंताचा सहवास अनुभवास येऊ लागला की परमार्थ साधला असे नक्की समजावे.


देहात राहणारा "मी" जितका खरा वाटतो तितकाच भगवंत खरा वाटला पाहिजे. ज्या जीवनात राम नाही, त्या जीवनात प्रेम नाही. जेथे प्रेम नाही तेथे जगण्यात अर्थ नाही.


आशिर्वाद.

🌷💧🍀

   💧🌷श्रीराम समर्थ🌷💧


अमृतधारा  ८७२


एखाद्या नाटकामध्ये कुणी राजा झाला काय किंवा कुणी भिकारी झाला काय, प्रत्यक्ष जगामध्ये दोघांनाही किंमत सारखीच. उलट भिकाऱ्याचे काम चांगले झाले तर लोक त्याचेच कौतुक करतात.


तसे या प्रपंचामध्ये कुणी श्रीमंत विद्वान असला काय किंवा कुणी गरीब अडाणी असला काय, भगवंताजवळ या गोष्टीला महत्व नसून, तो मनुष्य भगवंताचे किती स्मरण करतो याला खरे महत्त्व आहे.


आपल्या अंतःकाळी तेवढेच उपयोगी पडणार हे समजून, आपला सर्व काळ भगवंताचे अनुसंधान ठेवण्यात व नामस्मण करण्यात घालवावा.


नाम घेता घेता भगवद्चिंतनात देहाचा विसर पडेल इतकी तन्मयता येणे ही मोठी आनंदाची अवस्था आहे. अशा माणसाला आपल्या प्रपंचात काय उणे आहे याची आठवण करून द्यावी लागेल.


आशीर्वाद.

🌷💧🌹

   💧🌷श्रीराम समर्थ🌷💧


अमृतधारा  ८७३


आपला जन्म, मृत्यु, पैसा व मान आणि देहाचे सुख दुःख या गोष्टी प्रारब्धाने चालतात. म्हणून त्यांच्याबद्दल हाव वा कष्टी न होता मनाला भगवंताच्या नामाकडे वळवावे. असे केल्यानेच खरे समाधान लाभेल.


भगवंताचे नाम घेण्यास सुरुवात केल्यावर, भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करू लागल्यावर, सर्व बाजुने आघात होऊ लागतात. आपण ते धैर्याने सोसून चिकाटीने नाम घ्यावे, तरच प्रगती होऊन मन तयार होते.


जगातले ऐश्वर्य पुष्कळ मिळाले तरी आत्म्याचा विकास होत नाही. त्यासाठी काम, क्रोध, लोभ यांचा संयम करून शुद्ध निती व तिच्या पायावर आधारलेले विशुद्ध अध्यात्म यांची जोड आवश्यक आहे.


प्रपंचामधे देखील प्रेम असेल तरच गोडी येते. ज्याला भगवंताचे प्रेम लागले, त्याचे जीवन आनंदमय बनेल यात नवल नाही. आत्मार्पण करणे हा भगवंताच्या प्रेमाचा गाभा आहे. ही मानसिक अवस्था असल्याने ती सर्व परिस्थितीमधे साधता येते.


आशीर्वाद.

🌷💧🍀

   🍁🍀श्रीराम समर्थ🍀🍁


अमृतधारा  ८७४


आपण लहानपणी मोठी श्री गिरवली तेंव्हा आता आपल्याला लहान "श्री" काढता येऊ लागली. तसे आज आपण भगवंताच्या सगुण मूर्तीवर मन स्थिर करायला शिकलो तर कालांतराने ते भगवंताच्या निर्गुण व निराकार स्वरुपामधे स्थिर ठेवता येईल. म्हणून सगुणाला तुच्छ मानू नये. सगुणापासुनच निर्गुणाचा मार्ग आहे.


ज्ञान, विवेक व वैराग्य या साधनांनी मनाचे पुष्कळ मल (विकार) जातात हे खरे, पण भक्तीने मन अमुलाग्र स्वच्छ होते. प्रेमाच्या स्वच्छ पाण्याने भक्ती ही मन आत बाहेर शुद्ध व पवित्र करून टाकते.


भक्ती सगुण व निर्गुण अशी दोन प्रकारची आहे. निर्गुण भक्ती साधण्यास कठीण, पण सगुण भक्ती आचरण्यास सोपी आणि भावनेच्या भरात अमृताने भरलेली असते. म्हणून आपण तिलाच धरावी. सगुण भक्तीतूनच निर्गुण भक्ती आपोआप उदय पावते.


आशीर्वाद.

🍁💧☘

   💧🍁श्रीराम समर्थ🍁💧


अमृतधारा  ८७५


परमार्थात दान हे जरूर आहे. पण दान किती करावे? आपल्या प्रपंचात अडचण न येता व अगदी सहज जे देता येईल तेवढेच योग्य ठिकाणी दान म्हणून द्यावे.


दान दिल्यावर त्याचे स्मरण उरता कामा नये. असे दान नियमितपणे करीत गेल्याने वृत्ती आपोआप उदार बनते आणि दानाची कक्षा वाढते.


