9 Feb 2025

आज श्रीमहाराज जयंती.

 ||श्रीराम|| 🙏


आज श्रीमहाराज जयंती. या शुभ दिवशी आपण सर्वांनी महाराजांना जे आवडते ते मनापासून करण्याचा निश्चय करूया. महाराजांचे सच्छिष्य पूज्य बाबा बेलसरे यांनी आपल्या विविध प्रवचनांतून व पुस्तकातून आपल्या महाराजांना काय आवडते व काय आवडत नाही याचे सविस्तर वर्णन केलेले आहे हे आपल्याला माहीतच असेल. बाबांच्याच म्हणण्याप्रमाणे आपल्या सद्गुरूंवर खरे प्रेम करणा-यांनी ह्या गोष्टी सांभाळल्या तर परमार्थ मार्गात त्यांना खासच मदत होईल. त्या गोष्टी थोडक्यात पाहूया पूज्य बाबांच्याच शब्दात-- 


१) “रामनाम” हा महाराजांचा प्राण आहे. बाकी काही करण्याची गरज नाही; फक्त नाम जपा, तुमचा प्रपंच मी पाहतो ही महाराजांची ग्वाही आहे. जमेल तेव्हा, जमेल तेवढे, आनंदाने फक्त नामच घ्या. 


२) व्यवहार सांभाळावा परंतु कुणाचे मन दुखवू नये. महाराजांनी आयुष्यभर हे तत्त्व सांभाळले.


३) राम-कर्ता असे मानून आनंदाने संसार करावा. संसार हा त्यानेच दिला आहे ना? मग तो त्याज्य कसा असेल? फक्त त्यातील आसक्ती टाकावी. 


४) मानापमानापासून लांबच राहावे. मान ही रक्तातली साखर आहे. लौकिकाला जो भुलला त्याचा परमार्थ बुडाला हे तत्व अतिशय सावधपणे अंगी बाणवावे. 


५) ‘कोणत्याही परिस्थितीत ज्याचे समाधान भंगत नाही तो माझा माणूस’ असे महाराज म्हणत आणि असे समाधान नामाने मिळते ह्यात शंका नाही. 


६) भगवंताकडे काय मागावे याचे उत्तर “माझी मागण्याची बुद्धी नाहीशी कर असे मागावे” असे महाराजांनी दिले आहे. तेव्हा आपण तेच मागावे. 


७) महाराजांना घरातील गोडवा फार आवडे. ते म्हणत, घर असे हवे की तिथे गेलेल्याला पुन्हा कधी एकदा तिथे येऊन पडतो असे झाले पाहिजे. तेव्हा आपल्या घरातील शांतता ही ‘मंदिरातील शांतता’ असावी. 


८) महाराजांना ढोंगाची फार चीड होती. ते म्हणत, प्रपंचातच जर तुम्ही ढोंग करू लागलात तर परमार्थ कसा व्हायचा? आपण स्वतःशी प्रामाणिक राहणे ही परमार्थाची सुरुवात आहे. 


९) आळशीपणापेक्षा कर्तेपणा चांगला आणि कर्तेपणापेक्षा प्रयत्नांती भगवंतावर सोपवून फळाची अपेक्षा न करणे हे उत्तम असे ते म्हणत. 


१०) परनिंदा ही परमार्थाची अतिशय हानी करते असे महाराजांचे स्पष्ट मत होते. ते म्हणत, तुम्ही त्या माणसाच्या जागी असता तर ती चूक तुमच्याकडून झालीच नसती का? परिस्थितीमुळे होणाऱ्या चुकीला सुधारण्याचा वाव दिलाच पाहिजे. कोणतीही चूक रामापाशी कबूल करा आणि ती पुन्हा करू नका; तुमच्या पापाचा भार मी घेतला आहे! 


११) आपल्या गोड वागण्याने लोकांना जोडा. आपल्या मागे आपली गोड आठवण राहिली पाहिजे, असे ते नेहमी सांगत.


📿 *!!श्रीराम समर्थ!!* 📿

No comments: