9 Feb 2025

श्रीमहाराजांची जन्म तिथी - माघ शु. द्वादशी - आज दि ९ फेब्रुवारी २०२५

 श्रीमहाराजांची जन्म तिथी - माघ शु. द्वादशी - आज दि ९ फेब्रुवारी २०२५


लिंगोपंतांनी पांडुरंग घरी आणला, तेव्हापासून पंत वर्षातून दोनदाच पंढरीला जात. दर शुद्ध एकादशीला घरी रात्रभर भजन होई आणि द्वादशीला उपास सोडून मंडळी आपापल्या घरी जात. पंतांची सून गीताबाई हिचे दिवस भरले आणि शके १७६६ (इ.स.१८४५) मधील माघ महिन्यातील शुद्ध एकादशी आली. दर एकादशीला गीताबाई विठ्ठलाची षोडशोपचार पूजा करीत असत. त्याप्रमाणे या एकादशीलादेखील पूजा झाली. विठोबाचे तीर्थ सर्वांना दिले आणि सर्वांचा फलाहार झाला की नाही याची चौकशी करून त्यांनी स्वतः थोडा फलाहार केला व विश्रांतीसाठी जरा अंग टाकले. तिन्हीसांज टळल्यावर त्यांच्या सांगण्यावरून सुईणीला बोलावून आणली. बाहेर मंडळींनी एकादशीचे भजन सुरु केले. गीताबाई तोंडाने नामस्मरण करीत होत्या. सासुबाईंनी किंवा आईने काळजी दाखवली तर “नामस्मरण करीत बसा; काळजी करू नका” असे त्या सांगत. पहाटे भजन संपून पांडुरंगाची आरती सुरु झाली आणि इतक्यात श्रीमहाराजांचा जन्म झाला. अशा रीतीने आपले महाराज माघ शुद्ध द्वादशीला बुधवारी पहाटे सूर्योदयाच्या सुमारास गोंदवले येथे जन्मले. आपल्याला नातू झाला हे ऐकून पंतांना परमानंद झाला आणि त्यांनी पांडुरंगावर प्रेमाने फुले उधळली व गावात साखर वाटली. श्रीमहाराजांचा जन्म म्हणजे लिंगोपंतांच्या ऐश्वर्याचा कळस होता! 


अशा या ज्ञानदीप, तेजस्वी नामसूर्याची आज जयंती. आपण सर्वजण मनापासून नतमस्तक होऊन त्यांनी दाखवलेल्या नाममार्गावर राहण्यास त्यांची प्रार्थना करूया. 


॥ श्रीराम जय राम जय जय राम ॥

No comments: