Showing posts with label डिसेंबर. Show all posts
Showing posts with label डिसेंबर. Show all posts

18 Dec 2020

काळजी करायची तर नामाची करा.

आपण असे पाहतो की आज जे दुःखाचे वाटते तेच पुढे सुखाचे होते, आणि जे सुखाचे आहे असे वाटते तेच पुढे दुःखाला कारणीभूत होते. तुम्हांला जे सुखदुःख येते ते भगवंतापासून येते म्हटले, तर दुःखाचे कारण काय ? जोपर्यंत परक्याने दिलेले दुःख भगवंतानेंच दिले असे वाटत नाही, तोपर्यंत आपण भगवंताचे झालो नाही. आपण घाबरतो केव्हां, तर आपला आधार सुटला म्हणजे, जे जे होते ते रामाच्या इच्छेने होते असे समजावे. संकटे देवाने आणली तर ती सोसण्याची शक्तीही तोच देतो. समर्थांचे होऊन असे भ्यावे का ? समर्थांचे जे झाले त्यांनी परिस्थितीला नाही डगमगू. प्रत्यक्ष संकटाचे निवारण जर करता येते, तर मग भिती कशाची धरावी ? मुळात जी भिती नाही ती तुम्ही मनाने निर्माण करता याला काय म्हणावे ? खेळातली सोंगटी मेली म्हणजे त्याचे सुख-दुःख कोणी करतो का ? तसे व्यवहारात आपण वागावे. सुखाने हुरळून जाऊ नये आणि दुःखाने अस्वस्थ होऊ नये. असे व्हायला आपले मन शांत राहणे जरूर असते. जोपर्यंत 'मी कर्ता आहे' अशी भावना असते, तोपर्यंत सुखदुःखाचे हेलकावे मनाला बसतात. म्हणून कर्तेपण रामाकडे द्यावे, आणि देहाने कर्तव्यात राहून मन शांत ठेवावे. 'परिस्थितीचा परिणाम माझ्या मनावर घडू देऊ नको देवा' असे म्हणावे, 'परिस्थितीच बदल' असे देवाला म्हणू नये.

ज्याप्रमाणे एखादे विष रक्तात मिसळावे, त्याप्रमाणे काळजी आपल्या अंगात भिनली आहे. त्याला वरून औषध लावले तर उपयोग होत नाही. ह्यासाठी भगवंताच्या अनुसंधानाचे इंजेक्शनच पाहिजे. जे दुर्गुण भगवंताचा विसर पाडायला कारण होतात, त्या सर्वांचा संग्रह म्हणजे काळजी होय. काळजी हा फार मोठा रोग आहे. पोटात रोग वाढला आणि त्यानेच पोट भरले की रोग्याला अन्न जात नाही. त्याचप्रमाणे, ज्याला काळजी फार, त्याच्या हृदयात आनंद जाऊच शकत नाही. या काळजीचे आईबाप तरी कोण ? देहबुद्धीमुळे आपल्याला काळजी लागते. देहबुद्धी म्हणजे वासना. वासना आणि अहंकार हे काळजीचे आईबाप आहेत. अशा और स्वभावाचे आईबाप असल्यावर पोर असे विचित्र असायचेच ! भगवंताचे स्मरण करीत गेल्याने आईचा आणि मुलीचा मृत्यू बरोबर घडून येतो; वासना आणि काळजी दोघीजणी एकदम मरतात. खरे म्हणजे, एकच स्थिती कधी कायम राहात नाही म्हणून आपल्याला भिती वाटते, आणि तिच्यातून काळजी उत्पन्न होते. काळजी जितकी आपल्याला मारते, तितकेच नाम आपल्याला तारते. तरीसुद्धा आपण काळजीलाच पकडून बसतो, याला काय म्हणावे ? आपला जेवढा वेळ काळजीत गेला तेवढा वाया गेला असे समजावे. काळजी करायचीच असेल तर अनुसंधान कसे टिकेल याची करा.


३५३. नामाची काळजी घ्या, म्हणजे काळजी करायची वेळच येणार नाही.

31 Dec 2017

नाम हे चिरंतन आहे, त्याला समाप्ति नाही. 