त्यागावाचून शांति मिळणार नाही हे खरे आहे. पण त्याग हा बाह्यांगाचा नसून त्याचे मर्म स्थान अंतरंगात आहे. आत आसक्ती नसेल तर बाहेर वस्तु असली काय किंवा आपल्याजवळ ती नसली काय त्याचे काही वाटणार नाही.


चांगला गवई ताना मारीत असताना तबल्याकडे लक्ष ठेवून बरोबर समेवर येतो. तसे आपण प्रपंचातल्या सर्व खटपटी, प्रयत्न करावेत. पण ते करीत असताना भगवंताला मात्र विसरू नये.


इतकेच नाहीतर कर्म संपल्यावर ते भगवंताला अर्पण करावे. "ॐ तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु" ही जीवन संगीताची सम न चुकता गाठली पाहिजे. ही सम जर चुकली तर बाकीचे सर्व व्यर्थ होते.


आशीर्वाद.

💧☘🌹

   💧🌷श्रीराम समर्थ🌷💧


अमृतधारा  ८७६


आत्मरुपाने आपण व्यापक असून देखील माझेपणाने, मी पणाने देहबुद्धीच्या कोंडीत सापडलो आहोत. जे धडधडीत अशाश्वत आहे त्यामधे शाश्वत सुख शोधण्याचा प्रयत्न जन्मभर चालला आहे.


देहाची अशाश्वतता आणि आत्म्याची (भगवंताची)  आनंदमयता जितकी मनात बिंबेल तितकी वासना आपोआप क्षीण होईल आणि समाधान चालत येईल. सत्संगतीने हे सहज साधते म्हणून तिला अत्यंत महत्व आहे.


मी (खरा) जरी तोच राहिलो तरी देह अनेक होऊन गेलेत. म्हणून मरणाला उगीच घाबरू नये.


उलट मरण शांतपणे यावे म्हणून मनाला आत्तापासूनच भगवंताकडे लावण्याचा अभ्यास करावा. तरच अंतःकाळी खात्रीने नाम मुखी येईल.


आशीर्वाद.

💧🌷☘

   ☘🌹श्रीराम समर्थ🌹☘


अमृतधारा  ८७७


जीवनाचे ज्ञान हे पुस्तकातून उत्पन्न होत नाही. ते जीवनातूनच बाहेर पडते. त्यासाठी काम, क्रोधावर संयम ठेवून सतत नाम घेत गेले पाहिजे.


सध्या वाढलेले ज्ञान हे खरे ज्ञान नव्हे. त्याने मनुष्य जास्त विकाराधीन बनला आहे. खरे ज्ञान म्हणजे एक प्रकारचे भगवंताचे दर्शन होय. ज्ञान हा अनुभव आहे.


म्हणून ईश्वर दर्शन होणे ही एक ज्ञानाची अवस्था आहे. तो एक दिव्य अनुभव आहे. भगवंत हा स्वतःच ज्ञानमय असल्याने त्याचे दर्शन देखील ज्ञानमयच असते.


साध्या ज्ञानामधे, ज्ञाता (ज्ञान होणारा  साधक) हा  ज्ञेयापासून (ज्याचे ज्ञान व्हायचे त्या  भगवंतापासून) वेगळा राहतो. पण आत्मज्ञानामधे, ज्ञाता आणि ज्ञेय एकच वस्तू असल्याने तेथे ज्ञाता ज्ञातेपणाने शिल्लकच उरत नाही. म्हणून भगवंतास जाणावयास गेलेला ज्ञातेपणाने परत येत नाही.


आशीर्वाद

🍁☘💧

   ☘❗श्रीराम समर्थ❗☘


अमृतधारा  ८७८


भगवंत सर्व ठिकाणी असला तरी काही वस्तुंमधे विशेष रुपाने प्रगट होतो. ज्या ठिकाणी अत्यंत  भव्यपणा, दिव्यपणा, उदारपणा, तेजस्वीपणा, प्रेमळपणा आढळतो तेथे भगवंत पाहण्यास शिकावे.


सद्गुरु, संत, साधू, आई, बाप, गंगा, हिमालय, कैलास वगैरे ठिकाणी भगवंताचे दर्शन घेण्याची सवय करावी.


उत्कृष्ट कला, गोड  मुग्ध करणारे गायनवादन, अत्यंत प्रेमळपणा, तसेच जेथे असीम  दया, क्षमा, शांति, समाधान आहे तेथे भगवंत खात्रीने आहे असे समजावे.


अशाप्रकारे सज्जनांमधे संत पाहता पाहता तो दुर्जनांमधे देखील दिसू लागेल. जो भगवंत रामात तोच रावणात आणि जो कृष्णात तोच कंसात दिसू लागेल. भगवंत सर्व प्राणीमात्रात आहे अशी खात्री झाली की जगाकडे पाहण्याची आपली दृष्टीच साफ बदलून जाईल.


परंतु हे सर्व घडून येण्यास आपल्या स्वतःच्या आतमधे असणारा भगवंत शोधून काढला पाहिजे. त्यासाठी सतत नाम घेऊन आपले मन निर्वासन (वासनारहित) करण्याचा कसोशीने प्रयत्न केला पाहिजे.


आशीर्वाद.

