23 May 2025

अमृतधारा 901 TO 1108

 अमृतधारा  ९०१


मनुष्य जन्म हा शांती मिळविण्यासाठीच आहे. शांती या जन्मात खात्रीने मिळेल. ज्याने आपली शांती बिघडते त्याचा सहवास सोडून द्यावा.


वस्तु सोडून दिली किंवा सोडून गेली तरी तिचा सहवास नाहीसा होत नाही. वास्तुच्या आसक्तीमध्ये तिचा सहवास आहे.


वस्तुचा सहवास सोडण्यास त्या वस्तुबद्दलची आसक्ती आपण सोडली पाहिजे. ही आसक्ती सुटण्यासाठी भगवंताचे नाम सतत घेण्याची जरुरी आहे.


वस्तु येणे आपल्या हातात नाही आणि ती जाणे पण आपल्या हातात नाही. मग व्यवहारात कसे वागावे? सगळे कुणाला देऊन टाकले तर व्यवहार बिघडतो आणि सगळे ठेवले तर आसक्ती वाढते.


म्हणून आपल्याला पैसे पुष्कळ मिळाले ते भगवंताच्या इच्छेने आले म्हणून जवळ ठेवावे आणि यदाकदाचित ते गेले तर भगवंताच्या इच्छेने गेले असे समजून आपले समाधान बिघडू देऊ नये.


आशीर्वाद.

💧🌷🌼

   🌼💧श्रीराम समर्थ💧🌼


अमृतधारा  ९०२


आसक्ती सुटण्यासाठी भगवंताच्या उपासनेची गरज आहे. व्याप वाढवून त्यात आपण गुंतत जातो म्हणून आसक्ती सोडणे कठीण जाते.


कोणतीही गोष्ट करीत असताना ती कृती परमात्मा पाहत आहे या भावनेने करावी. अशा भावनेने सर्व कृती नेहमी करीत गेल्यास अनासक्ती आपोआप उत्पन्न होईल.


मनुष्याच्या वागण्यामध्ये असा निरभिमानीपणा असावा कि त्याच्या वागणुकीत तो कोण आहे हे कळले पाहिजे. भगवंत कर्ता आहे असे अनुसंधान जो रात्रंदिवस ठेवील त्याचाच अहंकार जाईल हे ध्यानात ठेवून आपण सतत भगवंताचे नाम घ्यावे.


आहे तितुके देवाचे | ऐसे वर्तणे निश्चयाचे |

मूळ तुटे उद्वेगाचे | येणे रीती || दास.


जे जे काही माझे  ते जाणावे रामाचे 

राम त्यास सांभाळिता  काळजीस कारण नुरले आता 


आशीर्वाद.

🌼🌷💧

   🌸💧श्रीराम समर्थ💧🌸


अमृतधारा  ९०३


आळसाने कृती न करणे जितके घातक आहे तितकेच कृती करण्याची आवड असणे घातक आहे. अमुक एक कार्य व्हावे असे वाटणे पाप नाही.


पण ते माझ्या हाताने व्हावे किंवा माझ्या हयातीत व्हावे किंवा अमुक रीतीने व्हावे असे वाटणे हे अभिमानाचे लक्षण आहे. जो आपल्या प्रवृत्ती आवरतो तो खरा बळकट, शक्तीशाली पुरुष होय.


आपल्या घरातले वातावरण कसे शुद्ध आणि पवित्र असावे. आपल्याकडे येणार्‍या माणसाला परत जाऊ नये असे वाटावे.


जगातले अजिंक्य पुरुष कुठे तरी विषयात गुंतलेले असतात. तिथे त्यांचा घात होतो. जगाला तो भारी असतो. पण जिथे तो गुंतला असतो तिथे त्याचे काही चालत नाही.


भगवंताचा आनंद मिळाला नाही तरी हरकत नाही. पण विषयामध्ये कायम टिकणारे सुख नाही एवढी खात्री झाली तरी पुष्कळ काम होईल. त्यामधुनच भगवंताचा आनंद उत्पन्न होईल.


आशीर्वाद.

🌸💧☘

   🌼💧श्रीराम समर्थ💧🌼


अमृतधारा  ९०४


आपल्याला जसे आपल्या घराचे प्रेम असते, तसे बुवालाही आपल्या मठाचे असेल तर या शेणामातीच्या प्रेमाने दोघेही बुडतील. प्रेम मठाचे आहे म्हणून बुवा काही तरणार नाही.


प्रेमात गुंतू नका तसे द्वेष, मत्सरातही गुंतू नका. आपण ज्याच्यावर कोर्टात खटला भरला आहे तो भाऊबंद मेला किंवा प्रिय नातेवाईक मेला दोघांचेही सुतक सारखेच. त्याप्रमाणे मनुष्य द्वेषाने गुंतला काय किंवा प्रेमाने गुंतला काय, पारमार्थिक दृष्टीने नुकसान सारखेच होते.


काम क्रोधादि सर्वच विकार भगवंताच्या आड येतात. पण द्वेष व वैर भडकले की भगवंताच्या भक्तीचा कोंब जळून जातो. करपून जातो.


म्हणून काय वाटेल ते झाले तरी साधकाने आपल्या अंतःकरणात द्वेषाला थारा देऊ नये. निर्वैर झाल्याशिवाय भगवंताची प्राप्ती नाही.


हे जर खरे तर दुसऱ्याचा द्वेष करून कसे चालेल. वैराचे, द्वेषाचे विचार येऊ लागले की नामस्मरण करावे.


आशीर्वाद.

☘🌼🌷

   ☘🌷श्रीराम समर्थ🌷☘


अमृतधारा  ९०५


सुख दुःख ज्याचे त्यालाच भोगावे लागते. ते कोणाचे कोणाला देता येत नाही किंवा घेता येत नाही. खरे सुख कायम टिकणारे पाहिजे, जे फक्त भगवंताच्या प्रेमात आहे. ते नामाने साधते.


नवरा बायकोचे ध्येय एक असेल तर प्रपंच बहुतांशी सुखाचा होईल. आपण आईबाप, नवराबायको, मुलें, नातेवाईक, शेजारीपाजारी यांचेवर सुखासाठी अवलंबून राहिलो तर आपण सुखी होणार नाही.


आपले दुःख वा यातना कोणी नाहीशा करु शकत नाही आणि घेऊ पण शकत नाही, तर मग दुसरा कोणी आपणास सुख देईल ही कल्पना कशी खरी ठरेल?


दुसऱ्यापासून सुख मिळविण्याची कल्पना करणारा मनुष्य प्रापंचिक होय. नाम घेत भगवंताच्या प्रेमात सुख मिळविण्याचा प्रयत्न करणारा माणूस पारमार्थिक होय.


दुसऱ्यांच्या प्रपंचाचा आपण विचार करू नये. कारण आपल्याजवळ जे नाही ते त्याचेजवळ आहे म्हणून तो सुखी आहे असे आपल्याला वाटते. पण तो खरा सुखी नसतो, कारण त्याचे दुःख आपल्याला माहीत नसते.


आशीर्वाद.

💧☘🌷

   💧🌷श्रीराम समर्थ🌷💧


अमृतधारा  ९०६


आपण आचरणाने शुद्ध राहून भगवंताच्या स्मरणात राहिलो असता आपल्याला प्रपंचाचे जे तडाखे बसतात ते परमार्थाच्या दृष्टीने फायदेशीर होतात.


आपल्या पोटच्या मुलीचे सुद्धा तिचे लग्न झाल्यावर आपल्याकडे काही दिवसाने दुर्लक्ष होते. याचा अर्थ इतकाच तिचे पूर्वीचे आपल्यावरील प्रेम टिकत नाही.


व्यवहारात जर असे दिसते तर ज्यांचे लक्ष परमार्थाकडे लागले ते लोक प्रपंचाकडे लक्ष देत नाहीत याचे वाईट कां वाटावे?


आहे त्या परिस्थितीत समाधान मानणे हाच विषयाची पकड ढिली होण्याचा उपाय आहे. आपली परिस्थिती ही परमात्म्याच्या इच्छेने आली आहे असे आपण म्हणुया. असे आपण केले की दुःखाचा आणि सुखाचाही आवेग कमी होईल.


प्रपंच समाधानाचा करायचा असेल, विषयात शांति पाहिजे असेल तर प्रेमयुक्त आणि द्वेषरहित राहून निस्वार्थी बुद्धीने (श्री ना आवडेल असे ) वागले पाहिजे. असा प्रपंच ज्याने केला त्याचा अंतःकाळ नक्कीच गोड होणार यात शंका नाही.


आशीर्वाद.

💧🌷☘

, 💧🌷श्रीराम समर्थ🌷💧


अमृतधारा  ९०७


प्रापंचिक लोक म्हणतात की विषयाचा अनुभव तात्काळ येतो, पण भगवंताचा अनुभव हा अनुमानाचा आणि श्रद्धेचा आहे. हे त्यांचे म्हणणे मला पटते.


प्रापंचिक लोक प्रपंच सोडत नाहीत याचे मला नवल वाटत नाही. पण ते सुख चिरकाल टिकणारे आहे ही समजूत करून घेऊन त्यामधे रमतात याचे मला नवल वाटते.


मी असे म्हणतो कि, जे तुमच्या अनुभवाप्रमाणे खरे आहे तेवढेच तुम्ही खरे माना. पण ते तुम्ही करीत नाही. विषयाचा  स्वभाव ज्याला कळला, त्याला विषयाच्या प्रेमाचा उमाळा नाही आणि कृती करुनही आसक्ती नाही.


विषय सोडून सुटत नाही म्हणून तो सोडण्याच्या भानगडीत न पडता आपण भगवंताचा ध्यास ठेवावा. जसा आपला ध्यास तशी आपली आस, आणि जशी आपली आस तशी आपली प्राप्ती असते.


भगवंताचा आनंद बाहेरून आणायचा वा मिळवायचा नसून तो आपल्या मधेच उत्पन्न होणारा आहे.


आशीर्वाद.

🌷☘🌼

   💧🌼श्रीराम समर्थ🌼💧


अमृतधारा  ९०८


मनुष्याने असा विचार करावा की, मला मागून पाहिजे ते मिळत नाही, मग मी मागावे तरी कां?आतापर्यंत जे मागितले, त्यापैकी जे मला मिळाले त्याने मी सुखी झालो का?


सध्या माझी परिस्थिती बरी नाही म्हणून मी दुःख करतो. पण पूर्वी परिस्थिती बरी असताना मी सुखी होतो का? माझे जीवन देखील जेथे माझ्या हातात नाही, तेथे हे किंवा ते मी मागू तरी कशाला?


आपली प्रपंचातली आवड निवड इतकी दृढ झाली आहे की ती आज आपण काढु शकत नाही. ती कमी होण्यासाठी पहिली पायरी म्हणजे आपल्याला जे पाहिजे असेल ते ते देवाजवळ मागावे.


आपण मागितलेले कधी आपणास मिळेल व कधी मिळणार नाही. न मिळाल्याचे पहिल्याने आपल्याला दुःख होईल हे खरे. पण भगवंतानेच दिले नाही, ही भावना झाल्यावर दुःख कमी होईल.


मागितले ते भगवंताने न देण्यामध्येच आपले हित आहे ही भावना होईल. ही भावना दृढ होणे ही दुसरी पायरी होय.


आशीर्वाद.

🌷💧☘

   💧🌷श्रीराम समर्थ🌷💧


अमृतधारा  ९०९


आपण मागितल्यावर देव देतोच असे नाही. जे फक्त आपल्या हिताचे असेल तेच भगवंत आपल्याला देतो. ही गोष्ट जर खरी असेल तर आपण मागावेच कशाला?


त्यामुळे भगवंत जे देईल ते आपल्या हिताचेच असते, अशी आपली वृत्ती बनेल. ही वृत्ती बनणे म्हणजेच आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान ठेवणे होय. ही शेवटची पायरी समजावी.


यातील पहिली पायरी (जे हवे ते देवाजवळ मागावे) आपल्या आचरणात येण्यास आपले बाह्य गोष्टींवरील लक्ष थोडे तरी  कमी केले पाहिजे.


जो भगवंताचे अनुसंधान ठेवील त्यालाच हे साधेल. म्हणून प्रत्येकाने सतत नामात राहावे. दुसऱ्याने आपल्याला दुःख दिले असता आपले अनुसंधान चुकते ही त्याची नव्हे, आपली चूक आहे.


एखाद्या माणसाने आपल्याला शिवी दिली तर त्याला उलट शिवी देणे ही चूक आहे. आपले समाधान न ढळू देता शत्रुच्या थोबाडीत मारावी. कोणीही वाईट कर्म केले तर त्याचा प्रतिकार करावा. पण त्याचा द्वेष करू नये.


आशीर्वाद.

💧🌷🌼

   🌷💧श्रीराम समर्थ💧🌷


अमृतधारा  ९१०


देवावर निष्ठा ठेवावी व अगदी व्यवहाराप्रमाणे वागावे. आपल्या शक्तीच्या बाहेर काहीही करू नये.


आपण एखादा व्यापार केला तर त्यामधले निव्वळ उत्पन्न हाच खरा नफा असतो. प्रपंचातला खरा नफा म्हणजे "आपले भगवंताकडे किती लक्ष लागले" हा होय.


भगवंताला अशी प्रार्थना करावी की "भगवंता, तुझ्या इच्छेने वागण्याची बुद्धी मला दे. माझे हित  मला कळत नाही".


जी आपली उपासना तीच सर्व ठिकाणी पहावी. एवढी उपासना करावी की त्यामुळे स्वतःचा विसर पडावा. कर्तव्य भगवंताच्या स्मरणात बिनचूक करावे.


उपासना करताना आपल्या हृदयात परमात्मा वास करतो ही भावना वाढवावी. घडणारी प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेने घडते अशी भावना कायम ठेवणे म्हणजे भक्ती करणे होय.


आशीर्वाद.

🌷🌼💧

   🌼🌷श्रीराम समर्थ🌷🌼


अमृतधारा   ९११


भक्तीमध्ये या जगातल्या आपल्या कर्तव्याची पूर्ण जाणीव असते. तिच्यामध्ये "मी कसे वागावे" (दुसऱ्याने कसे वागावे हे नव्हे) हे ठरवावे लागते. तसेच मोबदल्याचीही अपेक्षा नसते.


अर्थात सर्व नीती, न्याय, धर्म भक्तीमध्ये येतातच हे सांगणे नको. भक्ताने उपाधी बेताचीच म्हणजे गरजेपुरतीच ठेवावी. भगवंताचे अनुसंधान न चुकेल एवढीच उपाधी असावी.


सुरवातीला मात्र जरा बळजबरीने नेमाने नाम घ्यावे लागेल. सवय झाली म्हणजे मग कष्ट जाणवणार नाही, व नामस्मरणात आनंद वाटेल.


तसेच पचेल तेवढेच म्हणजे आनंदाने जेवढे करवेल तेवढेच नामस्मरण करावे. ते कष्टाने करु नये कारण त्यापासून आनंद होणार नाही.


एकाचे स्वतःचे घर होते. घरची माणसे म्हणतात "घर आमचे आहे." काही दिवसांनी मालक आणि ते घर कोणाकडे तरी गेले. पण जीवंत असताना मात्र तो "माझे, माझे म्हणत होता". या साठी "हे घर भगवंताचे आहे" असे आपण म्हणावे.


आशीर्वाद.

🌼💧🌷

   💧🌼श्रीराम समर्थ🌼💧


अमृतधारा  ९१२


आज खरी भक्ती नाही म्हणून भगवंताचे स्मरण नाही. भगवंताचे स्मरण ठेवण्याचा अभ्यास केल्याशिवाय खरी भक्ती येत नाही. कोणतीही गोष्ट अभ्यासानेच साध्य होत असते. शहाण्या माणसाने उगीच विकल्प न लढविता भगवंताचे स्मरण ठेवण्यास आरंभ करावा.


देहाशी असलेले आपले तादात्म्य हे एक प्रकारच्या सवयीने व अभ्यासानेच झाले आहे. या उलट भगवंताचे स्मरण, चिंतन केले तर आज जसे देहाशी तादात्म्य आहे त्याचप्रमाणे भगवंताशी आपले तादात्म्य होईल.


आपली प्रत्येक कृती ही देवाच्या इच्छेने होते. तो सर्व कर्ता आहे असे म्हटले म्हणजे देवाचे स्मरण होऊन त्याला आपले कर्म अर्पण होते.


प्रपंचामध्ये आपल्या हिताचे जे असेल त्यासाठी भरपूर प्रयत्न करावा. परंतु त्यात यश न मिळाले तर असे मानावे की भगवंताची यश देण्याची इच्छा नव्हती कारण ते आपल्या हिताचे नव्हते. हा खरा त्याग होय.


"भगवंत मला हवा" असे वाटणे हे आजवर केलेल्या पुण्याईचे फळ होय.


आशीर्वाद.

💧🌼🌷

   💧🌷श्रीराम समर्थ🌷💧


अमृतधारा  ९१३


आपल्या मनामध्ये विकल्प आला तरी आपण निश्चितपणे वागणे जरूर आहे. आपण आपल्या मनामध्ये आलेली प्रत्येक गोष्ट करीत नाही. तसे विकल्पाच्या बाबतीत वागावे.


आपण देहबुद्धीमध्ये राहणारी माणसे आहोत. आपल्या मनामध्ये स्वाभाविकपणेच विकल्प उठतात. हा आपला स्वभाव दोष असल्याने आपल्याला त्याचा दोष नाही.


आपण आपला खरा स्वार्थ साधतच नाही. या देहाचे कौतुक करीत असताना दुसऱ्याची (देहाची) घर भरणी चालली आहे हे आपल्या लक्षात येत नाही. त्याचा फायदा आपल्याला काहीच होत नाही. देह गेला की सगळे गेले.


देहाच्या कोणत्याही भागाला व्याधी झाली तरी आपल्याला चैन पडत नाही इतके देहाशी आपले तादात्म्य झाले आहे.


जोपर्यंत "मी देही आहे" ही भावना आहे तोपर्यंत काम क्रोध हे राहणारच. देहबुद्धी जाऊन देवबुद्धी झाली की सर्व साधले.


आशीर्वाद.

🌷🌼💧

   🌼💧श्रीराम समर्थ💧🌼


अमृतधारा ९१४


खऱ्या भक्ताला, जगातली कोणतीही परिस्थिती भगवंताच्या आड येऊ शकत नाही, जसे व्यसनी माणसाला परिस्थिती त्याच्या व्यसनाच्या आड येऊ शकत नाही.


सर्वांना पराधिनता आहेच. शरीर जोपर्यंत बरे असते तोपर्यंत कर्तेपणाच्या अभिमानाने पराधिनतेची जाणीव नसते इतकेच. भगवंत ठेवील त्यात समाधान राहिले तर पराधिनता नाही.


आपली सावली गटारात पडो किंवा देवळाच्या परिसरात पडो आपण जशी तिची पर्वा करत नाही, त्याप्रमाणे देहावर बरे वाईट कसेही आघात झाले तरी त्याची पर्वा करू नये.


दारिद्र्य व देहदुःख सोसणे फार कठीण आहे. ते सहन करताना भगवंताचे अनुसंधान न चुकणे यातच भगवंतावरील आपल्या निष्ठेची खरी परीक्षा होते.


आपला देह प्रारब्धावर टाकून साधकाने मजेत त्याच्या सुखदुःखाकडे पहावे.


आशीर्वाद.

🌼🌷💧

   🌼💧श्रीराम समर्थ💧🌼


अमृतधारा  ९१५


सगुणाची उपासना उपाधी वाढवण्यासाठी नसून त्या कमी करण्यासाठी आहे. भगवंताखेरीज इतर उपाधी नकोत हाच त्याचा उद्देश आहे.


"परमात्मा हवा" असे म्हणत असताना इतर उपाधी तेथेच थांबतात किंवा गळून पडतात. उपाधी किंवा वासना नाहिशी करण्यासाठीच सतत नाम घ्यायचे असते.


ज्याने गुरुची आज्ञा पालन केली त्याची आसक्ती आपोआप सुटली. त्याला फळाची आशा उरत नाही. त्याला संकल्प वा विकल्प त्रास देत नाहीत.


श्री गुरुने सांगितलेले तेवढेच करायचे इतकेच त्याला माहित असल्यामुळे आपल्या प्रयत्नाचा पुढे काय परिणाम होईल याची चिंता त्याच्या मनाला शिवतही नाही.


"आहे त्यात समाधान आणि भगवंताचे अनुसंधान". एवढीच सद्गुरूची आज्ञा असते.


आशीर्वाद.

💧🌼🌷

   🌼💧श्रीराम समर्थ💧🌼


अमृतधारा  ९१६


पैशामुळे मी सुखी आहे असे मनात सुद्धा आणू नये. पैसा आल्यावर आनंद झाला तर त्याचा लोभ आहे हे स्पष्ट होते.


पैसा खूप अनर्थांना कारण आहे. आपल्या श्रमाने मिळणारा पैसा तेवढा आपला. बाकीच्याची अपेक्षा करू नये. आपल्याला लागणारा पैसा आपला, बाकीचा आपला म्हणू नये.


आपल्याजवळचा पैसा आपण होऊन कोणास द्यावा असे मी म्हणत नाही. पण चोराने चोरून नेला तर रडत बसू नये किंवा कोणी मागायला आला तर त्याला 'नाही' म्हणू नये. त्याला काहीतरी द्यावेच.


आपण प्रापंचिक माणसे! आपण पैसा साठवला तर त्यात गैर नाही. पण त्याचा आधार आपल्याला न वाटावा.


पैशाचा आधार आहे असे वाटणे म्हणजे भगवंताचा आधार नाही असे वाटणे होय.


आशीर्वाद.

🌷🌼💧

   ☘🌷श्रीराम समर्थ🌷☘


अमृतधारा  ९१७


जगात निंदक हे असणारच. ते आपणास सावध करतात. आपण त्यांच्या संगतीत राहू नये. निंदा ही साधनाची होळी करते. म्हणून आपण कुणाची निंदा करू नये.


जो आपला निंदक असेल तो आपला हितकर्ता समजावा. त्याने काढलेले दोष आपल्यामध्ये आहेत की नाही हे तपासून पहावे.


आपण जगाच्या स्तुतीला कधी भुलू नये. आपल्याला कोणी चांगले म्हटले तर आपल्या जीवाला धक्का बसून लगेच नामाची आठवण व्हावी.


माणसाचे मोठेपण त्याच्या संयमात आहे. आपण आपल्या प्रत्येक कृतीला साक्षित्वाने पहायला शिकावे. आपले कर्तव्य करताना मन तेथे असावे. पण ते संपल्यावर मात्र मन लगेच भगवंताकडे लावावे.


मी पूर्वीचा नाही. मी आता भगवंताचा आहे, असे वाटणे जरूर आहे.


आशीर्वाद.

🌼💧🌷

   💧🌷श्रीराम समर्थ🌷💧


अमृतधारा  ९१८


कोणतीही आपत्ती कारणाशिवाय घडत नाही. ते कारण जर आपण पाहू गेलो तर ते आपल्या हिताचे असले पाहिजे असे दिसेल.


मनुष्य निधन पावतो तो आपल्या प्रारब्धाने होय. म्हणून तो केव्हा गेला याला महत्व नसून तो कसा गेला याला महत्व आहे.


केव्हा जाणे हे प्रारब्धावर अवलंबून आहे. पण कसे जाणे हे त्याच्या आणि त्याच्या गुरुच्या कर्तबगारीवर अवलंबून आहे.


आपल्या पूर्वायुष्यात आपण नोकरीचे ध्येय ठेवतो. पण पैसा, मान्यता, अधिकार आदि गोष्टी कितीही मिळाल्या तरी आपल्याला समाधान मिळत नाही.


म्हणून आता परमार्थ करण्यास आरंभ करावा, म्हणजेच भगवंताचे ध्येय ठेवून प्रपंचात वागावे. निदान तसे वागायला शिकावे.


नोकरी हे काही आपले सर्वस्व नाही. नामस्मरण करण्यासाठी नोकरीचाकरी आवश्यक आहे. नोकरीमुळे पोटाची ददात मिटेल. भगवंत हे आपले ध्येय ठेवले म्हणजे नोकरी ही त्याची पहिली पायरी.


आशीर्वाद.

💧🌼🌷

   💧🌼श्रीराम समर्थ🌼💧


अमृतधारा  ९१९


पोटाकरिता नोकरी करावी आणि भगवंताकरिता पोट भरावे म्हणजे आपली नोकरी ही भगवंताची सेवाच घडेल.


प्रत्येक खात्यामधील मनुष्य म्हणतो की, "माझ्या मुलाने माझ्या खात्यात नोकरी करू नये. या खात्यात मुळीच सुख नाही". याचा अर्थ कोणत्याच खात्यात सुख नाही.


आहे त्यामध्ये समाधान नाही, हा जो प्रत्येकाचा मनोधर्म आहे, त्याचे हे उत्तम उदाहरण आहे.


भगवंताची नोकरी सोडून दुसऱ्याची नोकरी करायला आपण सुरवात केली तेव्हांपासूनच आपली अब्रु गेली आहे. म्हणून नोकरीत कमीपणा आला तर त्याबद्दल मनाला विशेष लावून घेण्यासारखे काहीच नाही.


भिकाऱ्याला कधीही वेडे वाकडे बोलू नये. कारण आपली नोकरी ही भीकच आहे.


आशीर्वाद.

🌷🌼💧

   🌼💧श्रीराम समर्थ💧🌼


अमृत थारा  ९२०


आॕफीसमध्ये  जाणाऱ्यांनी आपले कर्तव्य नीट बजावावे, म्हणजे शक्य तितक्या उत्तम रितीने आपले काम करावे.


घरामधील मंडळीनी आपले काम मन लावून करावे. आणि हे सर्व आनंदाने करून प्रत्येकाने राहिलेला वेळ नामात घालवावा.


शासन करताना ते रागाच्या आधीन न होता केले तर त्याचा दोष नाही. क्रोध ताब्यात ठेवला पाहिजे. त्यासाठी भगवंताचे अधिष्ठान व अभ्यास पाहिजे.


अपराध्याला शासन करताना वृत्ती निरासक्त असावी. तेथे द्वेष बुद्धी असू नये. भगवंताचे स्मरण ठेवले तरच वृत्ती सांभाळता येईल. एकाला मारून शंभर जीव वाचत असतील तर त्याला मारणे ही अहिंसाच आहे.


आपल्या कर्माचे फळ देणे भगवंताच्या हातात आहे आणि तो देईल ते फळ आपल्या हिताचे आहे अशी भावना पाहिजे.


आशीर्वाद.

💧🌼🌷

   🌷💧श्रीराम समर्थ💧🌷


अमृतधारा  ९२१


जगाच्या मान अपमानाला कधी भुलू नये. पैसा व कामवासना यापेक्षा मान हा देहबुद्धीला जास्त चिकटून आहे. तेथे अगदी सावध असावे.


जेथे आपल्याला मान मिळण्याचा संभव आहे तेथे जाण्याचे टाळावे. टाळणे शक्य नसेल तर "हे भगवंताचे देणे आहे" हे मनापासून समजावे.


जो खरा मोठा असतो, तो कधी मानाची इच्छा करत नाही. मान त्याच्याकडे आला तर त्याची क्षिती बाळगत नाही. आपल्याला मान आवडतो का ते पहावे, म्हणजे त्यावरून आपल्या अंगी खरे मोठेपण किती आहे हे कळेल.


आपल्या अंगी सहजता यावी. घरामध्ये अमुक एक गोष्ट करा किंवा करु नका असा आग्रह न धरता आपण रहावे. देह असा प्रारब्धावर टाकणे मला फार आवडते.


जाता येता देवाला नमस्कार करावा. "राम राम"  म्हणावे. भगवंताचे प्रेम एकदा लागले की ते कधी सुटणार नाही.


आशीर्वाद.

💧🌼🌷

   💧🌼श्रीराम समर्थ🌼💧


अमृतधारा  ९२२


भगवंताच्या प्राप्तीच्या आड येणारे नाहीसे व्हावे म्हणून तळमणारा जो असतो त्याचे बरोबर चालले आहे असे समजावे.


साधकाला साधनाने देहदुःख सहन करण्याचे थोडे तरी धैर्य आले पाहिजे. त्याला देह थोडा तरी प्रारब्धावर टाकता आला पाहिजे.


ज्या वेळी देहबुद्धी तुटते त्यावेळी स्वतःला देखील निराळेच वाटते. अरे मी तोच आहे का? असे वाटते. मूळ स्वभाव कामापुरता उरतो. पण तो हानीकारक राहत नाही.


"मी देही आहे" ही भावना म्हणजे बद्धाची अवस्था होय. "मी देवाचा आहे" ही भावना मुमुक्षू व साधक यांची अवस्था होय. "मी परमात्म स्वरूपच आहे" ही भावना सिद्धाची, ज्ञानाची अवस्था होय.


ज्ञान उत्पन्न करावयाचे नाही. फक्त अज्ञान घालवायचे आहे. चित्त स्थिर केले की ज्ञान आलेच.


आशीर्वाद.

💧🌼🌷

   🌷💧श्रीराम समर्थ💧🌷


अमृतधारा  ९२३


आपले काम मनापासून करावे म्हणजे आपले वजन पडते. कर्तव्यात कसूर करू नये. त्याचा मोबदला केंव्हा तरी कोठे तरी मिळतो.


स्त्रियांनी आपला पत्नीधर्म पाळावा, प्रपंचातील कर्तव्ये करावीत, मन भगवंतापाशी लावावे. मुलांनी आईबापांविषयीचे आपले कर्तव्य करीत असता मन मात्र भगवंताकडे ठेवावे.


मोठ्यांनी किंवा मालकांनी "राम दाता" ही भावना ठेवून व्यवहाराने वागावे. मालक झाले म्हणून कुणाचा अपमान करून मन दुखवू नये.


साधकाने भगवंताच्या स्मरणात आपले कर्तव्य करावे. मग भगवंत (किंवा गुरु) पाहून घेतील असे म्हणून आनंदात रहावे.


भगवंता, असे कसे केलेस असे कधीच म्हणू नये. उलट भगवंता, तू केलेस ते योग्यच आहे. त्यात मी समाधानाने राहण्याचा प्रयत्न करीन असे म्हणावे.


आशीर्वाद.

🌷🌼💧

   🌼🌷श्रीराम समर्थ🌷🌼


अमृतधारा  ९२४


बाहेरून आपल्याला सुख मिळेल ही कल्पना आधी काढून टाकावी. हे केले की आपोआप निष्काम बुद्धीने काम केले जाईल. आपण सहजतेने वागावे. अमुक एका गोष्टीमुळे आपले अडते असे असू नये.


सुटीच्या दिवशी (वा निवृत्त झाल्यावर) घरामध्ये आपण सहजपणे रहावे. आपण होऊन काही मागू नये. आपण होऊन अमुक एक खायला प्यायला पाहिजे असे म्हणू नये.


आपण कोणाला भेटायला जाऊ नये. पण कोणी आपल्याला भेटायला आला तर नाही म्हणू नये. असा सहजपणे दिवस घालवावा. अमुक एक ठरवूच नये.


अशी सहजता साधली तर उत्तमच आहे. ही सहजतेची सवय ज्याला लागेल त्याला घरातच एकांत मिळेल.


उठता, बसता, चालता, बोलता आपण भगवंताचे अनुसंधान ठेवण्याचा प्रयत्न करावा. सुटीमध्ये याचा अभ्यास करावा.


आशीर्वाद.

💧🌼🌷

   ☘🌼श्रीराम समर्थ🌼☘


अमृतधारा  ९२५


कोणतेही व्यसन सवयीने काही काळाने पचनी पडते. त्याप्रमाणे भगवंताच्या चिंतनाचे आपल्याला व्यसन लागले पाहिजे.


आपले शरीरातले रक्त तपासल्यावर कोणता रोग झाला आहे हे जसे डाॅक्टरांना समजते, त्याप्रमाणे आपले चित्त कुठे गुंतले आहे हे आपणच तपासावे. तो आपला परमार्थाच्या आड येणारा भवरोग आहे.


शरीराच्या रोगांवर वेगवेगळी औषधें आहेत. पण सर्व भवरोगांवर संतांनी नामस्मरण हे एकच औषध सांगितले आहे.


मिश्रण नसलेले एकच शुद्ध अन्न पचायला सोपे असते हे जसे खरे त्याचप्रमाणे आपले अंतःकरण अगदी शुद्ध असावे. म्हणजे ते सर्वांमध्ये लवकर मिसळते.


आपल्या अंतःकरणामध्ये स्वार्थाचे मिश्रण असल्यामुळे ते सर्वांमध्ये समरस होऊ शकत नाही. शुद्ध अंतःकरणाच्या माणसाचे चालणे सहज, हळू व बोलणे मृदु असते. तो सर्वांना प्रिय होतो.


आशीर्वाद.

💧☘🌷

   🌷💧श्रीराम समर्थ💧🌷


अमृतधारा  ९२६


आज ज्याने नाम घेण्याचा निश्चय केला त्याचे मागले सर्व पुसलेच. भगवंत रोज संधी देतो आहे. आज सुधारले आणि कालचे पुन्हा केले नाही म्हणजे पुर्वीचे नाहीसे होते हीच ती संधी.


देवासारखा दयाळू कोणीही नाही. कितीही अपराध केले तरी "आता पुन्हा करणार नाही" म्हटले तर तो क्षमा करतो व मागील सर्व विसरतो.


आज आपल्या अंगी भगवंताची भक्ती नाही ही गोष्ट खरी. तरी आपण भक्तीचे सोंग आणण्याचा प्रयत्न करावा. शंभर वेळा खोटे पाणी डोळ्यात आले तर एक वेळा तरी खरे पाणी येईल.


एक वेळा जरी खरे पाणी आले तरी भगवंत आपले काम करील. भगवंताच्या प्रवाहामधे पडावे, त्याला आठवण्याचा प्रयत्न करावा. आपले काम लवकर होईल.


साधनामध्ये संत आपल्या बरोबर आहेत हे खरे, पण आपला अभ्यास आपणच केला पाहिजे. साधनामध्ये मन आवरणे ही पहिली पायरी आहे.


आशीर्वाद.

☘🌼💧

   💧🌷श्रीराम समर्थ🌷💧


अमृतधारा  ९२७


आपण आपले मन भगवंताच्या अनुसंधानात मोठ्या काळजीपूर्वक ठेवले असता त्याच्यावर आघात करायला विषय अगदी टपलेलेच असतात.


मन जरा भगवंतापासून बाजुला झाले की पुरे. विषयाने त्याच्यावर घाला घातलाच म्हणून समजावे. साधकाने रात्रंदिवस अगदी डोळ्यात तेल घालून जपले पाहिजे. म्हणून परमार्थ म्हणजे अखंड सावधानता.


भगवंताच्या नामाला कसलेही शरीराचे बंधन नाही. हेच तर नामाचे महात्म्य आहे. मनुष्याच्या कोणत्याही अवस्थेत भगवंताचे स्मरण सहज ठेवता येण्याचे एकच साधन, ते म्हणजे नाम होय.


देहबुद्धी अशी और आहे की त्या भगवंताच्या निरुपाधिक नामाला आपण काहीतरी उपाधी जोडतो आणि त्या उपाधीवर नाम घेणे अवलंबून ठेवतो. असे न करावे.


देहासंबंधीचे (बाप, मुलगा, नवरा, बायको वगैरे म्हणून) प्रत्येकाचे कर्तव्य राहणारच. परंतु मनुष्यत्वाचे प्रमुख कर्तव्य असेल तर ते भगवंताचे होणे आहे.


आशीर्वाद.

☘🌷💧

   ☘💧श्रीराम समर्थ💧☘


अमृतधारा  ९२८


प्रपंच येथपासून तेथपर्यंत सगळा सारखाच. गरीबाचा असो किंवा श्रीमंताचा असो, विद्वानाचा असो की अडाण्याचा असो, अधिकाऱ्याचा असो की कारकुनाचा असो, या देशातील असो की परदेशातील असो, "प्रपंचातील जो उणेपणा, अपुरेपणा, किंवा तात्पुरतेपणा" तो कुठेही बदलत नाही.


म्हणून जे आपल्यापाशी नाही ते ज्याच्यापाशी आहे त्याच्या प्रपंचाला पाहून आपण भुलू नये. आहे त्यामध्ये समाधान ठेवावे.


समाधानाच्या आधी आम्हाला सुख बरे वाटते. आधी खरुज खाजवून आनंद, पण मग तडतड. तसे प्रापंचिक सुख आहे. सुखाच्या पलीकडे समाधान आहे.


सुखाला कारण आहे, समाधानाला नाही. ज्याला कारण आहे ते सुख आणि ज्याला कारण नाही ते समाधान. ज्याला कारण आहे ते टिकत नाही.


वैराग्य हे वृत्तीत असते. भगवंताने दिले त्यात समाधान असून इतर काही हवे असे न वाटणे हे वैराग्य व त्यात भगवंताचे अनुसंधान ठेवणे हा विवेक होय.


आशीर्वाद.

💧☘🌷

   💧☘श्रीराम समर्थ☘💧


अमृतधारा  ९२९


जगामध्ये आपल्याला जे वाईट दिसते, त्याचे मूळ आपल्या मध्येच असते. जगामधे सुधारणा करायला नको. आपल्यामध्ये ती करायला पाहिजे.


आपण स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करावा. आपले अंतःकरण लोभ, द्वेष आणि मत्सर यांनी तुडुंब भरलेले आहे. म्हणून आपल्याला जगात कोणी चांगला दिसत नाही. स्वतःचे अंतःकरण स्वच्छ करणे हेच परमार्थाच्या साधनाचे मर्म आहे.


एका माणसाला पैशाची फार गरज होती. म्हणून तो आपल्या मित्राकडे चालला होता. जाता जाता त्याला वाटेमध्ये एक १०० रुपयांची नोट आढळली. त्याने ती उचलली व खिशात ठेवली. त्या माणसाला फार आनंद झाला.


हे सर्व एका पोलीसाने पाहिले. तो जरा पुढे गेला इतक्यात पोलीसाने त्याला येऊन धरले आणि चोरीचा माल जवळ ठेवल्याबद्दल फौजदाराकडे घेऊन गेला.


तात्पर्य काय ? कोणत्याही गोष्टीचा परिणाम काय होतो यावरून ती गोष्ट चांगली की वाईट हे ठरते. प्रथम वाईट दिसणारी घटना कालांतराने चांगली ठरते. म्हणून कोणतीही गोष्ट घडली की दुःखाने निराश होऊ नये. किंवा सुखाने हुरळून जाऊ नये.


आशीर्वाद.

💧☘🌷

   🌼💧श्रीराम समर्थ💧🌼


अमृतधारा  ९३०


"मी कर्ता नसून परमात्मा कर्ता आहे" अशी भावना झाल्याशिवाय मन भगवंताला अर्पण होणार नाही.ते अर्पण झाल्याशिवाय फळाची अपेक्षा सुटणार नाही आणि फळाची अपेक्षा सुटल्याशिवाय जीवाला शांती मिळणार नाही.


मला हवे ते मी मिळवीनच अशी खात्री नाही आणि नको ते टाळता येतेच असे नाही. पण "मी कर्ता आहे" ही भावना राहतेच. हीच भगवंताची माया होय.


शरीर आपल्या स्वाधीन नाही, पण मन आपल्या स्वाधीन होऊ शकेल. म्हणून त्याला सतत भगवंताचे स्मरण करण्याची सवय लावावी. आनंद हा मनाचा धर्म आहे.


जो आपल्याविषयी जास्त विचार करतो तो अधिक संकटात पडतो. आजच्यापुरता विचार करावा व उद्याचे भगवंतावर सोपवावे.


श्रीमंतीचा अभिमान व गरीबीचे दुःख दोन्ही सारखीच घातक आहेत. जगात न्याय मिळेल याची खात्री नाही. मात्र भगवंताजवळ योग्य न्याय मिळतो. म्हणून त्याच्यावर निष्ठा ठेवून रहावे.


आशीर्वाद.

☘💧🌼

,   🌼🌷श्रीराम समर्थ🌷🌼


अमृतधारा  ९३१


मी कोण आहे हे कसे ओळखावे? मी कोण आहे हे ओळखण्यास जडाने म्हणजेच वाचेने नाम घेण्यास सुरुवात करावी व ते नाम अखंड घेण्याचा प्रयत्न करावा.


मग ते मनाने अंतरात होऊ लागते. पहिल्याने मनाला आपल्या प्रयत्नाने नामाचे वळण लावण्याच्या नादी लागू नये. कारण ते फारच अवघड आहे.


"भगवंता मी तुझा आहे, सर्व काही तू करतोस, तू ठेवशील तसा मी राहीन" असे मनाने समजून वाचेने नाम घ्यावे. म्हणजे नाम घेता घेता देहाचा विसर पडेल आणि मग मी कोण व देव कोण हे आपोआप कळेल.


एकाग्रतेकडे लक्ष न देता नामस्मरण करावे. अनन्यता येण्याचा उत्तम मार्ग नामच आहे. उपासनेचा हेतू असेल तर तो राम आपल्या पाठीमागे उभा आहे ही भावना उत्पन्न करणे हा होय.


आशीर्वाद.

💧🌷🌼

   🌼🌷श्रीराम समर्थ🌷🌼


अमृतधारा  ९३२


आमच्या विचाराने ठरल्याप्रमाणे झाल्याचे सुख मिळतेच असे नाही. काही वेळेस विचाराविरुद्ध होऊनही मागाहून न झाल्याचेच बरे वाटते.


म्हणजे कोणत्याही गोष्टीचे सुखदुःख तात्काळ कळत नाही हेच खरे. म्हणून जरा वेळ थांबून सुख किंवा दुःख मानूया म्हणजे मग त्याचे काहीच वाटणार नाही.


आपल्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सर्व भगवंताच्या इच्छेनेच घडतात अशी पूर्ण खात्री झाली कि मग सुखदुःख उरत नाही.


ज्याची अशी खरी निष्ठा आहे त्याचे तेज काही निराळेच असते. अशा माणसाला अचल समाधान लाभते.


किंबहुना हे साधुत्वाचे मुख्य लक्षण समजावे. हे आपल्या अंगी यावे म्हणून साधनाची सर्व खटपट असते.


आशीर्वाद.

💧🌼🌷

   🌼🌷श्रीराम समर्थ🌷🌼


अमृतधारा  ९३३


एका साधकाने प्रश्न विचारला  "महाराज आपला परमार्थ सूत्र रुपाने सांगावा." यावर श्री महाराज लगेच म्हणाले,  "अखंड मुखी रामनाम, आत असावे अनुसंधान. हाच सगळा परमार्थजाण."