[तेरा कोटी रामनामाच्या जपाच्या समाप्तीच्या दिवशी झालेले निरूपण] 

खरे पाहिले म्हणजे आपण जपाची जी समाप्ती करतो ती केवळ अज्ञानामुळेच; कारण नाम हे चिरंतन आणि काळापलीकडचे आहे. त्याचे माहात्म्य कळायला फार कठीण आहे. देवाला अत्यंत प्रिय जर काही असेल तर ते म्हणजे त्याचे नाम. ते घेतल्याने तो आपलासा होईल. देव नामाशिवाय राहू शकत नाही. त्रिवेणीसंगम जर कोणता असेल तर तो म्हणजे देव, भक्त आणि नाम. जिथे देव असेल तिथे भक्त आणि नाम असते; आणि जिथे भक्त असतो तिथे नाम आणि देव असतो.

तुम्ही लोकांनी सेवा फार केली. खरोखर, जपाची सांगता करून तुम्ही राजाला लाजवील अशा रीतीने उत्सव साजरा केलात. आता रामाजवळ असे काही मागा की पुन्हा काही हवेसे वाटणार नाही. आपण जर काही अगदीच क्षुल्लक मागितले तर तो हसेल, की मी एवढा दाता असताना हे क्षुल्लक काय मागतात ! तर आता त्याच्याजवळ, 'देवा, माझे समाधान निरंतर टिकू दे, आणि तुझ्या नामाचे प्रेम दे,' हेच मागणे मागा. भगवंताला पूर्ण शरण जाऊन सांगा, ' भगवंता, मी हा असा आहे, यात सुधारणा होणे माझ्या हाती नाही. रामा, मी तुझे नाम मरणापर्यंत घेईन तरच जगेन.' स्त्रियांनी एकच करावे, पति देवासमान मानून देहाने त्याचे व्हावे आणि मनाने देवाचे व्हावे. प्रपंच हा परमार्थाचा लाभ होण्यासाठी करावा. कुठेही गुंतून राहू नये, कोणत्याही उपाधीत सापडू नये. उपाधीरहित राहण्याचे साधन म्हणजे उपाधीरहित असलेले भगवंताचे नाम सतत घेणे. नाम घेतल्याने श्रद्धा दृढ होईल आणि नामाची गोडी लागेल. जसे पाणी गोठल्यावर बर्फ होतो, त्याचप्रमाणे नाम घेतल्याने श्रद्धा घट्ट होते. श्रद्धेमुळे देवाला तुम्हांला भेटावेच लागेल. तुम्ही अखंड नाम घेत राहा, देव तुम्हाला खात्रीने भेटेल या बद्दल शंका बाळगू नका.

परमार्थ आणि व्यवहार यांची उत्तम सांगड घालावी. परमार्थाबद्दल नसत्या शंका घेऊ नयेत. आजच्या या दिवसापासून, आपण आपल्या मुलाला जितक्या आपलेपणाने हाक मारतो, तितक्या आपलेपणाने देवाला हाक मारा; आणि आतापर्यंत जितक्या आवडीने भगवंताचे नाम घेतलेत तितक्याच किंवा त्याच्यापेक्षाही जास्त आवडीने आणि निष्ठेने ते घ्या. अंतकाळी अगदीच सगळ्यात शेवटी सुटणारी वस्तू म्हणजे भगवंताचे नाम पाहिजे; नामात शेवटचा श्वास गेला पाहिजे. नाम इतके खोल गेले पाहिजे की प्राणाबरोबरच ते बाहेर पडावे. असे नाम जो घेतो त्याला देहाच्या सुख-दुःखाची जाणीवच राहणार नाही. तो आनंदात राहील . मला खात्री आहे, राम त्याचे कल्याण करील.

३६६. नामात शेवटचा श्वास जाण्याकरिता आतापासून सतत नामात राहण्याचा प्रयत्‍न करा.

