❗💧श्रीराम समर्थ💧❗
अमृतधारा - ८९
राजापासून रंकापर्यंत जगात प्रत्येक माणूस पराधीन आहे. प्रत्येकाला असमाधान आहे कारण त्याचे अस्तित्व पराधीन आहे.
जगात नोकर होणे व मालक होणे अशा दोन गोष्टी आहेत. त्यापैकी नोकर कोणाचे व्हावे व मालक कोणाचे व्हावे ते ठरवले पाहिजे.
सामान्य माणूस आपल्या विकारांच्या आधीन आहे. तो स्वातंत्र्य दाखवतो पण त्या विकारांच्या सत्तेत वावरतो म्हणूनच तो त्यांचा (विकारांचा) गुलाम आहे.
तुरूंगातील कैदी जसा स्वातंत्र्य दाखवतो पण त्याच्या हालचालींची मर्यादा ठरलेली असते. तसे मनुष्य विकारांच्या बाहेर जाऊ शकत नाही.
अगदी राजाला सुध्दा आधाराची अपेक्षा असते व ती प्रजेची आहे. प्रजेची अनुकूलता असेल तर राजा सुखी होऊ शकतो.
ही पराधीनता आहे तोपर्यंत माणसाला खरे समाधान मिळणार नाही.
म्हणून माणसाने स्वतःचे मालक झाले पाहिजे. म्हणजे विकारांचे मालक झाले पाहिजे. जो विकारांचा किंवा स्वतःचा मालक झाला तो जगाचा स्वामी होऊ शकतो. याकरता नीतीच्या कुंपणाची फार जरूर आहे.
सर्वानी अत्यंत नीतीने वागावे व त्यात भगवंताचे स्मरण राखावे. त्याकरता भगवंताचे नाम घ्यावे. नामाने काय होते म्हणण्यापेक्षा घेऊन पाहावे.
आशीर्वाद.
No comments:
Post a Comment