💧🌸🌼

   🌹💧श्रीराम समर्थ💧🌹


अमृतधारा  ८७९


भगवंताला जाणणे म्हणजे तद्रूप होणे होय. भगवंत अत्यंत सूक्ष्म आहे. म्हणून तद्रूप होण्यास आपले मन देखील तितकेच सूक्ष्म बनले पाहिजे.


वासना ही मनाला जड बनविते. यासाठी मन निर्वासन झाले पाहिजे. सातत्याने नामस्मरण करता करता वासना निःशेष निमाली की परमात्मा प्रकट झालाच पाहिजे.


जीवनतत्व मुळातच भगवद्रूप असल्याने त्याचा अनिर्बंध विलास अतिसुंदर व आनंदरूप असतो. उदाहरणा दाखल लहान मुलांकडे पहावे.


परंतू आपल्या स्वार्थाने व त्यातून उत्पन्न होणाऱ्या माझेपणाने आपण त्या शुद्ध आनंद स्वरुपावर झाकण टाकतो. त्यामुळे आपले अधःपतन होते.


आपले जीवन विकृत होते. म्हणून अधःपाताला, घाताला कारण असलेला "मीपणा मारून टाका" असा कंठशोष संत आजवर जीवाच्या उद्धारासाठी तळमळीने करीत आले आहेत.


आशीर्वाद.

🌼🌸☘

   🌸🌼श्रीराम समर्थ🌼🌸


अमृतधारा  ८८०


आपल्या अंतर्यामी भरून राहिलेला संसार आपल्याला चैन पडू देत नाही. आपण एकांतात जाऊन बसलो तरी तो बरोबर येतो. त्याला बाहेर काढण्यास अनासक्ती हा एकच मार्ग आहे.


वस्तु आपल्यापाशी असताना तिच्या विषयीची आसक्ती आपल्याला कळत नाही. आपल्या आसक्तीची कल्पना ती नसल्यावर येते. म्हणून ती वस्तु असतानाच ती नसल्यासारखे आपण वागावे.


आपल्या कर्तेपणामधे म्हणजे आपल्या आसक्तीमध्ये कर्माचे बंधन आहे. "सर्व काही भगवंताच्या इच्छेने होत आहे" असे मानले, अशी आपली वृत्ती तयार झाली, म्हणजे कर्माचे बंधन उरणार नाही.


आसक्ती हा मनाचा गुण असल्याने तो सूक्ष्म आहे. तो नाहीसा करण्यास साधनही सूक्ष्म हवे. भगवंताचे नाम हेच ते सूक्ष्म साधन होय. आसक्ती शोषून घेण्याचे सामर्थ्य नामात आहे. त्याचा अनुभव घ्यावा.


आशीर्वाद.

☘🌺🌼

   💧❗श्रीराम समर्थ❗💧


अमृतधारा  ८८१


भगवंताच्या चिंतनात, नामस्मरणात मन रमावे म्हणून नेहमीपेक्षा पचायला हलके असे साधे खाणेपिणे करणे हा उपवासाचा खरा हेतू आहे.


पण आपण उपवासाच्या नावावर खास तळलेले वेगळे पदार्थ, नंतर फलाहार असे जड खाणेपिणे करणे हे अपेक्षित नाही. भगवंताचे चिंतन, स्मरण न करता प्रापंचिक गोष्टीत वेळ घालवणे हे योग्य नाही. हा ढोंगीपणा आहे.


देह प्रपंचात काम करीत असताना मन भगवंताच्या चिंतनात ठेवावे अथवा देह जे कर्म करीत असेल तेथे मन सर्वस्वी गुंतवावे. या दोहोपैकी एक जरी साधले तरी परमार्थ साधेल.


देहाची कोंडी फोडण्यासाठी अंतरात्मा तळमळत असतो. त्याच्याकडे लक्ष न देता आपण सर्व काळ देहाची तुष्टी व पुष्टी करण्यासाठी तडफडत असतो. नामात चित्त गुंतवणे म्हणजे आत्म्याची भूक शांत करणे होय.


आशीर्वाद.

💧☘🍁

   🌸💧श्रीराम समर्थ💧🌸


अमृतधारा  ८८२


आपला अहंकार उगीच जाणार नाही. त्यासाठी सामर्थ्य पाहिजे. नाहीतर युक्ती पाहिजे. ज्ञानमार्गी लोक अहंकाराला आपल्या सामर्थ्याने जाळून टाकतात.


आपल्यासारख्या सामान्य माणसाला भगवंताच्या भक्तीसारखा सुखाचा उपाय नाही.


"भगवंता तू मला तुझ्यासाठीच हवा आहेस" अशा निष्काम मनाने भगवंताचे स्मरण करणे ही खरी भक्ती होय.


परमात्म्याच्या स्मरणात मीपणाचे, अभिमानाचे मरण आहे. अभिमानाचा त्याग करून भगवंताच्या अखंड स्मरणात राहणे हेच केंव्हाही इष्ट आहे.


सध्या जे घडत आहे आणि पुढे जे होणार आहे, ते सर्व भगवदिच्छेने घडत आहे ही भावना असावी म्हणजे अभिमानाचे डोके वर येणार नाही.