30 Dec 2017

शेवटी करावी प्रार्थना एक ।

सकाळी लवकर उठावे । भगवंताचें स्मरण करावे ।

हातपाय स्वच्छ धुवावे । मानसपूजा करावी ॥

हृदयांत ठेवावे रामाचे ठाण । षोडशोपचारे करावें पूजन ॥

गंध फूल करावे अर्पण । नैवेद्य करावा अर्पण । मनाने प्रसाद घ्यावा जाण ॥

शेवटी करावी प्रार्थना एक । 'रामा, तुला मी शरण देख ॥

वासना न उठों दुजी कांही । नामामध्यें प्रेम भरपूर देईं ॥

सदा राखावें समाधान । हें तुझें कृपेवांचून नाही जाण ॥

नीतिधर्माचे आचरण । तुझें कृपेने व्हावे जतन ॥

न मागणें आता कांही । मी तुझ्यासाठी जिवंत पाहीं ।

आतां द्या नामाचें अखंड स्मरण । देह केला तुला अर्पण ॥

रामा, जें जें कांही तूं करी । त्यांत समाधानाला द्यावें पुरी ।

आतां, रामा, एकच करीं । तुझा विसर न पडो अंतरीं ॥

तुझे नामाची आवडी । याहून दुजें मागणें नसावें उरी ॥

हेंचि द्यावे मला दान । दीन आलो तुज शरण ॥

रामा, मला एकच द्यावे । तुझें अनुसंधान टिकावें ॥

नको नको ब्रह्मज्ञान । काव्य-शास्त्र व्युत्पत्तीचें ज्ञान ॥

कामक्रोधाचे विकार । जाळताती वारंवार ॥

आतां तारीं अथवा मारीं । तुझी कास कधीं न सोडी ॥

आतां, रामा तुझा झालों । कर्तेपणांतून मुक्त झालों ॥

माझें सर्व ते तुझे पाहीं । माझें मीपण हिरोनि जाई ॥

रामा, आतां एकचि करी । वृत्ति सदा राहो तुझेवरी ॥

रामा, मी कोठें जावें ? । तुजवांचून कोठें राहावें ? ॥

देहबुद्धीची नड फार । ती करावी रामा तुम्ही दूर ॥

आजवर विषय केला आपलासा । न ओळखतां पडलों त्याच्या फांसा ॥

रामा सर्व सत्ता तुझ्या हाती । समाधान राहील अशी करावी वृत्ति ॥

तुझेजवळ मागणें दुजें नाहीं । हृदयांत तुझा वास अखंड राही ।

आतां तुझ्यासाठीं माझें जीवन । तुला तनमन केलें अर्पण ॥

तुमचें चिंतनीं लागावें मन । कृपा करा रघुनंदन' ॥

ऐसें करावें रामाचें स्तवन । रक्षणकर्ता एक भगवंत मनीं आणून ॥

ऐसें व्हावें अनन्य दीन । तात्काळ भेटेल रघुनंदन ॥

नामापरतें न माना दुजें साधन । जैसें पतिव्रतेस पति प्रमाण ॥

नामापरतें न मानावें सत्य । ज्यानें राम होईल अंकित ॥

हेच सर्व साधुसंतांचे बोल । कोणीही न मानावे फोल ॥

नामावर निष्ठा ठेवावी पूर्ण । मनीं असो, नसो, करावें नामस्मरण ॥

नामाविण दुजें काहीं । सत्य सत्य त्रिवार नाहीं ॥

३६५. नामाच्या संगतीं । ज्या व्यवहाराची प्राप्ति । तोच व्यवहार जाई । भगवत्सेवेप्रति ॥

29 Dec 2017

मीपणाचे विसर्जन करून सुखदुःखातीत राहावे.

भक्ति म्हणजे संलग्न होणे. विषयाकरिता आपण परमेश्वराची प्रार्थना वगैरे केली तर ती विषयाची भक्ति झाली, परमेश्वराची कशी होईल ? मीपणा आला की संकल्प उठतात, आणि संकल्पात्मक विषय तेच मनात येतात. मीपणा ठेवून परमेश्वराची पुष्कळ सेवा केली तरी तीत कमीपणा आहे. प्रपंचाचा त्याग करून, बैरागी होऊन मठ बांधला, पण मठाच्या बंधनात पडला ! देवाला दागिने घातले, का, तर त्याचे रूप आपल्याला चांगले दिसावे म्हणून ! चांगल्या कृत्यांतसुद्धा मी कसा लपून बसलेला असतो बघा ! थोडक्यात म्हणजे, मीपणाचे विसर्जन केले पाहिजे. साधू कर्तेपण परमेश्वराला देतात. वास्तविक आपण कर्ते आहोत कुठे ? आपण कर्ते म्हटले, परंतु मग आपल्या इच्छेप्रमाणे गोष्टी घडतात कुठे ? पण नसलेले कर्तेपण आपल्याकडे ओढून घेऊन माणूस सुखी किंवा दुःखी होतो. ज्याच्याकडे कर्तेपण आहे त्याला ते देऊन आपण सुखदुःखातीत राहावे. 'हे सर्व ईश्वराचे आहे' हेच सार वेदश्रुती सांगतात. "हे सर्व रामाचे असून तोच सर्वांचा कर्ता आहे" असे संत सांगतात; दोघांचेही सांगणे एकच. अशी भावना ठेवल्यावर सुखदुःख भोगावे लागणार नाही. मी कर्ता नसून राम कर्ता ही भावना वाढविणे, हीच खरी उपासना. मी काही नाही, कोणीतरी बाहुली आहे, असे समजावे. एक भगवंत तेवढा माझा, असे म्हणावे.