तो साधक पुन्हा म्हणाला  "महाराज हे फारच थोडक्यात झाले. आणखी थोडे समजावून सांगावे."


श्री महाराज म्हणाले

"थोडक्यात समाधान न वाटणे हेच तर मुळी देहबुद्धीचे  लक्षण आहे. एक भगवंताचे नाम घट्ट धरावे, त्यामध्ये अत्युत्कटता ठेवून एकतानता करावी आणि स्वतःला विसरून जावे. हाच खरा परमार्थ होय."


"नामामध्ये एकतानता होण्यास भगवंताच्या साक्षीने वागावे. हवेनकोपणा टाकून द्यावा. राम कर्ता ही भावना ठेवावी. विषय मालकीने भोगावा."


"आपला गुण भगवंताकडे लावावा. लहान मूल होऊन देवाकडे जावे. रामाला आपले सुखदुःख सांगावे."


"देहभोगाला कंटाळू नका. काळजी घ्या पण काळजी करु नका. निर्भय बना. आणि अशा रीतीने जिवंतपणीं आपले मरण पहा."


आशीर्वाद.

🌼🌷🍀

   🙏🌷💧श्रीराम समर्थ💧🌷



अमृतधारा  ९३४


भगवंताचे स्मरण करण्यास बसलो असता हजारो कल्पना आपल्या मनात येऊन जातात. त्या बहुतेक प्रपंचाविषयीच  असतात. सर्व कल्पना आज तरी एकदम थांबवून टाकणे शक्य नाही.


म्हणून मन जर कल्पना केल्याशिवाय स्वस्थ बसत नसेल तर त्या निदान भगवंताविषयी तरी असाव्यात. उदा. अशी आपण कल्पना करावी की, आपण पूजा करीत बसलो आहोत, पूजा आटोपल्यावर भगवंत प्रत्यक्ष प्रकट होऊन आपल्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देत आहे.


आपण भजन करायला बसलो आहोत आणि आपले भजन ऐकून भगवंत डोलत आहे. किंवा आपण जप करीत बसलो आहे आणि भगवंत, श्री महाराज आपल्या समोर सिंहासनावर बसले आहेत.


भगवंताविषयी विचार मनात आणून प्रापंचिक कल्पना मारून टाकाव्यात आणि शेवटी सर्व कल्पना टाकून निर्विकल्प व्हावे.


जोपर्यंत आपण देहबुद्धीत आहोत तोपर्यंत कल्पना येणारच. म्हणून त्याबद्दल उद्विग्न न होता नामात रंगून जाण्याचा अभ्यास करावा. त्यातच यश आहे.


आशीर्वाद.

🌷🌼💧

   🌷💧श्रीराम समर्थ💧🌷


अमृतधारा  ९३५


नाम घेताना कितीही विचार आले तरी येऊ द्या. तुम्ही मात्र विचारांच्या मागे जावू नका व नामाला चिकटून रहा. कालांतराने विचार मागे पडतील. आणि तुमचे काम होईल. कसाही प्रसंग आला तरी नाम सोडू नका. त्यातून परमात्मा हात देईल.


नामाशिवाय काही करावेसे वाटले की तेथे वृत्ती गुंतली आहे समजावे. त्यातून बाहेर पडण्यासाठी सतत नाम घ्यावे. त्याचा अभ्यास करावा.


नामाचे प्रेम नामातूनच उत्पन्न होत असते. अग्निहोत्राचा अग्नी त्याच्याच लाकडातून निघत असतो. त्याला बाहेरच्या विस्तवाची जरुरी नसते. तद्वत नामाच्या प्रेमाचे आहे.


राम कर्ता ही भावना ठेवून त्याच्या स्मरणात कर्तव्य करणे, इतकाच परमार्थ मला कळतो. यापेक्षा अधिक सांगेल तो वेदांत.


जो रोजच्या व्यवहारात आणता येऊन सामान्य माणसाला सत्य दर्शन करून देतो तो वेदांत खरा होय. नामाची संगत असल्याखेरीज वेदांत आचरणात येणार नाही आणि आचरणात आणल्याखेरीज त्याचा उपयोग नाही.


आशीर्वाद.

💧🌷🌼

   💧🌼श्रीराम समर्थ🌼💧


अमृतधारा  ९३६


आपण आपले मन भगवंताच्या चरणावर चिकटून ठेवावे आणि देह प्रारब्धाच्या प्रवाहामध्ये सोडून द्यावा. कधी तो सुखात तर कधी दुःखात राहील.


कधी तो बरेच दिवस सरळ जाईल, तर कधी मधेच गचका खाऊन बुडायच्या बेताला येईल. पण देहाच्या कोणत्याही अवस्थेमध्ये आपला आनंद कायम टिकेल यात शंका नाही.


आपल्या देहाकडे आपण वेगळेपणाने पहायला शिकले पाहिजे. मन द्यावे भगवंताकडे आणि देह द्यावा प्रारब्धाला, म्हणजे हे साधेल.


देहाचे सुखदुःख वरवरचे असावे. ते आत शिरून मनावर परिणाम करता कामा नये. भगवंताच्या नामाने हे हमखास साधते. म्हणून अखेर नामाशिवाय गत्यंतर नाही.


हाताने प्रपंचाचे काम, मुखाने भगवंताचे नाम आणि अंतःकरणात समाधान, इतके जो करील त्याला परमार्थ वेगळा करायला नको.


आशीर्वाद.

💧🌷🌼

   💦🌼श्रीराम समर्थ🌼💦


अमृतधारा  ९३७


आपण भगवंताला म्हणावे "भगवंता, मी सर्वस्वी तुझा आहे. माझा प्रपंचही तुझाच आहे. तुझी भक्ती कशी करावी हे मला माहित नाही. तू मला मार्ग दाखव. तू जे करशील ते मला मान्य असेल व त्यात मी सामील होईन"


आपण अगदी मनापासून अशी प्रार्थना करावी. मग भगवंत ठेवील त्या परिस्थितीमधे आपण आनंदात रहावे.


भगवंताला असल्या गोष्टी करण्याची फार हौस आहे. कारण हे जगत म्हणजे भगवंताची लिला आहे. आपण भगवंताला शरण गेलो तर तो आपला हात कधीही सोडणार नाही. आपण मात्र त्याला चिकटून राहिले पाहिजे. "तू मला शरण ये, म्हणजे तुझा योगक्षेम मी चालवीन". असे भगवंत गीतेमध्ये सांगतात त्याचा अर्थ हाच होय.


भगवंताला आपण अनन्य भावे शरण जाऊन "तुझ्या नामाचे प्रेम मला दे". अशी काकुळतीने प्रार्थना करावी म्हणजे नामाचे प्रेम आपोआप वाढेल व भगवंताचे खरे दर्शन घडेल.


आशीर्वाद.

💦🌷🌼

   🔥☘श्रीराम समर्थ☘🔥


अमृतधारा  ९३८


नाम घेणे म्हणजे भगवंत आपल्या जवळ आहे ही जाणीव उत्पन्न करून घेणे. जवळ म्हणजे अगदी हृदयात तो असावा. नामाने तो प्रगटतो.


आपण नाम घेताना आपल्याला काही करायचे उरले असे समजूच नये. नुसते नाम मनापासून घेतले की पुढील अवस्था आपोआप येत जातात.


आपण आहोत तोपर्यंत भगवंताचे नाम घ्यावे. नामात इंद्रियांना निजवावे, म्हणजे देहाला विसरावे.


नाम हेच सत्य, हेच चांगले, हेच योग्य, हेच न्याय्य आणि हेच सर्व सद्गुणाचे भांडार होय. नाम हेच धन आहे.


नामाच्या सहाय्याने मन अंतर्मुख केल्यावर आनंद सापडतो. नामाकरता नाम घेतल्याने मन आपोआप अंतर्मुख होऊन जाते.


रोज काही तरी निमित्त काढावे आणि पुष्कळ पुष्कळ भगवंताचे नाम घ्यावे. नामाची ज्योत अंतःकरणात जळत ठेवली तर संत आपल्याला अचूक येऊन भेटतील.


भगवंताच्या नामाला कसलेही शरीराचे बंधन नाही. हेच तर नामाचे महात्म्य आहे. सत्संगतीत राहून नाम घेतले तर देहबुद्धीच्या कोंडीतून बाहेर पडता येते.


आशीर्वाद.

💥☘🌷

, ??☘श्रीराम समर्थ☘🍁


अमृतधारा  ९३९


देहबुद्धी अशी और आहे की त्या निरुपाधिक नामाला आपण उपाधी जोडतो. त्या उपाधीवर नाम घेणे अवलंबून ठेवतो. असे न करावे.


कोणत्याही मनुष्याला कोठेही, कोणत्याही अवस्थेत, कोठेही नाम हे घेता येते. नाम अगदी बेंबीच्या देठापासून घ्यावे. जीव कळवळल्याशिवाय बेंबीपासून नाम येणारच नाही.


आपली वासना बेंबीपाशी आहे. भगवंताची खरी तळमळ लागल्याशिवाय जीव कळवळणार नाही. त्यासाठी आज जसे येईल तसे नाम घ्यावे. ते खोल शिरते.


नामस्मरणाची चांगली धुंदी आल्यावाचून मीपण जात नाही. मीपण गेले की जीव शुद्ध झाला. नामात प्रेम आले की भगवंताने कृपा केली.


माणसापेक्षा, संतापेक्षा नामाची संगती अधिक फायद्याची आहे. नामाची संगती निर्लेप व निर्भेळ आहे. त्याच्याविषयी विकल्प येणे शक्य नाही.


शिष्यावर कृपा करायची असेल तर संत त्याला आधी नामाचे प्रेम देईल. नामाच्या प्रेमाशिवाय भगवंत देखील अंतिम समाधान देऊ शकत नाही.


आशीर्वाद.

☘🌸🌼

   🔥💧श्रीराम समर्थ💧🔥


अमृतधारा  ९४०


कालचे विसरावे. उद्याचा विचार करु नये. आज नाम सोडू नये. परिस्थिती व भोग चुकत नाहीत, पण समाधान राहायचे असेल तर ते नामानेच टिकेल.


नामस्मरण सपाटून अखंड करावे. आपण साधनेत रहावे. भगवंताला नामाचे प्रेम इतके आहे की नाम घेतले की तो आलाच. गोपींनी ते केले.


नाम तेच भगवंत. आपण गोपी झाले पाहिजे. भगवंताच्या उपकाराची फेड त्याच्या नामाने करायची. गोपींच्या प्रेमाप्रमाणे नामात वृत्ती गुंतून राहिली पाहिजे.


जगात नामाने नामाशिवाय (दुसरे) मिळवायचेच नाही. नाम घेताना येणारे अनुभव नामाचा मार्ग बरोबर आहे हे दर्शवतात. पण ते काही सर्वस्व नाही.


नामाने शंका व भीती नाहीशी झाली पाहिजे. नामात चूक होतच नाही. त्याचे फळ शेवटचे साधायचे असेल तर अंतकाळी नाम साधायचे.


डोळे उघडे ठेवूनही जग नाहीसे होईल तर ते नामानेच होईल. हसावे, खेळावे, भजन करावे, पण नाम सोडू नये. नामाची निष्ठा जबर ठेवावी.


आशीर्वाद.

🌸🌺🌼

   🔥💧श्रीराम समर्थ💧🔥


अमृतधारा  ९४१


नामाचा मोबदला भगवंतच. नामाचे प्रेम येण्यास सर्व परमात्मरुप म्हणून चांगले वाईट पाहू नये. मी भगवंंताचा तसे जग भगवंताचे ही वृत्ती पाहिजे.


नामस्मरण समजून करावे. समजून म्हणजे राम कर्ता या भावनेने. या भावनेने जो राहील त्याला आनंदापासून वेगळे राहताच येणार नाही.


भगवंत निर्लेप आहे. नाम निर्लेप साधन आहे. तसा मी निर्लेप झालो पाहिजे. नाम निर्लेप आहे. म्हणून शरणागतीला एकमेव साधन आहे.


संत नामाशिवाय राहत नाहीत. नामामधें संत आहेत. संताना नामाची आवड आहे. नाम जेथे आहे तेथे संत धावत येतील. नामात संत समागम आहे.


नाम (घेणे) म्हणजे भगवंताचे स्मरण. शेवटी नाम बरोबर येईल इतके नाम स्मरावे. मी भगवंंताचा असे सारखे स्मरण पाहिजे. हाच नाम स्मरणाचा अर्थ.


नाम अति सूक्ष्म साधन आहे. ते आंत घ्यावे. त्याचा अति सूक्ष्म परिणाम होईल तो दिसणार नाही. नामाचे प्रेम अचाट आहे.


आशीर्वाद.

☘🌼🌷

   🔥💧श्रीराम समर्थ💧🔥


अमृतधारा  ९४२


मी नाम देतो अशी ज्याला जाणीवच नाही तो नाम देणारा चांगला. मी नाम देतो असे मला कधीच वाटले नाही.


राम आपल्याबरोबर यावा असे ज्याला वाटते, त्याने सतत नाम घ्यावे. जेथे नाम तेथे राम राहील. रामाला कोंडायला त्याला हृदयात ठेवावा.


नाम घेणे खरे भाग्याचे लक्षण आहे. नाम घेतो तो मला पूज्य आहे. आता सांगणारा भेटेल असे समजू नका. नामाला चिकटून राहा.


भगवंताचे दर्शन घेण्यास शरणागती हा एकच मार्ग आहे व शरणागतीला उत्तम उपाय नाम. शरणागतीत फक्त इच्छेचे मरण आहे. ते नामाने साधते.


विचारांकडे दुर्लक्ष करून नाम घ्यावे. नामात सर्वस्व आहे ही भावना पाहिजे. कल्पना म्हणजे मायेचे हत्यार. कल्पनारहित थोडे नामही फळ देईल.


निर्गुणाला जुळे झाले नाम व प्रेम. प्रेम आले की नाम येते. नाम घेतले की प्रेम येते. यापैकी एक काहीतरी करावे.


खरे अनिर्वाच्य, स्वतंत्र, निरपेक्ष, स्वतःसिद्ध असे फक्त नाम आहे. ते एक अनुभवाने कळेल किंवा निष्ठावंत सहवासाने तरी कळेल.


आशीर्वाद.

🌷🍀🔥

   💧🌹श्रीराम समर्थ🌹💧


अमृतधारा  ९४३

साधकांशी हितगुज


श्री महाराजांनी  साधकांशी केलेले हितगुज अमृतधाराच्या या अंतीम पर्वात देत आहे.


) साधकाचे नियम

) परमात्मा व जीव

ह्यांचे ऐक्य

)गुरूकृपेचे साधन

)सर्व साधनाचें साधन

)अभ्यास.


साधकाचे नियम  अ


श्रीगणेशाय नमः।

सतत विवेक जागृत असावा। स्वधर्माचा आळस नसावा। स्वधर्म करून जतन।  नित्यनेम संध्यास्नान।

यत्न करून साधले तितके स्वतः आपण | आपली मुले आप्त स्वकीय सखे सज्जन। यांचे कडून करावे जाण। साधुब्राम्हण पुराण श्रवण। अध्यात्म निरूपण मनन चिंतन। याठिकाणी आस्थापूर्ण। कुळधर्म कुळाचार वंशावळी करावी जतन। अब्रू लौकिक कीर्ती करून जतन। सर्वांचे राखावे समाधान। कोणाचे अंतःकरणा न लागावा धक्का। असा नेम करावा निका।|


आशीर्वाद.

🌷💧🌼

  : < >

   🌼🌷श्रीराम समर्थ🌷🌼


अमृतधारा  ९४४

साधकांशी हितगुज


साधकाचे नियम  आ


कुकांडासी भांडू नये। नास्तिकासी तंटू नये। नीच संगत धरू नये। स्वधर्मा विरूद्ध वागू नये। सगुण उपासना सोडू नये। काय हेतू वर मनुष्य बोलतो हे समजल्याशिवाय उत्तर देऊ नये। मती भ्रष्ट करणाराची संगत धरू नये। वृथाभ्रमाशी भूलू नये। किमयाचे नादांत पडू नये। जारणमारण शिकू नये। परनिंदा करू नये। परपीडा करू नये। अन्यायाने परद्रव्य हरण करू नये।


प्राण जाईतो परस्त्री गमन करू नये। हास्य, रहस्य, तालथट्टा। लावण्य , तारूण्य , मनात येऊ नये। विपूल द्रव्य देऊन भ्रष्ट करण्याचा कोणी इरादा केला तर भ्रष्ट कधी होऊ नये। अयोग्य माणसाचे तोंडीचा वेद ऐकू नये। त्याने शिकवलेले ज्ञान शिकू नये ।


आशीर्वाद.

🌷🌼💧

   🌼🌷श्रीराम समर्थ🌷🌼


अमृतधारा  ९४५

साधकांशी हितगुज

साधकाचे नियम  इ


शांती तत्व सोडू नये। क्रोध कधी येऊ देऊ नये। कामी मन असू नये। कोणत्याही जीवास तुच्छ मानू नये। परदुःखी हसू नये। देह दुःखी त्रासू नये। लोकनिंद्य काम करू नये। कोणाचा धर्म उच्छेदन करू नये। बुध्दीभेद करू नये। खोटा सल्ला देऊ नये। जनप्रियत्व सोडू नये। असत्य वर्तन वागू नये। मत्सर मनात येऊ नये। वैर कोणाशी धरू नये। दुसर्‍यास बुडवून आपला मतलब साधू नये।


गाईब्राम्हण यांस पूज्य मानून | बनेल तितका त्यांचा आदरसत्कार ठेवून | त्यांचेवरचे संकट टाळण्याचे प्रयत्न करावे। आल्या अतिथा सांभाळावे। ज्याचा जे असेल आश्रम। तैसा तो रक्षण करावा धर्म। कामक्रोधातीत होऊन अंतःकरण। वर लिहिलेले नियम करूनी जतन। आता काही परमार्थिक साधकाचे करू नियम।


आशीर्वाद.

🌷🌼??

   🌼🌷श्रीराम समर्थ🌷🌼


अमृतधारा  ९४६

साधकांशी हितगुज

साधकाचे नियम  ई


प्रसाद सेवन करीता। वेळ वृथा न जाता। काही करावे साधन। पापास भ्यावे रात्रंदिन। काही करावा नित्यनेम। मानसपूजा आदिकरून। स्वधर्म प्रपंच देह धर्म नित्यकर्म सांभाळून। अखंड करावे रामचिंतन। नामरूपी न चूके अनुसंधान। ऐसे अभ्यासिता होय ब्रम्हज्ञान। हाचि अभ्यास होता पूर्ण। सहज होय आत्मज्ञान।


आपले उपासना व्यतिरिक्त जो सांगेल ज्ञान। तो अंतरी जाणावा अधमाहून अधम। तो जरी असेल पंडीत,विद्वान ,शहाणा। तरी जाणावा मूर्खाचा राणा | भूतदया, नम्रता, जनप्रियत्व। निष्काम, निर्भय, गर्वरहित, निष्कलंक,निष्पाप। ही सर्व लक्षणे करूनि जतन। मुमुक्षूंनी करावे स्वधर्म आचरण। नाम रूपी लावावे मन। कोण प्रसंग कसाही आला। तरी विसरू नये नामरूपाला। देहबुद्धी स्फुरे स्फुरण। त्यासरशी रामनामाचे स्मरण। आधिव्याधी त्रिविध तापाचा प्रचंड घाला। ते क्षणी प्रेमप्रिती पुरस्सर। वैखरीने रामराम करावा उच्चार। ममते रहित गुणातीत रामलीला ठेवावे चित्त।


जिज्ञासूने जबरदस्तीने अभ्यासाचे जोराने वैखरीशी नामस्मरण चे वळण ठेवावे। साधकांनी अखंड नाम घ्यावे। सिंध्दानी नामरूप वागावे।


आशीर्वाद.

🌼🌷💧

   🌼🌷श्रीराम समर्थ🌷🌼


अमृतधारा  ९४७

साधकांशी हितगुज

परमात्मा व जीवाचे ऐक्य  अ


परमात्मा, परमेश्वर, सर्वोत्तम, निर्गुण, निष्कलंक, निरंजन | गुणरहित, मायातीत,अव्यक्त, अगम्य | तीन लोक,एकवीस स्वर्ग, चौदा भुवने | पंचतत्व ,पंचकोश, चंद्र, सूर्य, आकाश, पृथ्वी, वायु,ज्याने | निर्माण केली असा आदिनारायण | ओंकार रूप क्षराक्षरातीत, उत्तम | पुरूष, प्रकृती, आदिशक्ती ज्याचे पदाक्रांत | सर्वशक्ती, सर्वसत्ता,अद्भुत, |अतर्क्य ,कोणाही न कळे त्याचे नाम, रूप, धाम,स्वरूप त्याचेच मी जाणीव मूर्तीमंत | परि तो मी नव्हे हे सत्य सत्य | ते स्वरूप विकाररहित गुणातीत | तोच मी असता पदच्युत | होऊन व्यक्तरूप झालो जीव |


तो असा की, न बोलता ये स्पष्ट म्हणून देऊ दृष्टांत.

एक मनुष्य निद्रिस्त झाला. तोच देह असोनी जागृतीचा विसर पडला. स्वप्नामाजी पुष्कळ व्याप केला. परी मी कोण कोठील हे न कळे त्याला.

आप्त सखे आहेत मला. दिवस रात्र न कळे त्याला. दिवसा स्वप्नात म्हणे रात्रीचा प्रसंग आला. रात्री म्हणे सूर्य माध्यानकाल आला.


आशीर्वाद.

🌼💧🌷

   🌼🌷श्रीराम समर्थ🌷🌼


अमृतधारा  ९४८

साधकांशी हितगुज

परमात्मा व जीवाचे ऐक्य  आ


ऐसा मी जीव भ्रमरूप भ्रमला | स्वस्वरूप वस्तूसी भुलला | यमविधीचा घाला आला लक्ष चौऱ्यांशी योनी माळा | वासनात्मक बांधूनी गळा | जन्ममृत्युचे दुःख भोगी वेळोवेळा | महासंकट विचित्र मायेची कळा | अतिदुःखी, त्रिविध ताप, आधिव्याधी | मोहमाया, देहाभिमान, अज्ञानपण | ह्यांचे नांव जीव जाण | प्रकृती पुरूष साक्षी व्यापकत्व  असुन | वेगळे राहण्याची जाणे खूण |


पंचतत्व पंचकोश पंचप्राण | पंचकर्मेद्रिये पंचज्ञानेद्रिये ओंकारपंचक | आता सर्व ब्रम्ह होतील एक | चारी देह, चारी वाचा, चारी अवस्था, तीन गुण (रज तम सत्व) प्रकृती, पुरूष, जीवजाती "एकोहं बहूस्याम" असे व्हावे.


आशीर्वाद.

🌷🌼💧

   💧🌼श्रीराम समर्थ🌼💧


अमृतधारा  ९४९

साधकांशी हितगुज

गुरूकृपेचे साधन  अ


श्रीगणेशाय नमः। श्रीमारुतीराया नमः। श्रीरामरामाय नमः। श्रीजानकीवल्लभाय नमः।

श्रीउमारमणाय नमः। श्रीदत्तात्रयाय नमः। श्रीरूक्मीणीपांडुरंगाय नमः।

सन्तसाधु ऋषीमुनी।  भगवद्भक्त तत्वज्ञानी। सद्गुरु मातापिता। वंदूनी तयांचे चरण। सकलतीर्थासी लोटांगण। वेदमूळ ओंकार। तयाआधी हरीरामकृष्ण सर्वेश्वर। निर्गुण निरंजन साकार। तयासी माझा नमस्कार। मनुष्य देह बहु दुर्लभ। पुन्हा नाही ऐसी वेळ। म्हणून जिंका कळीकाळ। ज्ञानभक्तीचे उपाय। प्राप्त होती लवलाहे। जीवनमुक्तचि होय जीव। चौदा विद्या चौसष्ट कला। सर्व साधनांचे फळ। गुरूकृपेसी प्राप्तता। सांगेन ते ऐक आता।


प्रथम वैराग्य अंतरी। द्रुढव्रत ब्रम्हचारी। निर्भय चित्तवृती। अक्रोध दया शांती। स्वधर्म सदा रत। स्नान संध्या निष्ठावंत। शरण जात रामपाया। करी दिनावरी दया। श्रवण भजन कीर्तन। निजध्यासी लावी मन। जन्मा आल्याचे फळ। स्वधर्म करी जतन। परोपकारी देई प्राण। आश्रमाप्रमाणे आचरण। शत्रुमित्र एक जाण। निरूद्योगी न करी पिंड पोषण। मातापिता बायका मुले यांचे करावे यथाशक्ती रक्षण। हे एक भाड्याचे काम। यासी अंतर पडू नये जाण। जो वरी देहाभिमान तोवरी पाहिजे आत्मानुसंधान। ज्यासी देहाभिमान सरला। त्यासी हा भाग नाही उरला।


आशीर्वाद.

🌼🌷💧

   🌷🌼श्रीराम समर्थ🌼🌷


अमृतधारा  ९५०


साधकांशी हितगुज

गुरूकृपेचे साधन  आ


देहाभिमान करी निरसन। मनोवृत्ती ठेवी आधीन। नामस्मरणी काढी वेळ। नसे चित्तास तळमळ।  शत्रुमित्र एक जाण। नसे मानापमान। सदा राहेन समाधान। गर्वरहित ज्याचे मन। शुध्द चित्त निर्मळ भाषण। सर्व काळ विषय सन्निध असता। क्षोभ न होय ज्याचे चित्ता। धैर्य बळाचा स्वामी।  शुध्द निर्मळ अंतर्यामी।  अंतरबाह्य शुध्द मन। न करी कोणाचे खंडन। न पाही गुणदोष। सदा दौरा उदास।  धन धैर्य दाता।  दिनालागी मातापिता। न करी काही हिंसा।  मनी सत्याचा भरवसा। न धरी मानवाची आस।  नाम जसे श्र्वासोश्र्वास।  निष्ठावंत भगवद्भक्त।


नीच संगतीचा त्रास। संत चरणी रहिवास। देह प्रारब्धावर टाकी। जे होईल तो आनंद मानी।  यत्न प्रयत्न करावा। शेवटास न गेल्याचा खेद नाही करावा।  नाशिवंत संसारात खेद केला , तर परमार्थात काय उरले। परमार्थ न होईल हा खेद। आणि होईल तो आनंद।


आशीर्वाद.

💧🌷🌼

   🌷🌼श्रीराम समर्थ🌼🌷


अमृतधारा  ९५१

साधकांशी हितगुज

गुरूकृपेचे साधन  इ


सोडून षड्रिपूंचे बंधन। जागृत ठेवी मन। आत्मवत विश्व मान। रामनामावाचून एक पळ न पडे अंतर।  ऐसासाधी वेळ। जिकडे तिकडे जात दृष्टी। रामरूप पाहे सृष्टी।  पशु पक्षी खल दुष्ट दुर्जन कैसे समजावे। अहंभाव नसता कलेवर। स्वानंद नाम निरंतर। अहंब्रम्ह म्हणू नये आपण।


जाणावे तितके मीपण।  मीपण हेच अज्ञान।  सर्व साधने साधल्याची खूण। दया, शांती, नम्रता।  जितेंद्रिय अजिंक्य मन। आली ऊर्मी करावी जतन।  गर्वरहित मन।  जनप्रियत्व सत्य भाषण। निर्लोभ वासनारहित। मदमत्सर नसे मनात लेश।  गुरूवचनी विश्वास। सुखदुःख मानापमान। परनिंदा परधन। परपीडा परदारा परदोष दुर्गुण। वादविवाद श्रेष्ठाचार। दंभ प्रीती शोक कपट। याचा कधी नसे विटाळ। नामस्मरण सर्व काळ।


आशीर्वाद.

🌷💧🌼

   💧🌷श्रीराम समर्थ🌷💧


अमृतधारा  ९५२

साधकांशी हितगुज

सर्व साधनाचें साधन


सर्व साधने पूर्ण करावीत. नंतर पुढे श्रीरामाची सगुण मूर्ती ठेवून मनाने जप करावा. आणि प्रकृती रूप जीव यास साक्षी ठेवून मीपणा  जीवाचा जीव अगदी गाळून टाकावा. मीच राम आहे व विश्व अवघे मम रूप आहे असे द्रूढ करून परेचे मूळाने जप करावा  जाणावा नंतर रूप नाही, विश्व नाही देहगलीत राहावे.  सर्व निराकारापासून आहे असे जाणून मी मुरवणे. आणि सांगितले तसे वागावे म्हणजे झाले.


प्रथम साधना वृत्ती जाग्यावर असावी. दुसरे साधनास निरिच्छ असावे.  तिसरे साधनास कल्पना रहित व्हावे. कल्पना अंतःकरणाचे मूळ आहे.  मुळापासून तीन देहास विसरून जाणे.


देहाचे धर्म सोडून द्यावे. मग स्वस्थ जगात वागावे तोपर्यंत कर्माचा न चुकेल गोवा (गुंता). प्रपंचाचा जोंवर बोजा ये माथा, तोवर कर्म करावे सर्वथा.


आता ऐका कर्माचे विधान. एक देशी ध्यान. मुख्य दुजेपणाचा मोजावा भास. मग तत्वज्ञानास नाही अवकाश. म्हणून दृश्य सारे अशाश्वत. पदार्थावर तृष्णा राहू नये.


आशीर्वाद.

🌷🌼💧

   🌷💧श्रीराम समर्थ💧🌷


अमृतधारा ९५३

साधकांशी हितगुज

अभ्यास  अ


श्री गुरू प्रसन्न।

तुला सांगतो प्राणाहून करी नित्य अभ्यास। प्रथम पाहिजे एकांत स्थान। ते कोणते? मनास न होय चंचलपण ते।  सकल वृत्तीस आवरून।  चित्तापासून करावे स्मरण। दोन अक्षराची खूण।

सोडून विषयाचा संबंध।

एक रामनामाचा बोध।

ममत्व अभिमान सोडून आधी। दृश्यमात्राचा त्याग। बुध्दीला इंद्रियामधून वीट। मन अंतरी नेऊन स्थिर करी। जी जी वृत्ती उठेल लहरी।

ती बसवावी नामावरी।

करून रामनामाचा गजर। वृत्ती मारावी ठार।

मन षड्रिपूंचे हाती पडे।

विवेके त्यांचे न लागू द्यावे वारे।


येणे अभ्यासे स्थिरावे मन।  जिकडेतिकडे मन वावरे।

तिकडून माघारी आणावे।

मन जो विषय धरी।

तो आपण मानावा वैरी। वैरीयास न करीती साह्य। ऐसा प्राणीमात्राचा स्वभाव। ऐसे स्वरूपाने नामाशिवाय मन न जाय कोणीकडे।

मग आत्मज्ञान झाले उघडे। पुढे निरालंब नाही।

ऐसे पिपलिका मार्गे जाई।


आशीर्वाद.

🌷💧🌼

   

   🌼🌷श्रीराम समर्थ🌷🌼


अमृतधारा  ९५४

साधकांशी हितगुज

अभ्यास  आ


ऐसे पिपलिका मार्गे जाई। त्यासी जन्म मृत्यू नाही। मी कोणाचा कोण। मी आलो कोणीकडून? मी जातो कोठे? करतो काय? मला काय पाहिजे? काय नको? माझे कोण आहे? मी कोणाचा आहे? जग कोण? देही कोण?


प्रथम मी कोण हे जाणावे। वासना रूपी स्फुरण।

त्या मार्गाने आलो। तोच दृढ होऊन बद्ध मार्गाने जातो। आणि जन्ममरणास पात्र होतो।


तर तसे नाही करता जसा पूर्ण पाया अगोदर होता। तसाच आता राहिला पाहिजे। जन्ममरणातून मुक्त झालो।

मला आत्मा अनुभव पाहिजे। अहंभाव आणि वासना नको। माझे कोणी नाही। मी कोणाचा नाही  जग आणि देह हे अगदी माझे नाही। अशाश्वत आहे। ब्रम्ह निर्गुण निराकार झाले साकार। विश्व भरूनही उरला  प्रकृतीमुळे जीव झाला।पाप राशी भरूनी। विसरला आपणासी। मायाभ्रमे जाय नरकाशी। जीव अज्ञान पापराशी। कलंक नाही परब्रह्मासी। जिवापासून आहे दूर। म्हणून घ्यावे परमज्ञानाचे सार।


आशीर्वाद.

🌷💧🌼

,   💧❗श्रीराम समर्थ❗💧


अमृतधारा  ९५५

श्री महाराजांसोबतचा

बोधप्रद संवाद  अ


श्री महाराजांनी स्थूल देहाचे विसर्जन शके १८३६ मार्गशीर्ष कृष्ण १० ला केले.

त्या पुर्वी दोन दिवस  कै. काका फडके. भाऊसाहेब फाॅरेस्ट.  नागेशराव देशपांडे. बळवंतराव आटपाडीकर. श्रीमहाराजांचे दर्शनास सूर्योदयाचे सुमारास

"श्री" निजले होते त्या खोलीत गेले असता, श्री काका फडके व श्री महाराज यांजमधे संवाद झाला तो

मार्गशीर्ष कृष्ण ०८, शनिवार

शके १८३६ रोजी.


श्री महाराज म्हणाले

"मी बरीच वर्षें तुमचे कल्याण कल्याण करून घ्या असे सांगत आहे, परंतु तुम्ही कोणी माझे सांगण्याकडे लक्ष पुरविले नाही".


तेव्हा काका फडके म्हणाले

पूर्वकर्म (संचित) ज्या प्रमाणे सूत्रें हालवील तेवढ्याच गोष्टी आम्हां जीवांच्या हातून होणार आहेत.


श्रीकृष्ण म्हणतात   भ्रामयन्सर्वभूतानि

यंत्रारूढानि मायया |

त्याचा अर्थ काय?


श्री महाराज

हा श्लोक खरा आहे. परंतु संचित त्रयी बाजूस सारणे हे साधकाच्या साधनावर आहे हे सत्य समजावे.


..... २

    + () 

   ‼💧श्रीराम समर्थ💧‼


अमृतधारा  ९५६

श्री महाराजांसोबतचा

बोधप्रद संवाद  आ


श्री काका

श्री ब्रह्मानंद हे गुरुकृपेंतले असतां त्यांचे ठिकाणी संचित संबंधी कुष्ट कां रहावे ?

यास्तव संचित सारता येत नाही असे दिसते.


श्री महाराज

ब्रम्हानंद शरण आला त्यावेळी त्याचे अंगावर कुष्ट होते. पुढे काही दिवस माझे वचनांवर पूर्ण विश्वास ठेवून साधन करीत असतां एके दिवशीं त्याचे अंगावरील कुष्ट

नाहिसें करावे अशी त्याजकडे पाहून सुप्रसन्न अंतःकरणाने

मला इच्छा झाली..


तेव्हां त्यास हाक मारून

"तुझे कुष्ट नाहीसे करतो" म्हटल्यावर तो हात जोडून प्रार्थना करून म्हणाला

"मी आहे असाच असल्याने परमार्थास आच्छादन आहे. एवढे कृपा करून असावे".

म्हटल्यावरून..

"तथास्तु. तुझे इच्छेप्रमाणे आहे तेवढेच राहील".

असे सांगितलेवरून न वाढता तेवढेच राहिले

हे तुम्ही पाहतच आहा.


"हेच काय पण, माझे आज्ञेप्रमाणे वागला असतां प्रत्यक्ष काळाची देखील मगदूर नाही कि तो तुमचेकडे पाहील !!!  मग संचित क्रियमाणाची कथा ती काय !! "

(या प्रमाणे छातीस हात लावून ते उदगारले. )


....   ३

   💧❗श्रीराम समर्थ❗💧


अमृतधारा  ९५७

श्री महाराजां सोबतचा

बोधप्रद संवाद  इ


श्री काका

साधक साधन करू लागला म्हणजे मध्ये नाना प्रकारचे अडथळे उत्पन्न होतात व ते साधन सुटते. अडथळे बाजूला करून साधन करणे त्याला अशक्य होते.


याविषयी श्रीकृष्ण म्हणतात


बहूनां जन्मनामंते

ज्ञानवान्मां प्रपद्यते  |


श्री महाराज

बरोबर आहे. पण असे आहे मध्ये जे अडथळे येतात ते ध्यान, धारणा, आणि अनुसंधान ठेवले म्हणजे आपोआप दूर होतात.


श्री काका

आपले आज्ञेप्रमाणे क्रम ठेवला तर अडथळे दूर होतील हे खरे, परंतु उत्तम  साधक आपण चांगला म्हणता तो सुद्धा आज्ञा उल्लंघन करून मार्ग सोडू लागतो याचे कारण काय?


या वरून श्रीकृष्णाचे

म्हणण्यास


मनुष्याणाम् सहस्रेषु

कश्चिद्यतति सिद्धये|


या श्लोकाप्रमाणे सत्यत्व येते.


....... ४

   ‼💧श्रीराम समर्थ💧‼


अमृतधारा  ९५८

श्री महाराजांसोबतचा

बोधप्रद संवाद  ई


श्री महाराज

मी ज्याला चांगला म्हणतो तुम्ही त्याला जास्त किंमत देता, मी देत नाही. तथापि

तो कसाही असला तरी त्याला एक दिवस मार्गावर आणिनच आणीन.


यास उदाहरण

रहिमतपूर येथील एका

मामलेदाराची बायको मोठी दुर्गुणी होती. मामलेदार मोठा सज्जन असे. एके दिवशी माझा मुक्काम सहजी रहिमतपुरी पडला. मामलेदाराने आग्रहाने जेवण्यास ठेवून घेतले. बरीच मंडळी पंक्तीस होती. त्याच दिवशी परस्थ दोन आगंतुक आले. त्यासहि येण्यास सांगितले. त्याप्रमाणे ते आले असतां त्या बाईने त्यांना माघारी फिरविले. काय हा निर्दयपणा !!  ही गोष्ट माझे कानावर आली. मला सुद्धा आश्चर्य वाटले.  ते दोघेही नवरा बायको माझे अनुग्रहीत होते. पुढे ते आगंतुक मज बरोबर येऊन जेवले. परंतु ही गोष्ट माझे मनात राहिली.


या विषयी तिजकडे थोडे लक्ष पुरविल्यावर ती आपले नवर्‍याचे आज्ञेत वागून तिचे ठिकाणी उत्तम सत्वगुण, भूतदया, शांती वगैरे प्रगट झाले  व ती सर्वकाळ नाम चिंतनात निमग्न असे.  ही लक्षुमीबाई तुमच्या माहितीची आहेच.


........ ५

   ‼💧श्रीराम समर्थ💧‼


अमृतधारा  ९५९

श्री महाराजांसोबतचा

बोधप्रद संवाद  उ


श्री काका

साधकास साधन करीत असतां मध्ये अडथळे कोण आणितो?


श्री महाराज

साधकाची वृत्ती किती बाणली आहे हे पाहण्याकरिता अडथळे मी आणतो. आता रात्र थोडी आहे. तुम्ही आपले कल्याण करून घ्यावे.


श्री काका

सद्गुरु वचनांवर विश्वास, नामस्मरणावाचून दुसरे श्रेष्ठ साधन नाही हा पुरा भाव ठेवून अनुसंधान चुकू न देता नामस्मरण करणे ही चर्चेमध्ये सार्वत्रिक आज्ञा आहे. यावरून साधकांनी एवढाच क्रम ठेवला तर त्याचे काम होईल काय ?


श्री महाराज

जी सार्वजनिक आज्ञा केली त्याप्रमाणे क्रम चालू ठेवावा. अनुसंधान चुकू देऊ नये. अशातर्‍हेने (सतत नामस्मरण करीत) क्रम चालू ठेविला असतां कितीहि अडथळे, कितीहि संकटे आली तथापि ती सर्व  श्रीराम दूर करून तुमचे कल्याण करील, हा माझा पूर्ण आशीर्वाद.


आशीर्वाद


🌷💦🍁🍀🍁💦🌷

   🌷🙏??श्रीराम समर्थ🙏🏻🌷


अमृतधारा  ९६०


सत्संगती अती अपूर्व काम करणारी आहे. ज्याचे भाग्य असेल त्यालाच ती लाभेल.


सद्वासना आणि सद्विचार ही शिकायची असतात.


संतांच्या संगतीत आपण गेलो की आपले कर्तृत्व संपले. दवाखान्यात गेलेला रोगी जसा डॉक्टरच्या स्वाधीन असतो, तसे आपण संतांच्या घरी गेल्यावर त्यांच्या स्वाधीन होतो.


सत्संगतीमध्ये असताना आपल्याजवळ दोष आहे असे ज्याला कळेल तो लवकर सुधारेल.


आपण ज्या सत्पुरुषाकडे जातो त्याने सांगितलेले मनापासून आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न केला तरच त्याच्याशी खरी संगत केली असे म्हणावे.


आशीर्वाद

🙏🏻🌷🌼

   🙏🏻🌷श्रीराम समर्थ🌷🙏🏻


अमृतधारा  ९६१


भगवंताच्या प्रेमाशिवाय सर्व वाया आहे. ते प्रेम आतून यावे. असे प्रेम यायला सर्व लक्ष एका बाजूला लागले पाहिजे.


अत्यंत गुह्यातले गुह्य जे आहे ते मी तुम्हाला सांगतो  नामाचे प्रेम हेच ते गुह्य होय.


भगवंतावर अत्यंत निष्ठा ठेवा, प्रेम ठेवा. भगवंताचे प्रेम एकदा चिकटले की त्याच्या आड दुसरे काही येत नाही.


भगवंताचा आनंद हा फार बलवत्तर आहे. तो एकदा मिळाल्यावर प्रपंचतल्या लाभहानीचे महत्त्व वाटत नाही.


तोंड गोड करायला जशी साखर खावी लागते तसे आनंद प्राप्त व्हायला नाम घ्यावे लागते. नाम हे प्रेमरूपच आहे आणि खरा प्रेमाचा व्यवहार म्हणजे देणेघेणे हा होय; म्हणून आपण नाम घेतले की भगवंताचे प्रेम येईलच.


आशीर्वाद

🌼🌷🙏🏻

   💧❗श्रीराम समर्थ❗💧


अमृतधारा  ९६२

अ नु ग्र ह


आपण भगवंताचे आहोतच. पण या संस्काराने, म्हणजे अनुग्रहाने ती जाणीव उत्पन्न केली जाते.


अनुग्रहाने थोडी जबाबदारी उत्पन्न होतेच. या देण्याघेण्यास फारसे महत्त्व नाही, व देणार्‍यालाही महत्व नाही.