आशीर्वाद.

🍁☘💧

   🌷🌼श्रीराम समर्थ🌼🌷


अमृतधारा  ८८३


प्रपंचामधे जे आपल्याला दुःख होते ते स्वार्थ, आसक्ती किंवा अभिमानामुळे होते. हे तीनही घालवण्यासाठी आपल्यापाशी जे काही आहे ते सर्व देवाचे आहे असे म्हणावे.


माझेजवळ जे आहे ते सर्व रामाचे म्हटल्यावर रामच त्याचा सांभाळ करील. तेंव्हा आपल्याला काळजी करण्याचे कारणच उरणार नाही.


आपण कर्तव्यापुरते निमित्त मात्र आहोत ही जाणीव ठेवावी. म्हणजे अहंकार (अभिमान) बाधणार नाही.


ज्या ज्या रुपाने आपला अहंकार डोके वर काढत असेल त्याचा शोध करून त्याला विवेकाने नष्ट करण्याचा प्रयत्न करणे हे विचार शूराचे काम आहे. यासाठी आपण स्वतःच स्वतःचे गुरु बनले पाहिजे.


गोष्टी घडणे आपल्या हाती नसून सुद्धा त्याची काळजी आपल्याला लागते. याचे कारण म्हणजे आपला अभिमान होय. अभिमानाची भीती नाहीशी करायला नामाचा ध्वनी अखंड चालू ठेवावा. अखंड नाम घ्यावे.


आशीर्वाद.

🌷🌼💧

   ☘🌸श्रीराम समर्थ 🌸☘


अमृतधारा  ८८४


सर्व ठिकाणी भगवंताची सत्ता काम करीत आहे हा अनुभव चित्तात ठसला म्हणजे सर्व राग, द्वेष गळून पडतात. आणि मग आर्जव, नम्रता, अहिंसा, क्षमा वगैरे सर्व नीतीशास्त्र हृदयातच स्फुरण पावू लागते.


बिंदूमध्ये सिंधूचे सर्व गुण असतात. गीतेचा टाईप मोठा असो की छोटा असो, तिच्या अर्थामधे काहीच फरक पडत नाही. अगदी त्याचप्रमाणे सर्व सृष्टीमध्ये भरून राहिलेला परमात्मा सगूण मूर्तीमधे राहतो.


प्रेम करायला येणे ही देखील एक मोठी विद्या आहे. मनाने पूज्य व पवित्र मानलेल्या आपल्या कोमल भावना केंद्रीत करून तिला आपल्या जीवनाचे सर्वस्व मानणे हे खऱ्या प्रेमाचे लक्षण आहे.


मनुष्याला माणसावर प्रेम करणे सोपे जाते म्हणून जी देवता आपल्याला आवडते तिची गोड मूर्ती करून तिच्याशी प्रेमाचा संबंध जोडावा. या उपासनेतूनच भगवंताच्या विराट स्वरुपाचे ज्ञान होईल.


आशीर्वाद.

☘💧🌷

   🍁💧श्रीराम समर्थ💧🍁


अमृतधारा  ८८५


उपास्य मूर्तीशी प्रेमाचा संबंध जडला की त्या भावनेतून आनंदाची उत्पत्ती होते. यानंतर भोग वासना कमी होऊन प्रत्येक वस्तूशी प्रेम जोडण्याचे वळण आपल्या इंद्रियांना लागते हाच भक्तीचा उत्कर्ष होय.


जगामधे भगवंतावर खरे प्रेम करणारा एक तरी मनुष्य जोपर्यंत आहे तोपर्यंत भगवंताला जगाकडे लक्ष देणे जरूर आहे. म्हणून इकडे तिकडे न पाहता भक्तीकडे मन वळवावे.


भक्ती सकाम असली तरी चालेल, पण ती एकांतिक असावी. भगवंताशी संबंध मात्र येऊ द्यावा मग तो सकामपणापासून निष्कामपणाकडे स्वतःच घेऊन जाईल. कसेही का होईना, भगवंताला घट्ट धरून ठेवावे.


सहवासाने प्रेम लागते, म्हणून भगवंताचासारखा सहवास करावा. भगवंताच्या स्मरणाने त्याचे सान्निध्य लाभते. ते स्मरण आपल्याला शक्य आहे. त्यासाठी नाम घ्यावे.


आशीर्वाद.

🍁☘💧

,   🌹☘श्रीराम समर्थ☘🌹


अमृतधारा  ८८६


रामायणातील भरत हा आपला योग्य आदर्श आहे. रामाच्या मागे त्याने चौदा वर्षे राज्य चालविले, पण ते कसे? स्वतः तपस्व्यासारखा राहिला. रामाच्या पादुका राज्याच्या मालक म्हणून त्याने मानल्या.


भरत रात्रंदिवस राम चिंतनात राहिला. अगदी तसेच आपला प्रपंच हा भगवंताचा आहे या भावनेने वागून, आपण कर्तव्ये करीत असताना भगवंताचा विसर कधीही न पडेल हे सांभाळावे.