संताजवळ आसक्ति जरी पुरती सुटली नाही तरी नकळत कमी होत असते. म्हणून आपण नेहमी सत्समागमात असावे. संगत आणि अभ्यास यांचा आपल्या मनावर फार चांगला परिणाम होतो. आपण हातात काठी घेतली तर उगीच कुणाला मारावेसे वाटेल; ही झाली काठीची संगत. आपण हातात माळ घेतली तर त्याने जपच करू, माळेने काही आपण कुणाला मारणार नाही. आपल्या पोषाखात, वागण्यात, बोलण्यात, सर्व ठिकाणी संगत आपल्यावर परिणाम करते; म्हणून संताचा सहवास नेहमी ठेवावा. गाय जशी वासरामागून येते, तसे संत नामामागून आलेच पाहिजेत. ते नाम घेणाऱ्याला धुंडाळीत येतील, आणि त्यांच्या मागोमाग भगवंत अर्थात् आलाच म्हणून समजा. दवाखान्यात गेलेला रोगी जसा डॉक्टरच्या स्वाधीन असतो, तसे आपण संताच्या घरी गेल्यावर त्यांच्या स्वाधीन होतो. म्हणून संतांच्या संगतीत आपण गेलो की आपले कर्तृत्व संपले, असे मानले पाहिजे. सत्संगतीने साधकाची वाढ होते. संतांना ओळखण्यासाठी अनुसंधानाशिवाय दुसरे साधन नाही. संतांना भक्तिचे व्यसन असते. ते नेहमी नामात असतात. संत हे भगवंतावाचून दुसरीकडे राहिलेच नाहीत; म्हणून ते संत झाले, म्हणजे देवस्वरूप बनले. भगवंताचे नाम सिद्ध करून देणे हाच संतांचा जगावर सर्वात मोठा उपकार होय. प्रापंचिक लोकांना परमार्थाला लावावयाला संसारी संतच खरा उपयोगी पडतो.

३६४. सर्व काही रामाचे आहे असे समजणे म्हणजेच सर्वस्व रामास अर्पण करणे आहे.

28 Dec 2017

वैदिक कर्माच्या जोडीला भगवंताचे नाम घ्यावे. 


[ गायत्रीपुरश्चरण झाल्यावर वैदिक ब्रह्मवृंदासमोर झालेले प्रवचन. ] 

तुम्ही वेदविद्या जाणणारे सर्वजण मोठे ज्ञानी, भाग्यवान, आणि पूज्य आहांत. इतकी वर्षे वेदविद्या तुम्ही जतन करून ठेवली हे तुमचे फार मोठे उपकार आहेत. तुमची योग्यता खरोखर मोठी आहे ! त्याच्या उलट माझी स्थिती आहे. मी एक अज्ञ मनुष्य आहे. मला वेदविद्येचा गंध नाही, ग्रंथांचे ज्ञान नाही. मी रामरायाचा एक दीन दास आहे. त्याच्या नामावर माझे प्रेम आहे. माझे म्हणणे आपण प्रेमाने ऐकून घ्यावे.