नाम घेतो असे म्हणतो

तो कोणीही असला तरी मला आनंद होतो.


माझेकडून नाम घ्यावे असे तर मला कधीच वाटत नाही किंबहुना "मी नाम देतो" असे ज्याला वाटत नाही, अशी ज्याला जाणीव नाही तो देणारा चांगला.


ज्याला भगवंताची गरज वाटली तो घेणारा चांगला. मी नाम देतो असे मला कधीच वाटले नाही.


भगवंताचे नाम त्याच्याकडूनच येते. मधला कोण आहे हे महत्वाचे नाही. नळातून पाणी येते पण ते नळातून येत नाही, मूळ तलावातील पाणी असते.


मधला संबंध सुटला तर नळाला पाणी येत नाही. नळाला जितकी किंमत तितकीच मधल्या नाम देणार्‍याला आहे.


कोणाकडून ही नाम घेतले तरी हरकत नाही. नाम घेणे महत्त्वाचे आहे. ते घेण्याने मला फार आनंद होतो.


नाम घेतो असे म्हणणारा मनुष्य पाहून मला अतिशय आनंद होतो.


आशीर्वाद

   🌿🌸श्रीराम समर्थ🌸🌿


अमृतधारा  ९६३

(रामकृष्ण जन्मोत्सव)


उतरायला (राहायला) जागा असावी. खायला अन्न असावे. आणि राम नाम घ्यायला वेळ असावा. म्हणजे उत्सव.


आज इतके वर्ष आपण रामजन्माचा उत्सव करतो पण आपण जसे होतो तसेच आहोत.


आपल्याला विषयाचे प्रेम आंधळे करते म्हणून रामाच्या जन्माने प्रकाश व सुख प्राप्त होत नाही.


येथील म्हणजे गोंदवल्याचा राम विशेष आहे. त्याच्या दर्शनाने जर त्याचे प्रेम लागले नाही तर आपल्यात विषयाचे प्रेम अजून कायम आहे असे समजावे.


हा राम आरशासारखा आहे. त्यात आपण कसे आहोत ते बरोबर दिसते.


राम खरोखरच जन्माला आले तर आपले दुःख काळजी नाहीशी झाली पाहिजे. नाहीतर कालचा दिवस आजचा दिवस आणि उद्याचा दिवस यात काहीच फरक नाही आपण राम जन्मापूर्वी जसे होतो तस्सेच राहिलो.


रामजन्म खरा प्रत्येकाच्या हृदयात झाला पाहिजे. म्हणजे माणसाची काळजी व दुःख जाईल. असे होईल तेंव्हा गोंदवल्याची अयोध्या होईल यात मुळीच शंका नाही.


आशीर्वाद.

🙏🏼🌸🙏🏼

, ☘🌷श्रीराम समर्थ🌷☘

अमृतधारा  ९६४

(गुरु पोर्णिमा उत्सव)


आपण किती कष्ट करून गुरुपोर्णिमा उत्सव साजरा करतो. पुजाअर्चा भजन आदि करतो. हे  तर खरेच चांगले आहे.


पण या सर्वांचा उद्देश काय? आपण एखाद्या माणसाचा गौरव करतो तो खरोखर त्याच्या देहाचा नसतो तर त्याच्या अंगी असणाऱ्या कोणत्यातरी गुणाचा असतो.


म्हणजे आपण तो गुण मानतो. त्याचप्रमाणे या पूजेचा अर्थ हाच की ज्याने ज्याने आज पुजा केली, तुलसीपत्र वाहिले, त्याने त्याने त्यांचे सांगणे, वागणे मानले असा कबुली जवाबच दिला आहे.


मग आता त्याप्रमाणे वागणे जरूर आहे. तसे वागले तर पुजा केल्याचे श्रेय आहे. नाहीतर इतर बोलण्याच्या कार्यक्रमापैकी हा एक असे होईल.


आपण देवाची पूजाअर्चा करतो. पण त्याचा विश्वास  वाटत नाही. पण त्यामुळे त्याचा आधार वाटत नाही. देवावर आपली निष्ठा नसते.


बाकी सर्व असून नाम राहत नाही. "मला नामात रहायचे आहे". म्हणून मला वेळ नाही असे झाले  पाहिजे.


आशीर्वाद.

   🔥☘श्रीराम समर्थ☘🔥


अमृतधारा  ९६५


नाम घेणे म्हणजे भगवंत आपल्याजवळ आहे ही जाणीव उत्पन्न करून घेणे. जवळ म्हणजे अगदी हृदयात तो असावा. नामाने तो प्रगटतो.


आपण नाम घेताना आपल्याला काही करायचे उरले असे समजूच नये. नुसते नाम मनापासून घेतले की पुढील अवस्था आपोआप येत जातात.


आपण आहोत तोपर्यंत भगवंताचे नाम घ्यावे. नामात इंद्रियांना निजवावे, म्हणजे देहाला विसरावे.


नाम हेच सत्य, हेच चांगले, हेच योग्य, हेच न्याय्य आणि हेच सर्व सद्गुणाचे भांडार होय. नाम हेच धन आहे.


नामाच्या सहाय्याने मन अंतर्मुख केल्यावर आनंद सापडतो. नामाकरता नाम घेतल्याने मन आपोआप अंतर्मुख होऊन जाते.


रोज काही तरी निमित्त काढावे आणि पुष्कळ पुष्कळ भगवंताचे नाम घ्यावे. नामाची ज्योत अंतःकरणात जळत ठेवली तर संत आपल्याला अचूक येऊन भेटतील.


भगवंताच्या नामाला कसलेही शरीराचे बंधन नाही. हेच तर नामाचे महात्म्य आहे. सत्संगतीत राहून नाम घेतले तर देह बुद्धीच्या कोंडीतून बाहेर पडता येते.


आशीर्वाद.

💥☘🌷

   🔥☘श्रीराम समर्थ☘🔥


अमृतधारा  ९६६


देहबुद्धी अशी और आहे की त्या निरुपाधिक नामाला आपण उपाधी जोडतो. त्या उपाधीवर नाम घेणे अवलंबून ठेवतो. असे न करावे.


कोणत्याही मनुष्याला कोठेही, कोणत्याही अवस्थेत, कोठेही नाम घेता येते. नाम अगदी बेंबीच्या देठापासून घ्यावे. जीव कळवळल्याशिवाय बेंबीपासून नाम येणारच नाही.


आपली वासना बेंबीपाशी आहे. भगवंताची खरी तळमळ लागल्याशिवाय जीव कळवळणार नाही. त्यासाठी आज जसे येईल तसे नाम घ्यावे. ते खोल शिरते.


नामस्मरणाची चांगली धुंदी आल्यावाचून मीपण जात नाही. मीपण गेले की जीव शुद्ध झाला. नामात प्रेम आले की भगवंताने कृपा केली.


माणसापेक्षा, संतापेक्षा नामाची संगती अधिक फायद्याची आहे. नामाची संगती निर्लेप व निर्भेळ आहे. त्याच्याविषयी विकल्प येणे शक्य नाही.


शिष्यावर कृपा करायची असेल तर संत त्याला आधी नामाचे प्रेम देईल. नामाच्या प्रेमाशिवाय भगवंत देखील अंतीम समाधान देऊ शकत नाही.


आशीर्वाद.

☘🌸🌼

   🔥💧श्रीराम समर्थ💧🔥


अमृतधारा  ९६७


कालचे विसरावे. उद्याचा विचार करु नये. आज नाम सोडू नये. परिस्थिती व भोग चुकत नाहीत, पण समाधान राहायचे असेल तर ते नामानेच टिकेल.


नामस्मरण सपाटून अखंड करावे. आपण साधनेत रहावे. भगवंताला नामाचे प्रेम इतके आहे की नाम घेतले की तो आलाच. गोपींनी ते केले.


नाम तेच भगवंत.

आपण गोपी झाले पाहिजे. भगवंताच्या उपकाराची फेड त्याच्या नामाने करायची. गोपींच्या प्रेमाप्रमाणे नामात वृत्ती गुंतून राहिली पाहिजे.


जगात नामाने नामाशिवाय दुसरे काही मिळवायचे नाही. नाम घेताना येणारे अनुभव नामाचा मार्ग बरोबर आहे हे दर्शवतात. पण ते काही सर्वस्व नाही.


नामाने शंका व भीती नाहीशी झाली पाहिजे. नामात चूक होतच नाही. त्याचे फळ शेवटचे साधायचे असेल तर अंतकाळी नाम साधायचे.


डोळे उघडे ठेवूनही जग नाहीसे होईल तर ते नामानेच होईल. हंसावे, खेळावे, भजन करावे, पण नाम सोडू नये. नामाची निष्ठा जबर ठेवावी.


आशीर्वाद.

🌸🌺🌼

   🔥💧श्रीराम समर्थ💧🔥


अमृतधारा  ९६८


नामाचा मोबदला भगवंतच. नामाचे प्रेम येण्यास सर्व परमात्मरुप म्हणून चांगले वाईट पाहू नये. मी भगवंंताचा तसे जग भगवंताचे ही वृत्ती पाहिजे.


नामस्मरण समजून करावे. समजून म्हणजे राम कर्ता या भावनेने. या भावनेने जो राहील त्याला आनंदापासून वेगळे राहताच येणार नाही.


भगवंत निर्लेप आहे. नाम निर्लेप साधन आहे. तसा मी निर्लेप झालो पाहिजे. नाम निर्लेप आहे. म्हणून शरणागतीला एकमेव साधन आहे.


संत नामाशिवाय राहत नाहीत. नामामधें संत आहेत. संताना नामाची आवड आहे. नाम जेथे आहे तेथे संत धावत येतील. नामात संत समागम आहे.


नाम घेणे म्हणजे भगवंताचे स्मरण. शेवटी नाम बरोबर येईल इतके नाम स्मरावे. मी भगवंंताचा असे सारखे स्मरण पाहिजे. हाच नाम स्मरणाचा अर्थ.


नाम अति सूक्ष्म साधन आहे. ते आंत घ्यावे. त्याचा अति सूक्ष्म परिणाम होईल तो दिसणार नाही. नामाचे प्रेम अचाट आहे.


आशीर्वाद.

☘🌼🌷

   🔥💧श्रीराम समर्थ💧🔥


अमृतधारा  ९६९


मी नाम देतो अशी ज्याला जाणीवच नाही तो नाम देणारा चांगला. मी नाम देतो असे मला कधीच वाटले नाही.


राम आपल्याबरोबर यावा असे ज्याला वाटते त्याने सतत नाम घ्यावे. जेथे नाम तेथे राम राहील. रामाला कोंडायला त्याला हृदयात ठेवावा.


नाम घेणे खरे भाग्याचे लक्षण आहे. नाम घेतो तो मला पूज्य आहे. आता सांगणारा भेटेल असे समजू नका. नामाला चिकटून राहा.


भगवंताचे दर्शन घेण्यास शरणागती हा एकच मार्ग आहे व शरणागतीला उत्तम उपाय नामस्मरण. शरणागतीत फक्त इच्छेचे मरण आहे. ते नामाने साधते.


विचारांकडे दुर्लक्ष करून नाम घ्यावे. नामात सर्वस्व आहे ही भावना पाहिजे. कल्पना म्हणजे मायेचे हत्यार. कल्पना रहित थोडे नामही फळ देईल.


निर्गुणाला जुळे झाले नाम व प्रेम. प्रेम आले की नाम येते. नाम घेतले की प्रेम येते. यापैकी एक काहीतरी करावे.


खरे अनिर्वाच्य, स्वतंत्र, निरपेक्ष, स्वतःसिद्ध असे फक्त नाम आहे. ते एक अनुभवाने कळेल किंवा निष्ठावंत सहवासाने तरी कळेल.


आशीर्वाद.

🌷🍀🔥

   ☘🌸श्रीराम समर्थ🌸☘


अमृतधारा  ९७०

शरणागती  १


(आ.श्री नितीन सामंत

यांचे कडून)


जय श्रीराम 🙏🏻


शरणागती,  मी काय लिहू?

श्रीमहाराजांच्या ईच्छेने जे विचार आले, ज्याप्रमाणे मी वागतो व तेच तुमच्यापुढे मांडतो.


पूर्वीच्या काळी एखादा सम्राट दुसऱ्या राज्यावर आक्रमण करण्याआधी त्या राजाला आव्हान देऊन वा त्याच्याबरोबर युद्ध करून त्या राजाला शरण यायला भाग पाडत असे.


शरण आलेला राजा सम्राटाचे मांडलिकत्व स्वीकारल्यानंतर सर्व राज्यकारभार पूर्वीसारखाच चालू ठेवत असे पण आता तो त्या सम्राटाच्या नावाने तेच काम करू लागे.


त्याला ही जाणीव पुरेपूर असे की जे काही त्याच्याकडे आहे ते त्या सम्राटाचे आहे व ते राज्य हे त्या सम्राटाच्या ईच्छेप्रमाणे चालवणं हे त्याचं कर्तव्य आहे. सध्या आपलं राज्य खोट्या ‘मी’ पुरतचं आहे व आपले सम्राट साक्षात श्रीमहाराज आहेत.


🙏🏻🌷☘             २

   ☘🌸श्रीराम समर्थ🌸☘


अमृतधारा  ९७१

शरणागती  २


श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या प्रमाणे “गुरु हा संत कुळीचा राजा”

ते आपल्यापेक्षा आपला राज्यकारभार नक्कीच चांगला करतात. आपले सम्राट आपल व आपल्या प्रजेचं हीतच करणारे आहेत व त्यांना आपले हित करण्याबद्दल आस्था आहे.


त्यांना कल्पना आहे की आपल्याला कशाचेच ज्ञान नाही, त्यामुळे आणि आपल्यावरच्या प्रेमामुळे ते आपल्याला परत परत तेच तेच शिकवायला कायम तयार असतात. आपण त्यांच्या दृष्टीने शिकून पूर्ण तयार झालो की ते आपलं सर्व साम्राज्य आपल्याला देऊन टाकतात.


प्रत्येक दिवशी सकाळ पासून प्रत्येक गोष्ट सुरु करायच्या आधी व करून झाल्यावर त्यांच्या कानावर घालण्याने, ते कर्ता करविता आहेत ह्याची जाणीव कायम राहते व वाढत जाते.


त्या मांडलिक राजासारखं (आपण मात्र आनंदाने) त्यांचे होऊन राहावं. आपल्या आधी जे त्यांचे ‘मांडलिक राजे’ होऊन गेले ज्यांना त्यांनी आपलं साम्राज्य दिलं, त्यांनी अगदी गुरुकिल्ली आपल्याला देऊन ठेवली आहे, की ज्याच्या पालनाने ते आपल्याला त्याचं पूर्णपणे करून घेतील.


🙏🏻🌷☘.             ३

   ☘🌸श्रीराम समर्थ🌸☘


अमृतधारा  ९७२

शरणागती  ३


श्रीतुलासीदास म्हणतात

“जाऊ कहां तज चरण तुम्हारे”

तू सर्व अधमांना उद्धारतोस त्यामुळे तुझे पाय सोडून मी कोठे जाऊ? तुला तर सर्वांनी पतितपावन असं नावं दिलं आहे, तर मग मला दुसरीकडे जायचा प्रश्नच येत नाही. मी खरच अति दीन आहे, तर तू आता तुझं ब्रीद सांभाळ.

पूज्य ब्रह्मानंद म्हणतात

की बाकी काहीही करायची जरूरी नाही. फक्त सतत हरीनामाची जरुरी आहे.

श्रीमहाराज स्वतः म्हणतात

आजवर तुम्हा सांगितली मात |

नामाविण हित समजू नका ||

त्यांच्या कृपेने असं जाणवतं की सतत नामात राहणं व आपलं आयुष्य जगताना प्रत्येक गोष्ट करण्याआधी व करून झाल्यावर त्यांना सांगणं हा शरणागतीचा एक मार्ग होऊ शकतो. ह्यामध्ये आपण आपला राज्य कारभार चालू ठेवायचा आहे ‘पण’ राज्य त्यांचं आहे ह्या अखंड जाणीवेने.

मी आपल्याला काय सांगू ? श्रीमहाराजांचच वाक्य सागणं चांगलं – आपले कर्तव्याला न विसरावे ।

भगवंताचे अनुसंधान राखावे ॥

व्यवहाराने योग्य ते कर्तव्य करीत जावे ।

बाकी रामावर सोपवावे ॥


🙏🏻जय श्रीराम

(नीतीन सामंत)


🙏🏼☘🌸.

   🙏🏼☘श्रीराम समर्थ☘🙏🏼


अमृतधारा  ९७३


श्री काकासाहेब फडके

आणि

श्री महाराजांचा शेवटच्या

दोन दिवस आधीच्या

संवादातील काही

महत्वाची वचनें.


संचीत त्रयी बाजूस सारणे

हे साधकांच्या  साधनेवर

आहे हे सत्य समजावे.


माझे आज्ञेप्रमाणे वागला

असतां प्रत्यक्ष काळाची

देखिल मगदुर नाही की

तो तुमचे कडे पाहिल मग

संचीत क्रियमाणाची

कथा ती काय !!


साधने मधे जे अडथळे

येतात ते ध्यान धारणा,

अनुसंधान ठेवले म्हणजे

आपोआप दुर होतात.


माझा माणूस कसाही असला

तरी त्याला मार्गावर

आणिनच आणीन.


साधकाची वृत्ती किती बाणली   हे पहाण्या करीता अडथळे मीच आणत असतो.


श्री महाराजांची साव॔त्रिक

आज्ञा, सदगुरु वचनांवर विश्वास, नामस्मरणा वाचुन दुसरे श्रेष्ठ साधन नाही हा पुरा भाव ठेऊन अनुसंधान चुकू न देता नामस्मरण करणे.


श्रीं चे आश्वासन

अशा तर्‍हेने क्रम चालू ठेवला

असता कितीही अडथळे कितीही संकटे आली ती सर्व

श्रीराम दुर करून तुमचे

कल्याण करील

हा आशीर्वाद.


🙏🏻💧🌷👣🌷💧🙏🏻

   🌼🙏🏻श्रीराम समर्थ🙏🏻🌼


अमृतधारा ९७४


तुम्हासी सांगावे काही |

ऐसे सत्य मजजवळ नाही ||


पण एक येते मनी |

नामापरते सत्य नाही नाही ||


तुम्ही सूज्ञ विद्वान भारी |

परमार्थाचे अधीकारी ||


तुम्ही करावे एक जतन |

नामावाचून न कोठे गुंतवावे मन ||


जेथे भगवंताचे नाम |

तेथे उभा श्रीराम ||


हे संताचे वचन |

न मानावे अप्रमाण ||


म्हणून सदा घ्यावे भगवंताचे नाम |

जेणे कृपा करील श्रीराम ||


...श्री महाराज.


आशीर्वाद

🙏🏻🌼🌿

   🙏🏻श्रीराम 🌷समर्थ🙏🏻


श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर


आपले सद्गुरु श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर हे होते तरी कोण? हे एक गूढच होते. परंतु ते गूढ उकलणारे त्यांचे स्वतःचेच असे मोठे सूचक बोल


सूर्य आणि त्याचे किरण जसे निराळे नाहीत त्याचप्रमाणे मी आणि भगवंत हे वेगळे नाहीत.


भगवंत अवतरला आहे. तो तेथे जन्मास आला आहे. अखंड स्मरणात ठेवा. ओंकार, ओंकार म्हणतात तोच मी आहे.


नाम म्हणजेच मी, म्हणजेच भगवंत होय.


रोज अगदी पांच मिनिटेंच कां होईना नामाने भगवंताशी म्हणजेच माझ्याशी अनन्य व्हायला शिका.


शेवटी सांगतो नामाला शरण जा. मी नामाहून वेगळा नाही. तुमच्या अंतकाळी मी उशाशी आहे.


।। जानकी जीवन स्मरण जय जय राम ।।


।। श्रीराम जयराम जय जय राम ।।


....९७५

   💧श्रीराम 🙏🏻समर्थ💧


अमृतधारा  ९७६


आपल्या आयुष्यातील मुख्य ध्येय जप करणे (नाम स्मरणे) हे आहे. हा दृढ निश्चय करून केवळ त्याच कामाकरता आपल्यास जिवंत रहावयाचे, बाकी सर्व गोष्टीस आपण मेलो अशी भावना ठेवावी. इतर गोष्टीस महत्त्व न देता पुढील जीवनात सातत्याने नाम स्मरणे हेच महत्वाचे.


सद्गुरुनी दिलेला मंत्र म्हणजे प्रत्यक्ष मूर्तिमंत सद्गुरु स्वरूप आहे. तो सतत बाळगणे (स्मरण करणे) म्हणजेच सत्समागम करणे होय. ब्रह्मज्ञान, भक्ती व सत्कर्म  सर्व तेच आहे.


सद्गुरुचे ध्यान धरून त्यांनी सांगितलेल्या मंत्राचा जप (नामस्मरण) करावे. शेवटी सद्गुरुची मूर्ति हृदयात ठेवावी, व वारंवार हृदयातील मूर्तिकडे लक्ष असावे.


तुमचा परमार्थ तुमच्या स्वाधीन नाही. तो सद्गुरुच तुमच्या करता करीत असतात. तेंव्हा तुम्ही कशाचीही काळजी करू नये. जे होईल त्यात आनंद मानावा. सतत नाम घेत रहावे.


सद्गुरु दर्शनाने पूर्व पापे जळतात. तुमची पुढची काळजी सद्गुरु घेतात. मागील आठवण करू नये, पुढच्याची काळजी करूनये. नेहमी आनंदात असावे.


आशीर्वाद.

🌼☘🌹

   💦🌷श्रीराम समर्थ🌷💦


अमृतधारा  ९७७


सर्व माझ्या इच्छेने घडत आहे, व तुम्ही जे करता ते मीच करवितो याचे स्मरण ठेवावे.


ज्याला काळजी वाटते तो देवाच्या उपासनेत नाही असे समजावे.


रिकाम्या वेळात नामस्मरण करतो. असे जो म्हणतो, त्याच्या साऱ्या जन्मात हाच महत्त्वाचा व सार्थकी लागलेला वेळ होय.


प्रपंचात परमार्थ होत नाही असे म्हटल्या जाते. मग प्रपंचच परमार्थ रूप करावा. तो देवाचा आहे असे समजावे. खरोखरीच तो तसा आहे म्हणून आसक्तीरहित,  आपलेपणा न ठेवता करावा.


नामस्मरण हे प्रपंचाकरता म्हणजे प्रपंच चांगला व्हावा म्हणून नाही. उलट ते प्रपंचाची आसक्ती कमी करण्यासाठी आहे.


पण त्याने (आसक्ती कमी झाल्याने) प्रपंच बिघडत नाही. जे होईल ते आपल्या भल्यासाठी आहे असे मानून परमात्म्यावर विश्वास ठेऊन वागावे.


आशीर्वाद.

🌷🌼☘

, 🌹श्रीराम🙏🏻समर्थ 🌹


अमृतधारा  ९७८


दासबोधाच्या समासात साधकाने दुश्चित्त असू नये म्हणून सांगितले आहे. पण दुश्चित्त न होण्यास काय करावे म्हणून सांगितले नाही काय?


सत्संग करावा म्हणजे दुश्चितता वाटत नाही. पण सत्संग करण्यास संत कोठे पहावयाचे? संत आपल्या सारखे देहधारी असतात काय?


पण दासबोध हाच सत्संग होणार नाही काय? तर तोच होईल. समर्थांनी सांगुन ठेवले कि, जो विश्वासाने हा ग्रंथ वाचील, त्याला माझा संग घडेल. म्हणून आपण संत देहात पाहू नये.


संत जे साधन सांगतात तेच ते असे समजावे. आपणास संत भेटल्यावर काही करायचे उरले आहे असे वाटताच कामा नये. ज्याला तसे वाटते त्याला संत व देव न भेटल्यासारखेच आहे.


साधुची लक्षणें वाचून ती त्याच्यामधे पाहत बसु नये. ती आपल्यात आणण्याचा प्रयत्न करावा. बाह्य वेषावरून किंवा लक्षणें पाहून साधू ओळखता येणार नाही. जशी साखर पाहून (खाल्या शिवाय) तिची गोडी कळणार नाही. साधू होऊनच साधूला ओळखता येईल.


आशीर्वाद

🌿🌼🌹

   💦श्रीराम 🙏🏻समर्थ 💦


अमृतधारा  ९७९


आई मुलाची एका जन्मापर्यंत म्हणजे देह आहे तोपर्यंत काळजी घेईल. परंतु गुरू हा जन्मोजन्मी तुमची काळजी वाहण्यास तयार असतो.


त्यास देह नाही म्हणून तो नाही असे समजू नका. तुम्ही दुश्चित्त झाला म्हणजे तो ही दुश्चित्त होतो. तुम्हास काटा लागला म्हणजे त्यासही त्याचे दुःख होते. म्हणून तुम्ही केंव्हाही दुश्चित्त होऊ नका. देहाचे भोग येतील जातील. तुम्ही सदैव आनंदात रहा.


तुम्हास आता काही करणे आहे असे मानु नका. गुरू भेट झाली म्हणजे तुम्ही काही करण्याचे उरतच नाही. गुरुला अनन्य भावे शरण जावे.


एक शिष्य गुरूला भेटला. तो आनंदाने नाचु लागला. तेंव्हा त्यास विचारले तुला आज एवढा कसला आनंद झाला आहे? तो म्हणाला मला आता आनंदाशिवाय काही उरलेच नाही. कारण मला आज गुरू भेटले.


त्यास खरी गुरूभेट झाली. तरी तुम्ही गुरूस अनन्य शरण जा म्हणजे तुम्हास काही करण्यास नको, (सांगितलेले साधन मात्र सातत्याने करावे).


आशीर्वाद.

🌼🍀🌹

   💦श्रीराम🙏🏻 समर्थ 💦


अमृतधारा  ९८०


मला तुम्ही नामात पाहाता म्हणजे काय ते तुम्हाला समजले काय? मी जेंव्हा देहात होतो असे तुम्हास वाटत होते तेंव्हा मी देहात होतो काय?


तुमची ज्या ठिकाणी वासना असते तेथेच तुम्ही खरोखर असता.


तुम्ही आता यात्रेकरता आला आहात, पण तुमचे मन जर घराबद्दल चिंतन करीत असेल तर तुम्ही यात्रेच्या स्थळी असुनही घरीच आहात असे होते.


तुम्हास कोणी विचारले, तुम्ही नेहमी कोठे असता? तर आम्ही विषयातच असतो. असेच सांगावे लागेल. ज्याला जे आवडते त्यातच ते असतात. हे खरे ना?


मग जर तुमचा गुरू कोठे आहे असे जर तुम्हास कोणी विचारले तर तुम्ही त्यास कोठे दाखवाल? तर मी नामात आहे, असेच म्हणाल ना?


जेंव्हा मी गोंदवल्यात होतो,  तेंव्हा मी देहात नव्हतो, नामातच होतो. मी ज्या देहात होतो असे तुम्ही म्हणत होता, त्या देहाची जर मला गोडी असती तर तो देह मी कां टाकला असता? तेंव्हाही मी जेथे नाम तेथेच असे,  (आणि आताही आहे).


आशीर्वाद

🌼☘🌹

   💦श्रीराम 🙏🏻समर्थ 💦


अमृतधारा  ९८१


गोंदवल्यास असताना मला जर मला दुसर्‍या कोणत्याही देहात जाता येत होते तर मी त्या एकाच देहात होतो असे म्हणणे कसे शोभेल? म्हणून मी देहात नव्हतोच, नामातच होतो व आताही मी नामातच आहे.


आता देह नसला तरी मी शब्दाने तुम्हास आहेच ना? एखाद्याचे डोळे नसले तर तो नाही असे होत नाही. तर मग आता देह नाही म्हणून मी नाही असे नाही. जेथे नाम आहे, जो नामस्मरण करतो त्याचे मागे पुढे मी उभा आहे.


मला तेथे जाणे भाग आहे. नामस्मरण करताना मला कसे पहावे ते तुम्हास सांगतो. चार तर्‍हेने मला पाहता येईल;

देहाने, मनाने, रुपाने आणि नामस्मरणाने.


जोपर्यंत तुमची देहबुद्धी गेली नाही तोपर्यंत मला देहानेच पाहणे चांगले. नामस्मरण करताना मला देहातच पहावे, नाही तर मनाने मला आठवावे.


नामस्मरणाने तुम्हाला मला आताच पाहता येणार नाही. कारण त्या वेळेस नामस्मरण करणारा व ज्याचे नामस्मरण करतो ते दोन वेगळे उरतच नाही.


आशीर्वाद

🌼☘🌹

   💦श्रीराम 🙏🏻समर्थ 💦


अमृतधारा  ९८२


एकदम चार पायऱ्या उडी मारण्याची हाव कशाला धरावी? आपण गुरुने सांगितलेले साधन करीत जावे म्हणजे साधनात पुढे वाट दाखविण्यास गुरु उभाच असतो.


जसे जेथे चार वाटा फुटतात तेथे पाटी असते. साधनात राहून जेथे चार वाटा फुटतात तेथपर्यंत या म्हणजे तेथेच गुरू उभा आहे. तो तुम्हास वाट दाखवीतच असतो.


उगीच काही न करता पुढे काय आहे हे विचारुन काय करायचे आहे? तुम्हांपैकी ज्याला जसे वाटेल तसे तुम्ही मला पहा. पण नामस्मरण मात्र नेटाने करा.


पुढचे सर्व मी तुमच्या करता करीतच आहे. म्हणून जितके नामस्मरणात राहता येईल तितके राहत जा म्हणजे झाले. हेच तुम्हास मला सांगावयाचे आहे.


तुम्ही नामस्मरण करताना मी जरी तुम्हाला दिसत नसलो तरी मी तिथेच असतो.

जेधे नाम तेथे माझे प्राण

ही सांभाळावी खूण


आशीर्वाद.

🌼☘🌷

   💦श्रीराम 🙏🏻समर्थ 💦


अमृतधारा  ९८३


माया म्हणजे परमात्म्याशिवाय जे ती माया. जे दिसते, नासते ती सर्व माया. आपण जोपर्यंत नामस्मरणात आहो, तोपर्यंत आपण मायेच्या बाहेर आहो. नामाचे विस्मरण जेव्हा होते तेव्हा आपण मायेच्या अधीन आहो असे समजावे.


माया ही शब्दावडंबर (वेग वेगळ्या, कठीण शब्दांचा उपयोग) करून सांगता येईल. जसे आंब्याचे चित्र दाखवून, त्याच्या आकाराचे, गोडीचे वर्णन केले तरी कुणाचे समाधान होईल काय?


पण तो आंबा प्रत्यक्ष तुमच्या पुढे ठेवला. तो तुम्ही बघून, हाताळून खाल्ल्यावर काही न सांगता तुम्हास आंब्याचे खरे ज्ञान होईल. म्हणून सर्व करण्यामधे, अनुभवण्यामधे आहे. नुसते ऐकण्यामधे नाही.


मायेची खरी ओळख मायाजन्य बुद्धी जाणू शकत नाही. जे नाही ते आहे असे वाटणे म्हणजे माया. ही सृष्टी मायेने केली आहे. ती भगवंतासारखी त्याची छायाच आहे. मन तिकडे नेले पण सावलीच्या सोपस्काराने समाधान होत नाही.


आपण देहाला सुखी करण्याचा प्रयत्न केला पण खऱ्या सुखाला अंतरलो. हा मायेचा पगडा जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत खरा सुखानुभव येणार नाही. तो येण्यासाठी भगवंताला धरले पाहिजे. त्यासाठी सातत्याने नाम घेतले पाहिजे.


आशीर्वाद.

🌼☘🌸

   💦श्रीराम 🙏🏻समर्थ 💦


अमृतधारा  ९८४


निर्गुणाचे कितीहि वर्णन केल्याने निर्गुण रुप समजण्या सारखे नाही. म्हणून सगुण रुपच आपण पहावे आणि त्याचे पूजन करावे. निर्गुणाची उपासना करतो असे जो म्हणतो त्याला निर्गुण म्हणजे काय ते समजलेच नाही. कारण तेथे सांगण्यास कोणी उरतच नाही.


सर्व वेदांत ग्रंथ वाचून जर समाधान लाभत नसेल तर ते ग्रंथ वाचण्याचा काय उपयोग? अशा वेदांताचे आपणास काय करावाचे आहे? आपण आपली भोळी भाबडी भक्तीच करावी. भगवंताला अनन्य शरण जाऊन त्याचे नामस्मरण करीत जावे म्हणजे सर्व काही मिळते.


जो जेवायला बसतो, तो माझे पोट भरावे असे कधी म्हणतो काय? जेवण झाले की पोट आपोआपच भरते. तसे आपण या वाचनाच्या वगैरे फारसे नादी लागू नये.


कारण त्याने खरे साधन बाजुलाच राहते व त्याचा (वाचनीय ज्ञानाचा) अभिमान वाटू लागतो. म्हणून थोडेसेच वाचावे. त्याचे मनन करावे. पण सर्वस्व तेच खरे असे समजू नये, (सद्गुरुने सांगितलेले साधन मात्र सातत्याने करावे).


आशीर्वाद.

🌼☘🌹

   💦🙏🏻श्रीराम समर्थ🙏🏻💦


अमृतधारा  ९८५


माझे होणे म्हणजे मी सर्वत्र आहे हे ओळखून जगात व्यवहार करणे. मला वाटते की तुम्ही माझे झाल्याशिवाय मला तुमचे होता येणार नाही. तरी तुम्ही माझे व्हा. नामाला न विसरता माझी आठवण सर्वाधिक ठेवणे, यालाच माझे होणे म्हणतात.


भाविकपणे जो मला शरण आला तो माझे भावाप्रमाणे मी म्हणतो. म्हणजे मी व तो यात अंतर राहत नाही. मला वाटते की तुम्ही माझे आहात. पण हे आम्हास ठाऊक असले पाहिजे.


तुम्ही माझे असला तर नामाला विसरून चालणार नाही. नामाला मी माझे प्राण समजतो. नामाशिवाय वेळ फुकट घालविणे म्हणजे माझी अवज्ञा करणे आहे.


जाता जाता मी तुम्हास एकच सांगतो की तुम्ही माझे झाला आहात, म्हणजे तुम्हाला कसलीहि काळजी करण्याचे कारण नाही. मी भावाचा भुकेला आहे. तो ठेवा, म्हणजे तुम्ही काय कराल ते मी आपलेसे करून घेईल.


चार दिवस झालेत. तुम्ही माझेकडे येत आहात, पण मी तुम्हाला काहीच प्रसाद दिला नाही. तरी मी तुम्हास सांगतो की तुम्ही माझे प्रसादातच आहात. तुम्ही माझे झालात म्हणजे मला वाटते की तुम्ही आणि मी दोघे  एकत्रच राहू.


आशीर्वाद.

💧☘🍁

  : श्रीराम 🙏

पहीला अनुच्छेद (पॅरिग्राफ) सर्वाधिक  सार्वत्रिक. 🙏🏻

   💦श्रीराम 🙏🏻समर्थ 💦


अमृतधारा  ९८६


शास्त्राप्रमाणे वागणे, त्यात व्यवहार सांभाळणे, त्यातच साधन न सोडणे यातच खरा परमार्थ आहे. हे तुम्हास चांगले साधले आहे. तसेच वागत जा.


शास्त्र हे शेताचे कुंपण आहे. आतील पिकामधे वाढलले गवत काढून पीक सांभाळणे हे खरे काम आहे. नामस्मरण हे पीक सांभाळण्यासारखे आहे. शास्त्राने घालुन दिलेल्या मर्यादांचे उल्लंघन न करता वर्तन करणे हे कुंपणासारखे आहे.


मला वाटते की भक्तीभावाने सर्व गोष्टी जुळून येतात. तसेच निष्ठा असली म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ कळून येतो. गाणे ऐकताना मी भान विसरतो, म्हणजे मी त्यात तल्लीन झालो असे म्हणता येईल.


नामावर लक्ष ठेवल्यास तसेच होईल. याचा अर्थ एवढाच की नामावर विश्वास ठेवावा म्हणजे प्रचीतीला वेळ नाही.


नामी म्हणजे ज्याचे नाव आपण घेतो तो. त्यालाच नामी म्हणावे. व जो नाम घेतो, तोहि नामीच होय. म्हणजे दोन्ही एकरुपच आहेत.


आशीर्वाद.

🌷💦☘

   💧श्रीराम 🙏🏻समर्थ💧


अमृतधारा  ९८७


हृदयात परमात्मा आहे हे खरे. त्याची आठवण करणे म्हणजे माझे होणे आहे. याचा भावार्थ हा आहे की तुम्ही माझे झाल्याशिवाय सर्व गोष्टी कळण्यास फार कठीण जाते.


परंतु मी तुम्हास सांगून ठेवतो की तुम्ही माझे आहातच. त्यामुळे वेळ आली म्हणजे मी तुम्हास सर्व सांगेन. तुम्ही त्याचे मागे जाऊ नये. वैखरीने नाम घेणे म्हणजे यातायातीतून मुक्त होण्यासारखे आहे.


"वाचेने नाम व हाताने काम त्यास जोडे आत्माराम" हे माझे म्हणणे तुम्हाला ठाऊक आहेच. त्याप्रमाणे वागावे म्हणजे तुम्ही माझे व्हाल. तसे झाले म्हणजे मला तुम्ही आपले केलेसे होईल.


मी तुम्हास खात्रीने सांगतो की तुम्ही माझे झाला की मी तुमचाच आहे. फार काय सांगू, तुम्ही व मी दोन नाही. पण तुम्हास माझे सांगण्याप्रमाणे करणे आहे. (सतत नाम घेणे) ते तुम्ही केल्यास आपण दोघेही एकच आहोत.


आशीर्वाद.

🌷💧☘

  : < >

  : ' ... 


:...

   💧श्रीराम 🙏🏻समर्थ💧


अमृतधारा  ९८८


व्यवहारिक वा प्रापंचिक गोष्टी न ऐकण्याने गुरुद्रोह    होत नाही. सर्व काही करतो ते मी करतो असे मानून राहावे. आंधळ्यास जशी माशी दिसत नाही तसे गर्दीचे आत असेपर्यंत त्यातील मौज दिसत नाही. बाहेर आल्यावर पाहण्यास सापडते. तसे प्रपंचाची आसक्ती काढून तो देवाचा मानून संचिताचे कौतुक म्हणून ईश्वरी लीला पहावी.


प्रपंच देवाचा म्हणून अभिमानरहित करणे हा खरा परमार्थ. पण तो अभिमान धरून केला तर  तो खरा परमार्थ नाही. देवापाशी मागावे  ते म्हणजे "देवा तू मला आपला म्हण. माझे मन तुझे चरणी अर्पण होवो. मला तुझ्याजवळ काही मागण्याची इच्छा न होवो"  नाहीतर राज्य देण्यास समर्थ असणाऱ्या जवळ केरसुणी मागितल्या प्रमाणे होईल.


सार्थकी लागणारा कोणता वेळ असेल तर तो नामस्मरणात जात असणारा. नामस्मरणाने प्रपंच बिघडत नाही. पण नामस्मरण मात्र प्रपंचाकरता नाही. ते प्रपंचाची आसक्ती कमी करण्यासाठी आहे असे समजावे.


जे होईल ते आपल्या बऱ्या करता आहे असे मानुन परमात्म्यावर विश्वास ठेवून राहावे. ज्याला काळजी वाटते तो उपासनेत नाही असे समजावे.


आशीर्वाद.

💧🌼🌹

   🌼श्रीराम 🙏🏻समर्थ 🌼


अमृतधारा  ९८९


प्रपंच व परमार्थ एकदम होत नाही असे नाही. प्रपंचच परमार्थरूप करावा. प्रपंच देवाचा आहे असे समजून आसक्ती विरहित करावा. ज्या विषयात चित्त गुंतते त्यातून ते काढावे. नाहीतर तो विषयच देव बनतो व त्याचीच उपासना केल्यासारखे होते.


परमार्थात तळमळ (काळजी) सोडून वागावे. गुरु आज्ञेत असावे. मग ती आज्ञा साधनासंबधी का असेना. साधन सहज झाले पाहिजे म्हणजे ते प्राणा (श्वासा)  बरोबर असावे.


साधन काही साध्य नाही. काशीस पोहचल्यावर मजल (प्रवास) करण्याचे कारण काय? देवळात रामाचे दर्शन घेण्याचा जीवापलीकडे नेम केला व इकडे राम प्रत्यक्ष आपले घरी आले, तरी हा  नेम म्हणून देवळात जाण्यासाठी निघाला तर त्यास काय म्हणावे?


साधन करता कामा नये.

(मी करतो असे समजू नये),  करणे म्हणजे अभिमान आला. साधन सहज प्राणा (श्वासा) बरोबर झाले म्हणजे ते अखंड चालले असते. मग अशा स्थितीत होत नाही म्हणून तळमळ  कां असावी?


आशीर्वाद.

🌹🌼☘

   💦श्रीराम 🙏🏻समर्थ 💦


अमृतधारा  ९९०


सद्गुरु एकदा भेटला की त्याखेरीज आता काही कर्तव्य उरले नाही असे ज्यास वाटते त्यानेच गुरू भेटून सार्थक केले असे होते.


गुरू आज्ञेपरते त्यास दुसरे साधनच नसते. तोच त्याचा परमार्थ. त्यास आणखी काही करावे असे त्याचे ध्यानी सुद्धा येत नाही.


गुरू आज्ञेमधे राहणाऱ्यास कधीही नड येत नाही. राजाच्या राणीला दुपारचे जेवण कसे मिळेल याची काळजी नसते, तसे गुरुचा आधार आपणास आहे असे ठाम समजणाऱ्यास कसलीही नड नाही.


गुरू हा विषयापलीकडे असतो. पण तुम्ही त्याला विषयात ओढू पाहता. आणि गुरु तुम्हाला विषयात गुंतू नका म्हणून सांगत असतात.


जसे नदीचे ओघात (प्रवाहात) आपण सापडलो म्हणजे त्यातून बाहेर पडण्यास श्रम करावे लागतातच ना? तसे विषय प्रवाहात सापडल्यावर त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करावेच लागतील, (त्यासाठी नामाचाच आधार घ्यावा लागेल).


आम्हांस परमेश्वर प्राप्तीची तळमळ लागली म्हणजे गुरू प्रत्यक्ष जमीनीवर येईल व आम्हास मदत करील. तो गेला असे समजू नका. तो सारखा तुमचे करता वाट पाहत असतो.


