एका भक्ताने महाराजांना नाम कोणत्या वाणीने घ्यावे असा प्रश्न विचारला यावर महाराजांनी एक गोष्ट सांगितली " एक मोठा गणिती एकदा खेडेगावात गेला. सकाळी गावच्या बाजारामध्ये तो भाजी आणायला गेला. त्याला बटाटे घ्यायचे होते ,एका बाईने बटाट्याचे पंधरा वीस वाटे विकायला ठेवले होते, आणि " बटाटे घ्या, एक आणा वाटा " असे ती ओरडत होती. गणिती तिच्याजवळ गेला व म्हणाला " ए बाई बटाट्याचा मणाचा भाव काय ?" ती म्हणाली " ते मला माहित नाही , हा मी एक आण्याचा वाटा लावला आहे, तुला पाहिजे असला तर घे नाहीतर चालू लाग," या उत्तराने त्याचे समाधान झाले नाही तो मनात म्हणाला 'मणाचा भाव कळल्याशिवाय या बाईने केलेले वाटे बरोबर आहेत कि नाही हे अचूक कळणार नाही' म्हणून तो पुढे गेला. दोनतीन तास झाले तरी त्याने भाजी काही घेतली नाही.पण त्या बाईने मात्र तासाभरात आपले वाटे विकले व आनंदाने ती घरी निघून गेली". महाराज पुढे म्हणाले " विद्वान लोक आपल्या आयुष्याचा अशा व्यर्थ चीकीत्सेने नाश करून घेतात,साधे भोळे ,अडाणी लोक भगवंताचे नाम घेवून मजेने तरुन जातात, विद्वान लोक 'भगवंत कसा आहे,त्याचे गुण काय आहेत ? त्याचा व आपला संबध काय आहे ? त्याचे नाम त्याच्यापर्यंत पोचते कि नाही ? नामाचे प्रकार काय, त्याची सुरवात कधीपासून झाली ? नाम कोणत्या वाणीने घ्यावे परा, पश्यंती, मध्यमा कि वैखरी ? वगैरे गोष्टीची इतकी चिकित्सा करतात कि शेवटी आयुष्याचा अंतकाल येतो, आणि नामाची चिकित्सा तेवढी पदरात पडते नाम घेण्याचा आनंद काही मिळत नाही म्हणून शहाण्या माणसाने प्रथम नाम घ्यावे नंतर चिकित्सा करावी.
https://m.facebook.com/girish.atre.7
No comments:
Post a Comment