वेदांनी गायत्री अत्यंत पूज्य मानली आहे हे बरोबर आहे, कारण गायत्री उपासनेमध्ये विलक्षण सामर्थ्य साठविलेले आहे. गायत्रीची उपासना करणाऱ्या माणसाच्या अंगी खरे वैराग्य आणि पावित्र्य असावे लागते. पूर्वीचे ऋषी जनपदापासून दूर अशा अरण्यामध्ये आश्रम बांधून राहात असत. कंदमुळे हा त्यांचा आहार असे, इंद्रियसंयम हा त्यांचा मुख्य आचार असे. सत्य हेच त्यांच्या वाणीचे भूषण असे. काम, क्रोध, आणि लोभ जिंकलेले विरागी ऋषी ही गायत्रीची उपासना करायला खरी योग्य माणसे होती. परंतु आता काळ पालटला आहे. ज्या प्रकारचे जीवन ऋषिलोक जगत असत, त्यापैकी आपणाजवळ आता काहीच शिल्लक उरलेले नाही. ऋषींचे राहणे, खाणे, पिणे, इंद्रियसंयम, सत्यनिष्ठा यापैकी आपल्याजवळ काय शिल्लक उरले आहे ? त्याकाळी ऋषींनी पर्जन्यसूक्त म्हटले की पाऊस पडत असे, आणि तेच सूक्त आज म्हटले तर साधा वारादेखील सुटत नाही. ऋषींच्या अंगी तपश्चर्येचे सामर्थ्य होते, म्हणून त्यांच्या आशीर्वादाला जशी किंमत होती तशी त्यांच्या शापालादेखील होती. जीवनाबद्दल पूर्वी असणारी निष्ठा आज बदलली आहे. सध्या परिस्थिती अशी आहे की, वैदिक कर्मावरची श्रद्धा लोकांमध्ये पूर्ववत् राहिलेली नाही, आणि वैदिक कर्मे यथासांग घडणे कठीण होऊन बसले आहे. अशा स्थितीत, आपल्याला शक्य आहे तितके वैदिक कर्म करावे, परंतु चित्तशुद्धी होण्यासाठी त्यावर पूर्णपणे विसंबून न राहता त्या कर्माच्या जोडीला भगवंताचे नाम घ्यावे. सध्याच्या परिस्थितीत संयमाची बंधने सुटत चालली, म्हणून संतांनी कळवळून 'नाम घ्या' असे सांगितले. नाम हे आगंतुक नाही. आदि-नारायणाने वेद सांगण्याच्या वेळी जो 'ॐ' चा ध्वनी केला, ते नाम होय. म्हणून आपणा सर्वांना माझी विनंती अशी की, आपण नाम घेत जावे. किंबहुना आपण नाम घेतले तरच वेदांचा खरा अर्थ कळेल अशी माझी खात्री आहे .

३६३ वैदिक कर्मांना आहाराविहाराची बंधने आहेत. भगवंताच्या नामाला ती नाहीत.

27 Dec 2017

भगवंताचे प्रेम कसे उत्पन होईल ते पाहावे.

चमत्कार करता आले म्हणजे ब्रह्मज्ञान झाले असे म्हणता येणार नाही. संतांचे दर्शन झाले, पण त्याच्या आजूबाजूचे लोक पाहिले तर वाईट दिसतात. आपण दवाखाना पहायला गेलो तर निरोगी लोक आपल्याला तिथे कसे दिसतील ? आमची प्रपंचाची नड संताने दूर करावी, हे म्हणणे चुकीचे नाही का ? ती दूर करण्याकरिता प्रापंचिकाकडे जावे, संताकडे नव्हे. आता, दुखणे बरे व्हावे म्हणून जरी 'राम राम' म्हटले, तरीसुद्धा ते वाया जात नाही. सत्पुरुषांचे अत्यंत उपकार असतील तर रोगाचे निदान काय अहे ते त्यांनी शोधून काढले. आपल्याला हवेपणाचा रोग झाला आहे ! हवेनकोपण जिथे आहे, तिथे समाधान नाही हे खास. आपल्या भजन-पूजनाचा हेतू कोणता असेल ? तो समजून भजन-पूजन करा म्हणजे झाले ! आज भगवंत हवा असे म्हणणारे लोक थोडेच आहेत; आणि ज्यांना भगवंत हवा असतो तो भगवंतासाठी नको असतो, तो त्यांच्या प्रपंचासाठी हवा असतो. ज्याला भगवंताकरताच भगवंत हवा, त्याला समाधान खास मिळेल. त्याला कशाचीही अट नाही. त्याला वयाची मर्यादा नाही. विद्येची नाही, बुद्धीची नाही, पैशाची नाही, कशाचीही नाही; तळमळीची मर्यादा आहे.

खरोखर परमार्थ हा अनुमानाचा नाही. आपण नुसते बोलतो, कृति काहीच करीत नाही, म्हणून तो आपल्या आवाक्याबाहेर आहे असे आपल्याला वाटते. न करायला सबबी पुष्कळ सांगता येतात. अर्जुनाला भगवंतांनी युद्धाला उभा राहा म्हणून सांगितले. अर्जुन सबबी सांगू लागला. देवास फार वाईट वाटले. देहबुद्धीमुळे, अभिमानामुळे, भगवंताच्या आज्ञेला सबबी येतात. व्यवहारात सबबी सांगण्याची आम्हाला फार सवय झाली आहे. प्रयागला मुलगी आजारी पडली तर मनुष्य लगेच तिकडे जातो, आणि काशीस जायचे तर, योग येत नाही असे म्हणतो ! आज्ञेला सबब सांगणे हे मोठे पाप आहे. एखाद्या सावकाराला सांगितले की तुझ्याजवळचे सर्व काही देऊन टाक, तर तो कदाचित् देईलही; पण 'मी' दिले, ही आठवण नाही जाणार त्याची. जो द्यायला सांगतो तोच दाता असतो, हे तो विसरतो.