आशीर्वाद

🌼🌹🍀

   💦श्रीराम 🙏🏻समर्थ💦


अमृतधारा  ९९१


प्रापंचिक हेतू धरुनच सर्व माझ्याकडे येतात. ती संगती सत्संगती होत नाही. वासनाक्षय झाल्याशिवाय सत्संगती होत नाही. वासनाक्षय गुरु कृपेशिवाय होत नाही. व ती कृपा, गुरु आज्ञा मानून त्याप्रमाणे राहिल्याशिवाय होत नाही.


मी माझेपणा सोडून सद्गुरुस शरण जावे. हा मनोजय होण्याचा मार्ग आहे. आपल्याला समजत नाही तेथे गुरु करावा लागतो. मग मात्र तेथे आपली अक्कल लढवू नये.


शरण जाणे, म्हणजे सद्गुरु  परमात्मा आपला आहे. त्यावाचून आपणास दुसरे कोणी नाही. आपण काही करीत नसून तोच आपल्या हिताकरिता सर्व करीत आहे असा दृढ विश्वास ठेवणे.


अभिमान टाकणे म्हणजे कर्तेपणा सोडणे. रामाचा होणे म्हणजे भगवंतास शरण जाणे.


गुरुचे आज्ञेने साधन करावे म्हणजे त्यात अभिमान राहत नाही. गुरुला परमात्म स्वरुपात पाहिले म्हणजे परमात्म्याला गुरु रुपाने शिष्याचे काम करणे भाग आहे.


आशीर्वाद.

💧🌷🌼

   💦श्रीराम🙏🏻समर्थ💦


अमृतधारा  ९९२


गुरुसेवा म्हणजे फक्त शरीर सेवा असे नाही. तर गुरुआज्ञा प्रमाण म्हणून मानणे, त्याप्रमाणे वागणे ही सुद्धा गुरुसेवाच होय. सद्गुरुच्या आज्ञेत राहावे. सद्गुरु जे साधन सांगतील ते करीत जावे.


सरकारी नोकर वरिष्ठाने दिलेल्या हुकुमाप्रमाणे चालत असल्याने त्याजवर कसलीही जबाबदारी येत नाही, व कर्तेपणाही त्याला शिवत नाही. त्याप्रमाणे गुरुवर दृढ श्रद्धा ठेवून सांगितलेले करीत जावे. लाभ हानी देव जाणे.


सद्गुरुच साधन करवीत असल्यामुळे जबाबदारी  व कर्तेपण त्याचेवर असते. याच्याही पुढे म्हणजे जे जे काही हातून घडते ते त्याच्याच इच्छेने, सत्तेने घडते. अशी दृढ भावना झाली म्हणजे कर्तेपणा अजिबात जाऊन हा मोकळा होतो. असे झाले म्हणजे जे आपल्या हातून घडते ते त्याचीच सेवा होते.


मुख्य गोष्ट म्हटली म्हणजे परमात्मा आपल्या हृदयात आहे. आपण त्याच्यात आहो. आपण तेच आहोत अशी दृढ भावना अखंड राहिली पाहिजे.


याच्यातील मधली पायरी म्हणजे, परमात्म्याच्या नजरे खाली, तो पाहत असताना आपण सर्व कर्में करीत आहो, अशी जाणीव असणे. याने सर्व अभिमान गळतो आणि वाईट कृत्ये आपल्या हातून कधीही घडत नाहीत.


आशीर्वाद.

🌷🍀🌼

   💦श्रीराम🌷समर्थ💦


अमृतधारा  ९९३


आपणास जी काळजी वाटते ती देहाभिमानाने होते. तो देहाभिमान सुटला म्हणजे काळजी वाटणार नाही.


साधनाचा अभिमानही वाटायला नको आहे. साधनाकरिता साधन करावयाचे नाही, तर साध्याकरता ते करावयाचे. जसे शिडी माडीवर जाण्याकरता, मग वर गेल्यावर साधन काय करायचे? नामस्मरण मात्र साधन व साध्य दोन्ही आहे.


परमेश्वरावर भरवसा ठेवणे जरूर आहे. जसे थोडे विष जर खिरीत मिसळल्या गेले म्हणजे जिवाला घातक, तसेच थोडा अभिमानही वाईटच. परमेश्वर आपले चांगले करण्याकरताच सर्व करतो. त्याला सर्व काही समजते. तरी त्याला शरण जावे.


परमेश्वरास शरण जाणे म्हणजे त्याचेच होऊन राहणे. राजा व्हायचे असेल तर राजाच्या पोटी जन्म घ्यावा लागतो. तसेच हे आहे. महाराज कोणावर काही न करता कृपा करणार? हा पूर्व जन्मीचा संस्कार असला पाहिजे.


आशीर्वाद.

🍀 💦🏵

   💧श्रीराम🌷समर्थ💧


अमृतधारा  ९९४


ईश्वराने जग कां निर्माण केले वगैरे भानगडीत पडू नये. त्यातून सुटावे कसे याचा विचार करावा. हे सर्व मिथ्या मानून नाटकातील नटाप्रमाणे आपली भूमिका उत्तम करावी.


धर्मशाळेतून निघाल्यावर त्याची चौकशी कोण करतो? ज्याने जग निर्माण केले, त्यास ठाऊक त्याने ते कां केले. त्याचे ज्ञान कोणास असणार?


अनंत जन्माचा देहाशी सहवास असल्याने देहबुद्धी गुरुकृपेवाचून सुटावयाची नाही. नामाशी सतत सहवास करावा, म्हणजे विषयावरची आसक्ती कमी होऊन नामावर प्रेम जडते.


संताचे काम तुम्हाला देहबुद्धीपासून सोडविणे हे आहे. तुम्हाला मुलगा देणे, तुमचे दुःख दूर करणे म्हणजे विषय देणे हे नव्हे. जो जो परमार्थाला लागावे तो तो  त्याला तेथून ओढण्याचा देहबुद्धी प्रयत्न करते.


संत आणि भगवंत हे निरतिशय सुख देणारे आहे. त्यांच्या जवळ विषय मागणे म्हणजे राजा जवळ भिक्षापात्र मागण्या इतके वेडेपणाचे आहे.


आशीर्वाद.

🌼🌷🍀

   🌷श्रीराम☘समर्थ🌷


अमृतधारा  ९९५


सच्चिदानंद  परमेश्वराकडे जाण्यासाठी बरेच मार्ग सांगितले आहे. त्यापैकी योगमार्ग , ज्ञानमार्ग, भक्तीमार्ग, आणि कर्ममार्ग हे आपणास माहीत आहेत.


योग मार्गामधे फार कष्ट आहेत. या कलियुगात तो साधणे अशक्यप्राय आहे. जरी प्राप्ती झाली तरी परमेश्वराकडे त्या योगाची किंमत दत्तक पुत्र व औरस  (स्वतःचा) यामधे जो फरक आहे तोच योग व भक्ती यात असतो असे समजावे.


ज्ञान आणि भक्ती यापैकी आधी कोणते याचा वाद सर्व विद्वानांत असतो. वास्तविक ज्ञान म्हणजे परमात्म्यावाचून आपणास कोणी नाही याचा दृढनिश्चय होणे. हे ज्ञान बाणले (मनात भरले) म्हणजे मनुष्य परमेश्वर प्राप्तीच्या मार्गाला लागतो. म्हणजे साधनाला लागतो.


नामस्मरणा शिवाय दुसरे साधन नाही. व या साधनाने भगवंताशिवाय दुसरे काहीच आवडत नाही असे होते. ही जी मनात निर्माण झालेली भगवंताची आत्यंतिक आवड त्यालाच भक्ती म्हणतात.


कर्ममार्गात अभिमान राहतो. मी काही केले असे वाटते. भक्ती मार्गात अभिमान टाकावयाचा असतो. भगवंताला भक्त हा लाडक्या मुलाप्रमाणे असतो.


आशीर्वाद.

💧☘🌹

,   🍁श्रीराम🙏🏻समर्थ🍁


अमृतधारा  ९९६


परमात्म्याकडे जाण्यास जरी अनेक मार्ग असले तरी आपल्या गुरुने जो राजमार्ग दाखविला त्यानेच जावे. मध्येच दुसरेच मार्ग घेतले तर पल्ला (मुक्काम) कधीच गाठता यायचा नाही.


ज्या दिवशी मी तुम्हाला अनुग्रह देऊन आपले म्हटले त्या दिवशीच वास्तविक तुम्ही धन्य झाला. सर्व प्रापंचिक व पारमार्थिक जबाबदारी गुरुवर सोपवून तुम्ही मोकळे झालात. गुरू आज्ञा पालनाशिवाय तुम्हास दुसरे काही कर्तव्य उरले नाही. पण तुम्हाला असे वाटते कोठे?


विष हे आमटीत काय किंवा खिरीत काय, दोन्ही त्याज्यच. त्याचप्रमाणे अभिमान हा व्यवहारात काय आणि पारमार्थिक साधनात असला काय दोन्ही त्याज्यच.


माझ्याने आता काही होत नाही म्हणणे, म्हणजे इतके दिवस साधन केले ते तुम्ही केले असे नाही का होत? तुम्हाला चालता, बसता, बोलता आले म्हणून ना ते झाले?  परमात्मा तुमचेकडून साधन करवून घेतो असे कां वाटत नाही?


आपल्या मागेपुढे परमात्मा आहे अशी भावना ठेवल्यास तुमचे काय खर्च होते? यात अवघड ते काय? कां अशी भावना ठेवून आपण निश्चित राहत नाही? परमात्माच सर्व करतो असे कां मानीत नाही?


आशीर्वाद.

🌼🍀🏵

  : निश्चित  निश्चिंत ✔️

   💦श्रीराम🙏🏻समर्थ💦


अमृतधारा  ९९७


भावाशिवाय पूजा होत नाही. ज्याचे मन पूजेत असते त्याचीच खरी पूजा होते. नाहीतर मन दुसरीकडे ज्या विषयात गुंतले असेल त्या विषयाचीच ती पूजा होते.


सर्वांभूती भगवद्भाव पाहणे व कोणाचेही मन न दुखविणे म्हणजे खरीखरी पूजा होय. पूजेला बाह्योपचाराची आवश्यकता नसते. मन मात्र अर्पण करणे जरुर आहे.


देवास अर्पण करणे म्हणजे सर्व त्याचे करता करणे. देवाचे स्मरण ठेवून तोच कर्ता आहे असे मानून सर्व कर्में करणे.


भावाशिवाय नवविधा भक्ती सारखी साधनें व्यर्थ होतात. कालांतराने त्या साधनाने भाव उत्पन्न  होईल हे खरे. पण भाव ठेवून साधना केली म्हणजे (ध्येय) प्राप्ती लवकर होते.


नवविधा भक्तीमध्ये आत्मनिवेदन भक्ती, हिलाच अर्पण भक्ती म्हणतात. हीच सर्वात सोपी व सर्वात मुख्य होय. सर्वस्वी देवाचे व्हावे, म्हणजे आपण जे करतो ते सारे अर्पण होते. आपण देवाचे होण्याचा प्रयत्न करावा.


आशीर्वाद.

☘🌹🌼

, ☘श्रीराम🌷समर्थ☘


अमृतधारा  ९९८


जप करीत असताना मन वाटेल तिकडे भटकते. म्हणून जप करताना (फक्त आपल्याला ऐकू येईल एवढ्या आवाजात) तो वैखरीने करावा व  कानाने ऐकावा. म्हणजे मुख व कान नामोच्चाराने ताब्यात राहते. मन एकाग्र होण्यासाठी त्याच वेळी सद्गुरुस शरण जावे, म्हणजे या विषयापासून सोडव अशी प्रार्थना करावी.


नामात प्रेम नामानेच येणार. या प्रेमासाठी विषयावरचे प्रेम हळू हळू कमी केले पाहिजे. नामावर दृढ निष्ठा पाहिजे. नामच तारील. नामच सर्व काही करील असा दृढ भाव पाहिजे. तो ठेवून व्यवहारात प्रयत्न करावेत. पण यश देणारा परमात्मा आहे असा भाव पाहिजे.


वैद्याचे औषध आपण कधी नोकराकडून आणतो. पण गुण नोकराने दिला असे नाही ना म्हणत? तर त्याचे पुढे जाऊन वैद्याचे औषधाने आलेला गुण परमेश्वरानेच दिला, असे कां नाही म्हणत?


परमेश्वराला तुम्ही शरण जा. त्याने तुम्हाला आपले म्हटले आहे. तो तुमचे सदोदित हितच करणार. आपण परमात्म्याला आपले म्हटले की सहजच त्याचेवर प्रेम उत्पन्न होईल. हा आपला जिवलग, सखा, आपला हितकर्ता सर्व काही असल्याने काळजीला जागाच उरणार नाही. मग अखंड प्रेम व समाधान राहील. परमात्म्याशी आपलेपणा उत्पन्न होण्यास त्याचे नामाशी पुष्कळ सहवास घडला पाहिजे.


आशीर्वाद.

💧☘🌹

, 🌹श्रीराम💧समर्थ🌹


अमृतधारा  ९९९


परमेश्वराकडे जाण्यास नामस्मरण हा राजमार्ग आहे. देहबुद्धी आहे तोपर्यंत नित्य नैमित्तिक कर्में केलीच पाहिजे. ती सोडायची नसतात. ती सुटायची असतात.


योगामध्ये तो करी पर्यंतच समाधान असते. नामस्मरणाचे अनुसंधानात सतत समाधान असते. तेज दिसणे, नाद ऐकायला येणे हे गुणातच नाही का येत?


निर्गुणाची उपासना स्वतः निर्गुण झाल्याशिवाय होत नाही. निर्गुण होण्यास देहबुद्धी सुटावयास पाहिजे. सर्व व्यापक परमेश्वरास सर्वांभूती पाहणे ही निर्गुणोपासनाच आहे.


योग हा नामस्मरण सहज होण्यासाठी, प्रकृती उत्तम रहावी म्हणून जितका आवश्यक तितकाच करावा. त्याला प्राधान्य देऊ नये. योग नामस्मरणाला पोषक आहे.


नामस्मरण योगाच्या पलिकडे आहे. म्हणून नामस्मरणात योग येतो. योगात नामस्मरण येत नाही. सर्व साधनांचा अन्तर्भाव नामस्मरणात आहे.

नामस्मरण हे साध्य व

साधन आहे.


आशीर्वाद.

🍀🏵🕉

   💦श्रीराम🙏🏻समर्थ💦


अमृतधारा  १०००


एकाने मला विचारले

"तुम्ही एकाला एक व एकाला एक देता ते कां? " मी विचारले  "तुम्ही मला काय समजता?" एक म्हणाला   " मनुष्य." दुसऱ्यास विचारता तो म्हणाला  "देव समजतो." मी म्हटले  " झाले तर. जशी भावना तसे फळ मिळणार. निरनिराळ्या भावना तशी फळे पण निराळी."


भावात देव असतो. मी अमुक अमुक. आपल्या अस्तित्वाची जशी खात्री असते, तशी देवाच्या अस्तित्वाची खात्री वाटली पाहिजे.


मी होतो तेव्हा तुम्ही निश्चिंत होता. आता मी नाही असे तुम्ही मानता. तेंव्हा तुम्ही तळमळ करता. मी गेलोच नाही असा तुम्ही भाव ठेवा. म्हणजे मी आहेच.


देव सर्वत्र भरलेला आहे. तो भावानेच प्रकट केला पाहिजे. प्रल्हाद, द्रौपदीला खात्री होती, परमेश्वर आपला सहाय्यकारी आहे. तेंव्हा देवास प्रकट होणे भाग पडले.


महाराज येथे यंत्रावर (पेटीवर) आलेच पाहिजे म्हटल्यावर मला यावे लागते. येणे शक्य नाही असे म्हणाल्यास मी नाहीच. त्याला मी काय करू ? जसा तुम्ही भाव धराल व जितकी तुमची दृढता असेल तसे मला व्हावे लागते.


आशीर्वाद.

💦🌹🕉

   🌷श्रीराम समर्थ🌷


अमृतधारा  १००१


भगवंत व आपण यामध्ये अभिमानाचा पडदा आहे. हा  दूर झाला म्हणजे आपणास भगवत प्राप्ती झाली. हा दूर होण्यास अनेक मार्ग आहेत. त्यापैकी भक्ति मार्ग सोपा आहे.


भक्ति म्हणजे भगवंतास अभिमानरहित अनन्य शरण जाणे. भगवंताचे होऊन राहणे. भगवंताशिवाय काहीच न दिसणे. सर्वत्र भगवतप्रचिती येणे.


अशी भक्ति प्राप्त होण्यास

१) सर्व कर्तृत्व भगवंताकडे देणे. सर्व त्याचे इच्छेने चालले आहे असे मानणे. म्हणजे प्रत्येक क्रिया भगवंतास अर्पण करणे. याने अभिमान लवकर नाहीसा होतो.

२) गुरूआज्ञेत राहणे. म्हणजे आपला मान, अभिमान, शहाणपण हे सर्व गुंडाळून ठेवून गुरु सांगतील तसे सबब न सांगता वागणे.

३) संताजवळ नुसते पडून राहणे. त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागणे. त्यांच्या सहवासाने अभिमान हळूहळू कमी होतो.


आशीर्वाद.

💧🌼🌷

   🌷श्रीराम समर्थ 🌷


अमृतधारा  १००२


भक्ति दोन प्रकारची असते.

१) सर्व सोडून, लंगोटी लावून "भगवंता, तू मला भेटशील तरच मी उठेन". अशा निग्रहाने (ध्यानाला, नामस्मरणाला) बसणे. पण हा मार्ग कठीण आहे. प्रापंचिकाला हा साधणार नाही.

२) भगवंताच्या सहवासाने भक्तिप्रेम उत्पन्न करणे.  काही वाचावयाचे तर ते भगवंताचे गुणवर्णन वाचणे, श्रवण करणे. त्याचे दर्शनास जाणे वगैरे. प्रत्येक कृत्य भगवंताकरता करणे, त्यात त्याचे नामस्मरण करणे. असा अखंड सहवास ठेवला म्हणजे भगवंताचे ठिकाणी प्रेम उत्पन्न होते.


नवविधा भक्तीमध्ये श्रवणा नंतर कीर्तन भक्ति सांगितली आहे.

१) नाम संकीर्तन

२) हरीभक्ताने

केलेले कीर्तन.

कीर्तन सवयीने चांगले होत नसते. सवयीने ते फार तर उत्तम करता येईल. खरे कीर्तन येण्यास भक्तिप्रेमाचा ओलावा लागतो.


कीर्तन करणे ते पोटाकरिता वा पैशाकरिता करू नये. तर आपण जे सांगतो ते स्वतः आचरणात आणण्याकरिता करावे. कीर्तन केले म्हणजे, सांगितले तसे आचरणात आणले असे जाहीर करणे होय.


आशीर्वाद.

🏵🍀🌼

   🍁श्रीराम 🙏🏻समर्थ 🍁


अमृतधारा  १००३


परमेश्वराची आवड म्हणजे भक्ती आणि विषयाची अनासक्ती म्हणजे वैराग्य. विषयात राहून  अनासक्त असावे. प्रथम वैराग्य बळेच आचरणात आणावे. म्हणजे ते सहज होईल.


अमुक हवे किवा अमुक नको असे न वाटणे याचे नाव वैराग्य. परमात्म्याचे स्मरण करावे व त्याचे जवळ हे मागावे की "देवा मला तुझ्या जवळ काही मागण्याची इच्छा देऊ नको".


अमुक हवे असे वाटले व ते मिळाले नाही म्हणजे दुःख होते. भक्त कधीही दुःखी कष्टी असत नाही. मग तो कितीही दरिद्री वा आजारी असो.  तो नेहमी आपल्या समाधानात असतो.


भक्ताला कसलीही आस नसते, त्यामुळे त्याला दुःख नसते. तो व परमात्मा एकरूप असतात. परमात्म्याची इच्छा तीच त्याची इच्छा असते.


उपवास म्हणजे परमेश्वराजवळ असणे. परमात्म्यास देह नाही, तेंव्हा या देहाने त्याचेकडे कसे जाता येईल? देहबुद्धी सोडून गेले पाहिजे. वास्तविक पाहता नामस्मरण हे देहबुद्धी सोडुनच झाले पाहिजे.


आशीर्वाद

☘🌼🍁

   💧श्रीराम 🙏🏻 समर्थ💧


अमृतधारा  १००४


तीर्थक्षेत्राला क्षेत्रत्व आपल्या भावनेने दिले नाही तर तेथे पाणी आणि दगडच आहे! काशी गंगा म्हटल्या बरोबर पवित्रतेचे संस्कारच उभे राहतात. पण तेथील पुष्कळ लोकांना तसा भाव नसल्यामुळे ते वर्षावर्षात स्नानाला जात नाहीत. त्याना ते क्षेत्र नाहीच.


यावरून क्षेत्र हे तुमच्या  भावनेनेच नाही का निर्माण होत? मग ते घरच्या घरी नाही का निर्माण करता येणार? याला अर्थात दृढ भाव पाहिजे.


पण तितका दृढ भाव नसल्यास क्षेत्रात जावे. आर्थिक दृष्टीने ते शक्य नसल्यास "काशीस जावे नित्य वदावे".  म्हणजे काशीचे स्मरण तरी करावे. त्याने पवित्रतेचे संस्कार होऊन मन पवित्र होते.


आज एक यात्रा केली. उद्या दुसरी करावयाची राहिली अशी इच्छा कां असावी. एकदा गुरू भेटल्यावर त्यास गुरू आज्ञेपरते दुसरे साधनच नसते. तोच त्याचा परमार्थ व तीच त्याची तीर्थयात्रा असते.


तीर्थक्षेत्रात तीर्थपण, आपण आपल्या भावनेने देतो. तीर्थक्षेत्रास जाऊन जर आपण याने निष्पाप होऊ अशी भावना असली तरच तीर्थाचे स्नान होईल, नाहीतर ते पाणीच आहे.


आशीर्वाद.

🌼☘🌷

   🍁 श्रीराम🙏🏻समर्थ 🍁


अमृतधारा  १००५


भाव म्हणजे मी अमुक अशी आपल्या अस्तित्वाविषयी जशी खात्री असते, तशी देव आहे अशी खात्री पाहिजे. महाराज देव आहेत अशी वरील प्रमाणे (स्वतःचे अस्तित्व) खात्री पाहिजे म्हणजे त्याचा महाराजाचे ठिकाणी भाव आहे असे म्हणता येईल.


माझी सेवा जी तुम्ही करता ती तुम्ही आपल्या देहबुद्धीची केली. तुम्हास जे पसंत होते तसे केले. माझी सेवा म्हणजे मला जे आवडेल ते करणे. आज्ञेत राहणे, नामस्मरण करणे, सर्वाभूती भगवद्भाव ठेवून कोणाचे मन न दुखविणे, परमात्मा सर्व करतो आहे अशी भावना ठेवणे हे मला आवडते.


सर्व कर्तेपण भगवंताला देऊन, आपण काळजी करण्याचे अगदी सोडून आपल्या समाधानात,  आपल्या आनंदात सदैव राहावे. जे जे काही घडत आहे ते ते परमात्मा आपल्या हिता करताच करीत आहे व ज्या ज्या क्रिया आपल्या कडून होतात त्या आपण करीत नसून परमात्मा करीत आहे अशी प्रत्येक गोष्टीमध्ये, आपल्या प्रत्येक क्रियेमथ्ये भावना ठेवावी.


देवात देवपण, गुरुत गुरुपण आपण हे आपल्या भावनेने देतो. म्हणजे सर्व भावनेत आहे. नाम हा भाव उत्पन्न करते. नाम भावयुक्त अंतःकरणाने घेतले म्हणजे आपले काम शिघ्र होते.


आशीर्वाद.

🌼🍀🌷

,   💦श्रीराम🙏🏻समर्थ 💦


अमृतधारा  १००६


देव सर्व काही करतो असे म्हटले तर तो आशाबद्ध आहे असे म्हणावे लागेल. देव काही करीत नाही. तो नाही असे म्हणावे, तर नास्तिक स्थापन केल्या सारखे होते. वास्तविक देवास कर्तृत्व नाही.


आपण जे करतो (भोगतो) ते आपल्या कर्माचे फळ म्हणून भोगीत असतो. त्यात देवाचा संबंध नाही. तर मग देवास शरण जाऊन देहाच्या भोगाचा संबध सोडवून घेणे हे आपले कर्तव्य आहे.


असे शरण जाणे म्हणजे आज्ञा प्रमाण मानणे. शरण गेले म्हणजे देहाभिमान जाईल व तो गेला म्हणजे भोगाचा आपला संबंध राहणार नाही.


एकदा अभिमान नष्ट झाला म्हणजे, एकदा खूनाबद्दल फाशी दिल्यावर पुन्हा फाशी देता येत नाही तसे होते. एकदा सरकारी साक्षीदार झाला की त्याला जशी माफी असते, तसे देहबुद्धीचा त्रास आपणास होत नाही.


पूर्वी व आता जी तुम्ही माझी सेवा केली ती देहाची व देहबुद्धीची आहे. माझी खरी सेवा म्हणजे सर्वांभूती भगवद्भाव ठेवून कोणाचे मन न दुखविणे व अखंड नामस्मरण करणे हे मला आवडते ते करावे.


आशीर्वाद.

💧🌼🍁

   🍁श्रीराम🙏🏻समर्थ🍁


अमृतधारा  १००७


देह सुस्थितीत असला म्हणजे देहाचा विसर पडतो म्हणता. पण तुमच्या देहाचा विसर कधीच पडत नाही. तो  सामान्यपणे असतोच. दुखणे वगैरेनी विशेषत्वाने भासतो इतकेच.


देहास अति कष्ट देवू नये. पण जेंव्हा ते आपोआप येतात तेंव्हा ते आनंदाने सोसावे. कष्टावाचून राहू नये. देहाला परमार्थाकरता आपण कष्ट दिले म्हणजे अभिमान वाढतो. पण तो परमार्थाला नको असतो.


भोग भोगण्यातच पुरुषार्थ आहे. तेही समाधानाने भोगण्यात. दुखणे आले असता औषध घ्यावे, पण औषधात तरी गुण परमात्म्यानेच ठेवला आहे ना? व औषधाने गुण येतो असेही नाही. एकास येतो तर दुसऱ्यास नाही. तेंव्हा ज्याचे जसे हित होणे असेल तसे परमात्मा करतो.


तुम्हास एकच करणे. परमेश्वरास शरण जाऊन  "हा भोग भोगण्याची मला ताकद दे. माझे समाधान भंगू देऊ नको. तुझे स्मरण सतत असू दे", असे मागावे.


दुखणे भोगावयाचेच  आहे तर ते समाधानाने का भोगू नये? प्रारब्ध भोगाचे तुमच्या डोक्यावरचे ओझे ते कर्ज तेवढ्याने कमी नाही का होणार? दुखणे आले असता त्याची उपेक्षा करावी. म्हणजे आपोआप ते कमी होईल.


शरण जाणे म्हणजे आपले ओझे परमात्म्यावर ठेवणे. सर्व जबाबदारी त्याचेवर टाकणे. आपल्याला  आपले हित कळत नाही असे वाटून आपल्या हिताची सर्व जबाबदारी परमेश्वरावर सोपविणे.


आशीर्वाद.

💧🌼🌹

   🌷श्रीराम 🙏🏻समर्थ 🌷


अमृतधारा१००८


आपल्या प्रत्येक कृत्यात ते परमात्मा आपले कडून करवीत आहे अशी भावना ठेवावी. त्याची आठवण ठेवावी. त्याचे ध्यानच करावे म्हणाना. परमात्म्याच्या इच्छेने सर्व चालले आहे व आपण कर्ते नाही ही भावना ठेवावी.


परमात्मा तुमच्या करिता सर्व काही करीत आहे. तुम्ही जेवढे होईल तेवढेच करा, पण तळमळ (काळजी) करू नका. परंतू तुम्हाला विश्वास कोठे आहे. विश्वास कमी झाला की तळमळ आलीच.


परमात्मा तुमच्या मागे पुढे उभा आहे असे अखंड मानावे. त्याचे स्मरण ठेवणे म्हणजे स्थूलाचे स्मरण नाही, तर जे आपले हाताने घडत आहे ते भगवंताच्या सत्तेने होत आहे असे समजणे. ज्यांचा विश्वास संपूर्ण आहे ते वाचलेले आचरणात आणतात, वरवर आहे ते फक्त वाचतात.


सोन्याच्या काटेतोला (सुवर्ण तराजु) प्रमाणे (कडक शिस्तीत) मी काही वागलो नाही. तसे असते तर एकही मनुष्य टिकला नसता.


परमार्थ गुप्त असावा. राखेतल्या विस्तवा प्रमाणे असावा. प्रपंच करीत असताना श्रमाची पर्वा करू नये. पण त्यातच आसक्त असू नये. एकदा सुटल्यावर मागे पाहू नये.


आशीर्वाद.

💦🌹🍀

   🌹श्रीराम 🙏🏻समर्थ 🌹


अमृतधारा  १००९


सुख समाधान विषयात  नाही. प्रपंचातील मोठ्यात मोठा (श्रीमंत) घेतला तरी त्याच्या प्रपंचात काहीतरी न्यून असतेच. न्यूनता नाही असा प्रपंचच नाही. एखादा प्रापंचिक "माझा प्रपंच पूर्ण (सुखाचा) आहे असे सांगणारा भेटेल. तरी पण जसे चालले आहे असेच चालावे. यात कमी नाही ना कधी पडणार?" अशी त्याला  काळजी असते. म्हणजे त्याला सुख नसते.


प्रपंचातील सुख म्हणजे दुःखाची कमतरता असणे, यालाच सुख म्हणत असतात. सुख समाधान सत्यात आहे. मिथ्यात नाही. मृगजळ पिऊन तहान भागवता येत नाही. आजपर्यंत विषय भोगले. परंतू त्यात सुख झाले असे आढळले नाही. तर मग विषय मिथ्या आहेत अशी भगवंताने तुम्हास प्रचिती नाही का करून दिली?


अनुमानच नुसते नाही तर खात्री करून दिली. तरी देखील त्याच विषयात सुधार कसा होईल हेच तुम्ही विचारता व करण्यास मागता याला काय म्हणावे? जे दुःखमय आहे त्यात सुख कोठून मिळणार?


प्रपंच जर नाटका प्रमाणे लटका आहे. तर तो बरा असावा असे वाटण्याचे कारण काय? जसा असेल तसा असेल. मिथ्याच तो. आपण तो नटा प्रमाणे करावा.


एखाद्या गोष्टीमुळे आपल्याला अस्वस्थता येते, याचे कारण त्यास आपण सत्यता देतो. नाटकातील नट हा सर्व खेळ आहे असे समजतो. मिथ्या (खोटं) आहे हे जाणून आपली भूमिका खऱ्या सारखी करतो. तसा आपण व्यवहार करावा.


आशीर्वाद.

🌼🍀🌹

   🌷श्रीराम 🙏🏻समर्थ 🌷


अमृतधारा  १०१०


प्रत्येक प्राण्याची इच्छा सुख मिळविण्याची असते. नास्तिकातला नास्तिक परमेश्वराला मुळीच न मानणारा, त्याला सुद्धा आपण सुखी असावे असे वाटते. क्षुल्लक किड्यालाही सुखाची इच्छा असते. सुख हे तर परमेश्वर स्वरूप आहे. म्हणजे सर्व सृष्टी परमेश्वराकडे धाव घेत आहे असे नाही का होत?


सुख मिळविण्याचे मार्ग प्रत्येकाचे निरनिराळे असतील वा चुकिचेही असतील. कर्में मी करतो अशी आपली भावना असते त्यामुळे त्या कर्माची सुखदुःख आदि फळे आपणास भोगावी लागतात.


वास्तविक सर्व कर्में परमेश्वर सत्तेने घडतात. व तशी भावना झाली म्हणजे आपण सहजच सुखदुःखातीत होऊ. म्हणून कर्में ही वेदाज्ञेने, शास्त्राज्ञेने,  गुरूआज्ञेने करावीत. म्हणजे त्यात आपला अहंकार राहत नाही.


भगवंताने आपल्याला बुद्धी दिली व ती चालवून आपण काम करतो. म्हणजे भगवंतच आपले कडून सर्व कर्में घडवीत असतो. त्याच्या प्रेरणेनेच, सर्व सत्तेने घडत आहे अशी भावना प्रत्येक कर्मात ठेवली म्हणजे भगवंतावर प्रेम जडते.


जे काही करावयाचे ते भगवंता करता करावे म्हणजे पाप पुण्याची बाधा आपणास होणार नाही. कर्म झाल्यावर भगवंताचे स्मरण करून त्याला अर्पण करावे. म्हणजे हळूहळू अभिमान कमी होऊन भगवंतावर प्रेम जडेल.


आशीर्वाद.

🌼🍀🌹

   🌷श्रीराम 🙏🏻समर्थ 🌷


अमृतधारा  १०११


भगवंताच्या इच्छेप्रमाणे वागले म्हणजे आपण त्यास आवडू. भगवंताची इच्छा, विषय सोडून आपण त्याचे होऊन राहावे अशी आहे. आम्हाला विषयाचा ओढा फार म्हणून निरुपायास्तव त्यांनी गृहस्थाश्रम सांगितला.


भगवंताचे स्मरणात विषयाचा अति त्रास होऊ लागला तर तेवढ्या पुरताच प्रपंच करावा हा हेतू. पण आम्ही भगवंतालाच अजिबात विसरुन प्रपंचात गढून गेलो याला काय म्हणावे?


भगवंतानी सर्व सोडून माझ्याकडे (शरण) या म्हणून सांगितले. पण देहच मुळी कर्ममय तेंव्हा ते सुटायचे कसे? यासाठी कर्में करणे ते स्वार्थाकरता नसून परमेश्वर प्रित्यर्थ करावीत. अर्पण बुद्धीने करावीत. मला भगवंताचे व्हावयाचे आहे, याची रात्रंदिवस आठवण ठेवावी.


अभिमान व विषय यामुळे भगवंत दिसेनासा झाला आहे. पण पतंग धुक्यामुळे जरी दिसेनासा झाला तरी त्याची दोरी घट्ट धरली म्हणजे वाटेल तेंव्हा त्याला वाटेवर आणता येते. तसे नामाची दोरी घट्ट धरा म्हणजे भगवंताला तुम्हाला जवळ आणता येईल..


आशीर्वाद.

🌷🍀💦

   🌹श्रीराम 🙏🏻समर्थ 🌹


अमृतधारा  १०१२


एकादशी म्हणजे या दिवशी तरी एका कोणत्या तरी चांगल्या दिशेने मनाला वळण लावणे. सर्वांभूती परमात्मा असल्याने कोणाचेही दोष पाहू नये. मनात आले तरी उच्चारू नये. कोणाची निंदा करावयाची नाही असा नियम करावा.


सात्विक कृत्ये चांगली, पण त्यात अभिमान ठेवला तर वाईट. एक वेळ वाईट कृत्याचा पश्चात्ताप होऊन त्यापासून मुक्तता तरी होईल, पण सात्विक कृत्याचा अभिमान कसा जाणार? परमेश्वराच्या इच्छेने सर्व घडत आहे ही भावना ठेवावी.


मी आप्तेष्टांना मदत केली. ते आप्तेष्ट म्हणू लागले की यात त्यांनी काय केले? परमेश्वराने त्यांना दिले, म्हणून त्यांनी मदत केली. तेंव्हा मला वाईट वाटते.


वास्तविक पाहता परमात्मा त्यांना आठवला. आणि मी मात्र मी दिले असा अभिमान धरून वाईट वाटून घेतो. खरे पाहता परमात्म्यानेच त्यांना दिले. याला वाईट वाटण्याचे कारण काय? हा देणारा कोण?


व्यवहारात थोडा अभिमान लागतो. पण तो कारणापुरता असावा. वरिष्ठाने नोकराशी वागताना अभिमान पाहिजे पण तो तितक्या पुरता. त्याचा मनावर परिणाम होऊ देऊ नये. ही देहबुद्धी, हा अभिमान जाण्यास सद्गुरुचे होऊन राहावे. निदान बळजबरीने तरी मी त्यांचा आहे असे म्हणावे. सद्गुरु नकळत तुमचा अभिमान दूर करतील.


आशीर्वाद.

💦🌹🍀

   🌷श्रीराम 🙏🏻 समर्थ 🌷


अमृतधारा  १०१३


शरीर बळ वाढविण्यासाठी व्यायाम, दुसऱ्याशी कुस्ती खेळणे आदि गोष्टी कराव्या लागतात. बुद्धीबळ वाढवायचे असेल तर अवघड उदाहरणे सोडवावी लागतात. तसेच आत्मिकबळ वाढविण्यासाठी आलेल्या परिस्थितीला तोंड देऊन समाधानाने राहावे लागते.


आत्मिकबळ वाढणे म्हणजे देहबुद्धी कमी होणे. ते करण्या करताच परमेश्वर संकटे धाडून देतो. पण तुम्ही कच खाता, शेपुट घालता, मिळमिळी रडता याला काय म्हणावे?


तुमच्या परिक्षेसाठी, बळ वाढण्यासाठी संकटे तोच पाठवतो. अशा स्थितीत संकटे परत घेणे म्हणजे तुमचे अनहित करणे होय. भगवंताला तुमचे हित कशात आहे. हे उत्तम कळते.


आपणास अव्यंग शरीर, बुद्धी परमेश्वराकडून मिळाली आहे. सूर्य रोज आपल्याकरता उगवतो. पाऊस पडतो. इतकेच नव्हे तर सर्वात मोठे आश्चर्य म्हणजे या बदलणाऱ्या अपघातमय सृष्टीत आपण इतके दिवस जिवंत राहिलो. असे हे अनुभव आपणास पदोपदी नाही का येत?


या परते परमेश्वराचे अनुभव आणखी काय पाहिजे? पण हे अनुभव इतके पुष्कळ व एक सारखे येत असतात. त्यामुळे ते अंगवळणी पडतात व ते अनुभव असे वाटत नाही.


माझ्या अनुभवाविषयी म्हणाल तर, महाराज मला सहाय्य करतील अशी तुमची खात्री असली, दृढभाव असला म्हणजे मला सहाय्य करावेच लागते. म्हणजेच अनुभव घेणे तुमच्या हाती नाही का?


आशीर्वाद.

💧🌷🏵

, 🌷श्रीराम 🙏🏻 समर्थ 🌷


अमृतधारा  १०१४


परमेश्वराने  पाठविलेली दुखणीं, संकटे याचा आपल्याला आनंदच वाटला पाहिजे. मी जर तुम्हाला एखाद्या आजारी माणसाची देहकष्ट घेऊन शुश्रुषा करण्यास सांगितले तर ते काम तुम्ही आनंदाने कराल.


महाराजांनी हे काम आपणास सांगितले, याचा तुम्हाला आनंदच वाटेल. मग परमात्म्याने पाठविलेली दुखणीं, संकटे याचा आनंद का मानू नये? सारांश,  परमात्मा आपला हितकर्ता, पाठीराखा, पालन पोषणकर्ता आपला सर्वस्वच आहे असा तुमचा दृढ विश्वास आहे का?


परमात्म्याने धाडलेली संकटे दूर व्हावी असे मनातच येता कामा नये. त्याने धाडलेली संकटे त्यालाच दूर करण्यास  कसे सांगावे? भोग हा भोगावा लागणारच ना?


पण असे जर मनात येत असेल तर तसे महाराजांपुढे तोंडाने बोलण्यात कोठे बिघडते? ते काय करू शकणार नाही? ते आपल्या हिताचा साधक बाधक विचार करून वाटल्यास आपली संकटे दूर करतील, नाहीतर नाही करणार.


न केल्यास नावे ठेवू नये. कारण न करण्यात आपले खरे हित आहे असे समजावे.


आशिर्वाद.

🌿🌼🌷

   🌹श्रीराम 🙏🏻 समर्थ 🌹


अमृतधारा  १०१५


सुस्थितीत असले तर स्मरण बरे होते. हे वरवरचे स्मरण होय. हे खरे श्रद्धेचे स्मरण नव्हे. आपले परमात्म्याशिवाय कोणी नाही असा दृढ निश्चय व श्रद्धा पाहिजे.


परमेश्वराशिवाय आपले कोणी नाही अशी जाणीव द्रौपदीला झाली, त्या भावनेने श्रीकृष्णाचा धावा केला. तेव्हाच भगवान धावून आले. खऱ्या कळकळीचे स्मरण पाहिजे.


जसे लहान मुल काहीही झाले तरी आपल्या आईलाच हाक मारते. दुसरे तिसरे कोणी जाणत नाही. तसे तुमचे परमेश्वरासाठी झाले पाहिजे. वास्तविक तुमची भिस्त कोणावर आहे. तुमचा पाठीराखा कोण आहे हे संकट समयी उत्तम कळते.


१) सुस्थितीत वरवरचे स्मरण होते २) संकट समयी परमात्म्याशिवाय आपले कोणी नाही ही जाणीव उत्पन्न होऊन स्मरण होते. ३) ही जाणीव दृढ होऊन परमात्म्याचे सुस्थितीतही स्मरण होते.


तिसऱ्या प्रकारचे स्मरण एक सारखे टिकणे कठीण, म्हणून साधु संत "आम्हाला संकटेच येऊ देत" असे भगवंताजवळ मागतात. कारण त्यावेळेस खरे स्मरण होते. वरवरचे स्मरण करणारा आम्हास संकटे नको म्हणतो. हा दोहोतील फरक आहे.


आशीर्वाद.

🌼🌹🍀

   🌷श्रीराम 🙏🏻 समर्थ 🌷


अमृतधारा  १०१६


आपण लहान मुल होऊन सद्गुरुपाशी जावे म्हणजे त्याना पान्हा फुटतो. असे होता येत नसल्यास रामास म्हणावे "मी अज्ञ आहे. सर्वस्वी तुझा आहे". अशी प्रार्थना करावी.


उद्याची बिलकुल काळजी करु नये. जे काही होते ते परमेश्वराच्या इच्छेने होत आहे असा निश्चय असावा. उद्या अमुक होणार असे कळले तर तुम्ही फार तर ऐहिक व्यवस्था कराल, पण त्या वेळात जे काही नामस्मरण झाले असते, ते मात्र होणार नाही.


नामस्मरण करावेसे वाटणे ही पहिली पायरी. नामस्मरण करावयास लागणे ही दुसरी पायरी. मी करून काही होणार नाही. भगवंता! तुझ्या इच्छेनेच काय होईल ते खरे. तूच कृपा करशील तेंव्हा खरे, अशी खात्री वाटणे ही तिसरी पायरी.


नामस्मरणासारखे दुसरे साधन नाही. नाम घेत जावे. निदान जेव्हा काही करावेसे वाटेल तेंव्हा नामच घेईन एवढा तरी निश्चय करावा.