आनंदरूप भगवंताचे दर्शन होणे हे आपल्या जन्माला येण्याचे मुख्य कारण आहे. ते साधले की आपल्या जीवनाचे सार्थक झाले. आपण मात्र प्रपंचाला भुलून आपल्या खऱ्या ध्येयाला विसरलो.


साधु, संत आपल्याला नामस्मरणासाठी जागे करतात. जागे झाल्यावर मात्र पुन्हा निजू नये. दिवसभर आपल्या ध्येयाचे स्मरण ठेवून आपण वागावे. सतत नाम घेण्याचा मनापासून प्रयत्न करावा. साधनाची ही पहिली पायरी आहे.


आशीर्वाद.

💧🌷🌼

   ☘🔥श्रीराम समर्थ🔥☘


अमृतधारा  ८८७


जगात उपलब्ध असलेल्या सर्व शास्त्रांपैकी अध्यात्म शास्त्राचा मानवी जीवनाशी अत्यंत निकट संबंध आहे.


या अशाश्वत देहामधे वास करणारा आत्मा अत्यंत पवित्र, सुंदर व पूर्ण असल्यामुळे प्रत्येक मनुष्याने आपली दृष्टी आत वळवून आत्मपरिक्षण करावे असे अध्यात्म शास्त्र सांगते.


मनुष्याला खरोखर सुधारण्यास यापेक्षा खात्रीचा अन्य उपाय नाही. ज्या समाजात अशी अंतर्मुख असलेली माणसे पुष्कळ आहेत, तो समाज श्रीमंत नसेल पण खात्रीने सुखी मात्र होईल.


मुक्त पुरुष सर्व प्रकारच्या बंधनातून सुटलेला असतो. त्याची वासना भगवंताच्या इच्छेमधे पूर्णपणे विलीन झालेली असते. ही अवस्था अत्यंत दिव्य, सुंदर आणि उदात्त असते.


देहात राहून भगवंताशी तद्रूपतेने वागणारा हा सत्पुरुष सर्व क्रिया करून पुन्हा काही क्रिया करत नाही. आपण स्वतः भगवंताच्या हातातले बाहुले आहोत याचा साक्षात अनुभव आल्याने "मी हे करीन किंवा ते करणार नाही" अशी उर्मी त्याचे ठायी नसते.


आशीर्वाद.

🌼🌷☘

   🔥🌼श्रीराम समर्थ🌼🔥


अमृतधारा  ८८८


देह व मन यांची खाते वाटणी करावी.


देह द्यावा प्रपंचाचे स्वाधीन | मन करावे भगवंतापाशी लीन ||


भगवंताचे प्रेम एकदा लागले कि मग ते सुटणे कठीण जाते.


सकाळी व रात्री भगवंताची मानसपूजा करीत जावी. सुखासनी बसून आपल्या उपास्य देवतेची मूर्ती हृदयात आणावी. तिची यथासांग पूजा करून तिच्यापाशी कृपायाचना करावी.


साधनामधे मौनाला फार महत्व आहे, मोठे स्थान आहे. मौनाने शक्तीसंचय घडून मन आपोआप अंतर्यामी रमू लागते. पण व्यवहारापुरते बोलणे जरूर ठेवावे.


रोज थोडे वाचावे पण, नुसत्या वाचनाने आजपर्यंत कोणी तरला असे ऐकिवात नाही. जे वाचले त्याचे येता जाता मनन करावे. मननाने मौन साधेल.


व्यवहार म्हटला कि कधी मनासारखे तर कधी मनाविरुद्ध व्हायचेच. त्या दोन्ही प्रसंगी सावध असावे. सुखाची काय किंवा दुःखाची काय उर्मी जिरवण्याचा अभ्यास करावा.


आशीर्वाद.

🔥💧☘

   ☘🌸श्रीराम समर्थ🌸☘


अमृतधारा  ८८९


देहाची गती प्रारब्धाने चालते. कधी न मागता सुख तर कधी न मागता दुःख आपोआप येते. पहिल्याने हुरळू नये तर दुसरे म्हणजे दुःख आले तर विव्हळू नये. शांत, सम राहावे. हा अभ्यास करावा.


नित्याच्या व्यवहारात विकारांना बळी पडू नये. विशेषतः क्रोध, लोभ आणि द्वेष हे फार छळतात. त्याना प्रकट होण्यास सवडच देऊ नये. मनाने शांत, उदार व निर्मत्सर असावे.


आपण आपल्या देहाला, नातेवाईकांना आणि घरादाराला विश्वस्ताप्रमाणे बघावयाला शिकावे. व्यवहाराने त्याची मालकी असली तरी मनाने चिकटून नसावे.


आपणासकट सगळे जण चिरकाल टिकणारे नाहीत याची जाणीव आतमधे ठेवून बाहेरून व्यवहाराने वागावे. पण मन मात्र कोठे गुंतून ठेवू नये.


साधन करताना प्रकृतीला सांभाळावे. पण आळस मात्र करू नये. आळशी माणसाचे मन गंजून जाते. त्याला जडत्व येते. त्यामुळे आळस न करता नामस्मरण करावे व भगवंतापाशी रमावे.


आशीर्वाद.