व्यापार्‍याला स्वप्न व्यापाराचेच पडते, त्याप्रमाणे आपण ज्याचा सहवास करावा त्याचे प्रेम येते. भगवंताविषयी प्रेम कसे उत्पन्न होईल ते पाहावे. सहवासाने, निश्चयाने, किंवा आपलेपणा विसरल्याने, परमेश्वराचे प्रेम येते. पुष्कळ दिवस एका घरात राहिल्याने त्या घराविषयी नाही का आपल्याला प्रेम येत ? मुंबईत राहणार्‍याला मुंबई आवडते, याचे कारण सहवास. गांजा प्रथम ओढताना जरी ओकारी आली, तरी सवयीने त्याचे प्रेम येऊ शकते. नापसंत नवर्‍याशी जरी लग्न झाले, तरी मुलगी निश्चयाने त्याच्यावर प्रेम करायला शिकते; म्हणजेच प्रेम निश्चयाने येऊ शकते. राम आपल्या हृदयात आहे ही भावना ठेवू या. 'रामाहून मी वेगळा नाही, आणि तो माझ्या हृदयात आहे.' असा दृढ निश्चय करून ही भावना वाढविली पाहिजे.

३६२. आपले प्रेम प्रपंची लावले आहे, ते रामनामी लावायला पाहिजे.

26 Dec 2017

मन स्वाधीन होण्यासाठी मनापासून नाम घ्या.

जगात आजपर्यंत पुष्कळ लोकांनी दानधर्म, स्वार्थत्याग केला, पण त्यांच्यामध्ये कर्तेपणाची जाणीव राहिल्याने खऱ्या अर्थाने त्यांना निःस्वार्थी बनता आले नाही. खरे म्हणजे, आमचे मन आमच्या ताब्यात आल्याशिवाय आम्हाला निःस्वार्थी बनता येणार नाही. मन कोणत्या साधनाने आम्हांला आवरता येईल ? योग, याग इत्यादि साधने त्यासाठीच सांगितली आहेत, पण ही साधने या काळात आम्हाला करता येण्यासारखी आहेत का ? ह्या साधनांसाठी लागणारी काळाची अनुकूलता आपण राहतो त्या परिस्थितीत आपल्याजवळ खास नाही. मन ताब्यात यायला सध्याच्या काळात नामस्मरणाशिवाय दुसरे साधनच नाही. कारण आज एक नामच भगवंताने अवताररूपाने आमच्यासाठी शिल्लक ठेवले आहे. तेव्हां, मन स्वाधीन होण्यासाठी सर्वांनी मनापासून नाम घ्या. नाम घेत असताना, मनाचे स्थैर्य बिघडविणारे जे विकार आहेत त्यांना आवरण्याचा प्रयत्‍न करा. मनाला सर्वांत मोठा विकार बाधत असेल तर तो म्हणजे अभिमान. ह्या अभिमानासारखा आपला घात करणारा दुसरा शत्रू कोणी नसेल. तो अभिमान सोडायला आपण शिकले पाहिजे. भगवंताने आजपर्यंत एवढे अवतार घेतले ते सर्व अभिमान मारण्यासाठीच होते. हिरण्यकश्यपूच्या वेळी भगवंताने अवतार घेतला' पण देव समोर उभे असतानासुद्धा त्याचा हात नमस्काराकडे न जाता तरवारीकडे गेला ! यावरून त्याचा अभिमान किती तीव्र असेल याची कल्पना येईल. तो अभिमान नाहीसा करण्यासाठी आपण कर्तेपणाची जाणीव सोडून नाम घेतले पाहिजे.