ज्याचे नाव घ्यायचे त्याचे ज्ञान झाल्याशिवाय नुसत्या नामाचा काय उपयोग असे काही लोक म्हणतात. विस्तव माहित नसला तरी हात लावला तर भाजतो ना.


हा परिस आहे हे ठाऊक नसले तरी लोखंडाला लागले असता सोने होतेच ना. तसे ज्ञान नसताही नामस्मरण केले, भक्ती केली तर भगवंताची प्राप्ती होते.


आशीर्वाद.

🌼🌷☘

   🌷श्रीराम 🙏🏻समर्थ 🌷


अमृतधारा  १०१७


तुम्हाला जनप्रियत्व पाहिजे का? मग जनाचा जो राजा परमात्मा, त्याचे प्रियत्व संपादन करा म्हणजे जनप्रियत्व आपोआपच येईल. तुम्हाला लोक वाईट दिसतात. तुमच्या मनात वाईट आहे म्हणून लोक तसे दिसतात. तुम्ही स्वतःस आधी सुधारा म्हणजे कोणीही वाईट दिसणार नाही.


तुमची लोकांवर छाप बसावी, लोकांनी तुमचे ऐकावे म्हणता. पण ज्यांना तुम्ही आपले म्हणता, त्यांना (विकारांना) आधी ताब्यात घ्यायला नको का? माझा क्रोध अनावर आहे. माझे मन चंचल आहे वगैरे. तेंव्हा तुमचे विकार, मन यावर आपली छाप बसवा. मग लोकांबद्दल बघा.


कोठेही मन गेले तरी. देह व मन आणि त्याचे बरोबर त्याचे भोगही येणार. आपण कोठेही पळालो तरी आकाश असणारच. म्हणून आलेले कर्माचे भोग समाधानाने भोगण्यास मनालाच शिकवावे.


जोपर्यंत प्रयत्न केला तर बरे झाले असते, असे वाटते. तो पर्यंत प्रयत्न अवश्य करावा. परमात्मा यश अपयश योग्य असेल ते देणार असे समजून करावा. सर्व कर्तेपण परमात्म्याकडे द्यावे.


लांब उडी घेण्यापूर्वी चार पावले मागे जावे लागते. परिसापाशी सोने होण्यासाठी रुपे चालत नाही. त्यासाठी लोखंड व्हावे लागते. तसे गुरुचा पाठीराखेपणा असुनही जी आपणास अधोगती वाटते, खरे पाहता ती पुढील महत्कार्याची पूर्व तयारी असते.


आशीर्वाद.

🌼☘🌹

   🌷श्रीराम 🙏🏻समर्थ 🌷


अमृतधारा  १०१८


तुम्हाला रामाचे दर्शन पाहिजे म्हणता. पण राम तुम्हाला ओळखता कसा येणार? राम दर्शन होण्यास रामाचे अंतरंग कळले पाहिजे व ते होण्यास तुमच्या अंतरंगाची तयारी पाहिजे. अंतःकरणाची पवित्रता पाहिजे.


लहान मुली बाहुली बरोबर किती सहजपणे खेळतात. जेऊ घालतात, निजवतात वगैरे. त्यांनाही बाहुली निर्जीव आहे हे माहीत असते. पण भावनेने सजीव कल्पून त्या खेळतात.


परमात्म्याविषयी तुम्ही अशी भावना का करत नाही? परमात्मा आपल्याशी बोलतो आणि आपण त्याच्याशी बोलतो ही भावना जो जो जास्त दृढ होईल खरोखरच तो परमात्मा तुमच्याशी बोलू लागेल.


बाप मुलाला हातावर घेऊन पोहण्यास शिकवित असता मधून मधून हात काढून घेतो. पण मुलाची खात्री असते की बाबा आपल्याला बुडू देणार नाही. तसे आपणास सद्गुरुचा, भगवंताचा आधार आहे अशी पक्की खात्री असायला पाहिजे.


आपण भगवंताचे आहोत, जगाचे नाही, असा एकदा दृढ निश्चय करावा व तो टिकवण्यासाठी भगवंताचे नाम घ्यावे. नाम हे आपण भगवंताचे आहोत, जगाचे नाही अशी आठवण करून देते.


आशीर्वाद.

🌼☘🌹

, 🌷श्रीराम 🙏🏻समर्थ 🌷


अमृतधारा  १०१९


परमेश्वराचे नामस्मरण व ध्यानाच्या नियमित अभ्यासाने कालांतराने सिद्धी प्राप्त होतात. व सिद्धी तर त्याज्य. मग परमेश्वराचे ध्यान, नामस्मरण करू नये की काय? सिद्धी प्राप्त करण्यासाठी ते करू नये. परमेश्वर प्राप्तीकरता ते निष्काम बुद्धीने करावे म्हणजे भगवंत सिद्धिचे अडथळे दूर करतात.


थोड्या बहूत सिद्धी सर्वांजवळ असतात. कोणाच्या शब्दाला मान असतो. कोणाचा चेहरा असा असतो की दुसऱ्यावर सहज छाप बसते. आपली भक्ती एक शक्ती आहे. बरेच जण ती खर्चून साधू संतांकडून व्यवहारीक काम करून घेतात.


आपली ती भक्ती (शक्ती) जी परमेश्वराच्या प्राप्तीसाठी उपयोगात आणावयाची ती व्यवहारासारख्या क्षुल्लक कामात खर्च करू नये. साधुजवळ व्यवहारीक काही मागू नये. म्हणजे आपल्या (शक्तीचा) भक्तीचा अपव्यय होणार नाही.


खरे साधू कधीही सिद्धी वापरीत नाहीत. ते परमात्म स्वरुपात मिसळून गेलेले असतात. व सर्व गोष्टी ते परमात्म्यावर सोपवतात. भगवंताच्या इच्छेनेच केंव्हा केंव्हा चमत्कार झाल्याचे साधूच्या चरित्रात दिसतात.


आशीर्वाद.

💧🌼🌹

   🌷श्रीराम 🙏🏻समर्थ 🌷


अमृतधारा  १०२०


आपण सिद्धीचे, चमत्काराचे पाठीस लागू नये. ते आपल्या मार्गात विघ्ने आहेत. साप धरला असता चावत नाही. यात विशेष काही नाही. सापात काय, कशातही (सर्वाभूती) भगवंत पाहावा, म्हणजे कोणीही आपले शत्रू होत नाहीत.


भगवंताने आपल्याला विभुती सांगितल्या किंवा पुजास्थाने सांगितली. याचा अर्थ सर्वात भगवंत आहे. सर्वाभुती भगवंत प्रचितीस आल्याशिवाय एखाद्याची यथासांग (पूर्ण) पूजा झाली असे म्हणता येत नाही.


आपल्यावर धर्माने बंधने घातली, ती आपला प्रयत्न एका दिशेने, भगवत प्राप्तीसाठी व्हावा एवढ्याकरता. ती जर झुगारून दिली तर आपण सैरावैरा जाऊ.


भगवंताचे अखंड अनुसंधान ठेवण्याकरता :

१) आपण भगवंताचे आहोत, जगाचे किंवा दुसऱ्या कुणाचे नाही, हा निश्चय इतका दृढ असावा की जितका आपण मनुष्य आहोत याची जाणीव दृढ असते.

२) हे साधणे फार कठीण  आहे. त्यावर उपाय म्हटला म्हणजे जे काही घडत आहे, ते भगवंताच्या सत्तेने व इच्छेने घडत आहे असे मानावे.

३) हेही साधत नसेल तर वैखरीने अखंड नामस्मरण करावे.


आशीर्वाद.

💦🌼🌹

   💧श्रीराम 🙏🏻समर्थ 💧


अमृतधारा  १०२१


बाभळीचे झाड लावले तर त्याला आंबे नाही लागणार. पण नामात एक विशेष आहे. विषयाकरता जरी नाम घेतले, तरी विषय प्राप्त होऊन ते आपले काम, म्हणजे तुमचे मन निर्विषय करणे, हे करीतच असते. म्हणून कशाकरता का होईना नाम घ्या. ते निर्विषय होण्यासाठी घेतले तर काम शीघ्र होईल.


नामापासून सुरवात करावी. व नामातच शेवट करावा. साधन तेच व साध्यही तेच. नाम हे एकच सत्य आहे. यापरते दुसरे सत्य नाही. यापरते दुसरे साधन नाही. असा दृढ भाव असावा.


आपण कोणतेही कृत्य करीत असता ज्या करता हे कृत्य आरंभिले ते जसे नेहमी डोळ्यासमोर असते, त्याप्रमाणे आपण कशाकरता नाम घेतो (अर्थात भगवत्प्राप्तीसाठी) याची जाणीव अखंड असावी. ही  जाणीव अखंड ठेवणे, मी भगवंताचा आहे हे जाणणे, याचे नाव भगवंताचे अनुसंधान!


वास्तविक आपण भगवंताचे आहोत, पण भ्रमाने मला मी विषयाचा आहे असे वाटू लागले. संत तू विषयाचा नाहीस भगवंताचा आहे असे सांगतात. हीच संतांची खरी कामगिरी. त्याकरीता ते तळमळीने नाम घ्यायला सांगतात.


आशीर्वाद.

💧🌷🌼

,   श्रीराम समर्थ


अमृतधारा  १०२२


नाम घेणे म्हणजे मी भगवंताचा आहे विषयाचा नाही असे मनाला सांगणे व मनात तशी जाणीव उत्पन्न करणे. ही जाणीव टिकवण्याकरता पुन्हा पुन्हा मनाला मी भगवंताचा आहे हेच सांगणे म्हणजे सतत नाम घेणे.


भगवत्स्मरण करावे म्हणून संत नेहमी सांगत असतात. पण काय करावे, देहाची यातना (दुःख) कठीण आहे. त्यामुळे भगवंताची आठवण राहात नाही. या यातना देहाच्या अभिमानामुळे होतात. तुम्ही हा अभिमान कमी करण्याऐवजी वाढविता. संत अभिमान टाकतात एवढाच फरक..


आपण नाम घेऊ लागलो की अभिमान जो परमात्मप्राप्तीच्या आड येतो तो हळूहळू विगलित (निष्प्रभ) होत जातो. या अभिमान घालविण्याच्या आड जे जे येते ते दूर होऊ लागते. वैभव, सुस्थिती वगैरे अभिमान वाढवितात. म्हणून नाम घेणाऱ्यास या गोष्टी आपत्ती वाटतात.


अभिमान टाकून भगवंतास शरण गेले पाहिजे, म्हणजे तो भेटतो. भगवंतास भेटण्यास लांब जावे लागत नाही. तो तुमच्या हृदयातच आहे."मी फक्त भगवंताचा आहे". असे नेहमी मोठ्या कळकळीने म्हणत जावे. जे होते ते भगवद्सत्तेने होते, तो सर्व करतो अशी जाणीव सतत ठेवावी.


नदीच्या काठा काठाने जा, चालत राहा. काठ मात्र सोडू  नका. म्हणजे तुमचा गाव तुम्हाला भेटेल. असे वाटाड्याने सांगितल्याप्रमाणे गेलो तर गाव भेटतो. तसे  संत तुम्हाला नाम सांगतात. नामाला सोडू नका म्हणून आपल्याला सांगतात, म्हणजे भगवद्प्राप्ती होईल.


आशीर्वाद.

💦🌷🍀

   🌷 श्रीराम 🍀 समर्थ 🌷


अमृतधारा  १०२३


अभिमान मानाला कारण आहे. मी मोठा असे मनाने घेतले म्हणजे मानाची गरज वाटते. हा अभिमानच आपल्या व भगवंताच्या आड येतो. हा अभिमान घालविण्यास गुरू आज्ञेत राहणे, त्यांना शरण जाणे, व त्यांनी सांगितलेली साधने करणे हे उपाय आहेत.


पण ही साधने निराभिमानाने झाली पाहिजेत. हा अभिमान फार सूक्ष्म असतो. मी गुरू आज्ञेत राहातो. त्यांनी सांगितलेली साधने करतो. आता माझा अभिमान गेला, हे म्हणणे सुद्धा अभिमानाचेच आहे. खरे पाहता अभिमान बाळगण्यास आपल्या जवळ असे काय आहे? शक्ती, पैसा की कीर्ति? जगात आपल्यापेक्षा कितीतरी मोठे लोक आहेत.


पण मौज अशी की भिक्षा मागणाऱ्याला सुद्धा, मी त्यांचे कडे भिक्षेला गेलो. त्याने मला हट म्हटले, तेंव्हा पासून मी त्याचा उंबरठा नाही चढलो, असे म्हणतो. तेंव्हा हा अभिमान, मान, अपमान ही काय चीज आहे? याला मूळ कारण ही देहबुद्धी. ती नाहीशी झाली पाहिजे.


एखाद्या झाडास खतपाणी घालत गेलो तर ते मरेल कसे? मला लोकांनी बरे म्हणावे, मान द्यावा, शिव्या दिल्या तर वाईट वाटणे हे देहबुद्धीला खतपाणी घालण्यासारखे आहे. मान अपमान सर्व देवाला अर्पण करावे. वस्तुतः कर्तेपणच त्याच्याकडे सोपवावे. म्हणजे त्या कृत्याचा परिणाम होऊ देऊ नये.


आशीर्वाद.

💦🍀🌷

   🌷श्रीराम 🍀समर्थ 🌷


अमृतधारा  १०२४


अभिमान व देहबुद्धी भगवंताला शरण जाण्यास आड येतात. परिस्थिती आड येत नाही. ती व्यसनाच्या आड कोठे येते? अभिमान जाण्यास जे जे कराल ते भगवंतास अर्पण करावे.


तोच कर्ता, आपण काहीच करत नाही, ही भावना ठेवावी. म्हणजे अभिमानही भगवंतास अर्पण करावा. आपण भगवंताशी काहीना काही कारणाने संबंध जोडावा. नेहमी त्याच्याशी संबध ठेवावा. भगवंताशी बोलावे, त्याचे नाम घ्यावे. नामासारखे दुसरे खरे समाधान नाही.


साधन, प्रयत्नाचा अभिमान विगलित(शुन्य) होईपर्यंत केले पाहिजे. मी प्रयत्नाने, साधनाने भगवंत प्राप्त करून घेईन अशी याची गुर्मी जिरली पाहिजे. अगदी थकून गेला पाहिजे. भगवंता, तू कृपा करशील तरच तुझी प्राप्ती होईल. माझे हाती काही नाही, असे वाटले पाहिजे. तेंव्हाच भगवंत कृपा करतो.


मी प्रयत्न करून भगवंताने यश द्यावे हे म्हणणे सुद्धा खोटे. यात मी प्रयत्न करणारा हा अभिमान राहिलाच. भगवंताच्या कृपेशिवाय साधनांनी, प्रयत्नांनी तो मिळणार नाही, हे कळण्याकरताच साधन करावयाचे.


प्रयत्नांती, म्हणजे सर्व प्रयत्न झाल्यावर, भगवत्कृपेशिवाय त्याची प्राप्ती होणार नाही, माझे हाती काही नाही. अशी खात्री झाली म्हणजे परमेश्वर कृपा करतो.


आशीर्वाद.

💧☘🌷

   💧 श्रीराम 🌹समर्थ 💧


अमृतधारा  १०२५


अमुक हवे असे वाटले व ते मिळाले नाही म्हणजे दुःख होते. म्हणून अमुक हवे असे वाटुच देऊ नये. परमात्मा ठेवील त्यात समाधान मानावे. याचेच नाव वैराग्य.


आपण विषयात बुडत आहोत आणि विषयाचीच कास धरली तर आपण अधिकाधिक बुडणार नाही का? विषयाची आस धरणे म्हणजे आपण त्याचा दास नाही का होत? मनुष्याची सुखासाठी धडपड आहे. व अंती दुःखमय अशा विषयाची तो आशा करतो.


विषय मागितले की, विषयाबरोबरचे परिणामी दुःख येणारच. विषय नश्वर असल्यामुळे सेवेने मिळविलेले विषय नाहीसे होतात. तसे झाले म्हणजे आपण केलेली सेवा फुकट जावून सेवेचे श्रम मात्र पदरात पडतात. म्हणून भगवंताची सेवा निष्काम असावी.


सुख त्यागात आहे. भोगात नाही हे पुष्कळास पटतच नाही. परिसाला लोखंड लावले म्हणजे सोने होते. पण रुप्याचे सोने होत नाही. तसे आपण अतिशय अभिमानरहित झाले पाहिजे. असे झाले म्हणजे परमात्म्यास शरण जाता येईल. आणि असे होण्यास भगवंताची कृपाच पाहिजे. ती आपण नित्य भाकावी. त्यासाठी प्रार्थना करावी.


जे तुमची विषयातील नड भागवतात ते संत नव्हेत. संत विषयाची आसक्ती कमी करतात. अशा संतास शरण जावे. देव भावात असतो. तो भाव शुद्ध व उच्च असावा.


आशीर्वाद.

🌷🍀🌼

   

   🙏🏻श्रीराम 🌷समर्थ 🙏🏻


अमृतधारा  १०२६


विषयाकरता केलेली भगवत्भक्ती ही भगवत्भक्ती होऊ शकत नाही. कारण भक्ती म्हणजे संलग्न होणे, पण मी विषयाशी संलग्न असतो. तेंव्हा ती विषयाची भक्ती होते. भगवंताची नाही. हे ठरल्यासारखे झाले म्हणजे मी विषयाचा गुलाम नाही का होत? विषयाचा गुलाम होऊन विषय कसले भोगणार? मालक होऊन विषय भोगावे.


भगवंताला आपण आपले काम करण्याकरता म्हणजे सेवेला लावतो. नवस करणे हे असे आहे. ही भगवत् सेवा कशी होईल? व्यवहारातील इतर साधनाप्रमाणे आपण विषय हे साध्य व भगवंत हे साधन मानतो. उदा. डाॅक्टर, वैद्य याप्रमाणे किंबहुना त्याहूनही गौण असे भगवंतास मानतो.


मोबदला घेऊन केलेल्या सेवेला उदा. पैसे देऊन वैद्याचे औषध आणले, किंवा बाजारातून खडीसाखर आणली तर त्याला सेवा म्हणता येईल काय? अशा व्यवहारात वैद्यावर किंवा वाण्यावर प्रेम ते काय असणार?


सारांश भगवंताची सेवा अगदी निष्काम असावी. आपण भगवंताची सेवा करावी व म्हणावे  "माझे कडून सेवा करून घेतलीस हे मजवर तुझे उपकार आहेत".


आशीर्वाद.

🌼🍀🌹

   🌷श्रीराम 🙏🏻समर्थ🌷


अमृतधारा  १०२७


विषयातील सुख परावलंबी, विषयावर अवलंबून असणारे. विषय नश्वर, आपल्यापासून कधीतरी जाणार, निदान आपल्याला तरी त्याच्यापासून एक दिवस जावे लागणार. दुसरे, ते सुख इंद्रियाधीन, ती विकल झाली म्हणजे सुख कसे मिळणार?


उद्या आपण मरणार असे समजले तर कोणते विषय आपणास सुख देतील? जे जे होते असे वाटते ते आपणातच असते आणि विषयापासून सुख मिळते अशी आपली फसवणूक मात्र होते. मग सुख कशात आहे? माझ्याप्रमाणे पशुलाही विषय सुख आहे. मग त्याच्यात व माझ्यात फरक तो काय?


मी कशासाठी जन्माला आलो? मी कोण? असा विचार करणे याला सारासार विचार म्हणतात. प्रपंचातही आपण विचार करतो. कशात आपला फायदा कशात आपला तोटा हे बघतो. पण सर्वच असार. त्यात सार कोठुन असणार? आपण असलेल्या परिस्थितीत समाधान मानीत नाही. याहून अधिक सुखाच्या स्थितीची इच्छा धरतो.


देवाची भक्ती करणे, संताकडे जाणे हे सुद्धा विषय मिळविण्यासाठी. मग आपली ही भक्ती, सेवा विषयाची की संताची? देव व संत यांचाही इतर गोष्टींप्रमाणे विषय मिळविण्याचे साधन याप्रमाणे नाही का उपयोग करीत?


आशीर्वाद.

💧🍁☘

   🌷 श्रीराम 🙏🏻समर्थ 🌷


अमृतधारा  १०२८


आपल्याला अनंत जन्माच्या संस्कारामुळे विषयाची गोडी आहे. त्यामुळे विषय जसे नाचवील तसे आपण नाचतो. अगदी त्याचे दास बनून जातो. आपले आपण उरतच नाही. आपण त्याचे मालक न होता गुलाम बनून जातो.


ज्याची आपल्यास अत्यंत आवड त्याचे आपण दास बनतो. याचे उलट आपण दास झालो म्हणजे आवड उत्पन्न होते. म्हणून आपण भगवंताचे दास बनावे, म्हणजे भगवंताचे प्रेम उत्पन्न होईल.


भगवंताचे दास होण्यास त्याचे इच्छेप्रमाणे वागणे जरूर आहे. तोच सर्व कर्ता आहे. भगवंताच्या इच्छेप्रमाणे सर्व चालले आहे असे मानावे. आहे त्यात समाधान मानावे. त्याला आवडेल ते करावे म्हणजे भगवंताचे प्रेम उत्पन्न होईल.


प्रत्येकाची धाव आनंदाकडे व तो विषयापासून मिळेल असा त्याचा समज आहे. म्हणून तो विषयाकरता प्रयत्न करीत असतो. पण उलट दुःख मात्र पदरात पडते. तर मग जगात आनंदच नाही असे म्हटले तर प्राण्याची प्रवृत्ती तिकडे झालीच नसती.


प्रयत्नात चूक म्हणावी,  प्रयत्नाचे फळ विषय, तो मिळतो. मग विषयात आनंद नाही हे सिद्ध झाले. परमात्मा आनंदरूप आहे, व त्याचे प्राप्तीकरता प्रयत्न करणे जरुर आहे. निर्विषय आनंदरूप परमात्मप्राप्तीकरता निष्काम प्रयत्न झाला पाहिजे.


आशीर्वाद.

💦🍀🏵

, 🙏🏻 श्रीराम 🌷समर्थ 🙏🏻


अमृतधारा  १०२९


भगवंताचे रुप आनंद आहे व सृष्टीचा क्रम असाच आहे की तो आनंदाकडे पोहचवीत असतो. अत्यंत दरिद्री माणसाला सुद्धा आनंदाची जागा असते. आनंदाशिवाय मनुष्य जगणेच शक्य नाही. कशाची आसक्ती न धरता जगात वागणे हे मुक्ताचे लक्षण आहे. मला काही हवे हेच नाहीसे झाले म्हणजे दुःखाचे कारण राहत नाही.


देव सर्वव्यापी म्हणावे व माझ्यात नाही कसे म्हणावे? आपल्याला मायेने पछाडले आहे. आपण मायानियंता भगवंत, त्याचे होऊन राहावे. भगवंताजवळ माया ही आपल्याजवळ छाया तशी आहे.


भगवंताचे होऊन राहिल्याने माया खरी नाही हे समजते. विवेक म्हणजे मायेला ओळखणे व वैराग्य म्हणजे भगवंत ठेवील त्यात समाधान मानणे.


पाप पुण्य हे मनाचे धर्म आहेत. मी आता नाम घेतले. माझी सर्व पापे गेली अशी दृढ भावना झाली की तो निष्पाप झाला. चार चौघे करतात म्हणून साधन करून नाही चालणार.


साधनात दृढ भाव पाहिजे. पण जोपर्यंत देहबुद्धी गेली नाही, तोपर्यंत तो येणार नाही. जसे ताप जोपर्यंत उतरत नाही, तोपर्यंत मिरच्या तिखट लागत नाही. म्हणून साधन नियमित व निष्काम असावे.


आशीर्वाद.

💦🏵🌼

   🌷 श्रीराम 🙏🏻समर्थ 🌷


अमृतधारा  १०३०


देह हा परमार्थाकरता साधन आहे. पण मनुष्य हा देह मीच समजून व्यवहार करतो. वास्तविक आपण देहापासून वेगळे आहोत असे पदोपदी दाखवीत असतो. माझा हात, पाय, डोळा, मन फार काय माझा जीव असेही म्हणतो. पण मी तोच (देह) आहे असे समजून वागतो. देहाचा संबंध जास्त येईल असेच भगवंताजवळ मागतो.


आतील खोबऱ्याकरता करवंटी, त्याप्रमाणे देह मानावा. कुत्रा आपल्याला रात्रीच्या पहाऱ्याकरता उपयोगी पडतो. पण तो कितीही चांगला असला तरी आपण त्यास पानात घेऊन बसत नाही. त्याप्रमाणे देह आहे.


एखादे कुत्रे रडत असले तर आपल्याला वाईट वाटत नाही. पण एखादे लहान मुल रडत असेल तर वाईट वाटते. प्रेम वाटायला आपल्याला आपल्या सारखाच देहधारी लागतो. आपल्या देहावरचे प्रेम कमी होण्यास दुसऱ्या वरती प्रेम करावे लागते.


देवावर प्रेम करण्यास देवाला आपल्या सारखाच देहधारी कल्पावा लागतो. म्हणून देहबुद्धी कमी होण्यास, आपले देहावरचे प्रेम कमी होण्यास सगुण उपासना, सगुण मूर्तिचे, सद्गुरुचे ध्यान करावे लागते. ते जसे जसे दृढ होत  जाईल तसे तसे आपण स्वतःला विसरून जाऊ व आपण देहाच्या पलिकडे गेलो म्हणजे सद्गुरुचे खरे स्वरुप कळेल.


आशीर्वाद.

☘🌷🌼

,   🌷 श्रीराम 🙏🏻समर्थ 🌷


अमृतधारा  १०३१


आपले सद्गुरु देहातीत आहेत हे समजले म्हणजे आपली देहबुद्धी नष्ट होईल व तशी सद्गुरुची ओळख होईल. ज्याने आपला देहाभिमान नष्ट केला त्याची मोठा ज्ञानी सुद्धा सेवा करतो. मी देह म्हणावे याहून दुसरे कोणते अज्ञान नाही. मी भगवंताचा असून देहाचा म्हणणे यासारखे दुसरे खोटे नाही.


प्रपंचात संकटे येतात, पण तो सोडावासा वाटत नाही. याहून भगवंताची माया कोणती म्हणावी? अती सहवासाने देहाचे ममत्व सुटत नाही. परमात्म्याचा सहवास, उदा. देवाला जाण्याचा, जप करण्याचा नेम केला म्हणजे थोडे थोडे देहाचे ममत्व कमी होते. देहाच्या सहवासाने आपण देहाचे होतो. नामाच्या सहवासाने आपण परमात्म्याचे होऊ.


विषयात काळ घालवू लागलो की पुजेचा विसर पडतो. आणि पुजेत काळ जाऊ लागला की विषयाचा विसर पडतो. संत देहातीत असतात. त्यांचे जवळ गेल्याने देहाभिमान कमी होतो.


मला आज देवाची नड (गरज) वाटत नसेल, पण ती कशाने वाटेल याचा विचार करावा. ती भगवत् चिंतनाने,  नामस्मरणाने भासू लागते. भगवंताची गरज इतकी वाटली पाहिजे की अन्नपाणी गोड लागू नये.


जितकी आग जोराची तितका पाण्याचा मारा हवा. तसे जितकी देहबुद्धी बळकट तितका नामाचा जोर पाहिजे. नामात प्रेम नाही म्हणून नाम घेण्याचे सोडू नये. पाण्यात पडल्यानेच पुढे पोहायला येते. काठावर बसून नाही. काशीला गेले नाही तरी जायचे म्हणावे. त्याप्रमाणे नामात प्रेम नसेल तरी नामात प्रेम आहे असे म्हणावे.


आशीर्वाद.

💧🏵🍀

, 🌷 श्रीराम 🙏🏻समर्थ 🌷


अमृतधारा  १०३२


नामाशिवाय दुसरे सत्य नाही. दुसरे साधन नाही असा दृढ विश्वास झाला म्हणजे नाम घेतल्याशिवाय राहावत नाही. व घेतल्याने त्याच्या सहवासाने प्रेम येते. संत देव आहे म्हणतात. मीही देव आहे म्हणतो. फरक इतकाच की माझे म्हणणे अनुमानाने असते, त्यांचे म्हणणे अनुभवाचे असते.


भगवंताच्या नामाची गोडी एकदा लागली की तो ते सोडीत नाही. जितका देहाचा संबंध जास्त तितके नाम अधिक घेतले पाहिजे. इतके दिवस विषयाचे चिंतन केले, त्याने तरी तुमचे हातास काय आले?


विषयाचे ध्यासापासून सुख नाही असे वाटू लागले म्हणजे नामात गोडी येते. नामासारखे सोपे साधनच नाही. त्यास कसले बंधन नाही. भगवंत जोडण्याकरता नाम घेण्यासाठी कुणाची परवानगी लागत नाही. त्याच्या आड काही येता कामा नये.


नाम हेच साधन व साध्य होऊन राहावे. वाईट विचार येतील तेंव्हा नामाची जोड लावून द्यावी. नामात काय आहे ते, जे घेतात त्यांना कळते. एकदा नामाची गोडी लागली म्हणजे त्याला प्रपंचाची भीती वाटू लागते, इतके विषय त्याला कडू लागतात. वासरू घेऊन गेले म्हणजे जशी गाय मागे येते, त्याप्रमाणे नाम घेतले की भगवंत मागे येतो.


आशीर्वाद.

☘💦🏵

   🌹श्रीराम 🙏🏻समर्थ 🌹


अमृतधारा  १०३३


भगवंताचे नाम घेतल्याने प्रपंच बिघडला हे म्हणणे चुकीचे आहे. नाम घ्यावयाचे म्हणून कर्म मार्ग सोडू नये. नामाची गोडी ज्याला आली त्याची कर्में सुटतात. नामात प्रेम येइल असे करावे. नामाचा अनुभव नाही हे म्हणणे खोटे आहे. आपण ते घ्यावे तितके घेत नाही.


जन्माला आल्यासारखे नामाचे होऊन राहावे. भगवंत आपल्या नामस्मरणात आहे. वाचेने खरे किंवा खोटे बोलता येते. पण खरे बोलण्याकरता परमेश्वराने वाचा दिली आहे. भगवंतापाशी, तुझ्या नामाची गोडी दे हेच मागावे.


भगवंताचे नामस्मरण केले म्हणजे साहजिकच भगवंताची आठवण होते. आपण देह नाही, सच्चिदानंद रूप आहो, असे स्फुरू लागते, व एवढ्या करता संत नाम सांगतात. नाम घेणे म्हणजे आपण भगवंताचे आहो, देह नाही याची जाणीव ठेवणे नाही का होत?


शुद्ध भावनेशिवाय सर्व व्यर्थ आहे. भावना शुद्ध होण्यास एका सत्समागमाशिवाय दुसरा उपाय नाही. एकदा भगवंताचे होऊन राहिले म्हणजे तोच सर्व उपाय काढीत असतो. मी अमुक एक साधन करीन असे म्हणू नये. परमेश्वरा, तूच माझे हातून सर्व करून घेणार असे म्हणावे.


आशीर्वाद.

🌹☘🌼

   🌼 श्रीराम 🙏🏻समर्थ 🌼


अमृतधारा  १०३४


आपणास नाव लौकिकाचा किंबहुना देहाचा सुद्धा व्यसनापायी विसर पडतो. मग भगवंताला आळवण्यात स्वतःला कां विसरता येत नाही? याचे कारण आपणास विषय आवडतात. भगवंत आवडत नाही. असे तरी का व्हावे? कारण विषयाचा आज सहवास आपल्याला फार आहे म्हणून ते आवडू लागले.


आता भगवंताशी, म्हणजे त्याच्या नामाशी सतत  सहवास ठेवावा, व तो इतका वाढवावा की भगवंत आवडू लागावा. म्हणजे विषय आपोआप आवडणार नाहीत. सारांश, नामात प्रेम येईपर्यंत व विषय कडू लागेपर्यंत सतत नाम घ्यावे.


साखर गोड असते. तिच्यात गोडी घालावी लागत नाही. पण ताप आलेल्या माणसाला ती कडू लागते. ताप गेल्यावर गोड लागते. तसे विषयासक्ती नाहिशी झाली म्हणजे नाम गोड लागेल. ती जाण्यास जबरीने नाम घ्यावे. म्हणजे हळूहळू गोडी येईल. सहवासाने नामात गोडी येईल. आपण आपले नाम घेत जावे.


थोडा का होईना पण प्राणाबरोबर नामाचा नेम ठेवावा. ही एक तपश्चर्या आहे. आपल्याला सद्गुरुंचा पाठिंबा आहे ही भावना ठेऊन अगदी निर्भय राहावे. ही जाणीव मात्र नेहमी राहावी.


आशीर्वाद.

🌼🍀🏵

   🌷 श्रीराम 🙏🏻समर्थ 🌷


अमृतधारा  १०३५


ईश्वर उत्पन्न करतो, रक्षण करतो, आणि मारतोही (नाश) तोच. तरी पण त्याला न्यायी व प्रेमीच म्हणतात. म्हणजे प्रेम निस्वार्थीच असते. आपल्याला आपला स्वार्थ नडतो. हे ईश्वरी प्रेम कशानेही, कोणत्याही विषयाने प्राप्त होणार नाही.


ज्या गोष्टींनी हे प्रेम प्राप्त होत नाही त्याचा त्याग करायला हवा. विषयाची आसक्ती, त्याचे वरील प्रेम नाहीसे झाले पाहिजे. आपण ईश्वराचे, संताचे झाले पाहिजे. त्याशिवाय आपल्याला कशाचीही गरज वाटता कामा नये.


नामस्मरण करताना स्वतःचे विस्मरण हे भगवंताचे (खरे) स्मरण होय. विषयावरील प्रेम कमी झाल्याशिवाय आपल्याला भगवंत कसा भेटणार?  आपल्याला विषयही हवा आणि भगवंतही हवा, हे जुळणार कसे?


एकाच मातीची गणपती, बाहुली, मडके होतात त्याप्रमाणे ईश्वरही आपल्या भावनेप्रमाणे होतो. म्हणून आपला भाव शुद्ध निस्वार्थी असावा. मुळात पाणी घातले की झाड वाढते,पण आपण मुळापर्यंत जातच नाही. भाव शुद्ध कसा होईल हे पहावे.


एकादशीचे दिवशी उपास एवढेच ठाऊक. एक मनुष्य एकादशी म्हणून आंघोळ न करता बारा वाजेपर्यंत घरचे छोटे मोठे काम करीत बसला. उपास कशाकरता हेच तो विसरला. आपल्याला मुळात काय पाहिजे ते कळत नाही, म्हणून गुरू आज्ञा प्रमाण मानून वागत जावे.


आशीर्वाद.

🌷☘💦

, 🌷 श्रीराम 🙏🏻समर्थ ??


अमृतधारा  १०३६


संसार, विषय हे दुःखरुप आहेत. क्वचित सुखाचा आभास मात्र दिसतो. मनुष्य मला या एवढ्या संकटातून दूर करा म्हणतो. पण ज्याचे रुपच संकटमय, त्यातून दूर कसे करायचे?


संसारात एखादे वेळेस सुख झाल्यासारखे भासते. पण ते दारु प्यायल्याने मिळालेले  सुख धुंदी असेपर्यंत टिकणारे, म्हणजे ते शाश्वत (कायम) नाही. एकंदरीत विषयात सुख नाही हे ठरले.


मग असा हा संसार देवाने आमच्या मागे का लावला? तर तो पूर्वाभ्यासाने तुमचा तुम्हीच लावून घेतला आहे. त्यातच राहून युक्तीने सुटका करून घेतली पाहिजे. पण तुम्ही त्याचा दुरुपयोग करता!


संसार ही एक प्रकारची शाळा आहे. आपली उन्नती अजमावण्याची ती एक कसोटी आहे. त्याचा देहाने त्याग करणे शक्य नाही. कारण देह हाच पर्यायाने प्रपंच आहे. देहाला आनंद व सुख हवे.


आपण पोट दुखू लागले म्हणजे म्हणतो की खाण्यात काही चूक झाली असावी. म्हणजे निरोगीपणा हा आपला जन्मसिद्ध हक्क व दुखणे हे आगंतुक आहे. तसेच दुःखी कष्टी होणे हे आगंतुक व आनंदात असणे हे नैसर्गिक आहे.


आपणास भगवंत हवा ही गोष्ट खरी. पण कवटाळता विषयाला. ज्यात जे नाही ते मिळेल कसे? आपण लावून घेतलेली विषयासक्ती आपणच दूर करायला पाहिजे.


आशीर्वाद.

💧☘🌹

   🙏🏻 श्रीराम 🌷समर्थ 🙏🏻


अमृतधारा  १०३७


आपल्याला विषयासक्ती  आहे, ती आपली आपणच लावून घेतली. देवाची आसक्ती, ध्यास धरला म्हणजे विषयाची आसक्ती कमी होते. भगवंताचा विसर  जो पडतो त्याला विषय म्हणावे. भगवंताची आठवण ठेवून त्याला न विसरता विषय भोगले तर काय हरकत आहे?


काळजी व संकटे हे प्रपंचाचे स्वरूप आहे. ही काळजी श्रीमंत व गरीबांना दोघानाही सारखीच असते. जो तो पोटापुरते खायला मिळेल व लौकिकात राहता येईल असे द्या म्हणतो. पण त्याला काही मर्यादा आहे की नाही?


पैसा आज आहे उद्या नाही. अशा अशाश्वत पैशावर मी स्वतःला श्रीमंत म्हणतो. याने परावलंबीपणा नाही का येत? संत अशा संकटाच्या मुळावरच युक्तिने घाव घालतात. ते विचार करण्यास सांगतात हा संसार कोणाचा?


हे गाडे देहापर्यंत येते. मग देह कुणाचा हा प्रश्न येतो. माझा म्हटला तर त्याला आपल्या मनाप्रमाणे का वागविता येत नाही? त्याला ताप का येतो? सारांश, देहावर आपली सत्ता नाही? म्हणजे सर्व भगवंताच्या इच्छेने होते.


मी कर्ता नव्हे. देव कर्ता आहे. देव सत्य आहे म्हणजे त्रिकालाबाधित व सर्वव्यापी आहे. पण याचा समज, देव संकुचित व मर्यादित आहे. सारांश, तुमच्या भावनेत देवपण नाही.


आशीर्वाद.

💦🌼🌷

   🌷श्रीराम 🙏🏻समर्थ 🌷


अमृतधारा  १०३८


मी देह नव्हे तर आहे तरी कोण? त्रिकालाबाधित व सर्वव्यापी देव कसा भेटेल? ह्याला एकच उपाय, संत समागम. हा संताकडे, सत्पुरुषाकडे जातो, पण तो त्यांचे परीक्षेकरिता, व आपले मनाप्रमाणे सत्पुरुष आहे की नाही हे ठरवितो.


खरे संत, सत्पुरुष कसे असतात याला कोठे माहीत आहे? खरे सत्पुरुष, संत भेटावे अशी तळमळ लागली पाहिजे. त्यासाठी अखंड नामस्मरण करावे, म्हणजे हे सर्व साधते.


साधुची लक्षणें आपल्या अंगी बाणवून घेण्यासाठी सांगितली असतात. त्या लक्षणांवरून साधू कधीही ओळखता येणार नाही. साधू होऊनच त्याला ओळखले पाहिजे.


प्रापंचिकाला साधुंना ओळखायचे झाले तर साधुचा आपल्यावर काय परिणाम झाला ते पहावे. म्हणजे आपल्यावरून त्याला ओळखावे.


आपल्या मनाला काही वेळ शांती मिळाली. थोडातरी मीपणा कमी झाला. मन निर्विषय झाले. निदान व्हावे असे वाटू लागले. तर ते साधूचे स्थान आहे असे समजावे.


आशीर्वाद.

🌼☘🌷

   ☘श्रीराम 🍁समर्थ☘


अमृतधारा  १०३९


साधू सर्वाभूती भगवद्भाव किंवा सर्वत्र मीच आहे असे समजतात. त्यामुळे ते सर्वावर प्रेम करतात. आपण आपलेपणा काहीजणांमधेच पाहतो. सर्वत्र पाहत नाही.


साधुचा मीपणा गेल्यामुळे ते सर्वत्र भगवद्भाव पाहतात व त्यांचे प्रेम निस्वार्थी असते. आपले प्रेम स्वार्थी असते. साधुच्या प्रेमाची थोडी छटा आईच्या प्रेमाला येते. पण तिचे प्रेम सुद्धा थोडे स्वार्थमूलक असते.


संतासारखे प्रेम यावयास नाशवंत वस्तूंवरचे प्रेम नष्ट झाले पाहिजे. सर्वत्र प्रेम करावयाचे म्हणजे निस्वार्थ बुद्धीने योग्य ते करणे.


संत विषयात देव पाहतात. आपण, देवात विषय पाहतो. रामाची मूर्ति काय उत्तम घडविली आहे. देऊळ किती सुंदर बांधले आहे वगैरे आम्ही म्हणतो.


आमची वृत्ती विषयाकार बनली म्हणून आम्हाला जिकडे तिकडे विषयच दिसतो. संतांची वृत्ती रामरूप असते. त्यांना सर्वत्र रामच दिसतो. परमात्म्यास सोडून जी वृत्ती, ती सर्व विषयाकार आहे. त्यातच आपले मन गुंतले असते.


विषयाकार वृत्ती न उठणे हे सर्वस्वी रामकृपेवर अवलंबून आहे. पण वृत्ती आवरणे हे काही अंशी मनुष्याच्या प्रयत्नाधीन आहे. पण त्यासही रामकृपा पाहिजे. त्यासाठी कृतज्ञतेने नामस्मरण केले पाहिजे.


आशीर्वाद.

☘💦🌹

   💦श्रीराम 🌷समर्थ 💦


अमृतधारा  १०४०


वृत्ती आवरण्यासाठी जी जी गोष्ट होते ती भगवंताच्या इच्छेने होते ही जाणीव उत्पन्न करावी. कोणत्याही गोष्टीस एकदा ओळखले म्हणजे त्याची भीती वाटत नाही. विषय जोवर आपण ओळखले नाही तोवरच त्रास देतात.


परमार्थाचे आड आपले आपणच येत असतो. परमार्थास घातक दुसरे कोणी नाही. जेथे जेथे वृत्ती वावरते, तेथे तथे भगवंताची वस्ती असते. वृत्ती कोठेही जरी उठली तेथे भगवंताची आठवण केली की ती मावळते.


वृत्ती जेथून उठते तेथे भगवंताला शरण जाणे जरूर असते. उपास्य देवतेचे, रामरायाचे स्मरण करावे. त्याचे पायावर मस्तक ठेवून शरण जावे.