💧☘🌸

, ☘🌷श्रीराम समर्थ🌷☘


अमृतधारा  ८९०


अडवलेले पाणी मोकळे सोडले की ते आपोआप उताराकडे धावते. त्याचप्रमाणे आपले मनाला जरा मोकळे सोडले की आपली आवड जिकडे असते तिकडे म्हणजेच विकारांकडे व प्रपंचाकडे धावते.


म्हणून मनाला आनंदरूप भगवंताच्या अनुसंधानात नेहमी अडकवून ठेवण्याची सवय ठेवावी. त्यासाठी सतत नाम घेण्याचा अभ्यास ठेवावा


जगण्याला कंटाळू नये. तसेच मरणाला भिऊ नये. आपण किती दिवस जगणार याचा विचार करीत बसण्यापेक्षा आपले मन भगवंतापाशी गुंतवून ठेवण्यात खरे समाधान आहे.


विचारांना पूर्णपणे आवरावे. तसे होणे म्हणजे कालचक्राच्या बाहेर पडणे होय. आलेल्या विचारात न मिसळता साक्षित्वाने बाहेर राहिले तर हे चटकन साधेल.


अंतर्मुख बनून आपण आपल्या मनाकडे शांतपणे बघायला शिकलो तर मनच राहणार नाही. मन हरवून जे उरते तेच आत्मस्वरूप होय. तेथेच आनंद राहतो.


आशिर्वाद.

🌸☘💧

   🌼🌷श्रीराम समर्थ🌷🌼


अमृतधारा  ८९१


भगवंताच्या स्वरुपाबद्दल चर्चा करत बसू नये. आज जे स्वरूप कळेल त्याची धारणा करावी. त्यातूनच त्याच्या खऱ्या स्वरुपाचे ज्ञान प्रगट होऊ लागते.


साधकाने दुसऱ्याचे दोष पाहू नये. त्याची चिकित्सा करीत बसण्यापेक्षा मुखाने नाम घ्यावे व नित्य आपले अंतःकरण तपासून पहावे. तेथे अनेक दोष आढळतील.


प्रेमळ पत्नी जशी आपल्या पतीच्या जीवनात समरस बनून जाते तसे आपण आपल्या साधनात समरस व्हावयला शिकावे. हे अभ्यासाने साधते व पुढे सहज घडते.


सत्संगती आणि भगवंताची स्मृती | यांनीच घडून येते परमार्थात प्रगती ||


सत्संगती संतांच्या वचनाने घडू शकते. देहाने ती मिळाली तर फारच उत्तम. पण ती फार दुर्मिळ असते.


भगवंतापाशी अनन्यभावे, तळमळीने प्रार्थना करावी. "भगवंता तुझे प्रेम मला लागू दे"  ही सर्वात उत्तम प्रार्थना होय.


आशीर्वाद.

🌼🌷💧

   🌷💧श्रीराम समर्थ💧🌷


अमृतधारा  ८९२


जगाच्या प्रवाहाबरोबर वाहत न जावे. दुसऱ्यापासून आपल्याला सुख मिळेल ही कल्पनाच खरी नाही. सुखाचा झरा आपल्यापाशी, आपल्या अंतःकरणातच आहे.


"भगवंता, माझे सर्वस्व तूच आहेस, मी तुला अनन्य आहे, माझे मन तुझ्याच चिंतनात सदैव रहावे, तुझ्यापाशी चिकटून जावे" अशी येता जाता प्रार्थना करावी, मनाशी म्हणावे. असे केले की भगवंताचे प्रेम साधते.


विचारांना पूर्णपणे आवरावे. असे होणे म्हणजेच कालचक्राच्या बाहेर पडणे होय. आलेल्या विचारात मनाला न गुंतवता साक्षित्वाने बाहेर राहिले तर हे पटकन साधेल.


प्रत्येकाला राजी (खुष) राखण्याचा प्रयत्न करून जग प्रसन्न होत नाही. एका भगवंताला प्रसन्न केल्याने सर्व प्राणीमात्र आपोआप आपल्यावर प्रेम करू लागतात. हे नामाने सहज साधेल.


कोणतेही व्यसन पचनी पडल्यावर मनुष्य त्याच्या अधीन होतो. तसे भगवंताच्या नामाचा अथवा चिंतनाचा इतका नाद लागावा की ते आपल्या आवाक्याबाहेर जावे. अखंड नाम आपोआप चालू रहावे.


आशीर्वाद.

🌷💧🌼

   🌼🌷श्रीराम समर्थ🌷🌼


अमृतधारा  ८९३


जीवन हे नदीच्या प्रवाहासारखे धावते आहे. ते गतिमान असल्याने समजण्यास मन देखील तसेच हवे. म्हणून भूतकाळाने ते बांधून ठेवू नये.


आपल्या कर्माचे फळ देणारा भगवंत आहे ही धारणा धरून प्रवाहाने आलेले कर्म बिनतक्रार पण सर्वोत्तम करणे हेच परमार्थ साधन होय.


सदाचरण, शुद्ध अंतःकरण आणि त्यात भगवंताचे स्मरण ही त्रयी मिळून परमार्थ मार्ग बनतो. त्यात शुद्ध अंतःकरण आणि भगवंताचे अखंड स्मरण यावर भर दिल्याने काम चटकन होते.