मनाची स्थिरता बिघडवणारा दुसरा शत्रू म्हणजे राग. हा राग फार भयंकर असतो. मोठमोठ्या तपस्वी लोकांची तपश्चर्या याने धुळीस मिळविली आहे. हा राग आवरण्यासाठी, आपल्याला राग कशामुळे येतो हे नीट समजून घेतले पाहिजे. व्यवहारात आपल्याला नीतीची बंधने घालून दिली आहेत, ती सर्व आपण पाळली पाहिजेत. नीतीच्या बंधनात राहणाऱ्या माणसाचे विकार आपोआप आवरले जातील. ही बंधने कशासाठी घातली आहेत याचे मर्म समजून घेऊन वागले तर राग आवरता येईल. आणि राग आवरला म्हणजे त्याच्या पोटात लपून बसलेले, काम, क्रोध, मोह, इत्यादि विकारांनाही पायबंद पडेल. याप्रमाणे नीतीच्या बंधनात राहून तुम्ही आपले मन भगवंताकडे विनम्र करा. भगवंताकडे जाऊ लागा, मन आपोआप तुमच्या मागे येईल, कारण तो त्याचा धर्म आहे. भगवंताला विसरू नका. तुमचे मन तुम्हाला आपण होऊन साहाय्य करील याची खात्री बाळगा.

३६१. नाम सुरुंगाप्रमाणे आहे. विकाररूपी मोठाले खडक ते फोडून टाकते.

25 Dec 2017

भगवंताचे स्मरण हेच प्रत्येक साधनाचे मर्म.

एका गावाहून दोन सरकारी बैलगाड्या निघाल्या. एका बैलगाडीत सोन्याची नाणी असलेल्या पिशव्या होत्या, आणि दुसऱ्या गाडीत बांधकामाचे दगड होते. सबंध दिवसभर प्रवास करून त्या बैलगाड्या तालुक्याच्या ठिकाणी पोचल्यावर गाडीवानांनी गाड्या सोडल्या, सोने आणि दगड अधिकाऱ्यांच्या हवाली केले आणि दोन्ही गाड्यांच्या बैलांना कडबाच घातला. तसे, भगवंताच्या दृष्टीने, विद्वान आणि अडाणी दोघेही सारखेच. सुंदर विचारांचा भार डोक्यात वागवला म्हणजे विद्वानाला भगवंत जवळ होतो असे मुळीच नाही. विद्वान काय किंवा अडाणी काय, दोघांनाही बुडविण्याइतका अभिमान प्रत्येकाजवळ असतो; विद्वानाला अभिमान जास्त मारक होतो, इतकेच. विद्येला जगात किंमत आहे, पण ती साधनरूप आहे; साध्यरूप नाही. विद्या ही भगवंताची दासी बनली पाहिजे. पुष्कळ वेळा विद्वान लोक व्यर्थ चिकित्सेने आपल्या आयुष्याचा नाश करून घेतात. साधेभोळे अडाणी लोक भगवंताचे नाम घेऊन मजेने तरून जातात, पण हे विद्वान लोक, भगवंत कसा आहे, त्याचे गुण काय आहेत, त्याचा आणि आपला संबंध काय आहे, त्याचे नाम त्याच्यापर्यंत पोहोचते की नाही, नामाची सुरुवात केव्हापासून झाली, नाम कोणत्या वाणीने घ्यावे, इत्यादि गोष्टींची चिकित्सा करीत बसतात. आणि ती इतकी करतात की, शेवटी आयुष्याचा अंतकाल येतो, आणि नामाची चिकित्सा तेवढी पदरात पडते. नाम घेण्याचा आनंद मिळत नाही. म्हणून शहाण्या विद्वानाने, चिकित्सा करायचीच तर नाम घेत करावी.

ज्याच्या अंगी मीपणा आहे, त्याने चूक केली तर भगवंत त्याचे प्रायश्चित्त देतो. पण ज्याच्या अंगी मीपणा नाही त्याच्या हातून चूक घडली तर भगवंत ती सांभाळून घेतो. समजा आज आपल्या हातून चूक झाली, अगदी अजाणतेपणाने झाली, तरी आपण जर पश्चात्ताप पावून भगवंताला शरण गेलो तर खात्रीने तो क्षमा करतो. आपण आपले मागले घडलेले सर्व भगवंताला अर्पण करावे, मग पुढची जबाबदारी त्याच्यावर पडते.

प्रत्येक भक्ताने साधनाचे कष्ट स्वतःच सोसले पाहिजेत. कितीही मोठा गुरु असला तरी त्या बाबतीत तो काहीच करू शकत नाही. फार तर त्या कष्टाची त्याला जाणीव होऊ देणार नाही. आपले मन आपणच आवरले पाहिजे, आणि आपल्या वृत्तीला आपणच वळविले पाहिजे. साधन करीत असताना येणाऱ्या अवस्था आपण शांतपणे सोसल्याच पाहिजेत. भगवंताकडे जायची साधने पुष्कळ आहेत. इतर साधनांनी कष्ट करून जे साधते तेच थोडे नाम घेतल्याने साधते. पण नामावर तशी श्रद्धा मात्र पाहिजे. प्रत्येक साधनाचे मर्म म्हणजे भगवंताचे स्मरण होय. त्याचा पूर्णपणे समावेश भगवंताच्या नामात आहे. म्हणुन ज्याला लवकर भगवंत गाठायचा आहे त्याने एका नामाची कास धरावी.