आजवर जगाचा मी अनुभव पाहून घेतला. तुझे प्राप्तीवाचून खरे सुख कशात नाही असे भासू लागले. तरी वृत्ती आड आल्याशिवाय राहत नाही. खरे पाहू जाता त्या तुझ्यातच आहेत. तुझ्या आड येणारे विषय, वृत्ती तुझ्या कृपेवाचून दूर होणार नाहीत.  तरी भगवंता, तुझ्या पायी मी अनन्य भावे शरण आहे. अशी प्रार्थना करावी.


आशीर्वाद.

🌷☘🌼

   💧श्रीराम 🙏🏻समर्थ 💧


अमृतधारा  १०४१


भगवंतप्राप्तीच्या आड ज्या वृत्ती आड येतात त्या माझ्या (आहेत), अशा मीपणाने मीच माझ्या आड करून घेत आहे. तरी त्यांची ओळख मला पटवावी. त्यांची ओळख पटणे म्हणजे तुला त्यात पाहणे हे आहे. भगवंता! तुझ्या कृपेने ते सिद्धीस जाईल अशी प्रार्थना करावी.


सकाळी पंचपंच  उषःकाली उठत जावे. भगवंताची मूर्ति डोळ्यासमोर आणून "तुझे विस्मरण जेथे जेथे होते तेथे मला जागृत करीत जावे. मला आता तुझ्याशिवाय आसरा उरला नाही". अशी प्रार्थना करून नमस्कार  करीत जावे, म्हणजे आपले काम होते.


भक्ती प्रत्येकजण करीत असतो. व्यापक दृष्टीने पाहिले असता भक्ती म्हणजे अत्यंत आवड. सर्वांना विषयाची  आवड असते. तेंव्हा सर्व विषयाची भक्ती करतात. पण परमार्थात परमात्म्याची आवड म्हणजे भक्ती असा अर्थ करतात.


विषयाची भक्ती देहबुद्धीला धरून, देहबुद्धी वाढवणारी स्वार्थी होय. ही कमी झाल्याशिवाय परमात्म्याची आवड म्हणजे भक्ती उपजणे शक्य  नाही. त्यासाठी सतत नामस्मरण करणे जरुरी आहे.


आशीर्वाद.

☘🌷🌼

   🌷श्रीराम 🙏🏻समर्थ 🌷


अमृतधारा  १०४२


भक्ति म्हणजे भगवंताशिवाय दुसरे काही न आवडणे. आपण आपलेपणाने न उरणे. सर्व काही भगवंत करीत आहे. त्याचे सत्तेने सर्व काही चालले आहे असे मानणे. पाहू गेले तर ते फार सोपे आहे व कठिणही आहे.


अर्जुनाला गुरुजनांना कसे मारु असे वाटले व त्यामुळे तो युद्ध करी ना. भगवंतानी जेव्हा हे पूर्वीच मेले आहेत व अर्जुनाने त्यास मारले असे विश्वरूप दर्शनाने दाखवले, तेंव्हा त्यास पटले.


भक्तिमार्गातील पहिली पायरी म्हटली म्हणजे, देहबुद्धी कमी करण्याकरता मोबदल्यारहित, निष्काम व निस्वार्थीपणे भगवंताचे स्मरण करणे. शेवटची पायरी म्हणजे नामस्मरण करताना आपण स्वतःस विसरणे, देहबुद्धी नाहीशी होणे ही होय.


निस्वार्थी प्रयत्न करावा म्हटले तेंव्हा देहरक्षणाकरिता प्रयत्न करावा कि नाही, हा प्रश्न उद्भवतो. परमात्म्याच्या प्राप्तीसाठी देह रक्षण करावे. विषय सेवनासाठी नाही.


भगवंताच्या प्राप्तीसाठी निस्वार्थी प्रयत्न होणे हे खरे पण त्याचे प्रथम अस्तित्व मानले पाहिजे. आपण देव आहे असे मानतो पण त्यास देवळात पाहतो. त्याचे विश्वव्यापित्व लक्षात येत नाही. तसे असते तर पाप घडणे अशक्य आहे.


भावात देव असतो हे खरे. पण आम्हीच त्याला भावनेने एकाच ठिकाणी समजतो. भगवंत सर्वव्यापी असून सर्वसाक्षी आहे असे समजलो तर हातून पापाचरण होणारच नाही.


आशीर्वाद.

💦🍁🌼

, ❗श्रीराम ☘ समर्थ ❗


अमृतधारा  १०४३


भगवत्प्राप्तीकरता सद्गुरुनी साधन सांगितले. ते मी जिवापाड केले पण प्राप्ती झाली नाही. अमुक केले तर अमुक होते, असे अनुभव व्यवहारात पावलो पावली येतात. मग येथे असे का होते?


सद्गुरुचे चुकले असे तरी कसे म्हणावे? पण मी विषय बाजूला केले आणि कष्ट करून साधन केले पण अजून अनुभव नाही, तर माझे चुकते कोठे? मी साधन केले खरे, पण मी केले हा अभिमान गेला नाही.


सद्गुरुच्या इच्छेने मी करतो. साधन तेच करून घेतात अशी भावना ठेवावी. आम्ही जीव दशेतले. आम्हाला काही करावेसे वाटते तेव्हा प्रयत्न अवश्य करावा. पण निदान यश देणारे ते आहेत अशी भावना ठेवावी.


मी साधन इतके दिवस केले, पण विकार आहे तसेच आहेत. क्रोध तर उलट वाढला. याचेही कारण मी करतो हा अभिमान. सर्व त्याच्या इच्छेने तोच करीत आहे. दिवा जाताना ज्या प्रमाणे मोठा होतो, त्याप्रमाणे तुमच्या विकाराचे आहे.


एकदा तुम्ही सद्गुरुचे झाला, मग त्याचे इच्छेने काय होणार ते होईना. तुम्ही आपली अक्कल लढवू नका. सर्वस्वी माझेवर भार ठेवून स्वस्थ रहा.


आशीर्वाद.

🍁☘🌼

   🍁 श्रीराम 🙏🏻समर्थ 🍁


अमृतधारा  १०४४


साधकाने प्रयत्न अवश्य करावेत, पण जे काही आपले हातून घडत आहे ते भगवत्प्रेरणेने घडत आहे अशी दृढ भावना असावी. म्हणजे कर्तेपणाचा अभिमान हळूहळू विगलित होतो.


प्रयत्नाचा जो काही परिणाम तो आपल्याला आपल्या मते अनुकूल वा प्रतिकूल असो, त्यातच आपले हित आहे अशी दृढ भावना धरावी. म्हणजे त्याबद्दल सुख दुःख होणार नाही.


परमात्म्याची इच्छा तीच आपली इच्छा असावी. जे काही घडत आहे ते परमात्म्याच्या इच्छेने, म्हणजे सुख दुःख होण्याचे कारण राहत नाही. पण साधकाला परमात्म्याची इच्छा काय आहे ते कळत नाही. ते संतांनाच कळणार.


तरीपण, साधकांनी जी गोष्ट घडली ती ईश्वर इच्छेनेच घडली, व त्या इच्छेशी आपली इच्छा जुळती घेऊन सुख दुःख मानण्याचे सोडून द्यावे.


अभिमान सोडून कर्म करीत राहावे. प्रयत्न करून यश आले नाही म्हणजे दुःख होते. स्वास्थ्य बिघडते. मी केलेच नाही म्हटले म्हणजे दुःख कोठले?


प्रयत्न करून जे काही होते ते रामाच्या इच्छेने आले म्हणावे. प्रत्येक गोष्ट रामाने केली म्हणणे म्हणजे भगवंताच्या अखंड अनुसंधानात राहणे. आणि हे साधण्यास अखंड नामस्मरण करावे.


आशीर्वाद.

💦☘🍁

   ☘ श्रीराम 🌷समर्थ ☘


अमृतधारा  १०४५


अभिमान दुष्कृत्यामुळे तर वाढतोच पण सत्कर्मानेहि तो वाढतो. ही सत्कर्मे मी करतो ही भावना सोडावी. वैद्यकीमध्ये जसे ज्या जंतूंमुळे दुखणे आले असेल, तर त्याच जंतुंचे विष काही प्रयोग करून अंगात टोचतात. तसे हा देहाचा अभिमान जाण्यास भगवंताचा अभिमान धरावा.


भगवत्कृपेने त्याच्या इच्छेनेच ही सर्व कर्में मी करतो. खरा कर्ता तो आहे. मी निमित्तमात्र आहे. अशा भावनेत सदा रहावे. पण भगवंताचे अस्तित्व (तोच एक सत्य आहे) हे पटले पाहिजे. त्याकरता भगवंताचे स्मरणात अखंड राहावे.


प्रल्हाद व हिरण्यकश्यपू  यांच्यात दोन गोष्टी दिसतात. प्रल्हाद निरभिमानाचा पुतळा तर हिरण्यकश्यपू अभिभानाचा पुतळा.  सत्याच्या अधिष्ठाना वाचून असत्य राहुच शकत नाही. सत्य हे एकच असणार व भेद दिसणार ते असत्यातच.


प्रल्हादाला परमेश्वर सर्व ठिकाणी दिसत होता. तसा तो हिरण्यकश्यपूच्या ठिकाणीही दिसत होता. कारण त्याची दृष्टी असत्यातील सत्यावर होती.


म्हणून हिरण्यकश्यपूला देव त्याच्या स्वतःत न दाखवता खांबात दाखवला. कारण त्याची दृष्टी असत्यावर असल्याने त्याला स्वतःतील देव दिसणे शक्य नव्हते. त्याला देव दिसला तरी दैत्याच्या पांघरुणातच दिसणार. पण त्याच्यावरील असत्याचे, अभिमानाचे पांघरूण जेव्हा विदारण केले तेंव्हाच तो परमात्मस्वरूप झाला.


आशीर्वाद.

💦🌷🍀

   🌹श्रीराम 🙏🏻समर्थ 🌹


अमृतधारा  १०४६


चांगला वैद्य तुम्हाला ताप आला म्हणजे कारण शोधतो. व निदान झाले म्हणजे ते कारण दूर करण्याकरता औषध देतो. तुम्हाला समाधान नाही. चित्तात स्वस्थता वाटत नाही. तर हे कशामुळे होते. देहाला दुखणे आहे म्हणून कि पैसा नाही म्हणून? खरे निदान संतांना करता येते.


देहाच्या आसक्तीमुळे समाधान नाही. ती दूर करण्याकरता संत नाम सांगतात. तुम्ही नाम घेता ते देहाची आसक्ती कमी होऊन   परमात्म्याच्या प्रेमाकरता. नाहीतर देहदुःख कमी होण्याकरता घेता.


अशाला भक्ती म्हणता येईल काय? तुम्ही मुळापर्यंत जात नाही, व दुःख काही कमी होत नाही. एक दुःख कमी झालेसे वाटते, तर दुसरे त्याच्याहीपेक्षा अधिक दत्त म्हणून पुढे उभे राहते.


सर्व दुःखाचे मूळ जो देह, त्याचा विसर पडणे, त्याची आसक्ती नाहीशी होणे हे खरोखर साधले पाहिजे. हे साधण्याकरता परमात्म्यावर प्रेम, त्याचे स्मरण, त्याची आसक्ती जडली पाहिजे. हे प्रेम सद्गुरूने कृपा केल्याशिवाय मिळणार नाही,


हे सत्य, सत्य आहे. सद्गुरुने कृपा केल्याशिवाय परमात्म्याचे प्रेम वगैरे मिळणार नाही असे म्हणता. पण संसारात पैसा मिळवणे, साठवणे याबद्दल महाराज करतील तर होईल असे का म्हणत नाही ?


सर्व भगवंताच्याच इच्छेने चालले आहे. पण संसारात सर्व सुखाच्या गोष्टी मी करतो म्हणता. व त्यात दुःख झाले तर ती गोष्ट महाराजांनी पार पाडावी म्हणता. ही लबाडी नाही का?


आशीर्वाद.

🌷☘🌼

,   🌷श्रीराम ☘ समर्थ 🌷


अमृतधारा  १०४७


सर्व प्रपंच आणि परमार्थ सद्गुरुवर सोपवून, त्यांची आज्ञा प्रमाण मानून चालावे. मग सुख दुःखाचे कारण तुम्हाला काय आहे? एकाने एका जवळ १०० रुपये मागण्यास तुम्हांस धाडले. त्याने दिले किंवा नाही म्हटले तर हर्ष विषाद धाडणाऱाला. तुम्हाला दोहीतही सारखा आनंद वाटला पाहिजे.


ज्याची ज्याला आसक्ती त्याची त्याला भक्ती. आम्हाला विषयाची आसक्ती असल्यामुळे आम्ही विषयाची भक्तीच करतो. आपली सर्व खटपट सुखाकरता, आणि त्याकरता विषयाची कास धरतो. ते आहेत दुःखरूप व नाशवंत. तेथे सुख कसे मिळेल?


यातच काही आम्ही सुखी आहोत असे म्हणतात. याचे कारण ते दुःख इतके अंगवळणी पडलेले असते की ते त्यांना सुखच वाटते. विषयातील सुख म्हणजे कमी दुःख. अगदी गरीबांना धड पोटभर खायला मिळत नाही म्हणून दुःखी.


मध्यम स्थितीतील मनुष्याची स्थिती  तर फारच कठिण. अब्रुने दिवस कसा जाईल याच्या काळजीमुळे पुढे आलेले अन्नही त्याला गोड लागत नाही.


श्रीमंताला आपली संपत्ती कोणी नेणार तर नाही ना! असे सदोदित कसे चालेल, याची काळजी. काळजी म्हणजे दुःख नाही का? एकंदर सर्वच दुःखी, म्हणून विषयातील मन काढून भगवंताकडे लावावे.


आशीर्वाद.

🌷🌹💦

   💦श्रीराम 🌹समर्थ 💦


अमृतधारा  १०४८


आशा सर्व दुःखाचे मूळ आहे. आशा म्हणजे अमुक एक गोष्ट हवी किंवा नको असे वाटणे. ही आशाच काढून टाकावी. ही आशा मनात उद्भवते म्हणून मनच रामार्पण करावे.


हे करणे फारच कठीण आहे. ते एक संतच करू जाणे. किंबहुना त्यांनाच संत म्हणावे. त्यांचे हातून जे कर्म घडते ती रामसेवाच होय. कारण त्यांचे मन रामरूप झालेले असते.


हे सिद्धाचे काम आहे. साधकाने जे घडत आहे, ते भगवद्इच्छेने घडत आहे. आपण काही करीत नाही. त्यातच आपले हित आहे. अशी भावना करावी.


जे होईल त्यात त्यात आनंद मानीत जावे. सिद्धाची ही सहजावस्था असते. साधकाला प्रत्येक कृत्यात भगवंत आठवावा लागतो.


संतांना सर्वत्र रामरूप दिसत असते. त्यांना आपपर भाव नसतो. अशा स्थितीत व्यवहारी माणसाप्रमाणे लोक संग्रहार्थ वागण्याचे काम एखाद्या स्त्रीपार्टी नटाप्रमाणे त्यांना फार जपून करावे लागते.


संतांना आपण विषयाकडे ओढतो. पण संत असे वस्ताद की आपण विषयात आलो असे दाखवतील. पण तुम्हाला विषयाचे बाहेर काढतील. आणि नाम न घेणाराला नाम घेण्यास लावतील.


आशीर्वाद.

🌼💧🌷

, 💧श्रीराम 🌷समर्थ 💧


अमृतधारा  १०४९


संताची चौकशी करताना आपण त्याची उपासना कोणती? गुरू कोण असे पाहतो. त्यांच्या आई बापाची चौकशी करीत नाही.


संतांना देहाची आठवण नसते. ते आपला मीपणा, देहाभिमान भगवंताला देतात. मुक्त जगाचे नसून भगवंताचे असतात. मुक्त मालकाला जाणतो. बद्ध शिपायाला जाणतो. बद्ध जगाचे असतात.


बद्ध म्हणजे बांधलेला, पराधीन, दुसऱ्यावर अवलंबून असणारा. जो आपल्या आनंदाकरता दुसऱ्यावर अवलंबून असतो तो बद्ध. माझे माझे म्हणून आपण बद्धावस्था लावून घेतो.


मालक पाहिला तरी, मुक्त त्याला मालक म्हणत नाही. विषय प्रेम कमी होणे म्हणजे मुक्त दशेच्या मार्गाला लागणे. मी भगवंताचा म्हटले की तेथे बद्धपणा संपला. भगवंतापासून वेगळा राहत नाही तो मुक्त.


मी नसून तो आहे हे जाणणे म्हणजे मुक्तता प्राप्त करून घेणे. देह असून देहातीत राहातो तो मुक्त. रामकर्ता हे जाणतो तो मुक्त. मी एका भगवंताचा झालो, आता नाही कोणाचा असे म्हणावे व नाटकातील नटासारखे वागावे.


माझ्या मनावर कशाचाही परिणाम नाही होऊ लागला व समाधान कायम राहिले की मुक्तावस्था आली असे समजावे.


मुक्त मोकळा. स्वाधीन,  कोणावरही अवलंबून नसलेला. जो आपल्या आनंदाकरता दुसऱ्यावर, विषयावर, इंद्रियांवर अवलंबून नसतो तो मुक्त.


आशीर्वाद.

🌹☘💦

, 🌷 श्रीराम ☘ समर्थ 🌷


अमृतधारा  १०५०


सत्याला न ओळखल्यामुळे बद्धता आली. सत्यज्ञान करून घेणे म्हणजे मुक्तावस्था. दोरीला साप समजणे म्हणजे बद्ध. दोरीला दोरी समजणे म्हणजे मुक्त.


कर्तेपण सुटले कि तो मुक्त. निदान कर्तेपण घातुक आहे,  इतके तरी पटावे. अखंड भगवंताच्या स्मरणात राहावे म्हणजे कर्तेपण सुटते.


कर्तेपण आपलेकडे घेऊ नये. हे साधत नसेल तर,  अहंकाराने केलेली कर्में भगवंताला अर्पण तरी करावी. अर्पण केलेल्या वस्तूवर आपली सत्ता नसते, व ती वस्तू आपण परत घेत नाही. म्हणून केलेल्या कर्माचे फळ, सुखदुःख याच्याशी आपला कही संबंध राहत नाही.


ज्याच्याकडे कर्तेपण, त्याच्याकडेच सुख दुःखाचे भोक्तेपण येणार. आपण आपलेकडे कर्तेपण घेऊ नये, म्हणजे आपणास सुख दुःख होणार नाही.


मी देही म्हणतो तो बद्ध. मी कर्ता म्हणतो तो बद्ध. बद्धाचे बीज वासनेत असते, आणि आपल्या वासनेत आपला जन्म असतो. म्हणून ती वासनाच आपण नाहीशी करावी.


वास्तविक बद्ध आणि मुक्त दोन्ही मुळात नाहीत. हा निव्वळ आरोप आहे. लहान मुले दगडाचाच भात करतात त्याप्रमाणे.


आशीर्वाद.

🌼🌹🍀

   ☘ श्रीराम 🌹समर्थ ☘


अमृतधारा  १०५१


संत कधी देहात नसतात. ते कधी जात येत नाहीत. जे जातात ते संत नसतात. तुम्ही संतांना देहात पाहता व तो देह गेला म्हणजे ते गेले म्हणता. देहाशी समागम करून संत समागम होत नाही.


देव कल्पनेप्रमाणे आहे. तुम्ही मागाल ते तो देतो. तुम्ही विषय मागितला तर तो विषय व त्यातील दुःखही देतो. संत क्वचित विषय देतील, परंतु त्या देण्यात सुद्धा तुम्हाला निर्विषय करण्याची दृष्टी असते.


भगवंताने समर्थांना ज्ञानाचा उपदेश ज्यांना तळमळ लागली आहे त्यांनाच करण्यास सांगितले. तेंव्हा संत असे करतात की प्रथम तळमळ उत्पन्न करतात व नंतर ज्ञानोपदेश करतात.


संताची ओळख संताकडे पाहून म्हणजे त्यांच्या बाह्य कृती वरून पटणार नाही. आपल्यावरून त्यांची परीक्षा करावी. त्यांच्या समागमाने आपल्यात काय फरक पडला तो पहावा. म्हणजे आपली विषयासक्ती कमी झाली. मन हळूहळू निर्विषय होत चालले तर तेथे संताची वस्ती आहे असे समजावे.


संताची सेवा त्यांच्या देहाची करून नाही होत, कारण संत देहात नसतात. आपल्या वचनात असतात. म्हणून संतसेवा त्यांची आज्ञा प्रमाण मानून वागणे ही होय.


आशीर्वाद.

🌷☘🌼

   ☘ श्रीराम 🌷समर्थ ☘


अमृतधारा  १०५२


देहाभिमान व वासना सोडून संत नामात असतात. तेंव्हा त्यांची संगती करण्यासाठी तुम्हाला देहाभिमान व वासना सोडायला पाहिजे. वासनाक्षयाशिवाय सत्संगती होणेच शक्य नाही.


वासनाक्षय गुरुकृपेशिवाय शक्य नाही. गुरुकृपा गुरु आज्ञेत राहिल्याने होते. तुम्ही सर्व प्रापंचिक हेतू धरून माझ्याकडे येता. मग ती संगती सत्संगती नसून त्या हेतूची, विषयाची असते.


क्वचित हेतू न धरता येतात. तरीपण ती संगती देहाने देहाची होते. संत म्हणजे जे सतत असतात ते. नाम सतत सत्य आहे. म्हणून संत नाम सांगतात. त्या नामाची संगती करावी.


सद्गुरु आज्ञा प्रमाण माना. अनुभवाचे पाठीमागे लागू नका. इतके करूनही तळमळ लागत असली तर, असल्यापेक्षा आणखी काही मिळणे आहे असे वाटते, असे नाही का होत? जे सांगितले आहे त्यातच सत्य आहे असे माना.


चंद्र तेथे चांदणें. त्याप्रमाणे संत तेथे कृपा असतेच. वारा जसा चोहीकडे आहे, पण आपल्याला अनुभव येण्यास पंखा घेऊन हलवावा लागतो. त्याप्रमाणे संताची कृपा, ते जे सांगतील त्याप्रमाणे वागून संपादन करावी लागते.


आशीर्वाद.

☘🌹🌼

   ☘ श्रीराम 🌹समर्थ ☘


अमृतधारा  १०५३


संत आपली देहासक्ती कमी करण्यासाठी सगुण भक्ती करावयास लावतात. जसे सगुणावर प्रेम जडत जाईल, तशी तशी  देहासक्ती कमी होत जाते. देहासक्ती पूर्ण नष्ट झाली म्हणजे सगुणाशी व नंतर निर्गुणाशी अनन्य होता येते.


काट्याने काटा काढावयाचा किंवा मातीने घाण झालेले भांडे मातीनेच घासावयाचे तशातला हा प्रकार आहे. या करता सगुण भक्ती अवश्य आहे. तांब्या घासल्यावर तो घासण्यास घेतलेली माती निघून तो स्वच्छ होण्यास जसे पाणी घालावे लागते, त्याप्रमाणे सगुणातून निर्गुणात जाण्यास गुरुकृपेची जरुरी आहे.


संतांचे दर्शन ते जेथे राहतात तेथे जाऊन घेतले पाहिजे. तरच त्यांचे दर्शन होईल. संत नामात असतात. देहात कधीही नसतात. म्हणून आपण नामात राहिलो तरच त्यांचे दर्शन होईल.


संत देहात नसतात म्हणून जन्म मृत्युच्या अतीत असतात. आपण त्यांच्या देहाकडे पाहतो किंवा समाधीकडे पाहातो व दर्शनाने काही फायदा झाला नाही म्हणतो. पण जडाचे (देहाचे किंवा समाधीचे) दर्शनाने (भाव नसेल तर) काय प्राप्ती होणार?


भगवंत व देह अगदी विरुद्ध दिशेस आहेत. भगवंताचे स्मरण देहाचा विसर झाल्याशिवाय कसे होईल? देहाचा विसर म्हणजे भगवंताची आठवण. व देहाची आठवण म्हणजे भगवंताचा विसर. भगवंताची आठवण करीत गेले म्हणजे हळूहळू देहबुद्धी विगलित होईल.


आशीर्वाद.

🌼☘🌷

   🌷श्रीराम ☘ समर्थ 🌷


अमृतधारा  १०५४


आंबा गोड असतो. कस्तुरीला उत्तम सुवास असतो. या प्रमाणे संताचे लक्षण काय? एखाद्याचे दुखणे बरे करणे किंवा चमत्कार करणे हे का संताचे लक्षण? संत निर्विषय  असतात. त्यांची परीक्षा बाह्यांगावरून कशी  कशी करता येईल?


येणाऱ्या सुवासावरून खोलीत कस्तुरी आहे असे, जसे आपण म्हणतो तसे आपल्या मनातील विषयासक्ती कमी होत असेल तर ते स्थान संताचे आहे असे जाणावे. सारांश संताची परीक्षा आपल्या वरुनच करावयाची असते.


संत दयाळु असतात. त्याचेकडे विषय वासनेने जरी गेले, तरी ते त्याला क्वचित विषय देतील. पण त्याला निर्विषय करतील. संत तुमच्या दुर्गुणाकडे पाहत नाहीत.


आपली, संताचे व्हावे अशी उत्कट इच्छा मात्र पाहिजे की ते त्याला आपल्या सारखे करतात. राजाची बायको झाली म्हणजे दारिद्र्य आपोआपच नाहिसे होते. त्याकरता निराळी खटपट करायला नको.


संताकडे आपण विषयाकरता जातो. पण ती विषयाची संगत झाली. संताकडे निर्विषय होऊन जावे. निदान निर्विषय होण्याकरता जावे. संताचे काम तुम्हाला निर्विषय करण्याचे असते.


तुम्ही एवढे तरी करा की, एखाद वेळेस विषय नाही दिला तरी त्यास सोडू नका. तुम्ही त्यांना आपल्या मुलांच्या लग्नाला बोलावता. व्यवहारात ओढता. वास्तविक त्यांना याचा अगदी वीट. पण ते जाऊन दोघांनाही नामस्मरणाला लावतात.


आशीर्वाद.

🌷☘🌼

   🌷 श्रीराम 🙏🏻 समर्थ 🌷


अमृतधारा  १०५५


संत देवापेक्षा श्रेष्ठ. कारण देवाला थोडे, उदा. एक तरी भाजीचे पान द्यावे लागते. (द्रौपदीची थाळी ) म्हणजे हजारो जणांना तृप्त करतो. पण संत मात्र शिव्याशाप, टवाळी सोसून तुम्हाला विषयांपासून दूर करतात. पण एकदा का तुमची व त्याची गाठ पडली म्हणजे ते काही केल्या तुम्हाला सोडत नाही.


तुम्ही संताना विषयात ओढू पाहता व ते तुम्हाला विषयात आलेले दिसतील पण तुम्हाला विषयाबाहेर काढतील. असा तुमचा व त्यांचा झगडा चालु असतो. पण संत त्यांच्या मनातल्या सारखे करतात.


संतांचे काम देहबुद्धी नष्ट करण्याचे असते. पण कशाने का होईना ते त्यांचे काही काम करीत असतात. संत देहातीत असतात. देह मिथ्या आहे ते जाणतात. याचा परिणाम संत समाधानात असतात. आपण देहात असतो व देह सत्य मानतो. याचा परिणाम आपण तळमळ करतो.


संत भेटतील पण त्यांचा समागम होणे अत्यंत कठीण आहे. समागम होण्यास दोघे साधारण एका पातळीवर पाहिजेत. संतास भगवंताशिवाय दिसत नाही व संताचा समागम करावयाचा असेल तर आपणासही भगवंताशिवाय काही सुचू नये.


एक वेळ संत समागमाने ज्ञान असणे होऊ शकेल, पण ते अखेर पर्यंत टिकणे अत्यंत दुर्घट. केंव्हा देहबुद्धीचा घाला पडेल व वासना उधळतील याचा नेम नाही. म्हणून अखंड अनुसंधान असावे असे इतके की, आपण मनुष्य आहो याची आठवण न करता जशी अखंड जाणीव असते, तशी आपण भगवंताचे आहो अशी जाणीव असावी. तो आपला स्वभाव बनावा.


आशीर्वाद.

🌼🌷☘

   🙏🏻 श्रीराम 🌷 समर्थ 🙏🏻


अमृतधारा  १०५६


आई आपल्या मुलाला मारत होती. मरेनास का मेल्या म्हणाली. बाहेर एकाने ते ऐकले. आतली आई आहे का कोण, असे वाटुन घरात पाहाण्यास गेला. तो ती आई आपल्या मुलाला मऊ तूप भात, साखर तोंडी लावायला घेऊन भरवत होती.


मुलगा रडत होता. नको नको म्हणत होता. चिवडा मागत होता. संत हे अशा आई सारखे असतात. आम्ही विषय मागत असतो. व संत आमचे तोंडात नको नको म्हणत असता, राम नाम कोंबीत असतात. तूप भाताने मुलगा मरेल की पुष्ट होईल?


एक तर संत संगती लाभणे फार कठीण. संत भेटतीलही. त्यांचे जवळ वर्षानुवर्षे राहाल, पण संगती नाही होणार. ती होण्यास संत जेथे राहतात तेथे आपण राहिले पाहिजे. संत त्यांच्या वचनांत असतात. त्यांच्या वचनांची संगत धरावी.


कोणी काही विचारल्याशिवाय सांगू नये. असे शास्त्र आहे. आणि ते विचारणे सुद्धा कळकळीचे असले पाहिजे, तरच सांगावे. सारांश, परमार्थाची खरी तळमळ पाहिजे. संत मात्र सर्वांना सांगत सुटतात. ते  ज्यांना ती तळमळ नसते, त्यांना ती उत्पन्न करतात.


ज्याला खरोखर परमार्थाची तळमळ लागली आहे तो खरा सच्छिष्य. सद्गुरु तो की जो शिष्याला शिष्य म्हणून पाहात नाही. तो स्त्री पुरुष भेद पाहात नाही. तो सर्वांना रामरूप पाहतो. अशाच सद्गुरुने शिष्यास उपदेश देण्यास हरकत नाही.


आशीर्वाद.

💦🌷🍀

   🌼 श्रीराम 🌷 समर्थ 🌼


अमृतधारा  १०५७


मी धर्माने वागतो. नीतीने वागतो. जमेल तेव्हा नाम पण घेतो. गुरुही तेच सांगतात. तर मग गुरु करणे जरूर आहे का? हा प्रश्न पुष्कळांच्या मनात येतो.


श्री महाराज म्हणतात

"इतके दिवस तू जे करीत होतास ते आपलेपणाने, मीपणाने करीत होतास. त्याने अभिमान वाढत होता. गुरु केला म्हणजे त्याच्या आज्ञेने करतोस. याने अभिमान कमी होतो".


आपल्याला अमुक एक गोष्ट कळत नाही, ती कळाविशी वाटणे तो शिष्य. व ती ज्याला माहित असून विचारले असता सांगावे असे वाटते तो गुरु. आपल्याला नेहमी गुरुची गरज आहे.


प्रपंचात सुख नाही असे अनुभवाने पटले, व खरे सुख कोठे आहे? कसे प्राप्त होईल? अशी तळमळ लागली म्हणजे तो सच्छिष्य होय. व हे सुख ज्याला दाखवून देता येईल तो सद्गुरु.


खरी तळमळ लागल्याशिवाय सद्गुरु करण्याच्या भानगडीत पडू नये. संत ही तळमळ उत्पन्न करतात. या प्रपंचात सुख नाही असे वाटावयास लावतात.


संतांच्या, सद्गुरुच्या आज्ञेने केलेल्या साधनात अहंभाव आपोआप कमी होऊ लागतो. आपल्या बुद्धीने केलेल्या साधनाने अहंभाव वाढतो.


अहंभाव विरहित केलेली कर्मे भगवत्सेवा होते. व अहंभाव धरुन केलेली भगवत्सेवा सुद्धा देवाला पावत नाही. देह रामार्पण केला म्हणजे ती देवाची सेवा होते.


आशीर्वाद.

💧🌷🌼

   🌷 श्रीराम 🙏🏻 समर्थ 🌷


अमृतधारा  १०५८


संत समागम अतिशय दुर्लभ आहे. कारण याला संतच ओळखता येणार नाही. लोक आपल्या मनाने संत कसे असावे ठरवतात, व त्याप्रमाणे पाहण्यास जातात. आपले दोष काय हे मात्र पाहत नाहीत. आपण भगवंताचे ध्यान व नामस्मरण सोडू नये. संतच तुम्हाला शोधत येतील.


नर जन्म हा मोठ्या पुण्याईने प्राप्त होतो. असा नर देह मिळुनही जो विषयाचरण करतो, त्यात व इतर प्राणी मात्रात काय फरक झाला? आपल्या संचितातले पुण्य मात्र गमावून बसतो.


आतल्या खोबऱ्याकरता करवंटी जतन करायची असते. जे अंतरंगात राहिले ते बाह्यांगाला वाईट म्हणतील. बाह्यांगातच राहणाराला ते कसे शोभेल? प्रत्येक वस्तूत अंतरंग व बाह्यांग असतेच. अंतरंगा करताच बाह्यांगाला जरूर तितके महत्त्व द्यावे. देहाला सांभाळणे जरूर आहे. पण ते विषयाकरता करू नये. भगवत्प्राप्तीकरता करावे.


राम कृष्णादि अवतार नरदेहातच झाले. तसे दुर्योधन व रावणादिक नरदेहातच झाले. देहाचा जसा उपयोग करून घ्यावा तसा होतो. अग्निचा उपयोग करून घेणारावर आहे.


संधी साधावी असे म्हणतात. नरदेह ही मोठी संधी आहे. ८४ लक्ष योनीत केंव्हा तरी मोठ्या कष्टाने तो मिळणार,  तेंव्हा ही संधी दवडू नये. परमात्म्याची प्राप्ती करून घ्यावी.


आशीर्वाद.

🌷☘💦

, 🙏🏻श्रीराम 🌹समर्थ 🙏🏻


अमृतधारा  १०५९


देवाला कसे फसविता येईल? ज्याच्यापासून बुद्धी उत्पन्न झाली, त्याला कसे फसवणार? मी मला दूर असेन पण भगवंत आपल्या पासून दूर नाही.


देवाने एवढे काम केले असते तर मी सर्व सोडून देवाचा भक्त झालो असतो. एवढे देवाने केले असते तर त्याचे काय जात होते? असे म्हणणे लबाडीचे असते. जे काम व्हायचे राहिले होते त्याखेरीज बाकी सर्व अर्पण करण्यास कोणी नको म्हटले होते?


असे देवाचे काय अडले आहे की पापी (माणसाने) देवाचे भक्त व्हावे ? त्याचे घरी काय भक्तांचा तोटा आहे? तुम्ही एवढे मोठे कोण लागलात?


अटीने भक्त होणे देवास मुळीच आवडत नाही. जे काही होत आहे ते परमेश्वराच्या इच्छेने होत आहे अशा दृढ श्रद्धेने भगवंताच्या चरणीं लीन व्हावे.


आपण भगवंतास सर्वस्व अर्पण करीत नाही. व जे करतो ते सुद्धा भगवंत आपणास यापेक्षा जास्त देईल या आशेने करतो. आपण भगवंताने आपले इच्छेप्रमाणे वागावे अशी इच्छा करतो. त्याच्या इच्छेप्रमाणे आपण वागत नाही.


तुमच्या हातून चुका होतात तेंव्हा लहान मुलांच्या चालताना पडण्याचे किंवा बोबडे बोलण्याचे आई बापास कौतुक वाटते. त्याप्रमाणे तुमच्या चुकांचे व त्या सावरण्याचे मला कौतुकच वाटते. त्याचे मनात आणू नये.


आशीर्वाद.

🌼🌹💦

   🌹 श्रीराम 🙏🏻 समर्थ 🌹


अमृतधारा  १०६०


भगवंत आरशासारखा आहे. आपण जसे पहावे तसा भगवंत दिसतो. आपण जे मनात आणतो ते भगवंत देतो. मज सारखा पापी नाही. आता राम कसचा भेटणार असा विचार केला तर तो तसा होतो.


जशी भावना करावी तसा देव होतो. भावनेत देव आहे. माझा राम माझे शेजारी आहे, अशी भावना केली तर तो शेजारीच आहे. राम दूर  म्हटला तर जवळ असता तो दूर जातो.


भगवंत विचारा पलीकडे आहे. जर तो आपल्या विचारात येईल तर तो आपल्यापेक्षा कमी नाही का होणार? ज्याचे ज्ञान विचार होतो, तो विचारात कसा येईल?


प्रपंच जितका गोड लागतो,  तितका देव गोड वाटावा. प्रपंचाचा जितका ध्यास,  तितका देवाचा ध्यास लागावा. अखंड नामस्मरणाने देवाचा ध्यास लागतो.


पर्वकाळात भगवंत कामधेनुचा अवतार घेऊन येतो. जे ज्याला पाहिजे ते तो देतो. पर्वकाळात सज्जन व दुर्जन सर्वच आपापली कामें करून घेतात. जारण मारणही पर्वकाळातच शीघ्र साध्य होतात. आपण मात्र भगवंताचे कसे व्हावे, ते पहावे. शुभेच्छा धरावी. भावना जागृत करावी.


परमार्थ म्हणजे काही न करता स्वस्थ, समाधानात, नामस्मरणाचे आनंदात असावे. आपल्या प्रत्येक कृत्यात आपण भगवंताचे आहोत अशी भावना असावी.


आशीर्वाद.

🌼☘🌹

   ☘ श्रीराम 🌹समर्थ ☘


अमृतधारा  १०६१


जसे दिसते तसे असतेच असे नाही. विषय चांगले गोड दिसतात. पण ते दुःखप्रद असतात, म्हणून विषयाची संगत सोडावी. त्याहीपेक्षा विषयी लोकांची संगत सोडावी.


कारण विषय जड असल्याने आपण (स्वतः) होऊनच काय मोहित झालो तर होऊ. पण विषयी लोक आपणास मोहीत करतात. म्हणून केव्हाही सत्संंगती धरावी. सज्जनांच्या संगतीत असावे.


विषयाचे मरण भगवंताच्या स्मरणात आहे. व विषयाचे स्मरण भगवंताला व संताना दूर करते. संता जवळ विषय

मागणे म्हणजे भगवंत व संत दूर होऊ द्या, मला त्यांचा विसर पडू द्या असे नाही का होत?


कामासाठी जात असता काही वेळेस मांजर आडवे गेले तर ही दैवी सुचना आहे असे समजून आपण परत फिरतो. पण एक बायको मेली कि दुसरी करण्याच्या विचारात लागतो. बहूत करून आपले ध्येयच विषय असते. व तो मिळविण्याची आपली खटपट असते.


आपले ध्येयच चूक आहे की बरोबर याचा आपण कधी विचार करत नाही. विषय सुखाची आवड एकाएकी सुटत नाही, यास काय करावे? मी कोण, कशा करता आलो, माझे ध्येय काय, खरे सुख कशात आहे? याचा विचार केलाच जात नाही.


आशीर्वाद.

🌹☘💦

   🙏🏻 श्रीराम 🌷 समर्थ 🙏🏻


अमृतधारा  १०६२


मनुष्य नामस्मरण, योग, याग, तीर्थयात्रा करतो, पण ते कशाकरता ते माहित नाही. हे निव्वळ विषयाकरता होय. क्षेत्रातच देव आहे असे नाही. तो सर्व ठिकाणी आहे.


कुंभार मडके करतो. त्यात तो नाही असे नाही, पण तोच कुंभार असे नाही. देव सर्व ठिकाणी व्यापून आहे. पंढरीच्या विठोबात आहे. माझ्यातही आहे व उरलाही आहे.


त्या देवाचा शोध करणे म्हणजे देव शोधणे होय. माझ्यातला देव शोधणे त्यातल्या त्यात सोपे आहे, पण तो देव अभिमानाने, मीपणाने, देहबुद्धीने झाकला आहे.


याकरिता भावनेने कोठेतरी देव कल्पुन त्यावर प्रेम करण्यास लागावे म्हणजे आपल्या देहावरचे प्रेम आपोआप कमी होते. सारांश, आपले कर्तव्य काय? आपण जन्मास कशाकरिता आलो? आपले ध्येय काय याचा नको का विचार करायला?


पण हा विचार करतो, वेद कोणी केले? नामस्मरण वेदात आहे की नाही? असा वायफळ विचार करण्यात काय अर्थ? गर्भात असताना सोहं म्हणतो. जरा जगाचे वारे लागले म्हणजे कोऽहं म्हणावयास लागतो. व पुरे वारे लागले म्हणजे देहोऽहं म्हणतो. व आपण त्यास कळू लागले म्हणतो.


आशीर्वाद.

☘🌷💦

   🙏🏻 श्रीराम 🍁 समर्थ 🙏🏻


अमृतधारा  १०६३


आपले वडील दूर गावाला आहेत. त्यांचे पत्र नाही म्हणून काळजी करतो. ह्याला जन्मापासून भगवंत दूर आहे त्याची तळमळ का लागू नये?


मुंबईस गेले म्हणजे तेथील विशेष ठिकाणें पाहून यावेसे वाटते. पण रामाची पोथी ऐकल्यावर तो राम कसा आहे याची तळमळ लागते का?


आपण नामस्मरण करतो. पण ज्याचे नाम घेतो तो कोण, असा विचार करतो का? आपली सर्व खटपट विषयाकरिता. मग इतर योनीत व आपल्यात काय फरक झाला? ते विषयात, स्वार्थात असतात. आपणही तेच करतो. म्हणून प्रथम आपले ध्येय काय ते ठरवावे.


आपण ज्याचे नाम घेत असतो, तोच ते घेतो. आपण राम नाम घेतो ते तो रामच घेत असतो. आपण मात्र मी घेतो म्हणतो. राम घेतो अशी भावना तरी करावी.


ज्याच्या सांगण्यावरून आपण पत्र लिहितो तो खाली आपली सही करतो. म्हणजे आपले नाव आपण लिहितो. ते जर दुसऱ्याने लिहिले, तर खोटी सही केल्याचा आरोप येतो. तसे रामच आपले नाम घेतो. पण मनुष्य मी घेतो म्हणतो, हे खोटे नव्हे का?


एकदाच नाम घेतले म्हणजे ते पुन्हा न सोडणे. एकदा करणे म्हणजे त्यातून निराळे न राहाणे. एकदा रामाचे दर्शन घेतले म्हणजे दर्शनावाचून राहू नये.


आपण जे जे काही करतो, ते ते राम करतो अशा भावनेने करावे. त्याच्या इच्छेने करतो. त्याच्याकरिता करतो. करणे असेल ते करावे पण भगवंताला स्मरून करावे.