भगवंताच्या मार्गात (परमार्थात) तडजोड नाही. तेथे लबाडी (ढोंग) चालत नाही. तेथे वशिलेबाजी चालत नाही. तेथे दुसऱ्याचा संबंध नाही. दुसऱ्यापासून अपेक्षा नाही. परमार्थात दुसऱ्याची बाजू नाही. आपले आपणच प्रामाणिक प्रयत्न करत तो उकल करायचा असतो.


"मी भगवंताचे नाम घेतो" ही जाणीव सतत राहिली पाहिजे म्हणजे आपली वृत्ती सुधारते.


आशीर्वाद.

💧🌼🌷

   ☘🌷श्रीराम समर्थ🌷☘


अमृतधारा  ८९४


आपल्या मनाचे सामर्थ्य अफाटअचाट आहे. पण अनेक कल्पनांनी, सवयींनी व  समजुतींनी आपण ते आकुंचित (सीमित) केले आहे. ते सर्व बंध तोडावे की आनंद मिळतो.


पूर्वी आलेल्या अनेक अनुभवांच्या स्मृती संस्काररुपाने शिल्लक राहतात. या संस्काराचे गाठोडे म्हणजेच आपले मन समजावे.


मन हे मूलतः कल्पनारूप आहे. नाना प्रकारच्या कल्पनांनी आपले जीवन ग्रस्त बनते. ते तापते म्हणून त्यामधे काळजी, तळमळ, भय, शोक इत्यादी निर्माण होतात.


भगवंताच्या दर्शनासाठी आजच्या मनोरचनेत, विचार करण्याच्या प्रक्रियेत क्रांती घडली पाहिजे. आपण ती स्वतःच घडवून आणावयास हवी. नामाने ती घडून येते.


जीवनातील सर्व विरोध, संघर्ष आणि घालमेल विराम पावणे हे आत्मानुभूतीचे प्रधान लक्षण होय. त्यासाठी संघर्षाचे मूळ कारण जो मीपणा आहे तो अंतर्धान पावावयास हवा.


आशीर्वाद.

☘🌷🌼

   ☘🌼श्रीराम समर्थ🌼☘


अमृतधारा  ८९५


माझ्या मी कडे वेगळेपणे पाहता येणे जरूर आहे. ही कला साधली की, तो मी आपोआप वितळू लागतो. तो पूर्ण वितळला म्हणजे केवळ शुद्ध जाणीव शिल्लक राहते. तेच आनंदरूप समजावे.


"मी कर्ता नसून निमित्त मात्र आहे, खरा कर्ता परमात्मा आहे" असा साक्षात् अनुभव येऊन भगवंताची स्मृती अखंड  अंतकाळी पण टिकणे हे ज्ञानीपणाचे लक्षण आहे.


अंतकाळी ज्याने नाम घेतले त्याच्या इतर वासना, विषय, कल्पना मेल्या असे नसते. तो काही एकदम मुक्त होत नाही. पण तो भगवंताच्या स्मरणात गेला म्हणून पुढच्या जन्मात तो अती सात्विक म्हणून जन्माला येईल. तो भगवंताची प्राप्ती करून घ्यावी अशी वृत्ती असणारा असेल.


व्यवहार न सोडावा, पण विषयाकडे गुंतणारी आपली वृत्ती भगवंताच्या आड येते म्हणून तिला भगवंताकडे गुंतवावे, जेणेकरून भगवंताची खरी आवड निर्माण झाली पाहिजे.


आशीर्वाद.

🌼🌷☘

   ☘🌼श्रीराम समर्थ🌼☘


अमृतधारा  ८९६


आपल्याला जे मागायचे आहे ते भगवंताजवळ मागावे. भगवंताने ते दिले नाही तर ते न मिळणे आपल्या हिताचे आहे अशी बुद्धी उत्पन्न होईल व त्यानेच पुढे वासना मरेल.


बायको आणि मुलेबाळे असणे यालाच काही प्रपंच म्हणत नाहीत. लग्न न करून सुद्धा प्रपंच असू शकतो. प्रपंच हा आपल्या आसक्तीमध्ये आहे.


स्वतःच्या संन्यासाबद्दल ज्याला आरंभीच शंका आहे, त्याने संन्यास न घेणेच बरे. मला विचाराल तर, संन्यास मला आवडत नाही. कारण संन्यासातला त्याग हा खरा त्याग नव्हे.


वस्तु असताना त्याग करण्याची हिंमत संन्यासाच्या अंगात नसते, म्हणून तो ती सोडून जातो. वस्तू तर असावी, पण तिच्यात आसक्ती मात्र नसावी. हे मला जास्त आवडते.


श्री रामचंद्र व जनकराजा ऐश्वर्य असून देखील त्या पासून अलिप्त राहिले. याचे नाव अनासक्ती.


आशीर्वाद.

🌷🌼☘

   🌼🌷श्रीराम समर्थ🌷🌼


अमृतधारा  ८९७


ऐश्वर्य आले तरी त्यामध्ये प्रेम व आसक्ती ठेवू नये. "भगवंता हे तुझ्या इच्छेने आले आहे" असे आपण म्हणावे.