३६०. नामाबद्दलच्या सर्व शंका नाम घेत गेल्याने आपोआप नाहीशा होतात.

24 Dec 2017

काळजी करायची तर नामाची करा.

आपण असे पाहतो की आज जे दुःखाचे वाटते तेच पुढे सुखाचे होते, आणि जे सुखाचे आहे असे वाटते तेच पुढे दुःखाला कारणीभूत होते. तुम्हांला जे सुखदुःख येते ते भगवंतापासून येते म्हटले, तर दुःखाचे कारण काय ? जोपर्यंत परक्याने दिलेले दुःख भगवंतानेंच दिले असे वाटत नाही, तोपर्यंत आपण भगवंताचे झालो नाही. आपण घाबरतो केव्हां, तर आपला आधार सुटला म्हणजे, जे जे होते ते रामाच्या इच्छेने होते असे समजावे. संकटे देवाने आणली तर ती सोसण्याची शक्तीही तोच देतो. समर्थांचे होऊन असे भ्यावे का ? समर्थांचे जे झाले त्यांनी परिस्थितीला नाही डगमगू. प्रत्यक्ष संकटाचे निवारण जर करता येते, तर मग भिती कशाची धरावी ? मुळात जी भिती नाही ती तुम्ही मनाने निर्माण करता याला काय म्हणावे ? खेळातली सोंगटी मेली म्हणजे त्याचे सुख-दुःख कोणी करतो का ? तसे व्यवहारात आपण वागावे. सुखाने हुरळून जाऊ नये आणि दुःखाने अस्वस्थ होऊ नये. असे व्हायला आपले मन शांत राहणे जरूर असते. जोपर्यंत 'मी कर्ता आहे' अशी भावना असते, तोपर्यंत सुखदुःखाचे हेलकावे मनाला बसतात. म्हणून कर्तेपण रामाकडे द्यावे, आणि देहाने कर्तव्यात राहून मन शांत ठेवावे. 'परिस्थितीचा परिणाम माझ्या मनावर घडू देऊ नको देवा' असे म्हणावे, 'परिस्थितीच बदल' असे देवाला म्हणू नये.

ज्याप्रमाणे एखादे विष रक्तात मिसळावे, त्याप्रमाणे काळजी आपल्या अंगात भिनली आहे. त्याला वरून औषध लावले तर उपयोग होत नाही. ह्यासाठी भगवंताच्या अनुसंधानाचे इंजेक्शनच पाहिजे. जे दुर्गुण भगवंताचा विसर पाडायला कारण होतात, त्या सर्वांचा संग्रह म्हणजे काळजी होय. काळजी हा फार मोठा रोग आहे. पोटात रोग वाढला आणि त्यानेच पोट भरले की रोग्याला अन्न जात नाही. त्याचप्रमाणे, ज्याला काळजी फार, त्याच्या हृदयात आनंद जाऊच शकत नाही. या काळजीचे आईबाप तरी कोण ? देहबुद्धीमुळे आपल्याला काळजी लागते. देहबुद्धी म्हणजे वासना. वासना आणि अहंकार हे काळजीचे आईबाप आहेत. अशा और स्वभावाचे आईबाप असल्यावर पोर असे विचित्र असायचेच ! भगवंताचे स्मरण करीत गेल्याने आईचा आणि मुलीचा मृत्यू बरोबर घडून येतो; वासना आणि काळजी दोघीजणी एकदम मरतात. खरे म्हणजे, एकच स्थिती कधी कायम राहात नाही म्हणून आपल्याला भिती वाटते, आणि तिच्यातून काळजी उत्पन्न होते. काळजी जितकी आपल्याला मारते, तितकेच नाम आपल्याला तारते. तरीसुद्धा आपण काळजीलाच पकडून बसतो, याला काय म्हणावे ? आपला जेवढा वेळ काळजीत गेला तेवढा वाया गेला असे समजावे. काळजी करायचीच असेल तर अनुसंधान कसे टिकेल याची करा.

३५३. नामाची काळजी घ्या, म्हणजे काळजी करायची वेळच येणार नाही.