आशीर्वाद.

💦🌷☘

   🍁 श्रीराम 🙏🏻 समर्थ 🍁


अमृतधारा  १०६४


प्रपंच नेटका करावा म्हणजे प्रपंचात समाधान कसे मिळेल हे पाहणे. त्यात दक्षता, सावधपणा ठेवणे. म्हणजे, हा माझा म्हणून केला तर हा आपणास बुडविल. हा माझा नव्हे अशा विषयी सावध असणे. याला उपाय म्हणजे

१. सर्व भगवंताच्या इच्छेने चालले आहे. आपण काही करीत नाही या बैठकीवर असणे.

२. ज्या वेळेस चोर येतील, विकारांचा घाला पडेल अशावेळी सावध राहून, भगवंताचे स्मरण करावे.

३. हेही साधत नसेल तर, अखंड नामस्मरण करावे.


प्रपंच म्हणजे अहं, ममता यांचा प्रपंच. हा सुटला नाही तर बायका मुलांना सोडून काय उपयोग? हा सोडून बाहेर गेला तरी तेथे देहबुद्धी आहेच ना? व देहबुद्धी सुटली म्हणजे बायका मुलात राहिले म्हणून काय झाले?


समर्थांनी प्रपंच नेटका करायला सांगितले. पण तुम्ही करता त्या मार्गाने होणार नाही. कर्तेपणा भगवंताकडे देऊन त्याच्या स्मरणात प्रपंच करावा, म्हणजे तो नेटका होतो.


मला दारिद्र्यात ठेवले आहे. किंवा इंद्रियाचे व्यंग आहे, तर त्यातच दर्शन देण्याची रामाची इच्छा आहे असे समजावे. प्रपंच भगवंताचा म्हणून करावा. त्याच्या नावाने प्रपंच केला तर त्याला पूर्ण करणे भाग आहे. जसे आपण वडिलांच्या नावावर उधारी केली तर वडिलांनी ती ध्यावी लागते.


आशीर्वाद.

💧☘🌹

   🌷 श्रीराम 🙏🏻 समर्थ 🌷


अमृतधारा  १०६५


प्रपंचात आपणास अमुक हवे किंवा अमुक नको असे वाटते. म्हणजे काही न्युनता भासते व त्यामुळे दुःख होते. एक मुलेबाळे नाही म्हणून रडतो. तर दुसरा मुले वाईट निघाली म्हणून रडतो. तिसरा मुलास खाऊ घालण्यास पैसा नाही म्हणून रडतो. तर चौथा स्वतःस पोटदुखी आहे म्हणून रडतो.


एकाला काळजी करण्यासारखे काहीच नाही, पण हे आहे असे, नेहमी असेच कसे चालेल याचीच तो काळजी करतो. आणखी एक पैसा आहे पण तो जपावा कसा याच काळजीत असतो. सारांश नेहमी रडच चालू असते.


या दुःखाचे मूळ काय? हे विषय म्हणावे तर बोलून चालून जड. व दुसरे असे की ज्यांच्याजवळ आहेत तेही दुःखीच दिसतात. मग  दुःखाचे मूळ काय? अमुक एक हवे किंवा अमुक एक नको असे वाटणे, अशी इच्छा हीच दुःखाची जननी आहे. इच्छा होण्याचे कारण आपल्या व्यतिरिक्त काही आहे याची जाणिव होते म्हणून.


आपणास लहानपणापासून किंबहुना गर्भापासून विषयाचाच सहवास मिळून झालेले संस्कार दृढ होत जातात. जन्मण्यापूर्वीच हा मुलगा पुढे कलेक्टर होईल अशी भाषा चालते. जन्म झाल्यावर "माझा राजा तो", अमक्या मुलीशी लग्न करावयाचे वगैरे भाषा चालते.


संतांचा मोठा चमत्कार म्हटला म्हणजे हा की, अनंत जन्माच्या संस्कारामुळे विषय जे गोड वाटतात, त्याचा ते वीट आणतात व परमात्म्याच्या भेटीबद्दल तळमळ उत्पन्न करतात.


आशीर्वाद.

☘🌼🌷

   🌷 श्रीराम 🙏🏻 समर्थ 🌷


अमृतधारा  १०६६


आई बाप आपले लग्न करतात. याचा हेतू मुलाने चांगले नागरिक बनावे. म्हातारपणी आपल्या उपयोगी पडावे असा असतो. पण तो बाईलवेडा बनून आईबापाला दूर करतो. त्याला ते काय करणार?


आपण कोणालाही जन्माला आणीत नाही. जो तो आपल्या नशिबाने, भगवदिच्छेने जन्माला येतो. त्यात आपण आपलेपणा घालून सुखी वा दुःखी होतो. खरे प्रेम आपल्याला करताच येत नाही. आपले प्रेम स्वार्थी असते. परमेश्वर आपणास जन्मास घालतो. त्याचा हेतू आपण आपली उन्नती करून घ्यावी असा असतो.


मनुष्य गर्भात असताना सोहं म्हणतो. बाहेर आल्यावर कोहं म्हणतो. व कळू लागल्यावर देहोहं म्हणतो. पण आनंदाची प्राप्ती न होता दुःखच पाठीमागे लागते.


आनंद मिळविण्यासाठी निघाला असता दुःखच मिळते. तेंव्हा आपला मार्ग चुकला हे लक्षात नको का यायला? मग जेथून मार्ग चुकला तेथपर्यंत परत येणे जरूर आहे. तेंव्हा कोहंपर्यंत परत आले पाहिजे.


देहोहं हा मार्ग चुकीचा धरला होता. तेंव्हा मी कोण याचा चांगला विचार करावा. संतांना विचारावे व त्यांनी सांगितलेल्या मार्गाने जावे. खरी शिकवण संत देत असतात. ते आपल्याला परमात्मप्राप्तीचा मार्ग दाखवतात.


आशीर्वाद.

🌼☘🌹

   ☘ श्रीराम 🌹समर्थ ☘


अमृतधारा  १०६७


एखाद्या मुलाचा तुरुंगात जन्म झाला. व तेथेच तो लहानाचा मोठा झाला. म्हणजे त्याला तुरुंगाबाहेर काही जग आहे याची कल्पना नसते. त्याचे सर्व सुख दुःख तुरुंगात. आपण तुरुंगात आहो. बद्ध आहो याची त्याला जाणीवही नसते.


तसे आपले विषयी लोकांचे आहे. या विषयेंद्रियांच्या सुखापलीकडे काही आहे याची जाणीव नाही. सर्व सुख काय ते त्यातच आहे. पण त्यांना बद्ध झालो आहो, परतंत्र आहो ते त्यांच्या लक्षात येत नाही. संत या बद्धतेची जाणीव करून देतात. व त्यातून सुटण्याची त्यास तळमळ लावून देतात.


आपण विषयांना सत्य मानतो व त्यात आपलेपणा ठेवतो. म्हणून त्यावर प्रेम जडते. नामाशिवाय दुसरे काही सत्यच मानू नये व त्यावर आपलेपणा ठेवले तर नामाचे प्रेम येईल. नामाचा उपदेश म्हणजे सत्याचा उपदेश.  सत्य व ब्रह्म (परमेश्वराचे निराकार निरुपाधिक रुप) एकच असल्याने ब्रह्माचा उपदेश नाही का होत? व गुरु फक्त नामच सांगतात.


जे झाले, जे होत आहे, व जे होईल ते भगवंताचेच आपल्या हिताकरता करणे आहे. आपण कर्ते नाही असे मानने यास अखंड नामस्मरण पाहिजे. सारांश, जे काही झाले ते भगवंतानेच हिताकरता केले. उद्याची काळजी भगवंतासच आहे. त्याला काय योग्य वाटेल ते करील म्हणून झाल्याची म्हणजे कालची आठवण करु नये. होणाराची म्हणजे उद्याची काळजी करू नये. व चालू क्षण वाया जाऊ न देता नामस्मरणात राहावे.


आशीर्वाद.

🌼🌹☘

   ☘ श्रीराम 🌹समर्थ ☘


अमृतधारा  १०६८


सृष्टी शुन्यापासून उत्पन्न झाली. आपणही शुन्याकडे जावे म्हणजे स्वस्थ असावे असे म्हणतो. पण आपण स्वस्थ राहू शकत नाही. वास्तविक काही न करणे किंवा आपल्याला काही करावयाचे आहे असे न वाटणे हा परमार्थ. तुरुंगात काही न करता स्वस्थ बसावयास लावणे ही मोठी शिक्षा समजतात.


देहाने, मनाने आपल्याला एकसारखी चळवळ करण्याची सवय लागली आहे. देहाला स्वस्थ बसावयास लावणे कठीण, मनाला स्वस्थ बसावयास लावणे त्यापेक्षा कठीण. व देह कर्म करीत असता मनाला स्वस्थ बसविणे हे अत्यंत कठीण आहे.


मनाला खरे म्हटले तर स्वास्थ्य हवे. पण ते मिळविण्याकरिता साधन करणे, प्रयत्न करणे जरूर आहे. मनाचे स्वास्थ्य बिघडण्यास कारणे काय असतात?

१. आपले इच्छेविरुद्ध

गोष्ट होणे.

२. मागे घडून गेलेल्या

बऱ्या वाईट कर्माची

आठवण होणे.

३.उद्याची काळजी करणें.


जो तो आपल्या इच्छेप्रमाणे व्हावे असे म्हणणार. सर्व तुमच्या इच्छेप्रमाणे कसे होणार? तुमच्या इच्छेविरुद्ध गोष्टी होणारच. तेंव्हा स्वास्थ्य बिघडू न देण्यास आपली इच्छाच नाहीशी करावी. कोणतीही वस्तू मिळावी  ही बुद्धीच ठेऊ नये. हाव सोडावी. लोकांची आस सोडावी.


जग माझे सुखाकरता आहे असे आपण म्हणतो. पण सर्वच असे म्हणू लागले तर याला सुख कोठले. दुःखाचे मूळ आपल्याला अमुक हवे असे वाटणे यात आहे. म्हणून आहे त्या परिस्थितीत समाधान असावे.


आशीर्वाद.

☘🌼🌷

   🌷श्रीराम 💧 समर्थ 🌷


अमृतधारा  १०६९


एकदा, जन्मास येणे हे  दुःख म्हणतात. व एकदा देहासारखे घबाड नाही म्हणतात. दोन्ही खरे आहे. जन्माचे मूळ पहावे. पंढरपूरला बाप गेला. याला वाटले जन्माचे सार्थक झाले. मुलगा तेथे गेला. वारकरी पडले सात्विक. या मुलाने चोरी शिंदळकी जास्तच केली. तसे जन्माचे आहे.


रामकृष्ण अवतार झाले. त्यांनी जन्म नाही का घेतले? तसे संतांचे जन्म दुःखाचे मूळ म्हणावे तर संत जन्मून आनंदात असतात. आम्ही मात्र जन्मभर रडतच असतो.


आमची झोप एक प्रकारचे मरणच होय. जागे झाले नाही म्हणजे मरणच. झोपेवरून मरणाचा अदमास करावा. लहान मूल हट्ट करीत झोपी गेले तर जागे होताच तोच हट्ट करते. तसेच मरणाचे वेळी रामराम म्हणत गेला, तर जन्म झाला म्हणजे हा रामराम म्हणतो. आणि एक भगवंताला विषय वासना अर्पण करून मरतो. सारांश, वासना जन्माचे मूळ आहे.


म्हणून वासना काढावी. जे करतो ते राम करतो. तशी भावना करावी. रामाच्या इच्छेवर सोपवावे. जे दुःखाने भोगतो ते आनंदाने भोगावे.


गुरु आज्ञेत राहिले म्हणजे वासना मरते. आपण गुरु आज्ञा पाळतो ती त्यात आपले हित होईल म्हणून पाळतो. त्याचा मोबदला मागतो. आज्ञा ती आज्ञा म्हणून पाळीत नाही. निदान तोंडाने तरी रामराम म्हणावे.


आशीर्वाद.

🍀💦🌹

, 🍁 श्रीराम ☘ समर्थ 🍁


अमृतधारा  १०७०


गुरुंना कसे मारावे असा अर्जुनाला मोह उत्पन्न झाला. भगवंताने अर्जुनाला सांगितले की, देहबुद्धीने, मीपणाने केलेले कर्म मग तो धर्म का असेना, बंधनकारक होते. म्हणून हा अभिमान गळला पाहिजे. अर्जुनाला विश्वरूप दाखवून खात्री करून दिली की, हे सर्व आपल्या कर्माने पूर्वीच मेले आहेत.


अर्जुनाला फक्त निमित्तमात्र व्हावयाचे होते. अभिमानाची मुळे फार खोल गेलेली असतात. मेल्यावर सुद्धा या देहावरचा अभिमान सुटत नाही. हा अभिमान म्हणजेच भगवंताची माया. जशी देहासोबत छाया असते तशी ही भगवंता बरोबर असते.


ही माया तरून जाण्यास मायेचा जो नियंता भगवंत, त्याला शरण गेले पाहिजे. मी कर्ता असे वाटणे हे तिचे स्वरुप आहे. शरण जाणे म्हणजे तद्रूप होणे, एक होणे. असे एक होण्यास दोन्ही वस्तू सारख्या हव्यात. म्हणून हा जड अभिमान सोडला पाहिजे.


आपणास त्यापासून सुटावे असे वाटते पण ते वाटणे खरे नाही. आपली तितकी बलवत्तर इच्छाच नसते. अशी जगात कोणती वस्तू आहे की जी तुमच्या इच्छेच्या आड येईल? लोकाग्रहास्तव दुसरे लग्न करतो. परंतु लोकांच्या आग्रहास्तव तो संन्यास घेत नाही.


याच्या विषयेच्छेच्या जे आड येते ते तो हर प्रयत्नाने बाजूस करीत असतो. आम्ही बेहोश होऊन विषय सुखात गुंग होतो. आम्हाला भगवंताची प्राप्ती व्हावी अशी इच्छाच नसते. ती व्हावी म्हणून सतत नाम घ्यावे.


आशीर्वाद.

🌼💦🍁

   ☘ श्रीराम 🌷 समर्थ ☘


अमृतधारा  १०७१


जयंत्यादि उत्सव आपण करतो ते भगवंताच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न व्हावे म्हणून. प्रेम असले म्हणजे ज्याच्यावर जे उपचार करतो ते उपचार करून प्रेम नसतांना आणावयाचे असते. असा प्रेम व उपचार याचा अन्योन्य संबंध आहे.


दुसरे, या उपचारांनी भगवंताशी सहवास वाढतो व त्यामुळे प्रेम येते. आई आपल्या लहानग्याला दागिने वगैरे घालते. त्याचे त्या मुलाला काही सुख नसते. उलट त्याचा त्रासच होतो. पण आईला त्यामुळे बरे वाटते म्हणुन ती तसे करते. भगवंताला दागिने वगैरे घातले तर ते आपल्या स्वतःकरता होय. तसे भगवंताला काय कमी आहे?


सर्वांची धाव भगवंताकडे, आनंदाकडे असते. पण तो मिळत नाही कारण अभिमान आड येतो. तो अभिमान जाण्याचे उपाय म्हणजे

१. वेदाज्ञेने कर्म करावयास लागणे, म्हणजे दुसऱ्याच्या आज्ञेने कर्म करणे. ज्यामुळे याचा अभिमान गळावयास लागतो.

२. भक्ती करणे, देवावर प्रेम करणे म्हणजे देहावरचे प्रेम आपोआप कमी होते.

३. मी कोण याचा विचार करणे, म्हणजे हा विचार करू लागलो की मी ला म्हणजे अभिमानाला ठाव राहत नाही.


भगवंताच्या इच्छेने सर्व घडते. भगवंतच सर्व करतो असे मानणे म्हणजे परमार्थ. भगवंत तुमचे भोग दुःखे दूर करीत नाही. तर या दुःखात तुमचे समाधान भंगू देत नाही.


आशीर्वाद.

🌹💦🌼

   ☘ श्रीराम 🌹समर्थ ☘


अमृतधारा  १०७२


भक्ति म्हणजे परमात्म्याशी अभेदत्व अनुभवास येऊन त्या सुखाची गोडी चाखण्याकरता सेव्य सेवक भावाने राहणे. त्याच्याशी समरस न होता भेदभाव (सेवक स्वामी) ठेवणे. अशा भक्तास भगवंत आपले ऐश्वर्य देतो.


परमेश्वर हा कर्मफल दाता असल्याने, त्याचे काम हिशेबी असते. खरे भक्त (संत) परमेश्वरालाही जे करता येत नाही ते करु शकतील. पण ते अशा शक्तीचा उपयोग करीत नाहीत.


कारण ते परमेश्वरासी समरस (एकरूप) होतील व त्यामुळे सेव्य (स्वामी) सेवक भावाचा आनंद त्यांना चाखण्यास मिळणार नाही. दुसरे ते आपल्याकडे येणाऱ्या माणसाचे हित ज्यामध्ये आहे तेच करतात.


भक्तात व आपल्यात फरक इतकाच, भक्त मीपणाने निराळा उरतच नाही. आपण देणे झाले तरी आपल्यास ठेऊन मग देतो. कदाचित सर्वस्व दिले, तरी तळमळ लागतेच. निदान मी दिले हे विसरल्या जात नाही.


आपला नवरा ज्या स्थितीत, अवस्थेत आहे त्या स्थितीत स्त्री जर आनंदाने पतीला सर्वस्व मानून राहिली तर तिला पतिव्रता म्हणता येईल. ती जर नवऱ्याला म्हणाली, माझे माहेर श्रीमंत आहे. अशा हालअपेष्टात राहण्यापेक्षा आपण तेथे जाऊन राहू. तर तिला पतिव्रता म्हणता येईल काय? तसे तुम्हाला विषय व परमात्मा दोन्ही हवे. तर मग तुम्हाला भक्त कसे म्हणावे?


आशीर्वाद.

☘🌹💦

   ☘ श्रीराम 🌹 समर्थ ☘


अमृतधारा  १०७३


समाधान, ब्रह्म, आणि अनुभव (ब्रह्मानंदाचा) हे सर्व अनिर्वाच्य (अवर्णनीय) आहेत. कल्पनेच्या बाहेर आहेत. वाचेने सांगता येत नाही, असे सांगितले म्हणजे, सांगता येत नाही हे तरी सांगितलेच ना?


अमुक गाव येथून दिसत नाही. ती टेकडी चढून गेली म्हणजे दिसेल. म्हणजे येथून जरी दिसत नसले तरी काय केले असता दिसेल, ते सांगितले. तसे अनुभवाचे आहे.


पुष्कळ लोक अनुभव नाही म्हणतात. काही लोक अनुभव आला म्हणतात. दोघांनाही अनुभव नसतो. अनुभव हा काही वृत्तीने घेण्याचा थोडाच असतो? मी अनुभव घेतो म्हणजे, अनुभव आलाच नाही. अनुभव अनिर्वचनीय आहे. तो सांगता येण्याजोगा नाहीच.


मनुष्याचा स्वभाव असा असतो की, आपल्या कल्पनेत येते तेवढे तो सत्य मानतो. आमची कल्पनाच किती संकुचित असते. भगवंत जो कल्पनेच्या पलिकडे आहे, तो कल्पनेने कसा ओळखता येईल?


कल्पनेत सत्य येईल असे मानणे, हीच अविद्या. भगवंताच्या इच्छेनेच त्याचे ज्ञान होणार आहे. संत महात्म्याच्या वचनांवर श्रद्धा ठेवली पाहिजे. कल्पना जेथे थांबते, तेथे श्रद्धेचा आरंभ होतो.


आशीर्वाद.

🍁🌼☘

   ☘ श्रीराम 🌹समर्थ ☘


अमृतधारा  १०७४


माणसाला देवाची कल्पना माणसाप्रमाणेच होईल. म्हणून आपण देवाची मूर्ती माणसाप्रमाणे करावी. पण ती इतकी सुंदर करावी की ती पाहून आपले देहभाव सहज हरपावे.


मग अशा मूर्तिची पूजा करावी. आपण कितीही सुंदर कल्पना केली तरी पण ती कल्पना हाताने आकृतीत उतरणे कठीण म्हणून कल्पनेने सुंदर मूर्ती कल्पून त्याची मानसपूजा करावी, व आपणास जे आवडते ते समर्पण करावे.


पुजा करण्यास भगवंत मालक व आपण दास बनले पाहिजे. तरच खरी पूजा होईल. माझा मालक राम. तोच एक दाता आहे, असे ज्याच्या मनाला पटले त्याला हे बाहेरचे विधी करावे लागत नाही.


आम्ही कित्येक जणाचे दास होतो आणि इतक्यातून उरले तेंव्हा भगवंताचे दास होणार. सर्वात अर्पणभक्ती श्रेष्ठ म्हणून आपणास जे जे उत्तम असून आवडते ते ते मनाने भगवंतास अर्पण करावे.


कल्पनेतच जर अर्पण करायचे तर उत्तम गोष्टीची का नाही कल्पना करु? आपण भगवंताचे दास व्हावे  म्हणतो. पुजेत अंगचोरपणा करु नये. चित्त विषयात ठेवून पूजा करणे म्हणजे अंगचोरपणा होय.


भगवंत सर्वत्र भरला आहे, मग देवळात देवाचे दर्शन घेण्याचे कारण काय असे म्हणू नये. जो देवळात आहे तोच सर्व जग व्यापुन राहिला आहे, अशी जाणीव असावी. सर्व ठिकाणी असणारा प्रकाश सुर्याचा आहे, हे जसे सूर्याला दाखवितात, त्याचप्रमाणे भगवंत सर्व जगाला व्यापून राहिला आहे.


आशीर्वाद.

☘🌹💦

, 🍁 श्रीराम 🍀 समर्थ 🍁


अमृतधारा  १०७५


श्रीरामाचे दर्शन १३ कोटी जप केल्यावर होते असे म्हणतात. त्याचा अर्थ १३ कोटी जप होण्यास रोज १०१२ तास जप केला तर १२ वर्षे  लागतात. इतका सतत ध्यास धरला म्हणजे ते रुपच तो होतो.


केंव्हा केंव्हा एखाद्याला दर्शन होत नाही. तेंव्हा त्याचे नाम दुसरीकडे खर्च झाले असते. पूर्व पाप घटत असेल किंवा विषयप्राप्ती करता असेल. म्हणून नामाकरता नाम घ्यावे.


नाम आपले सर्वस्व वाटले पाहिजे. अगदी खायला मिळेनासे झाले तरी, आपली बायको विकून कुणी भूक मिटवत नाही. इतके नाम सर्वस्व वाटले पाहिजे. विषयाकरता नाम खर्च करू नये.


तप, अनुष्ठान केल्याने ऐश्वर्य, सिद्धी मिळवता येते. रावणाने शिवाची अशीच आराधना केली. परंतु त्याचा अहंकार नाहीसा झाला नव्हता. म्हणून त्याला भक्त अगर साधू म्हणता येत नाही. साधन अभिमानरहित केले पाहिजे. तो अभिमान जाण्यास भगवंतास शरण गेले पाहिजे. म्हणजेच आज्ञा प्रमाण मानली पाहिजे.


अंतःकाळी नामस्मरण होणे म्हणजे अंतःकाळ साधणे होय. हा साधण्यासच आधी सतत नामस्मरण करणे जरूर आहे. अंतःकाळ साधण्याकरता जगावे. अंतःकाळ साधत असल्यास आणखी जगून काय करायचे आहे?


आशीर्वाद.

🌼☘🌹

,   🍁 श्रीराम 🌼 समर्थ 🍁


अमृतधारा  १०७६


समाधान अद्वैतात म्हणजे एकपणात आहे. द्वैताचा जनक जो अभिमान तो कमी होण्याचे बघावे. मी कर्ता नव्हे, भगवंत कर्ता आहे असे मानावे. सर्वाभूती भगवद्भाव पहावा. मी कोण याचा विचार करावा.


तो करण्यासाठी मी कोणाचा नाही याचा विचार करावा. मी आप्तेष्टांचा, बायका मुलांचा, आईबापाचा तर नाहीच पण देहाचा, मनाचाही नाही. असे करता करता जो राहील तो मी.


समाधान नसण्यास आपण जे सांगतो, उपदेश करतो ते सत्य आहे अशी खात्री नसते. त्याशिवाय दुसरे काही सत्य आहे असे वाटते. सर्वाभूती परमात्मा आहे. कोण कोणास उपदेश करणार.


आपण प्रवचन करतो ते लोकांना उपदेश करण्याकरता नसून आपले घट्ट होण्याकरता आहे या भावनेने करावे. ते सत्य आहे अशी खात्री असली तरीसुद्धा दुसर्‍या कशाची निंदा करू नये. स्वतःचे समाधान नसले तर दुसऱ्याचे समाधान कसे होणार? स्वतः आचरण करून समाधान मिळाल्यावरच दुसऱ्यास सांगावे.


सर्व प्रारब्धाप्रमाणेच जर होणार असेल तर परमेश्वराची पूजा, प्रार्थना, भजन कशाला करायचे? प्रारब्धाने आलेले सुख दुःख भोगीत असता पूजा, भजन, प्रार्थना, ते टाळण्यासाठी नसून, हर्षविषादाने समाधान भंगू  नये म्हणून करायचे असते.


आशीर्वाद.

🍀💦🌹

,   ☘ श्रीराम 🌹समर्थ ☘


अमृतधारा  १०७७


सत्यापासून भीती होते. खोटे मिथ्यापासून भय कसे वाटणार? लहान मुले आपल्या सावलीला भितात. त्याचे कारण त्यांना सावली सत्य वाटते. देह, जग यांचे मिथ्यत्व पटले तर त्यापासून भीती वाटणार नाही.


आपली सावली बऱ्या वाईट ठिकाणी पडली तरी त्याचे आपल्याला काही वाटत नाही. याचे कारण सावली मिथ्या आहे हे आपल्याला पटले आहे. म्हणून त्या ठिकाणी आपण अहंममत्व (आपलेपणा) ठेवीत नाही.


आपण अहंममत्व सत्य वस्तूवर ठेवतो. देहादिक वास्तविक सत्य नसून त्या सत्य वाटतात म्हणून त्यावर आपण अहंममत्व ठेवतो. आता देहादिक मिथ्या आहेत हे तरी पटले पाहिजे किंवा संतानी आपल्या अनुभवाने जी सत्य वस्तू ठरविली आहे (त्यावर विश्वास ठेवला पाहिजे). त्या सत्य वस्तूवर अहंममता बळजबरीने का होईना ठेवली पाहिजे.


हा दुसरा मार्ग सुलभ आहे. संत, भगवंत व त्याचे नाव सत्य आहे असे सांगतात. तरी भगवंत व त्याच्या नामाचे ठिकाणी आपलेपणा बळजबरीने ठेवला पाहिजे.  चिर सहवासाने तो आपलेपणा स्वाभाविक होईल व प्रेम येइल म्हणजे आपण भगवंताचे होऊ.


आशीर्वाद.

🍁🌼☘

   🌼 श्रीराम 🍁 समर्थ 🌼


अमृतधारा  १०७८


सुखदुःख, शीतउष्ण या जशा जोड्या, तशीच जन्ममरणाची जोडी आहे. एकाला सोडून एक राहू शकणार नाही. मूल जन्माला आले त्याचा आनंद मानण्याचे कारण काय? मूल तर स्वतः जन्मल्या बरोबर रडतेच आता पुढे कसे होईल म्हणून.


इतरांनाही हे पुढे कसे निघेल याची काळजी नको का वाटायला? येथे आनंदाचे असे काय आहे? आजारी असला तर देवाला नवस करून हा त्याला जगवण्याचा प्रयत्न करु लागला. पण हा एक दिवस जाणार हे ज्याला खरे पटले तर तो असा वागणार नाही.


मुलगा वाचला तर देवाला अर्पण करीन म्हणतो. अर्पण करणार म्हणजे त्यावरचा आपलेपणा सोडणार. तर मग आज मेला म्हणून काय झाले? जन्म मरण्याच्या फेऱ्यातून सुटणे मागून घेण्यापेक्षा मरण चुकवावे हे म्हणणे किती योग्य?


मरण येणार हे जर ठरुनच गेले तर ते चांगले यावे असे वाटू नाही का? पुन्हा जन्म नाही ते चांगले मरण. वासनेचा क्षय, स्वतःला विसरणे, भगवंताचे होऊन राहणे हे खरे मरण. भगवंताच्या स्मरणात मरण आले तर त्याचा आनंद मानला पाहिजे.


नुसते मरण म्हणजे त्याचे पुढे कसे होईल याची काळजी वाटली पाहिजे. माझे कसे होईल म्हणून शोक करु नये. जन्माचा आनंद व मरणाचा शोक हा निव्वळ स्वार्थ आहे.


आशीर्वाद

🌼🍁☘

   🌹श्रीराम 🍀समर्थ 🌹


अमृतधारा  १०७९


अहंभाव जाण्याकरता केलेल्या साधनात तरी अहंभाव असता कामा नये. म्हणून साधन गुरु आज्ञेने करावे. एखाद्या नोकराने आपल्या वरिष्ठांच्या आज्ञेने केलेल्या कामाबद्दल तो जबाबदार नसतो व तो ते काम मी केले असे म्हणत नाही.


कारण कर्माची जबाबदारी, त्याचे बरे वाईट फल हे सर्व वरिष्ठाकडे असते. तो केवळ हुकुमाचा चाकर असतो. म्हणून साधकाने गुरु करावा व त्याचे आज्ञेने साधन करावे.


याचा अर्थ असा की गुरुने सांगितलेल्या साधनाच्या अनुष्ठानाने अनुभव आला की नाही, फलप्राप्ती काय झाली वगैरे पहावयाचे त्याचे काम नाही. गुरुने जे साधन सांगितले आहे ते करायचे इतकेच त्याचे काम.


सरकारी नोकराने सरकारच्या आज्ञेने केलेल्या कामामध्ये येणारी विघ्ने सरकार जशी दूर करते तशी साधकाची विघ्नें गुरु परमात्मा दूर करतो.


गुरु परीक्षेकरता नाना प्रकारच्या आज्ञा करतात. ज्याने विषय बळावला, देहबुद्धी वाढली, ती आज्ञा पाळली असे कसे म्हणता येईल? ज्याला देह बाजुला ठेऊन राहाता येते त्यानेच आज्ञा पाळली असे म्हणता येईल.


आपण शास्त्र मर्यादेत राहून, सद्गुरुवर सर्व जबाबदारी सोपवून त्याचे आज्ञेत राहावे. आपण त्याचेच होऊन राहावे. कशाचीही काळजी करू नये.


आशीर्वाद.

🍀🌼🌹

   ☘ श्रीराम 🌷 समर्थ ☘


अमृतधारा  १०८०


भगवंत ज्याने जवळ येतो तो धर्म. व ज्याने भगवंत दुरावतो तो अधर्म. मग ते कृत्य दिसण्यात कितीही चांगले असेना? चांगल्या कृत्यात सहभागी सुद्धा हेतू पहावा लागतो. तो वाईट असेल तर त्याला सत्कर्म कसे म्हणावे?


सर्व धर्माश्रम परमात्म्याच्या प्राप्तीसाठी सांगितले आहे. ब्रह्मचर्याश्रम उत्तम. संसारात मन असेल तर गृहस्थाश्रम आचरावा. पण तो शास्त्राप्रमाणे सर्व बंधने पाळून करावा. विषय वासना कमी करण्याकरता करावा. मनसोक्त विषयाचरण करण्याकरता तो नव्हे.


गृहस्थाश्रमात बाकीचे आश्रम साधतात. शास्त्राची बंधने पाळून शास्त्राची आज्ञा म्हणून केला तर तो ब्रह्मचर्याश्रमच होय असे शास्त्रच सांगते. पत्नीचे सान्निध्यात राहून आपल्याला विषय वासना किती जिंकता आली हे आजमावण्यासाठी वानप्रस्थाश्रम आहे.


जे होत आहे, ते भगवंताच्या इच्छेने होत आहे, मी कर्ता नव्हे हे पूर्ण बाणले म्हणजे संन्यासाश्रम सिद्ध झाला. नंतर भगवत्प्रातीचा मार्ग सुकर होतो.


वेदांनी रुपरेषा घालून दिली. शास्त्रांनी मार्ग सांगिला. व संत तुम्हास प्रत्यक्ष त्या मार्गाने हात धरून नेतात. उदाहरणार्थ. एकाने पोहता येणे चांगले असे सांगितले. व त्याचे फायदे सांगितले. दुसऱ्याने पोहावे कसे ते समजावून सांगितले. तिसरे पाण्यात उतरून तुम्हाला पोहण्यास शिकवतात. ते काम सद्गुरु करतात.


आशीर्वाद.

🌼🍁☘

, 🍁 श्रीराम ☘ समर्थ 🍁


अमृतधारा  १०८१


नोकरी चाकरी करणेच प्राप्त झाले, तरी पण भगवंताला विसरू नका ? सगळ्यात मोठा अधर्म म्हणजे भगवंताला विसरणे. ज्याने भगवंत गाठता येतो, तो भागवत धर्म.


नीतीने वागावे असे शास्त्रच सांगते. तसे वागणे हे आपले कामच आहे. त्यातला अभिमान टाकावा व परमेश्वराची आठवण ठेवावी. सत्कर्मात जरी अभिमान असला तरी तो अधर्मच आहे.


सत्कर्म तर करावे पण त्यातला अभिमान टाकावा. व राम कर्ता आहे असे जाणावे. साधनेचा अभिमान पण घातक असतो. देहाभिमानामुळे मी साधन करतो असा अभिमान उत्पन्न होतो.


जे काही होते ते परमेश्वराच्या सत्तेने होते असे मानीत जावे. त्यालाच आपले हित कशात आहे हे उत्तम कळते. भगवंत तुमच्या बऱ्या करताच सर्व करीत असतो. तरी कसलीही काळजी करू नये. देहाभिमान नाहीसा होईल तेंव्हाच काळजी सुटते. आपण भगवंतावर विश्वास ठेवून आनंदात राहावे.


परमार्थात अभिमान नसावा. भगवंतापुढे, सद्गुरुपाशी आपण मूल झाले पाहिजे. गुरुआज्ञेपुढे आपले कळणे आणता कामा नये. व्यवहारात तुम्ही आपले कळण्याचा उपयोग करावा. पण परमार्थात मात्र अगदी मूल व्हावे. व्यवहारातही परमेश्वर बुद्धी देतो अशी भावना असू द्यावी.


आशीर्वाद.

🌷☘💦

, 🌷 श्रीराम ☘ समर्थ 🌷


अमृतधारा १०८२


आपण अशक्य गोष्ट शक्य करु पाहतो. ती कशी होणार? देह अगदी अस्थिर,  त्याला विश्रांती देण्याकडे,  स्थिर करण्याकडे आपली प्रवृत्ती. पण तो अस्थिरच राहणार.


मनाला तुम्ही चंचल म्हणता, पण तुम्ही त्याला विषयासारख्या अशाश्वत, अस्थिर अशा ठिकाणी योजता, तेंव्हा अर्थातच ते चंचल होते.


मन परमात्म्याच्या ठिकाणी ठेवा. मग ते स्थिर कसे होत नाही ते पाहू. जड अजडाची एकवाक्यता कशी होईल. मनाची व परमात्म्याची एकता होणे शक्य आहे.


जी वस्तू तुमचे ताब्यात असेल ती तुमची म्हणता येईल. मन जर तुमचे असेल तर ते तुमच्या ताब्यात असले पाहिजे. व ते जर तसे राहत नसेल तर तुमचे नाही म्हणावे.


आपल्या मनाचे विकार जात नाहीत असे चांगल्या लोकांना वाटते. पण ते जात नाहीत, जात नाहीत असे घोकून त्याचा ध्यास घेतल्याने उलट वाढतील. त्यांची उपेक्षाच केली पाहिजे. तिकडे लक्ष देऊ नये. व आपले काम नाम घेणे, हे करीत जावे. विकार आपोआपच कमी होतील. मात्र मनापाठीमागे देहाला जाऊ न देणे इतके जपले पाहिजे.


मनात उगाच वाईट विचार येतात. तर त्या विचारांची व नामाची सांगड घालून द्यावी. म्हणजे अशा वेळेला नामस्मरण करावे.


आशीर्वाद.

🌷☘🌼

, ☘ श्रीराम 🌷समर्थ ☘


अमृतधारा  १०८३


प्रापंचिकांना मी राम राम म्हणावयास सांगतो. व परमार्थ करण्यास येतात त्यांना प्रपंच करावयास सांगतो. आणि दोघेही मला नावे ठेवतात. प्रापंचिक म्हणतात, आम्हाला परमार्थ नको. प्रपंचात येणारी दुःखे आपण दूर करावी. आमच्या कामना पूर्ण कराव्या व त्या करता आम्ही रामराम म्हणू, नाम घेऊ.


त्यांना चुचकारून, केंव्हा केंव्हा त्यांच्या मनाप्रमाणे वागून, पण पुष्कळ वेळा तसे न वागता आपले ध्येय विषयभोग नव्हे. हा नरदेह त्याकरता नाही वगैरे उपदेश करून, त्यांची विषय वासना कमी करून परमार्थाकडे वळवतो.


जे परमार्थाकरता तयारी करून येतात, त्यांची तयारी कितपत आहे हे आजमावण्या करता प्रपंच करावयास सांगतो. व कदाचित तितकी तयारी नसली तरी शास्त्राविरुद्ध असे त्यांचे आचरण होत नाही.


प्रपंच दुःखमय आहे, सुखमय नाही असे वारंवार अनुभव येतात. तरीपण आपण ते ओळखत नाही. आपली वाट चुकली तर जेथून वाट चुकली तेथपर्यंत परत जायला नको का? चुकीची दुरुस्ती करणे जरूरी आहे. पण हा म्हणतो विषयात, प्रपंचात आनंद आहे. प्रपंच दुःखमय असून त्याचा वीट आणणे ही संतांची मोठी कामगिरी होय.


आशीर्वाद.

🌷☘🌼

   🌷 श्रीराम 🙏🏻 समर्थ 🌷


अमृतधारा  १०८४


आपण परमार्थ करू लागलो म्हणजे व्यवहार सोडतो व जसे काही पूर्ण वैराग्यशील झालो असे दाखवतो. व्यवहार करु लागलो म्हणजे परमार्थाची आठवण सुद्धा नसते. भगवंत मिळवण्याकरता परमार्थाचे ध्येय पुढे ठेवून व्यवहार करावा. यालाच व्यवहारदक्ष म्हणतात.


परमार्थ आनंदाने करावा. परमार्थ म्हणजे सच्चिदानंदरूप होणे. खीर करावयाची असल्यास त्यात साखरच घालावी लागते. तिखट घालून खीर कशी होणार? म्हणून परमार्थ आनंदानेच मिळविला पाहिजे. काबाड कष्टाने, देहदुःखाने तो कसा मिळणार? पण आळसाचा आनंद मात्र नको.


स्वस्थ आनंदात असणे हा परमार्थ. यालाच सर्व धर्म टाकून भगवंतास शरण जाणे म्हणतात. अभिमानरहित होणे ते हेच, पण हा अभिमान जाणे अत्यंत कठीण आहे.


साधकाने उचित कर्में ही केलीच पाहिजेत. दुष्कर्माच्या अभिमानापेक्षा सत्कर्माचा अभिमान त्यातल्या त्यात बरा. म्हणून साधकाने दुष्कर्में अजिबात टाकावी. सत्कर्में करीत रहावे.


त्यातला अभिमान जाण्याकरता प्रथम ती सत्कर्में भगवंतास अर्पण करावी. व नंतर हे सर्व ईश्वर इच्छेने घडत आहे, तोच करीत आहे. आपण करीत नाही, ही भावना दृढ करावी म्हणजे अभिमान विगलित होतो.


आशीर्वाद.

☘💦🌷

   🌷 श्रीराम 🙏🏻 समर्थ 🌷


अमृतधारा  १०८५


परमार्थाकरता परिस्थिती आड येत नाही. आपण परिस्थितीचा दुरुपयोग करतो किंवा ती आपल्याला नकोशी वाटते. ज्या परिस्थितीत देवाने ठेवले तीच योग्य असते.


"प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे समाधान भंगते, साधन होत  नाही". हे म्हणणे बरोबर नाही. प्रकृती उत्तम आहे आणि कोणी शिव्या दिल्या तर समाधान भंगेल ना? खरे समाधानाचे मूळ कशात आहे हे पहावे.


समाधान भंगते म्हणजे तत्पूर्वी समाधान होते ना? मग त्या वेळेला काय स्थिती होती ते पहावे. समाधान आपण आपल्याला विसरण्यात आहे. विषयाचा विसर झाला पाहिजे. मीपणा विसरला पाहिजे. आणि मीपणा विसरण्यासाठी भगवंताच्या स्मरणात राहिले पाहिजे. त्या करता नाम घेतले पाहिजे.


भगवंताला शरण जाण्यास तो ज्या स्थितीत म्हणजे अहंभावरहित, गुणातीत झाले पाहिजे. ते भगवत्कृपेशिवाय होणे शक्य नाही. साधन करावयाचे ते या भगवंताच्या कृपेकरिताच करावयाचे. आपल्याला विषयाशी अनन्य (म्हणजे त्याशिवाय दुसरे काही नाही असे) होता येते. ते भगवंताशी व्हावयास पाहिजे.


आशीर्वाद.

☘💦🌷

   🌷 श्रीराम 💧 समर्थ 🌷


अमृतधारा  १०८६


प्रत्येक आस्तिकास व नास्तिकास आनंदात सुखात राहावेसे वाटते. निर्भय स्थिती म्हणजे खऱ्या आनंदाची स्थिती. पण सुखाच्या ऐवजी काळजी, भीती व दुःखेही येतात.


परमेश्वराला ही उत्पन्न करता येत नाहीत. आम्हीच ह्या गोष्टी उत्पन्न केल्या आहेत. वास्तविक त्यांना काडी इतकी सत्ता! अंधार म्हणजे प्रकाशाचा अभाव. त्या प्रमाणेच या गोष्टी होत.


भय द्वैतात, भेदात उत्पन्न होते. सिंह, सर्प यांची पिल्ले त्यांना भीत नाहीत. कारण ती भेद पाहत नाहीत. त्यांच्याकडे ती आपलेपणाने पाहतात. सर्वांच्या अंतर्यामी असणारा राम आपलेपणाने ओळखता आला पाहिजे.


प्रथम आपल्या अंतर्यामी असणाऱ्या रामाला ओळखले पाहिजे, व तेच आपले प्रथम रुप आहे हे जाणले पाहिजे. नंतर जे दृष्टीस पडेल त्यात ते आहे हे ओळखले पाहिजे.