नोकरी ही सुखासाठी नसून पोट भरण्यासाठी आहे, अशा वृत्तीने जो ती करील त्याला तिची आसक्ती राहणार नाही. त्याला नोकरीचा अभिमान राहणार नाही.


समजा एखाद्या माणसाची बदली झाली, तर जेवढे सामान आगगाडीतून नेणे शक्य असते तेवढेच तो घेतो. बाकीच्याचा लोभ सोडून देतो.


रहायचे घर, मोठा पलंग, किंवा मोठे कपाट गाडीतून नेता येत नाही म्हणून तो त्याची आसक्ती धरीत नाही. हे जसे खरे, त्याप्रमाणे आपण प्रपंचामधे जड वस्तूविषयी अनासक्त असावे.


फिरतीवरचा सरकारी अधिकारी नव्या बंगल्यामध्ये शिरताना तो आपला नाही म्हणून शिरतो आणि त्यामध्ये राहतो. त्याचप्रमाणे आपल्या प्रपंचात आसक्ती न ठेवता राहिले पाहिजे.


आशीर्वाद.

💧☘🌷

   🌷☘श्रीराम समर्थ☘🌷


अमृतधारा  ८९८


आपण गाडीतून प्रवास करीत असताना ज्याप्रमाणे गाडीच्या डब्यात आपल्याला प्रवासी भेटतात, त्याप्रमाणे आपल्या मुलांबाळाचे अपल्याशी संबंध असतात.


त्यांचे प्रारब्ध ते त्यांचे बरोबर घेऊन येतात. आपण निमित्तमात्र असतो. त्यांचे (सुखदुःख) सगळे वेगळे असते. आपण आपले कर्तव्य करावे पण त्यांच्यामध्ये तशी आसक्ती ठेवू नये.


सुखासाठी जो दुसऱ्यावर अवलंबून असतो, तो दुःखी बनतो. जो दुसऱ्यापासून सुखाची अपेक्षा करीत नाही तो सुखी असतो.


दुसरा मला सुख देईल, ही कल्पना असल्यामुळे त्याच्या ठिकाणी आसक्ती असते. जास्त सुखाची अपेक्षा, म्हणजे आसक्तीच दुःखाला कारण होते.


"भगवंता, मी तुझा होऊन राहीन. तू माझा आहेस. एवढेच माझेपण, आसक्ती मी ठेवीन". असे म्हणावे.


आशीर्वाद.

🌼🌷☘

   💧🌼श्रीराम समर्थ🌼💧


अमृतधारा  ८९९


निष्काम कर्म करायला अडचण नाही. कारण हेतू ठेवणे आणि फळाच्या ठिकाणी आसक्ती किंवा आग्रह ठेवणे यामध्ये फरक आहे.


अमुक एक हेतू ठेवून कर्म केल्यावर त्याचे फळ काहीही मिळु दे अशी वृत्ती असणे, हे निष्काम कर्म होय. हे खरे निर्हेतुक कर्म होय. अमुकच फळ मिळावे हा आग्रह असणे हे सहेतुक कर्म होय.


आपण लोकांना आपल्या परिस्थितीप्रमाणे मदत करावी. जास्त करू नये, पण कमीही करू नये. त्यावर कोण काय बोलतो ते मनावर घेऊ नये व त्याचे वाईट वाटू देऊ नये.


आपण आपल्यावरून (गृहित धरून) दुसर्‍याचे कारण सांगतो म्हणून आपला हेतू शुद्ध असणे जरूर आहे. तो अभिमानाचा (अहंपणाचा) नसावा.


मनुष्याला आग्रह नसावा. आग्रहाबरोबर हट्ट आणि अभिमान येतो.


आशीर्वाद.

☘🌷💧

   ☘🌷श्रीराम समर्थ🌷☘


अमृतधारा  ९००


प्रत्येक कृतीत भगवंताला साक्षी ठेवा. "मी तुझा आणि तू माझा" असे भगवंताला सांगावे. म्हणजे त्याला वाईट दिसेल असे आपण वागणार नाही.


ज्याच्या हृदयात परमात्मा प्रकट आहे त्याला जगात दुःख नाही. अंतःकरणाची शुद्धता हा त्याला उपाय आहे. ही शुद्धता येण्यास "भगवंता, मी तुझा आहे" असे अगदी मनापासून म्हणावे.


भोग प्रारब्धाने येतात असे म्हणण्यापेक्षा ते भगवंताच्या इच्छेने येतात असे म्हटले की समाधान मिळेल.


"भगवंता मी तुझा आहे " असे रात्रंदिवस म्हणत असावे. असे म्हणत गेल्याने भगवंत प्रगट होत जाईल. आणि भगवंत जितका प्रगट होत जाईल तितके मीपणाचे दडपण कमी होत जाईल.


भगवंताच्या इच्छेने सर्व होते. ही जाणीव झाली तर दुःखाचे कारणच नाही. पण ते तसे वाटत नाही, याला काय करावे? (सतत नाम घ्यावे.)


आशीर्वाद.

🌷💧🌼

   💧🌷श्रीराम समर्थ🌷💧