प्रथम अभिमानाने, मीपणाने कर्तेपण आपल्याकडे घेतो. व परमात्मा राम जो खरा कर्ता आहे, ज्याच्या इच्छेने सर्व घडत आहे, त्याला विसरून, त्याला न ओळखता, भिन्नपणाने राहतो व दुःखात, काळजीत पडतो.


आशीर्वाद.

🍁🌼☘

   ☘ श्रीराम 🌷 समर्थ ☘


अमृतधारा  १०८७


जे काही परमात्म्याच्या इच्छेने सर्व घडत आहे, ते तसे न घडता दुसरे काही घडावे अशी इच्छा होणे व ते कसे घडून येईल याची विवंचना करणे म्हणजे काळजी करणे.


परमात्म्याचे आपण होणे, त्याच्या इच्छेत आपली इच्छा मिसळणे व दुसरी इच्छा न उद्भवणे असे झाले म्हणजे काळजीला जागा कोठे राहिली. आणि भयही कोठले?


आपल्यातील राम अनुभवून दुसऱ्यातील राम ओळखण्यापूर्वी आपलेपणाची भावना सर्वत्र केली पाहिजे. अंधारामुळे एकाच्या डोक्यावरची आंब्याची पाटी दुसऱ्याच्या धक्क्याने पडली. वास्तविक पहिल्यालाही तो दुसरा दिसला नव्हता. पण त्याने दुसऱ्याला रक्त येईपर्यंत मारले.


कुणीतरी कंदील आणला तेंव्हा पाहतो तर तो आपला भाऊ म्हणून समजले. मग त्याला अत्यंत वाईट वाटले. आपल्याला आई काय म्हणेल असेही वाटले व तो त्याची आपलेपणाने शुश्रूषा करू लागला.


आपलेपणात प्रेम येते. म्हणून सर्वांनाच आपलेपणाने पहाण्यास शिकले पाहिजे. सर्वत्र आपण परमेश्वराची लेकरे आहोत ही भावना ठेवली पाहिजे .


आशीर्वाद.

🌼🌷💦

   🍁 श्रीराम 🙏🏻 समर्थ 🍁


अमृतधारा  १०८८


भगवंतानी मी अमक्या तमक्यात आहे असा विभूती योग सांगितला. ज्याला एका ठिकाणापेक्षा अनेक ठिकाणी राहता येते, तो सर्व ठिकाणी असू शकेल, म्हणून भगवंत सर्वव्यापी आहे.


प्रत्येकाला सर्वव्यापीची उपासना करता यावयाची नाही, म्हणून जेथे उत्तम गुण आहेत तेथे माझी विभूती (म्हणजे मी) आहे म्हणून सांगितले.


चांगले गुण ती भगवंताची विभूती. मग प्रत्येक वस्तुत काही तरी चांगला गुण असतो व ती वस्तू उपयोगी असते. मग सर्व ठिकाणी भगवंत असतो. तो सर्वव्यापी आहे हे ठरत नाही का?


आपण लोकांचा द्वेष करतो म्हणजे आपण त्यातला भगवंत पाहात नाही. ज्याचा द्वेष करतो त्याच्या नुकसानापेक्षा जो द्वेष करतो त्याचे त्याचे अधिक नुकसान होते.


भगवंताने सृष्टी उत्पन्न केली तर त्यात दोष कसे असतील? जर त्यात तुम्हाला दोष दिसत असतील, तर ते तुमच्यात आहेत. तुम्ही आपलेच दोष त्याच्यात पाहतात.


तुमच्यात दोष आहेत. त्याचे कारण तुम्ही आपल्यातला भगवंत पाहात नाही. त्याची ओळख पटू द्या, म्हणजे दोष कोठेही दिसणार नाही. व सर्वाभूती भगवंत दिसू लागेल.


आशीर्वाद.

☘🌸🌻

   🍁 श्रीराम 🙏🏻 समर्थ 🍁


अमृतधारा  १०८९


आपण लोकांच्या उपयोगी पडलो (सर्वाभूती भगवंत समजून), त्यांची सेवा केली तर ती भगवंतापर्यंत पोहचते. भगवंताने लोककल्याणार्थ, लोकांची सेवा करण्यासाठी काही शक्ती द्याव्यात असे काहींना वाटते.


पण परमात्म्याला एकदा देह अर्पण केल्यावर अमुक एका देहामार्फतच लोककल्याण करावे अशी इच्छा का? याचा अर्थ  देहबुद्धी सुटली नाही असा नव्हे का? शक्ती वापरण्याचे सामर्थ्य आल्यावर, परमात्मा कदाचित ते देईलही, पण लहानाच्या हाती तलवार देऊन काय उपयोग?


परमेश्वराला तुझी सेवा किती दिवस करू असे विचारणे म्हणजे सेवेला कमीपणा येतो. तसेच त्याचे नामाबद्दल पण! नामाला मुदत कशी घालता येईल. विषय किती दिवस भोगू असे आपण म्हणत नाही. मग नामाबद्दल कां विचारावे?


वेदांनी सांगितलेला भगवंताचा प्राप्तीचा मार्ग शास्त्रांनी स्पष्ट केला व संतांनी आचरून त्यातील अडचणी सांगितल्या. अडचणी कशा टाळाव्या हे संत शिकवतात पण आपण यासाठी अमुक अमुक करावेच लागेल असे मानून संतांवर अविश्वास दाखवला. उलट, संतांनी सोपे नाम साधन कसे करावे सांगितले; परंतु आपला त्यावर विश्वास बसत नाही.


आशीर्वाद.

🌸☘💧

,   ☘ श्रीराम 🌹समर्थ ☘


अमृतधारा  १०९०


जो जे करतो त्यात तो असतो व उरतोही. परब्रह्माने ब्रह्मांड निर्माण केले. त्यात तो असतो, म्हणून ते पाहून ब्रह्माची आठवण नाही का होत? म्हणून सर्वाभूती भगवंत पाहाण्यास सांगतात.


सर्वात तो असतो म्हणून आपणातही तो आहे. त्याची प्रथम जाणीव करून घ्यावी. पिंडावरून ब्रह्मांडाची ओळख होते. स्वतःत ब्रह्म पाहिले की ते ब्रह्मांडात आपोआप दिसते.


जग सर्व पिवळे दिसावेसे वाटले, तर आपण स्वतः पिवळी आरशी (चष्मा) लावावी. जग सुधारावे असे वाटल्यास प्रथम आपण सुधारावे. आपले हित पाहावे. दुसऱ्याला सुधारण्याचे प्रयत्न करु नये.


जगात देव पाहावयाचा असेल तर आपल्यातला देव  प्रथम अनुभवावा. जो लबाडीने वागतो तो भरभराटीत (ऐश्वर्यात) राहातो. व जो न्यायाने राहातो तो हालअपेष्टात. हा उलटा न्याय नाही का? याला उपाय स्वतःला सुधारावे.


दुसऱ्यापासून सुख मिळेल ही बुद्धी असल्यामुळे तो लोकांनी सुधारावे, त्यांना चांगली बुद्धी द्यावी म्हणतो. वास्तविक आपण सुधारलो की सर्वच चांगले दिसतील.


आशीर्वाद.

🍀🌸💦

   ☘ श्रीराम 🌹समर्थ ☘


अमृतधारा  १०९१


चित्तामध्ये विषय पूर्वीच्या भोगाच्या संस्काररुपाने असतात. पूर्वी जे विषय भोगले ते त्यातून सुख मिळेल म्हणून. विषयात सुख नाही असे संत सांगतात म्हणून श्रद्धा ठेवावी. किंवा आपल्या विचाराने, अनुभवाने ठरवावे.


चित्तवृत्ती परमेश्वराकडे लावावी. तेथून वृत्ती विषयाकडे जाऊ लागली म्हणजे ती संधी साधावी. सावध असावे. त्यावर लक्ष ठेवावे. मन विषयाकार होऊ लागले म्हणजे माझे स्मरण करावे. बऱ्याच वेळाने आठवण झाली तरी त्यावेळी माझे स्मरण करावे म्हणजे पुढे लवकर आठवण होऊ लागेल.


तसेच एका वृत्तीतून दुसऱ्या वृत्तीत जात असताना सावध असावे. ती संधी साधावी. माझे स्मरण करावे. तसे न झाले तरी जेंव्हा वृत्ती गेली असे कळेल तेंव्हा तरी माझी आठवण करावी.


आपण पोटभर जेवलो म्हणजे तृप्ती वाटते. म्हणजे तृप्ती पूर्ततेत आहे. आता आजपर्यंत विषय भोगले त्यात पूर्तता झाली का? काही तरी उणे भासले. तेव्हा विषयापासून खरे सुख प्राप्त होणे शक्य नाही हे लक्षात आले.


वास्तविक विषय जड. ते सुख किंवा दुःख कोठून देणार? त्या बद्दलची आपली अनुकुल किंवा प्रतिकुल बुद्धीच सुख दुःखाला कारण असते.


देहाला दुखणे, प्रारब्ध भोग येणारच. ते भोगलेच पाहिजेत. देहभोग संपला की भगवंताच्या कृपेने रोग जातात.


आशीर्वाद.

🌹🍀💦

   💧 श्रीराम 🍁 समर्थ 💧


अमृतधारा  १०९२


देहबुद्धी ज्याने वाढते ते दुष्कर्म, पाप. आणि ती ज्याने कमी होते ते सत्कर्म होय. मी तालासुराकडे लक्ष ठेवून चांगले भजन केले, असे वाटले पण भजनात देवाकडे लक्ष नसेल तर ते भजन नाही होणार.


भगवंताची आठवण ठेवून भाजी आणली तर ते भजनासारखे होईल. पण देवाला विसरुन भजन केले तर ते भजन होणार नाही. ते पाप होईल. गाईचा जीव वाचविण्याकरिता कसायाशी असत्य बोलणे पुण्य होईल. पाप पुण्य हे त्याच्या फळावरुन ठरविले जाते.


जगाचे डोळे चुकवून पाप करता येईल. पण देवाचे डोळे चुकविता यावयाचे नाहीत. कुठलेही दुष्कृत्य करताना जगाला भिण्यापेक्षा देवाला भ्यावे. परमेश्वराच्या स्मरणात  विषय भोगले तर हळूहळू आसक्ती कमी होईल.


भगवंताचा म्हणून प्रपंच केला तर तो परमार्थ होईल. प्रपंच करताना रामकर्ता ही जाणीव ठेवावी. परमार्थ म्हणजे देवाचे होऊन राहाणे. आपण देवाचे मुल होऊन राहावे.


भगवंताकडे नेईल असे सत्कर्म करावे पण ते कर्तेपण सोडून करावे. म्हणजे गुरुआज्ञा प्रमाण मानावी. सद्गुरु सांगतात ते करणे याचे नाव अनन्य भक्ती. या करण्याचा (कुठल्याही प्रकाराने) मोबदला मागितला तर त्याला भक्ती कसे म्हणता येईल.


आशीर्वाद.

🍁☘💧

   ❗💧श्रीराम समर्थ 💧❗


अमृतधारा  १०९३


व्यवहार दक्ष म्हणजे जो व्यवहारात राहून आपले हित साधतो तो व्यवहार दक्ष. आपले हित म्हणजे देवाचे होणे, भगवत्प्राप्तीचा मार्ग चालणे.


प्रपंचात जसे साडेतीन मुहूर्त हे प्रापंचिक कामाकरता उत्तम मुहूर्त असतात, तसे परमार्थाकरता परमात्म्याचे जयंत्यादि दिवस सत्य संकल्प करण्याकरता उत्तम मुहूर्त असतात.


सद्गुरुने कृपा करावी असे आपण म्हणतो, त्याकरता सद्गुरुच्या दारी धरणे धरुन नको का बसायला? जोपर्यंत मी काही करीन असा मीपणाचा, कर्तेपणाचा अभिमान धरतो, तोपर्यंत साधने करावी लागतात.


सर्व करणे सद्गुरुकडे आहे अशी बालंबाल खात्री झाली म्हणजे त्याला उद्धार  करायला वेळ लागत नाही. गुरुआज्ञा प्रमाण माना, म्हणजे कर्तेपण नाहीसे होईल.


भक्ती निर्विकार रीतीने प्राप्त होते. विकार अहंबुद्धीने उत्पन्न होतात.  राम कर्ता मानीत गेल्याने अहंबुद्धी जाते.


साधन हे अभिमान घालविण्याकरता  करायचे की वाढविण्याकरता? अभिमान घालविण्याकरता जे साधन करायचे त्या साधनाचाच जर तुम्ही अभिमान धरला, तर तुमचा अभिमान जाईल कसा?


आशीर्वाद.

💦☘🏵

   💧❗श्रीराम समर्थ ❗💧


अमृतधारा  १०९४


परमात्म्याजवळ, तू वाटेल त्या स्थितीत मला ठेव; पण माझे समाधान भंगू देऊ नको, माझा मीपणा काढून टाक, तुझा विसर पडू देऊ नको, मला अमुक एक तुजजवळ मागावे अशी इच्छा देऊ नको, नामामध्ये मला प्रेम दे, तुझे चरणीं दृढ श्रद्धा दे असे मागावे.


समाधानाचे सोंग आणता यावयाचे नाही. तो धर्म मनाचा आहे व अनुभवही मनालाच येतो. जे काही आपण करतो त्याचा अनुभव येईल. परमार्थाचा येत नाही म्हणजे तो मार्ग परमार्थाचा नाही, हा अनुभव नव्हे का?


गोष्ट जरी तीच असली तरी प्रत्येकाचा अनुभव निरनिराळा असतो. साप आला तर एकाला महाराज त्या रूपाने आले असे वाटते. तर दुसऱ्यास तो सापच वाटतो. तेंव्हा मनाची भुमिका तयार करावयास पाहिजे.


अनुभव येण्यास साधना नको का करायला? अनुभवाकडे दृष्टी ठेवली की साधनात ढिलेपणा येतो. अनुभवाकरता जे करणे जरूर असेल ते केले म्हणजे अनुभव ठेवलेलाच.


परीक्षेला बसायचे नाहीच असा निश्चय करून नेटाने अभ्यास करावा. अभ्यास चांगला झाला की परीक्षेला बसल्यावर यशाचा अनुभव येतोच. आम्हाला फळ हवे पण कर्म नको. कर्म पुरे झाल्यावरच अनुभव येतो. अर्धे कर्म झाल्यावर अर्धा अनुभव द्या असे म्हटले तर कसे चालेल? नामाचा अनुभव नामातच येईल. दुसऱ्यात कसा येईल?


आशीर्वाद.

💧☘🌷

   🌷श्रीराम 🙏🏻समर्थ 🌷


अमृतधारा  १०९५


मूर्खामधे मूर्खपण हे की भगवंताला विसरणे. पश्चातापासारखे प्रायश्चित्त नाही. पण ती चुकीची गोष्ट पुन्हा हातून होणार नाही ही दक्षता घेतली पाहिजे. स्वार्थामध्येच सर्व कामक्रोधादि येतात.


आपल्या मागे आपल्या मुलाबाळाचे कसे होईल म्हणून काळजी करता. पण तुमचे आईबाप गेले तरी तुमचे चालले आहे ना? दुसरे, तुम्ही असला म्हणजे मुलाबाळांचे चांगले होईल असे थोडेच आहे? एक परमेश्वरच सर्वांची काळजी करतो व ज्याचे त्याला योग्य ते देतो.


कोणाचा द्वेष करू नये. पण कोणाच्या प्रेमातही गुंतून पडू नये. नित्य मारुतीस जावे. तो आपला पाठीराखा आहे अशी दृढ भावना असावी. आपले हितगुज अडचणी आपण त्याला सांगाव्यात.


देवाचा प्रसाद मग तो गोड असेल किंवा कडू असेल, तो जसा आदराने आपण ग्रहण करतो तसे संकटे व  दुखणे देवाचा प्रसाद म्हणून ग्रहण करावे (म्हणजे दुःखाची तीव्रता जाणवणार नाही).


आपण कडू प्रपंच गोड करून घेतला. आणि गोडाला (परमात्म प्राप्तीचे साधन  नाम) गोड मानत नाही. याचे कारण तुम्हाला (विषय ज्वर) ताप आला आहे. जसे ताप आलेल्या माणसाला साखर गोड लागत नाही, तसे तुम्हाला नाम गोड लागत नाही.


ज्याने नाम घेतले त्याला प्रपंचाचा मळ नाही लागला. परमार्थातील विघ्नें त्याला बाधत नाही. कष्टाने नाम घेऊ नका. नामातच गुरुला पाहावे.


आशीर्वाद.

🌷☘🌼

   💧श्रीराम 🌷समर्थ 💧


अमृतधारा  १०९६


शास्त्री पंडीत म्हणतात की आमच्याकरता ज्ञानमार्ग हा राजमार्ग आहे. पण त्यांच्या लक्षात येत नाही की तो अत्यंत कठीण आहे. त्यात  देहबुद्धी, अभिमान नष्ट होण्याऐवजी वाढण्याचा संभव जास्त.


बाह्य सत्य (दिसणारे, वाटणारे) जगत मिथ्या हे तत्व त्यांच्या बुद्धीला पटते. परंतु त्याचा अनुभव मात्र त्यांना येत नाही. जग मिथ्या आहे असे ते म्हणतात, पण आपल्या देहाला मात्र सत्य मानतात. नुसत्या विचाराने देहाचे मिथ्यापण अनुभवास येणे हे अत्यंत कठिण आहे.


ब्रह्म प्राप्तीचा सर्व श्रेष्ठ प्रयत्न केल्यावरही ब्रह्म प्राप्ती होत नाही असे ठरले म्हणजे ज्ञानमार्गातील इतर उपायांचा अवलंब न करता मग उपासनेचा, नाम स्मरणाचा अवलंब करून त्यांना ब्रह्म प्राप्ती होते.


एखादा रोगी मोठ मोठ्या  औषधे घेउनही गुण येत नाही हे पाहून एखाद्या वैदुचे तरी झाड पाल्याचे औषध घेऊन पाहु असे म्हणतो व ते औषध घेऊन त्याला गुण येतो, अशा प्रमाणे हे झाले.


भगवंत, नाम हे सत्य मानणे, शाश्वत मानणे हा विवेक. भगवंत ठेवील त्या परिस्थितीत समाधान मानणे हे वैराग्य.


आपल्या प्रमाणे आपला गुरु आहे अशी जाणीव ठेवावी. तो गुरू आपल्या मागे येण्यास त्याला जे आवडते ते नाम घ्यावे, म्हणजे वासरा मागे गायी प्रमाणे तो येईल.


आशीर्वाद.

🍁🌼☘

   🍁 श्रीराम 🙏 समर्थ 🍁


अमृतधारा  १०९७


कर्मठ ब्राम्हण म्हणतो की आम्ही आपल्या कर्म मार्गानेच जाणार. वेदांनी घालून दिलेली बंधनें व नियम यांचे पालन करणार. आमचा नामावर विश्वास नाही. असे म्हणून बंधनें व नियम यांचे इतके पालन करतो की तो सर्वस्वी बंधनालाच मानतो.


त्याला हे कळत नाही की ईश्वर प्राप्ती हे साध्य असून बंधने हे साधन आहे. साध्य साधण्यापुरतीच बंधने पाळावयाची असतात. फुलझाडांची बाग रक्षण करण्यापुरतेच बागेचे कुंपण. हे आपले कुंपणालाच सर्वस्व मानतात. त्याचे खतपाणी घालून रक्षण करतात, व आत जातच नाही.


नामावर विश्वास नाही म्हणतो. पण संध्येच्या किंवा  कोणत्याही वैदिक कर्माच्या सुरवातीला केशवाय नमः म्हणतो. मग हे नाम नव्हे तर काय?


काही लोक म्हणतात नुसते राम राम म्हणून ईश्वर प्राप्ती होईल असे आम्हास वाटत नाही. ते म्हणतात नोकरी नोकरी असा जप केल्याने नोकरी मिळेल का? त्याकरता खटपट केली पाहिजे.


नोकरी मिळणे यात द्वैत (भेद, भिन्नता) आहे. एक  नोकरी, दुसरा  नोकरी करणारा, तिसरा  नोकरी देणारा. व हे कायमच राहणार. पण नामस्मरण करता करता, नामस्मरण करणारा स्वतः आपल्याला विसरून जातो व तो नामात एकरूप होतो. या ठिकाणी द्वैत नाही. तेंव्हा   राम राम म्हणून ईश्वर प्राप्ती होईल यात संशय नाही.


आशीर्वाद.

🍁☘🌼

, 🍁 श्रीराम 🌼 समर्थ 🍁


अमृतधारा  १०९८


काही साधकांची एक चूक अशी होते की ते गुरुलाच साधन मानतात. व साध्यवस्तू  काही दुसरी वेगळी आहे असे समजतात. वास्तविक सद्गुरु हेच साध्य आहे. व ती वस्तू प्राप्त झाली म्हणजे दुसरे काही मिळवायचे किंवा करायचे आहे अशी भावनाच उरू नये. हे जर साधत नसेल तर निदान गुरुने सांगितलेले साधनच साध्य मानून ते साधन चिकाटीने करीत असावे.


समाधान एकात  अद्वैतात असते. साध्याकडे लक्ष ठेवले, तर साधन लक्षपूर्वक कसे होईल? परीक्षा पास होण्याकरता अभ्यास करायचा ही गोष्ट खरी. पण अभ्यास करताना परीक्षा पास कशी होईल अशी काळजी करु लागलो तर अभ्यास कसा होईल? अशावेळी अभ्यासच करावा. परीक्षेचे मनात सुद्धा आणता कामा नये. अभ्यास चांगला झाला म्हणजे परीक्षा पास होणारच. तसेच साधन मनापासून झाले म्हणजे साध्य मागून आलेच पाहिजे.


काही लोक म्हणतात की आम्ही चित्ताची एकाग्रता झाल्याशिवाय नामस्मरण करणार नाही. पण नामस्मरण केल्याशिवाय चित्ताची एकाग्रता होत नाही.


आता हे लोक एकाग्रता होण्याकरता एकादा ठिपका भिंतीवर काढून त्याच्याकडे नजर लावावी असे म्हणतात. अशा रीतीने एकाग्रता झाल्याचा उपयोग काय? जिकडे तिकडे त्यांना ठिपके दिसू लागतील. मग नामस्मरण (अभ्यास) करून एकाग्रता झाल्यास ईश्वरप्राप्ती का करून घेऊ नये?


आशीर्वाद.

🍁🌼☘

   🍁 श्रीराम 🌼 समर्थ ☘


अमृतधारा  १०९९


नामस्मरण करताना चित्त एकाग्र होत नाही म्हणून तक्रार करता. त्याच वेळी तुम्ही इतर गोष्टींवर लक्ष दिले तर चित्त एकाग्र कसे होणार?


नाम घेताना  मी नाम घेणारा, नाम व साध्य होणारे देवदर्शन असे जर तीन ठिकाणी तुमचे चित्त गुंतले, तर ते एकाग्र कसे होणार? नाम घेतांना मी नाम घेणारा व देव दर्शनाकरता घेतो, या दोन्ही भावना अजिबात गेल्या पाहिजेत. म्हणजे चित्त एकाग्र होईल.


आपणास जप करण्याची लाज वाटत असेल तर तो मोठ्याने करावा. लोक आपल्याला काय म्हणतील व अहंभाव वाढेल असे वाटत असेल तर कोणाला कळू न देता मनात करावा.


दासबोध वगैरे वाचीत जावे. हळूहळू अर्थ कळू लागेल.  ग्रंथास व ग्रंथकारास नमस्कार करून आपण आपला ग्रंथ मला समजावून द्यावा अशी प्रार्थना करावी. जितके आपल्याला कळणे योग्य असेल तितके कळतेच. जितके कळले असेल तितके आचरणात आणावे.


तप, अनुष्ठानात अहंकार असतो. त्याने सिद्धी, ऐश्वर्य  मिळवता येतात, पण साधू होता येत नाही. साधू होण्यास अहंकार गेला पाहिजे. व तो जाण्यास भगवंतास शरण जावे. म्हणजे आज्ञा प्रमाण मानावी.



आशीर्वाद.

🍁🌼💧

   🍁 श्रीराम 🌼 समर्थ ☘


अमृतधारा  ११००


प्रल्हाद आणि ध्रुव यांना त्यांच्या सद्गुरुनी जो मंत्र दिला तो मंत्र हल्ली नाही. ते नाम व हल्लीचे नाम निराळे म्हणून भगवत्प्राप्ती होत नाही,असा काही लोकांचा आक्षेप आहे.


पण खरे म्हणजे हल्लीचे नाम व पूर्वीचे नाम असा फरक नाही. पूर्वीचे जे नाम तेच हल्लीचे नाम आहे. ते घेण्यात मात्र फरक आहे. प्रल्हादाने किती एकनिष्ठेने नाम घेतले? प्रल्हादाला कडेलोटाची शिक्षा झाली तरी त्याने नाम सोडले नाही. आपल्या जिवाची पर्वा केली नाही. इतके त्याने नामावर प्रेम केले.


आपणही प्रल्हादाच्या निष्ठेने नाम घेतले तर आपल्याला निःसंशय राम भेटेल. निष्ठे निष्ठेत फरक आहे. पूर्वीचे नाम निराळे व हल्लीचे नाम निराळे असा फरक नाही.


जोपर्यंत परनिंदा गोड लागते, तोपर्यंत समजावे की भगवंत अजून दूर आहे.


देव सगुण का असेना, आपण त्याचे भजनात स्वतःला विसरलो म्हणजे ती  निर्गुण उपासना झाली.


संताची कृपा नामावरची निष्ठा कोणत्याही प्रसंगात ढळू देत नाही.


आशीर्वाद.

🍁🌼💧

   💧 श्रीराम 🌷 समर्थ 💧


अमृतधारा  ११०१


श्रवणाचे चिंतन, मनन झाले पाहिजे. नाहीतर व्यर्थच म्हणावे लागेल. पण हे मनन होण्यास त्यात माझे हित आहे, अशी खात्री वाटली पाहिजे. निदान श्रद्धा तशी पाहिजे.


हे मनन झाले याची खूण, त्याचा परिणाम आचरणावर घडला पाहिजे. परमार्थाचा उपयोग व्यवहारात दिसला पाहिजे. व्यवहारात जर परमार्थ येत नसेल तर त्याचा काय उपयोग?


असत्याला सत्यत्व देणे, विषय, दुःखरूप, अनित्य आहेत त्यांना सुखरूप मानणे ही माया. खोट्यावरून खऱ्याची परीक्षा होते. तशी मायेवरून ब्रह्माची परीक्षा होते. सावली पाहिली तर कोणी तरी बाजूने गेले म्हणतो. म्हणजे खोट्याला खऱ्याचे अधिष्ठान पाहिजे. व खोट्यावरून सत्याकडे जाता येते.


कोणत्याही गोष्टीची ओळख होण्याचे दोन मार्ग आहेत. १) ती अमुक एक गोष्ट असे दाखवणे. व २) ती अमुक एक गोष्ट नव्हे असे निराकरण करीत जाणे. आपण कोण ते कळणे म्हणजे आत्मनिवेदन करणे. यासाठी दुसऱ्या मार्गाचे अवलंबन मी अमुक नव्हे असे करीत जे उर्वरीत राहते ते आपले व भगवंताचे स्वरूप समजावे. साक्षी रुपाने हीच वस्तू दिसते. साक्षी असणारी वस्तू, ज्याची ती साक्ष असते अशा साक्ष्य वस्तुहून ती भिन्न असली पाहिजे. तरच तिला "साक्षी" म्हणता येईल. उदा. कोर्टातील साक्षीदार.


आशीर्वाद.

💧🌼🍁

   🍁 श्रीराम 💧 समर्थ 🍁


अमृतधारा  ११०२


श्री ब्रह्मानंद महाराजांचे पुण्यतिथी दिवशी मालाड येथे श्रीमहाराजांनी (वाणीरूप) केलेले निरुपण.


अखेरपर्यंत ज्याने वासना, इंद्रिये जिंकली व राम जोडला त्याचीच पुण्यतिथी करतात. ब्रह्मानंद बुवा माझेकडे आले तेंव्हा संसार करायाचा वगैरे अशी इच्छा होती, पण त्याचा भाव शुद्ध होता.


माझी गाठ पडल्यावर त्यांची वासना पार मावळली. मी त्यांना जेंव्हा पाहिले तेंव्हा त्यांचे हृदयात मला मीच दिसू लागलो. व त्यांना माझे हृदयात स्वतःचे रुप दिसू लागले. याला गुरु शिष्य संबंध म्हणतात.


तुम्हाला जे नाम सांगितले तेच नाम त्यांना सांगितले, पण त्यांनी तेच सत्य म्हणून घेतले. त्यामुळे त्यांना विषय असत्य वाटू लागले. त्यांना गुरुआज्ञा पालन हेच साधन सांगितले. सद्गुरु व भगवंत यात त्यांना फरक दिसला नाही.


विषयाच्या लालसेने संत समागम करणे हा सत्समागम नव्हे. संत केंव्हा केंव्हा विषय देतात. पण आपल्याला विषयाचा वीट आणण्याचा प्रयत्न करतात. संताचे घरी नुसते पडून राहिल्याने शुद्ध भाव येईल. आपण महाराजांचे आहोत असे छातीठोकपणे सांगत चला.


आशीर्वाद.

💦☘🌷

   ☘ श्रीराम 🌹समर्थ ☘


अमृतधारा  ११०३


भगवंताला अनन्य शरण जाऊन "तुझ्या नामाचे प्रेम मला दे" अशी काकुळतीने प्रार्थना करावी. म्हणजे नामाचे प्रेम आपोआप वाढेल व भगवंताचे खरे दर्शन घडेल.


काही नाही केले तरी चालेल पण महाराज आपल्या मागे पुढे आहेत अशी दृढ भावना असू द्यावी. मला सुख दुःख दोन्ही नाही, पण तुम्ही दुःखी झाला तर मला दुःख होते. तेंव्हा तुम्ही कधी दुःखी होऊ नका.


मी देह ठेवल्यानंतर "महाराज गेले नाहीत, आपले पाठीराखे आहेत" असे तुमच्यापैकी एकाला तरी वाटत होते का? तुमची अशी हीन अवस्था पाहून मी गेलो नाही, आहे असा धीर देण्याकरिता लोकापवाद सोसून या अशा तऱ्हेने (वाणीरुपात) मला यावे लागले. आईच्या आपल्या मुलाबद्दलच्या प्रेमाची कल्पना वांझेला कशी येणार?


तुम्हाला जर मला यातून सोडवायचे असेल तर, तुम्हाला प्रत्येकाला आपला आधार गेला नाही, महाराज आपले जवळच आहे अशी खात्री पाहिजे.


मी कोण आहे असे लोक विचारतात. त्यांना मी काय सांगावे? देहात असतांना मला स्पष्ट सांगता येत नसे. व्यवहाराप्रमाणे मला वागावे लागले. पण त्यावेळी मी जो होतो तोच आहे.


आशीर्वाद.

💦🙏🏻🍁

   💧श्रीराम 🌷समर्थ 💧


अमृतधारा  ११०४


प. पू. ब्रह्मानंद महाराज

श्री महाराजांविषयी काय म्हणायचे


"मी महाराजांविषयी काय सांगणार? परमात्म्याचा अवतार आपल्या गोंदवल्यात झाला. मी म्हणत होतो साकार दिसतात, पण निराकार आहेत त्याचा तुम्हाला अनुभव मिळाला ना?"


"महाराज आपल्या मागे पुढे आहेत असा दृढ विश्वास असू द्या. महाराजापेक्षा दुसरा देव नाही. एकदा श्रींच्या पायावर डोके ठेवले, आता दुसर्‍याच्या पायावर कशाला डोके ठेवावे? जन्मास येऊन महाराजांची गाठ पडली यापेक्षा दुसरा लाभ कोणता?"


"पंढरपूरचा पांडुरंग दगड नाही, आणि श्रीमहाराज माणूस नाहीत. ते प्रत्यक्ष राम आहेत. महाराज म्हणजे दयासिंधू".


पूज्य ब्रह्मानंद महाराजांनी काव्यामधे व्यक्त केलेल्या  श्रीमहाराजांविषयीच्या भावना.


गुरुराव माझे ब्रह्मची साकार केला उपकार धरुनी देह ||


नाही निराकार, नाही हो साकार

ऐसा गुरुवर माझा आहे ||


जेथे दिसे सद्गुरु चरण

तेची आम्हा गोकर्ण ||


महाराजा समान नाही त्रिभुवनी

आनंदाचे खाणी गुरुराव ||


गुरुराव माझे रामची केवळ

वासनेचे मूळ दूर केले ||


आशीर्वाद.

☘💦🍁

   ☘ श्रीराम 🌹समर्थ ☘


अमृतधारा  ११०५


कोणत्याही गोष्टीस एकदा ओळखले म्हणजे त्याची भीती वाटत नाही. विषय जोवर आपण ओळखले नाहीत, तोवरच त्रास देत असतात. परमार्थाच्या आड आपले आपणच येत असतो. परमार्थास घातुक दुसरे काही नाही.


वृत्ती कोठेही जरी उठली तरी तेथे तेथे भगवंताची आठवण केली की मावळत असते. त्याला उपाय एकच आहे. वृत्ती जेथून उठते तेथे त्याला शरण जाणे जरूर असते.


उपास्यदेवतेचे स्मरण करीत जावे. त्याचे पायावर मस्तक ठेवावे. अनन्यभावाने  शरण आहे असे सांगावे. तुझ्या आड येणारे विषय तुझ्याकृपेवाचून दूर होणार नाहीत, तरी याला काय करावे ही प्रार्थना करावी.


सकाळी उषःकाली उठत जावे. भगवंताची मूर्ती डोळ्यासमोर आणून अशी प्रार्थना करावी  तुझे विस्मरण जेथे जेथे होते तेथे मला जागृत करत जावे. मला आता तुझ्याशिवाय आसरा राहिला नाही, असे म्हणून नमस्कार करीत जावे म्हणजे आपले काम झाले.


आशीर्वाद.

💦🙏🏻🍁

   ☘ श्रीराम 🌹समर्थ ☘


अमृतधारा  ११०६


जी कृती सर्व बाजूंनी हिताची असते तीच संस्कृती होय. 'सु' म्हणजे शिव, चांगले. त्याची धारणा करणारी ती सुधारणा होय.


भगवंताकडे नेणारी कृती हीच एकटी सर्व बाजूंनी हिताची असते. कारण हित म्हणजे कल्याण आणि भगवंत तर कल्याणाचे निधान आहे. म्हणून ज्या कृतीच्या आरंभी, मध्ये व शेवटी भगवंत भरलेला आहे ती कृती संस्कृती होय.


प्रत्येक कृतीमध्ये कर्म करणारा, कर्म करण्याचे साधन आणि प्रत्यक्ष कर्म अशा तीन गोष्टी असतात. त्यांपैकी कर्म व त्याचे साधन जडच असते; पण कर्म करणारा मात्र सचेतन जीव असतो. अर्थात कर्मामध्ये भगवंत भरणारा जीव भगवंतानेच भरून गेला पाहिजे.


जीवामध्ये भगवंत भरण्यास जीवाने आपली दारे उघडी टाकली पाहिजेत. या सगळ्याचा अर्थ असा की, जो जीव मीपणाने मरून भगवंताच्या स्मरणात विरून गेला, तोच भगवंताने भरून राहिला.


आशीर्वाद.

💦🙏🏻🍁

   

   🌷 श्रीराम 💧 समर्थ 🌷


अमृतधारा  ११०७


आपण आपल्या पासूनच सुख घेण्याचे शिकावे. आपल्यातला राम आपण पाहिला म्हणजे सर्वात तो दिसू लागतो. त्यामुळे त्याला कोणातही दोष दिसत नाही.  राम आपल्यात पाहिला की जे आपण करतो ते सर्व राम  करतो असे नाही का होत? वाघाची भीती, कारण याला आपले रक्षण आपण करतो असे वाटते म्हणून. वास्तविक राम त्याला बुद्धी देतो, त्याने खाल्ले तर रामाचीच इच्छा समजावी.


मृत्युची भीती बाळगू नये. तो प्रत्येकाला केंव्हा ना केंव्हा तरी येणारच. माझे आता म्हातारपण आले आहे. मला काही करावयाचे उरले नाही. मृत्यु केंव्हा का येईना हे मृत्युची भीती न बाळगणे नव्हे. मी आता देवाचा झालो. मृत्युच्या पलीकडे गेलो (जे होईल ते देवाच्या इच्छेने होईल), असे वाटणे म्हणजे मृत्युची भीती न बाळगणे होय.


रामा सारख्याचा आपल्याला आधार असताना आपल्याला निराधार कां वाटावे? आपण काळजी कां करावी?


एखाद्या थोरामोठ्याचा मुलगा वाईट चालीचा निघाला म्हणजे लोक त्याला "याने आई बापाची अब्रू घालविली" असे म्हणतात. तरी तुम्ही काळजी करुन माझी अब्रू घालवित आहात.


मी कसा राम इच्छा मानून निष्काळजीपणाने वागत असे. तुम्ही माझे म्हणवता व काळजीत दैन्यवाणे राहाता, याला काय म्हणावे? आता माझे तुमच्या जवळ एकच मागणे आहे. माझी अब्रू घालवू नका. माझी लाज राखा.


आशीर्वाद.

💧🌼🙏🏻

   🍁 श्रीराम 🙏🏻 समर्थ 🍁


अमृतधारा  ११०८


आजपर्यंत जे नामस्मरण झाले, ते परमात्म्यानेच तुमच्या हिताकरता तुमच्याकडून करवून घेतले. तुमचे हित तुमच्यापेक्षा भगवंताला उत्तम कळते. नामस्मरण करणारे तुम्ही असता तरी कोण?


जे काही होत आहे, ते भगवंताच्या इच्छेने योग्य असे होत आहे. तुम्ही आपला मीपणा उगाच कशाला मिरवता? हा मीपणा हे कर्तेपण, हे प्रपंचाच्या व परमार्थाच्या जबाबदारीचे ओझे गुरु चरणांवर अर्पण करून आपल्या आनंदात मोकळेपणाने राहावे.


प्रयत्न अवश्य असून त्यात येणारे यश किंवा अपयश हे सर्व आपल्या हिता करताच आहे, अशी भावना केली म्हणजे काळजीला तरी जागा कोठे राहिली.


एकदा काळजी गेली म्हणजे आपला आनंद हा स्वयंसिद्ध आहेच आहे. तो काही कोठून मिळवायचा नाही. आनंदाला काळजी झाकून टाकते.


मीपण, म्हणजे कर्तेपण सर्व परमात्म्याला द्यावे. म्हणजे काळजी नाहीशी होते व फक्त निर्मळ आनंद उरतो.


अशा स्थितीत नामस्मरण चालावे. नामस्मरणाला अशा स्थितीची जोड पाहिजे. श्रीमहाराज स्वानंदात स्मरण सांगत. अशा आनंदी स्थितीत नामस्मरणात सदैव निमग्न होऊन राहाणे ते हेच

"स्वानंदात स्मरण".


आशीर्वाद.

💦🍁🙏🏻

   🙏🏼☘श्रीराम समर्थ☘🙏🏼


अमृतधारा  विशेष १


श्री काकासाहेब फडके

आणि

श्री महाराजांचा शेवटच्या

दोन दिवस आधीच्या

संवादातील काही

महत्वाची वचनें.


संचीत त्रयी बाजूस सारणे

हे साधकांच्या  साधनेवर

आहे हे सत्य समजावे.


माझे आज्ञेप्रमाणे वागला

असतां प्रत्यक्ष काळाची

देखिल मगदुर नाही की

तो तुमचे कडे पाहिल मग

संचीत क्रियामाणाची

कथा ती काय !!


साधने मधे जे अडथळे

येतात ते ध्यान धारणा,

अनुसंधान ठेवले म्हणजे

आपोआप दुर होतात.


माझा माणूस कसाही असला

तरी त्याला मार्गावर

आणिनच आणीन.


साधकाची वृत्ती किती बाणली   हे पहाण्या करीता अडथळे मी आणतो.


श्री महाराजांची साव॔त्रिक

आज्ञा, सदगुरु वचनांवर विश्वास, नामस्मरणा वाचुन दुसरे साधन श्रेष्ठ साधन नाही हा पुरा भाव ठेऊन अनुसंधान चुकू न देता नामस्मरण करणे.


श्रीं चे आश्वासन

अशा तर्‍हेने क्रम चालू ठेवला

असता कितीही अडथळे कितीही संकटे आली ती सर्व

श्रीराम दुर करून तुमचे

कल्याण करील

हा आशिर्वाद.


आशिर्वाद.

   🙏🏻श्रीराम 🛕 समर्थ🙏🏻


अमृतधारा विशेष  २


श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य

महाराज गोंदवलेकर


आपले सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर हे होते तरी कोण? हे एक गूढच होते. परंतु ते गूढ उकलणारे त्यांचे स्वतःचेच असे मोठे सूचक बोल


सूर्य आणि त्याचे किरण जसे निराळे नाहीत त्याचप्रमाणे मी आणि भगवंत हे वेगळे नाहीत.


भगवंत अवतरला आहे. तो गोंदवल्यास जन्मास आला आहे. अखंड स्मरणात ठेवा. ॐकार, ॐकार म्हणतात तोच मी आहे.


नाम म्हणजेच मी, म्हणजेच भगवंत होय.


रोज अगदी पांच मिनिटेंच कां होईना नामाने भगवंताशी म्हणजेच माझ्याशी अनन्य व्हायला शिका.


शेवटी सांगतो नामाला शरण जा. मी नामाहून वेगळा नाही. तुमच्या अंतकाळी मी उशाशी आहे.


आशीर्वाद


... श्री महाराज.


जानकीजीवन स्मरण

जयजयराम


श्रीराम जयराम जयजयराम

   🌼🙏🏻श्रीराम समर्थ🙏🏻🌼


अमृतधारा  विशेष ३


तुम्हासी सांगावे काही |

ऐसे सत्य मजजवळ नाही ||


पण एक येते मनी |

नामापरते

सत्य नाही नाही ||


तुम्ही सूज्ञ विद्वान भारी |

परमार्थाचे अधीकारी ||


तुम्ही करावे एक जतन |

नामावाचून

न कोठे गुंतवावे मन ||


जेथे भगवंताचे नाम |

तेथे उभा श्रीराम ||


हे संताचे वचन |

न मानावे अप्रमाण ||


म्हणून सदा घ्यावे

भगवंताचे नाम |

जेणे कृपा करील श्रीराम ||


...श्री महाराज.


आशीर्वाद

🙏🏻🌼🌿

  

No comments: